Tuesday, January 20, 2015

DeviMahatmya Adhyay 12 श्रीदेवीमहात्म्य अध्याय (१२) बारावा


DeviMahatmya Adhyay 12 
DeviMahatmya Adhyay 12 is in Marathi. It is a translation of DurgaSaptashi Adhyay 12 which is in Sanskrit. In this Adhyay Goddess Durgadevi is telling the importance of reading/Listening DeviMahatmya. The devotees who read or listen this DeviMahatmya becomes free from his difficulties and they receive everything they wish by the blessings of Goddess. She is telling how and when Navaratri festival started. Initially in the war with Ravana God Ram found it very difficult, hence Rushies, Munies and Gods started praying Goddess Durgadevi. She awoke on first day of Ashawin. God Ram killed Demon Ravan on the Ashawin Shudha Dashami. Hence this Dashami is being called as Vijaya Dashami. People started to celebrate Vijayadashami. People started to celebrate Navaratri festival from Ashawin Shudha Pratipada to Ashawin Shudha Dashami.
श्रीदेवीमहात्म्य अध्याय (१२) बारावा
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीदेव्यै नमः ॥
जय जय अंबिके शंकरप्रिये । मूलप्रकृति महामाये ।
तव नामक्स्मरणे संकट जाय । तृणअग्निन्यायवत ॥ १ ॥
ऐसिया तुझे पवित्र नामीं । सदा तत्पर राहिलों आम्ही ।
आतां नेई मोक्षधामीं । संसारदुःखें निवटूनियां ॥ २ ॥
असो पूर्वाध्यायीं कथन । नारायणीस्तुति जाण ।
आणि देव्यवतारनिरुपण । केलें निजमुखें देवांसी ॥ ३ ॥
आतां पुढील चरित्र । ऐका चित्त देऊनि सर्वत्र ।
जें कां श्रवणपठणें पवित्र । भुवनत्रया करितसे ॥ ४ ॥
देवी म्हणे देवांलागून । जो एकाग्रचित्त होऊन । 
नित्य हें माहात्म्य पठण करुन । तोषवील मजलागीं ॥ ५ ॥
तयाच्या सकल बाधेतें । निःसंशय मी स्वयें नाशितें ।
इहपरीची सौख्य त्यातें । देऊनियां तोषवीन ॥ ६ ॥
मधु-कैटभांचे घातन । आणि महिषासुराचे मर्दन ।
शुंभ-निशुंभांचे निर्दलन । यांचे कीर्तन करितील जे ॥ ७ ॥
अष्टमी-चतुर्दशी-नवमीसी । जे होऊनि एकाग्र मानसीं ।
श्रवण करिती माहात्म्यासी । प्रेमभक्तिकरुनियां ॥ ८ ॥
तयांसी किंचित पाप आपदा । दारिद्र्य दुःख न होय कदा ।
प्राप्त होती सर्व संपदा । यांचें पठणही कर्त्यांसी ॥ ९ ॥
इष्टजनांचा वियोग कांहीं । कदाकाळीं होणार नाहीं ।
