Friday, February 5, 2016

ShriNavanath BhaktiSar Adhyay 15 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय पंधरावा ( १५ ) भाग १/२


ShriNavanath BhaktiSar Adhyay 15 
Kanifa and Goraksha completed their 12 years tapas and they performed the necessary Pooja and proceeded for tirthayatra. They also wanted to see their Guru. However they were unaware about each other. Goraksha was very unhappy as he could not found out his guru. However at Helapattam he met with Kanifa's Guru Jalindar. Kanifa while on tirthyatra was spreading Nathapanth. Thus his disciples were increasing and the figure went to seven hundred. On his way he reached near to the boundary of Female kingdom, where entry was hard and anybody who had entered had never came back alive. Hence some of his disciples were frighten. Finally Kanifa proved his strength with they by using Sparshastra on them. Then he also fought with Maruti. Maruti was thinking that Kanifa would bring back Machchhindra who was in Female kingdom. However Kanifa told him that he was not there to take Machchhindra with him. Machchhindra welcomed Kanifa in Female kingdom and honored him with many gifts. In the next 16th Adhyay Dhundisut Malu from Narahari family will tell us what happens next.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय पंधरावा ( १५ ) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी जगत्पालका । मुनिमानसचकोरमृगांका ।
कृपांबुदातया पूर्णशशाकां । ग्रंथादरीं येई कां ॥ १ ॥
मागील अध्यायीं कथन । तुवां वदविलें कृपा करुन ।
गर्तकूपीं अग्निनंदन । गोपीचंदे घातला ॥ २ ॥
घातला परी कैसा लाग । कीं कोठें नाहीं मूसमाग ।
जैसा शंकर गेल्यामाग । फसवूनि त्यासी वरियेलें ॥ ३ ॥
असो पुढें आतां श्रोती । श्रवण करावी रसाळ उक्ती ।
सिंहावलोकनीं घेऊनि गती । मागील कथा विलोका ॥ ४ ॥
बद्रिकाश्रमीं पूर्ण तपासी । गोरक्ष कानिफा जान्हवीतीरासी ।
तप आचरितां द्वादशवर्षी । उद्यापन उरकिलें ॥ ५ ॥
परी याचें त्यासी नाहीं ठाऊक । कायाभुवनीं उभय अर्क ।
संगोपीत कामांतक । परी माहीत नाहीं अन्योन्यां ॥ ६ ॥
पुढील भविष्योत्तर जाणून । गुप्त ठेविलें ओळखून ।
यापरी तप झालिया पूर्ण । उभयतांही बोळविलें ॥ ७ ॥
कानिफा निघाला उत्तरदेशीं । महातपी तो गोरक्षशेखी ।
उत्तरपूर्णमध्यकोणासी । संचार करीत चालिला ॥ ८ ॥
प्रयाग गया काशी करुन । श्रीगुरुतें शोधी गजकर्णनंदन ।
यापरी पूर्ण दक्षिण कोण । गोरक्ष शोधी मच्छिंद्रा ॥ ९ ॥
शोधीत परी तो कैसा । कीं जलविण विभक्त मासा । 
कीं बाळ मातेचे वसवसा । सदोदित हृदयांत ॥ १० ॥
