Saturday, March 5, 2016

Shree Navanath Bhaktisar Adhyay 26 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सव्वीसावा (२६) भाग१/२


Shree Navanath Bhaktisar Adhyay 26 
Surochan gandharv had become donkey because of curse by God Indra. Surochan made Mithula Nagari into copper as per wish of king Satyavrat. Hence Surochan married with Satyavati who was daughter of king Satyavrat. Satyavati became mother of a boy who was named as Vikram. After birth of Vikram, Surochan saw his face and became free from the curse and went to swarga. Vikram grew older and from his childhood had all the virtues of a king. He was working as a guard when he heard that Bhartari was telling to the traders. Vikram immediately took his sword and fought with the demon and killed the demon. He carried out everything as told by Bhartari. He took the gems from hands of demon. Vikram thought that Bhartari would be an incarnation and not ordinary man. So he took Bhartari with him to his house. Introduced him to his mother asked Bhartari to live with them. In the next 27th Adhyay Dhundusut Malu from Narahai family would tell us what happened next.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सव्वीसावा (२६) भाग१/२ 
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी कमलापती । सर्वसाक्षी आदिमूर्ती ।
पूर्णब्रह्मा सनातनज्योती । रुक्मिणीपते जगादात्मया ॥ १ ॥
हे दीननाथ दीनबंधू । मुनिजनमानसरंजना कृपासिंधू ।
तरी आतां कथासुबोधू । रसज्ञ शब्दी वदवीं कां ॥ २ ॥
मागिले अध्यायीं कथन । गंधर्व नामीं सुरोचन ।
शक्रशापें गर्दभ होऊन । सत्यवती वरियेली ॥ ३ ॥
तरी ही असो मागील कथा । सिंहावलोकनीं पहा आतां ।
कमठ कुल्लाळ काननपंथा । अवंतिके जातसे ॥ ४ ॥
गंधर्वगर्दभीं संचार वाहोन । स्वदारेसहित सत्यवतीरत्न ।
मार्गीं चालतां मुक्कामोमुक्काम । अवंतिकें पातला ॥ ५ ॥
कुल्लाळगृहीं सदन पाहून । राहते झाले समुच्चयेंकरुन ।
परी सत्यवतीतें सुढाळपणें । कन्येसमान पाळीतसे ॥ ६ ॥
सकळ मोहाचें मायाजाळ । सत्यवतीतें अर्पी कुल्लाळ ।
आसनवसनादि सकळ । इच्छेसमान पाळीतसे ॥ ७ ॥
तों एके दिवशीं सत्यवती । म्हणे ताता कमठमूर्ती ।
मम लग्नातें करुनि पति । माझा मज दावीं कां ॥ ८ ॥
येरी म्हणे वो अवश्य माय । या बोलाचा फेडीन संशय । 
मग रात्रीं अवसर पाहूनि समय । गंधर्वापाशीं पातला ॥ ९ ॥
म्हणे महाराजा पशुपती । कामना वेधली जे तव चित्तीं ।
ती फळासी येऊन निगुती । तुजलागीं पावती झाली ॥ १० ॥
तरी त्या अर्था सुलक्षण । पुढें व्हावें मंगळकारण । 
