Dashak Tisara Samas Satava Aadhibhutik Tap
Samas Satava Aadhibhutik Tap is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about the pains suffered as we come into contact of the others; after taking birth on this earth and are called Aadhibhutik Tap.
समास सातवा आधिभूतिक ताप
॥ श्रीराम ॥
मागां जालें निरुपण । आध्यात्मिकाचें लक्षण ।
आतां आदिभूतिक तो कोण । सांगिजेल ॥ १ ॥
अर्थ
१) मागिल समासंत आध्यात्मिक तापाची लक्षणें सविस्तर सांगितली. आता आदिभूतिक ताप कोणता व त्याची लक्षणें सांगतो.
श्र्लोकः
सर्वभूतेन संयोगात् सुखं दुःखं च जायते ।
द्वितीयतापसंताप सत्यं चैवाधिभौतिकः ॥ १ ॥
१) सर्व सजिवांच्या संयोगामुळे सुख-दुःख निर्माण होते ते जीवाला भोगावे लागते. हा दुसरा ताप म्हणजे आदिभौतिक ताप होय.
सर्व भूतांचेनि संयोगें । सुख दुःख उपजों लागे ।
ताप होतां मन भंगे । या नाव आदिभूतिक॥ २ ॥
२) सर्व भूतांशी संबंध आल्याने सुख किंवा दुःख निर्माण होते. यामुळे जीवाच्या मनावर परिणाम होतो. या तापास आदिभूतिक ताप म्हणतात.
तरी या आदिभूतिकाचें लक्षण । प्रांजळ करुं निरुपण ।
जेणें अनुभवास ये पूर्ण । वोळखी तापत्रयाची ॥ ३ ॥
३) या आदिभूतिक तापाची लक्षणे सांगतो ज्यामुळे हा दुसरा ताप ओळखता येईल.
ठेंचा लागती मोडती कांटे । विझती शस्त्रांचे धायटे ।
सला सिलका आणी सरांटे । या नाव आदिभूतिक॥ ४ ॥
४) ठेंचा लागणे, काटे मोडणे, हत्यारांचे घाव लागणे, बारीक कुसे शरीरांत घुसणे, सराटे लागणे,
अंग्या आणी काचकुहिरी । आवचटा लागे शरीरीं ।
गांधील येऊन दंश करी । या नाव आदिभूतिक॥ ५ ॥
५) अंगास आग आणणारी, तसेच खाज आणणारी वनस्पती लागणे, गांधील माशीनें येऊन दंश करणे,
मासी गोमासी मोहळमासी । मुंगी तेलमुंगी डांस दसी ।
सोट जळु लागे यासी । आदिभूतिक बोलिजे ॥ ६ ॥
६) माशी, गोमाशी, मोहळमाशी, मुंगी, तेलमुंगी, डांस यांनी डसणे, सोट म्हणजे रक्त पिणारा किडा, जळु अंगास चिकटणे,
पिसा पिसोळे चांचण । कुसळें मुंगळे ढेंकुण ।
विसीफ भोवर गोंचिड जाण । या नाव आदिभूतिक॥ ७॥
७) पिसवा, पिसोळे,चांचण म्हणजे तांबडे मुंगळे, कुसळे, मुंगळे, ढेंकुण, इसबाचे किडे, भुंगे, गोचिडे,
गोंबी विंचु आणी विखार । व्याघ्र लांडिगे आणी शूकर ।
गौसायळ सामर । या नाव आदिभूतिक॥ ८ ॥
८) गोम, विंचू, साप, वाघ, लांडगे, डुक्कर, साळू, सांबर,
रानगाई रानम्हैसे । रानशकट्ट आणी रीसें ।
रानहाती लावपिसें । या नाव आदिभूतिक॥ ९ ॥
९) रानगाई, रानम्हशी, रानबैल, अस्वलें, रानहत्ती, पक्ष्यांची पिसें,
सुसरीनें वोढून नेलें । कां तें आवचितें बुडालें ।
आथवा खळाळीं पडिलें । या नाव आदिभूतिक॥ १० ॥
१०) मगरीने ओढून नेणे, एकाएकी पाण्यांत बुडणे, किंवा पाय घसरुन पाण्याच्या प्रवाहांत पडणे,
नाना विखारें आजगर । नाना मगरें जळचर ।
नाना वनचरें अपार । या नाव आदिभूतिक॥ ११ ॥
११) विषारी सर्प, मगर, अजगर, इतर जळचर, अनेक जंगली जनावरें, यांच्यामुळे जे दुःख होते ते आदिभूतिक समजावे.