तस्कर आणि शत्रूंचें भयही । त्यांसी कदा असेना ॥ १० ॥
राजापासूनी अग्नीपासूनि । तयांसी भय न होय जनीं ।
शस्त्रांचे जलाचें त्यांलागुनी । भय कदाही असेना ॥ ११ ॥
या कारणास्तव जाण । माझें हें माहात्म्य पवित्र पूर्ण ।
एकाग्रचित्ते श्रवण पठण । कर्त्यासी कल्याण होईल कीं ॥ १२ ॥
महामारीपासूनि सर्व । नानापरींचे उपद्रव ।
तैसेचि त्रिविध उत्पातभाव । शांत करी माहात्म्य हें ॥ १३ ॥
माझ्या मंदिराच्या ठायीं जाण । याचें करील श्रवण पठण ।
त्याच्या सन्निधानातें टाकून । मी न जाई कदापि ॥ १४ ॥
जेथें माहात्म्याचें पठण । तेथें माझें सान्निध्य जाण ।
सर्वकाळ वास करुन । मी राहें तयापासीं ॥ १५ ॥
कोठें कोठें पठण करावे । तें सांगते ऐका स्वभावें ।
बलिप्रदान करितां भावें । पठण याचे उत्तम ॥ १६ ॥
पूजेच्या ठायीं जाण । अवश्य याचें करावें पठण ।
आणि होमाचे काळीं पू्र्ण । माहात्म्य पठण करावें ॥ १७ ॥
श्रवण अथवा पठन । दोहींचें फळ समसमान ।
परी एकाग्रचित्तें करुन । सादर मात्र असावें ॥ १८ ॥
जाणूनि अथवा न जाणत । बलिपूजा करितां निश्र्चित ।
आणि अग्नीचे ठायीं होम देत । प्रेम धरुनि मानसीं ॥ १९ ॥
त्या बलिपूजेतें आणि होमातें । मी ग्रहण करीन निश्र्चितें ।
बहुत असे आवडी मातें । होमाचीं आणि पूजेचीं ॥ २० ॥
प्रतिवर्षाचे शरत्काळीं । महापूजा करावी तत्काळीं ।
पूजाकाळीं मिळोनि सकळीं । माहात्म्य श्रवण करावें हें ॥ २१ ।
सर्व बाधेपासूनि मुक्त । ते होती धनधान्यसुतान्वित ।
माझ्या प्रसादेंकरुनि समस्त । अर्थप्राप्ति होईल तयां ॥ २२ ॥       
मी बोलतें याचा संशय । धरुं नका हाचि निश्र्चय ।
सर्वदा तयासी होय विजय । माहात्म्यश्रवण कर्तयासी ॥ २३ ॥
माहात्म्य पराक्रम उत्पत्ती । जो कां श्रवण करी निश्र्चितीं ।
तेणें कालादिकांचे भय चित्तीं । धरुं नये सर्वथा ॥ २४ ॥ जो कां माहात्म्य करी श्रवण । त्याचे शत्रु पावती मरण । 
त्याचें होय सदा कल्याण । संशय नाहीं सर्वथा ॥ २५ ॥  श्रवणार्थियासी कल्याण । हें तंव आश्र्चर्य नव्हे जाण ।
परी तयाच्या कुळासी पूर्ण । आनंद होय सर्वदा ॥ २६ ॥
सर्व शांतिकर्माचे ठायीं जाण । अवश्य याचें करावें पठण ।
जाहलिया दुःस्वप्नदर्शन । श्रवण याचे करावे ॥ २७ ॥
हें माहात्म्य श्रवण करितां । ग्रहपीडा नासती तत्त्वतां ।
सर्व उपसर्गांची शांतता । होय येणेंकरुनियां ॥ २८ ॥
दुःस्वप्नाचें सुस्वप्न होय । बालग्रहाची पीडा जाय ।
सर्वरोगनाशाचा उपाय । माहात्म्यश्रवण असे हें ॥ २९ ॥