सत्यवती उत्तम रत्न । वाट पाहे पतीची ॥ ११ ॥
तरी या प्रश्र्नाचें उत्तर देऊन । उभयीं मिरवावें समाधान ।
ऐसें ऐकतां संकटवचन । गंधर्वराज वदतसे ॥ १२ ॥
तरी असो अन्य विधीतें । प्रविष्ट न व्हावें हें लोकांत ।
तरी योजूनि आसुर लग्नांत । सत्यवती स्वीकारुं ॥ १३ ॥
म्हणे महाराजा कमठा ऐक । मंगलविधि नसे एक ।
आसुरविधिपूर्वक । हा सोहळा मिरवीतसे ॥ १४ ॥
ऐसें बोलतां गंधर्वराज । कमठ म्हणे आहे बरवें ।
परी एक संधी उदित भाव । उदय पावला महाराजा ॥ १५ ॥
म्हणे संदेह कवण कैसे । परी आपण वर्ततां पशुऐसे ।
तरी या मिषें संग मनुष्यें । कैसे रीती घडेल कीं ॥ १६ ॥
तरी संदेह फेडूनि माझा । प्रिय करावीं आपुली भाजा ।
ऐसें ऐकूनि कमठ चोजा । उत्तरा उत्तर देतसे ॥ १७ ॥
तो म्हणे महाराजा कमठा ऐक । रत्न सत्यवती अलोलिक ।
ऋतुसमय सत्य दोंदिक । श्रुत करावें आम्हांतें ॥ १८ ॥
तुवां श्रुत केलिया चतुर्थदिनीं एकान्त ठाया ।
तुष्ट करीन गंधर्वीं काया । वरुनियां महाराजा ॥ २० ॥
ऐसी बोलतां गंधर्ववाणी । तुष्ट झाला कमठ मनीं ।
मग स्वधामांत संचरोनी । वृत्तांत कन्येसी निवेदिला ॥ २१ ॥
म्हणे माय वो सत्यवती । कामना जे आहे तव चित्तीं । 
ते ऋतुकाळीं कामाहुती । गंधर्वराज ओपील गे ॥ २२ ॥
आपुल्या स्वरुपा प्रगट करुन । करुं योजितो आसुर लग्न ।
तरी तेंचि वरुनि समाधान । सुखालागीं पावशील ॥ २३ ॥
ऐसें सांगूनि कमठ कुल्लाळ । शयनीं पहुडला उतावेळ ।
ती निशा लोटूनि उदयकाळ । गभस्तीचा पातला ॥ २४ ॥     
तेही लोटल्या दिनोदिन । समय पातला ऋतुकालमान ।
चतुर्थ दिनीं कुल्लाळ जाऊन । श्रुत करी गंधर्वातें ॥ २५ ॥     
म्हणे महाराजा गंधर्वनाथा । योजिला समय आला आतां ।
तरी उभय कामपूर्ण होतां । स्वीकारावें महाराजा ॥ २६ ॥
ऐसें बोलतां कमठ वाणी । वेष गर्दभी तत्क्षणीं ।
स्वस्वरुपा प्रकट करुनी । महींलागीं मिरवला ॥ २७ ॥
मिरवला परी कैसा गभस्ती । वस्त्राभरणीं कनककांती ।
कमठें पाहूनि चित्तसरिती । आनंदतोय हेलावें ॥ २८ ॥
चित्तीं म्हणे भाग्यवंत । मजसमान नाहीं या महींत ।
स्वर्गवासी गंधर्व दैवत । मम गृहीं वर्ततसे ॥ २९ ॥
अहा ती धन्य सत्यवती । बैसलीसे पुण्यपर्वतीं ।    
ऐसा स्वामी जियेतें पती । निजदैवें लाधला ॥ ३० ॥
राहिला परी वर्णनासी मती । नसे बोलावया अनुसंमती ।
स्वर्गफळचि लागलें हाती । सत्यवतीकारणें ॥ ३१ ॥
जैसे अमरां पीयूषदान । आतुडलें मंथनी दैवेंकरुन ।
कीं दानवांत नवनिधिधन । कुबेर लाधला पुण्यानें ॥ ३२ ॥
कीं शिवमोळींचें दृढासन । दैवें लाधला रोहिणीरमण ।
तेवीं गंधर्व सुरोचन । सत्यवती ही लाधली ॥ ३३ ॥
कीं प्रत्यक्ष सूर्यनारायण । पाठीं वाहे श्यामकर्ण । 
तन्न्यायें दैवेंकरुन । सत्यवती लाधली ॥ ३४ ॥      
कीं अब्धिजा दारा कमला नामें । विष्णूसी लाधली दैवेंकरुन ।
