Monday, January 9, 2017

Samas Dahava PadhataMoorkha Lakshan समास दहावा पढतमूर्ख लक्षण


Dashak Dusara Samas Dahava PadhataMoorkha Lakshan
Samas Dahava PadhataMoorkha Lakshan is in Marathi. In this Samas, Samarth Ramdas is telling us the bad qualities of a person who is knowledgeable, but behaves like Moorkha (Mad). Even if we are having such qualities, we need not be ashamed of, because these bad qualities can be removed from our nature with our efforts. He who is PadhataMoorkha is very proud of his knowledge and he disrespects others who are also knowledgeable. He is full of Rajogun and Tamogunas. He blames others for having bad virtues, but he forgets that he himself has these bad virtues in his nature. There are many such bad virtues of PadhataMoorkha are described in this Samas.
समास दहावा पढतमूर्ख लक्षण 
श्रीराम ॥
मागां सांगितलीं लक्षणें । मूर्खाआंगीं चातुर्य बाणे ।
आतां ऐका शाहाणे । असोनि मूर्ख ॥ १ ॥
अर्थ
१) मूर्ख माणूस चतुर व्हावा म्हणुन मागे (दशक दुसरा समास पहिला) मूर्खाची लक्षणे सांगितली. आतां कांहीं लोक शहाणे असूनही मूर्खासारखेच वागतात. त्यांची लक्षणे ऐका.
तया नाव पढतमूर्ख । श्रोतीं न मनावें दुःख । 
अवगुण त्यागितां सुख । प्राप्त होये ॥ २ ॥
२) शहाणा असून मूर्खासारखा वागणार्‍याला पढतमूर्ख असे म्हणतात. श्रोत्यांनी ह्यांतील काही लक्षणे त्यांच्या अंगी असली तरी वाईट वाटुन घेऊ नये. प्रयत्नाने त्या अवगुणांचा त्याग करुन सुखी व्हावे. 
बहुश्रुत आणी वित्पन्न । प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान ।
दुराशा आणी अभिमान । धरी तो येक पढतमूर्ख ॥ ३ ॥
३) पुष्कळ वाचलेले आहे, ज्ञान पुष्कळ मिळवले असून विद्वान आहे. आत्मज्ञान, परमार्थ फार सुंदर सांगतो. परंतु ज्याच्याजवळ वाईट वासना आहे व जो अभिमानी आहे. तो पढतमूर्ख असतो. 
मुक्त क्रिया प्रतिपादी । सगुण भक्ति उछेदी ।
स्वधर्म आणी साधन निंदी । तो येक पढतमूर्ख ॥ ४ ॥
४) आत्मज्ञान झाल्यावर वागणे, वर्तणुक यावर काहीही बंधने पाळण्याची आवशकता नसते, असे सांगतो. देवाच्या सगुण रुपाची भक्ति व्यर्थ आहे, असे सांगतो. स्वधर्म व साधन यांची निंदा करतो, तो पढत मूर्ख असतो. 
आपलेन ज्ञातेपणें । सकळांस शब्द ठेवणें ।
प्राणीमात्रांचें पाहे उणें । तो येक पढतमूर्ख ॥ ५ ॥  
५) आपल्या ज्ञानाचे अभिमानाने दुसर्‍यांना कमी लेखून त्यांचे दोष दाखवतो. तो पढत मूर्ख असतो. 
शिष्यास अवज्ञा घडे । कां तो संकटीं पडे ।
जयाचेनि शब्दें मन मोडे । तो येक पढतमूर्ख ॥ ६ ॥
६) आपले शिष्य पुरी करु शकणार नाहीत अशी गोष्ट, त्यांना करावयास सांगतो. किंवा ते करत असतांना त्यांना त्रास होईल, त्यांच्यावर संकट येईल अशी त्यांना आज्ञा देतो. ज्याच्या बोलण्याने लोकांची मने दुखावली जातात. तो पढत मूर्ख असतो.    
