Dashak Choutha Samas Aathava Sakhya Bhakti
Samas Aathava Sakhya Bhakti is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Bhakti. Sakhya Bhakti is eight from Navavidha Bhakti. Sakhya means to become friend of God. It is not easy to be a riend of God. We have to deelop all the necessary qualities, virtues and change our nature so that God will accept us as his friend. That is described in here.
समास आठवा सख्यभक्ति
श्रीराम ॥
मागां जालें निरुपण । सातवें भक्तीचें लक्षण ।
आतां ऐका सावधान । आठवी भक्ती ॥ १ ॥
१) मागील समासांत सातव्या भक्तीचे वर्णन झाले. आतां आठवी भक्ति नीट लक्षपूर्वक ऐका.
देवासी परम सख्य करावें । प्रेम प्रीतीनें बांधावें ।
आठवें भक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ २ ॥
२) देवाशी दृढ मैत्री करावी. प्रेम भावनेने देवाला जणु बांधुनच ठेवावे. हे आठव्या भक्तीचे लक्षण समजुन घ्यावे.
देवास जयाची अत्यंत प्रीती । आपण वर्तावें तेणें रीतीं ।
येणें करितां भगवंतीं । सख्य घडे नेमस्त ॥ ३ ॥
३) देवाला अतिशय आवडणार्या गोष्टी आपण कराव्यात. त्यामुळे भगवंताशी दाट मैत्री जडते.
भक्ति भाव आणी भजन । निरुपण आणी कथाकीर्तन ।
प्रेमळ भक्तांचें गायन । आवडे देवा ॥ ४ ॥
४) भक्ति, प्रेमाचा भाव, भजन, निरुपण, कथा-किर्तन, प्रेम भावनेने गाणार्या भक्तांचे गायन देवाला आवडते.
आपण तैसेंचि वर्तावें । आपणासि तेंच आवडावें ।
मनासारिखें होतां स्वभावें । सख्य घडे नेमस्त ॥ ५ ॥
५) आपण त्याप्रमाणे वागावे. देवाला जे आवडते ते आपल्यालाही आवडावे.देवाच्या मनाप्रमाणे झाले की मैत्री जडते.
देवाच्या सख्यत्वाकारणें । आपलें सौख्य सोडून देणें ।
अनन्यभावें जीवें प्राणें । शरीर तेंहि वेंचावें ॥ ६ ॥
६) देवाच्या मैत्रीसाठी आपण आपले देहसौख्य सोडून द्यावे. आपला जीव, प्राण व शरीर देवाला अर्पून मी देवासाठी आहे असा भाव ठेवावा.
सांडून आपली संसारवेथा । करित जावी देवाची चिंता ।
निरुपण कीर्तन कथा वार्ता । देवाच्याचि सांगाव्या ॥ ७ ॥
७) आपल्या संसारांतील सुख-दुःख बाजूस ठेवून देवाच्या सुखाची कामाची काळजी घ्यावी. देवाच्या कथा, किर्तन, निरुपण व गोष्टी सांगाव्या.
देवाच्या सख्यत्वासाठीं । पडाव्या जिवलगांसी तुटी ।
सर्व अर्पावें सेवटीं । प्राण तोहि वेचावा ॥ ८ ॥
८) देवाच्या मैत्रीसाठी जीवलग मित्र व नातेवाईकांशी संबध तुटले तरी चालेल.सर्व देवाला अगदी प्राणसुद्धा अर्पावा.
आपुलें आवघें चि जावें । परी देवासीं सख्य राहावें ।
ऐसी प्रीती जिवें भावें । भगवंतीं लागावी ॥ ९ ॥
९) आपले सर्व गेले तरी चालेल पण भगवंताशी मैत्री तुटु देऊ नये. अशी मैत्री जीवाभावाने देवाशी व्हावी.
देव म्हणिजे आपुला प्राण । प्राणासी न करावें निर्वाण ।
परम प्रीतीचें लक्षण । तें हें ऐसें असें ॥ १० ॥
१०) देव म्हणजे जणुकांही आपला प्राणच समजाव. देव आपल्याला प्राणाहून प्रिय असावा. दृढ मैत्रीचे लक्षण असे असते.
ऐसें परम सख्य धरितां । देवास लागे भक्ताची चिंता ।
पांडव लाखाजोहरीं जळतां । विवरद्वारें काढिले ॥ ११ ॥
११) देवाशी अशी उत्कट मैत्री जोडली म्हणजे देवाला अशा भक्ताची काळजी लागते. पांडवांचा सख्य भाव एवढा उत्कट होता की लक्षाघरांत ते आगींत सापडले असतां भगवंताने त्यांना गुप्त गुहेंतून सुखरुप बाहेर काढले.
