Tuesday, January 27, 2015

DeviMahatmya Adhyay 14 श्रीदेवीमाहात्म्ये अध्याय चौदा (१४)


DeviMahatmya Adhyay 14 
DeviMahatmya Adhyay 14 is in Marathi. It is a translation of DurgaSaptashi Adhyay 14 which is in Sanskrit. This Adhyay Markandey Rushi describes Pradhanik Rahasya. Here devotees are asking Rushi; to tell them which avatar of Goddess Durga is greatest since Goddess has eight avatars. Further they also asked for the procedure to perform Pooja, Tapas, and Sadhana of Goddess Durga. All troubles and all difficulties of the devotees who recite or listen this adhyay are vanished.
श्रीदेवीमाहात्म्ये अध्याय चौदा (१४)
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीदेव्यै नमः ॥
जय अखिलार्थदायक भगवती । तव नामस्मरण आणितां चित्तीं । 
सकल विघ्नांची होऊनि शांती । पुरती इष्ट मनोरथ ॥ १ ॥
मग भक्तीचे ठायीं तत्पर । जे असती निरंतर ।
त्यांची थोरवी मी पामर । काय वर्णू शकेन ॥ २ ॥
ऐसा देवी तुझा महिमा । न कळे वेदादिकांसी सीमा ।
लीन होऊनि स्वयें ब्रह्मा । तव चरणीं स्थिरावला ॥ ३ ॥
तेथें माझी काय प्रोढी । जाया तव गुणनिधीचे पैलथडीं ।
तरी तूंचि दासमुखें आवडी । काय वदवीं दयाळें ॥ ४ ॥
असो पूर्वाध्यायाचे शेवटी जाण । सुरथ वैश्य लाधलें वरप्रदान ।
आतां प्राधानिकरहस्य पूर्ण । वर्णियेलें सुरस बहु ॥ ५ ॥
शौनक बोले सूतासी । शिष्य पुसे मार्कंडेयासी ।
संशय प्राप्त जाहला आम्हांसी । तो तुम्हांसी निरुपितों ॥ ६ ॥
मेधाऋषीसी पुसून । सुरथ वैश्य गेले तपालागुन ।
तीन वर्षें आराधन । केलें त्यांनीं देवीचें ॥ ७ ॥
देवी होऊनि प्रसन्न । राज्य दिधलें नृपालागुन ।
वैश्यासी देऊनि परम ज्ञान । धन्य केले दोघेही ॥ ८ ॥
ही कथा ऐकिली पूर्ण । परी संशय जाहला उत्पन्न ।
कैसे करावें आराधन । तयांसी कैसें निवेदिलें ॥ ९ ॥
स्वामींनी हें कृपा करुन । आम्हांसी करावें निवेदन ।
ऐकोनि शौनकाचा प्रश्र्न । सूत बोलता जाहला ॥ १० ॥
तुम्हांऐंसाचि सुरथें । प्रश्र्न केला मेधाऋषीतें ।
म्हणे ऋषिवोग्य र्या कृपामूर्ते । प्रश्र्न आमुचा सांगावा ॥ ११ ॥
चंडिकेचे अष्टावतार । आम्हांलागीं वर्णिले साचार । 
परी तयांत कोण थोर । स्वभाव कैसा कवणाचा ॥ १२ ॥
हें सांगावें आम्हांलागुन । महादेवीचें स्वरुप वर्ण ।
पूजावयासी योग्य कवण । तें अम्हां सांगावें ॥ १३ ॥
कोणत्या विधीनें कवण । आराधावें स्वरुप पूर्ण ।
सर्व सांगावें आम्हांलागुन । यासी तूं योग्य आहेसी ॥ १४ ॥
