Monday, February 8, 2016

Shree NavanathBhaktiSar Adhyay 16 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सोळावा ( १६ ) भाग १/२


NavanathBhaktiSar Adhyay 16 
Kanifa was in a female kingdom for about 1 month with his host Machchhindra. Then he proceeded for his tirthyatra. He came near to Helapattanam in Goud-Bangal. He met with Goraksha. Then they know from each other about their gurus. Kanifa knew that his guru Jalindar was buried by King Gopichand. Goraksha knew that his guru Machchhindra was in female kingdom. Kanifa was very angry and decided that he would punish king Gopichand. However Mainavati met Kanifa and told him that she was a disciple of Jalindar and was unaware of what happened to Guru Jalindar. She requested Kanifa not to punish Gopichand. What happened next would be told to us by DhundiSut Mau from Narahari family in the next Adhyay 17.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सोळावा ( १६ ) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥
जयजयाजी दिगंबरा । आद्यनामें विश्र्वंभरा ।
वर्णितां तुझिया गुणसंभारा । मति अपूर्व होतसे ॥ १ ॥
वर्णितां तुझिया गुणसंपत्ती । वेदभांडारे अपूर्व होती ।
सहस्त्रफणी वाहतां माथीं । शीण वाचे दावीतसे ॥ २ ॥
पंचानन ऐसे धेडे । परी दो अक्षरीं झाले धडे ।
सरस्वतीचें शिणोनि तोंड । करी सांड विलापाची ॥ ३ ॥
आठभार उद्भिज्ज देही । कमळपत्रांते पुरे मही ।
सप्ताब्धींची अपूर्व शायी । तव गुणसाररसज्ञ ॥ ४ ॥
ऐसा सर्वगुणज्ञ पुरुष । येवोनि बैसला अबद्धमतीस ।
भक्तिसार ग्रंथ सुधारस । स्वयें निर्मिला आपणचि ॥ ५ ॥
तरी मागिले अध्यायीं सकळ कथन । कानिफा आणि वायुनंदन ।
युद्धसमयीं ऐक्य होऊन । सुखसागरा मिळालें ॥ ६ ॥
यावरी कानिफा स्त्रीदेशांत । गेले श्रीगडमुंडगांवांत ।
तेथे भेटोनि मच्छिंद्रातें । आतिथ्यातें भोगिले ॥ ७ ॥
भोगिले परी कैंसे रीतीं । तेंचि ऐका येथूनि श्रोतीं ।
मच्छिंद्राचे काम चित्तीं । एक अर्थी उदेला ॥ ८ ॥
कीं कानिफा जाईल स्वदेशांत । श्रीगोरक्षा करील श्रुत ।
मग तो धांवोनि येईल येथ । नेईल मातें येथुनी ॥ ९ ॥
तरी गोरक्ष मम शिष्य आहे । ऐसें यासी श्रुत करुं नये ।
अनेक योजूनि उपाय । येथें राहता करावा ॥ १० ॥
ऐसी युक्ती रचूनि चित्तीं । करावें म्हणे आतिथ्य बहू रीतीं ।
म्हणोनि बोलावूनि बहुत युक्तीं । सकळां मच्छिंद्र सांगतसे ॥ ११ ॥
याउपरी आणिक योजना करीत । कीं विषयीं गोवावा कानिफनाथ ।
मग हा कदा देशांत । जाणार नाहीं सर्वस्वें ॥ १२ ॥
चंद्राननी मृगांकवदनी । पाठवीतसे शिबिरालागुनी ।
