Sunday, October 11, 2015

Shri Navanath Bhaktisar Adhyay 5 Part 1\2 श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय ५ भाग १/२


Shree Navanath Bhaktisar Adyay 5 
I am trying to describe this adhyay 5 shortly. Machchhindra was on his way to visit Baramalhar temple. In a village in the forest he was resting in a temple at night. Where he came to know that some ghosts were moving around here and there. He thought that he should make use of these ghosts and their power in his endeavor to benefit the people. Hence he used the Sparshastra uttered mantra and thrown vibhuti on the ghosts. Because of the Sparshastra ghosts were fixed to the ground and could not move. The king of ghosts, Vetala came to know about this and came to fight with Machchhindra. Vetala and his captions were very powerful. However they were defeated by Machchhindra . He they asked Vetala and ghosts to be helpful to the people who will chant a mantra in their name or read this adhyay or have this book in their house. In the next adhyay Mchchhindra will meet Kalika Bhavani and there will also be a war which is described in there as written by Dhundi sut Maluji from Narahari family.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय पांचवा ( ५ ) भाग १/२
श्रीगणेशायनमः ॥
जयजयाजी यदुकुळतिळका । भक्तिपंकजाच्या सदैव अर्का ।
मुनिमानसचकोरपाळका । कृपापीयुषा चंडा तूं ॥ १ ॥
भाविक प्रेमळ भक्त परी । तयांचा अससी पूर्ण कैवारी ।
बाळप्रल्हाद संकटवरी । कोरडे काष्ठीं प्रगटलासी ॥ २ ॥
करविंशतिप्रताप सघन । संकटीं घातले देव तेणें ।
तदर्थ सकळ रविकुळपाळण । अवतारदीक्षा मिरविसी ॥ ३ ॥
देवविप्रांचें संकट पाहून । मत्स्यकुळातें करी धारण ।
मग उदधीतें गगन दावून । शंखासुर धरियेला ॥ ४ ॥
तेवींच दैत्य दुमदुमा करीत । अवतार कच्छ झाला मिरवीत ।
उदधी मंथूनि शंखा तोषवीत । महाराज कृपार्णव ॥ ५ ॥
राया बळीची उद्दाम करणी । स्वरुप मिरवी खुजटपणी ।
संकट पडतां सुरगणी । फरशधर झालासे ॥ ६ ॥
अपार भक्तप्रेमा सघन । त्यांत स्थिरावले पंडुनंदन ।
शिशुपाळ-वक्रदंतकंदन । वसुदेवकुशीं मितवला ॥ ७ ॥
असो ऐसा भक्तिप्रेमा । तूंतें आवडे मेघश्यामा । 
तरी भावभक्तिच्या उगमा । पुढें ग्रंथ बोलवीं ॥ ८ ॥
मागिले अध्यायीं केले कथन । हिंगळाज क्षेत्रीं मच्छिंद्रनंदन ।
अष्टभैरव चामुंडा जिंकून । दर्शन केलें अंबेचें ॥ ९ ॥
तरी श्रोते सिंहावलोकनीं । कथा पहा आपुले मनीं ।
बारामल्हारमार्ग धरुनी । जाता झाला मच्छिंद्र ॥ १० ॥
तो बारामल्हारकाननांत । मुक्कामा उतरला एका गावांत ।
देवालयीं मच्छिंद्रनाथ । सुखशयनीं पहुडला ॥ ११ ॥
तों रात्र झाली दोन प्रहर । जागृत आहे नाथ मच्छिंद्र ।