अश्र्व वृषभ आणी खर । स्वान शूकर जंबुक मार्जार ।
ऐसीं बहुविध क्रूर । या नाव आदिभूतिक॥ १२ ॥
१२) घोडा, बैल, गाढव, कुत्रे, डुक्कर, कोल्हे, मांजर या क्रूर प्ारण्यांपासून दुःख होणे,
ऐसीं कर्कशें भयानकें । बहुविध दुःखदायकें ।
दुःखें दारुणें अनेकें । या नाव आदिभूतिक॥ १३ ॥
१३) अशी कर्कश, भयंकर नाना रीतीने यातना देणारी अनेक असह्य दुःखे,
भिंती माळवदें पडती । कडे भुयेरीं कोंसळती ।
वृक्ष आणगावरी मोडती । या नाव आदिभूतिक॥ १४ ॥
१४) भिंती व माळवदे किंवा गच्चीअंगावर कोसळणे, कडे, भुयारे, कोसळणे, झाडे अंगावर पडून अवयव मोडणे,
कोणी येकाचा श्राप जडे । कोणी येकें केले चेडे ।
आधांतरी होती वेडे । या नाव आदिभूतिक॥ १५ ॥
१५) कोणाचा शाप लागणे, कोणाचा जादूटोणा लागणे, उगाचच वेडे होणे,
कोणी येकें चाळविलें । कोणी येकें भ्रष्टविलें ।
कोणी येकें धरुन नेलें । या नाव आदिभूतिक॥ १६ ॥
१६) कोणेतरी फसविणे, कोणीतरी भ्रष्ट करणे, कोणीतरी धरुन नेणे,
कोणी येकें दिलें वीष । कोणी येकें लाविले दोष ।
कोणी येकें घातले पाश । या नाव आदिभूतिक॥ १७ ॥
१७) कोणी वीष देणे, कोणीतरी खोटा आळ घेणे, कोणीतरी पाश घालणे,
अवचिता सेर लागला । नेणो बिबवा चिडला ।
प्राणी धुरें जाजावला । या नाव आदिभूतिक॥ १८ ॥
१८) कल्पना नसतां शेराच्या झाडाचा चीक लागणे, बिब्बा उतणे, धुराने जीव घाबरा होणे,
इंगळावरी पाय पडे । शिळेखालें हात सांपडे ।
धावतां आडखुळे पडे । या नाव आदिभूतिक॥ १९ ॥
१९) विंचवावर पाय पडणे, दगडाखाली हात सापडणे, धावताधावता अडखळून पडणे,
वापी कूपा सरोवर । गर्ता कडा नदीतीर ।
आवचितें पडे शरीर । या नाव आदिभूतिक॥ २० ॥
२०) विहिर, हौद, तलाव, मोठा खळगा, कडा, नदीचा कांठ, आदिमध्ये शरीर पडणे,
दुर्गाखालें कोंसळला । झाडावरुन पडला ।
तेणें दुःखें आक्रंदती । या नाव आदिभूतिक॥ २१ ॥
२१) किल्ल्यावरुन खाली कोसळणे, झाडावरुन पडणे, त्या दुःखाने मोठ्याने रडणे,
सीतें वोठ तरकती । हात पाव टांका फुटती ।
चिखल्या जिव्हाळ्या लागती । या नाव आदिभूतिक॥ २२ ॥
२२) थंडीने ओठ फुटणें, हात, पाय व टाचा यांना भेगा पडणे, हातापायांची बोटे कुजणे,
अशनपानाचिये वेळे । उष्ण रसें जिव्हा पोळे ।
दांत कस्करे आणी हरळे । या नाव आदिभूतिक॥ २३ ॥