तेवीं गंधर्वस्वामी सुरोचन । सत्यवती लाधली ॥ ३५ ॥
ऐसा विस्मय कमठ पोटीं । करीत आहे हर्षें देठीं ।
मग भाळ ठेवूनि चरणसंपुटीं । विनवणी करीतसे ॥ ३६ ॥
म्हणे महाराजा स्वर्गधामका । अहा मी अबुद्ध असें या लोका ।
नेणूनि तव प्रतापआवांका । कष्टविलें पापिष्ठें ॥ ३७ ॥
तव पृष्ठीते ग्रंथिका वाहुनी । गर्दभ भाविला आपुलें मनीं ।
अहंमूढ मी अबुद्धखाणी । आरोहण केलें पापिष्ठें ॥ ३८ ॥
अहा स्वामिया ऐसी कोटी । असूनि मृत्तिका वाहिली पाठीं ।
नेणूनि तूतें केलें कष्टी । मींही दुरात्मा पापिष्ठें ॥ ३९ ॥
अहा कर्म हें अनिवार । आरोहतां तव पृष्ठीवर । 
तैं दुरात्मा मुष्टिप्रहार । करित होतों पापिष्ठ ॥ ४० ॥
तरी ऐसिया अपराधांसी । क्षमा करीं गा दयाराशी ।
ऐसें म्हणोनि पुन्हां चरणांसी । निजमौळी अर्पीतसे ॥ ४१ ॥
मग सुरोचन गंधर्वा हात । धरुनि कमठ सदनीं नेत । 
म्हणे महाराजा स्वकांतेतें । सांभाळावें सर्वस्वीं ॥ ४२ ॥
मग सुरोचन गंधर्वें एकांतासी । पाचारिले सत्यवतीसी ।
येरी येतांचि षोडशोपचारेंसी । गंधर्वराज पूजियेला ॥ ४३ ॥
मग अतिप्रीती संवादस्थितीं । ऐक्यभावानें उभय रमती ।
आसुर-विवाहकामार्थ रती । तुष्ट चित्तीं मिरवला ॥ ४४ ॥
मिरविले परी त्याचि रात्रीं । गर्भ संभवला सत्यवती ।
प्रारब्धयोगें पुत्रवंती । जठरस्थानीं राहिला ॥ ४५ ॥
यापरी गंधर्वराज । म्हणतसे सत्यवतीभाज ।
पुत्रमुखातें पाहिलें चोज । कीं स्वर्गवास करीन मी ॥ ४६ ॥
शक्रशापापासूनि कथा । सत्यवतीतें होय सांगता ।
कथा सांगूनि म्हणे आतां । सुखें क्षेमांत असावें ॥ ४७ ॥
तरी आतां राजबाळी । पुत्र उल्हासील येणें काळीं ।
परी तो पुत्र महाबळी । राज्यासनीं मिरवेल ॥ ४८ ॥
मिरवेल परी धर्मदाता । विक्रम नामीं जगविख्यात ।
धैर्यराशी औदार्यवंत । शककर्ता मिरवेल ॥ ४९ ॥
ऐसा पुत्र तूं चुडामणी । लाधसील वो शुभाननी ।
मी तव ऋणापासूनी । मुक्त झालों सर्वस्वीं ॥ ५० ॥
आतां उरलें शापमोचन । पाहतांचि गे पुत्रवदन ।
अमूल्य स्वर्गसुखा पावेन । स्वस्थानासी जाऊनी ॥ ५१ ॥
यावरी पुढें तूं गोरटी । मम क्षती न करीं आपुले पोटीं ।
विक्रमपुत्र पाळूनि शेवटीं । सकळ सुखा भोगीं कां ॥ ५२ ॥
ऐसें सांगूनि सुरोचन । पुन्हां गर्दभवेष धरुन ।
सवेंचि सेविलें आपुलें ठाण । अंगणांत येऊनियां ॥ ५३ ॥
यापुढें दिवसानु दिवस । गर्भ लागला आहे वाढीस ।
परी लोक पुसती कुल्लाळास । सत्यवती कोण ही ॥ ५४ ॥
येरु म्हणे मम कुमरी । मोहें आणिली आहे माहेरीं ।
गरोदरपण निवटल्यावरी । पुन्हां जाईल स्वसदना ॥ ५५ ॥
ऐसें जगतातें करुनि भाषण । तुष्ट मिरवे सकळांचें मन ।
यापरी तीतें नवमास पूर्ण । गर्भस्थानीं विराजले ॥ ५६ ॥
तों सुलक्ष समयो सुलक्ष तिथी । नक्षत्र करण शुभयोगांतीं । 
चंद्रबळ तारानीती । प्रसूत झाली सुलक्षणी ॥ ५७ ॥