तंव काननीं दिवट्या अपार । मच्छिंद्रनाथें देखिल्या ॥ १२ ॥
इकडूनि जाती तिकडूनि येती । ऐशा येरझारा करिती ।
तें पाहुनि नाथ जती । म्हणे भुतावळें उदेले ॥ १३ ॥
तरी यातें करावें प्रसन्न । समय येत हाचि दिसून । 
कोण्या तरी कार्यालागून । उपयोगीं श्रम पडतील ॥ १४ ॥
तरी त्यातें आतां शरणागत । प्रसन्न करुनि घ्यावें भूत ।
श्रोते म्हणती कार्य कोणतें । भूतास्वाधीन असेल कीं ॥ १५ ॥
तरी ऐसें न बोलावें या वेळे । भूत श्रीराम उपयोगी आलें । 
राक्षसाचें प्रेत नेलें । समरंगणीं सुवेळे ॥ १६ ॥
तेव्हां अमृतदृष्टीकरुन । उठवी श्येन कपिरत्न ।
तेवीं तुळसीसी प्रसन्न । भूत झालें कलींत ॥ १७ ॥
तरी लहानापासूनि थोरापर्यंत । समयीं कार्य घडूनि येत ।
पहा अर्णवा झुरळें निश्र्चित । वांचविलें म्हणताती ॥ १८ ॥
तन्न्यायें कल्पूनि चित्तीं । नाथ भूतांच्या बैसल्या अर्थी ।
मग अंबिकाअस्त्र स्पर्शशक्ती । प्रेरिता झाला तेचि क्षणी ॥ १९ ॥
तें अस्त्र प्रेरितां भूतगणीं । होतां स्पर्श कुरुमेदिनीं । 
मग पद धरी आंवळूनि । सुटका नाहीं पदातें ॥ २० ॥
जेवी युद्ध कुरुक्षेत्रांत । मही धरीतसे कर्णरथ । 
चक्रें गिळुनि करी कुंठित । ग३मनसंधान करुं नेदी ॥ २१ ॥
तन्न्यायें स्पर्शशक्ती । करी भूतपदा धरा व्यक्ती । 
चलनवलन मग त्या क्षितीं । कांहीएक चालेना ॥ २२ ॥
जैसे तरु एकाचि ठायीं । वसती अचळप्रवाहीं ।  
तन्न्यायें भूतें सर्वही । खुंटोनियां टाकिलीं ॥ २३ ॥
तयां भूतांचे वियोगनिमित्ते । कीं वेताळा भेटी जाणें होतें ।
सर्व मिळोनि येतां क्षितींत । जमोनियां येताती ॥ २४ ॥
तंव ते दिवशीं झाले कुंठित । वेताळभेटीच राहिली अप्राप्त ।
येरीकडे वेताळ क्षितींत । अनंत भूतें पातलीं ॥ २५ ॥
तो दक्षभूतांचा बळी वेताळ । पाहे अष्टकोटी भूतावळ ।
तों न्यूनपणीं सर्व मंडळ । दिसून आलें तयातें ॥ २६ ॥
मग अन्य भूतांतें विचारीत । शरभतीरींची भूतजमात ।
आली नाहीं किमर्थ । शोध त्यांचा करावा ॥ २७ ॥
अवश्य म्हणोनि पांच सात । गमन करिते झाले भूत ।
शरभतीरीं येऊनि त्वरित । निजदृष्टीं पहाती ॥ २८ ॥
तंव ते मंडळी महीं व्यक्त । उभी असे बळरहित ।
जैसा एका ठायींचा पर्वत । दुसर्‍या ठायीं आतळेना  ॥ २९ ॥
मग त्या मंडळानिकट येऊन । पुसते झाले वर्तमान ।
तुम्ही व्यक्त महीलागून । काय म्हणोनि तिष्ठलां ॥ ३० ॥
येरी म्हणती अनेक जे भेद । महीं उचलोनि देतां पद । 
कोण आला आहे सिद्ध । तेणें कळा रचियेली ॥ ३१ ॥
मग ते पाहे कळा ऐकून । पर्वता चालिले शोधालागून ।
गुप्तरुपें वस्तींत येऊन । मच्छिंद्रनाथ पाहिला ॥ ३२ ॥
बालार्क किरणीं तेजागळा । शेंदूर चर्चिलासे भाळा ।
तयामाजी विभुती सकळा । मुखचंद्रें चर्चिली ॥ ३३ ॥
कर्णी मुद्रिका रत्नपाती । कीं वस्तीस पातल्या रत्नज्योती ।
हेमगुणी गुंफोनि निगुती । कबरींभारीं वेष्टिला ॥ ३४ ॥
ललाट अफाट मिशा पिंगटा । वटदुग्धानें भरल्या जटा ।
