Tuesday, September 8, 2015

Shri NavnathBhaktiSar Adhyay 1 part 1/2 श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय पहिला (१) भाग १/२

Shri NavnathBhaktiSar Adhyay 1 
Shri NavnathBhaktiSar Adhyay 1 is in Marathi. Malu Narahari is the writer of this Navanath Bhaktisar. Son of Dhundi Shri Malu from Narahari family is starting Shri Navanath Bhaktisar. He starts with bowing to God Ganesh who is destroyer of all difficulties. Then he bows to Goddess Saraswati who gives art of writing and proper words to describe Navanath Bhaktisar. He requests both of them to bless him. God Vishnu called NavNarayan (nine Narayan) and asked them to take a birth on the earth in the current Kali Yuga to establish NathPanth and increase the devotional power on the earth. He also told them their names in that birth.
श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय पहिला (१)
भाग १/२
श्रीगणेशाय नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीपांडुरंगाय नमः ।
श्रीकुलदेवतायै नमः । श्रीमातापितृभ्यां नमः ।
ॐ नमो जी हेरंबमूर्ती । वक्रतुंडा गणाधिपती ।
विद्यार्णवा कळासंपत्ती । भक्तसंकट वारीं गजानन ॥ १ ॥
सदैव धवला श्र्वेतपद्मा । विद्याभूषित कलासंपन्नधामा ।
तुझ्या वंदितों पादपद्मा । ग्रंथाक्षरां बोलवीं ॥ २ ॥
तूं निव्वळ निरंजन निर्विकार । परी भक्ततरज्जुबंधनाधार ।
प्रेमें संभवोनि मूर्ति साकार । आम्हां दासां मिरविसी ॥ ३ ॥
तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा । किंकिणीमंडिता ग्रंथादरा ।
येऊनि स्वामी वदनसुंदरा । मम रसनारस सेवीं कां ॥ ४ ॥
अगा अर्थ-लिंग-प्रकरण-र्‍हस्व- । दीर्घ शृंगार धारणा सुरस ।
छंद ताल नवरस । ग्रंथामाजी आदरीं कां ॥ ५ ॥
हे गणाधिपते गणराज । मी अबुध वर्णना आहे सहज ।
परी कृपा करोनि सकळां भोज । विकळ आपदा हरी आतां ॥ ६ ॥
हे मोरेश्र्वरा गणाधिपति । सर्वविषयाधीशमूर्ती । 
मंगळारंभी मंगळाकृती । आरंभी स्तुती प्रार्थितों ॥ ७ ॥
तरी सरस्वती कळामांदुस । सवे घेऊनि वाहनहंस । 
या संतांगणीं येऊनि सभेस । विराजावें महाराजा ॥ ८ ॥
जी मंगलदायक वाग्भवानी । चातुर्यसरिता ब्रह्मनंदिनी ।
ती महाशक्ती हंसवाहिनी । घेऊनि घेई महाराजा ॥ ९ ॥
जीचेनि कृपें वांकुडें दृष्टी । वाचस्पतीच्या मिरवती कोटी ।
ती माय तूं सवें गोरटी । घेऊनि येई महाराजा ॥ १० ॥ 
असो ऐसें पाचारणवचन । ग्लानित भावना सम्यक् पाहून ।
ग्रंथासनीं मूर्तिमंत येऊन । वरालागीं ओपिजे ॥ ११ ॥
सकळसिद्धि पूर्णपणा । पावोत ऐशा विनीतवचना । 
वरद मौळी हस्तकंजना । स्पर्शोंनि ज्ञान मिरविलें ॥ १२ ॥
म्हणे महाराजा कलोत्तमा । सिद्धी पावेल काव्यमहिमा ।
