Tuesday, February 23, 2016

Shri Navanath Bhaktisar Adhyay 21 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकविसावा (२१) भाग २/२


Shri Navanath Bhaktisar Adhyay 21 
Kilotala tried everything so that Goraksha could not leave Female kingdom. However Goraksha had already decided to leave female kingdom alogwith Machchhindra. He started for Tirthyatra taking with him Machchhindra and Meennath. Kilotala also went to swarga with Uparcharvasu father of Machchhindra. What happened next will be told to us by Dhandusut Malu from Narahari family in the next 22nd Adhyay.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकविसावा (२१) भाग २/२
मग नाना संवाद नाना स्तुती । दावितां ती श्रमली युवती ।
परी हा विरक्त कोणे अर्थी । आतळेना तियेतें ॥ १०१ ॥
मग ती आपुले चित्ती श्रमोन । राहती झाली दीनवदन ।
कीलोतळेतें वर्तमान । सर्व सांगून गेलीसे ॥ १०२ ॥
यावरी कीलोतळा संपत्तीसी । गोरक्षा दावी भलते मिसी ।
रत्नमुक्तमाणिकराशी । शृंगारादि अचाट ॥ १०३ ॥
परी दावूनि सहजस्थित । म्हणे वत्सा हें तुझेंचि वित्त ।
चंद्रसूर्यअवधीपर्यंत । भोगिसील पाडसा ॥ १०४ ॥
ऐसें बोले कीलोतळा । परी हा न मळे आशामळा ।
जेवीं मुक्ता लिंपिलिया काजळा । श्र्वेतवर्ण सांडीना ॥ १०५ ॥
ऐशा युक्तिप्रयुक्ती करितां । निकट वृत्ति आली तत्त्वतां ।
मग कीलोतळेच्या मोहें चित्ता । नित्य हुंबाडा येतसे ॥ १०६ ॥
मीननाथ जवळी घेऊन । नेत्रीं लोटले अपार जीवन ।
ती आणि शैल्या सेवकी पाहून । दुःखी होती तैशाचि ॥ १०७ ॥
मग त्या म्हणती वो माय स्वामिनी । आम्ही मोहूं गोरक्षालागुनी ।
तुम्ही चिंता कदापि मनीं । आणूं नका महाराजा ॥ १०८ ॥
ऐसें बोलूनि शैल्या युवती । कीलोतळेसी समजाविती ।
ऐसें बोलतां दिनव्यावृत्ती । प्रतिपदा आली असे ॥ १०९ ॥
मग त्या दिवशीं आनंदमहिमा । गुड्या उभारिल्या ग्रामोग्रामा ।
परीशृंगाररुप  प्रवाकोत्तमा । मच्छिंद्रयोगी बुडाले ॥ ११० ॥
कैंचा आनंद कैंची पाकनिष्पत्ती । कैंचि गुडी शोकव्यावृत्ती ।
सकळ ग्रामीं शैल्या युवती । मच्छिंद्रयोगें हळहळल्या ॥ १११ ॥
एक म्हणती हा नाथ । राज्यप्रकरणीं प्रतापवंत । 
उदार धैर्यपर्वत । दयाळ आगळा मायेहुनी ॥ ११२ ॥
एक म्हणती  चांगुलपणा । यापुढें उणीव वाटे मदना ।
कनकासनीं सभास्थाना । अर्कासमान वाटतसे ॥ ११३ ॥
एक म्हणती ऐसा पुरुष । दैवें लाधला होता आम्हांस ।
गोरक्ष विवसी आली त्यास । घेऊनि मेला जातसे ॥ ११४ ॥
ऐशापरी बहुधा युक्तीं । गोरक्षातें शिव्या देती ।