२३) खातापितांना गरम पदार्थ तोंडांत जाऊन जीभ पोळणे, दांतांवर दात करकरणे, दातांमध्ये फटी पडणे,
पराधेन बाळपणीं । कुशब्दमारजाचणी ।
अन्नवस्त्रेंवीण आळणी । या नाव आदिभूतिक॥ २४ ॥
२४) लहानपणी परावलंबी असल्याने शिव्यांचा मारा सोसावा लागणे, अन्न वस्त्राची कमतरता असणे,
सासुरवास गालोरे । ठुणके लासणें चिमोरे ।
आलें रुदन न धरे । या नाव आदिभूतिक॥ २५ ॥
२५) मुलींना सासुरवासामुळे गालगुच्चे, ठोसे, चिमटे, डागणे, यामुळे रडे येऊन ते न आवरणे,
चुकतां कान पिळिती । कां तो डोळां हिंग घालिती ।
सर्वकाळ धारकीं धरिती । या नाव आदिभूतिक॥ २६ ॥
२६) चूक झाली तर कान पिळतात, किंवा डोळ्यांत हिंग घालतात, सारखे धारेवर धरतात,
नाना प्रकारीचे मार । दुर्जन मारिती अपार ।
दुरी अंतरे माहेर । या नाव आदिभूतिक॥ २७ ॥
२७) दुष्ट लोक मारहाण करतात, मुलींना माहेर अंतरणे,
कर्ण नासिका विंधिलें । बळेंचि धरुन गोंधिलें ।
खोडी जालिया पोळविलें । या नाव आदिभूतिक॥ २८ ॥
२८) कनांत, नाकांत भोके पाडणे, जबरदस्तीने गोंदणे, थोडी चूकझाल्यावर आगीचे चटके देणे,
परचक्रीं धरुन नेलें । नीच यातीस दिधलें ।
दुर्दशा होऊन मेलें । या नाव आदिभूतिक॥ २९ ॥
२९) शत्रूच्या हल्ल्यांत पकडले जाणे, नीच यातीच्या लोकांना विकणे, अंती दुर्दशा होऊन मरणे,
नाना रोग उद्भवले । जे आध्यात्मिक बोलिले ।
वैद्य पंचाक्षरी आणिले । या नाव आदिभूतिक॥ ३० ॥
३०) आध्यात्मिक तापांत सांगितलेले अनेक रोग होणे, त्यांच्यासाठी वैद्य, पंचाक्षरी बोलावणे,
नाना वेथेचें निर्शन । व्हावया औषध दारुण ।
बळात्कारें देती जाण । या नाव आदिभूतिक॥ ३१ ॥
३१) रोगावर उपाय म्हणून अति कडक औषधें जबरदस्तीने पाजणे,
नाना वल्लीचे रस । काढे गर्गोड कर्कश ।
घेतां होये कासावीस । या नाव आदिभूतिक॥ ३२ ॥
३२) निरनिराळ्या वनस्पतींचे रस, काढें, वाटणें घेतांना जीव कासावीस होणें,
ढाळ आणी उखाळ देती । पथ्य कठिण सांगती ।
अनुपान चुकतां विपत्ती । या नाव आदिभूतिक॥ ३३ ॥
३३) जुलाबासाठी व ओकारी होण्यासाठी औषधें देणे, कठीण पथ्य करावयास सांगणे, औषध घेण्याची रीतचुकल्याने त्रास होणे,
फाड रक्त फांसणी । गुल्लडागांची जाचणी ।
तेणें दुःखें दुःखवे प्राणी । या नाव आदिभूतिक॥ ३४ ॥