परी तो नातळे कामवासनीं । इंद्रियदमनी महाराज ॥ १३ ॥
म्हणाल तरी त्या कैशा युवती । प्रत्यक्ष कामाच्या मूर्ती ।
जयांचे नेत्रकटाक्षें होती । वेडेपिसे देवादि ॥ १४ ॥
जयेचें पाहतां मुखमंडण । तपी सांडिती तपाकारणें ।
येवोनि मुंगी लुंगी होवोन । मागें भ्रमती जपी तपी ॥ १५ ॥
जयेचे अधर पोंवळ्यांपरी दिसती । दर्शन दाळिंबबीज गोमटी ।
गौरवर्ण पिकाघाटी । ग्रीवा दर्शवी बाहेर ॥ १६ ॥
कीं अनंत चंद्राचा प्रकाश जैसा । कीं उडुगणपतीचा द्वितीय  ठसा ।
जयांच्या नखाकृतिलेखा । चंद्रकोरी मिरवल्या ॥ १७ ॥
असो ऐसे स्त्रियांचे वर्ण । कीं भानुचि पावला उदयभान ।
ऐसिया स्त्रिया पाठवोनि स्थान । चेतविती कामासी ॥ १८ ॥
परी तो नातळे महाराज । हा वृत्तांत मच्छिंद्रा कळला सहज ।
मग म्हणे शिष्य कटकाचा समाज । कामवासनीं गोवावा ॥ १९ ॥ 
ऐसाही यत्न करुनि पाहतां । कामिनींचा श्रम झाला वृथा ।
शिष्यकटकही येईना हाता । उपाय कांहीं चालेना ॥ २० ॥
 असो ऐसे छळणांत । एक मास राहिले तेथ ।
परी कोपें देव होतां उदित । सहजस्थितीं लोटले ॥ २१ ॥
असो लोटल्या एक मास । मग पाचारुनि मच्छिंद्रास ।
म्हणती आज्ञा द्यावी आम्हांस । स्वदेशासी जावया ॥ २२ ॥
मग अवश्य म्हणोनि मच्छिंद्रनाथ । नानासंपत्ती द्रव्य ओपीत ।
गज वाजी उष्ट्र अमित । द्रव्य बहुत दिधले ॥ २३ ॥
शिबिरें कनाथा पडप थोर । तंबू राहुट्या पृथगाकार ।
शिबिका मुक्ताझालरा छत्र । वस्त्राभरणी भरियेले ॥ २४ ॥
ऐसी ओपूनी अपार संपत्ती । बोळवीतसे मच्छिंद्रजती ।
एक कोस बोळवोनि नमिती । परस्परांसी आदरें ॥ २५ ॥
ऐसें बोळवोनि कटकभार । स्वस्थाना आला नाथ मच्छिंद्र ।
येरीकडे तीर्थवर । करीत आला स्वदेशा ॥ २६ ॥
सहज आले मुक्कामेंमुक्काम । लंघुनि स्त्रीदेश सुगम ।
पुढें गौडबंगाल स्थान उत्तम । नानाक्षेत्रें हिंडती ॥ २७ ॥
परी जया गांवीं जाय नाथ । त्या गांवीं लोक करिती आतिथ्य ।
सर्व पाहूनि भक्तिवंत । उपचारें मिरवती ॥ २८ ॥
इच्छेसम सकळ अर्थ । पूर्ण होऊनि शिष्यसांप्रदायीं होत ।
म्हणोनि वर्णिती कीर्त । मुखोमुखीं उल्हासें ॥ २९ ॥
मग या गावींचे त्या गांवीं लोक । येऊनि नेती सकळ कटक ।
दावूनि भक्तिभाव अलोलिक । बोळविती पुढारा ॥ ३० ॥
ऐसें श्रवंण करीत करीत । कीर्तिमागे केर्ती होत  ।
ती सत्कीर्ती हेळापट्टणांत । प्रविष्ट झाली जगमुखें ॥ ३१ ॥
बहुत जनांचे वाचे स्तुती । अहाहा स्वामी ऐसें म्हणती ।
मग राजांगणी ही कीर्ती । हेलावली सेवकमुखें ॥ ३२ ॥
कीर्ति ऐकूनि नृपनाथ । पुढें प्रेरिता झाला दूत ।
त्याकरवी उत्तम वृत्तांत । मुनिकटकाचा आणविला ॥ ३३ ॥ 
ते सांगती मुनीचा राजयोग । गांवोगांवीहूनि शिबिरें सुरंग चांग ।
धांवताती घेऊनि मागोमाग । स्वामीलागीं राहावया ॥ ३४ ॥
पुढें नाथध्वज येऊन । शिबिरें चालती त्यामागून ।
शिष्यकटकासी मागूनि गमन । कानिफाचे होतसे ॥ ३५ ॥  
