Thursday, June 5, 2014

Gurucharitra Adhyay 32 Part 2/2 गुरुचरित्र अध्याय ३२ भाग २/२

Gurucharitra Adhyay 32
 Gurucharitra Adhyay 32 is in Marathi. Name of this Adhyay is MrutaVipraSanjivanam.
Please visit
गुरुचरित्र अध्याय ३२ भाग २/२ 
येणेंपरी नदीसी । गेली नारी पतीसरसीं । 
कुंड केलें अग्नीसीं । काष्टें शेणी अपरिमित ॥ १०१ ॥ 
अग्निकुंडसंनिधेसीं । ठेविलें तया प्रेतासी । 
बोलावोनि सुवासिनींसी । देती झाली वाणें देखा ॥ १०२ ॥ 
सुपें चोळी कुंकुमेसीं । हळदी काजळ परियेसीं । 
तोड-कंठसूत्रेसीं । सुवासिनींसी देतसे ॥ १०३ ॥ 
गंधपुष्प-परिमळेसीं । पूजा केली सुवासिनींसी । 
द्रव्य दे ती अपारेसी । समस्त ब्राह्मणां तये वेळीं ॥ १०४ ॥ 
नमन करुनि समस्तांसी । निरोप मागतसे हर्षी । 
आपण जात्यें माहेरासी । लोभ असो द्यावा म्हणतसे ॥ १०५ ॥ 
माझा पिता शूलपाणि । माता गौरी अंतःकरणीं । 
आम्हां बोलाविलें सगुणीं । प्रेमभावेंकरुनियां ॥ १०६ ॥ 
आला सण दिपवाळी । आम्ही जातों मातेजवळी । 
पतीसहित मन निर्मळीं । जात्यें लोभ असों द्यावा ॥ १०७ ॥ 
समागमी लोक आपुले । होते जे कां सवें आले । 
त्यांसी सांगतसे बोलें । जावें परतोनि ग्रामासी ॥ १०८ ॥ 
पुसतां श्र्वशुरमामीसी । त्यांतें तुम्हीं न सांगावें ऐसी । 
प्राण देतील आम्हांसरसी । वंशहत्या तुम्हां घडेल ॥ १०९ ॥ 
त्यांसी तुंम्हीं म्हणावें ऐसें । क्षेम आहेति तीर्थवासें । 
भीमातीर स्थान असे । श्रीगुरुचें संनिधानीं ॥ ११० ॥ 
आल्यें श्रीगुरुदर्शनासी । आरोग्य झालें पतीसी । 
राहिलीं आपुले संतोषीं । म्हणोनि सांगा आमुचे घरीं ॥ १११ ॥ 
ऐसें सासूश्र्वशुरासी । तैसेंचि आमुचे मातापित्यासी । 
इष्ट-जन-सोइरियांसी । सांगा येणेंपरी तुम्ही ॥ ११२ ॥ 
ऐसें वचन ऐकोन । दुःख करिती सकळ जन । 
आपण असे हास्यवदन । प्रेताजवळी उभी देखा ॥ ११३ ॥ 
अग्निकुंडीं तत्क्षणीं । घलिताति काष्ठें शेणी । 
तों आठवण झाली तिचे मनीं । योगेश्र्वराचा उपदेश ॥ ११४ ॥ 
रुद्राक्ष काढोनियां दोनी । बांधीतसे प्रेतश्रवणीं । 
कंठसूत्री ठेवूनि दोनी । पसतसे ब्राह्ंमणांसी ॥ ११५ ॥ 
विनवीतसे द्विजांसी । संकल्प केला मीं मानसीं । 
श्रीगुरुमूर्ति आहे कैशी । आपले दृष्टीं पाहीन ॥ ११६ ॥ 
दर्शन करुनि स्वामीसी । त्वरित येईन अग्निकुंडापाशी । 
आज्ञा झालिया वेगेसीं । त्वरित येईन म्हणतसे ॥ ११७ ॥ 
ऐकोनि तियेचें वचन । म्हणती समस्त विद्वजन । 
दहना न होतां अस्तमान । त्वरित जाऊनि तुम्हीं यावें ॥ ११८ ॥ 
पुसोनियां ब्राह्मणांसी । निघाली नारी संगमासी । 
जेथें असे हृषीकेशी । श्रीनृसिंहसरस्वती ॥ ११९ ॥ 
सवें येती नगरनारी- । सह-ब्राह्मण नानापरी । 
कौतुक पाहती मनोहरी । पतिव्रता स्त्रियेचे ॥ १२० ॥ 
जातां मार्गी स्तोत्र करी । म्हणे स्वामी नरकेसरी । 
अभाग्य आपुलें पूर्वापरी । म्हणोनि आम्हां अव्हेरिलें ॥ १२१ ॥ 
तूंचि दाता सर्वेश्र्वर । शरणांगता आधार । 
