Tuesday, July 11, 2017

Samas Chavatha Upadesh Lakshan समास चवथा उपदेशलक्षण


Dashak Pachava Samas Chavatha Upadesh Lakshan
Samas Chavatha Upadesh Lakshan. It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Upadesh. How different Gurus give Mantras to his disciples. However that Mantra doesn’t enlighten Disciples. These are not the Mantras which impart Brahma Gyana to disciples.
समास चवथा उपदेशलक्षण
श्रीराम ॥
ऐका उपदेशाचीं लक्षणें । बहुविधें कोण कोणें ।
सांगता तें असाधारणें । परी कांहीं येक सांगो ॥ १ ॥
१) आतां उपदेशाची लक्षणें ऐका.  ती नाना तर्‍हेची व पुष्कळ आहेत. परंतु कल्पना येण्यासाठी थोडी सांगतो.
बहुत मंत्र उपदेशिती । कोणी नाम मात्र सांगती ।
येक ते जप करविती । वोंकाराचा ॥ २ ॥
२) उपदेश देणारे गुरु पुष्कळ प्रकारच्या मंत्रांचा उपदेश करतात. कोणी नामस्मरण करातम्हणता तर कोणी ॐ काराचा जप सांगतात.
शिवमंत्र भवानीमंत्र । विष्णुमंत्र माहालक्ष्मीमंत्र ।
अवधूतमंत्र गणेशमंत्र । मार्तंडमंत्र सांगती ॥ ३ ॥
३) कोणी शिवमंत्र, भवानीमंत्र तर कोणी विष्णु, महालक्ष्मीचा मंत्र, कोणी अवधूत मंत्र, गणेश मंत्र, कोणी मार्तंड मंत्र सांगतात.
मछकूर्मवर्‍हावमंत्र । नृसिंहमंत्र वामनमंत्र ।
भार्गवमंत्र रघुनाथमंत्र । कृष्णमंत्र सांगती ॥ ४ ॥
४) कोणी मच्छ, कूर्म किंवा वराह मंत्र, तर नृसिंह, वामनमंत्र तर कोणी भार्गव, रघुनाथ मंत्र, कृष्ण मंत्र सांगतात. 
भैरवमंत्र मल्लारिमंत्र । हनुमंतमंत्र येक्षिणीमंत्र ।
नारायेणमंत्र पांडुरंगमंत्र । अघोरमंत्र सांगती ॥ ५ ॥
५) कोणी भैरव, मल्लारिमंत्र, तर कोणी हनुमान, यक्षिणी मंत्र, नारायण, पांडुरंग मंत्र तर कोणी अघोर मंत्र सांगतात.
शेषमंत्र गरुडमंत्र । वायोमंत्र वेताळमंत्र ।
झोटिंगमंत्र बहुधा मंत्र । किती म्हणौनि सांगावे॥ ६ ॥
६) कोणी शेष, गरुडमंत्र, तर कोणी वायु, वेताळ मंत्र, कोणी झोटिंग असे नाना प्रकारचे मंत्र सांगतात.  
बाळामंत्र बगुळामंत्र । काळिमंत्र कंकाळिमंत्र । 
बटुकमंत्र नाना मंत्र । नाना शक्तींचे ॥ ७ ॥
७) कोणी बाळामंत्र, बगुळामंत्र, काळिमंत्र, कंकाळिमंत्र बटुकमंत्र असे नाना शक्तिचे नाना मंत्र सांगतात.   
पृथकाकारें स्वतंत्र । जितुके देव तितुके मंत्र ।
सोपे अवघड विचित्र । खेचर दारुण बीजाचे ॥ ८ ॥
८) जितके देव आहेत तितके प्रत्येकाचे स्वतंत्र मंत्र आहेत. त्यांत काहीं सोपे तर कांहीं अवघड आहेत. काहीं बीजमंत्र असतात.   