वियोग होतां स्त्रीपुत्रांचा । पुन्हा संयोग होय साचा ।
सकळांची मैत्री करण्याचा । हाचि उपाय निर्धारें ॥ ३० ॥
दुर्वृत्ताचीं बळें सकळ । येणेंचि लया जाती तत्काळ ।
भूत प्रेत पिशाच केवळ । नाश पावती पठनेंचि ॥ ३१ ॥
सर्व माझें हें माहात्म्य देख । जाणावें मम सान्निध्यकारक ।
माझी पूजा सांवत्सरिक । मम प्रीत्यर्थ करावी  ३२ ॥
मजकारणें बलिदान । मेषाश्र्वमहिषादि पशु जाण ।
तदभावें पैष्टिक पशु करुन । बलिदान करावें ॥ ३३ ॥
अथवा कुष्मांडफळाचा बळी । यथाधिकारें अर्पावा तत्काळी ।
जितुक्या पशुच्या रोमावळी । पशुशरीरीं असतील ॥ ३४ ॥
प्रतिरोमीं सहस्त्र वर्ष । दुर्गालोकीं वास विशेष ।
त्यासी घडेल सावकाश । यासी संशय असेना ॥ ३५ ॥   आश्र्विन शुद्ध प्रतिपदेशी । कलश स्थापूनि विधीसीं ।
उपवास करावा अष्टमीसी । नवमीसी होम पारणें ॥ ३६ ॥
तेचि दिवसीं बलिप्रदान । अपराण्हकालीं करावें जाण ।
आणि कुमारिकापूजन । अवश्य ते दिवसीं करावें ॥ ३७ ॥
मूळावरी सरस्वत्यावाहन । श्रवणनक्षत्रीं विसर्जन ।
विजयादशमीसही पूजन । करुनि मग विसर्जावें ॥ ३८ ॥
तीन पांच अथवा सात । अथवा नऊ दिवसपर्यंत ।
नवरात्र करावें एकभुक्त । नक्त अथवा उपोषणें ॥ ३९ ॥
स्त्रीपुरुषांनी करावें व्रत । सर्व वर्णासी असे उचित ।
अभ्यंग दंतघावन निश्र्चित । पुष्पादि ग्रहण करावें ॥ ४० ॥
अंजन आणि तांबूल जाण । कुंकुमयुक्त वस्त्रें आपण ।
यथाधिकारें यांचे धारण । उपवासीं करावें ॥ ४१ ॥
अशौच अथवा रोगग्रस्त । रजस्वला जाहलिया निश्र्चित ।
स्वयें करावें उपवासव्रत । कायिक नियम करावें ॥ ४२ ॥
जप पाठ अर्चन स्तवन । अन्यद्वारा करवावें जाण ।
नवरात्राचे अंतीं पारणें । स्वयमेव करावें ॥ ४३ ॥
अशौचांतीं ब्राह्मण भोजन । करावें ब्राह्मणासी दान ।
नक्षत्रयोग नसतां जाण । तिथि ग्रहण करावी ॥ ४४ ॥
सप्तमीपासूनि चार दिन । केलिया सरस्वतीपूजन ।
लिहितां वाचितां अध्ययन । करितां दुःख होतसे ॥ ४५ ॥
नित्य राजोपचारेंकरुन । महापूजा करावी जाण ।
नवरात्रीं चंडिकापूजन । केलिया अनंत फळ होय ॥ ४६ ॥
ब्राह्मण भोजन कुमारीपूजन । नित्य यथाशक्ती करावें आपण ।
कुमारीपूजनाचें विधान । एकाग्रचित्तें श्रवण करा ॥ ४७ ॥
कुमारी असावी रोगरहित । कुरुप नसावी निश्र्चित ।
अंगी व्रणछिद्रें विवर्जित । स्ववर्णाची असावी ॥ ४८ ॥
एक वर्षाची कन्या जाण । तिचें करुं नये पूजन ।
दोन संवत्सरांपासून । दशवर्षांत पूजावी ॥ ४९ ॥