रजोगुणी तमोगुणी । कपटी कुटिळ अंतःकर्णी ।
वैभव देखोन वाखाणी । तो येक पढतमूर्ख ॥ ७ ॥
७) जो रजोगुणी व तमोगुणी असतो. कपटी असून दुष्ट अंतःकरणाचा असतो. लोकांचा बडेजाव, पैसाअडका बघुन स्तुती करतो. तो पढत मूर्ख असतो.  
समूळ ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी दूषण । 
गुण सांगतां अवगुण । पाहे तो येक पढतमूर्ख ॥ ८ ॥
८) सर्व ग्रंथ वाचल्याशिवाय, बघितल्याशिवाय त्या ग्रंथाला वाईट म्हणतो, दुषणें देतो. ग्रंथांतील गुण सांगितले, चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी त्यातले अवगुणच शोधतो. तो पढत मूर्ख असतो.  
लक्षणें ऐकोन मानी वीट । मत्सरें करी खटपट । 
नीतिन्याय उद्धट । तो येक पढतमूर्ख ॥ ९ ॥ 
९) चांगले गुण, लक्षणें सांगायला गेलो तर त्याचा त्याला कंटाळा येतो. मत्सरामुळे नाना खटाटोपी, उद्योग, कारभार करतो. नीति न्याय काही पाळत नाही. उद्धटपणाने वागतो. तो पढत मूर्ख असतो.   
जाणपणें भरीं भरे । आला क्रोध नावरे । 
क्रिया शब्दास अंतरे । तो येक पढतमूर्ख ॥ १० ॥
१०) मी मोठा ज्ञानी अशा अभिमानाने फुगलेला असतो. ज्याला राग आवरत नाही. ज्याचे बोलणे व वागणे याचा मेळ नसतो. बोलणे एक व करणे दुसरेच असा जो वागतो. तो पढत मूर्ख असतो.  
वक्ता अधिकारेंवीण । वगत्रृत्वाचा करी सीण ।
वचन जयाचें कठीण । तो येक पढतमूर्ख ॥ ११ ॥ 
११) पात्रता नसतांना वक्ता बनतो, कोणीही त्याच्या बोलण्यास किंमत देत नसतांना उगाचच बोलण्याचे कष्ट घेतो. जो कठोर वचनी असतो. तो पढत मूर्ख असतो.  
श्रोता बहुश्रुतपणें । वक्तयास आणी उणें ।
वाचाळपणाचेनि गुणें । तो येक पढतमूर्ख ॥ १२ ॥
१२) पुष्कळ माहिती असलेला श्रोता असून तोंडाळपणाने वक्त्यास कमी लेखतो, तो पढत मूर्ख असतो. 
दोष ठेवी पुढिलांसी । तेंचि स्वयें आपणापासीं ।
ऐसें कळेना जयासी । तो येक पढतमूर्ख ॥ १३ ॥
१३) लोकांचे दोष काढतो पण तेच दोष त्याच्या अंगी आहेत याकडे दुर्लक्ष करतो. स्वतःचे तेच दोष त्याला समजत नाहीत, तो पढत मूर्ख असतो. 
अभ्यासाचेनि गुणें । सकळ विद्या जाणे । 
जनास निवऊं नेणें । तो येक पढतमूर्ख ॥ १४ ॥ 
१४) जो अभ्यास करुन बर्‍याच विद्या मिळवितो. परंतु लोकांना मात्र त्याच्या जवळच्या ज्ञानाचा उपयोग करुन समाधानी, सुखी करु शकत नाही, तो पढत मूर्ख असतो. 
हस्त बांधीजे ऊर्णतंतें । लोभें मृत्य भ्रमरातें । 
ऐसा जो प्रपंचीं गुंते । तो येक पढतमूर्ख ॥ १५ ॥  
१५) एखादा हत्ती कोळ्याच्या जाळ्यांत बांधला जातो. किंवा भुंगा मधाच्या लोभाने कमळांत अडकून पडतो व मरतो. तसाच पुष्कळ विद्यांचे ज्ञान असलेला प्रपंचांत गुंतुन आपले ज्ञान फुकट दवडतो, तो पढत मूर्ख असतो.  