ऐसें तुझें ब्रीद थोर । कामीं आपणा न लाधेंचि ॥ १२२ ॥ 
हेळामात्रें त्रिभुवनासी । रचिसी रजपगुणेसीं । 
सत्वगुणें सृष्टिसी । प्रतिपाळिसी तूंचि स्वामी ॥ १२३ ॥ 
तमोगुण असे ऐसी । प्रलय समस्त जीवांसी । 
तीनी गुण तूंचि होसी । त्रिमूर्ति तूंचि देवा ॥ १२४ ॥ 
तुजपाशीं सर्व सिद्धि । वळंगत राहती नवनिधि । 
देखिली आमुची कुडी बुद्धि । म्हणोनि मातें अव्हेरिलें ॥ १२५ ॥ 
एखादा नर बाधा करी । जावोनि सांगती राजद्वारीं । 
क्षण न लागतां अवसरीं । साह्य करिती तयांचे ॥ १२६ ॥ 
रोग येतां मनुष्यासी । घेऊनि जाती वैद्यापाशीं । 
औषधें करिती तात्काळेसीं । आरोग्य होय तयांतें ॥ १२७ ॥ 
तूं त्रैमूर्तीचा अवतार । ख्याति झाली अपरांपर । 
भक्तजनां आधार । म्हणोनि वानिती सकळ जन ॥ १२८ ॥ 
अपराध आपण काय केले । वीस गांवें भेटीसी आल्यें । 
मातापित्यांते विसरल्यें । तुझ्या ध्यानें स्वामिया ॥ १२९ ॥ 
होसील तूंचि मातापिता । म्हणोनि आलों गा धांवतां । 
भेटी होतां आरोग्यता । पतीस होईल म्हणोनि ॥ १३० ॥ 
आपुले समान असती नारी । त्यांसी असती पुत्र कुमरी । 
आपण जाहल्यें दगडापरी । पुत्र नाही आपणांसी ॥ १३१ ॥ 
पति आपुला सदा रोगी । कैंचा पुत्र आपुले अंगीं । 
म्हणोनि याचि काम्यालागीं । निघोनि आल्यें स्वामिया ॥ १३२ ॥ 
आरोग्य होईल पतीसी । पुत्र होतील आपणासी । 
आशा धरुनि मानसीं । आल्यें स्वामी कृपासिंधु ॥ १३३ ॥ 
पुरला माझा मनोरथ । आरोग्य जाहला प्राणनाथ । 
पुत्र जाहले बहुत । नवस जाहला स्वामिया ॥ १३४ ॥ 
मनोरथ जाहला आम्हांसी । म्हणोनि येत्यें पुसावयासी । 
जाऊं आतां परलोकासी । कीर्ति तुझी घेऊनियां ॥ १३५ ॥ 
ऐसेपरी ध्यान करीत । आली अमरजासंगमा त्वरित । 
वृक्ष असे अश्र्वत्थ । देखती झाली स्वामियासी ॥ १३६ ॥ 
उभी ठाकोनियां दुरी । साष्टांगी नमन करी । 
श्रीगुरु म्हणती तये आवसरीं । सुवासिनी होईं ध्रुव ॥ १३७ ॥ 
ऐसें म्हणतां मागुती । नमन करी एकभक्तीं । 
पुनरपि स्वामी तेणेंच रीतीं । अष्टपुत्री होय म्हणतसे ॥ १३८ ॥ 
ऐसें वचन ऐकोन । हास्य करिती सकळ जन । 
सांगताति विस्तारोन । श्रीगुरुपाशी तयेवेळी ॥ १३९ ॥ 
विप्र म्हणती स्वामियासी । इचा पति पंचत्वासी । 
पावला परंधामासी । सुवासिनी केवीं होय ॥ १४० ॥ 
नेलें प्रेत स्मशानासी । हे आली असे सहगमनासी । 
निरोप घ्यावया तुम्हांपाशी । आली असे स्वामिया ॥ १४१ ॥ 
तुमचा निरोप घेऊनि । अग्निकुंडा जाऊनि । 
समागमे पतिशयनीं । दहन करणें इयेसी ॥ १४२ ॥ 
ऐकोनि ब्राह्मणांचे वचन । श्रीगुरु म्हणती हांसोन । 
इचें स्थिर अहेवपण । मरण कैचें घडे इसीं ॥ १४३ ॥ 
म्हणती श्रीगुरु तये वेळीं । आणा प्रेत आम्हांजवळी । 
प्राण गेला कवणें काळी । पाहूं म्हणती त्या अवसरीं ॥ १४४ ॥ 
श्रीगुरु म्हणती द्विजांसी । आमुचे वाक्य जाहलें ऐसी । 
अहेवपण स्थिर इयेसी । संदेह न धरा मनांत ॥ १४५ ॥ 
या बोलाचा निर्धारु । करील आतां कर्पूरगौरु । 
नका प्रेत संस्कारु । आणा म्हणती आपणाजवळी ॥ १४६ ॥ 