सरळ नासिका नेत्रवाटा । अग्रीं समदृष्टीं पहातसे ॥ ३५ ॥
अर्कनयनीं विशाळ बहुत । उग्रपणीं उदय दावीत ।
पाहतां वाटे कृतांत । नेत्रतेजें विराजला ॥ ३६ ॥
स्थूळवट बाहुदंड सरळ । आजानुबाहु तेजाळ । 
कीं मलविमल करुनि स्थळ । बहुवटीं विराजले ॥ ३७ ॥
मस्तकीं शोभला दिव्य वीरगुंठी । कंथा विराजे पाठपोटीं ।
त्यावरी ग्रीवेसी नेसल्या दाटी । ज्ञानशिंगी मिरवीतसे ॥ ३८ ॥
बाहुवटें हनुमंत । वीरकंकण करी शोभत ।
कुबडी फावडी घेऊनि हातांत । बोधशैलिका विराजे ॥ ३९ ॥
जैसा तीव्र बारावा रुद्र । कीं सकळ योगियांचा भद्र ।
जैसा नक्षत्रगणीं चंद्र । तेजामाजी डवरतसे ॥ ४० ॥
ऐसें पाहून एक भूतीं । मनामाजीं करितां ख्याती ।
येणेंचि व्यक्त केलें क्षितीं । भूतगणा वाटतसे ॥ ४१ ॥
मग ते होऊनि संदेहस्थ । नाथासी म्हणती भूतें पतित ।
जाऊं द्या स्वामी करा मुक्त । आपुल्याला कार्यासी ॥ ४२  ॥
नाथ म्हणे सर्व गुंतले । तुम्ही मुक्त केवीं राहिले । 
येरु म्हणे पाठविलें । समाचारा वेताळें ॥ ४३ ॥
तरी महाराजा करीं मुक्त । जाऊं द्या वेताळनमनार्थ ।
यावरी त्यांसी म्हणे नाथ । सोडणार नाहीं सहसाही ॥ ४४ ॥
तुमचा वेताळ आदिराणीव । जाऊनि त्यातें त्वरें सांगावें ।
येरु म्हणती मग अपूर्व । भलें नोहे महाराजा ॥ ४५ ॥
वेताळ खवळता बाबरदेव । हे महाबळाचे असती अष्टार्णव ।
ब्रह्मांड जिंकूनि कंदुकभाव । महीं खेळती महाराजा ॥ ४६ ॥
नवनाग जैसे सबळी । तयां माजी फोडिती कळी ।
तयांसवें कोणी रळी । केली नाहीं आजन्म ॥ ४७ ॥
देव दानव गंधर्व असती । तेही वेताळ बलाढ्य म्हणती ।
तस्मात् स्वामी तयांप्रती । श्रुत करुं नोहे जी ॥ ४८ ॥
येरु म्हणे संपादणी । येथें काय करितां दाऊनि । 
तुमचा वेताळ पाहीन नयनीं । बळजेठी कैसा तो ॥ ४९ ॥
ऐसी ऐकूनी भूतें मात । म्हणती अवश्य करुं श्रुत ।
मग जाती जेथ तो वेताळ भूत । तयापाशीं पातले ॥ ५० ॥
राया वेताळासी करुनि नमन । सांगते झाले वर्तमान ।
म्हणती महाराजा भूतांसी विघ्न । जोगी एक आहे कीं ॥ ५१ ॥            
तेणें खेळूनि मंत्रशक्ती । महीं व्यक्त केली जमाती । 
शेवटीं म्हणतो हेंचि गती । तुम्हां करीन महाराजा ॥ ५२ ॥
ऐसें ऐकूनि पिशाचराव । परम क्षोभला विकृतिभाव ।
म्हणे आतां अष्टका सर्व । भूतावळ मेळवा ॥ ५३ ॥
मग भूतभृत्य जासूद हलकारे । जाते झाले देशांतरा ।
अर्बस्थान पंजाब गुर्जरा । बंगालादि पातले ॥ ५४ ॥
माळवी मेवाड तेलंगण । कर्नाटकी देश दक्षिण ।
कुंडाळ कैकाड विलंबवचन । सप्तदीपींचे पातले ॥ ५५ ॥
सकळां श्रुत करुनि गोष्टी । पाठविती सकळ भूतथाटी ।
अष्टराणीव एक एक कोटी । समारंभा पातले ॥ ५६ ॥
अष्टराणीव तयांचे नांव । महावीर विद्याकारणी सर्व । 
म्हंमद म्हैषासुर धुळोवान गर्वे । बाबर झोटिंग पातले ॥ ५७ ॥
मुंजा वनरसिंहाचा अवतार । म्हणोनि वीरांत त्याचा संचार ।
तोही एक कोटी भार । घेऊनियां मिळाला ॥ ५८ ॥
असो ऐसे कोटी भार । उतरले जैसे गिरिवर ।
