Sunday, April 22, 2012

Gurucharitra Adhyay 39 गुरुचरित्र अध्याय एकूणचाळीसावा

Gurucharitra Adhyay 39 
Adhyaya 39 is to have santati (issue). Gurucharitra is a pious and holy Grantham (Book) in Marathi. This Grantham consists of stories of Incarnation of God Dattatreya, ShriPad ShriVallabha and Nrushinha Saraswati. God Dattatreya himself is incarnation of God Brahma, God Vishnu and God Shiva. Guruchatria Adhyay 39 is in Marathi. This Adhyay describes how Guru Nrusinha Saraswati helped his lady disciple and blessed her with a daughter and a son. The lady disciple was a sixty year old barren lady. She was very desirous to have an issue. It was next to impossible in her current birth. However by the blessings of Guru (Shri Nrusinha Saraswati) her desire was fulfilled. Gurucharitra is a collection of stories based on the blessings by Guru (Shri Nrusinha Saraswati and Shripad ShriVallabha) to different people, devotees for removing their sorrow, unhappiness and difficulties. Thus there is very importance of Gurucharitra in many people’s life. Many devotees have obtained health, Wealth, happiness and peace in their life by performing parayana of Gurucharitra. Issueless couples are advised to read/listen this adhyay daily to fulfil their desire to have an issue.
 
गुरुचरित्र अध्याय एकूणचाळीसावा 
श्री गणेशायनमः II श्री सरस्वत्यै नमः I श्री गुरुभ्यो नमः I 
सिद्ध म्हणे नामधारका I पुढें अपूर्व वर्तले ऐका I 
साठी वर्षें वांझेसी एका I पुत्र झाला परियेसा II १ II 
आपस्तंब-शाखेसी I ब्राह्मण एक परियेसीं I 
शौनकगोत्र-प्रवरेसी I नाम त्या 'सोमनाथ' II २ II 
'गंगा' नामें त्याची पत्नी I पतिव्रताशिरोमणि I 
वेदशास्त्रें आचरणी I आपण करी परियेसा II ३ II 
वर्षें साठी झालीं तिसी I पुत्र नाहीं तिचे कुशीं I 
वांझ म्हणोनी ख्यातेसी I होती तया गाणगापुरीं II ४ II 
पतिसेवा निरंतर I करी भक्ति पुरस्सर I 
नित्य नेम असे थोर I गुरुदर्शना येत असे II ५ II 
नीरांजन प्रतिदिवसीं I आणोनि करी श्रीगुरूसी I 
येणेंपरी बहुत दिवसीं I वर्तत होती परियेसा II ६ II 
ऐसें असता वर्तमानी I संतुष्ट झाले श्रीगुरूमुनि I 
पृच्छा करिती हांसोनि I तया द्विजस्त्रियेसी II ७ II 
श्रीगुरू म्हणती तियेसी I काय अभीष्ट असे मानसीं I 
आणित्येसी प्रतिदिवसीं I नीरांजन परोपरी II ८ II 
तुझ्या मनींची वासना I सांगे त्वरित विस्तारून I 
सिद्धि पाववील नारायण I गौरीरमण गुरुप्रसादें II ९ II 
ऐकोनि श्रीगुरुंचे वचन I करी साष्टांगी नमन I 
विनवीतसे करा जोडून I 'अपुत्रस्य लोको नास्ति' II १० II 