दोन वर्षांची कुमारी जाण । मुख्य तिचे करावें पूजन ।
तीन वर्षांची त्रिमूर्ति पूर्ण । पूजन भावें करावें ॥ ५० ॥
चहूं वर्षांची कल्याणी । पांच वर्षांची रोहिणी । 
सहा वर्षांची काली म्हणोनी । नाममंत्रे पूजावी ॥ ५१ ॥
सात वर्षांची चंडिका । आठां वर्षांची शांभवी देखा ।
नव वर्षांची दुर्गा ऐका । दहा वर्षांची सुभद्रा ती ॥ ५२ ॥
या प्रकारेंकरुन । नव कन्यांचे करावें पूजन ।
मुख्य नाममंत्र जाण । बोलिला असे पुराणीं ॥ ५३ ॥
श्रुतिस्मृतींचे मंत्र म्हणती । परी नाममंत्र अंती जपती ।
म्हणोनि तोचि मंत्र निश्र्चितीं । मुख्य असे परियेसा ॥ ५४ ॥
नाममंत्राचें लक्षण । प्रणव आधीं उच्चारुन । 
नामसी चतुर्थी लावून । ' नमः ' अंतीं म्हणावें ॥ ५५ ॥
असो प्रतिपदेसी कलश पूजून । आरंभावें पूजानुष्ठान ।
उपांगललिताव्रत पूर्ण । पंचमीदिवसीं करावें ॥ ५६ ॥
सप्तमीदिवसीं सरस्वती । मूळनक्षत्रीं पूजा करिती । 
दशमीसी पुस्तक शस्त्रें पूजिती । मग करिती विसर्जन ॥ ५७ ॥
अष्टमीदिवसीं अकस्मात । कोट्यवधि योगिनीसहित ।
प्रकट जाहली ती निश्र्चित । महामाया जगदंबा ॥ ५८ ॥
चैत्र शुद्ध अष्टमीदिनीं । जन्मली देवी महाभवानी ।
म्हणवूनि उपवासालागुनी । योग्य असती हे दिवस ॥ ५९ ॥
असो नवरात्रामध्ये जाण । जयासी न घडे उपोषण ।
तेणें अष्टमीसी तरी पूर्ण । उपोषण करावें ॥ ६० ॥
यद्यपि न घडे सर्वांस । पुत्रवंते करावें विशेष ।
नवमी दिवसीं समाप्तीस । होम पारणें करावें ॥ ६१ ॥
नवमीदिवसीं अपराण्हीं । बलिदान करावें देवीलागुनीं ।
दशमीदिवसीं सर्वांनीं मिळोनी । सीमोल्लंघन करावें ॥ ६२ ॥
सायंकाळी दशमीस जाण । श्रवणयुक्त सीमोल्लंघन ।
अश्मंतकशमीचें पूजन । नाममंत्रे करावें ॥ ६३ ॥
या नवरात्रामध्यें जाण । आधारीं पुस्तक स्थापून ।
मग करावें माहात्म्यपठण । करीं घेता निष्फळ होय ॥ ६४ ॥
प्रतिदिनीं नवमीपर्यंत । महापूजा करावी निश्र्चित ।
समारंभ करावा बहुत । ती पूजा वार्षिकी जाणावी ॥ ६५ ॥
संवत्सरामध्यें नव दिन । नवरात्रमाहात्म्य थोर जाण ।
व्हावयाचे काय कारण । एकाग्रचित्तें श्रवण करा ॥ ६६ ॥
पुलस्तीच्या वंशी जन्मले । रावण-कुंभकर्ण वरें मातले ।
सर्व देव बंदि घातलें । कार्यीं योजिले सर्वही ॥ ६७ ॥
ब्रह्मदेवें पंचांग सांगावें । इंद्रें पुष्पहार गुंफावे ।
रावणाच्या गळा घालावें । तोषवावें सकळिकें ॥ ६८ ॥
चंद्रानें छत्र धरावें । सूर्यानें दिप पाजळावे ।
वरुणानें उदक भरावें । तीर्थसमुद्रालागुनी ॥ ६९ ॥  
