Gurucharitra Adhyay 29 is in Marathi. Name of this Adhyay is BhasmaMahima Varnanam.
आरक्त वस्त्र नेसली । जैसें दाडिंब पुष्पवेली ।
किंवा कुंकुमें डंवरिली । गिरिजा माता परियेसा ॥ १८१ ॥
बाहुदंड सुरेखा । करीं कंकण मिरवे देखा ।
रत्नखचित मेखळ देखा । लेहली असे अपूर्व जे ॥ १८२ ॥
चरण शोभती महा बरवे । असती नेपुरें स्वभावें ।
ऐसें पार्वती-ध्यान घ्यावें । म्हणती गण समस्त ॥ १८३ ॥
अष्टमीच्या चंद्रासरिसा । मिरवें टिळक कपाळीं कैसा ।
त्रिपुंड्र टिळा शुभ्र जैसा । मोतियांचा परियेसा ॥ १८४ ॥
नानापरीचे अलंकार । अनेकपरीचे श्रृंगार ।
कवण वर्णूं शके पार । जगन्माता अंबिकेचा ॥ १८५ ॥
ऐसा शंभु उमेसहित । बैसलासे सभेंत ।
तेहतीस कोटी परिवारासहित । इंद्र उभा वोळगेसी ॥ १८६ ॥
उभे समस्त सुरवर । देवऋषि सनत्कुमार ।
आले तेथें वेगवक्त्र । तया ईक्ष्वरसभेसी ॥ १८७ ॥
सनत्कुमार तये वेळीं । लागतसे चरणकमळीं ।
साष्टांग नमन बहाळीं । विनवीतसे शिवासी ॥ १८८ ॥
जय जया उमाकांता । जय जया शंभु विश्र्वकर्ता ।
त्रिभुवनीं तूंचि दाता । चतुर्विध पुरुषार्थ ॥ १८९ ॥
समस्त धर्म आपणासी । स्वामी निरोपिलें कृपेसीं ।
भवार्णवीं तरावयासी । पापक्षयाकारणें ॥ १९० ॥
आणिक एक आम्हां देणें । मुक्ति होय अल्पपुण्यें ।
चारी पुरुषार्थ येथे गुणें । अनायासें साधिजे ॥ १९१ ॥
एर्हवीं समस्त पुण्यासी । करावें कष्ट असमसहासीं ।
हितार्थ सर्व मानवांसी । निरोपावें स्वामिया ॥ १९२ ॥
ऐसें विनवी सनत्कुमार । मनीं संतोषोनियां ईश्र्वर ।
सांगता झाला कर्पूरगौर । सनत्कुमार मुनीसी ॥ १९३ ॥
ईश्र्वर म्हणे तये वेळीं । ऐका देव ऋषि सकळीं ।
घडे धर्म तात्काळीं । ऐसें पुण्य सांगेन ॥ १९४ ॥
वेदशास्त्रसंमतेसीं । असे धर्म परियेसीं ।
अनंत पुण्य त्रिपुंड्रेसी । भस्मांकित परियेसा ॥ १९५ ॥
ऐकोनि विनवी सनत्कुमार । कवणें विधीं लाविजे नर ।
कवण ' स्थान ' ; ' द्रव्य ' परिकर । 'शक्ति','देवता' कवण असे ॥ १९६ ॥
कवण 'कर्तु', किं 'प्रमाण' । कोण मंत्रे लाविजे आपण ।
स्वामी सांगा विस्तारुन । म्हणोनि चरणीं लागला ॥ १९७ ॥
ऐसी विनंति ऐकोनि । सांगे शंकर विस्तारोनि ।
गोमय-द्रव्य, देवता अग्नि । भस्म करणें परियेसा ॥ १९८ ॥
पुरातनीचे यज्ञस्थानीं । जे का असे मेदिनी ।
पुण्य बहुत लावितांक्षणी । भस्माकिंत परियेसा ॥ १९९ ॥
' सद्योजाता'दि मंत्रेसीं । घ्यावें भस्म तळहस्तासी ।
अभिमंत्रावें भस्मासी । 'अग्निरित्या'दि मंत्रेकरोनि ॥ २०० ॥
'मानस्तोके' ति मंत्रेसीं । समर्दावे अंगुष्ठेसीं ।
