Wednesday, December 24, 2014

DeviMahatmya Adhyay 5 श्रीदेवीमहात्म्य अध्याय (5) पांचवा


DeviMahatmya Adhyay 5 
DeviMahatmya Adhyay 5 is in Sanskrit. Name of this Adhyay is devyavtarDootSamvadNirupanam. It means that Devi avatar namely Mahasaraswati is described in this adhyay and then discussion between Goddess Mahasaraswati and doot of demon king Shumbha is described in this adhyay.
श्रीदेवीमहात्म्य अध्याय (5) पांचवा
श्रीगणेशाय नमः ॥ 
मेधा म्हणे सुरथराजा । मार्कंडेय सांगे शिष्यवर्गा ।
सूत बोले शौनकादि आचार्या । सावधान परिसावें ॥ १ ॥
आतां महासरस्वतीआख्यान । सांगतो मी तुम्हांलागून ।
हा तिसरा अवतार पूर्ण । नव अध्याय जाणिजे ॥ २ ॥
हें भगवतीचरित्र निश्र्चित । श्रोत्या-वक्त्यांसी करी पुनीत ।
अधिकाधिक तृष्णा वाढत । याच्या श्रवण-पठनाची ॥ ३ ॥
असो पूर्वी शुंभ-निशुंभ असुर । दोघे दायाद महाक्रूर ।
देवांचे शत्रु अनिवार । पराक्रमी जाहले ॥ ४ ॥
संग्रामीं शोभतो म्हणोन । शुंभ ऐसें नामाभिधान ।
त्याहूनि जो अत्यंत शोभायमान । निशुंभ म्हणती तयासी ॥ ५ ॥
ते कामरुपी दोघे असुर । त्याहीं त्रैलोक्य जिंकिलें सत्वर ।
जिंकोनियां देवनिकर । यज्ञभाग घेतले ॥ ६ ॥
दोघांनीं करुनियां शौर्य । घेतलें देवांचें सकल ऐश्र्वर्य ।
तेव्हां संग्रामीं सांडोनि धैर्य । देव पळते जाहले ॥ ७ ॥
इंद्र वायु यम कुबेर । धायीं केले सर्व जर्जर ।
कुबेराचे निधि सत्वर । हिरोनियां आणिले ॥ ८ ॥
सांडोनि ऐश्र्वर्याची आशा । देव पळाले दशदिशां ।
प्राप्त जाहली दुःखदशा । कोणासी ती सांगावी ॥ ९ ॥
प्रतापी ते दोघे असुर । सूर्याचा घेतला अधिकार । 
दोघे सूर्य होऊनि सत्वर । प्रकाशिलें त्रैलोक्या ॥ १० ॥
दोघे चंद्र होऊनि निश्र्चितीं । त्रैलोक्यीं पाडिली चंद्रकांती ।
शुक्ल कृष्ण पक्षस्थिती । करिते जाहले निजांगे ॥ ११ ॥
वायूचा अधिकार चालविला । तैसाचि पर्जन्यही पाडिला ।
यथाकाळीं वर्षो लागला । जनइच्छेकरुनियां ॥ १२ ॥
अग्नीचें कर्म चालविले । त्रैलोक्याचें राज्य घेतलें ।
दिक्पाळ ते पळोनि गेले । अधिकार सांडोनियां ॥ १३ ॥
वरुणाचा घेऊनि अधिकार । सप्त समुद्र केले आज्ञाधर ।
काळाचाही दंड सत्वर । हिरावूनि घेतला ॥ १४ ॥
ऐसें राज्य करितां दैत्यपाळ । कांहीं निघोनि गेला काळ ।
तेव्हां देव मिळोनि सकळ । स्मरते जाहले देवीतें ॥ १५ ॥