ऐकोनि ऋषि बोले वचन । राजा हें श्रेष्ठ रहस्य जाण ।
अन्यासी करुं नये कथन । ऐसें वर्णिलें पुराणीं ॥ १५ ॥
परंतु तूं आहेसी भक्त । म्हणोनि सांगतो निश्र्चित ।
नाहीचि अवाच्य किंचित । तुजलागीं नराधिपा ॥ १६ ॥
सकळांच्या आदींची जाण । महालक्ष्मी असे आपण । 
सर्व जगाची ईश्र्वरी पूर्ण । त्रिगुणस्वरुपा आहे ती ॥ १७ ॥ 
त्रिगुणस्वरुपें वर्णिली । परी मुख्य सात्त्विकी बोलिली ।
देवतास्वरुपें उत्पन्न जाहली । लक्ष्यालक्ष्यरुपा ती ॥ १८ ॥
भक्तासी स्वरुप आहे लक्ष्य । अभक्तासी असे अलक्ष्य ।
सर्व व्यापोनि सर्वसाक्ष्य । स्वरुप असे राहिलें तें ॥ १९ ॥
मातुलिंग गदा खेट । पानपात्रधारी स्पष्ट ।
नाग लिंग योनी वरिष्ठ । धरिती जाहली मस्तकीं ॥ २० ॥
तप्तसुवर्णासारिखा वर्ण । तप्पसुवर्णाचीं भूषणे जाण ।
सकळ लोक शून्य पाहून । आपुल्या तेजें पूर्ण केला ॥ २१ ॥
शून्य पाहूनि सकळ लोक । दुसरें स्वरुप धरिलें देख ।
केवळ तमोगुणा सकळिक । कृष्णवर्णा जाहली ती ॥ २२ ॥
ती तंव महाकाली जाण । भिन्नांजनासारिखा वर्ण ।
विक्राळ दाढायुक्त वदन । विशाल लोचन तियेचे ॥ २३ ॥ 
तनूचे ठायीं मध्यम आपण । नारी दिसे शोभायमान ।
कबंधहारांतें उरेंकरुन । धारण करिती जाहली ॥ २४ ॥
शिरांची माळा घातली जाण । एके हस्तीं खङ्ग घेऊन ।
दुजे हस्तीं पानपात्र धारण । करिती जाहली जगदंबा ॥ २५ ॥
तिसरे हस्तीं धरिलें शिर । चौथे हस्तीं खेटक सुंदर ।
अलंकृत चतुर्भुज समग्र । शोभतसे महाकाली ॥ २६ ॥
ती प्रमदोत्तमा काली तामसी । बोलती जाहली महालक्ष्मीसी । 
नामकर्म देई मजसी । माते तुजला नमो नमः ॥ २७ ॥
महाकालीचें ऐकोनि वचन । मग महालक्ष्मी बोले आपण ।
नामकर्मातें तुजलागुन । देतें आतां श्रवण करीं ॥ २८ ॥
महामाया महाकाली उत्तम । महामारी क्षुधा तृषा हें नाम ।
निद्रा तृष्णा एकवीरा परम । कालरात्री दुरत्यया ॥ २९ ॥
हीं दहा तुझीं नामें जाण । कर्मेंकरुनि प्रतिपाद्य पूर्ण ।
या तुझ्या नाम-कर्मातें जाणून । पठण करी तो सुख पावे ॥ ३० ॥
यापरी बोलूनि कालीप्रत । महालक्ष्मी काय करीत ।
महासरस्वतीचें रुप त्वरित । घेऊनि तिसरी जाहली ॥ ३१ ॥
अतिशुद्ध सत्त्वगुणें करुन । महासरस्वती जाहली जाण ।
चंद्रासारिखी प्रभा पूर्ण । धारण करिती जाहली ॥ ३२ ॥
अक्षमाला अंकुशधारी । वीणा पुस्तक घेऊनि करीं ।
होती जाहली ती श्रेष्ठ नारी । नामें ऐका तियेचीं ॥ ३३ ॥
महाविद्या कामधेनु भारती । आर्या ब्राह्मी वाक् सरस्वती ।
महावाणी वेदगर्भा निश्र्चितीं । धीश्र्वरी हें दहावें ॥ ३४ ॥
यानंतर महालक्ष्मी आपण । बोलती जाहली दोघींलागुन 