पाहों जातां पृथ्वीवरी । देवांची गणना कोण करी ।
तितुके मंत्र वैखरी । किती म्हणौनि वदवावी ॥ ९ ॥
९) खरोखर पाहिले तर पृथीवरिल देवांची गणना कोणालाच करता येत नाही. म्हणुन इतके मंत्र वाणीने सांगणे शक्य नाही. 
असंख्यात मंत्रमाळा । येकाहूनि येक आगळा ।
विचित्र मायेची कळा । कोण जाणे ॥ १० ॥
१०) मंत्रमाळा पुष्कळ आहेत. शिवाय त्या एकाहून एक सामर्थ्य असलेल्या आहेत. हा सगळा मायेचा खेळ आहे. मायेची विचित्रकळा माणसाला कळणे अशक्य आहे.  
कित्येक मंत्रीं भूतें जाती । कित्येक मंत्रीं वेथा नासती ।
कित्येक मंत्रीं उतरती । सितें विंचू विखार ॥ ११ ॥
११) कांहीं मंत्रांनी भुतें जातात. काहीं मंत्रांनी आजार जातात. कित्येक मंत्रांनी थंडीताप बरा होतो. तर कांहीं मंत्रांनी विंचू, सर्प यांचे विष उतरते.
ऐसे नाना परीचे मंत्री । उपदेशिती कर्णपात्रीं ।
जप ध्यान पूजा यंत्री । विधानयुक्त सांगती ॥ १२ ॥
१२) असे नाना प्रकारचे मंत्र आहेत. ते गुरु शिष्याच्या कानांत सांगतात. जप, ध्यान, पूजा व यंत्र यांच्याबद्दल शास्त्रोक्त माहीती ही सांगतात.  
येक शिव शिव सांगती । येक हरि हरि म्हणविती । 
येक उपदेशिती । विठ्ठल विठ्ठल म्हणोनी ॥ १३ ॥
१३) कोणी शिव, शिव तर कोणी हरि, हरि तर कोणी विठ्ठल, विठ्ठल म्हावयास सांगतात. 
येक सांगती कृष्ण कृष्ण । येक सांगती विष्णु विष्णु ।
येक नारायण नारायण । म्हणौन उपदेशिती ॥ १४ ॥
१४) कोणी कृष्ण, कृष्ण तर कोणी विष्णु, विष्णु तर अजुन कोणी नारायण, नारायण म्हणायचा उपदेश देतात.
येक म्हणती अच्युत अच्युत । येक म्हणती अनंत अनंत ।
येक सांगती दत्त दत्त । म्हणत जावें ॥ १५ ॥
१५) कोणी म्हणतात अच्युत, अच्युत म्हणा, तर कोणी अनंत, अनंत; तर कोणी दत्त दत्त म्हणावे असे सांगतात.
येक सांगती राम राम । येक सांगती ॐ ॐम ।
येक म्हणती मेघशाम । बहुतां नामीं स्मरावा ॥ १६ ॥
१६) कोणी राम राम; कोणी ॐ ॐ; तर कोणी मेघशामाचे अनेक नांवांनी स्मरण करावे.
येक सांगती गुरु गुरु । येक म्हणती परमेश्र्वरु ।
येक म्हणती विघ्नहरु । चिंतीत जावा ॥ १७ ॥
१७) कांही म्हणतात गुरु गुरु; कांहीं सांगतात परमेश्र्वर; तर कोणी विघ्नहर्त्या गणेशाचे चिंतन करावयास सांगतात.
येक सांगती शामराज । येक सांगती गरुडध्वज ।
येक सांगती अधोक्षज । म्हणत जावें ॥ १८ ॥
१८) कोणी शामराज, कोणी गरुडदध्वज, तर कोणी अधोक्षज म्हणावे असे सांगतात. 
येक सांगती देव देव । येक म्हणती केशव केशव ।
येक म्हणती भार्गव भार्गव । म्हणत जावें ॥ १९ ॥
१९) कोणी देव देव; तर कोणी केशव केशव तर कोणी भार्गव भार्गव म्हणावयास सांगतात.