ऐसें मार्गीं करितां गमन । तो येरीकडे जगन्नाथाहून ।
गोरक्ष बंगालदेशांत येऊन । गांवोगांव भ्रमतसे ॥ ३६ ॥
तो सहजमार्गी करितां गमन । महीप्रवाही तरुव्यक्त विपिन ।
तया विपिनीं गजकर्णनंदन । सहजस्थितीं भेटला ॥ ३७ ॥
तेणें पाहिलें गोरक्षासी । गोरक्षें पाहिलें कानिफासी ।
दृष्टादृष्टी होतां आदेशीं । एकमेकां बोलिले ॥ ३८ ॥
करुनि स्थिर शिबिकासन । खालीं उतरला कर्णनंदन ।
मग भरजरी गालिचा महीं पसरुन । गोरक्षासी बैसविले ॥ ३९ ॥
आपण बैसे उपसवें नेटी । बोले कानिफा वाग्वटी ।
नाथपंथ हा वरदपुटी । कोण गुरु लाहिला ॥ ४० ॥
हें ऐकून गोरक्षनाथ । मच्छिंद्रजन्मापासूनि कथा सांगत ।
वरदपाणी उदयमित्र । प्रसन्न झाला तयासी ॥ ४१ ॥
तरी त्याचा दासानुदास । मी म्हणवितों महापुरुष ।
परी श्रीगुरु कानिफादेहास । गुरु कोण मिरवला तें सांगा ॥ ४२ ॥
ऐसे गोरक्ष बोल ऐकून । कानिफा सांगे जालिंदरकथन ।
जन्मापासूनि वर्तमान । दत्तकृपा आगळी ॥ ४३ ॥
ऐसे उभयतांचे भाषण । झालिया मिरवलें समाधान ।
म्हणती योग्य आलें घडून । तुम्ही आम्हां भेटलां ॥ ४४ ॥
याउपरी कानिफाचित्तीं । कामना उदेली एका अर्थी ।
की मच्छिंद्र गुरु गोरक्षाप्रती । दत्तवरदें मिरवला ॥ ४५ ॥
तरी दत्तकृपेचें अनुसंधान । कैसें लाधलें विद्यारत्न ।
कीं कवणरुपीं सहजदर्शन । जगामाजी मिरवती ॥ ४६ ॥
तरी याचा शोध करावा । दावूनी आपुल्या गौरवा ।
ऐसें योजूनि सहज भावा । दृष्टी करी भोंवतालीं ॥ ४७ ॥
तों दृष्टीसमोर आम्रवन । पक्व फळी देखिलें सधन ।
तेंही पाडाचें पक्वपण । शाखा वृक्षीं विराजल्या ॥ ४८ ॥
तें पाहतां कानिफनाथ । म्हणे हे आम्रवन काय शोभत ।
फळें हीं मधुर शाखा व्यक्त । झोंबल्या आहेत ह्या वृक्षीं ॥ ४९ ॥
परी ऐसीं फळें सुगम दिसती । तरी भक्षण करावें वाटे चित्तीं ।
यावरी गोरक्ष बोले युक्ती । नको नको म्हणतसे ॥ ५० ॥
याउपरी बोले कानिफा वचन । तोडूनि आणवितो शिष्य धाडून ।
गोरक्ष म्हणे इतुका यत्न । कासयासी करावा ॥ ५१ ॥
आतां शिष्य आहेत जवळी । तोडूनि आणावें त्या करकमळीं ।
शिष्य नसतां कोणे काळीं । मग आपण काय करावें  ॥ ५२ ॥        
तरी आतां स्वतः ऐसें करावें । गुरुप्रसादें प्रताप मिरवावे ।
फळे तोडूनि विद्येसी गौरवावें । तुष्ट आत्मा करावा ॥ ५३ ॥
ऐसें कानिफा ऐकूनि वचन । जरी तुमचें इच्छितें ऐसें मन ।
तरी आतांचि आणितों तोडून । पक्वपणीं गुरुकृपें ॥ ५४ ॥
मग कवळूनि भस्मचिमुटी । विभक्तास्त्र जपे होटीं ।
त्यावरी आकर्षण मंत्रपोटीं । प्रेरित झाला युक्तीनें ॥ ५५ ॥
विभक्तास्त्र आकर्षणी । प्रेरितां फेकीं भस्म काननीं ।
तंव तीं पक्वफळें वृक्षावरुनी । पुढें आलीं सर्वत्र ॥ ५६ ॥
मग ते शिष्यकटकासहित । फळें भक्षिती मधुर व्यक्त ।
भक्षिल्या पूर्ण तृप्त । क्षाळिले हात जीवनानें ॥ ५७ ॥