तुम्ही उभयतांहीं जाण । कन्यापुत्र निर्मावे ॥ ३५ ॥  
त्या दोघींतें ऐसें बोलून । स्वयें महालक्ष्मी आपण ।
कन्यापुत्रांतें आपणापासून । निर्मिती जाहली तत्काळ ॥ ३६ ॥
पुत्र तो ब्रह्मदेव जाण । कन्या ती लक्ष्मी सगुण ।
त्या दोघांतें नामाभिधान । ठेविती जाहली जगदंबा ॥ ३७ ॥
विधि हिरण्यगर्भ विरिंचि धाता । ऐसीं पुत्राचीं नांवें ठेवी माता ।
श्री पद्मा कमला लक्ष्मी तत्त्वतां । कन्येचीं नांवे ठेविलीं ॥ ३८ ॥
त्यानंतर महाकाली आपण । कन्यापुत्रांतें आपणापासुन ।
उत्पन्न करिती जाहली जाण । मनेंकरुन क्षणमात्रें ॥ ३९ ॥
पुत्र तो महादेव देख । कन्या ती सरस्वती सम्यक ।
त्या दोघांते नामें अनेक । ठेविती जाहली महामाया ॥ ४० ॥
नीलकंठ रक्तबाहु शंकर । श्र्वेतांग कपदीं चंद्रशेखर । 
त्रिलोचन रुद्र स्थाणु ईश्र्वर । नामें ठेविलीं पुत्राची ॥ ४१ ॥
सरस्वती त्रयीविद्या स्वरा । कामधेनु आणि भाषाक्षरा ।
नामें ठेवी ती सुंदरा । कन्येलागीं तें काळीं ॥ ४२ ॥ 
त्यानंतर महासरस्वती । कन्यापुत्रातें जाहली निर्मिती ।
पुत्र तो महाविष्णु निश्र्चितीं । कन्या गौरी परियेसा ॥ ४३ ॥
नंतर त्या उभयतांसी । नामें ठेविती जाहली कैसीं ।
तीचि ऐकावीं वेगेंसीं । स्वस्थचित्तेंकरुनियां ॥ ४४ ॥
विष्णु कृष्ण हृषीकेश । वासुदेव जगन्निवास ।
जनार्दन हीं नामें विशेष । पुत्रालागीं ठेविलीं ॥ ४५ ॥
उमा सती चंडी गौरी । सुभगा शिवा आणि सुंदरी ।
हीं कन्येचीं नामें सत्वरी । ठेविती जाहली तेधवां ॥ ४६ ॥
या प्रकारें युवती जाण । पुरुषत्व पावल्या आपण ।
ज्ञाते पाहती तयांचे ज्ञान । ज्ञाननयन जयांसी ॥ ४७ ॥
महामायेच्या स्वरुपातें । ज्ञानें जाणती जे जाणते । 
इतर ज्ञानी नेणते । न जाणती तें कदापि ॥ ४८ ॥
नंतर महालक्ष्मी जी तिणें । सरस्वती दिधली ब्रह्म्याकारणें ।
विष्णूही तिचेचि आज्ञेने । लक्ष्मीतें वरिता जाहला ॥ ४९ ॥
भ्रतार गौरीचा आपण । महादेव जाहला जाण । 
ऐसे महालक्ष्मीच्या आज्ञेकरुन । तिचेही जाहले कुटुंबी ॥ ५० ॥
उत्पत्ति-स्थिति-प्रलयास । सामर्थ्य दिधलें तिघांस ।
ब्रह्मा घेऊनि सरस्वतीस । यथासुखें राहिला ॥ ५१ ॥
सरस्वतीसहवर्तमान । एकत्र होऊनि चतुरानन । ब्रह्मांडातें करुनि उत्पन्न । चराचरातें निर्मिले ॥ ५२ ॥
ब्रह्मांडासहित जें जें सर्व । त्या त्या संहारी महादेव ।
गौरीसहित होऊनि अपूर्व । प्रलय करिता जाहला ॥ ५३ ॥
ब्रह्मांडामध्यें जें जें निर्माण । स्थावरजंगमादि असे जाण ।
त्यातें त्यातें नारायण । पालन करी लक्ष्मीसह ॥ ५४ ॥
सर्व सत्त्वमयी आपण । महालक्ष्मी असे जाण ।
सकळांची ईश्र्वरी पूर्ण । महामाया जगदंबा ॥ ५५ ॥
तीच मूळप्रकृति साचार । असती जाहली निराकार ।
पुढें होती जाहली साकार । तीच गुणमयी प्रकृति ॥ ५६ ॥
जें जें दृश्यमान पाहावें । आणि श्रोत्रें श्रवण करावें ।
जें जें मानसीं कल्पावें । मायास्वरुप तितुकेंही ॥ ५७ ॥
जें जें नामरुपात्मक सकळ । तें तें मायेचें स्वरुप केवळ ।
ब्रह्मा विष्णु महेश्र्वर सुढाळ । मायापुत्र हेही पैं ॥ ५८ ॥
असो या प्रकारेंकरुन । महालक्ष्मी श्रेष्ठ जाण ।
सर्वदा तियेचें आराधन । प्रेमभावें करावें ॥ ५९ ॥
या अध्यायीं निरुपिलें । प्राधानिकरहस्य वहिलें ।
पुढील अध्यायीं गायिलें । वैकृतिरहस्य अपूर्व जें ॥ ६० ॥
याचें करितां श्रवण पठन । सर्व बाधा होती शमन ।
आणि सर्व संकटांपासून । मुक्त होय क्षणमात्रें ॥ ६१ ॥
त्या महालक्ष्मीसी नमस्कृती । सर्वदा माझी असो निश्र्चितीं ।
राममुखें ग्रंथ पुढती । चालवीं माते आवडीनें ॥ ६२ ॥
॥ इति श्रीमार्कंडेयपुराणे सावर्णिके मन्वंतरें देवीभगवतीमाहात्म्ये प्राधानिकरहस्यवर्णनं नाम चतुर्दशोऽध्यायः ॥

॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥

DeviMahatmya Adhyay 14 
श्रीदेवीमाहात्म्ये अध्याय चौदा (१४)


Custom Search

No comments:

Post a Comment