येक विश्र्वनाथ म्हणविती । येक मल्लारि सांगती ।
येक ते जप करविती । तुकाई तुकाई म्हणौनी ॥ २० ॥
२०) कोणी विश्र्वनाथ, तर कोणी मल्लारि, कोणी तुकाई तुकाऊचा जप करावयास सांगतात. 
हे किती म्हणौनि सांगावें । शिवशक्तीचीं अनंत नांवें ।
इच्छेसारिखीं स्वभावें । उपदेशिती ॥ २१ ॥
२१) भगवंताची नावें हे कितीतरी मंत्र आहेत. ते किती सांगावे. शिवशक्तींची नांवे असंख्य आहेत. ज्या गुरुला जे नांव आवडते त्याचा उपदेश तो शिष्याला करतो.  
येक सांगती मुद्रा च्यारी । खेचरी भूचरी चाचरी अगोचरी ।
येक आसनें परोपरी । उपदेशिती ॥ २२ ॥
२२) कोणी चार मुद्रा खेचरी, भूचरी, चाचरी व अगोचरी कराव्या असे सांगतो. तर कोणी निरनिराळी आसनें करावी म्हणून सांगतो.
येक दाखविती देखणी । येक अनुहातध्वनी ।
येक गुरु पिंडज्ञानी । पिंडज्ञान सांगती ॥ २३ ॥
२३) कोणी अतिंद्रिय प्रकाश दाखवितात. कोणी अनाहत ध्वनी ऐकवितात. कोणी शरिराचे ज्ञान देतो.
येक सांगती कर्ममार्ग । येक उपासनामार्ग ।
येक सांगती अष्टांग । नाना चक्रें ॥ २४ ॥
२४) कोणी कर्ममार्गाचा, तर कोणी उपासनेचा मार्ग, तर अजुन कोणी अष्टांगयोग सांगतात व सात चक्रांचे भेदन शिकवतात. 
येक तपें सांगती । येक अजपा निरोपिती ।
येक तत्वें विस्तारिती । तत्वज्ञानी ॥ २५ ॥
२५) कोणी तपें करावयास सांगतात. कोणी अजपाजप करावयास सांगतात. कोणी तत्वचिंतक विश्र्वाच्या मूलतत्वाची विस्तारानें चिकित्सा करतात.
येक सांगती सगुण । येक निरोपिती निर्गुण ।
येक उपदेशिती तिर्थाटण । फिरावें म्हणूनी ॥ २६ ॥
२६) कोणी सगुणाचा तर कोणी निर्गुणाचा उपदेश करतात. कोणी तीर्थयात्रा कराव्या असे सांगतात.
येक महावाक्यें सांगती । त्यांचा जप करावा म्हणती ।
येक उपदेश करिती । सर्व ब्रह्म म्हणोनि ॥ २७ ॥
२७) चार वेदांतील चार महावाक्ये त्यांचाजप करावा असे कांहीं सांगतात. तर कोणी सर्व जे कांहीं आहे ते ब्रह्मच आहे असा उपदेश करतात.
येक शाक्तमार्ग सांगती । येक मुक्तमार्ग प्रतिष्ठिती ।
येक इंद्रियें पूजन करविती । येका भावें ॥ २८ ॥
२८) कोणी शाक्तमार्ग सांगतात. कोणी मुक्तमार्ग म्हणजे स्वैराचाराने वागण्यास सांगतात. तसेच इंद्रियांची पूजाही करुन घेतात.  
येक सांगती वशीकर्ण । स्तंवन मोहन उच्चाटन ।
नाना चेटकें आपण । स्वयें निरोपिती ॥ २९ ॥
२९) कोणी वशीकरण सांगतात. स्तंभन, मोहन, उच्चाटन अशा प्रकारची नाना चेटकें उपदेशीतात व करवून घेतात.