बाळ पाहतां शुभाननी । तेजःपुंज लावण्यखाणी । 
कीं सकळ तेज ओपूनि तरणी । पाहुणचारीं आराधिला ॥ ५८ ॥              
पुढें होतां संस्कारासी । बारसें केले द्वादश दिवसीं ।
पाळणां घालूनि बाळकासी । विक्रम नाम ठेविलें ॥ ५९ ॥
नाम ठेविलें सुदिनास । तों अर्क प्रवर्तला अस्तप्रदेश ।
सुरोचन गर्दभवेष । सांडिता झाला तत्क्षणीं ॥ ६० ॥
मग संचरुनि सदनातें । सत्यवतीतें म्हणे कांते ।
शीघ्र आणीं पाहूं दे बाळकातें । पुत्रमुख या काळीं ॥ ६१ ॥
बैसवोनियां वस्त्रासनीं । सत्यवती देत बाळ आणूनी ।
अंकीं सुरोचन गंधर्व घेऊनी । पुत्रमुख पाहिलें ॥ ६२ ॥
पुत्रमुख पाहतां दृष्टीं । आटूनि गेल्या शापकोटी ।
तों अमरीं जाणविलें शक्रपोटीं । मातलीते पाठविलें ॥ ६३ ॥
विमानारोहण मातली घेवोनि । येता झाला अवंतिकास्थानीं ।
शीघ्र द्वारीं आसन ठेवोनी । सदनामाजी संचरला ॥ ६४ ॥
तों सुरोचन गंधर्व बाळ घेऊन । परम स्नेहानें घेत चुंबन ।
तो मातली सन्निध उभा राहून । बोलता झाला गंधर्वातें ॥ ६५ ॥
म्हणे महाराजा सुरोचन । मज पाठविलें पाकशासनें ।
तरी आतां आरुढोनि विमाना । अमरस्थानीं चलावें ॥ ६६ ॥
आतां सोडूनि पुत्रमोहातें । चला वेगीं देवनाथ ।
अहा वाट आपुली पहात । शापमोचन जाहलिया ॥ ६७ ॥
ऐसें बोलतां मातली वचन । सत्यवतीतें बाळक ओपून ।
म्हणे कांते समाधान । ठेवी आतां जातो आम्ही ॥ ६८ ॥
ऐसें बोलतां सत्यवती । म्हणे महाराजा गंधर्वपती । 
बाळ तान्हुलें टाकूनि क्षितीं । कैसें जातां महाराजा ॥ ६९ ॥
तुम्ही गेलिया सोडूनि मातें । कोण आहे मम देहातें ।
निढळपणीं परदेशातें । सोडूनि कैसें जातां जी ॥ ७० ॥
ऐसें म्हणोनि सत्यवती । हंबरडा फोडिला वृत्तीं ।
अश्रु भरुनि नेत्रपातीं । दुःखसरिता लोटतसे ॥ ७१ ॥
म्हणे महाराजा तुजकारण । जनक माझा सत्यवर्मा जाण ।
तुटला आहे निर्लोभ होऊन । कैसें सोडून मज जातां ॥ ७२ ॥
अहा महाराजा तुम्हांसाठीं । सर्व सोडूनि भांडारकोटी ।
जनकजननींची पाडूनि तुटी । जोड केली म्या तुमची ॥ ७३ ॥      
तरी आतां मज सोडून । तुम्ही जातां निढळवाण (निष्ठूरपणें) ।
मातें करोनि दीनपण । योग्य तुम्हां दिसेना ॥ ७४ ॥
ऐसें बोलतां सत्यवती । हृदयीं धरी सुरोचन पती । 
चुंबन घेऊनि अश्रु वाहती । पुसोनियां वदतसे ॥ ७५ ॥
ऐकें युवती शुभाननी । तुज स्मरण होतां माझें मनीं ।
त्याचि वेळां उतरुनि अवनीं । भेटी देईन तूतें गे ॥ ७६ ॥
ऐसें देऊनि भाष्यउत्तर । शांतविलें युवतीअंतर । 
मग आरोहूनि विमानावर । कमठास पुसोनि निघाला ॥ ७७ ॥
सत्यवतीचा धरुनि तैं हस्त । कमठा ओपूनि मोहित ।
म्हणे तनयाचा मम सांप्रत । सांभाळ करीं महाराजा ॥ ७८ ॥
ऐसें वदोनि सुरोचन । पाहता झाला शक्रस्थान । 
येरीकडे बाळ तान्हें । वयोवर्धन होतसे ॥ ७९ ॥
दिवसानुदिवस होतां थोर । सप्तवर्षीं झाला कुमार ।
