Wednesday, December 14, 2016

Samas Satava Kaveshwar Stavan समास सातवा कवेश्र्वरस्तवन


Dashak Pahila Samas Satava Kaveshwar Stavan 
Samas Satava Kaveshwar Stavan is in Marathi. Samarth is now praising the poets. These poets are with their unlimited imagination create many things. They create Gods in beautiful forms, describe and unable people to believe and devote the Gods. Samarth says that in ancient times there were Vyas, Valmiki and many great poets, there are many at present and there will be many in future. He is bowing these poets at the end of this Seventh Samas of Dasbodh.
समास सातवा कवेश्र्वरस्तवन 
श्रीराम ॥
आतां वंदू कवेश्र्वर । शब्दसृष्टीचे ईश्र्वर । 
नातरी हे परमेश्र्वर । वेदावतारी ॥ १ ॥
अर्थ
१) मी आतां थोर कवींना नमस्कार करतो. ते शब्दसृष्टीचे जणूं ई्श्र्वरच असतात. हा ईश्र्वर वेदरुपानेच अवतरलेला आहे. 
कीं हे सरस्वतीचें निजस्थान । कीं हे नाना कळांचे जीवन ।
नाना शब्दांचे भुवन । येथार्थ होये ॥ २ ॥
२) कवि म्हणजे प्रत्यक्ष सरस्वतीचे स्वगृहच होय. ते निरनिराळ्या कला जीवंत ठेवतात. निरनिराळ्या शब्दांचे ते घरच होत. 
कीं हे पुरुषार्थाचें वैभव । कीं हे जगदेश्र्वराचे महत्व ।
नाना लाघवें सत्कीर्तीस्तव । निर्माण कवी ॥ ३ ॥
३) कवी हे पुरुषार्थाचे वैभवच आहेत. ते परमेश्र्वराचे महत्व कृतीने सांगत असतात. निरनिराळ्या प्रकारे परमेश्र्वराची, संताची ते कीर्ति गात असतात.
कीं हे शब्दरत्नाचे सागर । कीं हे मुक्तांचें मुक्त सरोवर ।
नाना बुद्धीचे वैरागर । निर्माण जाले ॥ ४ ॥   
४) कवी हे शब्दरुपी रत्नांचे सागरच होत. त्यांच्यांत मुक्त प्रतिभेचे सरोवरच असते. असेच हे कलावंत किंवा कवी बुद्धीचातुर्याने वेगळे वेगळे खेळ करतात.
अध्यात्मग्रंथांची खाणी । कीं हे बोलिले चिंतामणी ।
नाना कामधेनूचीं दुभणीं । वोळलीं श्रोतयांसी ॥ ५ ॥
५) ते अध्यात्म ग्रंथांची खाणच असतात. ते वाक्चातुर्याने जणु बोलके चिंतामणीच असतात. कामधेनुचे जणु दुधच ते आपल्या श्रोत्यांना पाजतात.
 कीं हे कल्पनेचे कल्पतरु । कीं हे मोक्षाचे मुख्य पडीभरु ।
नाना सायोज्यतेचे विस्तारु । विस्तारले ॥ ६ ॥
६) हे जणु कल्पनेचे कल्पतरुच असतात. कारण मोक्ष मिळवुन देणार्‍या कल्पनेचा, प्रतिभेचा साठा त्यांच्यात असतो. सायोज्यमुक्तीचा त्यांच्या ठिकाणी विस्तार झालेला असतो.
कीं हा परलोकींचा निजस्वार्थु । कीं हा योगियांचा गुप्त पंथु ।
नाना ज्ञानियांचा परमार्थु । रुपासि आला ॥ ७ ॥
७) हा परलोकाचा (परलोक मिळवून देणारा) निजस्वार्थ, किंवा योगी साधकांचा गुप्तपंथ, किंवा ज्ञानाने परमार्थाची साधना करणाराचाच जणु जन्म झालेला असतो.
कीं हे निरंजनाची खूण । कीं हे निर्गुणाची वोळखण ।
मायाविलक्षणाचें लक्षण । ते हे कवी ॥ ८ ॥
८) कवी म्हणजे निरंजन दर्शविणारी खूणच, किंवा निर्गुण दर्शनाची ओळख करुन देणारी, मायेच्या खेळाचे लक्षण दर्शविणारे असे हे कवी असतात.
कीं हा श्रुतीचा भावगर्भ । कीं हा परमेश्र्वराचा अलभ्य लाभ ।
नातरी होये सुल्लभ । निजबोध कविरुपें ॥ ९ ॥
९) ते श्रुतीचा भाव उलगडतात, परमेश्र्वराचा लाभ मिळवण्याचा मार्ग दर्शवितात हे कवीमुळे सोपे होते.
कवि मुमुक्षाचें अंजन । कवि साधकांचें साधन । 