पुत्राविणे स्त्रियांसी I पाहों नये मुखासी I 
पापरूपी महादोषी I म्हणती मातें स्वामिया II ११ II 
जिचे पोटीं नाहीं बाळ I तिचा जन्म निर्फळ I 
वाट पाहती उभयकुळ I बेचाळीस पितृलोकीं II १२ II 
पितृ चिंतिती मनांत I म्हणती एखादी सती वंशांत I 
पुत्र व्यालिया आम्हां हित I तो उद्धरील सकळांते II १३ II 
पुत्राविणे जें घर I तें सदा असे अघोर I 
अरण्य नाही त्यासी दूर I 'यथारण्य तथा गृह' II १४ II 
नित्य गंगास्नानासी I आपण जात्यें परियेसीं I 
घेऊनि येती बाळकांसी I समस्त स्त्रिया कवतुकें II १५ II 
कडे घेऊनियां बाळा I खेळविताति स्त्रिया सकळा I 
तैसें नाहीं माझे कपाळा I मंदभाग्य असें देखा II १६ II 
जळो माझें वक्षस्थळ I कडे घ्यावया नाही बाळ I 
जन्मोनियां संसारी निष्फळ I नव्हें पुरुष अथवा सती II १७ II 
पुत्रपौत्र असती जयांसी I परलोक साधे तयांसी I 
अधोगति निपुत्रिकासी I लुप्तपिंड होय स्वामिया II १८ II 
आतां पुरे जन्म मज I साठी वर्षें जाहली सहज I 
आम्हां आतां वर दीजे I पुढे उत्तम जन्म होय II १९ II 
पुत्रवंती व्हावें आपण I अंतःकरण होय पूर्ण I 
ऐसा वर देणें म्हणोन I विनवीतसे तये वेळीं II २० II 
ऐकोनि तियेचे वचन I श्रीगुरू म्हणती हांसोन I 
पुढील जन्म जाणेल कवण I तूंतें स्मरण कैचें सांग II २१ II 
नित्य आरति आम्हांसी I भक्तिपूर्वक भावेंसी I 
करितां जाहलों संतोषी I कन्या-पुत्र होतील तुज II २२ II 
इहजन्मीं तूंतें जाण I कन्या पुत्र सुलक्षण I 
होतील निगुती म्हणोन I श्रीगुरू म्हणती तियेसी II २३ II 
श्रीगुरुवचन ऐकोनि I पालवीं गांठी बांधी ज्ञानी I 
विनवीतसे कर जोडूनि I ऐका स्वामी कृपासिंधु II २४ II 
साठी वर्षें जन्मासी I जाहलीं स्वामी परियेसीं I 
होत नाही विटाळसी I मातें कैचें पुत्र होती II २५ II 
नाना व्रत नाना तीर्थ I हिंडिन्नल्ये पुत्रार्थ I 
अनेक ठायीं अश्वत्थ I पूजा केली स्वामिया II २६ II 
मज म्हणती सकळै जन I करीं वो अश्वत्थ-प्रदक्षिणा I 
तेणें पुरतील मनकामना I होतील पुत्र म्हणोनि II २७ II 
अश्वत्थसेवा बहुतकाळ I करितां माझा जन्म गेला I 
विश्वास म्यां बहु केला I होतील पुत्र म्हणोनि II २८ II 
साठी वर्षें येणेंपरी I कष्ट केले अपरांपरी I 
सेवा करित्यें अद्यापिवरी I अश्वत्थाची प्रदक्षिणा II २९ II 
 पुत्र न होती इह जन्मीं I पुढें होतील ऐसे कामीं I 
सेवा करितसें स्वामी I अश्वत्थाची परियेसा II ३० II 
 आतां स्वामी प्रसन्न होसी I इहजन्मीं पुत्र देसी I 
अन्यथा नोहे बोलासी I तुमच्या स्वामी नरहरी II ३१ II 
स्वामीनीं दिधला मातें वर I माझे मनीं हा निर्धार I 
हास्ये न करी स्वामी गुरु I शकुनगांठी बांधिली म्यां II ३२ II 
पुढील जन्म-काम्यासी I करित्यें सेवा अश्वत्थासी I 
स्वामी आतांचि वर देसी I इहजन्मीं कन्या-पुत्र II ३३ II 
