Wednesday, December 28, 2016

Samas Chavatha Bhakti Nirupan समास चवथा भक्ति निरुपण


Dashak Dusara Samas Chavatha Bhakti Nirupan 
Samas Chavatha Bhakti Nirupan is in Marathi. Samarth Ramdas is telling about Bhakti in this Samas. How we can make best use of this body of the man, which we have received in this birth. It is not easy to get a man’s body. After many many births in the past; we have got it. We have to worship the God, visit holy places, give donations, to be in the good company, serve the guru, try to acquire as many good virtues as possible, avoid to be in the company of bad people and there are many such things described here, which really makes us a spiritual person.
समास चवथा भक्ति निरुपण  
श्रीराम ॥
नाना सुकृताचें फळ । तो हा नरदेह केवळ ।
त्याहि मधें भाग्य सफळ । तरीच सन्मार्ग लागे ॥ १ ॥
अर्थ
१) जन्मोजन्मी जी सत्कृत्यें केली त्यांचे फळ म्हणुन नरदेह मिळाला. त्यांतही भाग्य चांगले असेल तर माणुस सन्मार्गाला लागतो.
नरदेहीं विशेष ब्राह्मण । त्याहि वरी संध्यास्नान ।
सद्वासना भगवद्भजन । घडे पूर्वपुण्यें ॥ २ ॥
२) सर्वांत आधी नरदेह मिळाला. तोही स्नानसंध्या करणार्‍या सद्वासना असलेल्या ब्राह्मणाचा जो भगवंताचे भजन, भक्ती करणारा असा योग पूर्वपुण्यानेच घडतो. 
भगवद्भक्ति हे उत्तम । त्याहि वरी सत्समागम ।
काळ सार्थक हाचि परम । लाभ जाणावा ॥ ३ ॥
३) भगवंताची भक्ती करणे उत्तमच त्याबरोबर संतांचा, चांगल्या लोकांचा सहवास, यामुळे आयुष्याचे सार्थक होते. असा हा अलभ्य लाभच जाणावा.
प्रेमप्रीतीचा सद्भाव । आणी भक्तांचा समुदाव । 
हरिकथा मोहोत्साव । तेणें प्रेमा दुणावे ॥ ४ ॥
४) अंतरी भगवंतावर अनन्य प्रेम, भक्ती हा भाव आणि बाहेर भक्तांचा समुदाय यामुळे मोठमोठे भगवंताचे महोत्सव, हरिकथा वगैरे होऊन भगवंताविषयी प्रेमभाव वृद्धिंगत होतो.
नरदेहीं आलियां येक । कांही करावें सार्थक ।
जेणें पाविजे परलोक । परम दुल्लभ जो ॥ ५ ॥
५) आपल्याला नरदेह मिळाला आहे, म्हणून त्याचे सार्थक असे करुन घ्यावे की, ज्यामुळे अत्यंत दुर्लभ अशा परलोकाची प्राप्ती होईल.    
विधियुक्त ब्रह्मकर्म । अथवा दया दान धर्म ।
अथवा करणें सुगम । भजन भगवंताचें ॥ ६ ॥
६) यथासांग ब्रह्मकर्म करावे, किंवा दयाभावाने वागावे, दान,धर्म करावा. किंवा अतिशय सोपे असे भगवंताचे भजन भक्तीभावाने करावे.
अनुतापें करावा त्याग । अथवा करणें भक्तियोग ।
नाहीं तरी धरणें संग । साधुजनाचा ॥ ७ ॥  