कवि सिद्धांचें समाधान । निश्र्चयात्मक ॥ १० ॥
१०) कवींची प्रतिभा मुमुक्षुंसाठी अंजनासारखी, तर साधकांसाठी एक साधनच दर्शविणारी व सिद्धांसाठी निश्र्चयात्मक समाधान (समाधि अवस्था) मिळवून देणारी असते.
कवि स्वधर्माचा आश्रयो । कवि मनाचा मनोजयो ।
कवि धार्मिकाचा विनयो । विनयकर्ते ॥ ११ ॥
११) कवीच्या प्रतिभेंत स्वकर्तव्याची जाणीव, मनोजय कसा मिळेल आणि धार्मिकांना विनय प्राप्त करुन देण्याची शक्ती असते.
कवि वैराग्याचें संरक्षण । कवि भक्तांचे भूषण ।
नाना स्वधर्मरक्षण । ते हे कवी ॥ १२ ॥
१२) ते वैराग्याचे महत्व विशद करतात. भक्तांच्या भक्तिचे महत्व सांगतात. स्वधर्माचे आचारविचार सांगुन धर्मरक्षण करतात.
कवि प्रेमळांची प्रेमळ स्थिती । कवि ध्यानस्थांची ध्यानमूर्ती ।
कवि उपासकांची वाढ कीर्ती । विस्तारली ॥ १३ ॥
१३) प्रेमी लोकांची प्रेमावस्था ते सगब्दरुपाने सांगतात. ध्यान लावणार्‍यांना ध्यानमूर्तिचे वर्णन करतात. आणि थोर भक्तांचे चरित्रे लिहून त्यांची कीर्ती वाढवतात. 
नाना साधनाचें मूळ । कवि नाना प्रेत्नाचें फळ ।
नाना कार्यसिद्धी केवळ । कविचेनि प्रसादें ॥ १४ ॥
१४) ते निरनिराळ्या साधनांची त्यांना माहिती असते. निरनिराळ्या प्रयत्नांचे फळ काय मिळते हे त्यांना माहित असते. त्यांच्या प्रसादाने, सहकार्याने निरनिराळी कामे सफळ होतात.
आधीं कवींचा वाग्विळास । तरी मग श्रवणीं तुंबळे रस ।
कवीचेनि मतिप्रकाश । कवित्वास होये ॥ १५ ॥   
 १५) कविंची प्रतिभा जागृत होऊन वाणी वाग्विलासाने श्रोत्यांना निरनिराळे रसांनी तृप्त करते. पूर्वींची कवित्वें त्यांची काव्यशक्ति जागृत करतात.
कवि वित्पन्नाची योग्यता । कवि सामर्थ्यवंतांची सत्ता । 
कवि विचक्षणाची कुशळता । नाना प्रकारें ॥ १६ ॥
१६) विद्वानांची योग्यता, सामर्थवंतांची सत्ता आणि हुषार पुरुषांची कुशलता याचे वर्णन कवी अनेक प्रकारे करतात.
कवि कवित्वाचा प्रबंद । कवि नाना धाटी मुद्रा छंद ।
कवि गद्यपद्येंभेदाभेद । पदत्रासकर्ते ॥ १७ ॥
१७) ते निरनिराळे काव्य, प्रबंध रचतात, त्यांत धाटी, छंद, समास, अलंकार रचतात. नविन नविन प्रतिभेचे प्रकार त्यांत योजतात.
कवि सृष्टीचा आळंकार । कवि लक्ष्मीचा शृंघार ।
सकळ सिद्धीचा निर्धार । ते हे कवि ॥ १८ ॥
१८) कवी हा सृष्टीचा अलंकारच आहे. जणु तो लक्ष्मीचा शृगांर आणि सकळ सिद्धि निश्र्चयाने मिळवून देणार असा हा कवी आहे.
कवि सभेचें मंडण । कवि भाग्याचे भूषण ।
नाना सुखाचें संरक्षण । ते हे कवि ॥ १९ ॥
१९) हे कवि सभेला शोभा देतात, भाग्याचे ते भूषण आहेत आणि नाना प्रकारच्या सुखांचे ते संरक्षण करतात.
कवि देवांचे रुपकर्ते । कवि ऋषीचे महत्ववर्णिते ।
नाना शास्त्रांचें सामर्थ्य ते । कवि वाखाणिती ॥ २० ॥
२०) कवि देवांचे रुप वर्णितात, ऋषिंचे महत्व विशद करतात, निरनिराळ्या शास्त्रांचे सामर्थ्य गौरवतात.
नस्ता कवींचा व्यापार । तरी कैंचा अस्ता जगोद्धार ।
म्हणौनि कवि हे आधार । सकळ सृष्टीसी ॥ २१ ॥
२१) कवींनी मोठमोठी काव्यें केली नसती तर जगाचा उद्धार झाला नसता. त्यामुळे सकळ सृष्टीसाठी ते मोठे आधारच आहेत.
नाना विद्या ज्ञातृत्व कांहीं । कवेश्र्वरेविण तों नाहीं । 
कविपासून सर्वहि । सर्वज्ञता ॥ २२ ॥
२२) नाना प्रकारचे ज्ञान व विद्या या कवीशिवाय मिळाल्या नसत्या. कवीच सारे ज्ञान सर्वत्र पसरवतात.