महाभद्र तो आग्या वेताळवीर । येऊनियां पोहोंचला ॥ ५९ ॥
सकळ वेताळापाशीं येऊन । कथिते झाले सिद्धगमन ।
मग सकळ सांगूनि वर्तमान । समारंभीं चालिले ॥ ६० ॥
येऊनि शरभतीराप्रती । अष्टही कोटी कोल्हाळ करिती ।
तेणें दणाणी अमरक्षिती । आणि पाताळी आदळतसे ॥ ६१ ॥
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ । करीं कवळी विभूतिपात ।
आराधूनि मंत्रशक्तीतें । लखलखीत पैं केलें ॥ ६२ ॥
स्मरणगांडीव विभूती शर । सज्ज करिती अति तत्पर । 
परी सर्वांचा प्रताप पहावया स्थिर । महीं विराजे उगलाचि ॥ ६३ ॥
परी वज्रास्त्रमंत्र जपून । भोवतें वेष्टिलें रेषारंगण । 
आणि मस्तकीं वज्रासन । वज्रशक्ती मिरवीतसे ॥ ६४ ॥
तेणेंकरुनि भूतांचा प्रवेश । लिप्त नोहे आसपास । 
परी भूतावळ्या स्मशानास । वर्षाव करिती आगळा ॥ ६५ ॥
जैशा पर्जन्याच्या धारा । वर्षाव करिती अपार अंबरा ।
परी वज्रास्त्र सबळ मौळिभारा । कदाकाळीं मानीना ॥ ६६ ॥
त्यांत अष्ट पिशाचनृपाळ । स्वरुपेंकरुनि अति विशाळे ।
तरु टाकिती उपटूनि बळें । पर्जन्यधारांसारिखे ॥ ६७ ॥
परा तें वज्रास्त्र मौळीं । तया न गणिती तये काळीं ।
तरु संचवूनि पर्वतमौळी । पर्णकुटी ती जाहली ॥ ६८ ॥
ऐसा संचरतां तरुभार । काय करिते झाले समग्र । 
कोरडे काष्ठादि तृण अपार । तयावरी सांडिती ॥ ६९ ॥
सकळ करुनि महाकहर । सांडिते झाले वैश्र्वानर ।
तें पाहूनि नाथ मच्छिंद्र । जलदास्त्र प्रेरीतसे ॥ ७० ॥
भूतें सांडिती वैश्र्वानर । तरु कडकडती ज्वाळपर ।
ब्रह्मांडी उमाळा व्यापे थोर । पक्षिकुळ जीवजंतु ॥ ७१ ॥
ऐसी पाहतां पावकथाटी । परी जलदास्त्रें केली दाटी ।
उदधी मिरवूनि आकाशापाठी । शांत केला पावक तो ॥ ७२ ॥
यापरी मच्छिंद्रनाथ । पावकास्त्र प्रेरिता झाला विभूतिमंत्र ।
तेणें अग्नि प्रदीप्त करीत । भूतगणीं मिरवीतसे ॥ ७३ ॥
परी तो दृश्य अदृश्य जाणोनी । प्रळयाग्नि पाहती गुप्त होऊनी ।
मग पहा उदधितोया सांडोनी । आकाशांत मिरवूं त्या ॥ ७४ ॥
परी तो विझेना मंत्राग्न । मग मच्छिंद्रें जलदास्त्र प्रेरुन ।
शांत केला द्विमूर्धन । अस्त्रमंत्रे करुनियां ॥ ७५ ॥
शांत होताचि मंत्राग्नी । महीं उतरली भूतगणीं ।
मग स्पर्शास्त्र जल्पोनी । भूतांगणीं कल्पीतसे ॥ ७६ ॥
तेणेंकरुनि अष्टकोटी । महीं व्यक्त झाली एकथाटी ।
जैसी पूर्वी भूतांते राहटी । तेंचि झालें सर्वांस ॥ ७७ ॥
परी अष्टजन जे तयांचे नृप । महाबळी प्रतापदर्प । 
ते स्पर्शास्त्र न गणती माप । स्वबळें मिरविती ॥ ७८ ॥
परी स्पर्शास्त्रें एकचि केलें । अदृश्य सकळ तेज खंडूनि धरिलें ।
हें तों नेणोनि निकट आले । मच्छिंद्राते आकळावया ॥ ७९ ॥
परी भोवतें आहे वज्र संपन्न । लाग न चाले कांहीं तेणें ।

परी परम बलाढ्य वेताळसंधान । निकट अंगें पातले ॥ ८० ॥ 
Shri Navanath Bhaktisar Adhyay 5 
 श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय ५


Custom Search

No comments:

Post a Comment