७) पश्चातापाने (विरक्त होऊन) संसाराचा त्याग करावा. किंवा भक्तीपंथाचा मार्ग धरावा. किंवा मग संत, साधुजनांच्या सहवासांत रहावे.
नाना शास्त्रें धांडोळावीं । अथवा तीर्थे तरी करावीं ।
अथवा पुरश्र्चरणें बरवीं । पापक्षयाकारणें ॥ ८ ॥
८) नाना शास्त्रांचा सखोल अभ्यास करावा. नाहीतर तीर्थयात्रा कराव्या. किंवा पुरश्चरणे करावीत. हे सर्व कशासाठी तर आपण जन्मोजन्मी केलेल्या पापांचा क्षय व्हावा म्हणुन करावे. 
अथवा कीजे परोपकार । अथवा ज्ञानाचा विचार ।
निरुपणीं सारासार । विवेक करणें ॥ ९ ॥
पाळावी वेदांची आज्ञा । कर्मकांड उपासना ।
जेणें होईजे ज्ञाना । अधिकारपात्र ॥ १० ॥
९-१०) परोपकार तरी करावा. किंवा ज्ञानमार्ग पकडावा. किंवा सत्पुरुषांकडून ऐकलेल्या प्रवचनांतील सारासार पहावें. वेदांची आज्ञा पाळावी, कर्मकाण्ड, उपासना करावी की, ज्यामुळे योग्य व उत्तम ज्ञान प्राप्त करुन घेण्याचा अधिकार प्राप्त होतो. पात्रता वाढते. 
काया वाचा आणि मनें । पत्रें पुष्पें फळें जीवनें ।
कांहीं तरी एका भजनें । सार्थक करावें ॥ ११ ॥
११) परमेश्र्वराचे कायेने, वाचेने मनापासून पुष्प, पान,फळ, किंवा पाणी याने पूजन करावे आणि (जन्माचे) सार्थक करुन घ्यावे.   
जन्मा आलियाचें फळ । कांहीं करावें सफळ ।
ऐसें न करितां निर्फळ । भूमिभार होये ॥ १२ ॥
१२) जन्माला आलो आहो म्हणून काहींतरी चांगले (भजन, पूजन, किर्तन आदी) करुन पदरी पुण्य जमा करुन घ्यावें. असे केले नाहीतर जन्माला येऊन केवळ भूमिभार झालो असे होईल.
नरदेहाचें उचित । कांहीं करावें आत्महित । 
यथानुशक्त्या चित्तवित्त । सर्वोत्तमीं लावावें ॥ १३ ॥
१३) (दुर्लभ) नरदेहाचा काहींतरी उचीत उपयोग करुन घेऊन आत्महीत करुन घ्यावे. आणि आपल्या शक्तिनुसार चित्त, वित्त यांचा उपयोग सर्वोत्तम करण्याकडे करावा. ज्यायोगे स्वहीत (आत्महीत) साधेल.
हें कांहींच न धरी जो मनी । तो मृत्यप्राय वर्ते जनीं ।
जन्मा येऊन तेणें जननी । वायांच कष्टविली ॥ १४ ॥
१४) याचा मनांत काहींच विचार न करता, जो लोकांत जिवंत असूनही केवळ  मृतप्राय होऊनच वावरतो. त्याने जन्माला येऊन उगाचच आईला कष्टविले असे होते.
नाहीं संध्या नाहीं स्नान । नाहीं भजन देवतार्चन ।
नाहीं मंत्र जप ध्यान । मानसपूजा ॥ १५ ॥ 
नाहीं भक्ति नाहीं प्रेम । नाहीं निष्ठा नाहीं नेम ।
नाहीं देव नाहीं धर्म । अतीत अभ्यागत ॥ १६ ॥
नाहीं सद्बुद्धि नाहीं गुण । नाहीं कथा नाहीं श्रवण ।
नाहीं अध्यात्मनिरुपण । ऐकिलें कदा ॥ १७ ॥
नाहीं भल्यांची संगती । नाहीं शुद्ध चित्तवृत्ती ।
नाहीं कैवल्याची प्राप्ती । मिथ्यामदें ॥ १८ ॥
नाहीं नीति नाहीं न्याये । नाहीं पुण्याचा उपाये ।
नाहीं परत्रीची सोये । युक्तायुक्त क्रिया ॥ १९ ॥