श्रीगुरुचा निरोप होतां । आणूं गेले धांवत । 
लोक कौतुक पहात । अभिनव म्हणती सकळही जन ॥ १४७ ॥ 
इतुकें होतां अवसरीं । आले तेथें विप्र चारी । 
पूजा करिती मनोहरी । श्रीगुरुची भक्तीनें ॥ १४८ ॥ 
रुद्रसूक्त म्हणोनि । अभिषेक करिती गुरुचरणीं । 
षोडशोपचार विस्तारोनि । पूजा करिती भक्तीसी ॥ १४९ ॥ 
तीर्थपूजा नानापरी । पूजा करिती उपचारी । 
इतुकें होतां अवसरीं । घेऊनि आले प्रेतासी ॥ १५० ॥ 
प्रेत आणोनियां देखा । ठेविलें श्रीगुरुसन्मुखा । 
श्रीगुरु म्हणती विप्रलोकां । सोडा दोर वस्त्र याचें ॥ १५१ ॥ 
चरणतीर्थ तये वेळीं । देती तयां विप्रांजवळी । 
प्रोक्षा म्हणती तात्काळीं । प्रेत सर्वांगीं स्नपन करा ॥ १५२ ॥ 
श्रीगुरुनिरोपें ते ब्राह्मण । प्रेतासी करिती तीर्थस्नपन । 
अमृतदृष्टीं श्रीगुरु आपण । पाहती प्रेत सर्वांगीं ॥ १५३ ॥ 
पाहतां सुधादृष्टीनें । प्रेत जाहलें संजीवन । 
उठोनि बैसला तत्क्षण । अंग मुरडीत परियेसा ॥ १५४ ॥ 
नग्न म्हणोनि लाजत । प्रेता झालें सर्व चेत । 
नवीं वस्त्रें नेसत । येवोनि कडे बैसला ॥ १५५ ॥ 
बोलावूनि स्त्रियेसी । पुसतसे विस्तारेसी । 
कोठें आणिलें आपणासी । यतीश्र्वर कवण सांग ॥ १५६ ॥ 
इतुके लोक आले असतां । कां वो न करसी तूं चेता । 
निद्रा आली मदोन्मत्ता । म्हणोनि पुसे स्त्रियेसी ॥ १५७ ॥ 
ऐकून पतीचें वचन । सांगती झाली विस्तारुन । 
उभीं राहून दोघेजण । नमन करिती श्रीगुरुसी ॥ १५८ ॥ 
चरणावरी माथा ठेवून । स्तोत्र करिती दोघेजण । 
पहाती सकळही जन । महानंद प्रवर्तला ॥ १५९ ॥ 
म्हणती पापरुपी आपण । पाप केलें दारुण । 
पापवासना अनुसंधान । जन्म जाहला स्वामिया ॥ १६० ॥ 
दुर्बुद्धिने पापीं वर्तलों । पापसागरीं बुडालों । 
तुझें स्मरण विसरलों । त्रयमूर्ति जगद्गुरु ॥ १६१ ॥ 
समस्त जीवमात्रासी । रक्षिता शंकर तूंचि होसी । 
ख्याति तुझी त्रिभुवनासी । शरणागता रक्षका ॥ १६२ ॥ 
त्राहि त्राहि जगद्गुरु । विश्र्वमूर्ति परात्परु । 
ब्रह्मा-विष्णु-महेश्र्वरु । सच्चिदानंदस्वरुपा ॥ १६३ ॥ 
त्राहि त्रहि विश्र्वकर्ता । त्राहि त्राहि जगद्भर्ता । 
कृपासागरा गुरुनाथा । भक्तजनवरप्रदा ॥ १६४ ॥ 
जय जया गुरुमूर्ति । जटाजूटा पशुपति । 
अवतरलासी तूं क्षितीं । मनुष्यदेह धरुनियां ॥ १६५ ॥ 
त्राहि त्राहि पिनाकपाणी । त्राहि देवा तूं शिरोमणि । 
भक्तजनां पाळोनि । रक्षितोसि निरंतर ॥ १६६ ॥ 
सर्वां तूंचि वससी । नमन तुझे चरणांसी । 
मज ऐसा गमलासी । मातारुपी वर्तत ॥ १६७ ॥ 
विश्र्वकरणी तूंचि करिसी । हेळामात्रें सृष्टि रचिसी । 
मज ऐसा गमलासी । ज्ञानरुपें वर्तत ॥ १६८ ॥ 
त्रिभुवनीं तुझी करणी । माथा ठेविला तुझे चरणीं । 
निश्र्चय केला माझे मनीं । पुनरपि जन्म नव्हे आतां ॥ १६९ ॥ 
तुझें नायके एखादा जरी । कोपसी त्वरित तयावरी । 
माझें मनीं येणेंपरि । अकलंकरुप दिसतोसि ॥ १७० ॥ 
क्रोध नाहीं तुझे मनीं । आनंदमूर्ति तूंचि सगुणी । 
भक्तजनातें करी रक्षणी । कृपासागरा स्वामिया ॥ १७१ ॥ 