ऐसे झालिया पूर्णप्रकरणीं । गोरक्ष विचारी ऐसें मनीं ।
म्हणे प्रताप दाविला मजलागुनी । कानिफानें आपुला ॥ ५८ ॥
तरी आपण आतां यासी । दावूं विद्या चमत्कारासी ।
ऐसा विचार करुनि मानसीं । कानिफातें बोलतसे ॥ ५९ ॥
म्हणे तुम्ही केला पाहुणचार । तरी उत्तरालागीं उत्तर ।
आणिक फळें भक्षूनि साचार । चवी रसने मिरवावी ॥ ६० ॥
ऐसे ऐकोनि तयाचे वचन । म्हणे बोललां तें फार उत्तम ।
तुमच्या शब्दासी करुनि मान । स्वीकारावें तैसेंचि ॥ ६१ ॥
मग आकर्षणशक्तीं विभक्तास्त्र । जल्पोन नाथ गोरक्ष पवित्र ।
तों लवंगवनींचीं फळे विचित्र । येऊनि पडलीं पुढारां ॥ ६२ ॥
मग ती फळें खात जेठी । रसनेसी पडो पाहे मिठी ।
अहा अहा म्हणे शेवटीं । अमृतसरीं दाटले ॥ ६३ ॥
मग ती फळें केलिया भक्षण । शुद्धजीवनें हस्त प्रक्षाळून ।
बैसले आसनीं सुखें येऊन । त्यावरी बोले गोरक्ष तो ॥ ६४ ॥
म्हणे खालीं फळें उत्तम राहिलीं । परी जैसीं तैसीं करावी वहिलीं ।
पुन्हां योजूनि वृक्षडाहळीं । पुढें मार्गा गमावें ॥ ६५ ॥
याउपरी कानिफानाथ । ऐसा कोण ब्रह्मयाचा सुत ।
पुन्हां निर्मोनि मूर्तिमंत । जैसें तैसें करील ॥ ६६ ॥
गोरक्ष म्हणे गुरुपुत्र । जो निस्सीमपणीं आहे पवित्र ।
त्यासी हे करणें अघटित विचित्र । कदाकाळीं नसेचि ॥ ६७ ॥
तो दुसरा ब्रह्मा करील उत्पन्न । मग ऐसियाची कथा कोण ।
जो महीच मस्तकीं करिता धारण । तो पर्वताचे ओझे शिणे कीं ॥ ६८ ॥
जो अर्कतेजा निवविणार । तो पावक ठिणगीनें पळे सत्वर ।
हृदयीं सांठवितो सप्तसागर । तो थिल्लरोदकें अटकेना ॥ ६९ ॥
जो बोलकाजाचे गंभीर चातुरीं । बृहस्पतीतें मागें सारी ।
तों अजारक्षकाते भिवोनि अंतरीं । मौन वरील कां वाचे ॥ ७० ॥
जो आपुलें प्रतापेंकरुनी । क्षीराब्धी करील गृहवासनी ।
तो तक्राकरितां सदैव सदनीं । भीक मागेल केउता ॥ ७१ ॥
कीं चक्षूचे कृपाकटाक्षें । पाषाण करी परीस जैसे ।
तो हेमाकरितां काय प्रत्यक्ष । आराधील धनाढ्या ॥ ७२ ॥
जयाचे वचनवाग्वटी । मिरविती सकळ देवांच्या थाटी ।
तो आपल्या मोक्षासाठीं । आराधिना भूतासी ॥ ७३ ॥
तस्मात् ब्रह्मयाची काय कथा । जो अनंतब्रह्मांडें होय निर्मिता ।
सर्व कर्तव्याचा कर्ता । गुरुकृपेसीं मिरवतसे ॥ ७४ ॥
नातरी मुळींच प्रौढीं । गुरु मिरवला ज्याच्या कवाडीं ।
तयाची दैना कोण फेडी । काबाड ( गवत, कडबा ) ओझे वाहे तो ॥ ७५ ॥
ऐसें ऐकतां कानिफनाथ । परम क्षोभला खचितार्थ । 
जैसा पावक आज्यसिंचितार्थ । कवळूं पाहे ब्रह्मांडा ॥ ७६ ॥
म्हणे हो हो जाणतों तूतें । आणि तुझिया गुरुसहित ।
बहुसाधनीं प्रतापवंत । नरकामाजी पचतसे ॥ ७७ ॥
वाचे म्हणविती योगीजन । कर्म आचरती नरकपतन ।
सकळ स्त्रीराष्ट्र वेष्टून । भोग भोगी पापांचा ॥ ७८ ॥
जितेंद्रियत्व दावावें जनीं । असोनि भोग चिंती मनीं ।