तिनें पूर्वी आम्हां वर दिधला । तुम्ही स्मराल जेव्हां मला ।
संकटीं पावेन तुम्हांला । दुःख नाशीन तत्क्षणीं ॥ १६ ॥
देवीचा वर आणोनि मनीं । मग सर्वाहीं विचार करोनि ।
हिमपर्वतालागोनी । येते जाहले ते काळीं ॥ १७ ॥
सर्व बद्धांजली होऊन । करिते जाहले साष्टांग नमन ।
अष्टभावांते पावोन । स्तवन करिती देवीचें ॥ १८ ॥
कंप रोम वैवर्ण्य स्वेद । स्तंभ रोदन कंठ गद्गद ।
नृत्य-गायनादि आनंद । अष्टही भाव जाणिजे ॥ १९ ॥
पाद जानु उत कर शिर । हीं भूमीसी लावूनि सत्वर ।
मन दृष्टीसीं स्वरुपीं धर । मंत्र वाचेनें वदावा ॥ २० ॥  ऐसें साष्टांग नमस्कार । करुनि देवीसी अपार ।
स्तविते जाहले सुरवर । बद्धांजलि होऊनियां ॥ २१ ॥
पूर्वी म्हणोनि दिव्य मंत्र । मग आरंभिते जाहले स्तोत्र ।
त्याचि मंत्राचा अर्थ पवित्र । प्रथम तुम्हांसी सांगतो ॥ २ २ ॥
मंत्र भावार्थ-
देव होऊनि नम्र बहुत । अनन्यभावें स्तवन करीत ।
म्हणती नमूं देवी तुजप्रत । महादेवी तुज नमो ॥ २३ ॥
तैसेंचि शिवें तूतें जाण । सतत असो आमुचें नमन ।
नमो प्रकृति भद्रे तुजलागून । सर्वनामे नमो नमः ॥ २४ ॥
हा मंत्र प्रथम योजून । करितां षोडशोपचारें पूजन ।
श्रीजगदंबा होय प्रसन्न । भक्तांकारणें संतोषे ॥ २५ ॥
अथवा जे हिरण्यसूक्त । त्याच्या प्रतिमंत्रे निश्र्चित ।
यथाविधि जे पूजा करीत । षोडश उपचार अर्पूनी ॥ २६ ॥
तयांसी देवी प्रसन्न होत । मानसीं इच्छिलें तें तें देत ।
साधती चारही पुरुषार्थ । ऋद्धि सिद्धि सर्वही ॥ २७ ॥
ऐसें मंत्रसिद्धिफल सांगोन । आतां त्याचा स्पष्टार्थ वदेन ।
ती सर्वांतें प्रकाशक म्हणोन । देवी म्हणती तिजलागीं ॥ २८ ॥
सर्व देवांहूनि वरिष्ठ । वास्तव महादेवी नाम श्रेष्ठ ।
शिवाची पत्नी असे स्पष्ट । शिवा नाम म्हणोनी ॥ २९ ॥
ही सर्वांतें उत्पन्न करीत । म्हणोनि प्रकृतिनाम निश्र्चित ।
भद्र म्हणजे कल्याण होत । भद्रा नामेंकरुनी ॥ ३० ॥
तुझ्या या सर्व नामेंकरुन । तुजकारणें आमुचें नमन ।
प्रतिनाममंत्र जपोन । नमस्कार असो सर्वदा ॥ ३१ ॥
मंत्राचा सांगितला स्पष्टार्थ । आतां स्तोत्राचा ऐका भावार्थ ।
श्रवणपठणें कृतार्थ । श्रोत्यावक्त्यांसी करी जो ॥ ३२ ॥
स्तोत्रार्थः
रौद्रा नित्या गौरी धात्री । ज्योत्स्ना चंद्ररुपिणी सर्वत्री ।
सुखा कल्याणजनयित्री । ऋद्धि सिद्धि तुज नमो ॥ ३३ ॥
निर्ऋति पर्वतशोभा शर्वाणी । दुर्गा दुर्गपारा सारा भवानी ।