स्त्रियांचा संग धरी । स्त्रियांसी निरुपण करी ।
निंद्य वस्तु आंगिकारी । तो येक पढतमूर्ख ॥ १६ ॥
१६) सतत स्त्रीयांच्या संगतींत रमतो, त्यांना उपदेश करतो. निंदनीय वस्तूंचे उपभोगांत राहतो, तो पढत मूर्ख असतो. 
जेणे उणीव ये आंगासी । तेंचि दृढ धरी मानसीं ।
देहबुद्धी जयापासीं । तो येक पढतमूर्ख ॥ १७ ॥  
१७) ज्यामुळे कमीपणा पत्करावा लागतो, तेच मनांत घट्ट धरुन ठेवतो. कमीपणा आला तरी परतपरत तसेच वागतो. जो ज्ञानी असूनही देहबुद्धी सोडत नाही. तो पढत मूर्ख असतो.   
सांडूनियां श्रीपती । जो करी नरस्तुती ।
कां दृष्टी पडिल्यांची कीर्ती । वर्णी तो येक पढतमूर्ख ॥ १८ ॥
१८) श्रीहरीची स्तुती स्तवन न करता माणसाची स्तुती करतो. जो भेटतो त्याची स्तुती करतो, तो पढत मूर्ख असतो. 
वर्णी स्त्रियांचे आवेव । नाना नाटकें हावभाव ।
देखा विसरे जो मानव । तो येक पढतमूर्ख ॥ १९ ॥ 
१९) स्त्रीयांचे वर्णन जो करतो, त्यांच्यासारखे वेश करु नाना हावभाव करतो व जो माणुस देवाला विसरतो, तो पढत मूर्ख असतो.  
भरोन वैभवाचे भरीं । जीवमात्रास तुछ्य करी ।
पाषांड मत थावरी । तो येक पढतमूर्ख ॥ २० ॥
२०) अति वैभवसंपन्नतेमुळे इतर जनांस तुच्छ मानतो. त्यांना तुच्छतेने वागवितो. शास्त्राविरुद्ध मतांना उचलून धरतो, तो पढत मूर्ख असतो.   
वित्पन्न आणी वीतरागी । ब्रह्मज्ञानी माहायोगी ।
भविष्य सांगों लागे जगीं । तो येक पढतमूर्ख ॥ २१ ॥
२१) विद्वान, विरक्त, ब्रह्मज्ञानी, महायोगी असूनही लोकांना भविष्य सांगण्याच्या मागे लागतो, तो पढत मूर्ख असतो.  
श्रवण होतां अभ्यांतरीं । गुणदोषाची चाळणा करी ।
परभूषणें मत्सरी । तो येक पढतमूर्ख ॥ २२ ॥  
२२) कांही चांगले ऐकले की, त्यांतील गुणदोषाची छाननी करुन दोषच काढतो. दुसर्‍याच्या उत्कर्षाने मत्सराने फुलतो, तो पढत मूर्ख असतो. 
नाहीं भक्तीचें साधन । नाहीं वैराग्य ना भजन ।
क्रियेविण ब्रह्मज्ञान । बोले तो येक पढतमूर्ख ॥ २३ ॥ 
२३) भक्ती नाही, वैराग्य नाही, भजन नाही,  कोठचेही साधन करीत नाही. क्रियेविण वाचाळता अश्या प्रकारे लोकांना ब्रह्मज्ञान सांगतो, तो पढत मूर्ख असतो.  न मनी तीर्थ न मनी क्षेत्र । न मनी वेद न मनी शास्त्र ।
पवित्र कुळीं जो अपवित्र । तो येक पढतमूर्ख ॥ २४ ॥
२४) पवित्र कुळांत जन्म घेऊनही ज्याच्याजवळ तीर्थ, क्षेत्र, वेद, शास्त्र यांबद्दल मनांत आदर नसतो व अशा प्रकारे अपवित्रपणे वागतो, तो पढत मूर्ख असतो. 