३४) शरीराची चिरफाड करणे, शस्त्राने शरीरांतील रक्त काढणे, तापलेल्या सळईने शरीर दाबून धरुन डागण्या देऊन भोके पाडणे,
रुचिकबिबवे घालिती । नाना दुःखें दडपे देती ।
सिरा तोडिती जळा लाविती । या नाव आदिभूतिक॥ ३५ ॥
३५) रुईचा चीक घालणे, बिब्बा घालणे, नाना दुःखांचे आघात होणे, शिरा तोडणे, जळवा लावणे,
बहु रोग बहु औषधें । सांगतां अपारें अगाधें ।
प्राणी दुखवे तेणे खेदें । या नाव आदिभूतिक॥ ३६ ॥
३६) कितीतरी रोग व त्यांची कितीतरी औषधे आहेत. ते सांगू लागल्यास अमर्याद आहेत. त्यांच्यामुळे यातना होणे,
बोलावितां पंचाक्षरी । धूरमार पीडा करी ।
नाना यातना चतुरीं । या नाव आदिभूतिक॥ ३७ ॥
३७) एक मांत्रिक बोलाविला व त्याने धुराचा मारा केला, अशा नाना प्रकारच्या यातना आहेत त्या शहाण्यांनी आदिभूतिक समजाव्यात.
दरवडे घालूनियां जना । तश्कर करिती यातना ।
तेणें दुःख होये मना । या नाव आदिभूतिक॥ ३८ ॥
३८) चोर दरवडा घालतात व लोकांना छळतात, त्यामुळे मनाला दुःख होणे,
अग्नीचेनि ज्वाळे पोळे । तेणें दुःखें प्राणी हरंबळे ।
हानी जालियां विवळे । या नाव आदिभूतिक॥ ३९ ॥
३९) आग्नीच्या ज्वाळांनी भाजणे, व्याकुळ होणे, नुकसान झाल्याने विव्हळणे,
नाना मंदिरें सुंदरें । नाना रत्नांचीं भांडारें ।
दिव्यांबरें मनोहरें । दग्ध होती ॥ ४० ॥
४०) किती सुंदर मंदिरे, जडजवाहिरांचे साठे, सुंदर किमती वस्त्रे आग्नीने दग्ध होणे,
नाना धान्यें नाना पदार्थ । नाना पशु नाना स्वार्थ ।
नाना पात्रें नाना अर्थ । मनुष्ये भस्म होती ॥ ४१ ॥
४१) धान्यें, पदार्थ, पशु, घरांत साठवलेला पैसा, भांडी, वस्तु, माणसे,
आग्न लागला सेती । धान्यें बणव्या आणी खडकुती ।
युक्षदंड जळोन जाती । आकस्मात ॥ ४२ ॥
४२) शेतें धान्यें, गवताच्या गंजी, धान्याच्या सालपटाचे ढिगारे, ऊस इत्यादि एकाएकी जळून जाणे,
ऐसा आग्न लागला । अथवा कोणी लाविला ।
हानी जाली कां पोळला । या नाव आदिभूतिक॥ ४३ ॥
४३) अशी आग आपोआप लागली का कोणी लावली परंतु नुकसान मात्र होते, माणसेही भाजतात,
ऐसे सांगतां बहुत । होती वन्हीचे आघात ।
तेणे दुःखें दुःखवें चित्त । या नाव आदिभूतिक॥ ४४ ॥
४४) आग लागून होणारे अपघात पुष्कळ आहेत त्यामुळे माणसाच्या मनाला होणार्या यातना या आदिभौतिक जाणाव्यात.