ख्याती कृष्णा धूमा सर्वकारिणी । अतिसौम्या तुज नमो ॥ ३४ ॥
अतिरौद्रा जगत्प्रतिष्ठा । देवी कृति सर्ववरिष्ठा ।
तुज नमो तूं सर्वश्रेष्ठा । प्रतिनामीं तुज नमो ॥ ३५ ॥
सर्व भूतांचे ठायीं जाण । जी विष्णुमाया म्हणती पूर्ण ।
त्या देवीकारणें नमन । आमुचें असो सर्वदा ॥ ३६ ॥
जी सर्व भूतांचे ठायीं । चेतना ऐसें म्हणती पाहीं ।
तिजकारणें लवलाहीं । नमस्कार असोत सर्वदा ॥ ३७ ॥
जी जगदंबा सर्व भूतीं । बुद्धिरुपें असे निश्र्चितीं ।
तिजकारणें नमस्कृती । प्रतिमंत्रीं असो कीं ॥ ३८ ॥
जी सर्व भूतीं निरंतर । निद्रारुपें राहिली स्थिर ।
तिजकारणें नमस्कार । आमुचे असोत सर्वदा ॥ ३९ ॥
जी चंडिका सर्व भूतीं । क्षुधारुपें जाहली राहती ।
त्या देवीकारणें निश्र्चितीं । नमस्कार आमुचे सर्वदा ॥ ४० ॥
जी सर्व भूतांचे ठायीं जाण । छायारुपें राहिली आपण ।
त्या देवीप्रती नमन । आमुचें असो सर्वदा ॥ ४१ ॥
जी सर्व भूतीं पाहें । शक्तिरुपें राहिली आहे ।
तिजकारणें नमस्कार हे । आमुचे असोत सर्वदा ॥ ४२ ॥
सर्व भूतीं जी चंडिका । तृष्णारुपें असे देखा ।
तिजकारणें असोत कां । नमस्कार आमुचे सर्वदा ॥ ४३ ॥
जी राहिली सर्व भूतीं । रुप धरोनियां क्षांती ।
नमस्कार अनेक तिजप्रती । आमुचे असोत सर्वदा ॥ ४४ ॥
जीं सर्व भूतीं सतत । जातिरुपें स्थिर वर्तत ।
तीतें आमुचे निश्र्चित । नमस्कार असोत सर्बदा ॥ ४५ ॥
जी सर्व भूतमात्रीं जाण । लज्जारुपें राहिली आपण ।
त्या देवीकारणें नमन । आमुचें असो सर्वदा ॥ ४६ ॥
जी सर्व भूतांचे ठायीं । शांतिरुपें असे पाहीं ।
तिजकारणें सर्वदाही । नमस्कार असोत आमुचे ॥ ४७ ॥
सर्व भूतीं निरंतर । जी श्रद्धारुपें असे स्थिर ।
त्या देवीसी नमस्कार । आमुचे असोत सर्वदा ॥ ४८ ॥
जी सर्व भूतीं समान । कांतिरुपें असे जाण ।
त्या देवी भगवतीतें नमन । आमुचें असो सर्वदा ॥ ४९ ॥
जी लक्ष्मीरुपें राहिली । सर्व भूतांचे ठायीं संचरली ।
त्या देवीसी असो वहिली । नमस्कृति आमुची सर्वदा ॥ ५० ॥
जी सर्व भूतीं चराचर । वृत्तिरुपें असे स्थिर ।
तिजकारणेम नमस्कार । आमुचे असोत सर्वदा ॥ ५१ ॥
जी सर्व भूतांचे ठायीं जाण । स्मृतिरुपें राहिली आपण ।
त्या देवीकारणें नमन । आमुचे असो सर्वदा ॥ ५२ ॥
जी सकल भूतीं सतत । दयारुपें असे वसत ।
त्या देवीसी निश्र्चित । नमन असो सर्वदा ॥ ५३ ॥ 
जी सर्व भूतीं पाहें । तुष्टिरुपें राहिली आहे ।
त्या देवीसी लवलाहें । नमस्कृति आमुची ॥ ५४ ॥