मागां वाल्मीक व्यासादिक । जाले कवेश्र्वर अनेक ।
तयांपासून विवेक । सकळ जनासी ॥ २३ ॥
२३) पूर्वी वाल्मिकी, व्यास आदि असे अनेक मोठे मोठे कवी होऊन गेले ज्यांनी लोकांना विवेकाचे दर्शन करविले.
पूर्वीं काव्यें होतीं केलीं । तरीच वित्पत्ती प्राप्त जाली ।
तेणें पंडिताआंगी बाणली । परम योग्यता ॥ २४ ॥
२४) पूर्वी उत्तमोत्तम काव्यें केलेली होती. त्यांच्यायोगे पंडितांना विद्वत्ता प्राप्त झाली. ज्यामुळे जगांत त्यांना योग्यता मिळाली.
ऐसें पूर्वी थोर थोर । जाले कवेश्र्वर अपार ।
आतां आहेत पुढें होणार । नमन त्यांसी ॥ २५ ॥
२५) पूर्वी जे मोठेमोठे कवीश्र्वर होऊन गेले, आताही आहेत व पुढेही होतील त्या सर्वांना माझा नमस्कार आहे.
नाना चातुर्याच्या मूर्ती । कीं हे साक्षात् बृहस्पती । 
वेद श्रुती बोलों म्हणती । ज्यांच्या मुखें ॥ २६ ॥ 
 २६) कवि हे चातुर्याच्या मूर्ति असलेले प्रत्यक्ष बृहस्पतीच आहेत. वेद व श्रुती यांनासुद्धा कविंच्या मुखांतून प्रगट व्हावेसे वाटले.
परोपकाराकारणें । नाना निश्र्चय अनुवादणें ।
सेखीं बोलिले पूर्णपणें संशयातीत ॥ २७ ॥
२७) परोपकारासाठी वेगवेगळे सिद्धांत कवि सांगतात. पूर्णपणे संशयविरहीत सिद्धांतांचे ज्ञान ते प्रगट करतात.
कीं हे अमृताचे मेघ वोळले । कीं हे नवरसाचे वोघ लोटले ।
नाना सुखाचे उचंबळले । सरोवर हे ॥ २८ ॥
२८) कवि म्हणजे अमृत वर्षाव करणारे मेघच, (नदींतून) वाहणारे नवरसांचे मोठेमोठे प्रवाह, किंवा निरनिराळ्या सुखांनी उचंबळणारे सरोवरच असतात.
कीं हे विवेकनिधींचीं भांडारें । प्रगट जालीं मनुष्याकारें ।
नाना वस्तूचेनि विचारें । कोंदाटले हे ॥ २९ ॥
२९) जणु मनुष्यरुपाने विवेकरुपी संपत्तीने भरलेली भांडारगृहे, नाना प्रकारच्या (आत्मज्ञान देणार्‍या) विचारांनी भरलेलेच हे कवि असतात.
कीं हें आदिशक्तीचें ठेवणें । नाना पदार्थास आणी उणें ।
लाधलें पूर्व संचिताच्या गुणें । विश्र्वजनासी ॥ ३० ॥
३०) जणु आदिशक्तीची (म्हणजेच ईश्र्वराची स्वशक्ती) ठेव महामाया जी सर्व पदार्थांना तुच्छ लेखते, ती पूर्वपुण्याने सर्व जनांना लाभते.
कीं हे सुखाचीं तारुवें लोटलीं । आक्षै आनंदें उलटलीं ।      
विश्र्वजनास उपेगा आली । नाना प्रयोगाकारणें ॥ ३१ ॥
३१) कवि म्हणजे अक्षय आनंदाने भरलेली जीवनप्रवाहांत तरंगत असलेली नाव जी विश्र्वांतील सर्व लोकांना वेगवेगळ्या योजनांची पूर्ति करण्यास उपयोगी पडते.
कीं हे निरंजनाचीं संपत्ती । कीं हे विराटाची योगस्थिती ।
नातरी भक्तीची फळश्रुती । फळास आली ॥ ३२ ॥
३२) कवि म्हणजे शुद्ध परब्रह्माचे ऐश्र्वर्य, त्या विराटाची समाधी अवस्था, परम भक्तीची फळश्रुती असे हे कवि असतात.
कीं हा ईश्र्वराचा पवाड । पाहातां गगनाहून वाड ।
ब्रह्मांडरचनेहून जाड । कविप्रबंदरचना ॥ ३३ ॥
३३) आकाशापेक्षां मोठी ईश्र्वराची देणगी असे हे कवि कीं, ज्यांची काव्यरचना ब्रह्मांडाहूनही मोठी असते.
आतां असो हा विचार । जगास आधार कवेश्र्वर ।
तयांसी माझा नमस्कार । साष्टांग भावें ॥ ३४ ॥
३४) आता कविवर्णनाचे विचार मी पुरे करतो. जगाला आधारभूत असलेल्या त्या कचिवर्यांना माझा साष्टांग नमस्कार आहे.
॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कवेश्र्वरस्तवननाम समास सातवा ॥ 
Samas Satava Kaveshwar Stavan
समास सातवा कवेश्र्वरस्तवन  


Custom Search

No comments:

Post a Comment