अहो मच्छिंद्रअर्काप्रती । राहुग्रह हा भेटला ॥ ११५ ॥
एक म्हणती नोहे गोरक्षक । आम्हां भेटला यम देख । 
मोहपाश घालूनि प्रत्यक्ष । मच्छिंद्र प्राण नेतसे ॥ ११६ ॥
हा कोणीकडोनि आला मेला । कां आमुच्या देशाशी आला ।
मच्छिंद्र मांदुस घेऊनि चालिला । बलात्कारें तस्कर हा ॥ ११७ ॥
एक म्हणती अद्वैत पूर्ण । ऐसें लाधलें होतें स्थान ।
त्या सुखासी लाथ मारुन । जात आहे करंटा ॥ ११८ ॥
काय करील अभाग्यपण । घरोघरीं भीक मागून ।
त्या तुकड्यांचें झालें स्मरण । षड्रसान्न आवडेना ॥ ११९ ॥
उत्तम चीर अन्न भूषण । सांडूनि करील चिंध्या लेपन ।
महाल माड्या नावडे सदन । सेवील कानन अदैवी ॥ १२० ॥
ऐसें बहुधा बहुयुक्तीं । बोलताती त्या युवती ।
बोलूनि वियोगें आरंबळती । मच्छिंद्र मच्छिंद्र म्हणोनि ॥१२१ ॥
ऐसे परी सकळ ग्रामांत । संचरलीसे विकळ मात ।
येरीकडे गोरक्षनाथ । कुबडी फावडी संयोगी ॥ १२२ ॥
अंगीं लेऊनि कंथाभूषण । माळा गळां दाट घालून ।
सिंगी सारंगी करी कवळून । नाथापाशीं पातला ॥ १२३ ॥
चरणीं अर्पूनियां भाळ । म्हणे स्वामी आली वेळ । 
उठा वेगीं उतावेळ । गमन करावया मार्गांत ॥ १२४ ॥
तें पाहूनि कीलोतळा । सबळ उदक आणीत डोळां ।
म्हणे स्थिर होईं कां बाळा । भोजन सारिल्या जाईजे ॥ १२५ ॥
मग पाक करुनि अतिनिगुती । गुरुशिष्य बैसवूनि एके पंक्तीं ।
वाढितां बोलती झाली युवती । विचक्षण कीलोतळा ॥ १२६ ॥
म्हणे महाराज मच्छिंद्रनाथ । तुम्ही जातां स्वदेशांत । 
परी मीननाथ तुमचा सुत । ठेवितां कीं संगें नेतां ॥ १२७ ॥
नाथ म्हणे वो शुभाननी । जैसें भावेल तुझिये मनीं ।
तैसीच नीति आचरुनी । मीननाथ रक्षूं गे ॥ १२८ ॥
मग बोलती झाली कीलोतळा । तुम्ही संगें न्यावें बाळा ।
येथें रक्षण केउतें बाळा । भुभुःकारीं होईल कीं ॥ १२९ ॥
तुम्ही होतां निकट येथें । म्हणवूनि भुभुःकार न बाधी त्यातें ।
तुम्ही गेलिया कोण येथें । रक्षण करील बाळाचें ॥ १३० ॥
आणिक एक घेत लक्ष । मातें शापिलें वसु उपरिईशें ।
तुमचा पिता जो प्रत्यक्ष । वीर्यसंध आराधिला ॥ १३१ ॥
तयाचा विचक्षण सबळ शाप । मीं सोडिलें सिंहलद्वीप ।
त्या शापाचें पूर्ण माप । भरुनि आलें महाराजा ॥ १३२ ॥
तरी उश्शापाचा समय आला आतां । फळासी येईल तुम्ही जातां ।
उपरिचरवसू तुमचा पिता । येऊनि नेईल मजलागीं ॥ १३३ ॥
मग बाळाचें संगोपन । कोण करील मायेविण ।
यातें जरी न्यावें स्वर्गाकारण । मनुष्यदेह न येचि ॥ १३४ ॥
तरी सांगाया हेंचि कारण । मीननाथ सवें नेणें । 
मग अवश्य म्हणे मच्छिंद्रनंदन । भोजन करुन ऊठले ॥ १३५ ॥
कीलोतळाही भोजन करुनी । मीननाथाकडे पाहुनी । 
बोल न निघे तिचे वदनीं । परी हृदयीं डोंब पाजळला ॥ १३६ ॥