अश्वत्थसेवा बहु दिवस I करितां झाले मज प्रयास I 
काय देईल आम्हांस I अश्वत्थ सेवित्यें मूर्खपणें II ३४ II 
ऐकोनि तियेचें वचन I श्रीगुरु म्हणती हांसोन I 
अश्वत्थसेवा महापुण्य I वृथा नोहे परियेसा II ३५ II 
निंदा न करीं अश्वत्थासी I अनंत पुण्य परियेसीं  I
सेवा करीं वो आम्हांसरसी I तूंतें पुत्र होतील II ३६ II 
आतां आमचे वाक्येंकरी I नित्य जावें संगमातीरी I 
अमरजा वाहे निरंतरी I भीमरथीसमागमांत II ३७ II 
तेथें अश्वत्थ असे गहन I जातों आम्ही अनुष्ठाना I 
सेवा करीं वो एकमनें I आम्हांसहित अश्वत्थाची II ३८ II 
अश्वत्थाचें महिमान I सांगतसें परिपूर्ण I 
अश्वत्थनाम-नारायण I आमुचा वास तेथें असे II ३९ II 
ऐकोनि श्रीगुरुचें वचन I विनवीतसे तें अंगना I 
अश्वत्थवृक्षाचें महिमान I स्वामी मातें निरोपावें II ४० II 
कैसी महिमा असे त्यासी I स्वामी सांगावें मजसी I 
स्थिर होईल माझें मानसी I सेवा करीन भक्तीनें II ४१ II 
श्रीगुरु म्हणती तियेसी I अश्वत्थवृक्षासी निंदा करिसी I 
महिमा असे अपार त्यासी I समस्त देव तेथें वसती II ४२ II 
अश्वत्थाचें महिमान I असे ब्रह्माण्डपुराणी निरुपण I 
नारदमुनीस विस्तारोन I ब्रह्मदेवानें सांगितलें II ४३ II 
ब्रह्मकुमर नारदमुनि I नित्य गमन त्रिभुवनीं I 
ब्रह्मयासी पुसोनि I आला ऋषी-आश्रमासी II ४४ II 
नारदातें देखोनि I अर्घ्यपाद्य देवोनि I 
पूजा केली उपचारोनि I पुसते झाले तयेवेळी II ४५ II 
ऋषि म्हणती नारदासी I विनंति एक परियेसीं I 
अश्वत्थमहिमा असे कैसी I विस्तारावें स्वामिया II ४६ II 
ऋषिवचन ऐकोनि I सांगता जाहला नारदमुनि I 
गेलों होतों आजिचे दिनीं I ब्रह्मलोकीं हिंडत II ४७ II 
आपण पुसे स्वभावेंसी I अश्वत्थमहिमा असे कैसी I 
समस्त मानिती तयासी I विष्णुस्वरूप म्हणोनियां II ४८ II 
ऐसा वृक्ष असे जरी I सेवा करणें कवणेपरी I 
 कैसा महिमा सविस्तारीं I निरोपावें स्वामिया II ४९ II 
ब्रह्मा सांगे आम्हांसी I अश्वत्थमुळीं आपण वासी I 
मध्यें वास हृषीकेशी I अग्रीं रुद्र वसे जाणा II ५० II 
शाखापल्लवीं अधिष्ठानीं I दक्षिण शाखे शूलपाणि I 
पश्चिम शाखे विष्णु निर्गुणी I आपण उत्तरें वसतसें II ५१ II 
इंद्रादि देव परियेसीं I वसती पूर्वशाखेसी I 
इत्यादि देव अहर्निशी I समस्त शाखेसी वसती जाणा II ५२ II 
गोब्राह्मण समस्त ऋषि I वेदादि यज्ञ परियेसीं I 
समस्त मूळांकुरेसी I असती देखा निरंतर II ५३ II 
समस्त नदीतीर्थें देखा I सप्त-सागर लवणादिका I 
वसती जाणा पूर्व शाखा I ऐसा अश्वत्थ वृक्ष जाणा II ५४ II 
अ-कारशब्द मूळस्थान I स्कंध शाखा उ-कार जाण I 
फळ पुष्प म-कारवर्ण I अश्वत्थमुख अग्नीकोणीं असे II ५५ II 
एकादश रुद्रादिक I अष्ट वसु आहेत जे का I 
जे स्थानीं त्रैमूर्तिका I समस्त देव तेथें वसती II ५६ II 
ऐसा अश्वत्थनारायण I महिमा वर्णावया शक्त कवण I 