हारपे विसरे आणी सांडे । नासे गाहाळे फुटे पडे ।
असाध्य होये कोणीकडे । या नाव आदिभूतिक॥ ४५ ॥
४५) वस्तु हरवणे, विसरणे, गमावणे, सडणे, गहाळ होणे, फुटणे, पडणे, परत मिळणे अशक्य होणे,
प्राणी रथानभ्रष्ट जालें । नाना पशूतें चुकलें ।
कन्यापुत्र गाहाळले । या नाव आदिभूतिक॥ ४६ ॥
४६) माणूस स्थानभ्रष्ट होणे किंवा पदभ्रष्ट होणे, जनावरे गायब होणे, मुले-मुली हरवणे,
तश्कर अथवा दावेदार । आवचिता करिती संव्हार ।
लुटिती घरें नेती खिल्लार । या नाव आदिभूतिक॥ ४७ ॥
४७) चोरांनी किंवा शत्रूनीं एकाएकी धाड घालणे, संहार करणे, घरे लुटणे, जनावरे पळविणे,
नाना धान्यें केळी कापिती । पानमळां मीठ घालिती ।
ऐसे नाना आघात करिती । या नाव आदिभूतिक॥ ४८ ॥
४८) शेतांतील धान्यें कापून नेणे, केळी तोडणे, पानमळ्यांत मीठ घालून नासधूस करणे,
मैंद उचले खाणोरी । सुवर्णपंथी भुररेकरी ।
ठकु सिंतरु वरपेकरी । वरपा घालिती ॥ ४९ ॥
४९) लुटारु, उचले, घर खणुन चोरी करणारे, किमयागार, भुरळ घालणारे ठग, लुच्चे, फसविणारे, दरवडेखोर, आदि लोकांनी धाड घालणे, लुटणे व फसविणे,
गठीछोडे द्रव्य सोडिती । नाना आळंकार काढिती ।
नाना वस्तु मूषक नेती । या नाव आदिभूतिक॥ ५० ॥
५०) गाठोडी पळविणार्यांनी ती पळवून दागदागिने लांबविणे, उंदरांनी अनेक वस्तु पळविणे,
वीज पडे हिंव पडे । प्राणी प्रंजनी सापडे ।
कां तो माहापुरीं बुडे । या नाव आदिभूतिक॥ ५१ ॥
५१) अंगावर वीज पडणे, अति थंडी पडणे, मोठ्या पावसांत सापडणे, महापुरांत बुडणे,
भोवरे वळणें आणी धार । वोसाणें लाटा अपार ।
वृश्र्चिक गोंबी आजगर । वाहोन जाती ॥ ५२ ॥
५२) नदीच्या प्रवाहांतभोवरे, वळणे, धार, पुरांतुन वहात येणार्या वस्तु, म्हणजे लाकडे वगैरे, मोठ्या लाटा, विंचु, गोमा, अजगर यां बरोबर वाहुन जाणे,
तयामध्ये प्राणी सांपडला । खडकींबेटीं आडकला ।
बुडत बुडत वांचला । या नाव आदिभूतिक॥ ५३ ॥
५३) त्यांत सापडणे, वहात वहात एखाद्या खडकावर किंवा बेटावर अडकणे, बुडता बुडता वाचणे,
मनासारिखा नसे संसार । कुरुप कर्कश स्त्री क्रूर ।
विधवा कन्या मूर्ख पुत्र । या नाव आदिभूतिक॥ ५४ ॥
५४) कुरुप, कर्कश, क्रूर स्वभावाची बायको मिळणे, मुलगी विधवा होणे, मुलगा मूर्ख असणे,
भूत पिशाच्य लागलें । आंगावरुन वारें गेलें ।
अबद्ध मंत्रे प्राणी चळलें । या नाव आदिभूतिक॥ ५५ ॥
५५) भूत, पिशाच्च लागणे, अंगावरुन वारे जाणे, मंत्राचा जप चुकल्याचा भ्रम होणे,
ब्राह्मणसमंध शरीरीं । बहुसाल पीडा करी ।