अग्नीनें सर्व वस्त्रांचे मळ । क्षालन करावें तत्काळ ।
गणपतीनें पशु सकळ । रावणाचें राखावें ॥ ७० ॥
वायूनें रावणगृहींची धूळ । सर्वदा केर काढावा सकळ ।
षष्ठीदेवतेनें तत्काळ । बाळंतपणें करावीं ॥ ७१ ॥
ऐशीं सहस्त्र स्त्रिया जाण । एकलक्ष पुत्रसंतान ।
सव्वा लक्ष पौत्रप्रमाण । रावणाचें असती पैं ॥ ७२ ॥
अष्टभैरव जे कां प्रबळ । रावणाचे ते कोतवाल ।
त्यांनी रात्रीं जागूनि केवळ । चौकी पहारा करावा ॥ ७३ ॥
मल्लारी देव जाण । तेणें करावें केशकुंतन ।
नवग्रहांनींही मिळोन । आज्ञेकरुन वर्तावें ॥ ७४ ॥
या प्रकारें कार्यार्थीं केले । कितीएक बंदीं घातले । 
देवऋषि त्रास पावले । शरण गेले ब्रह्मयासी ॥ ७५ ॥
तेणें विष्णूसी प्रार्थिलें म्हणून । राम लक्ष्मण जाहले उत्पन्न ।
त्यांनी युद्ध केलें दारुण । लंकेवरी रावणाशीं ॥ ७६ ॥
इंद्रजित कुंभकर्ण । या दोघांचे केलें हनन ।
परी रावणासी मरण । कैसे होय कळेना ॥ ७७ ॥
रावणासी अमरत्वाचा वर । हृदयीं अमृतकलशसाचार ।
संग्रामीं त्याचे छेदितां शिर । पुन्हां उत्पन्न पैं होय ॥ ७८ ॥
तेव्हां राम चिंताक्रांत जाहले । सर्व देवांसी संकट पडले ।
मग ब्रह्मदेवें जागृत केलें । महामायेसीं तें काळीं ॥ ७९ ॥
रामासी व्हावा जय प्राप्त । रावणासी मृत्यु निश्र्चित । 
म्हणवूनि ब्रह्मदेव त्वरित जागृत । करिता जाहला ॥ ८० ॥
आश्र्विन शुद्ध प्रतिपदेसी । देवी जागृत झालीं निशीं ।
चंद्रदर्शन नसतां रात्रीसी । जागी जाहली महामाया ॥ ८१ ॥
म्हणोनि चंद्राचें दर्शन । ते दिवसीं न घ्यावें आपण ।
असो रामासी जय होईल जाण । ऐसा वर दिधला ॥ ८२ ॥
मग सर्व देव ऋषि मिळोनी । निश्र्चय केला आपुले मनीं ।
रावण मरेपर्यंत सर्वांनीं । आराधावी जगदंबा ॥ ८३ ॥
ऐसा सर्वांनीं निश्र्चय करुन । मग मांडिलें अनुष्ठान ।
कलशस्थापन देवीपूजन । चंडीपाठ आरंभिला ॥ ८४ ॥
कुमारीपूजन उपोषण । यथाशक्ति ब्राह्मणभोजन ।
सर्व देव ऋषि मिळोन । अनुष्ठान चालविती ॥ ८५ ॥
इकडे देवीचे आज्ञेंकरुन । युद्ध मांडिलें अतिदारुण ।
सप्तदिवसपर्यंत जाण । अहोरात्र युद्ध केलें ॥ ८६ ॥
मग अष्टमदिवसीं देख । मरण पावला दशमुख ।
कोट्यवधि योगिनींसह सुरेख । तै प्रकट जाहली जगदंबा ॥ ८७ ॥
ब्रह्मा आदिकरुनि देव । तेव्हां आनंदले सर्व । 
नानापरींचे वर अपूर्व । पावूनि स्तविती देवीतें ॥ ८८ ॥
मग देवीच्या आज्ञेंकरुन । नवमीसी होम पारणें सारुन ।
देवीकारणें बलिप्रदान । केलें अपराण्हीं देवांनीं ॥ ८९ ॥