ऐसें बोलोनि सुशीलधामा । रसने स्थापिली सरस्वती ॥ १३ ॥
यापरी नमितों श्रीगुरुराज । जो अज्ञानतमीं सविता विराजे ।
जो मोक्षपदातें वरवूनि काज । साधकातें विराजवी ॥ १४ ॥
तो ज्ञानेश गुरु ज्ञानदिवटी । संजोगोनि बैसला मम पृष्ठीं ।
लेखणी कवळोनि करसंपुटीं । ग्रंथालागीं आदरीतसे ॥ १५ ॥
वरदहस्तें स्पर्शोनि मौळी । फेडिली सकळ अज्ञानकाजळी ।
यापरी तया बद्धांजुळीं । अनन्यभावें नमितों मी ॥ १६ ॥
जो नरहरिवंशीं विजयध्वज । धुंडिराज नाम तयाचें साजे ।
तोही पृष्ठीं बैसोनि सहज । ग्रंथालागीं आदरीतसे ॥ १७ ॥
आतां नमूं ज्ञानशक्ती । जी सत्तामयी चिद्भगवती । 
अनन्यभावें चरणांवरती । भाळ तिचिये अर्पोनियां ॥ १८ ॥
यापरी नमिती श्रोते संत । कीं तुमच्या गृहींचा मी अतीत ।
तरी ग्रंथांतरीं सुरस नितांत । प्रेमभरित दाटवा ॥ १९ ॥
अहो प्राज्ञिक संत श्रोतीं । प्रत्यक्ष तुम्ही महेशमूर्ती ।
तुम्हां वर्णावया अबुध शक्ती । मजमाजी केवीं मिरवेल ॥ २० ॥
परी धन्य तुम्ही भक्तिवाडें । स्वीकारितां बोल बोबडे ।
जड बाळा उभवोनि कोडें । जगामाजी मिरवितां ॥ २१ ॥
कीं पहा जैसें कांचमण्यास । सोमकांत नांव ठेविलें त्यास ।
तेणेंचि शब्दें लाज सोमास । वरवूनि बुंदां ढाळीतसे ॥ २२ ॥
तेवीं तुमचा शरणागत । नरहरि मालू धुंडीसुत ।
तस्मात् महंत श्रोते संत । करा सरतें आपणांतरी  ॥ २३ ॥
यापरी पूर्वी कथासारामृत ग्रंथ । वदविला तुम्हीं श्रद्धायुक्त ।
आतांही ओपूनि वरद हस्त । भक्तिसार वदवा हा ॥ २४ ॥
जे संत झाले जगद्विख्यात । तयांचें माहात्म्य वदविलें समस्त ।
परी सारासार कथा त्यांत । उरल्या असती महाराज ॥ २५ ॥
जया संतांच्यापायीं रत । गुरुमूर्ती प्रतापवंत ।
की ज्यांनी सांप्रदाय जगद्विख्यात । जगामाजी स्थापिले ॥ २६ ॥
तरी त्यांची सर्व कथा ग्रंथी । स्वीकारावया अवधान द्यावें श्रोतीं ।
असो कलिप्रारंभीं रमापती । नवनारायणा पाचारी ॥ २७ ॥
उद्धवासी बैसवोनि सन्निध । कनकासनीं यादववृंद ।
तव ते नवनारायण प्रसिद्ध । प्रविष्ट झाले द्वारके ॥ २८ ॥
कवि प्रथम हरि दुसरा । अंतरिक्ष तृतीय होय चतुर ।
महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर । नारायण चतुर्थ तो ॥ २९ ॥
पंचम महाराज पिप्पलायन । सहावा आविर्होत्र नारायण ।
सातवा द्रुमिल आठवा चमस जाण । करभाजन नववा तो ॥ ३० ॥
ऐसे नवनारायण महाराज । द्वारकेंत पातले सहजासहज ।
रमापतीचें पाचारणचोज । दृश्य झाले धवळारी ॥ ३१ ॥
हरीनें पाहतांचि नारायण । सोडिता जाहला सिंहासन । 
परम गौरविले आलिंगून । कनकासनीं बैसविले ॥ ३२ ॥
सकलवैभवभूषणाकार । मेळवोनि सकळ अर्चासंभार । 
सारिता झाला सपरिकर । षोडशोपचारें पूजेसी ॥ ३३ ॥
हरिचा गौरव पाहोन । बोलते झाले नारायण । 
कवण अर्थी पाचारण । आम्हांसी केलें श्रीरंगा ॥ ३४ ॥
हरि म्हणे जो महाराजा । कीं मनीं काम वेधला माझ्या ।