शनेश्र्वराचा धोका धरी । या नाव आदिभूतिक॥ ५६ ॥
५६) एखदा ब्रह्मसमंध शरीरांत शिरुन बरीच वर्षे त्रास देणे, शनीची वाईट दशा येणे,
नाना ग्रहे काळवार । काळतिथी घातचंद्र ।
काळवेळ घातनक्षत्र । या नाव आदिभूतिक॥ ५७ ॥
५७) इतर ग्रहांची वाईट दशा येणे, काळवार, काळतिथि, चंद्राचे असणारी काळवेळ, घातनक्षत्र,
सिंक पिंगळा आणी पाली । वोखटें होला काक कलाली ।
चिंता काजळी लागली । या नाव आदिभूतिक॥ ५८ ॥
५८) शिंकेचा अपशकुन, पालीची चुकचुक, पिंगळा, कावळा, होला यापाखरांचा अपशकुन, असल्या अपशकुनांनी मनांत काळजीचा काळोख पसरणे,
दिवटा सरवदा भाकून गेला । अंतरीं धोका लागला ।
दुःस्वप्नें जाजावला । या नाव आदिभूतिक॥ ५९ ॥
५९) दिवटा म्हणजे रात्री मशालीच्या प्रकाशांत भविष्य सांगत फिरणारा, व भविष्य सांगणारा सरवटा, हे वाईट भविष्य सांगून गेले म्हणुन मनाला धसका बसणे त्यामुळे वाईट स्वप्ने पडून भिति वाटणे,
भालु भुंके स्वान रडे । पाली अंगावरी पडे ।
नाना चिन्हें चिंता पवाडे । या नाव आदिभूतिक॥ ६० ॥
६०) कोल्हेकुई, कुत्र्यांचे रडणे, पाल अंगावर पडणे, अशा अनेक अपशकुनांनी मनाला फार काळजी वाटणे,
बाहेरी निघतां अपशकुन । नाना प्रकारें विछिन्न ।
तेणें गुणें भंगे मन । या नाव आदिभूतिक॥ ६१ ॥
६१) घराबाहेर पडले की नाना प्रकारचे विचित्र अपशकुन होऊन मन उदास होणे,
प्राणी बंदी सांपडला । यातने वरपडा जाला ।
नाना दुःखें दुःखवला । या नाव आदिभूतिक॥ ६२ ॥
६२) कैदेंत पडणे, तेथे अनेक प्रकारच्या यातना भोगावयास लागणे, अनेक दुःखांनी कष्टी होणे,
प्राणी राजदंड पावत । जेरबंद चाबुक वेत ।
दरेमार तळवेमार । या नाव आदिभूतिक॥ ६३ ॥
६३) राजाकडून शिक्षा होणे, घोड्याच्या काढण्या, चाबूक, छड्या यांचा मार मिळणे, दरींत लोटून देणे, तापलेल्या तव्यावर उभे करणे,
कोरडे पारंब्या फोक । बहु प्रकारें अनेक ।
बहु ताडिती आदिभूतिक । या नाव बोलिजे ॥ ६४ ॥
६४) कोरडे म्हणजे चामड्याचा चाबूक, झाडाच्या पारंब्या, फोक म्हणजे झाडाची सालपटे, यांनी मारणे,
मोघरीमार बुधलेमार । चौखरुन डंगारमार ।
बुक्या गचांड्या गुडघेमार । या नाव आदिभूतिक॥ ६५ ॥
६५) जाड सोट्यासारख्या मुदगलाने मारणे, दारुच्या बुधल्यास बांधुन आग लावून मारणे, चारी बाजूंनी ताणून बडगे हाणुन मारणे, गुद्दे मारणे, गचांड्या मारणे, गुडगह्यांनी मारणे,
लाता तपराखा सेणमार । कानखडे दगडमार ।
नाना प्रकारींचे मार । या नाव आदिभूतिक॥ ६६ ॥