कल्पवृक्ष याचि कारण I ब्रह्मा म्हणे नारदासी II ५७ II 
नारद सांगे ऋषेश्वरांसी I त्रयमूर्ति वास ज्या वृक्षाशीं I 
काय महिमा सांगो त्यासी I भजतां काय सिद्धि नोहे? II ५८ II 
ऐसें ऐकोनि समस्त ऋषि I विनविताति नारदासी I 
आचरावया विधी कैसी I कवणें रीतीनें भजावें II ५९ II 
पूर्वी आम्हीं एके दिवसीं I पुसिले होते आथर्वणासी I 
त्याणें सांगितले आम्हांसी I अश्वत्थसेवा एक रीतीं II ६० II 
 तूं नारद ब्रह्मऋषि I समस्त धर्म ओळखसी I 
 विस्तार करोनि आम्हांसी I विधिपूर्वक निरोपावें II ६१ II 
नारद म्हणे मुनिवरां I त्या व्रताचिया विस्तारा I 
सांगेन ऐका तत्परा I विधान असे ब्रह्मवचनीं II ६२ II 
आषाढ-पौष-चैत्रमासीं I अस्तंगत गुरुशुक्रेसीं I 
चंद्रबळ नसते दिवसीं I करुं नये प्रारंभ II ६३ II 
याव्यतिरिक्त आणिक मासीं I बरवे पाहोनियां दिवसीं I 
प्रारंभ करावा उपवासीं I शुचिर्भूत होऊनि II ६४ II 
 भानुभौमवारेसीं I आतळू नये अश्वत्थासी I 
भृगुवारी संक्रांतिदिवसीं I स्पर्शू नये II ६५ II 
संधीरात्रीं रिक्तातिथीं I पर्वणीसी व्यतीपातीं I 
दुर्दिनादि वैधृतीं I अपराण्हसमयीं स्पर्शूं नये II ६६ II 
अनृत-द्यूतकर्मभेषीं I निंदा-पाखंडवर्जेसी I 
प्रातमौंनी होवोनि हर्षी I आरंभावें परियेसा II ६७ II 
 सचैल स्नान करूनि I निर्मळ वस्त्र नेसोनि I 
वृक्षाखालीं जाऊनि I गोमयलिप्त करावें II ६८ II 
स्वस्तिकादि शंखपद्मेसीं I घालावी रंगमाळा परियेसीं I 
पंचवर्ण चूर्णेसी I भरावें तेथें पद्मांत II ६९ II 
मागुती स्नान करूनि I श्वेत वस्त्र नेसोनि I 
गंगा यमुना कलश दोनी I आणोनि ठेवणें पद्मांवरी II ७० II 
पूजा करावी कलशांसी I पुण्याहवाचनकर्मेसीं I 
संकल्पावें विधींसी I काम्यार्थ आपुलें उच्चारावें II ७१ II 
मग कलश घेवोनि I सात वेळां उदक आणोनि I 
स्नपन करावें जाणोनि I अश्वत्थ वृक्षासी अवधारा II ७२ II 
पुनरपि करूनियां स्नान I मग करावें वृक्षपूजन I 
पुरुषसुक्त म्हणोन I पूजा करावी षोडशोपचारे II ७३ II 
मनीं ध्यावी विष्णुमूर्ति I अष्टभुजा आहेति ख्याती I 
शंख-चक्र-वरद-हस्तीं I अभय-हस्त असे जाणा II ७४ II 
खड्ग-खेटक एके करीं I धनुष्य-बाण सविस्तारीं I 
अष्टभुजी येणेंपरी I ध्यावा विष्णू नारायण II ७५ II 
पितांबर पांघरूण I सदा लक्ष्मी-सन्निधान I 
ऐसी मूर्ति ध्याऊन I पूजा करणें वृक्षासी II ७६ II 
त्रैमूर्तिचें असें स्थान I शिवशक्तीविणे नाहीं जाण I 
समस्तांतें आवाहनोन I षोडशोपचारे पूजावें II ७७ II 
 वस्त्रें अथवा सुतेसीं I वेष्टावे तया वृक्षासी I 
पुनरपि संकल्पेसीं I प्रदक्षिणा कराव्या II ७८ II 
मनसा-वाचा-कर्मणेसीं I भक्तिपूर्वक भावेंसी I 
प्रदक्षिणा कराव्या हर्षी I पुरुषसूक्त म्हणत देखा II ७९ II 
अथवा सहस्रनामेंसीं I कराव्या प्रदक्षिणा हर्षी I 