नावडे त्यातें अन्नपाणी । नावडे निद्रा सुखासनीं ।
सदा भंवते भाविक मनीं । उद्वेगचक्रीं पडियेला ॥ ११ ॥
श्रीगुरु आठवूनि चित्तांत । भ्रमण करीतसे पिशाचवत ।
सांडी श्र्वास आणूनि हेत । नाथ हे नाथ म्हणोनि ॥ १२ ॥
वारंवार हंबरडे फोडीत । म्हणे कधीं भेटती गुरुनाथ ।
प्राण डोळां उरला किंचित । पाय आतां दाखवीं ॥ १३ ॥
ऐसी प्रेमें होतसे वृष्टी । आपुल्या पुसे वागवटी ।
म्हणे पहिला असेल मच्छिंद्र जेठी । कोणी तरी सांगा हो ॥ १४ ॥
ऐसें बहुधा बहुतां पुसून । नाना क्षेत्रीं करी गमन ।
तो भ्रमत गौडदेशाकारण । हेळापट्टणीं पातला ॥ १५ ॥
तपें मांस भक्षिलें समग्र । अति सूक्ष्म जर्जर शरीर । 
त्यावरी श्रीगुरुवियोगचिंताशर । हाडीं टोले मारीतसे ॥ १६ ॥
जेथें बैसे तेथें वसे । नीरबिंदु वाहती नेत्रास । 
कार्याकारण कोण्या क्षेत्रास । भिक्षा मागूं जातसे ॥ १७ ॥
तों हेळापट्टण नगरामाझारी । येऊनि बैसला क्षणभरी ।
तों द्वारपाळ ग्रामद्वारीं । बैसले होते कांहींसे ॥ १८ ॥
त्यांनीं पाहूनि गोरक्षनाथ । आदेश म्हणूनि त्यातें नमीत ।
परी गोरक्ष तयां द्वारपाळां पुसत । मच्छिंद्रनाथ आहे कीं ॥ १९ ॥
तंव ते म्हणती आमुचे गांवीं । मच्छिंद्र नामे कोणी गोसावी ।
महाराजा आलाचि नाहीं । काय सांगावी सुखव्यक्ती ॥ २० ॥
परी नाथा एक तापसी । आला होता या गांवासीं ।
नाम जालिंदर या जगासी । मिरवत होता महाराजा ॥ २१ ॥
काय सांगावी तयाची नीती । लोकांसी वाटे जैसा गभस्ती ।
तो तृणभारा वाहतां माथीं । अधर आम्ही पाहातसों ॥ २२ ॥
गोरक्ष म्हणे काय कारण । मस्तकीं वाहतसे तृण । 
येरी म्हणे काननांतून । गोधनाकरितां आणीतसे ॥ २३ ॥
गोरक्ष म्हणे गोधन कोणाचें । येरी म्हणतीं तें गांवींचें ।
परी निःस्पृहवृत्ति गोधनाचें । पालन करी महाराजा ॥ २४ ॥
गोरक्ष म्हणे किती दिवस । राहिला होता या वस्तीस ।
राहूनि लोप कवण ठायास । झाला पुढें तो सांगा ॥ २५ ॥
येरी म्हणती योगद्रुमा । एक संवत्सर राहिला या ग्रामा ।
पुढें गेला कोठे तें आम्हां । माहीत नाहीं महाराजा ॥ २६ ॥
याउपरी गोरक्षनाथ । दिवस किती लोटले ते पाहात ।
येरी म्हणे दश आजपर्यंत । लोटले संवत्सर महाराजा ॥ २७ ॥
ऐसी ऐकूनि तयांची वाणी । गोरक्ष विचारी आपुले मनीं ।
तरी कां माझा स्वामी नाम पालटूनि । जगामाजी विचरला ॥ २८ ॥
मी सांडूनि पूर्ण तपास । लागावया करीत येईन धांवत ।
म्हणूनि पालटिलें स्वनामास । गांवामाजीं मिरवला ॥ २९ ॥
ऐसी कल्पना आणूनि मनीं । अश्रुधारा वाहती नयनीं ।
म्हणे महाराजा गेलासी सोडुनी । मज पाडसा कैसा रे ॥ ३० ॥
टाकूनि निर्वाण काननांत । कोठें गेला माझा नाथ । 
मी अर्भक अज्ञान बाळक । बहुत मोकालिलें कैसें मज ॥ ३१ ॥
हें नाथ तूं सकळमय । सर्वस्वी बापमाय ।
तुजवीण मातें कोण आश्रय । तिन्ही लोकीं दिसेना ॥ ३२ ॥
अहा मज पाडसाची येरणी । चरुं गेली कोणे रानीं ।