इकडे रामें बिभिषणाला । लंकाराज्यीं स्थापन केला ।
मग दिव्य देऊनि सीतेला । निघता जाहला सुमुहुर्तें ॥ ९० ॥
आश्र्विन शुक्ल दशमी जाण । सायंकाळीं नक्षत्र श्रवण ।
विजय नामाचा काल पूर्ण । तारकाउदयीं जाणावा ॥ ९१ ॥ 
तो विजयकाल सकळिक । सर्वकार्यार्थसाधक ।
प्रयाणमुहुर्ती विशेषक । सर्व कामना सिद्ध होती ॥ ९२ ॥
विजयकालाची म्हणोनी । विजयादशमी म्हणती जनीं ।
तो विजयमुहूर्त पाहूनी । निघता जाहला काकुस्थ ॥ ९३ ॥
सर्व देवांसहित जाण । करोनियां शमीपूजन ।
केलें शमीसीं प्रिय भाषण । मग पुष्पकीं बैसला ॥ ९४ ॥
ईशान्येसी केलें गमन । आला अयोध्येलागून ।
सर्व सुहृदादिजनां भेटोन । राज्य करिता जाहला ॥ ९५ ॥
सर्व देवऋषींसी आनंद । जाहला तुटले अवघे बंध ।
सीमोल्लंघन केलें प्रसिद्ध । स्वेच्छाचारें दशमीसी ॥ ९६ ॥
या कारणास्तव जाण । विजयादशमीसी पूजन । 
करावें ईशान्येंसी सीमोल्लंघन । शमीपूजनें जयप्राप्ती ॥ ९७ ॥
नवरात्रीं आणि विजयादशमीस । महापूजा करावी विशेष ।
त्या पूजेच्या कारणें अवश्य । वार्षिकी पूजा म्हणावी ॥ ९८ ॥
हा नवरात्रीविधि कथन । केला कालिकापुराणावरुन ।
रायाचेही पूर्वज जाण । नवरात्र करिते जाहले ॥ ९९ ॥
कल्पपरत्वें अवतार । होती जाती वारंवार ।
कथाभेदही साचार । अनेकपरी असती ते ॥ १०० ॥
महानवमीदिवशीं जाण । जें करावें देवीपूजन ।
त्याचा महिमा न कळे पूर्ण । ब्रह्मादिकां हरिहरां ॥ १०१ ॥
जो सुगंधपुष्पतोयेंकरुन । देवीकारणें घाली स्नान ।
तो जाय वैकंठालागुन ।  संशय नाहीं सर्वथा ॥ १०२ ॥
क्षीरेंकरुनि जो घाली स्नान । तया प्राप्त इंद्रभुवन ।
दधिस्नान अर्पितां जाण । शिवलोकासी पावे तो ॥ १०३ ॥
घृतस्नान घालितां आपण । दश पूर्वजांसहित जाण ।
दश अवरज घेऊन । दुर्गालोकीं वास करी ॥ १०४ ॥
जो कां पंचगव्याचें स्नान । अर्पीतसे देवीलागुन ।
सर्वदा विष्णूचें सन्निधान । तयालागीं होतसे ॥ १०५ ॥
कपिलाधेनूचेदुग्ध घृत । त्याचें शतगुणें पुण्य होत ।
इक्षुरसें जो स्नापित । तोही पावे विष्णुलोका ॥ १०६ ॥
जो मधुस्नान घाली आपण । त्याचे समस्त पितृगण ।
सहस्त्रवर्षेंपर्यंत जाण । तृप्त होती निर्धारें ॥ १०७ ॥
स्नानासी अर्पितां तीर्थजळ । अश्र्वमेधाचें पावे फळ ।
गंधोदकस्नानें केवळ । महिमा पावे चंद्रलोकीं ॥ १०८ ॥
कर्पूरोदकीं सुगंध पदार्थ । जो तेणें स्नान घाली यथार्थ ।
स्वर्गलोकीं सुगंधअर्थ । प्राप्त होती तयासी ॥ १०९ ॥
क्षीर कुशाग्र अक्षता जळ । दधि सर्षप यव दूर्वा तिळ ।
