Sunday, December 4, 2016

Samas 2 दासबोध दशक १ समास २ गणेशस्तवन

Dashak Pahila Samas Dusara Ganesh Stavan 
This is the prayer of God Ganesh by Samarth Ramdas for helping and making him free from all the troubles, difficulties while writing Dasbodh. He has described many virtues of God Ganesh to please the God. He is describing the God Ganesh how he looks, what he does and how he blesses. It is the praise of God Ganesha by Samarth Ramdas.
समास दुसरा गणेशस्तवन 
श्रीराम ॥
ॐ नमो जि गणनायेका । सर्वसिद्धिफळदायेका ।
अज्ञानभ्रांतिछेदका । बोधरुपा ॥ १ ॥
मराठी अर्थ
१) सर्व सिद्धींची फळें देणारा, अज्ञान दूर करणारा, भ्रम नाहींसा करणारा, आणि ज्ञानस्वरुप, ओंकाररुप जो गणपति त्याला मी नमस्कार करतो.
माझिये अंतरीं भरावें । सर्वकाळ वास्तव्य करावें ।
मज वाग्सुंन्यास वदवावें । कृपाकटाक्षेंकरुनी ॥ २ ॥
२) गणपतीनें माझें अंतःकरणी वास्वव करुन आपल्या कृपाकटाक्षाने ग्रंथ वदविण्यास मला मुक्याला बळ द्यावे. 
तुझिये कृपेचेनि बळें । वितुळती भ्रांतीचीं पडळें ।
आणी विश्र्वभक्षक काळें । दास्यत्व कीजे ॥ ३ ॥
३) त्याच्या कृपेच्या सामर्थ्याने भ्रम व अज्ञान यांचें आवरण विरुन जातें आणि सारें विश्व गिळून टाकणारा काळ आपला गुलाम बनतो. 
येतां कृपेची निज उडी । विघ्नें कांपती बापुडीं ।
होऊन जाती देशधडी । नाममात्रें ॥ ४ ॥ 
 ४) अशी त्याची कृपा झाली की संकटें भयाने थरथर कापूं लागतात. तसेच त्याच्या नामस्मरणाने ती नाहींशी होऊन जातात.
म्हणौन नामें विघ्नहर । आम्हां अनाथांचें माहेर । 
आदिकरुनि हरीहर । अमर वंदिती ॥ ५ ॥
५) म्हणून त्याला विघ्नहर म्हणतात. आम्हां अनाथांचे ते माहेर आहे. विष्णू व शंकर त्याला नमस्कार करतात.
वंदूनियां मंगळनिधी । कार्य करितां सर्वसिद्धी ।
आघात अडथळें उपाधी । बाधूं सकेना ॥ ६ ॥
६) जगांत जें मंगळ आहे ते तो आहे. त्याला नमस्कार करुन कार्य केल्यास ते सिद्ध होते. अडथळें, अडचणी किंवा संकटे यांचा त्रास होत नाही.
जयाचें आठवितां ध्यान । वाटे परम समाधान । 
नेत्रीं रिघोनियां मन । पांगुळें सर्वांगी ॥ ७ ॥
७) त्याचे रुप, ध्यान आठविल्यावर समाधान वाटते. मन डोळ्यांमध्ये अवतरुन बाकी सर्व क्रिया बंद करुन ते रुप पाहू लागते.  
सगुण रुपाची टेव  माहा लावण्य लाघव । 
नृत्य करितां सकळ देव । तटस्त होती ॥ ८ ॥
८) ते गणेशाचे सगुण रुप विलक्षण आहे. तो नाचू लागला कीं सगळे देव नुसते पाहातच बसतात.
सर्वकाळ मदोन्मत्त । सदा आनंदे डुल्लत ।
हरुषें निर्भर उद्दित । सुप्रसन्नवदनु ॥ ९ ॥
९) त्याच्या गंडस्थळांतून सारखा मद गळत असतो. म्हणून जेव्हां पहावे तेव्हां तो मस्त दिसतो, परमानंदाने नेहमी डोलत असतो. आंतून येणार्‍या आनंदाच्या उर्मींनी त्याचे मुख प्रसन्न असते.