६६) लाथा मारणे, चपराका मारणे, शेणमारा करणे, कानांत खडे खुपसणे, दगडांनी मारणे, असे नाना प्रकारचे मार भोगावे लागणे,
टांगणें टिपर्या पिछोडे । बेडी बुधनाल कोलदंडे ।
रक्षणनिग्रह चहूंकडे । या नाव आदिभूतिक॥ ६७ ॥
६७) टांगणें, चाप लावणें, दोन्ही हात मागे खेचून बांधणे, बेड्या घालणे, झाडाच्या बुंध्यावर नालाप्रमाणे वाकायला लावून मारणे. कोलदांडे घालणे, इकडे तिकडे हालू न देणे,
नाकवणी चुनवणी । मीठवणी रायवणी ।
गुळवण्याची जाचणी । या नाव आदिभूतिक॥ ६८ ॥
६८) चुन्याचे पाणी, मिठाचे पाणी, मोहरीचे पाणी, गुळाचे पाणी नाकांत, घशांत किंवा कानांत ओतल्याने यातना होणे,
जळामध्यें बुचकुळिती । हस्तीपुढें बांधोन टाकिती ।
हाकिती छळिती यातायाती । या नाव आदिभूतिक॥ ६९ ॥
६९) पाण्यांत बुचकळणे, हातपाय बांधून हत्तीपुढे टाकणे, जनावराप्रमाणे फटके मारुन हांकणे, छळ करणे, उगाच कष्ट देणे,
कर्णछेद घ्राणछेद । हस्तछेद पादछेद ।
जिव्हाछेद अधरछेद । या नाव आदिभूतिक॥ ७० ॥
७०) कान, नाक, हात, पाय, जीभ, ओठ तोडून टाकणे,
तीरमार सुळीं देती । नेत्र वृषण काढिती ।
नखोनखी सुया मारिती । या नाव आदिभूतिक॥ ७१ ॥
७१) बाणांचा मार देणे, सुळी देणे, डोळे काढणे, वृषण काढणे, बोटांच्या नखांमध्ये सुया टोंचणें,
पारड्यामध्यें घालणें । कां कडेलोट करणें ।
कां भांड्यामुखें उडवणें । या नाव आदिभूतिक॥ ७२ ॥
७२) पारड्यामध्ये घालणे, कडेलोट करणे, तोफेच्या तोंडी बांधुन उडविणे,
कानीं खुंट्या आदळिती । अपानीं मेखा मारिती ।
खाल काढून टाकिती । या नाव आदिभूतिक॥ ७३ ॥
७३) कानांत खुंट्या ठोकणे, गुदद्वारांत मेखा मारणे, अंगाचे कातडे सोलणे,
भोत आणी बोटबोटी । अथवा गळ घालणें कंठीं ।
सांडस लाऊन आटाटी । या नाव आदिभूतिक॥ ७४ ॥
७४) पोत्यांत भरुन मारणे, बोटें ठेचून टाकणे, गळ्याला गळ लावणे, तापलेल्या चिमट्याने वृषण किंवा स्तन डागणे,
सिसें पाजणें वीष देणें । अथवा सिरछेद करणें ।
कां पायातळीं घालणें । या नाव आदिभूतिक॥ ७५ ॥
७५) उकळलेले शिसे पाजणे,जालिम विष पाजणे, शोकेम उडविणे, अंगावर माणसे नाचवून मारणे,
सरड मांजरें भरिती । अथवा फांसीं नेऊन देती ।
नानापरी पीडा करिती । या नाव आदिभूतिक॥ ७६ ॥
७६) अंगावरील कपड्यांत सरडे सोडणे, बंद खोलींत ठेऊन पिसाळलेले मांजर सोडणे, फाशी देणे, नानाप्रकारे पीडा देणे,
स्वानप्रळये व्याघ्रप्रळये । भूतप्रळये सुसरीप्रळये ।
शस्त्रप्रळये वीझप्रळये । या नाव आदिभूतिक॥ ७७ ॥
७७) कुत्री, वाघ, भुतेंखेतें, सुसरी, शस्त्रे, विजा यांचा अतिरेक होऊन जीविताची हानी होणे,