मग मुलांसीं खेळता झाला सत्वर । राजचिन्हीं खेळतसे ॥ ८० ॥
ऐसें खेळतां मुलांत । द्वादश वर्षें लोटलीं त्यांत । 
ईर्षें पडोनि बाळखेळांत । विद्येलागीं लागला ॥ ८१ ॥  
विद्या तरी सहजचिन्हीं । शास्त्रआधार अश्र्वारोहणी ।
सहज सेवकाश्रयेंकरुनीं । विद्येलागीं अभ्यासी ॥ ८२ ॥
सहज मग तों विद्येकारणीं । ओळखी पडली राजांगणीं ।
राजमंडळी सर्व प्राणी । विक्रमातें ओळखिती ॥ ८३ ॥
पुढें षोडश वर्षावरुतें । इष्टत्वें भेटविला विक्रमरायातें ।
पाइक चाकरी अर्पूनि यातें । ग्रामरक्षणीं ठेविलें ॥ ८४ ॥
ग्रामरक्षण दरवाजावरती । पहारा गाजवूनि गाजवी राती  ।
तों व्यवसायी बाजारक्षितीं । तेथें येऊनि राहिले ॥ ८५ ॥
तयांमाजी भर्तरीनाथ । वनचरसावजी भाषा जाणत ।
कोल्हे भुंकतांचि अकस्मात । भाषा सांगे तयांची ॥ ८६ ॥
म्हणे उत्तरदिशेहूनि दानव । निर्बळपणीं होऊनि मानव ।
दक्षिणदिशेचा धरुनि गौरव । जात आहे पांथिक तो ॥ ८७ ॥
तरी त्याच्या सामोरें जाऊन । वधील कोणी तयाकारण ।
वधिल्या ग्रामद्वारा पूर्ण । रुधिरटिळा रेखावा ॥ ८८ ॥
आणि दुसरें आपुलें भाळा । तेचि क्षणीं रेखिजे टिळा ।
तो अवंतिका उत्तमस्थळा । नृपत्वातें मिरवेल ॥ ८९ ॥
ऐसी ऐकतां भर्तरीवाणी । विक्रम जातसे शस्त्र घेऊनि । 
येथपर्यंत कथा रंजनी । पूर्व अध्यायीं वदलीसे ॥ ९० ॥
तरी श्रोते बुद्धिवान । पाहती सिंहावलोकन ।
चित्रमा गंधर्व शापोन । राक्षसदेहीं मिरवला ॥ ९१ ॥
मिरवला परी शापमोचन । बोलिला वरदें शाप सघन ।
तों ती घडी निटावून । रांगत फिरत ये वेळा ॥ ९२ ॥
तरी शापवचनीं शापमोचन । शिववरदें शाप सघन ।
बोलिला असे त्रिनयन । कीं शापें गंधर्व सुरोचन राहिला कीं ॥ ९३ ॥
तयाच्या वीर्येकरोन । निर्माण होईल विक्रमनंदन ।
त्याच्या हस्तें पावोनि मरण । राक्षसशरीरा सांडसी तूं ॥ ९४ ॥
ऐसा उश्याप शिववरदेसीं । होतां चित्रमा गंधर्वासी ।
तो समय भर्तरीवागुत्तरासी । येवोनियां झगटला ॥ ९५ ॥
असो ही मागील कथा । विक्रम भर्तरीचें शब्द ऐकतां ।
शस्त्र सज्जोनि सामोरा पंथा । चित्रमा गंधर्वा होतसे ॥ ९६ ॥   
तंव चित्रमा गंधर्व । राक्षसापरी करोनि भाव ।
मानवरुप धरुनि स्वभावें । येत आहे पांथिक तो ॥ ९७ ॥
येत आहे परंतु चार । अमूल्य रत्नें तेज अपार । 
मुष्टीं घेऊनि राक्षस थोर । मानववेषें गमतसे ॥ ९८ ॥
तों विक्रम जाऊनि तया निकटीं । शस्त्रविद्येतें विपुल जेठी ।
सामोरा होऊनि मौळीं दृष्टीं । असिलतेसी प्रेरीतसे ॥ ९९ ॥
सकळ प्रहार भेदितां धायीं । राक्षस उलथोनि पडला महीं । 
प्राण कासावीस होऊनि देहीं । पडता झाला तत्काळ ॥ १०० ॥
Shree Navanath Bhaktisar Adhyay 26  श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सव्वीसावा (२६) 



Custom Search

No comments:

Post a Comment