माझें स्मरण सकळ सांडूनि । कैसी गुंतली तिकडेचि ॥ ३३ ॥    
अहा मग वत्साची प्रेममाउली । कोण रानीं चरुं गेली ।
परी माझे स्मरण विसरली । कैसी गुंतली तिकडेचि ॥ ३४ ॥
अहा माझी मोहाची माय । करुं गेली अंतराय ।
मज ते विसरुनि सदयहृदय । कैसी गुंतली तिकडेचि ॥ ३५ ॥
ऐसें बोलूनि विलाप करीत । ऊर्ध्च हंबरडा मारुनि धांवत ।
पोट कवळुनि श्र्वास सोडीत । अहा नाथ म्हणूनि ॥ ३६ ॥
मग ते कानवाळू द्वारपाळ । म्हणती नाथा न करीं तळमळ ।
तुम्हां मायलेंकरांचा मेळ । ईश्र्वर करील पुढांरा ॥ ३७ ॥
ऐसी वदती ते वाणी । गांवांत धाडिला भिक्षेलागूनि । 
मग तो गोरक्ष सदनोसदनीं । अलक्ष गाजवीत जातसे ॥ ३८ ॥
परी जालिंदर होतां ज्या ठायीं । तेथे सहज आला भिक्षेस पाहीं ।
तैं एकटएक सदन सांई । पाहुनि अलक्ष म्हणतसे ॥ ३९ ॥
तो सवाल ऐकूनि जालिंदरनाथ । आदेश म्हणे महीआंत ।
ते आदेश गोरक्षाप्रत । श्रवण झाले तांतडी ॥ ४० ॥
मग ते आदेश वंदूनि पुढती । म्हणे कोठें आहांत महाराज जती ।
येरु म्हणे महीगर्ती । विराजलोसे महाराजा ॥ ४१ ॥
गोरक्ष म्हणे कवण नामीं । मिरवत आहांत नाथा स्वामी ।
येरी म्हणे मनोधर्मी । नाथ जालिंदर म्हणतात ॥ ४२ ॥
परी महाराजा योगद्रुमा । कवण नाम मिरवतसे तुम्हां ।
आणि वरदहस्तप्रसादउगमा । गुरु कोण तुमचा हो ॥ ४३ ॥
गोरक्ष म्हणे मच्छिंद्रजती । वरदप्रसाद गुरुमूर्ती ।
आणि गोरक्ष नाम देहाप्रती । जगामाजी मिरवले ॥ ४४ ॥
परी महाराजा ऐकें युक्ती । तुम्ही सेविली महीगर्ती ।
जगीं प्रवेष्टुनी पाप मती । भंगित झाली लोकांची ॥ ४५ ॥
ऐसी ऐकूनि तयाची वार्ता । जालिंदर सांगे झाली कथा ।
ती ऐकतांचि गोरक्षनाथा । कोपानळ पेटला ॥ ४६ ॥
म्हणे महाराजा आज्ञा करावी । क्षणेंचि घालीन पालथी मही ।
तंव त्या नृपाची प्रौढी कांहीं । भस्म करीन क्षणांत ॥ ४७ ॥
जैसा अग्नि पेटला सदनांत । तेणें तृणतंतूचें कोण गणित   ।
तन्न्यायें येथील नृपनाथ । भस्म करीन महाराजा ॥ ४८ ॥
अहा ऐसी गुरुमूर्ती । देवां दानवां वरद अती ।
ऐशा स्वामीसी घालूनि गर्ती । राज्य कैसा करितो जी ॥ ४९ ॥
तरी आतांचि आज्ञा प्रमाण । लागूं नेदी एक क्षण ।
मग जालिंदर बोले वचन । ऐसें नोहे महाराजा ॥ ५० ॥
या कार्याचें पुढें कार्य । नातरी हृदयीं विचारुनि पाहें ।
नाथपंथ येणें दुणावे । हेंचि भविष्य असे पहा ॥ ५१ ॥ 
तरी आतां क्षमा करुन । पुढें महाराजा करी गमन ।
परी हें ऐसें वर्तमान । बोलूं नको जगासी ॥ ५२ ॥
तुम्ही हिंडता सहज महीसी । मम सुत कानिफा भेटतां तुम्हांसी ।
श्रुत करावें कृत्य त्यासी । वृत्तांत यथींचा सकळिक ॥ ५३ ॥
मग तो युक्तिप्रयुक्ती करुन । संपादूनि रायासी कल्याण ।
मातें काढील गर्तेंतून । वाढवील तो नाथपंथ ॥ ५४ ॥
ऐसें सांगूनि गोरक्षनाथ । आदेश म्हणू बोळवीत ।
आणि गोरक्ष ऐकूनि शांत । होऊनि आदेश म्हणतसे ॥ ५५ ॥
मग आदेश शब्देंचि गमन । करुनि निघाला गोरक्षनंदन ।