तया भोगवश करोनि । मेनिकानाथ होवोनि ठेला ॥ ७९ ॥
तरी ठाऊक गुरु तुझा । किती बोलसी प्राज्ञी ओजा । 
आतां ब्रह्मयाचें करुनि हीन तेजा । ढिसाळ गोष्टी करितोसी ॥ ८० ॥
प्रथम गुरु तुझा काबाडी । तुझी दैना कोण फेडी ।
आतां सोडोनि सकळ प्रौढी । मार्गालागी क्रमी कां ॥ ८१ ॥
ऐसें वचन खडतर बोलणें । गोरक्षातें होतां श्रवण ।
मग म्हणे बोलसी आपण । चावटीपणीं हे भ्रष्टा ॥ ८२ ॥
तुझा गुरु जालिमदरनाथ । प्रतापहीन दीन बहुत । 
दशवर्षें आजपर्यंत । नरकीं नित्य पचतसे ॥ ८३ ॥
परी त्या सामर्थ्य नाहीं झालें । कीं आपण येथूनि जावें वहिलें ।
नृपसर्पदर्पे वेष्टिले । शक्तिहीन झालासे ॥ ८४ ॥
हेळापट्टणीं गौडबंगाल देशीं । वस्ताद मिळाला आहे त्यासी ।
धन्य गोपीचंद प्रतापराशी । लीदगर्तीत पचवीतसे ॥ ८५ ॥
तैसा नोहे गुरु माझा । हालवील सकळ ब्रह्मांड चोजा ।
शंकराचें अस्त्र ओजा । करकमळीं मिरवतसे ॥ ८६ ॥
अष्टभैरव महादारुण । अजिंक्य देवांदानवांकारण । 
त्यांसी बळें करुनि कंदन । शरणागत आणिलें ॥ ८७ ॥
पाहे केवढा मारुतसुत । जेणें विजयी केला रघुनाथ । 
तया मस्तकीं देऊनि पर्वत । उभा केला स्तंभापरी ॥ ८८ ॥
वीरभद्र प्रतापतरणी । देवदानवां अजिंक्य करणी ।
तयाचा प्राण कंठी आणुनी । शरणागत तो केला ॥ ८९ ॥
द्वादशकळी तीव्र आदित्य । तयाचा उलथोनि पाडिला रथ ।
सकळ देव शरणागत । होऊनि लोटले पायासी ॥ ९० ॥
तरी प्रतापी गुरु ऐसा । भक्त सोडवीत नरकक्लेशा ।
तयाच्या वरदकृपें ऐसा । आतांचि पाहें हे भ्रष्टा ॥ ९१ ॥
मग घेऊनि भस्मचिमुटी । मंत्रप्रयोग बोले होटीं ।
संजीवनी ते पीयूषथाटी । सकळ फळांते मिरवली ॥ ९२ ॥
ऐसीं सकळ प्रयोगीं फळें संपूर्ण । जैसीं तैसीं ठेली होऊन ।
तें कानिफनाथ पाहून । मनीं शंकीत पैं झाला ॥ ९३ ॥
योजूनि सर्वें मुख वोठीं । विस्मय करीत आपुले पोटीं ।
म्हणे धन्य हा प्रतापजेठी । जगामाजी मिरविला ॥ ९४ ॥
सकळ टाकूनि विरुद्ध भाषण । धांवोनि दिधलें आलिंगन ।
म्हणे धन्य तूं एक निपुण । गुरुपुत्रता मिरविशी ॥ ९५ ॥
परी ऐशा बोलतां विरुद्ध बोला । मातें सर्वज्ञ लाभ झाला ।
शोधित फिरलों जालिंदराला । ठाव लाधला तुजपासीं ॥ ९६ ॥
यापरी गोरक्ष बोले वचन । हें बोलिलासी अति अप्रमाण ।
माझा लाभ तुजकारण । तुझा लाभ मज झाला ॥ ९७ ॥
ते बोल नव्हे वाईट । दाविते झाले मार्ग चोखट ।
गुप्तगुरुचें उघडूनि कपाट । मार्गदिवटा पैं केला ॥ ९८ ॥
तरी आतां उत्तम झालें । दृष्टीं पाहूं गुरुपाउलें ।
ऐसें वदूनि प्रीतीं नमिलें । एकमेकां तें वेळा ॥ ९९ ॥
याउपरी गौरनंदन । स्पर्शास्त्र मुखीं जल्पून ।

वृक्षांदेठीं फळें नेऊन । जेथील तेथें जडियेलीं ॥ १०० ॥

Shree NavanathBhaktiSar Adhyay 16 
 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सोळावा ( १६ )


Custom Search

No comments:

Post a Comment