जीं सर्व भूती स्थिर । राहे मातृरुपें निरंतर ।
तिजकारणे नमस्कार । आमुचे असोत सर्वदा ॥ ५५ ॥
जी सर्व भूतीं आपण । भ्रांतिरुपें राहिली पूर्ण ।
त्या देवीकारणें नमन । आमुचे असो सर्वदा ॥ ५६ ॥
सर्व इंद्रियांची अधिष्ठात्री । भूतव्याप्त देवी जनयित्री ।
चितिरुपें व्यापिली सर्वत्रीं । तिजप्रति नमो नमः ॥ ५७ ॥
अभीष्ठा संश्रयेंकरुन । पूर्वी देवांनीं स्तविली जाण ।
तैसीचि इंद्रानें सर्वदिनीं पूर्ण । सेविली ती शुभ करो ॥ ५८ ॥
ती शुभहेतु ईश्र्वरी जाण । करो आमुचें शुभ कल्याण ।
सर्व आपदांचें निरसन । करो क्षण न लागतां ॥ ५९ ॥
आतां दैत्यतापेंकरुन । तप्त होऊनि केलें नमन ।
तरी येचि क्षणीं येऊन । सर्व दुःखें निवारीं ॥ ६० ॥
मेधा ऋषि म्हणे सुरथा । देव ऐसें स्तवीत असतां ।
जान्हवीस्नाना तत्वतां । पार्वती तेथें पातली ॥ ६१ ॥
ती बोलती झाली सुरांते । तुम्ही येथें स्तवितां कोणातें ।
तों तिच्या देहापासूनि त्वरितें । स्त्री एक उत्पन्न जाहली ॥ ६२ ॥
तीच महासरस्वती जाण । पार्वतीच्या देहापासून । 
अवतार तिसरा घेऊन । बोलती जाहली तियेतें ॥ ६३ ॥
म्हणे पार्वती ऐक निश्र्चिती । देव हे माझें स्तवन करिती ।
शुंभनिशुंभांनी रणक्षितीं । पराभविलें म्हणोनियां ॥ ६४ ॥
शरीरकोशापासूनि जाहली । म्हणोनि ' कौशिकी ' नाम पावली ।
तिहीं लोकीं गाइयेली । शिवा म्हणोनि सर्वथा ॥ ६५ ॥
ऐसी कौशिकी होतां उत्पन्न । पार्वती जाहली कृष्णवर्ण ।
यास्तव ' कालिका ' नाम पावून । हिमपर्वती राहिली ॥ ६६ ॥
त्यानंतर महासरस्वती । दिव्य रुप जाहली धरिती ।
त्रैलोक्यीं दुजी स्त्री निश्र्चितीं । तैसी नाहीं पाहतां ॥ ६७ ॥
ती रतीहूनि मनोहर । कोटिगुणें असे सुंदर ।
तेव्हां चंड मुंड महाअसुर । पाहते जाहले तियेतें ॥ ६८ ॥
शुंभ-निशुंभांचे श्रेष्ठ । जे भृत्य असती महावरिष्ठ ।
देवीतें पाहूनियां स्पष्ट । सांगते जाहले शुंभासी ॥ ६९ ॥
राजा अत्यंत सुंदर । स्त्रीरत्न असे मनोहर ।
हिमवंत पर्वत थोर । तयावरी पाहिलें ॥ ७० ॥
जिच्या स्वरुपाची कांती । दाही दिशां पडली दीप्ती ।
हिमवंत पर्वत निश्र्चितीं । शोभविला तियेनें ॥ ७१ ॥
कोणाची ती आहे कोण । हें न कळे वर्तमान । 
ऐसें सुंदर स्त्रीरत्न । दुजें नाहीं त्रैलोक्यीं ॥ ७२ ॥
ती कोण आहे हे जाणोन । अवश्यमेव करावें ग्रहण ।
त्या स्त्रीरत्नावांचूनि जाण । सर्वही रत्नें व्यर्थ तुझी ॥ ७३ ॥