भव्यरुप वितंड । भीममूर्ति महा प्रचंड ।
विस्तीर्ण मस्तकीं उदंड । सिंधूर चर्चिला ॥ १० ॥
१०) तो रुपाने भव्य आणि धिप्पाड आहे. देहाने प्रचंड शक्तिमान आहे. त्याच्या विस्तीर्ण कपाळी शेंदूर विलसत आहे.
नाना सुगंध परिमळें । थवथवां गळती गंडस्थळें । 
तेथें आली षट्पदकुळें । झुंकारशब्दें ॥ ११ ॥
११) त्याच्या गंडस्थळांतून थबथबा गळणार्‍या मदाने व त्या मदाच्या सुगंधी वासाने भुंगे घूं घूं आवाज करीत तेथे जमा होतात.
मुर्डीव शुंडादंड सरळे । शोभे अभिनव आवाळें ।
लंबित अधर तिक्षण गळे । क्षणक्ष्णा मंदसत्वी ॥ १२ ॥
१२) एखाद्या सोटासारखी त्याची सोंड सरळ, मुरडलेली किंवा कधी गुंडाळलेली असते. कपाळावर दोन आवाळे आहेत. खालचा ओठ लोंबलेला व त्यांतून उग्र गंधाचा मद क्षणक्षणाला गळत आहे.
चौदा विद्यांचा गोसांवी । हरस्व लोचन ते हिलावी ।
लवलवित फडकावी । फडै फडै कर्णथापा ॥ १३ ॥
१३) हा चौदा विद्यांचा स्वामी आहे. डोळे लहान व त्यांची सारखी उघडझाप चाललेली असते. लांबरुंद असलेले लवचिक कान सारखे फडफड आवाज करीत फडकवीत असतो.            
रत्नखचित मुगुटीं झळाळ । नाना सुरंग फांकती कीळ ।
कुंडलें तळपती नीळ । वरी जडिले झमकती ॥ १४ ॥
१४) त्याच्या मुगुटांत सुंदर रंगांची रत्नें आहेत. ती तेजानें झळकतात. त्यांचे सुंदर रंग आजुबाजुला प्रकाशतात. गणपतीच्या कानांतील कुंडलें चमकतातच पण त्यांत बसविलेले नीळमणी जास्त प्रकाश सोडतात.
दंत शुभ्र सइट । रत्नखचित हेमकट्ट ।
तया तळवटीं पत्रें नीट । तळपती लघु लघु ॥ १५ ॥
१५) त्याचे दांत पांढरे व घट्ट आहेत. त्याला रत्नखचित सोन्याचें कडें आहे. त्याखाली सोन्याची लहान पानें चमकत आहेत.
लवथवित मलये दोंद । वेष्टित कट्ट नागबंद ।
क्षुद्र घंटिका मंद मंद । वाजती झणत्कारें ॥ १६ ॥   
१६) त्याचे मोठे पोट हलत असते. कमरेला सजीव नाग कमरपट्यासारखा बांधलेला आहे. कमरेच्या साखळीला असलेली घुंगुरे मंद मंद आवाजांत झणत्कारत आहेत.  
चतुर्भुज लंबोदर । कासे कासिला पीतांबर । 
फडके दोंदिचा फणीवर । धुधूकार टाकी ॥ १७ ॥
१७) त्याला चार हात आहेत. त्याचे पोट सुटलेले आहे. कमरेला पीतांबर आहे. पोटावरचा नाग फणा काढून फुत्कारत आहे.
डोलवी मस्तक जिव्हा लाळी । घालून बैसला वेटाळी ।
उभारोनी नाभिकमळीं । टकमकां पाहे ॥ १८ ॥
१८) तो जिभल्या चाटत फणा काढून डोलतो. कमरेला वेढा घालून तो नाग बेणबीपाशी फणा काढून टकमका बघत आहे. 
नाना याति कुशममाळा । व्याळपरियंत रुळती गळा ।
रत्नजडित हृदयकमळा । वरी पदक शोभे ॥ १९ ॥
१९) नाना प्रकारच्या फुलांच्या माळा गणपतीच्या गळ्यांत असून त्या कमरेपर्यंत लोंबत आहेत. हृदयावर रत्नजडित पदक शोभत आहे.
शोभे फरश आणि कमळ । अंकुश तिक्षण तेजाळ ।
येके करीं मोदकगोळ। तयावरी अति प्रीति ॥ २० ॥
२०) चार हातांपैकी एका हातांत परशु, दुसर्‍यांत कमळ तर तिसर्‍या हातांत टोकदार अंकुश व चवथ्या हातांत अतिशय आवडणारा गोल मोदक आहे.
