Friday, July 28, 2017

Samas Dusara Brahmapavan Nirupan समास दुसरा ब्रह्मपावन निरुपण


Dashak Sahava Samas Dusara Brahmapavan Nirupan 
Samas Dusara Brahmapavan Nirupan. It is in Marathi. If we think spirituality then we come to know that what we see is not permanent. There is an end to everything what we see. Hence it is not real or permanent. However what we don’t see our soul is permanent and real. The soul has no end. When soul leaves our body we are called as dead. In this Samas how we can get knowledge of that permanent thing which is called as Brhma, is told.
समास दुसरा ब्रह्मपावन निरुपण
श्रीराम ॥
ऐका उपदेशाचीं लक्षणें । सायोज्यप्राप्ती होय जेणें ।
नाना मतांचें पेखणें । कामा नये सर्वथा ॥ १ ॥
१) ज्या उपदेशानें सायोज्य मुक्ति मिळते. त्याची लक्षणें आतां ऐका.  याबाबतींत निरनिराळ्या मतांतरांचे ज्ञान उपयोगी पडत नाही.
ब्रह्मज्ञानेंविण उपदेश । तो म्हणो नये विशेष ।
धान्येंविण जैसें भूंस । खातां नये ॥ २ ॥
२) धान्याशिवाय असलेला भूसा जसा खात नाहीत, तसाच ब्रह्मज्ञानाशिवाय असलेला उपदेश विशेष समजूं नये.  
नाना काबाड बडविलें । नातरी तक्रचि गुसळिलें ।
अथवा धुणचि सेविलें । सावकास ॥ ३ ॥
३) रसरहित कडबा कुटला, किंवा लोणी काढलेले ताक घुसळीलें, किंवा तांदुळाचे धुवण प्यावें, 
नाना साली भक्षिल्या । अथवा चोईट्या चोखिल्या ।
खोबरें सांडून खादल्या । नरोट्या जैश्या ॥ ४ ॥
४) किंवा नाना फळांच्या साली खाल्या, किंवा रस नसलेल्या बाठी चोखल्या, किंवा खोबरें नसलेल्या करंट्या खाल्या तर नुसतेंच श्रम होऊन तें वायां जातात.  
तैसें ब्रह्मज्ञानेंविण । नाना उपदेशाचा सिण । 
सार सांडून असार कोण । शाहाणा सेवी ॥ ५ ॥
५) तसेच ब्रह्मज्ञानाशिवाय असलेला उपदेश ऐकणे म्हणजे नुसता शिणच सार नसलेला असार कोण शहाणा सेवन करील?  कोणीच करणार नाही. 
आतां ब्रह्म जें कां निर्गुण । तेंचि केलें निरुपण । 
सुचित करावें अंतःकर्ण । श्रोतेजनीं ॥ ६ ॥ 
६) आतां ब्रह्म जें गुणातीत आहे. त्याचें वर्णन श्रोत्यांनी शुद्ध अंतःकरणाने ऐकावे. 
सकळ सृष्टीची रचना । ते हे पंचभूतिक जाणा ।
परंतु हे तगेना । सर्वकाळ ॥ ७ ॥
७) सगळें विश्र्व हें पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. पण हे सर्व फार काळ टिकत नाही.
आदि अंती ब्रह्म निर्गुण । तेचि शाश्वताची खूण ।
येर पंचभूतिक जाण । नासिवंत ॥ ८ ॥
८) हें विश्र्व निर्माण होण्या आधी व नंतर गुणातीत ब्रह्म जसेंच्या तसेंच राहाते. इतर जें कांहीं आहे तें नाशवंत समजावें.  
येर्‍हवीं हें पाहातां भूतें । देव कैसें म्हणावें त्यातें ।
भूत म्हणतां मनुष्यातें । विषाद वाटे ॥ ९ ॥
९) साध्या मानवी दृष्टीनें पाहीलें तर विश्र्व हे झालेले (भूत) आहे. ते बदलते म्हणून त्याला देव म्हणता येत नाही. भूत म्हणून हांक मारली तर मनुष्याला वाईट वाटते. 