जीं रत्नें त्रैलोक्यीं असती । मणिगजाश्र्वादि निश्र्चितीं ।
तीं सर्व तुझे गृहीं शोभती । सांप्रतकाळीं दैत्येंदा ॥ ७४ ॥
आणिलें त्वां इंद्रापासून । ऐरावत हें गजरत्न ।
पारिजातक तरुही जाण । उच्चैःश्रवा हव तैसा ॥ ७५ ॥
ब्रह्मदेवाच्रें अत्युद्भुत । विमानरत्न आणिलें येथ ।
हंसयुक्त जें कां तिष्ठत । तवांगणी दैत्येंद्रा ॥ ७६ ॥
जिंकोनि त्वां कुबेराला । महापद्मनिधि आणिला ।
किंजल्किनी अम्लानमाला । तुज दिधली समुद्रें ॥ ७७ ॥
पंकजमाला शोभिवंत । जी कधींच नाहीं सुकत ।
सदा राहे टवटवीत । ती गळां घातली आपुल्या ॥ ७८ ॥
वरुणाचें छत्र हें जाण । तुझे गृहीं असे आपण ।
सर्वदा ज्यापासून सुवर्ण- । वृष्टि होत असे कीं ॥ ७९ ॥
दक्षप्रजापतीचा उत्कृष्ट । रथांमध्ये जो रथ श्रेष्ठ ।
तुज प्राप्त जाहला स्पष्ट । जो वरिष्ठ सर्वांहूनी ॥ ८० ॥
मृत्यूची उत्क्रांति देणार । ऐसी आणिली त्वां शक्ति दुस्तर ।
वरुणाचा पाश सत्वर । तव बंधूनें आणिला ॥ ८१ ॥
नाना रत्नजाति अपार । समुद्रीं निघाले त्यांचे निकर ।
निशुंभें आणोनि सत्वर । आपुल्या गृहीं सांठविल्या ॥ ८२ ॥
शुद्ध आणि नित्यनूतन । अग्नीऐसें तेजायमान । 
वस्त्रद्वय हें तुजलागून । अग्नि देता जाहला ॥ ८३ ॥
या प्रकारें त्वां दैत्यवरा । सर्व रत्नें आणिलीं घरा ।
स्त्रीरत्नांमध्यें ही सुंदरा । घरा कां हो नाणिसी ॥ ८४ ॥
मेधा म्हणे सुरथाप्रती । त्या चंड-मुंडांची वचनोक्ती ।
शुंभें ऐकोनि निश्र्चितीं । काय करिता जाहला ॥ ८५ ॥
सुग्रीव नामें महाअसुर । सर्व दूतांमध्यें चतुर ।
त्यातें पाठविता होय सत्वर । बोधोनि आणाया तिजलागीं ॥ ८६ ॥
शुंभ म्हणे सुग्रीवालागून । त्वां हिमपर्वतीं जाऊन ।
ऐसें ऐसें बोल कीं वचन । जेणें वश होय आम्हां ती ॥ ८७ ॥
या माझ्या वचनेंकरुन । त्वां तीस बोधिलें असतां जाण ।
स्वयमेव प्रीती धरुन । मजजवळी येईल ती ॥ ८८ ॥
या प्रकारें वचनोत्तरीं । त्वां कार्य करावें सत्वरीं ।
ऐसें बोलोनि तो झडकरी । पाठविला रायानें ॥ ८९ ॥
तों शोभिवंत हिमपर्वत । सुग्रीव तेथें गेला त्वरित ।
जेथें देवी होती निश्र्चित । तेथे सवेंचि पातला ॥ ९० ॥
नम्र मंजुळ मधुर वाणी । बोलता जाहला देवीलागुनी ।
म्हणे ऐक तूं कल्याणी । दूत मी येथें आलों असे ॥ ९१ ॥      
त्रैलोक्याचा चराचर । जो सर्व दैत्यांचा ईश्र्वर ।
शुंभनामा राजेश्र्वर । त्याचा दूत असें मी ॥ ९२ ॥
तेणें पाठविलें पाहीं । यास्तव पातलों या ठायीं ।