अथवा कराव्या मौन्येंसीं I त्याचें फळं अमित असे II ८० II 
चाले जैसी स्त्री गर्भिणी I उदककुंभ घेउनी I 
तैसे मंद गतीनी I प्रदक्षिणा कराव्या शुद्धभावें II ८१ II 
पदोपदीं अश्वमेध I पुण्य जोडे फलप्रद I 
प्रदक्षिणासमाप्तमध्य I नमस्कार करावा II ८२ II 
ब्रह्महत्यादि पापांसी I प्रायश्चित्त नाहीं परियेसीं I 
प्रदक्षिणा द्विलक्षांसी I ब्रह्महत्या पाप जाय II ८३ II 
त्रिमूर्ति वसती जया स्थानीं I फल काय सांगू प्रदक्षिणी I 
समस्त पापा होय धुणी I गुरुतल्पादि पाप जाय II ८४ II 
नाना व्याधि हरती दोष I प्रदक्षिणा करितां होय सुरस I 
कोटी ऋण असे ज्यास I परिहरत परियेसा II ८५ II 
जन्म मृत्यु जरा जाती I संसारभय नाश होती I 
ग्रहदोष बाधों न शकती I सहस्र प्रदक्षिणा केलिया II ८६ II 
पुत्रकाम्य असें ज्यासी I त्यातें फल होय भरंवसी I 
मनोवाक्कायकर्मेसी I एकोभावें करावें II ८७ II 
चतुर्विध पुरुषार्थ I देता होय तो अश्वत्थ I 
पुत्रकाम्य होय त्वरित I न करा अनुमान ऋषी हो II ८८ II 
शनिवारीं वृक्ष धरोनि I जपावें मृत्युंजय-मंत्रांनी I 
काळमृत्यु जिंकोनि I राहती नर अवधारा II ८९ II 
त्यासी अपमृत्यु न बाधती I पूर्णायुषी होती निश्चिती I 
शनिग्रह न पीडिती I प्रार्थावें अश्वत्थासी II ९० II 
शनिनाम घेवोनि I उच्चारावें आपुले जीव्हेनी I 
बभ्रू-पिंगळ म्हणोनि I कोणस्थ-कृष्ण म्हणावें II ९१ II 
अंतक-यम-महारौद्री I मंद-शनैश्चर-सौरि I 
जप करावा येणेंपरी I शनिपीडा न होय II ९२ II 
ऐसे दृढ करोनि मना I अश्वत्थ सेवितां होय कामना I 
पुत्रकाम्य तत्क्षणा I होय निरुतें अवधारा II ९३ II 
अमावास्या-गुरुवारेंसी I अश्वत्थछाया-जळेसी I 
स्नान करितां नरासी I ब्रह्महत्या पाप जाय II ९४ II 
अश्वत्थतळीं ब्राह्मणासी I अन्न देतां एकासी I 
कोटि ब्राह्मणां परियेसीं I भोजन दिल्हें फळ असे II ९५ II 
अश्वत्थतळीं बैसोन I एकदां मंत्र जपतां क्षण I 
फळें होतील अनेकगुण I वेदपठण केलियाचें II ९६ II 
नर एखादा अश्वत्थासी I स्थापना करी भक्तीसी I 
आपुले पितृ-बेचाळिसी I स्वर्गी स्थापी परियेसा II ९७ II 
छेदितां अश्वत्थवृक्षासी I महापाप परियेसीं I 
पितृसहित नरकासी I जाय देखा तो नर II ९८ II 
अश्वत्थातळीं बैसोन I होम करितां महायज्ञ I 
अक्षय सुकृत असे जाण I पुत्रकाम्य त्वरित होय II ९९ II 
ऐसा अश्वत्थमहिमा I नारदाप्रति सांगे ब्रह्मा I 
म्हणोनि ऐकती ऋषिस्तोम I त्या नारदापासोनि II १०० II 
नारद म्हणे ऋषेश्वरासी I प्रदक्षिणेच्या दहावे अंशीं I 
हवन करावें विशेषी I आगमोक्त विधानपूर्वक II १०१ II 
हवनाचे दहावे अंशी I ब्राह्मणभोजन करावें हर्षी I 
ब्रह्मचर्य हविष्यान्नेसी I व्रत आपण करावें II १०२ II 
येणेंपरी आचरोन I मग करावें उद्यापन I 
शक्त्यनुसार सौवर्ण I अश्वत्थवृक्ष करावा II १०३ II 
तो द्यावा ब्राह्मणासी I विधिपूर्वक परियेसीं I 