कलींत अवतार घेणें ओजा । तुम्हीं आम्हीं चलावें ॥ ३५ ॥
जैसे समुच्चये एकमेळीं । राजहंस जाती उदधिजळीं ।
तेवीं तुम्हीं कृपाकल्लोळीं । अवतारदीक्षा मिरवावी ॥ ३६ ॥
येरु म्हणती जनार्दना । अवतार घ्यावा कवणे स्थाना ।
कवण नामीं कवण लक्षणां । जगामाजी मिरवावें ॥ ३७ ॥
यावरी बोले द्वारकाधीश । कवि नारायण जो कां प्रत्यक्ष ।
तेणें मच्छिंद्र होऊनि दक्ष । जगामाजी मिरवावें ॥ ३८ ॥
यावरी हरी जो महादक्ष । तो तंव शिष्य होऊनी प्रत्यक्ष ।
महाराज नामें तो गोरक्ष । जगामाजी मिरविजे ॥ ३९ ॥
यापरी अंतरिक्ष नारायण नाम । तो जालिंदर मिरविजे प्रकाम ।
तयाचा शिष्य भक्तिद्रुम । प्रबुद्ध नामे कानिफा ॥ ४० ॥
यापरी पंचम पिप्पलायन प्रकाम । मिरविजे जगीं चरपट नाम । 
आविर्होत्र जो योगद्रुम । मिरविजे जगीं नामें नागेश ॥ ४१ ॥
यापरी द्रुमिल अतिसमर्थ । जगीं मिरविजे भरतनाथ । 
आणि चमस नारायण जगीं विख्यात । रेवणनामें मिरविजे ॥ ४२ ॥
नववा तो करभाजन । तो गहिनी ऐसें मिरविजे नाम ।
ऐसे अवतार महीकारण । दीक्षेप्रति मिरवावे ॥ ४३ ॥
म्हणाल एकटपणीं वास । करणें सांगतां आम्हीं कलीस ।
तरी तुम्हांसवें अवतारास । बहुत येतील महाराजा ॥ ४४ ॥
प्रत्यक्ष कवि वाल्मीक सुरस । तो पुढे होईल तुलसीदास ।
आणि शुक्र महाराज जो ब्रह्मभास । कबीर भक्त होईल तो ॥ ४५ ॥
यापरी जो व्यास मुनी । तो जयदेव होईल महाप्राज्ञी ।
आणि उद्धव माझा प्राणाहुनी । आवडता होईल नामा तो ॥ ४६ ॥
आणि भक्तिप्रौढी जांबुवंत । तो नरहरि होईल नितांत ।
प्रत्यक्ष जो बलराम भ्रात । पुंडलीक होईल तो ॥ ४७ ॥
मीही प्रत्यक्ष जन्मोन । ज्ञानदेव नामें मिरवीन ।
आणि धवलारी जो पंचानन । निवृत्तिनाथ होईल कीं ॥ ४८ ॥
आणि सत्यनाथ चतुरानन । तो स्वनामीं मिरवील सोपान ।
जी योगमाया मानसमोहन । मुक्ताबाई विराजेल ॥ ४९ ॥
यापरी प्राज्ञिक हनुमंत । तो रामदास होईल महाभक्त ।
आणि कुब्जा दासी मातें रमत । जनी जनांत होईल कीं ॥ ५० ॥
असो ऐसें समुच्चयेंकरोन । कलींत वाढवावें भक्तिमाहात्म्य जाण ।
मग अवश्य म्हणोनि नारायण । पुढें बोलत प्रश्र्नातें ॥ ५१ ॥
म्हणती महाराजा सर्वज्ञमूर्ती । आम्हां सांगतां जन्मस्थिती ।
परी कवण स्थानीं केउते युक्तीं । व्यक्त होणें तें सांगा  ॥ ५२ ॥
यावरी बोले प्रत्यक्ष नारायण । कीं दीक्षेचें भविष्यपुराण ।
पूर्वीच कथिलें पराशरनंदने । महामुनि व्यास तो ॥ ५३ ॥
अगा पूर्वी अठ्ठ्यांयशीं सहस्त्र ऋषी । निर्माण झाले विधिवीर्यासी । 
तें वीर्य चुकोनि ठायाठायासी । आपाप कांहीं उरलें असे ॥ ५४ ॥
तें जीवदशे वांचोनि सत्य । महाराजा न पावे उदय ।
तरी ते ठायीं ठायीं केउतें वीर्य । त्याचे ठाय ऐकावें ॥ ५५ ॥
उपरिचर वसु यानीं असतां । वीर्य गळलें उर्वशी पाहतां ।
ते शरस्तंबी दुरोनि द्रवतां । आदळतां झालें त्रिभाग ॥ ५६ ॥
यमुनेंत वीर्यबिंदु द्रोणाकांठीं । पडतांचि झाले विभाग शेवटीं ।