देव सख्यत्वें राहे आपणासी । तें तों वर्म आपणाचि पासीं ।
आपण वचनें बोलावीं जैसीं । तैसीं येती पडसादें ॥ १२ ॥
१२) आपले जितके शुद्ध प्रेम, मैत्री असते, तशीच देवही आपल्याशी मैत्री ठेवतो. आपण जसे बोलतो तसेच प्रतिध्वनी आपल्याला ऐकावयास येतात. आपली श्रद्धा देवावर अनन्य भावाने असेल तर देवही आपली काळजी घेतो.
आपण असतां अनन्यभावें । देव तत्काळचि पावे ।
आपण त्रास घेतां जीवें । देवहि त्रासे ॥ १३ ॥
१३) आपला भाव जर अनन्य असेल तर व एका भगवंतावरच आपला विश्र्वास, श्रद्धा, निष्ठा असेल तर भगवंत आपल्याला तत्काळ प्रसन्न होतो. पण आपण त्याला कंटाळलो तर तोही आपल्याला कंटाळतो.
श्र्लोक
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ॥
जे लोक मला ज्याप्रकारें भजतात त्याप्रकारे मी त्यांच्यावर अनुग्रह करतो.
जैसें जयाचे भजन । तैसाचि देवहि आपण ।
म्हणौन हें आवघें जाण । आपणासि पासीं ॥ १४ ॥
१४) ज्या भावनेने आपण भगवंताचे भजन करतो, त्याच भावनेने भगवंत आपल्यावर अनुग्रह करतो.
आपुल्या मनासारिखें न घडे । तेणें गुणें निष्ठा मोडे ।
तरी गोष्टी आपणाकडे । सहजचि आली ॥ १५ ॥
१५) एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर त्यामुळे भगवंतावरील आपले प्रेम, निष्ठा, श्रद्धा कमी होते. तसेच भगवंताचेही आपल्यावरील प्रेम, ममत्व कमी होते.
मेघ चातकावरी वोळेना । तरी चातक पालटेना ।
चंद्र वेळेसि उगवेना । तर्ही चकोर अनन्य ॥ १६ ॥
१६) चातक मेघाचेच पाणी पितो. मेघाने वृष्टी केली नाही तर चातकाची तहान शमत नाही. पण तो मेघावरील प्रेम कमी करत नाही. तसाच चकोर चंद्राला उगवायला उशीर झाला तरी तो चकोर तसाच भुकेलेला उपाशी राहतो. पण चंद्रावरील प्रेम कमी करत नाही.
ऐसें असावें सख्यत्व । विवेकें धरावें सत्व ।
भगवंतावरी ममत्व । सांडूंचि नये ॥ १७ ॥
१७) सख्य, मैत्री अशी असावी. भगवंताची मैत्री मोठ्या विवेकाने धरुन ठेवावी. त्याच्याशी असलेले सख्य, मैत्री, प्रेम कमी होऊन देऊ नये.
सखा मानावा भगवंत । माता पिता गण गोत ।
विद्या लक्ष्मी धन वित्त । सकळ परमात्मा ॥ १८ ॥
१८) भगवंताला सखा मानावा. तोच माता, तोच पिता, तोच नातेवाईक व सगेसंबधीही तोच मानावा. तसेच विद्या, लक्ष्मी, धन व वित्तसुद्धा भगवंतच. आपले जे जे ते ते सर्व तो परमात्मा भगवंतच अशी भावना बाळगावी.
देवावेगळें कोणी नाहीं । ऐसें बोलती सर्वहि ।
परंतु त्याची निष्ठा कांहीं । तैसीच नसे ॥ १९ ॥
१९) आपल्याला देवाखेरीज कोणीच नाही. असे सर्वच म्हणतात. परंतु त्यांचा खरा भाव तसा नसतो.
म्हणौनि ऐसें न करावें । सख्य तरी खरेंचि करावें ।
अंतरी सदृढ धरावें । परमेश्र्वरासी ॥ २० ॥
२०) म्हणुन असे खोटे वागु नये. देवाशी सख्य, मैत्री खरी भावना ठेवूनच करावे. मनांत देवाबद्दल प्रेम दृढ धरुन ठेवावे.
आपुलिया मनोगताकारणें । देवावरी क्रोधास येणें ।
ऐसीं नव्हेत किं लक्षणें । सख्यभक्तीचीं ॥ २१ ॥
२१) आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही तर देवावर रागावणे, नाराज होणे हे खर्या सख्य भक्तीचे लक्षण नव्हे.