श्वेतधेनु सवत्सेसीं I ब्राह्मनातें दान द्यावी II १०४ II 
वृक्षातळीं तिळराशी I करावी यथानुशक्तीसी I 
श्वेतवस्त्र झांकोनि हर्षी I सुक्षीण ब्राह्मणासी दान द्यावें II १०५ II 
ऐसें अश्वत्थविधान I सांगे नारद ऋषिजना I 
येणेंपरी आचरोन I सकळाभीष्ट लाधले II १०६ II 
श्रीगुरू म्हणती वांझ सतीसी I अश्वत्थमहिमा आहे ऐसी I 
भावभक्ती असे ज्यासी I त्यातें होय फलश्रुति II १०७ II 
आचार करीं वो येणेंपरी I संशय अंतःकरणी न धरी I 
वृक्ष असे भीमातीरी I जेथें अमरजासंगम II १०८ II 
तेंची आमुचें असें स्थान I सेवा करीं वो एकोमनें I 
होईल तुझी मनकामना I कन्या पुत्र तुझ होतील II १०९ II 
 ऐकोनि श्रीगुरूचें वचन I नमन करी ते अंगना I 
विनवीतसे कर जोडूनि I भावभक्तीकरोनियां II ११० II 
आपण वांझ वर्षें साठी I कैंचे पुत्र आपुले पोटीं I 
वाक्य असे तुमचें शेवटीं I म्हणोनि आपण अंगीकारीन II १११ II 
गुरुवाक्य म्हणजे कामधेनु I ऐसे बोलती वेदपुराण I 
आतां नाहीं अनुमान I करीन सेवा स्वामिया II ११२ II 
चाड नाहीं अश्वत्थासी I निर्धार तुमचे बोलासी I 
सेवा करीन तुमची ऐसी I म्हणोनि चरणी लागली II ११३ II 
ऐसा निरोप घेवोनि I जावोनि वनिता संगमस्थानीं I 
षट्कूलांत न्हाऊनि I सेवा करी अश्वत्थाची II ११४ II 
श्रीगुरूनिरोप जेणेंपरी I तैसी सेवा करी ते नारी I 
येणेंपरी तीन रात्रीं I आराधिलें परियेसा II ११५ II 
श्रीगुरूसहित अश्वत्थासी I पूजा करित तिसरे दिवसी I 
स्वप्न जाहलें तियेसी I सांगेन ऐका एकचित्तें II ११६ II 
स्वप्नामध्यें विप्र एक I येवोनि देतो तिसी भाक I 
काम्य झालें तुझें ऐक I सांगेन एक करीं म्हणे II ११७ II 
जाऊनि गाणगापुरांत I तेथें असे श्रीगुरुनाथ I 
प्रदक्षिणा करीं हो सात I नमन करीं तूं भक्तींसीं II ११८ II 
जें काय देतील तुजसी I भक्षण करीं वो वेगेसीं I 
निर्धार धरुनि मानसीं I त्वरित जावें म्हणे विप्र II ११९ II 
ऐसें देखोनि सुषुप्तींत I सवेंचि झाली ते जागृत I 
कल्पवृक्ष असे अश्वत्थ I कल्पिलें फळ त्वरित होय II १२० II 
सेवा करूनि चवथे दिवशी I आली आपण मठासी I 
प्रदक्षिणा करूनि हर्षी I नमन केलें तये वेळी II १२१ II 
हांसोनिया श्रीगुरूमुनि I फळें देती तिसी दोनी I 
भक्षण करीं वो संतोषोनि I काम्य झालें आतां तुझें II १२२ II 
भोजन करीं वो तूं आतां त्वरित I काम्य होईल तुझें सत्य I 
कन्या-पुत्र दोघे तूंतें I दिल्हे आजि परियेसा II १२३ II 
पारणें करोनि विधीसी I मग भक्षावें या फलांसी I 
दान द्यावें ब्राह्मणांसी I जे काय पूर्वी निरोपिलें II १२४ II 
व्रत संपूर्ण करोनि I केलें दान तें भामिनीं I 
तेचि दिवसी अस्तमानी I झाली आपण विटाळशी II १२५ II 
मौन दिवस तीनवरी I भोजन करी हिरवे खापरीं I 
श्वेत वस्त्र नेसोनि नारी I कवणाकडे न पाहेचि II १२६ II 