'त्र्ंयबका'दि मंत्रेसी । शिरसीं लाविजे परियेसा ॥ २०१ ॥
' त्र्यायुषे' ति मंत्रेसीं । लाविजे ललाट भुजांसी ।
त्याणेंचि मंत्रें परियेसी । स्थानी स्थानी लाविजे ॥ २०२ ॥
तीनी रेखा एके स्थानीं । लावाव्या त्याच मंत्रांनी' ।
अधिक न लाविजे भ्रुवांहुनि । भ्रुसमान लाविजे ॥ २०३ ।
मध्यमानामिकांगुळेसीं । लाविजे पहिले ललाटेसी ।
प्रतिलोम -अंगुष्ठेसी । मध्यरेषा काडिजे ॥ २०४ ॥
त्रिपुंड्र येणेपरी । लाविजे तुम्ही परिकरी ।
एक एक रेखेच्या विस्तारीं । सांगेन ऐका एकचित्तें ॥ २०५ ॥
नव देवता विख्यातेसी । असती एकेक रेखेसी ।
'अ' कार गार्हपत्यासी । भूरात्मा रजोगुण ॥ २०६ ॥
ऋग्वेद आणि क्रियाशक्ति । प्रातःसवन असे ख्याति ।
महादेव-देव म्हणती । प्रथम रेखा येणेंपरी ॥ २०७ ॥
दुसरे रेखेची देवता । सांगेन ऐका विस्तारता ।
' उकार ' दक्षिणाग्नि देवता । नभ सत्व जाणावें ॥ २०८ ॥
यजुर्वेद म्हणिजे त्यासी । मध्यंदिन-सवन परियेसीं ।
इच्छाशक्ति अंतरात्मेसीं । महेश्र्वर-देव जाणा ॥ २०९ ॥
तिसरी रेखा मधिलेसी । ' म ' कार आहवनीय परियेसीं ।
परमात्मा दिव हर्षी । ज्ञानशक्ति तमोगुण ॥ २१० ॥
तृतीयसवन परियेसीं । सामवेद असे त्यासी ।
शिवदैवत निर्धारेंसी । तीनि रेखा येणेंविधि ॥ २११ ॥
ऐसें नित्य नमस्कारुनि । त्रिपुंड्र लाविजे भस्मेंनि ।
महेश्र्वराचें व्रत म्हणोनि । वेदशास्त्रें बोलताति ॥ २१२ ॥
मुक्तिकामें जे लाविती । त्यासी नाहीं पुनरावृत्ति ।
जें जें मनीं संकल्पिती । लाधे चारी पुरुषार्थ ॥ २१३ ॥
ब्रह्मचारी-गृहस्थासी । वानप्रस्थ-यतीसी ।
समस्तीं लाविजे हर्षीं । भस्मांकित त्रिपुंड्र ॥ २१४ ॥
महापापी असे आपण । उपपातकी जरी जाण ।
भस्म लावितां तत्क्षण । पुण्यात्मा तोचि होय ॥ २१५ ॥
क्षत्रिय-वैश्य-शूद्र-स्त्रीवध्यासी । गोहत्यादि-पातकासी ।
वीरहत्या-आत्महत्येसी । शुद्धात्मा करी भस्मांकित ॥ २१६ ॥
विधिपूर्वक मंत्रेसीं । जे लाविती भक्तिसीं ।
त्यांची महिमा अपारेसीं । एकचित्तें परियेसा ॥ २१७ ॥
जरी नेणे मंत्रासी । त्याणें लाविजे भावशुद्धीसीं ।
त्याची महिमा अपारेसीं । एकचित्तें परियेसा ॥ २१८ ॥
परद्रव्यहारक देखा । परस्त्रीगमन ऐका ।
असेल पापी परनिंदका । तोही पुनीत होईल जाणा ॥ २१९ ॥
परक्षेत्रहरण देखा । परपीडक असेल जो कां ।
सस्य आराम तोडी का । ऐसा पातकी पुनीत होई ॥ २२० ॥
गृहदाहादि केला दोष । असत्यवादी परियेस ।
पैशुन्यपण पापास । वेदविक्रय पाप जाणा ॥ २२१ ॥
कूटसाक्षी व्रतत्यागी । कौटिल्य करी पोटालागीं ।