आदर देखोनि मन धरी । कीर्तीविण स्तुती करी ।
सवेंचि निंदी अनादरी । तो येक पढतमूर्ख ॥ २५ ॥
२५) जो कोणी ह्याला मोठा म्हणतो, त्याची मनधरणी करतो. स्तुतीस पात्र नसलेल्याची स्तुती करतो, व त्याची निंदा व अनादरसुद्धा करतो, तो पढत मूर्ख असतो.   
मागें येक पुढें येक । ऐसा जयाचा दंडक ।
बोले येक करी येक । तो येक पढतमूर्ख ॥ २६ ॥ 
२६) जो तोंडावर एक बोलतो व मागे दुसरेंच बोलतो, अशी ज्याची वागण्याची पद्धत असते, जो बोलतो एक व करतो दुसरेच, तो पढत मूर्ख असतो.   
प्रपंवविशीं सादर । परमार्थीं ज्याचा अनादर ।
जाणपणें घे अधार । तो येक पढतमूर्ख ॥ २७ ॥ 
२७) प्रपंचाबद्दल कामास सदा तयार, परंतु परमार्थाविषयी जो अनादर करतो, समजून व ज्ञानवान असूनही असा जो वागतो, तो पढत मूर्ख असतो.    
येथार्थ सांडून वचन । जो रक्षून बोले मन ।
ज्याचें जिणें पराधेन । तो येक पढतमूर्ख ॥ २८ ॥
२८) जे नीतिस, धर्मास, ज्ञानास धरुन असते ते न बोलता दुसर्‍यांना आवडेल असे बोलतो, ज्याचे जीवन दुसर्‍यावर अवलंबून असते, तो पढत मूर्ख असतो.    
सोंग संपाधी वरीवरी । करुं नये तेंचि करी ।
मार्ग चुकोन भरे भरीं । तो येक पढतमूर्ख ॥ २९ ॥
२९ ) जो चांगले वागण्याचे ढोंग व सोंग करतो, वरवरचे त्याचे वर्तन बरोबर सोंगाप्रमाणे वठवितो, जे कर्म करु नये तेच करतो व मार्ग चुकला तरी त्याच मार्गावरुन हट्टाने चालतो, तो पढत मूर्ख असतो. 
रात्रंदिवस करी श्रवण । न संडी आपले अवगुण । 
स्वहित आपलें आपण । तो येक पढतमूर्ख ॥ ३० ॥
३०) रात्रंदिवस चांगले ऐकतो तरीही स्वतःचे वाईट गुण सोडत नाही, आपले स्वहित होईल असे वागणे तो करत नाही,  तो पढत मूर्ख असतो. 
निरुपणीं भले भले । श्रोते येऊन बैसले । 
क्षुद्रें लक्षुनी बोले । तो येक पढतमूर्ख ॥ ३१ ॥ 
३१) निरुपणाच्यावेळी मोठमोठे ज्ञानी श्रोते येऊन बसले त्यांना क्षुद्र लेखून त्यांचे उणेदुणे काढतो, तो पढत मूर्ख असतो. 
शिष्य जाला अनाधिकारी । आपली अवज्ञा करी ।
पुन्हा त्याची आशा धरी । तो येक पढतमूर्ख ॥ ३२ ॥   
३२) ज्याचा शिष्य अयोग्य वर्तनाने अनाधिकारी झाला, त्या शिष्याने अपमान केला तरी जो त्याची अपेक्षा धरतो, तो पढत मूर्ख असतो.  