 येणेंपरी तिन्हीं निशी I क्रमिल्या नारीनें परियेसीं I 
 सुस्नात होवोनि चवथे दिवशीं I आली श्रीगुरुचे दर्शना II १२७ II 
पतीसमवेत येऊनि I पूजा करि ति एकाग्रमनीं I 
श्रीगुरु म्हणती संतोषोनि I पुत्रवंती व्हावें तुम्ही II १२८ II 
ऐसे नमूनि श्रीगुरूसी I आली आपुल्या मंदिरासी I 
ऋतु दिधला पांचवे दिवसी I म्हणोनि कन्या परियेसा II १२९ II 
येणेंपरी ते नारी I जाहली ऐका गरोदरी I 
ग्राम सकळ विस्मय करी I काय नवल म्हणतसे II १३० II 
म्हणती पहा नवल वर्तलें I वांझेसी गर्भधारण केवीं झालें I 
सोमनाथ विप्र भले I करीतसे आनंद II १३१ II 
सातवे मासीं ओटी भरिती I अक्षय वाणें ओंवाळिती I 
श्रीगुरूसी विनोदावरी प्रीति I वाणें देवविती कौतुकें II १३२ II 
 आठवे मासीं तो ब्राम्हण I करी सीमंतविधान I 
गुरुनिरोपें संतोषोन I देती वाणें ग्रामांत II १३३ II 
अभिनव करिती सकळही जन I म्हणती वांझेसी गर्भधारण I 
पांढरे केश म्हातारपण I वाणें देती कौतुकें II १३४ II 
एक म्हणती श्रीगुरुप्रसाद I श्रीनृसिंहमूर्ति भक्तवरद I 
त्याची सेवा करितां आनंद I लाधे चारी पुरुषार्थ II १३५ II 
त्रैमूर्तीचा अवतार I झाला नृसिंहसरस्वती नर I 
भक्तजनां मनोहर I प्रगटला भूमंडळीं II १३६ II 
ऐसें नानापरी देखा I स्तोत्र करिती गुरुनायका I 
वाणें देत तें बालिका I अत्योल्हास तिच्या मनीं II १३७ II 
वाणें देऊनि समस्तांसी I येऊनि नमी ती श्रीगुरूसी I 
भक्तवत्सल परियेसी I आशीर्वचन देतसे II १३८ II 
 संतोषोनि विप्रवनिता I करी साष्टांग दंडवता I 
नानापरी स्तोत्र करितां I विनवीतसे परियेसा II १३९ II 
जय जया परमपुरुषा I तूंचि ब्रह्मा विष्णुमहेशा I 
तुझें वाक्य जाहलें परीस I सुवर्ण केला माझा देह II १४० II 
तूं तारावया विश्वासी I म्हणोनि भूमीं अवतरलासी I 
त्रैमूर्ति तूंचि होसी I अन्यथा नव्हे स्वामिया II १४१ II 
तुझी स्तुति करावयासी I अशक्य आपुले जिव्हेसी I 
अपार तुझ्या महिमेसी I नाही साम्य कृपासिंधु II १४२ II 
येणेंपरी स्तोत्र करूनि I श्रीगुरुचरण वंदूनि I 
गेली निरोप घेऊनि I आपुले गृहा परियेसा II १४३ II 
ऐसे नवमास क्रमोनि I प्रसूत जाहली शुभदिनीं I 
समस्त ज्योतिषी येवोनि I वर्तविती जातकातें II १४४ II 
ज्योतिषी म्हणती तये वेळीं I होईल कन्या मन निर्मळी I 
अष्टपुत्रा वाढेल कुळी I पुत्रपौत्रीं नांदेल II १४५ II 
येणेंपरी ज्योतिषीं I जातक वर्तविलें परियेसीं I 
सोमनाथ आनंदेसी I दानधर्म करिता जाहला II १४६ II 
दहा दिवस क्रमोनि I सुस्नात झाली तें भामिनी I 
कडिये बाळक घेवोनि I आली श्रीगुरूदर्शनासी II १४७ II 
बाळक आणोनि भक्तींसी I ठेविलें श्रीगुरूचरणापाशीं I 
नमन करी साष्टांगेसी I एकभावेंकरोनियां II १४८ II 
आश्वासोनि श्रीगुरुमूर्ति I उठीं बाळे पुत्रवंती I 
बहुतपरी संतोषविती I प्रेमभावेंकरोनियां II १४९ II 