दोन भाग द्रोणापोटीं । एकजळी पडियेला ॥ ५७ ॥
असो पर्णद्रोणांत जो भाग पडिला । तो तत्काळ द्रोणकूपीं जन्मला ।
परी जळांत जो भाग पडिला । तो ग्रासिलामत्स्यानें ॥ ५८ ॥
तरी तें मत्स्युदरीं वीर्य । नारायण प्रत्यक्ष आहे ।
परी जीवदशेविण गर्भवंशोदय । होत नाहीं महाराजा ॥ ५९ ॥
तरी प्राज्ञिक कवि नारायण । तेणें मत्स्युदरीं जन्म घेणें ।
मच्छिंद्र ऐसें जगांत नामानें । मिरवावें महाराजा ॥ ६० ॥
यापरी शिव कामावरी कोपोन । तृतीयनेत्रींचा काढोनि अश्र । 
महास्मर केला भस्म तेणें । ऐसें ग्रंथ बोलती ॥ ६१ ॥
परी तो काम द्विमूर्धनी । बैसला आहे वीर्य प्राशन करोनी ।
तरी तयाचे जठरीं अंतरिक्ष जाऊनी । जालिंदर नामें मिरवेल ॥ ६२ ॥
यापरी कुरुवंशीं जनमेजयें । नागसत्री आवाहन केलें आहे ।
तया वंशी महान पाहें । बृहद्रथ राणा मिरवेल ॥ ६३ ॥
तो महीलागीं करील हवन । तेव्हां गर्भ सांडील द्विमूर्धन ।
यज्ञकुंडीं देदिप्यमान । जालिंदरें जन्मावें ॥ ६४ ॥
यापरी ब्रह्मवीर्य सहस्त्रेंशीं । ऋषि निर्मिले सहस्त्र अठ्यायशीं ।
तेव्हां वीर्य रेवातीरासी । रेवेमाजी पडियेलें ॥ ६५ ॥
तें महीचे परम कुशीं । वीर्य आहे रेवातीरासी ।
तेथें व्यापोनि जीवदशेसी । देहालागीं मिरवावें ॥ ६६ ॥
तो महाराजा चमस नारायण । रेवणसिद्ध मिरविजे नामानें ।
रेवारेवेंत झाला जन्म । म्हणोनि नाम हे त्याचें ॥ ६७ ॥  
तेचि वेळीं आणिक रेत । सर्पिणीमौळी अकस्मात ।
पडतां प्राशिले तिनें नेमस्त । भक्ष्य म्हणोनि जाण पां ॥ ६८ ॥
ते जनमेजयाचे नागसत्रांत । नाग आहुति विप्र देत ।
तये वेळीं आस्तिकें निश्र्चित । सर्पिणीतें लपविलें ॥ ६९ ॥
ब्रह्मवीर्य उदरांत । अंडजाशुक्तिरत्नयुक्त ।
पुढें होईल महानाथ भविष्य जाणोनि आच्छादी ॥ ७० ॥
महातरुच्या पोखरी । तक्षकात्मजा पद्मिनी नारी ।
ठेवितां प्राज्ञिक ऋषीश्र्वरी । नवमास लोटले ॥ ७१ ॥
असो त्या अंडजाशुक्तिकायुक्त । जीवदशा सकळ होऊनि मुक्त ।
तरी आविर्होत्र नारायण तेथ । संचरिजे महाराजा ॥ ७२ ॥
वीर्य अंडजपात्र सांडोनी । गेली आहे तक्षकनंदिनी ।
तो वडाच्या पोखरस्थानीं । अद्यापि आहे महाराजा ॥ ७३ ॥
तरी तेथें आविर्होत्र । प्रवेश करितां सत्पात्र । 
वटसिद्धनाथ स्वतंत्र । तया देहीं मिरवावें ॥ ७४ ॥
यापरी मित्ररेत मंत्रसंपत्तीं । कृपें कुरवाळील मच्छिंद्रजती ।
ती वरदहस्ताची उकरडा विभुती । साचोकार मिरवेल ॥ ७५ ॥
तें मंत्रप्रतापें सूर्यवीर्य । सविताराज सांडिता होय ।
परी तें भविष्यकारणीं उकरडामय । वरदभस्म मिरवेल ॥ ७६ ॥
तेथें हरी जो नारायण । शीघ्र संचरोनि दीक्षाकारण ।
गोरक्ष ऐसें प्रतिष्ठानामानें । जगामाजी मिरवावें ॥ ७७ ॥
यापरी मृडानीकारणी । सुरवर आलिया दक्षसदनीं ।
ते कमलोद्भव पाकशासनी । समारंभें पातले ॥ ७८ ॥
परी दक्षात्मजेची रुपरहाटी । नेत्रकटाक्ष पाहतां परमेष्ठी ।