जीवमात्रा कृपा करिसी । शरणागतातें रक्षिसी । 
इहपर सौख्य देसी । चतुर्विध पुरुषार्थ ॥ १७२ ॥ 
तूंचि कारुण्य-सागरु । चिन्मात्राचा आगरु । 
श्रीनृसिंहसरस्वती गुरु । क्षमा करणें स्वामिया ॥ १७३ ॥ 
ऐसें नानापरीसी । स्तोत्र केलें श्रीगुरुसी । 
श्रीगुरुमूर्ति संतोषीं । आश्र्वासिती तये वेळीं ॥ १७४ ॥ 
अष्ट पुत्र पूर्णायुषी । हो कां श्रीमंत अतिहर्षी । 
गेले तुमचे सर्वदोषी । देहांतीं मुक्ति तुम्हां ॥ १७५ ॥ 
चतुर्विध पुरुषार्थ । लभ्य झाले तुम्हां सत्य । 
सांडोनियां संदेह त्वरित । सुखें असा म्हणती देखा ॥ १७६ ॥ 
इतुकें होतां अवसरीं । मिळाल्या होत्या नगरनारी । 
जयजयकार अपरांपरी । प्रवर्तला तये वेळीं ॥ १७७ ॥ 
नमन करिती सकळही जन । स्तोत्र करिती गायन । 
करिताति निरांजन । जयजयकार प्रवर्तला ॥ १७८ ॥ 
तयांमध्ये विप्र एक । होता कुबुद्धिक । 
याचें गृह होतें नरकीं । म्हणोनि पुसे श्रीगुरुसी ॥ १७९ ॥ 
विप्र म्हणे श्रीगुरुसी । विनंति स्वामी परियेसीं । 
संशय आमुच्या मानसीं । होतसे स्वामिया ॥ १८० ॥ 
वेदशास्त्र-पुराण । बोलताति सनातन । 
 ' ब्रह्मलिखित सत्य ' जाण । म्हणोनि वाक्य निरंतर ॥ १८१ ॥ 
घडला नाहीं अपमृत्यु यासी । दिवामरण सुखांतरेसीं । 
त्याचा आला प्राण कैसी । ब्रह्मलिखित सत्य कीं मिथ्या ॥ १८२ ॥ 
न कळे याच्या अभिप्राया । निरोपावें गुरुराया । 
श्रीगुरु सांगती हांसोनियां । तया मूर्ख ब्राह्मणासी ॥ १८३ ॥ 
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । सांगेन तुज विस्तारेसीं । 
पुढें जन्म होय त्यासी । एकचित्तें परियेसा ॥ १८४ ॥ 
आम्हीं तया ब्रह्मयापाशीं । मागून घेतलें कारणेसीं । 
पुढील जन्मांत परियेसीं । वर्षे तीस संख्या ते ॥ १८५ ॥ 
भक्तजन रक्षावयासी । मागितलें आम्ही ब्रह्मयापाशीं । 
म्हणूनि सांगती विस्तारेसीं । तया विप्रवर्गापुढें ॥ १८६ ॥ 
तटस्थ झाले सकळही जन । साष्टांग करिती नमन । 
गेले आपुलाले स्थाना । ख्याति झाली चहूं राष्ट्रीं ॥ १८७ ॥ 
पतिव्रतेनें पतीसहित । स्नान केलें संगमांत । 
अंतःकरणीं संतोष बहुत । पूजा करिती भक्तिनें ॥ १८८ ॥ 
अपार द्रव्य वेंचून । करिती तेथें आराधन । 
सूर्य गेला अस्तमाना । आले श्रीगुरु मठासी ॥ १८९ ॥ 
स्त्रीपुरुष नमस्कार । करिताति वारंवार । 
पूजासामग्री उपचार । आरति करिती श्रीगुरुसी ॥ १९० ॥ 
सिद्ध म्हणे नामधारका । पुढें जाहलें अपूर्व ऐका । 
कथा असे अति विशेषा । सांगेन एकचित्तें ॥ १९१ ॥ 
म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्र विस्तार । 
ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्ट पाविजे ॥ १९२ ॥ 
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ 
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे 
मृतविप्रसंजीवनं नाम द्वात्रिंशोऽध्यायः ॥

Gurucharitra Adhyay 32 
गुरुचरित्र अध्याय ३२


Custom Search

No comments:

Post a Comment