आहारापुरतें मेळवूनि अन्न । उपहारा संपादी ॥ ५६ ॥
मग शिंगी शेली करुनि ग्रहण । करिता झाला मार्गी गमन ।
तों जगन्नाथ प्राचीनस्थान । तेथें जाऊनि पोहोंचला ॥ ५७ ॥
येरीकडे कानिफनाथ । गांवोगांवी भ्रमण करीत ।
परी ज्या गांवीं जाय तेथें । जगालागीं बोधीतसे ॥ ५८ ॥ 
कानिफामुखाचिये बोधस्थिती । ऐकूनि परम जन मानवती ।
सलिलप्रेम दाटूनि चित्तीं । अनुग्रह घेती तयाचा ॥ ५९ ॥
मग त्या गांवांत एकेक दोन । सच्छिष्य निघती विरक्तमान ।
प्रपंचराहणी लाथ मारुन । नाथासवें चालती ॥ ६० ॥
 ऐसे एक दोन पांच सात । दहाविसांचा मेळा जमत ।
होतां होतां सप्तशत । दाटले शिष्य समागमें ॥ ६१ ॥
पूर्वदेशीं करिता गमन । तो स्त्रीराज्य दोषसघन ।
तयाच्या सीमेपर्यंत जाऊन । उलट पाहती माघारां ॥ ६२ ॥
स्त्रीराज्यांत पुरुष कोणी । नाहीं हें विख्यात जनश्रुतकर्णी ।
म्हणोनि शिष्यमंडळ दणाणोनि । परतोनि पाहती माघारी ॥ ६३ ॥
ठायीं ठायीं करिती विचार । म्हणती स्त्रीराज्यदेश तीव्र ।
तेथें प्रवेश करितां नर । वाचत नाहीं सहसाही ॥ ६४ ॥
ऐसा देश कठिण असून । स्वामी करिती तयांत गमन ।
तरी अग्निकुंडीं सकळां नेऊन । पूर्ण आहुती इच्छितसे ॥ ६५ ॥
जरी सेविल्या हलाहलातें । मग कोण पुरुष जगेल तेथे ।
जेवी तीव्र अग्नीत शिरतां तेथें । आहाळेना कैसे म्हणावे ॥ ६६ ॥
सदनीं प्रेरिला वैश्र्वानर । सदन झालें खदिरांगार ।
तयामाजी निघतां नर । वांचेल कैसा सहसा तो ॥ ६७ ॥
कीं पतंग घेता दीपाची भेटी । त्याचि रीती येथें गोष्टी ।
दिसूनि येती परी शेवटीं । मृत्यु आम्हा दिसतसे ॥ ६८ ॥
ऐसें होतां निश्र्चयवचन । कोणी म्हणती करापलायन ।
जीवित्व वाचल्या साधन । घडून येईल महाराजा ॥ ६९ ॥
एक म्हणती ऐसें करावें । सदृढ धरावे गुरुचे पाय ।
मग जीवित्वाचें भय काय । जातसे तरी जाऊं द्या ॥ ७० ॥
काया वाचा तनुमनधन । प्रथम त्यासी केलें अर्पण ।
मग या जीवित्वाची आस्था धरुन । व्रतालागीं कां भंगावें ॥ ७१ ॥
एक म्हणती लागलें वेड । कैचे व्रत पडिपाड ।
जीवित्व हरल्या व्रतकोड । कोणी दृष्टीं पाहिलें ॥ ७२ ॥
तरी हा अर्थ सांडूनि धन । या स्वामीलागीं चुकवून ।  
गृहस्थांनो पलायन । करुनि जीवित्व वांचवा ॥ ७३ ॥
या स्वामीसी लागलें वेड । सादर मृत्युझांपड ।
जया ठायीं पडेल धाड । चालूनि जातो त्या ठायीं ॥ ७४ ॥
ऐसें तुम्हांसीं सत्य भासेल । तरी हे मानूनि घ्यावे बोल ।
जीवित्वाची आस्था असेल । तरी बोल फोल न मानावे ॥ ७५ ॥
ऐसें ठायीं ठायीं ताटीं । बैसूनि करिती बोलचावटी ।
परी हा अर्थ सकळ पोटीं । कानिफातें समजला ॥ ७६ ॥
मनांत म्हणे भ्याले सकळ । हीनबुद्धि अति दुर्बळ ।
परी आपुला प्रताप सांगतां तुंबळ । सत्य वाटणार नाहीं यांसी ॥ ७७ ॥
मग करी कवळूनि भस्मचिमुटी । स्पर्शास्त्र प्रयोग पोटीं ।
जल्पूनि प्रेरी महीपोटी । तिन्ही दिशा लक्षुनी ॥ ७८ ॥
पुढील मात्र मार्ग ठेवूनि मोकळा । दिशा बंधन केल्या सकळा ।