मच्छिंद्रमोहाच्या स्नेहेंकरुनि अपार । अनिवार मोहाचे वैश्र्वानर ।
पेट घेतां शिखेपर । दुःख आकाशीं प्रकटलें ॥ १३७ ॥
मोह उचंबळोनि अत्यंत चिंता । नेत्रीं लोटलीं अश्रूसरिता ।
तें पाहूनियां शैल्या समस्ता । गोरक्षातें वेष्टिती ॥ १३८ ॥
म्हणती गोरक्षा ऐकें वचन । करुं नको रे कठिण मन । 
मच्छिंद्र आमुचा घेऊनि प्राण । जाऊं नको महाराजा ॥ १३९ ॥
पहा पहा सुखसंपत्ती । राजवैभव केवीं गती ।
ऐशा टाकूनि स्वसुखाप्रती । कानन मुलुख सेवूं नको रे ॥ १४० ॥
महाल मुलुख तुज हस्ती । अश्र्व फिरणें चातकगती ।
हें सुख टाकूनि राज्यसंपत्ती । कानन मुलुख सेवूं नको रे ॥ १४१ ॥
महाल मुलुख तुज स्वाधीन । प्रजालोकादि करिताती नमन ।
ऐसा टाकूनि बळमान । कानन सेवूं नको रे ॥ १४२ ॥
हिरे रत्नें माणिक मोतीं । परम तेजस्वी नक्षत्रज्योती ।
स्वीकारुनि भूषणाप्रती । सुखसंपत्ती भोगावी ॥ १४३ ॥
आम्ही झालों तुमच्या दासी । नित्य आचरुं सेवेसी । 
रतिसुखासी नटूं तैसें । हें सुखसंपन्न भोगीं कां ॥ १४४ ॥
कला कुशल विद्या सांग । सभेस्थानीं रागरंग ।
ऐसे टाकूनि प्रेमभोग । कानन सेवूं नको रे ॥ १४५ ॥
जरी जरतारी दीपती चीर । परिधानीं कीं इच्छापर ।
ऐशिया सुखा करीं निर्धार । कानन सेवूं नको रे ॥ १४६ ॥
जडितरत्न हेमश्रृंगार । भूषणीक मनोहर ।
ऐसें टाकूनि सुखवृदं । कानना जाऊं नको रे ॥ १४७ ॥
चुवा चंदन अर्गजागंध । अंगीं चर्चूं आम्ही प्रसिद्ध ।
ऐसें टाकूनि सुखवृदं । कानना जाऊं नको रे ॥ १४८ ॥  
कनकासनीं विराजमान । दिससी जैसे सहस्त्रनयन ।
ऐशा सुखाचा त्याग करुन । कानना जाऊं नको रे ॥ १४९ ॥  
द्रव्यराशी अमूप भांडार । भरले असती अपरंपार । 
किल्ले कोट टाकूनि सुंदर । कानना सेवूं नको रे ॥ १५० ॥   
ऐशा सुखाची उत्तम जाती । टाकूनि जासी दुःखआवर्ती ।
महीं भ्रमण काननक्षितीं । दुःख अपार आहे रे ॥ १५१ ॥
शालदुशाल भूषणमाला । टाकूनि घेसी दुःख कशाला ।
सांडूनि षड्रसअन्ना विपुला । कंदमूळ खाशील ॥ १५२ ॥
उंच आसन मृदु कैसें । मंचकीं शय्या कुसुमकेश ।
तें टाकूनि महीस । लोळसील काननीं ॥ १५३ ॥
तरी गोरक्षा मनुष्यदेहीं । वृत्ति आणी विवेकप्रवाहीं ।
राज्यासनांचे सुख घेईं । सकळ महीं भोगीं कां ॥ १५४ ॥
अरे या देशीं शत्रुभय । अन्य राजाचें नाही भय ।
ऐसें स्थान आनंदमय । तरी सकळ महीं भोगीं कां ॥ १५५ ॥
ऐसें बहुतांपरी उपदेशी । दाविती तया सुखासी ।
परी विरक्त स्वचित्तेंसी । आशेलागीं आतळेना ॥ १५६ ॥
धिक्कारुनि सकळ युवती । म्हणे आम्हां कासया व्हावी संपत्ती ।
प्राण टाकोनि शवाहातीं । तुम्हीच मिरवा जगीं हो ॥ १५७ ॥