तुझ्यासमीप लवलाहीं । त्याचें वाक्य सांगतो ॥ ९३ ॥
तो जें बोलिला असे वचन । तें मी सांगतों तुजलागून ।
देवयोनीचे ठायीं जाण । माझी आज्ञा सर्वत्रीं ॥ ९४ ॥
ब्रह्मादिक जे सुरवर । ते माझे असती किंकर ।
समस्त माझे आज्ञाधर । मम वचनें वर्तती ॥ ९५ ॥
म्यां सकळ देव जिंकिले । त्रैलोक्य आपुलेंसें केले ।
देव माझे स्वाधीन जाहले । यज्ञभाग मी सेवीं ॥ ९६ ॥
या त्रैलोक्याचे ठायीं जाण । जें जें असे श्रेष्ठ रत्न ।
तें तें माझे गृहीं येऊन । शोभतें जाहले सर्वही ॥ ९७ ॥
पहा गजरत्न ऐरावतच । सर्व जगांत श्रेष्ठ निश्र्चित ।
देव मिळोनियां समस्त । उच्चैःश्रवा अर्पिला ॥ ९८ ॥
तैशींच देवगंधर्वाचे ठायीं । सर्प-दानव-देवगृहीं ।
जीं वस्तुरत्नें सर्वही । तीं माझीच असती निर्धारें ॥ ९९ ॥
सर्व रत्नांमध्यें वरिष्ठ । तूं स्त्रीरत्न अससी श्रेष्ठ । 
ऐसें आम्ही मानितों स्पष्ट । तरी आतां एक करीं ॥ १०० ॥
रत्नभोक्ते आम्ही बरवे । यास्तव त्वां आम्हांसी वरावें ।
आम्ही तुजलागीं सेवावे । हेंचि एक योग्य जनीं ॥ १०१ ॥
मातें अथवा बंधु निशुंभातें । तुजसी योग्य सेवनातें ।
आम्हांवांचूनि त्रैलोक्यातें । तुज योग्य कोणी असेना ॥ १०२ ॥
आम्ही पराक्रमी दोघेजण । तूं चंचलापांगी योग्य रत्न ।
माझ्या परिग्रहेंकरुन । सर्व ऐश्र्वर्य पावसी ॥ १०३ ॥
ऐसेम जाणोनि विचार करीं । मजलागीं येऊनि वरीं ।
तूं पट्टमहिषी निर्धारी । प्राणेश्र्वरी होसील ॥ १०४ ॥
मेधा म्हणे सुरथा जाण । दूताचें ऐकोनि भाषण ।
दुर्गा भगवती हांसोन । गंभीर शब्दें वदतसे ॥ १०५ ॥
जियेच्या इच्छामात्रेंकरुन । ब्रह्मादिक जाहले उत्पन्न ।
उत्पत्ति संहार पालन । धारण करी जगाचे ॥ १०६ ॥
ती जगन्माता भगवती । बोलती जाहली दूताप्रती ।
तूं सत्य बोललासी निश्र्चिती । किंचित मिथ्या नसे कीं ॥ १०७ ॥
त्रैलोक्याचा राजेश्र्वर । तो शुंभ दैत्यपति असे थोर ।
तैसाचि त्याचा बंधु साचार । दोघे समर्थ असती ते ॥ १०८ ॥
परंतु जरी हें मजसी । पूर्वीच समजते वेगेसीं ।
तरी व्यर्थ प्रतिज्ञेसी । करुनि गुंतले नसतें कीं ॥ १०९ ॥
पूर्वी अल्पबुद्धी करुन । प्रतिज्ञा मी केली जाण ।
दूता सांगते तुजलागून । उपाय येथें सुचेना ॥ ११० ॥
जो मज युद्धीं जिंकील सत्वर । तोचि करिन निश्र्चयें वर ।
ऐसिया प्रतिज्ञेसी साचार । मिथ्या कैसे करावें ॥ १११ ॥
तस्मात् ते येथे येऊन । शुंभ निशुंभ दोघेजण ।
शीघ्र युद्धीं मज जिंकोन । पणिग्रहण करोत कां ॥ ११२ ॥