नट नाट्य कळा कुंसरी । नाना छंदें नृत्य करी ।
टाळ मृदांग भरोवरी । उपांग हुंकारे ॥ २१ ।
२१) नाना प्रकारचे हावभावयुक्त कलाकौशल्याने तो टाळ व मृदंग यांच्या तालावर तो नृत्य करतो. मधुनच हुंकार भरतो.
स्थिरता नाहीं येक क्षण । चपळविशंई अग्रगण ।
साजिरी मूर्ति सुलक्षण । लावण्यखाणी ॥ २२ ॥
२२) गणपति क्षणभरसुद्धा स्थिर नसतो. चपळपणांत तो अग्री आहे. त्याची सौंदर्यवान मूर्ति मोठी सुंदर व देखणी दिसते आहे. 
रुणझुणा वाजती नेपुरें । वांकी बोभाटती गजरें ।
घागरियासहित मनोहरें । पाउलें दोनी ॥ २३ ॥
२३) त्या गणेशाच्या पायांतील पैंजणें रुणुझुणु असा गोड आवाज करत आहेत. वाकींचाही मोठा मधुर आवाज होतो. घुंघरु असलेली त्याची पाऊले मनोहर दिसतात.
ईश्र्वरसभेसी आली शोभा । दिव्यांबरांची फांकली प्रभा ।
साहित्यविशईं सुल्लभा । अष्ट नायका होती ॥ २४ ॥
२४) ईश्र्वराच्या सभेंत गणपति शोभा निर्माण करतो. त्याच्या वस्त्रांचे दिव्य तेज सर्वत्र फाकते. अष्टनायिका त्याच्या सान्निध्यांत साहित्य निर्माण करणारास साह्यभूत होतात.
ऐसा सर्वांगें सुंदरु । सकळ विद्यांचा आगरु ।
त्यासी माझा नमस्कारु । साष्टांग भावें ॥ २५ ॥
२५) असा हा गणपति सर्वांगाने सुंदर आहे. तो सर्व विद्यांचे आगर आहे. त्याला मी साष्टांग नमस्कार करतो.
ध्यान गणेशाचें वर्णितां । मतिप्रकाश होये भ्रांता ।
गुणानुवाद श्रवण करितां । वोळे सरस्वती ॥ २६ ॥
२६) गणेशाच्या रुपाचे चिंतन अज्ञानी माणसाच्या बुद्धिंत ज्ञानाचा उगम करते. त्याच्या गुणांचे वर्णन ऐकले की ते ऐकणारास सरस्वती प्रसन्न होते.
जयासी ब्रह्मादिक वंदिती । तेथे मानव बापुडे किती ।
असो प्राणी मंदमती । तेहीं गणेश चिंतावा ॥ २७ ॥
२७) ज्याला ब्रह्मदेवासारखे देवसुद्धा नमस्कार करतात, त्याच्यापुढे मनुष्याला काय किंमत, तरीसुद्धा अल्प, मंदबुद्धि  माणसाने गणपतिची उपासना व चिंतन करावे. 
जे मूर्ख अवलक्षण । जे कां हीणाहूनि हीण ।
तेचि होती दक्ष प्रविण । सर्वविशईं ॥ २८ ॥
२८) जे अवलक्षणी, हीन असतात ते हुशार व सर्व विषयांत प्रवीण होतात.
ऐसा जो परम समर्थ । पूर्ण करी मनोरथ ।
सप्रचीत भजन स्वार्थ । कल्लौ चंडीविनायेकीं ॥ २९ ॥
२९) असा परम समर्थ गणपति मनोरथ पूर्ण करणारा आहे. स्वानुभवाचा स्वार्थ साधकाला देणारा गणपति व देवी या कलीयुगांतील मुख्य देवता मानतात.
ऐसा गणेश मंगळमूर्ती । तो म्या स्तविला येथामती ।
वांछ्या धरुन चित्तीं । परमार्थाची ॥ ३० ॥
३०) माझ्या मनांतील परमार्थाची इच्छा पुरी व्हावी म्हणून माझ्या बुद्धीनुसार मी गणेशाचे, मंगळमूर्तिचे स्तवन केले आहे.   
॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गणेशस्तवननाम समास दुसरा ॥            

Dasbodha Dashak 1 Samas 2
दासबोध दशक १ समास २ गणेशस्तवन





Custom Search

No comments:

Post a Comment