देवाचें जें मनोगत। तेंचि आपुलें उचित ।
इच्छेसाठी भगवंत । अंतरुं नये कीं ॥ २२ ॥
२२) भगवंताच्या इच्छेने जे घडून येईल तेच आपल्यासाठी योग्य आहे. आपली इच्छापूर्ती
करण्यासाठी भगवंत अशा भावनेने भगवंतास दुरावी नये.
देवाचे इच्छेनें वर्तावें । देव करील तें मानावें ।
मग सहजचि स्वभावें । कृपाळु देव ॥ २३ ॥
२३) देवाच्या इच्छीनेच आपले वर्तन असावे. देव करील ते स्वीकारावे. मग सहजच कृपाळु
असलेला देव आपल्याला हवे ते देइल.
पाहातां देवाचे कृपेसी । मातेची कृपा कायेसी ।
माता वधी बाळकासी । विपत्तिकाळीं ॥ २४ ॥
२४) देवाची कृपा ही मातेच्या ममत्वापेक्षा मोठी असते. संकट ओढवले तर माता आपल्याच बाळाचा वध करते. देवाचे तसे नाही.
देवें भक्त कोण वधिला । कधीं देखिला ना ऐकिला ।
शरणागतांस देव जाला । वज्रपंजरु ॥ २५ ॥
२५) शरण आलेल्याचा देव कधीच वध करत नाही उलट त्याचे रक्षणच करतो.त्याचा देवाने वध केला असे कधीच कोणी ऐकलेले नाही.
देव भक्तांचा कैवारी । देव पतितांसि तारी ।
देव होये साहाकारी । अनाथांचा ॥ २६ ॥
२६) देव हा भक्तांवर कृपा करणारा आहे. देव पतितांचा उद्धार करणारा आहे. देव हा अनाथांचा सहाय्यकर्ता आहे.
देव अनाथांचा कैपक्षी । नाना संकटांपासून रक्षी ।
धाविन्नला अंतरसाक्षी । गजेंद्राकारणें ॥ २७ ॥
२७) देव हा अनाथांचा पक्ष घेणारा आहे. तो त्यांना अनेक संकटांतून वाचवितो. गजेन्द्राला मगरीच्या तावडींतून सोडविण्यासाठी तो तत्काल धावला.
देव कृपेचा सागरु । देव करुणेचा जळधरु ।
देवासि भक्तांचा विसरु । पडणार नाहीं ॥ २८ ॥
२८) देव हा कृपेचा सागर आहे. तो करुणारुपी मेघ आहे. देवाला भक्तांचा कधीच विसर पडत नाही.
देव प्रीती राखों जाणे । देवासी करावें साजणें ।
जिवलगें आवघी पिसुणें । कामा न येती ॥ २९ ॥
२९) आपल्या भक्ताचे प्रेम कसे राखावें त्याला प्रेमांकित कसा करावा. व त्याचे प्रेम कसे वृधिंगत करावे. हे सर्व देवाला माहीत आहे. म्हणून देवाशी खर्या भावनेने सख्यत्व करा. आपले नातेवाईक हे स्वार्थ बुद्धिने जमा होतात. प्रसंगी आपल्या सहाय्यास
येत नाहीत.
सख्य देवाचें तुटेना । प्रीती देवाची विटेना ।
देव कदा पालटेना । शरणागतांसी ॥ ३० ॥
३०) देवाशी सख्य जोडले की ते तुटत नाही. देवाचे प्रेम कमी होत नाही. ते वाढतच जाते. देव शरणागताला कधी निराश करत नाही.
म्हणोनि सख्य देवासी करावें । हितगुज तयासी सांगावें ।
आठवे भक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ ३१ ॥
३१) म्हणून देवाशी सख्य, मैत्री खर्या भवनेने करावी. त्याल आपले सर्व सुख-दुःख सांगावे.आठव्या भक्तीचे हे असे लक्षण जाणून घ्यावे.
जैसा देव तैसा गुरु । शास्त्रीं बोलिला हा विचारु ।
म्हणौन सख्यत्वाचा प्रकारु । सद्गुरुसीं असावा ॥ ३२ ॥
३२) जसा देव तसाच सद्गुरु असे शास्त्रांत सांगितले आहे. म्हणुन सख्यत्व सद्गुरुशी ही याचप्रकारे करावे.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सख्यभक्तिनिरुपणनाम समास आठवा॥
Samas Aathava Sakhya Bhakti
समास आठवा सख्यभक्ति
Custom Search