मधु कुंकुम गोरोचनादि सकळ । द्वादश पदार्थ अर्घ्याचे ॥ ११० ॥
मंत्रयुक्त अर्घ्य देवीसी । जो कां अर्पण करी विशेषीं ।
तो दशसहस्त्र वर्षी । दुर्गा लोकी वास करी ॥ १११ ॥  
उदक कुशाग्र क्षीर तंदुळ । दधि घृत सर्षप तिळ ।
अष्टांग अर्घ्य हा केवळ । अर्पिता सायुज्य पावे तो ॥ ११२ ॥
चंदन कर्पूर गोरोचन । अगरु कस्तूरी कुंकुम जाण ।
सुगंधे करीतसे लेपन । चारही पुरुषार्थ पावे तो ॥ ११३ ॥
नानापरींचे अर्पितां पुष्प । तत्काळ होय तो निष्पाप ।
याचि जन्मीं देवीस्वरुप । प्राप्त होय तयासी ॥ ११४ ॥
कृष्णागरु कर्पूर चंदन । दशांगगुग्गुल धूपार्पण ।
केलिया पावे दुर्गाभुवन । यासी संशय असेना ॥ ११५ ॥
घृतदीप लावितां प्रसिद्ध । तयासी घडे अश्र्वमेध । 
तैलदीप लावितां अगाध । वाजपेय घडे त्यासी ॥ ११६ ॥
जितुका दीपांचा संघात । दीप लावी घृतयुक्त ।
तितुके कल्पसहस्त्रपर्यंत । दुर्गालोकीं वास करी ॥ ११७ ॥
शर्करायुक्त पायस । जो अर्पण करी देवीस ।
सकळ राज्यप्राप्ति त्यास । संशय नाहीं सर्वथा ॥ ११८ ॥
देवीसी चतुर्विध अन्न । षड्रस आणि पक्वान्न ।
संतति संपत्ति ऐश्र्वर्य पूर्ण । प्राप्त होय तयासी ॥ ११९ ॥
जो देवीसी वस्त्रें अर्पीत । त्यांसी जितुके तंतु असती निश्र्चित ।
तितुके वर्षसहस्त्रांत । वास करी दुर्गागृहीं ॥ १२० ॥
छत्रें चामरें अलंकार । व्यजन आदर्शादि सादर ।
फल तांबूल दक्षिणा समग्र । जे जे पदार्थ अर्पावे ॥ १२१ ॥ 
त्यांच्या अनंतगुणें निश्र्चित । आपणांलागी प्राप्त होत ।
अंती निर्वाण मोक्ष पावत । संशय चित्तीं न धरावा ॥ १२२ ॥
देवी म्हणे देवांलागुन । मज करावें सर्व भोग अर्पण ।
तर्पण होम विप्रभोजन । वार्षिकी पूजा करावी ॥ १२३ ॥
संवत्सरें करुनि पूजन । माझी साधावी प्रीती जाण ।
माझें चरित्र श्रवण पठण । प्रेमभावें करावें ॥ १२४ ॥
पातकाचा करी नाश । आरोग्यता पाठकास ।
भूतांपासूनि रक्षणास । हें माहात्म्य करीतसे ॥ १२५ ॥
सकळ शत्रूंचे भय जाय । सदा शुभफल प्राप्त होय ।
दावाग्नीचें नाहीं भय । जरी वेष्टिलें तयानें ॥ १२६ ॥
तस्करांनीं जरी वेढिला । शत्रूनीं जरी धरिला ।
सिंहव्याघ्रादिकीं गांठिला । घोर वनीं यद्यपि ॥ १२७ ॥
राजानें क्रोध पावून । आज्ञापिला वधालागुन ।
बंध पावला असतां जाण । घूर्णित जाहला वायूनें ॥ १२८ ॥
समुद्रीं नौकेमध्यें बैसला । संग्रामीं शस्त्रपात घडला ।
घोर बाधा जाहली तयाला । कळा लागल्या सर्वांगीं ॥ १२९ ॥
स्मरतां माझें हें चरित्र । सर्व संकटांपासूनि मुक्त होत ।