ऐसीं पापें सदा भोगी । तोही पुनीत होय जाणा ॥ २२२ ॥
गाई-भूमि-हिरण्यदान । म्हैषी-तीळ-कंबळदान ।
घेतलें असेल वस्त्रान्न । तोही पुनीत होय जाणा ॥ २२३ ॥
धान्यदान जलादिदान । घेतलें असेल नीचापासून ।
त्याणें करणें भस्मधारण । तोही पुनीत होय जाणा ॥ २२४ ॥
दासी-वेश्या-भुजंगीसीं । वृषलस्त्री-रजस्वलेंसीं ।
केलें असती जे कां दोषी । तोही पुनीत होय जाणा ॥ २२५ ॥
कन्या विधवा अन्य स्त्रियांशीं । घडला असेल संग जयासी ।
अनुतप्त होऊनि परियेसीं । भस्म लावितां पुनीता ॥ २२६ ॥
रस-मांस-लवणादिका । केला असेल विक्रय जो कां ।
पुनीत होय भस्मसंपर्का । त्रिपुंड्र लावितां परियेसा ॥ २२७ ॥
जाणोनि अथवा अज्ञानता । पाप घडलें असंख्याता ।
भस्म लावितां पुनीता । पुण्यात्मा होय जाणा ॥ २२८ ॥
नाशी समस्त पापांसी । भस्ममहिमा आहे ऐशी ।
शिवनिंदक पापियासी । न करी पुनीत परियेसा ॥ २२९ ॥
शिवद्रव्य-अपहारकासी । निंदा करी शिवभक्तांसी ।
न होय निष्कृति त्यासी । पापावेगळा नव्हे जाणा ॥ २३० ॥
रुद्राक्षमाळा जयाचे गळां । लाविला असेल त्रिपुंड्र टिळा ।
अन्य पापी होय केवळा । तोही पूज्य तीन्ही लोकीं ॥ २३१ ॥
जितुकी तीर्थे भूमीवरी । असतील क्षेत्रें नानापरी ।
स्नान केलें पुण्य-सरी । भस्म लावितां परियेसा ॥ २३२ ॥
मंत्र असती कोटी सात । पंचाक्षरादि विख्यात ।
अनंत आगम असे मंत्र । जपिलें फळ भस्मांकिता ॥ २३३ ॥
पूर्वजन्म-सहस्त्रांती । सहस्त्र जन्म पुढें होती ।
भस्मधारणें पापें जातीं । बेचाळिस वंशादिक ॥ २३४ ॥
इहलोकीं अखिल सौख्य । होतीं पुरुष शतायुष्य ।
व्याधि न होती शरीरास । भस्म लावितां नरासी ॥ २३५ ॥
अष्टैश्र्वर्ये होतीं त्यासी । दिव्य शरीर परियेसीं ।
अंती ज्ञान होईल निश्र्चयेसीं । देहांतीं तया नरा ॥ २३६ ॥
बैसवोनि दिव्य विमानीं । देवस्त्रिया शत येऊनि ।
सेवा करिती येणें गुणीं । घेऊनि जाती स्वर्गभुवना ॥ २३७ ॥
विद्याधर सिद्धजन । गंधर्वादि देवगण ।
इंद्रादि लोकपाळ जाण । वंदिती समस्त तयासी ॥ २३८ ॥
अनंतकाळ तया स्थानीं । सुखें असती संतोषोनि ।
मग जाती तेथोनि । ब्रह्नलोकीं शाश्र्वत ॥ २३९ ॥
एकशत कल्पवरी । रहाती ब्रह्मलोकीं स्थिरी ।
तेथोनि जाती वैकंठपुरीं । विष्णुलोकीं परियेसा ॥ २४० ॥
ब्रह्मकल्प तीनवरी । रहाती नर वैकुंठपुरीं ।
मग पावती कैलासपुरीं । अक्षय काळ तेथें रहाती ॥ २४१ ॥
शिवसायुज्य होय त्यासी । संदेह सोडोनियां मानसीं ।
लावा त्रिपुंड्र भक्तीसीं । सनत्कुमारादि सकळिक हो ॥ २४२ ॥
वेदशास्त्रादि उपनिषदार्थ । सार पाहिलें मीं अवलोकित ।