अगे आम्हांसी वोढण वसनशयनीं । वरतें आकाश खालीं मेदिनीं ।
शयन करितों योगधारणीं । अलक्षीं लक्ष लावूनियां ॥ १५८ ॥
ऐसी बहुतां नीती तयेंसी वाणी । म्हणे दूर लंडी गौडबंगालिणी ।
ऐसें म्हणोनि तये अवनी । पाऊल ठेविता पैं झाला ॥ १५९ ॥
मग कीलोतळेतें करुनि नमन । स्कंधी वाहिला मच्छिंद्रनंदन ।
श्रीमच्छिंद्र सवें घेऊन । ग्रामाबाहेर पैं आला ॥ १६० ॥
परी कीलोतळेनें गोरक्षकासी चोरुन । कनटवीट आणली भांडारांतून ।
मच्छिंद्रनाथकरीं अर्पोन । भस्मझोळींत टाकिली ॥ १६१ ॥
परी मच्छिंद्राच्या मोहेंकरुन । घोंटाळती पंचप्राण । 
नेत्रीं अपार अश्रुजीवन । मोहें नयन वर्षत ॥ १६२ ॥
मग गांवाबाहेर मैनाकिनी । माथा ठेवी नाथाचे चरणीं ।
गोरक्ष हृदयीं कवळोनी । मिरवीतसे तयातें ॥ १६३ ॥
म्हणे वत्सा माझे नाथा । घेऊनि जाशील अन्य देशांत ।
परी क्षुधा तृषा जाणोनि यातें । सुख देईं पाडसा ॥ १६४ ॥
बा रे अशक्त मच्छिंद्रनाथ । दिधलासे तुझिये हातांत ।
योजन अर्धयोजन महीतें । सुख देईं पाडसा ॥ १६५ ॥
बा रे मच्छिंद्र शांतीचा अचळू । परी फारचि असे सदा भुकाळू ।
तरी मच्छिंद्राचा क्षुधानळू । बाळासमान जाण रे ॥ १६६ ॥
जैसें मीननाथाचें लहानपण । त्याचि रीतीं मच्छिंद्रातें मान ।
हे उभयतां आहेत क्षीण । तुझे ओटींत वाहिले ॥ १६७ ॥
यापरी तूंतें सांगूं किती । तूं जेथें अससी बा सर्वज्ञमूर्ती ।
सच्छिष्य ऐसें तूतें म्हणिती । कारण भक्ती पाहोनी ॥ १६८ ॥
ऐसें वदोनी कीलोतळा । मिठी घाली गोरक्षगळां ।
म्हणे बा रे तूंतें वेळोवेळां । निरवितें जीवीं धरीं बा ॥ १६९ ॥
ऐसें म्हणोनि हंबरडा फोडीत । परम अट्टाहासें शब्द करीत ।
म्हणे आतां कैसा नाथ । निजडोळा देखेन मी ॥ १७० ॥
ऐसी मोहाची उभवी वार्ता । तें गोरक्ष पाहोनि म्हणे चित्ता ।
वेगें निघावें नातरी ममता । मच्छिंद्रातें दाटेल ॥ १७१ ॥
मग श्रीगुरुचा धरोनि हात । लगबगें चालिला गोरक्षनाथ ।
पाउलापाउलीं दुरावत । तों तों आरंबळे कीलोतळा ॥ १७२ ॥
पालथा घालोनि पर्वत । अदृश्य झाले तिन्ही नाथ ।
मग कीलोतळा मस्तक महीप्रत । आपटीतसे तेधवां ॥ १७३ ॥
गाईसमान हंबरडा मारीत । हस्तें वक्षःस्थळ पिटीत ।
म्हणे आतां मच्छिंद्रनाथ । दृष्टी कैसा पडेल ॥ १७४ ॥
ऐसा मच्छिंद्र गुणी । सदा शांत म्हातारपणीं ।
दयाब्धि कृपानिधि पूर्ण । कोठे पाहूं मच्छिंद्रा ॥ १७५ ॥
म्हणे बाई गे शचीनाथ (इंद्र) । तैसा आपणांमाजी मिरवत ।
ऐसा स्वामी दयावंत । कोठें पाहूं निजदृष्टीं ॥ १७६ ॥
अहा मज कृपणाचें धन । गोरक्षतस्करें नेलें चोरुन ।
आतां नाथें कठीण मन । कैसें केलें मजविषयीं ॥ १७७ ॥ 
अहा मज वत्साचें अब्धिजीवन । गोरक्षघन गेला गिळोन ।