नाहीं विद्या नाहीं वैभव । नाहीं चातुर्याचा भाव ।
नाहीं कळा नाहीं लाघव । रम्यसरस्वतीचें ॥ २० ॥  
शांती नाहीं क्ष्मा नाहीं । दीक्षा नाहीं मीत्रीं नाहीं ।
शुभाशुभ कांहींच नाहीं । साधनादिक ॥ २१ ॥
सुचि नाहीं स्वधर्म नाहीं । आचार नाहीं विचार नाहीं ।
आरत्र नाहीं परत्र नाहीं । मुक्त क्रिया मनाची ॥ २२ ॥
कर्म नाहीं उपासना नाहीं । ज्ञान नाहीं वैराग्य नाहीं ।
योग नाहीं धारिष्ट नाहीं । कांहींच नाहीं पाहातां ॥ २३ ॥ 
उपरती नाहीं त्याग नाहीं । समता नाहीं लक्षण नाहीं ।
आदर नाहीं प्रीति नाहीं । परमेश्र्वराची ॥ २४ ॥
परगुणाचा संतोष नाहीं । परोपकारें सुख नाहीं ।
हरिभक्तीचा लेश नाहीं । अंतर्यामीं ॥ २५ ॥
ऐसे प्रकारीचे पाहातां जन । ते जीतचि प्रेतासमान ।
त्यांसीं न करावें भाषण । पवित्र जनीं ॥ २६ ॥
पुण्यसामग्री पुरती । तयासीच घडे भगवद्भक्ती ।
जे जे जैसें करिती । ते पावती तैसेंचि ॥ २७ ॥
१५-२७) असा तो माणूस कसा तर- स्नान-संध्या नाही, भजन किंवा देव-पूजाही नाही. मंत्र, जप, ध्यान किंवा मानसपूजाही करत नाही. त्याच्याजवळ भक्ति किंवा प्रेमभावही नसतो. सद्बुद्धि नसल्याने चांगले गुणांचाही अभाव, भगवत् कथा, पुराण यांचे श्रवणही करत नाही. अध्यात्म निरुपणही कधिच ऐकत नाही. भल्या लोकांची संगत नसते. चित्तशुद्ध नसते. खोट्या दंभाने,  मोक्षप्राप्ती कशी होणार ? त्याला नीति-न्यायाची चाड नसते. काही पुण्याचे काम करत नाही. परलोकाची प्राप्ती करुन घेण्याचा काही उपाय करत नाही. विद्या नसते तसेच त्याच्याजवळ वैभवही नसते. चातुर्य, कला, सरस्वतीचा वाग्विलास यापैकी काहींच नसते. शांती, क्षमा, दया, दीक्षा, मैत्री, शुभाशुभाचा विवेक-विचार नाही. कोठचेही साधन करत नाही. 
शुद्धता, स्वधर्माप्रमाणे वागणे नाही. योग्य आचार-विचार यांचा अभाव असतो. मनांत येईल त्याप्रमाणे स्वच्छंद वर्तणुक असते. कर्म, उपासना, ज्ञान, वैराग्य, योग किंवा धारिष्ट यापैकी काहींच नसते. असल्या वागण्याची उपरतिही नसते. त्याग नसतो. समता, परमेश्र्वराबद्दल आदर, प्रेम काहींच नसते. दुसर्‍याचे गुण पाहून आनंद होत नाही. परोपकार करत नाही त्यामुळे त्याचे सुख नाही. भगवंताच्या भक्तिचा लेशसुद्धा अंतर्यामी नसतो. अशा प्रकारचे लोक म्हणजे जिवंतअसून मेल्यासारखेंच असतात. त्या लोकांशी पवित्र लोकांनी बोलूसुद्धा नये. ज्याच्याजवळ पूर्वपुण्याई आहे त्यालाच भगवत्भक्ति घडते. जे जे जसे जसे कर्म करतात त्यांना तसे तसेच फळ मिळते. 

॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे भक्तिनिरुपणनाम समास चवथा ॥   
Samas Chavatha Bhakti Nirupan 
समास चवथा भक्ति निरुपण  


Custom Search

No comments:

Post a Comment