सीरा वोढून घेती । टेंमें लाऊन भाजिती ।
ऐशा नाना विपत्ती । या नाव आदिभूतिक॥ ७८ ॥
७८) अंगावरील शिरा तोडणे, जळत्या टेंभ्यांनी चटके देणे, भाजून काढणे, नाना यातना भोगणे,
मनुष्यहानी वित्तहानी । वैभवहानी महत्वहानी ।
पशुहानी पदार्थहानी । या नाव आदिभूतिक॥ ७९ ॥
७९) मनुष्य, द्रव्य, वैभव, मोठेपणा, जनावरें, व चीजवस्तु यांची हानी होणे,
बाळपणीं मरे माता । तारुण्यपणीं मरे कांता ।
वृद्धपणीं मृत्य सुता । या नाव आदिभूतिक॥ ८० ॥
८०) बाळपणी आई मरणे, तरुणपणी बायको मरणे, म्हातारपणी मुलगा मरणे,
दुःख दारिद्र्य आणी रुण । विदेशपळणी नागवण ।
आपदा अनुपति कदान्न । या नाव आदिभूतिक॥ ८१ ॥
८१) दुःख, दारिद्र्य, कर्ज, परदेशी पळून जाणे, लूट होऊन नागवले जाणे, संकटें येणे, अंगावर जड वस्तु पडणे, वाईट अन्न खावे लागणे,
आकांत वाखाप्रळये । युध्य होतां पराजये ।
जिवलगांचा होये क्षये । या नाव आदिभूतिक॥ ८२ ॥
८२) कॉलर्याच्या साथीने अनेक माणसे मरणे, युद्धांत पराभव होणे, जिवलगंचा मृत्यु होणे,
कठीणकाळ आणी दुष्काळ । साशंक आणी वोखटी वेळ ।
उद्वेग चिंतेचे हळाळ । या नाव आदिभूतिक॥ ८३ ॥
८३) कठीण काळी दुष्काळ येणे, मनांत भीति असतांना वाईट वेळ येणे, उद्वेग उत्पन्न होणे, काळजीने जीवाचे हाल होणे,
घाणा चरखीं सिरकला । चाकाखालें सांपडला ।
नाना वन्हींत पडिला । या नाव आदिभूतिक॥ ८४ ॥
८४) घाण्यांत किंवा चरकांत शिरुन चाकाखाली सापडणे, निरनिराळ्या प्रकारच्या आगींत पडणे,
नाना शस्त्रें भेदिला । नाना स्वापदीं भक्षिला ।
नाना बंदीं पडिला । या नाव आदिभूतिक॥ ८५ ॥
८५) अनेक शस्त्रांनी अवयव तुटणे, नाना श्वापदानी खाणे, अनेक लोकांच्या कैदेंत अडकणे,
नाना कुवासें निर्बुजे । नाना अपमानें लाजे ।
नाना शोकें प्राणी झिजे । या नाव आदिभूतिक॥ ८६ ॥
८६) वाईट जागी रहावे लागणे, निरनिराळ्या प्रकारच्या अपमानाने लाजिरवाणे होणे, नाना दुःखांनी खंगून जाणे,
ऐसे सांगतां अपार । आहेत दुःखाचे डोंगर ।
श्रोतीं जाणावा विचार । आदिभूतिकाचा ॥ ८७ ॥
८७) असे वर्णन केलेले दुःखांचें पुष्कळ डोंगर आहेत. ते सर्व सांगता येणे येथे शक्य नाही. परंतु येथे जे सांगितलेले आहेत त्यावरुन श्रोत्यांनी आदिभौतिक तापाचा विचार समजून घ्यावा.
॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आदिभूतिकतापनिरुपणनाम समास सातवा ॥
Samas Satava Aadhibhutik Tap
समास सातवा आधिभूतिक ताप
Custom Search