कीं मज अंधाची काठी हिरोन । गोरक्षनिर्दयें नेली गे ॥ १७८ ॥ 
आतां जावोनि मंदिरांत । काय कोठें पाहों नाथ ।
दाही दिशा ओस मातें । वाटताती साजणी ॥ १७९ ॥
सभेस्थानीं कनकासनीं । जेवीं बैसला दिसे तरणी (सूर्य) ।
आतां तें आसन वसन पाहोनि । पाठी लागे गे माये ॥ १८० ॥
अगे राजवैभव सकळ भार । मातें वाटतें ओस नगर ।
आतां माझा नाथ मच्छिंद्र । कैं पाहीन निजदृष्टीं ॥ १८१ ॥
ऐसा हा मच्छिंद्रपुरुष । कोठें हिंडतां न देखों देश ।
अति स्नेहाळु माया विशेष । मायेहूनि पाळीतसे ॥ १८२ ॥
बाई गे बाई निजतां शयनीं । काय सांगूं तयाची करणी ।
तीन वेळां मज उठवोनी । तान्हेलीस म्हणतसे ॥ १८३ ॥
मग आपुले करीं उदकझारी । लावी माझिये मुखपात्रीं ।
उदक पाजोनि कृपागात्रीं । जठर माझें चापीतसे ॥ १८४ ॥
रिक्त जठर लागतां त्यातें । म्हणे अससी क्षुधाक्रांत ।
मग पाचारोनी परिचारिकेतें । बळेंचि भोजन घालीतसे ॥ १८५ ॥
ऐशिया मोहाची दयाकोटी । वागवीत होता आपुले पोटीं ।
अति निर्दय होवोनि शेवटीं । कैसा सोडूनि पैं गेला ॥ १८६ ॥
ऐसें बोलूनि वागुत्तर । मस्तक आपटिलें महीवर ।
मुखीं मृत्तिका वारंवार । घालोनि हंबरडा फोडीतसे ॥ १८७ ॥
ऐसिया दुःखाची सबळ कहाणी । उपरिचरवसूच्या पडली कानीं ।
मग तो विमानीं बैसोनी । तियेपाशीं पातला ॥ १८८ ॥
विमान ठेवोनि तये अवनीं । निकट पातला कृपेंकरुनी ।
निकट येतां धरिला पाणी (हात) । म्हणे पापिणी हें काय ॥ १८९ ॥
तूं स्वर्गवासिनी शुभाननी । येथें आलीस शापेंकरुनी ।
तें शापमोचन गे येथोनी । झालें आहे सुख मानीं कां ॥ १९० ॥
मग करें कुरवाळोनि कीलोतळा । धरिता झाला हृदयकमळा ।
अश्रु डोळां पुसोनि ते वेळां । सदनामाजी आणितसे ॥ १९१ ॥
सदना आणूनि ते युवती । बोधिता झाला नाना युक्तीं ।
तो बोध असे भक्तिसारग्रंथीं । पुढिलें अध्यायीं ऐकावा ॥ १९२ ॥
भक्तिसार उत्तम ग्रंथ । ऐकतां होय पुण्यवंत ।
तरी श्रोते देऊनि चित्त । ग्रंथ आदरें ऐकावा ॥ १९३ ॥
नरहरिवंशीं धुंडिसुत । अनन्य तुम्हां शरणागत ।
मालू ऐसें नाम देहातें । संतकृपेनें व्यापिलें ॥ १९४ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ग्रंथ । स्वयें बोलिला पंढरीनाथ ।
सदा संतसज्जन परिसोत । ईश्र्वरकृपेंकरोनियां ॥ १९५ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । एकविंशतितमाध्याय गोड हा ॥ १९६ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
॥ श्रीनवनाथभक्तिसार एकविंशतितमाध्याय संपूर्ण ॥

Shri Navanath Bhaktisar Adhyay 21 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकविसावा (२१)


Custom Search

No comments:

Post a Comment