दूत बोले चंडिकेतें । व्यर्थ गर्व करिसी त्यांते ।
मजपुढें एकही वाक्यातें । बोलूं नको देवी तूं ॥ ११३ ॥
या त्रैलोक्यामाझारी । शुंभ-निशुंभांचे समरी ।
युद्ध करी ऐसा केसरी । समर्थ कोणी असेना ॥ ११४ ॥
शुंभ-निशुंभांचे सेवक । त्यांचे पुढें राहूं सन्मुख ।
ऐसी शक्ति नाही देख । इंद्रादिकांसी सर्वथा ॥ ११५ ॥
हें काय तुज सांगावें पुन्हां । तूं तंव स्त्री एकटी जाणा ।
इंद्रादि सर्व देवगणां । दैत्य संग्राम दुस्तर ॥ ११६ ॥
शुंभ-निशुंभांच्या सन्मुख । तूं स्त्री कैसी राहसील देख ।
आतांचि मद्वाक्याचें सुख । मानोनि चाल शुभांगी ॥ ११७ ॥
आतांचि मानेंकरुनि जावें । हें आम्हांसी दिसते बरवें ।
केशाकर्षण करुनि घ्यावें । मग यावें कशाला ॥ ११८ ॥
केशआकर्षणेंकरुन । गेलिया गौरव नसे जाण ।
थोर मरणाहुनि अपमान । ऐसें सर्व ज्ञाते बोलती ॥ ११९ ॥
देवी म्हणे दूतालागून । खराचि बळी शुंभ जाण ।
तैसाचि निशुंभही बळवान । परी काय करुं प्रतिज्ञेसी ॥ १२० ॥
पूर्वी विचार न करितां । प्रतिज्ञा केली म्यां तत्वतां ।
जें होणार तें होवो आतां । दूता जाऊनि सांगें तूं ॥ १२१ ॥
माझ्या प्रतिज्ञेचें निरुपण । जें हें सर्व युद्धकारण ।
आदरे सांगिजे दैत्यालागून । तो जें युक्त तैसें करो ॥ १२२ ॥
श्रोते हो व्हावें सावधान । आतां पुढील अध्यायीं जाण ।
धूम्रलोचनाचें हनन । तुम्हांलागीं कथन करुं ॥ १२३ ॥
गातां ऐकतां हा अध्याय । नाश पावती सर्व अपाय ।
मानसीं इच्छिलें प्राप्त होय । धन-सुत-दारादि सर्वही ॥ १२४ ॥
विद्यार्थियासी विद्याप्राप्ती । रोगियासी आरोग्यस्थिती ।
मुमुक्षूसी मोक्ष निश्र्चितीं । प्राप्त याचेनि होतसे ॥ १२५ ॥
हें महासरस्वतीचें आख्यान । करिता जाहलो तुज कथन ।
तृतीयअवतार उत्पत्ति जाण । दूतसंवादही निरुपिला ॥ १२६ ॥
देवीनें जैसें बोलविलें । तैसेचि येथें वर्णन केलें ।
सज्जनी पाहिजे परिसिलें । कृपा करुनि सर्वदा ॥ १२७ ॥
श्रीभगवतीसी नमस्कार । माझे असोत निरंतर । 
तीच हा ग्रंथ करणार । निमित्त राम निर्धारे ॥ १२८ ॥
॥ इति श्रीमार्कंडेयपुराणे सावर्णिके मन्वंतरे देवीभगवतीमाहात्म्ये महासरस्वत्याख्याने देव्यवतारदूतसंवादनिरुपणं नाम पंचमोऽध्यायः ॥ 

॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥

DeviMahatmya Adhyay 5 
श्रीदेवीमहात्म्य अध्याय (5) पांचवा




Custom Search

No comments:

Post a Comment