होत असतां श्रवण । देहास आलें उणेपण ।
क्रोधें करी चिणचिण । तो येक पढतमूर्ख ॥ ३३ ॥  
३३) श्रवण करीत असतांना याच्या देहास कांही त्रास झाला तर चिडचिडेपणा करतो, तो पढत मूर्ख असतो. 
भरोन वैभवाचे भरीं । सद्गुरुची उपेक्षा करी ।
गुरुपरंपरा चोरी । तो येक पढतमूर्ख ॥ ३४ ॥  
३४) आपल्या श्रीमंतीने, वैभवाने फुगुन जाऊन सद्गुरुची मानमर्यादा ठेवत नाही, आपली गुरुपरंपरा लपवून ठेवतो, तो पढत मूर्ख असतो. 
ज्ञान बोलोन करी स्वार्थ । कृपणा ऐसा सांची अर्थ ।
अर्थासाठीं लावी परमार्थ । तो येक पढतमूर्ख ॥ ३५ ॥ 
३५) मोठ्यामोठ्या ज्ञानाच्या गोष्टी बोलून जो आपला स्वार्थ साधतो, कंजुषपणाने पैसा जमवून ठेवतो, पैशासाठी परमार्थ ज्ञानाचा उपयोग करतो, तो पढत मूर्ख असतो. 
वर्तल्यावीण सिकवी । ब्रह्मज्ञान लावणी लावी ।
पराधेन गोसावी । तो येक पढतमूर्ख ॥ ३६ ॥
३६) आपण योग्यप्रकार न वागता, लोकांना मात्र तसे वागण्यास सांगतो, ब्रह्मज्ञानी स्वतः नसतांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो, दुसर्‍याच्यावर अवलंबुन असतो, तो पढत मूर्ख असतो.    
भक्तिमार्ग अवघा मोडे । आपणामध्यें उपंढर पडे ।
ऐसिये कर्मीं पवाडे । तो येक पढतमूर्ख ॥ ३७ ॥ 
३७) जी कर्में केली तर भक्तिमार्गाचे नुकसान होते, स्वतःचे जीवनसुद्धा बिघडते, तरीही तसाच वागतो, तो पढत मूर्ख असतो.   
प्रपंच गेला हातीचा । लेश नाहीं परमार्थाचा । 
द्वेषी देवां ब्राह्मणाचा । तो येक पढतमूर्ख ॥ ३८ ॥ 
३८) प्रपंच कायमचा कामाचा नाही म्हणून तो सोडला, परमार्थ करता येत नाही, आतां मात्र देवाचा, ब्राह्मणांचा द्वेष करु लागला. तो पढत मूर्ख असतो. 
त्यागावया अवगुण । बोलिलें पढतमूर्खाचें लक्षण ।
विचक्षणें नीउन पूर्ण । क्ष्मा केलें पाहिजे ॥ ३९ ॥
३९) अवगुणांचा त्याग करावा म्हणून पढतमूर्खाची लक्षणे सांगितली, शहाण्यांनी ती राहीली असतील ती पुरी करुन घ्यावी, व मला क्षमा करावी. 
परम मूर्खांमाजी मूर्ख । जो संसारी मानी सुख ।
या संसारदुःखा ऐसें दुःख । आणीक नाहीं ॥ ४० ॥
४०) सर्व मूर्खांमध्ये मूर्ख म्हणजे संसार सुख हे नित्य मानणारा होय. या प्रपंच्याएवढे दुःख कोठेच नाही.    
तेंचि पुढें निरुपण । जन्मदुःखाचें लक्षण ।
गर्भवास हा दारुण । पुढें निरोपिला ॥ ४१ ॥  
४१) त्याचेच निरुपण पुढीले जन्मदुःखाचे लक्षण या समासी गर्भवासाचे दारुण दुःखाद्वारे केले आहे.  

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पढतमूर्खलक्षणनाम समास दहावा ॥ 
Samas Dahava PadhataMoorkha Lakshan
समास दहावा पढतमूर्ख लक्षण 


Custom Search

No comments:

Post a Comment