केल्या परी ऐशा बळा । देवदानवां आतुळेना ॥ ७९ ॥  
केले अर्थ द्व्यथपर । शिष्य पळूनि नाहीं जाणार ।
आणि मारुतीचाही भुभुःकार । पोहोचूं नये त्या ठाया ॥ ८० ॥
ऐसें स्पर्शास्त्र पृष्ठीं । रचूनि शांत बैसला जेठी ।
मग शिष्यां पाचारुनि शेवटीं । पुसता झाला तयासी ॥ ८१ ॥गुरुप
लहान मोठे मेळवून । समुदायासी बैसवून ।
म्हणे आम्हांलागीं जाणें । स्त्रीराज्यांत आहे कीं ॥ ८२ ॥
परी तो देश कठिण । वांचत नाही पुरुषरत्न ।
हनुमंतभुभुःकारेंकरुन । प्राणहानी होतसे ॥ ८३ ॥
पुढें देश बहुत कठिण । परी आम्हांलागीं आहे जाणें ।
 तया देशींचे तीर्थ करुन । येऊं ऐसें वाटतसे ॥ ८४ ॥
आमुचा विश्र्वास गुरुपायीं । जरी असेल भवप्रवाहीं ।
तरी देशाची लंघूनि मही । पुनः येऊं माघारे ॥ ८५ ॥
नातरी सुखें जावो प्राण । परी मनाची धांव घेई पूर्ण ।
तरी तुमचा विचार कवण । तो मजप्रती दर्शवावा ॥ ८६ ॥
जें निःसीम गुरुच्या असती भवतीं । तिहीं धरावी माझी संगती ।
नातरी जीवलोभ असेल चित्तीं । तिहीं जावें माघारें ॥ ८७ ॥
ऐसें सांगूनि बोलावीत । म्हणे देखिली बुद्धि करा येथ ।
मग निःसीम भक्तांचे किंचित । तया ठायी राहिले ॥ ८८ ॥
सातशतांत सात जाण । ठायीं उरले स्थान धरुन ।
वरकड कंबरबस्ती करुन । कल्पिल्या मार्गी चालिले ॥ ८९ ॥
मनांत मानिती सुखवसा । म्हणती तस्कर बुद्धीचा ठसा ।
पळूनि जाता काजळीलेशा । मूर्खत्व येते आपणांसी ॥ ९० ॥
तरी फार बरवें झालें । स्वामीनें अंतर ओळखिलें । 
उजळणीं बोळविले । कीर्तिमाहात्म्य रक्षुनी ॥ ९१ ॥
ऐसा चित्तीं सुखवसा मानून । आले पंथी करिती गमन ।
एक कोस गेले धांवून । सीमेपर्यंत ग्रामाच्या ॥ ९२ ॥
परी स्पर्शास्त्र सीमा लक्षून । बैसलें होतें मही वेष्टून ।
तेणें येतांच धरिलें कवळून । महिसीं दृढ केले ते ॥ ९३ ॥
पद झाले महीं व्यक्त । मागें पुढें ठेवाया नसे शक्त ।
जैसें सावज गुंतल्या चिखलांत । बळ कांहीं चालेना ॥ ९४ ॥
असो झाले महीं व्यक्त । म्हणूनि हस्ते काढूं जात ।
तों हस्त झाले महीं लिप्त । मग सकळ ओणवे झाले ॥ ९५ ॥
येरीकडे कानिफानाथ । त्या सातांतें बोलावूनि घेत ।
जवळ बैसवूनि सकळ वृत्तांत । निवेदिला तयांचा ॥ ९६ ॥
तुम्हीं करावें आतां ऐसें । शीघ्र जाऊनि त्या महीस ।
पाषाण करीं उचलोनि विशेष । तयांच्या पृष्ठीं स्थापावे ॥ ९७ ॥
मग विभक्तास्त्रविभूति । चर्चूनि तयांच्या भाळाप्रति ।
मागूनि पाठविले साती । समाचारा तयांच्या ॥ ९८ ॥
ते तंव श्रीगुरुचे आज्ञेकरुन । पहात चालिले सीमास्थान ।
तरी ते सर्वही ओणवे होऊन । ठायीं ठायीं खुंटले ॥ ९९ ॥
सातांसी पाहूनि अवघ्या मूर्ती । परम चित्ती लज्जित होती ।

अधोवदन करुनि पाहती । परी न देती उत्तर ॥ १०० ॥

ShriNavanath BhaktiSar Adhyay 15 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय पंधरावा ( १५ )


Custom Search

No comments:

Post a Comment