सिंहादि चोर वैरी समस्त । दूर पळती निर्धारें ॥ १३० ॥
ऋषि सांगे सुरथाप्रती । ऐसें बोलोनि भगवती ।
गुप्त जाहलीं निश्र्चितीं । पाहात असतां सुरवर ॥ १३१ ॥
तैं देव होऊनि आनंदयुक्त । स्वाधिकारांते पावले त्वरित ।
यज्ञभागादि समस्त । पूर्वींचे परी पावले ॥ १३२ ॥
देवीनें शुंभ निशुंभ असुर । मारिले पराक्रमी दुर्धर ।
मग उरले दैत्य समग्र । पातालभुवनीं प्रवेशले ॥ १३३ ॥
मेधाऋषि सांगे सुरथा । या प्रकारें देवी तत्त्वतां ।
केवळ जन्ममृत्युरहिता । निरंतर नित्य असे ॥ १३४ ॥
परी भक्तकार्यालागून । पुनःपुन्हां होऊनि उत्पन्न ।
या विश्र्वाचें परिपालन । करिती जाहली महामाया ॥ १३५ ॥
ती या विश्र्वातें मोहीत । सर्व जगातें उत्पन्न करीत ।
प्रार्थिली असतां त्वरित । विज्ञानऋद्धि देतसे ॥ १३६ ॥
तिनें ब्रह्मांड व्यापिले समस्त । महाकाली महामारी निश्र्चित ।
तीचि सृष्टि जाहली अद्भुत । भूतस्थिति करीतसे ॥ १३७ ॥
तीचि अनादि जाण । वृद्धिप्रदा गृहीं होऊन ।
भयकालीं सर्व कल्याण । करीत असे भूतांचे ॥ १३८ ॥
तैसीच विनाशकाळीं जाण । अलक्ष्मी होय नाशालागून ।
एवं सर्व कालीं सनातन । संचली असे महामाया ॥ १३९ ॥
यास्तव पुष्पधूपादिकेंसीं । स्तवितां पूजिता जगदंबेसी ।
शुभमति पुत्र भक्तांसी । देतसे धनही अपार ॥ १४० ॥
विद्यार्थी विद्यावंत होती । राज्यलोभिया राज्यप्राप्ती ।
भार्यार्थियासी अंगना निश्र्चितीं । मनोहारिणी प्राप्त होय ॥ १४१ ॥
धर्माचे ठायी बुद्धि सतत । अंती उत्तम गति देत ।
असो या प्रकारें निश्र्चित । चरित्रमहिमा वर्णिला ॥ १४२ ॥
आतां पुढिले अध्यायीं जाण । सुरथ-वैश्यां वरप्रदान । 
देईल स्वयें देवी आपण । महामाया जगदंबा ॥ १४३ ॥
श्रीदेवीने जैसे बोलविलें । तैसेंचि येथें वर्णन केलें ।
सज्जनीं पाहिजे परिसिलें । कृपा करुनि सर्वदा ॥ १४४ ॥
याचें करितां श्रवण पठण । सर्व बाधा जाती निरसून ।
देवी करीतसे श्रवण । भक्तजवळी बैसोनी ॥ १४५ ॥
त्या अंबिकेसी नमन । सर्वभावें असो जाण ।
राममुखें कृपा करुन । हें माहात्म्य वदविलें ॥ १४६ ॥ 
॥ इति श्रीमार्कंडेयपुराणे सावर्णिके मन्वंतरे देवीभगवतीमाहात्म्ये महासरस्वत्याख्याने देव्याश्र्चरित्रमाहात्म्यवर्णनं तथा भगवतीवाक्यनिरुपणं नाम द्वाददशोऽध्यायः ॥

॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥

DeviMahatmya Adhyay 12 
 श्रीदेवीमहात्म्य अध्याय (१२) बारावा


Custom Search

No comments:

Post a Comment