ऐसी उपदेशांची स्थिती । पुरे आतां सांगों किती ।
ऐसे हे उपदेश असती । असंख्यात ॥ ३० ॥
३०) उपदेशांची अवस्था ही अशी आहे. असे असंख्य उपदेश आहेत. ते किती म्हणून सांगावेत ? हे आतां पुरे झाले.
ऐसे उपदेश अनेक । परी ज्ञानेंविण निरार्थक ।
येविषईं असे येक । भगद्वचन ॥ ३१ ॥
३१) उपदेशाचे असे पुष्कळ प्रकार असले तरी आत्मज्ञानावाचून त्यांना कांहीं अर्थ नाही. याबद्दल एक भगवद् वचन आहे.
या कारणें ज्ञाना समान । पवित्र उत्तम न दिसे अन्न ।
म्हणौन आधीं आत्मज्ञान । साधिलें पाहिजे ॥ ३२ ॥
३२) या कारणासाठी आत्मज्ञानासारखें पवित्र दुसरें कांहीं नाही. म्हणून आधी आत्मज्ञान समजून घेतले पाहीजे.
सकळ उपदेशीं विशेष । आत्मज्ञानाचा उपदेश ।. 
येविषईं जगदीश । बहुतां ठाईं बोलिला ॥ ३३ ॥
३३) सर्व उपदेशांमध्ये आत्ज्ञानाचा उपदेश सर्व श्रेष्ठ आहे. याबद्दल भगवंताने पुष्कळ ठिकाणी सांगून ठेवले आहे. 
श्र्लोक
यस्य कस्य च वर्णस्य ज्ञानं देहे प्रतिष्ठितम् ।
तस्य दासस्य दासोहं भवे जन्मनि जन्मनि ॥
माणूस कोणत्याही वर्णाचा असो, त्याच्या अंगी आत्मज्ञान स्थिरावलें असेल तर या जगांत जन्मो जन्मी मी त्याचा दास होतो. 
आत्मज्ञानाचा महिमा । नेणे चतुर्मुख ब्रह्मा ।
प्राणी बापुडा जीवात्मा । काये जाणे ॥ ३४ ॥
३४) चार तोंडांच्या ब्रह्मदेवालासुद्धा आत्मज्ञानाचा मोठेपणा कळत नाहीतर मग गरीब जीवात्म्याला तो कसा समजणार.
सकळ तीर्थांची संगती । स्नानदानाची फळश्रुती ।
त्याहूनि ज्ञानाची स्थिती । विशेष कोटिगुणें ॥ ३५ ॥
३५) तीर्थयात्रा, स्नान, दान इत्यादि सर्व साधनांनी मिळविलेले पुण्य पुष्कळ असते. पण आत्मज्ञानाची पुण्याई या सर्वांहून कोटीगुणांनी अधिक असते.  
श्र्लोक
पृथिव्यां यानि तीर्थानि स्नानदानेषु यत्फलम् ।
तत्फलं कोटिगुणितं ब्रह्मज्ञानसमोपमम् ॥
पृथ्वीवर जीं तीर्थें आहेत त्यांच्या यात्रेचे फळ, तसेच स्नान दानाचे फळ यांची बेरीज कोटीगुणांनी वाढविली तर कदाचित ती ब्रह्मज्ञानाच्या बरोबरीने होईल.
म्हणौनि जें आत्मज्ञान । तें गहनाहूनि गहन ।
ऐक तयाचें लक्षण । सांगिजेल ॥ ३६ ॥
३६) म्हणून गहनाहून गहन, अत्यंत गूढ असें जें आत्मज्ञान त्याचें लक्षण आतां सांगतो. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उपदेशनाम समास चवथा ॥
Samas Chavatha Upadesh Lakshan 
 समास चवथा उपदेशलक्षण


Custom Search

No comments:

Post a Comment