उठोनि विनवी ती श्रीगुरूसी I पुत्र नाही आमुचे कुशीं I 
सरस्वती आली घरासी I बोल आपुला सांभाळावा II १५० II 
ऐकोनि तियेचें वचन I श्रीगुरू म्हणती हांसोन I 
न करी मनी अनमान I तूंतें पुत्र होईल II १५१ II 
म्हणोनि तिये कुमारीसी I कडिये घेती प्रीतींसीं I 
सांगताति समस्तांसी I तये कन्येचें लक्षण II १५२ II 
पुत्र होतील बहु इसी I होईल आपण शतायुषी I 
पुत्राचे पौत्र नयनेंसीं I पाहील आपण अहेवपपणें II १५३ II 
होईल इसी ज्ञानी पति I त्यातें चारी वेद येती I 
अष्ट ऐश्वर्ये नांदती I प्रख्यात होवोनि भूमंडळी II १५४ II 
आपण होईल पतिव्रता I पुण्यशील धर्मरता I 
इची ख्याति होईल बहुता I समस्त इसी वंदिती II १५५ II 
दक्षिणदेशीं महाराजा I येईल इचे दर्शनकाजा I 
आणिक पुत्र होईल तुज I म्हणोनि श्रीगुरू बोलती II १५६ II 
येणेंपरी श्रीगुरुमूर्ति I कन्यालक्षण सांगती I 
विप्रवनिता विनयवृत्तीं I म्हणे पुत्र व्हावा मज II १५७ II 
श्रीगुरू म्हणती तियेसी I पुत्र व्हावा तुज कैसी I 
योग्य पाहिजे वर्षे तीसी I अथवा शतायुषी मूर्ख पैं II १५८ II 
ऐकोनि श्रीगुरुच्या वचना I विनवीतसे ते अंगना I 
योग्य पाहिजे पुत्र आपणा I तयासी पांच पुत्र व्हावे II १५९ II 
भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ति I वर देते तेणें रीतीं I 
संतोषोनि घरा जाती I महानंद दंपतीसी II १६० II 
पुढें तीसी पुत्र झाला I वेदशास्त्रीं विख्यात भला I 
पांच पुत्र तो लाधला I नामकरणी श्रीगुरूचा II १६१ II 
कन्यालक्षण श्रीगुरूमूर्ती I निरोपिलें होतें जेणें रीती I 
प्रख्यात झाली सरस्वती I महानंद प्रवर्तला II १६२ II 
यज्ञ करी तिचा पति I प्रख्यात नाम 'दीक्षिती' I 
चहूं राष्ट्रीं त्याची ख्याती I म्हणोनि सांगे सिद्धमुनि II १६३ II 
साठी वर्षें वांझेसी I पुत्र जाहला परियेसी I 
सिद्ध म्हणे नामधारकासी I ऐसी कृपा श्रीगुरुची II १६४ II 
निर्धार असे ज्याचे मनीं I त्यासी वर देती तत्क्षणी I 
एकोभावे याकारणी I भक्ति करावी श्रीगुरुची II १६५ II 
म्हणोनि सरस्वती-गंगाधर I सांगे गुरुचरित्रविस्तार I 
भजा भजा हो श्रीगुरू I सकळाभीष्ट लाधे तुम्हां II १६६ II 
जो भजेल श्रीगुरूसी I एकोभावे भक्तींसीं I 
त्यासी दैन्य कायसी I जें जें मागेल देईल सत्य II १६७ II 
गुरुभक्ति म्हणजे कामधेनु I अंतःकरणी नको अनुमानु I 
जें जें इच्छीत भक्तजनु I समस्त देईल परियेसा II १६८ II 
इति श्रीगुरूचरीत्रामृते परमकथाकल्पकरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे वृद्धवंध्यासंतानप्राप्ति नाम ऐकोनचत्वारींशत्तमोSध्यायः II 
II श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु II श्रीगुरुदेवदत्त II 


Gurucharitra Adhyay 39 
गुरुचरित्र अध्याय एकूणचाळीसावा 


Custom Search

No comments:

Post a Comment