चतुर्विध पुरुषार्थ । भस्मधारणें होय जाणा ॥ २४३ ॥
ऐसें त्रिपुंड्रमहिमान । सांगितलें ईश्र्वरें विस्तारुन ।
लावा तुम्ही सकळ जन । सनत्कुमारादि ऋषीश्र्वर हो ॥ २४४ ॥
सांगोनि सनत्कुमारासी । गेला ईश्र्वर कैलासासी ।
सनत्कुमार महाहर्षी । गेला ब्रह्मलोकाप्रती ॥ २४५ ॥
वामदेव महामुनि । सांगती ऐसे विस्तारोनि ।
ब्रह्मराक्षसें संतोषोनि । नमन केलें चरणकमलासी ॥ २४६ ॥
वामदेव म्हणे राक्षसासी । भस्ममाहात्म्य आहे ऐसी ।
माझें अंगस्पर्शेसीं । ज्ञान तुज प्रकाशिलें ॥ २४७ ॥
ऐसें म्हणोनि संतोषीं । अभिमंत्रोनि भस्मासी ।
देता झाला राक्षसासी । वामदेव तया वेळीं ॥ २४८ ॥
ब्रह्मराक्षस तया वेळीं । लावितां त्रिपुंड्र कपाळीं ।
दिव्यदेह तात्काळीं । तेजोमूर्ति जाहला परियेस ॥ २४९ ॥
दिव्य अवयव झालें त्यासी । जैसा सूर्यसंकाशी ।
झाला आनंदरुप कैसी । ब्रह्मराक्षस तया वेळीं ॥ २५० ॥
नमन करुनि योगीश्र्वरासी । केली प्रदक्षिणा भक्तिसी ।
विमान आले तत् क्षणेसी । सूर्यसंकाश परियेसा ॥ २५१ ॥
दिव्य विमानीं बैसोनि । गेला स्वर्गासी तत्क्षणीं ।
वामदेव महामुनीं । दिधला तयासी परलोक ॥ २५२ ॥
वामदेव महादेव । मनुष्यरुप दिसतो स्वभाव ।
प्रत्यक्ष जाणा तो शांभव । हिंडे भक्त तारावया ॥ २५३ ॥
त्रयमूर्तीचा अवतारु । वामदेव तोचि गुरु ।
करावया जगदोद्धारु । हिंडत होता भूमीवरी ॥ २५४ ॥
भस्ममाहात्म्य असे थोरु । विशेष हस्तस्पर्श गुरु ।
ब्रह्मराक्षसासी दिधला वरु । उद्धार गति परियेसा ॥ २५५ ॥
समस्त मंत्र असती । गुरुविणें साध्य नव्हती ।
वेदशास्त्रें वाखाणिती । ' नास्ति तत्त्वं गुरोः परम् ' ॥ २५६ ॥
सूत म्हणे ऋषेश्र्वरांसी । भस्ममाहात्म्य आहे ऐसी ।
गुरुहस्तें असे विशेषीं । तस्माद् गुरुचि कारण ॥ २५७ ॥
येणेंपरी त्रिविक्रमासी । सांगती श्रीगुरु विस्तारेसीं ।
त्रिविक्रमभारती हर्षी । चरणांवरी माथा ठेवित ॥ २५८ ॥
नमन करुनि श्रीगुरुसी । निघाला आपुले स्थानासी ।
झालें ज्ञान समस्तांसी । श्रीगुरुच्या उपदेशें ॥ २५९ ॥
येणेंपरी सिद्धमुनि । सांगते झाले विस्तारुनि ।
ऐकतो शिष्य नामकरणी । भक्तिभावेंकरुनियां ॥ २६० ॥
म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
भक्तिभावें ऐकती नर । लाधे चारी पुरुषार्थ ॥ २६१ ॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने
सिद्ध-नामधारकसंवादे
भस्ममहिमावर्णनं नाम एकोनत्रिंशोऽध्यायः ॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
Gurucharitra Adhyay 29
गुरुचरित्र अध्याय २९
Custom Search