तेणें धडाडोनि कामपाठीं । इंद्रियद्वारा द्रवला तो ॥ ७९ ॥
परी तो चतुराननी । बैसला होता सभास्थानीं ।
काम द्रवतां इंद्रियवदनीं । परम चित्तीं लाजला तो ॥ ८० ॥
मग रगडोनि चरणटांचे । छिन्नत्व केलें रेताचें ।
तें एक आगळें साठ सहस्त्रांचें । रेतभाग वहियेलें ॥ ८१ ॥
तें साठ सहस्त्र रेतप्रमाणासी । जीवदशा अपत्य वालखिल्यऋषींसी । 
झाले परी एक भागासी । वीर्य आहे तैसेच ॥ ८२ ॥
तें लज्जायुक्त होऊनी । केरासह सांडिले भागीरथीजीवनीं ।
तयांतूनि एक भाग जाऊनी । कुशवेटी स्थिरावला ॥ ८३ ॥
तरी ते कुदरीचे निखळीं । रेतभागाची आहे वेली ।
ती पिप्पलायन माउली । संचारावें तेणें तेथें ॥ ८४ ॥
टांचे चरपटलें आहे रेत । म्हणोनि नाम चरपटनाथ । 
जगांत मिरवोनि जगविख्यात । दीक्षेलागीं विराजावा ॥ ८५ ॥
यापरी कुंभोद्भवाचा उदय झाला । तो मित्रकामशराचा लोट लोटला ।
तो गगनपंथे विमुक्त झाला । अतिबळें करोनियां ॥ ८६ ॥
एक भाग घटीं पडतां । अगस्तिउदय झाला तत्त्वतां ।
एक भाग महीवरता । कैलिकसदनीं पातला ॥ ८७ ॥
तो महाराज कैलिकऋषी । भिक्षाभरतरी ऊर्वशी ।
भरतरी म्हणती भिक्षापात्रासी । आंगणीं तें ठेविलें ॥ ८८ ॥
तो मित्ररेत अकस्मात । येऊनि पडिलें भरतरीआंत ।
तें कैलिकें पाहोनि भविष्यांतें । भरतरी तैसें रक्षितसे ॥ ८९ ॥
तरी ते भरतरीरेतसंगीं । द्रुमिल नारायण प्रसंगीं ।
संचारोनि रेत अंगीं । भरतरी नामें मिरविजे ॥ ९० ॥
यापरी हिमाद्रीच्या विपिनस्थानीं । दिग्गज ठेला महीते शयनीं ।
तैं सरस्वतीचे उद्देशेंकरोनी । विधि वीर्यासी ढांसळला ॥ ९१ ॥
तें वीर्य गजकर्णांत । पडतांचि झाले बिंदयुक्त । 
तरी कांहींसें वीर्य होऊनि विभक्त । महीवरती पडियेले ॥ ९२ ॥
तयावरोनि व्याघ्र चाली । चालता भेदलें पाउलीं ।
तया पादसंधींत तनु ओतिली । जीवदशा अत्रीची ॥ ९३ ॥
तैसा गजकर्णसूतिकारण । प्रबुद्ध मिरविजे रेतरत्न ।
तया नामाभिधानी प्रयत्न । कर्णकानिफा मिरविजे ॥ ९४ ॥
यापरी गोरक्षाची हतवटी । पडतां वाळवंटाचे पोटी ।
कर्दमपुतळा करितां जेठी । अभिमंत्रोनि भविष्यांतर ॥ ९५ ॥
मंत्रशक्तीं विष्णुवीर्य । आव्हानिलिया पुतळामय ।
तैं करभाजनें संचराया । जीवदशा मिरवावी ॥ ९६ ॥
ऐसें सांगोनि रमारमणे । संतुष्ट केले नवनारायण ।
मग परस्परें नमनानमन । करोनियां उठले ते ॥ ९७ ॥
असो भगवंतेशीं नवनारायण । पाहती मंदराचळमौळीस्थान ।
श्रीशुकाचार्य समाधीपासीं जाऊन । समाधीतें वरियेलें ॥ ९८ ॥
नव समाधी मेरुपाठारी । दहावी समाधी शुकऋषीश्र्वरीं ।
असो ते दाही स्थूळशरीरीं । पुढे तेथोनियां निघाले ॥ ९९ ॥
यापरी शुकवीर्याचें कथन । बद्रिकाश्रमीं सोमब्राह्मण ।

रंभाउद्देशें झालें पतन । कबीर तेथे जन्मला ॥ १०० ॥
Shri NavnathBhaktiSar Adhyay 1 
श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय पहिला (१)


Custom Search

No comments:

Post a Comment