मां तो जगज्जनक परमात्मा । त्यास आणि भूतउपमा ।
ज्याची कळेना महिमां । ब्रह्मादिकांसी ॥ १० ॥
१०) मग तो परमात्मा की ज्याचा महिमा ब्रह्मासिकांनाही कळला नाही त्या थोर जगज्जनकाला भूत म्हणणे अगदींच कांहींतरी वाटते. 
भूतां ऐसा जगदीश । म्हणतां उत्पन्न होतो दोष ।
याकारणें माहापुरुष । सर्व जाणती ॥ ११ ॥
११) या जगाचा नियंता ईश्र्वर पंचमहाभूतांसारखा आहे असें म्हणणे फार सदोष आहे. ब्रह्मज्ञानी महापुरुष हें सगळें बरोबर जाणतात.
पृथ्वी आप तेज वायो आकाश । यां सबाह्य जगदीश ।
पंचभूतांसी आहे नाश । आत्मा अविनाशरुपी ॥ १२ ॥   
१२) पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश या पंचमहाभूतांना परमात्मा आंतून बाहेरुन व्यापून आहे. पंचमहाभूतांना नाश आहे. आत्मा मात्र अविनाशी आहे.   
जें जें रुप आणी नाम । तो तो आवघाचि भ्रम ।
नामरुपातीत वर्म । अनुभवें जाणावें ॥ १३ ॥
१३) जें जें रुप व नांव आहे तो सगळा भ्रमच आहे. नामरुपाच्या पलीकडे असलेले जें वर्म परमात्मास्वरुप आहे तें जाणावें. 
पंचभूतें आणि त्रिगुण । ऐसी अष्टधा प्रकृति जाण ।
अष्टधा प्रकृतीस नामाभिधान । दृश्य ऐारिसें सें ॥ १४ ॥
१४) पांच महाभूतें व तीन गुण या आठांनी प्रकृती बनते. याच अष्टधा प्रकृतीस दृश्य असेही दुसरे नाव आहे.  
तें हे दृश्य नासिवंत । ऐसें वेद श्रुति बोलत । 
निर्गुण ब्रह्म शाश्वत । जाणती ज्ञानी ॥ १५ ॥
१५) वेद व श्रुती म्हणतात जें दृश्य आहे ते नाशिवंत आहे. पण निर्गुण ब्रह्म ते शाश्वत आहे. हें ज्ञानी जाणतात. 
जें शस्त्रें तोडितां तुटेना । जें पावकें जाळितां जळेना ।     
कालवितां कालवेना । आपेंकरुनी ॥ १६ ॥
१६) तें ब्रह्म शस्त्राने तोडता येत नाही. तें अग्नींने जळू शकत नाही. तें पाण्यांत कालविता येत नाही. 
जें वायोचेनि उडेना । जें पडेना झडेना ।
जें घडेना ना दडेना । परब्रह्म जें ॥ १७ ॥
१७) तें वार्‍यानें उडविता येत नाही, तें पडत नाहीं कां झडत नाहीं. तें घडविता येत नाही कीं जे लपत नाही असे ते परब्रह्म आहे.
ज्यासी वर्णचि नसे । जें सर्वाहूनि अनारिसे ।
परंतु असताचि असे । सर्वकाळ ॥ १८ ॥ 
१८) त्याला कोणताही रंग नाही. तें सर्व वस्तूंहून वेगळे आहे. पण तें सर्वत्र नेहमी सर्व काळ भरुन राहीलेले आहे. 
दिसेना तरी काये जालें । परंतु तें सर्वत्र संचलें ।
सूक्ष्मचि कोंदातलें । जेथें तेथें ॥ १९ ॥
१९) तें दिसत नाहीं म्हणून काय झाले. ते सर्वत्र भरुन राहीलेले आहे. तें सूक्ष्मत्वानें जेंथें तेथें व्यापलेलें आहे. 
दृष्टीस लागली सवे । जें दिसेल तेंचि पाहावें ।
परंतु गुज तें जाणावें । गोप्य आहे ॥ २० ॥
२०) जें दिसेल तें पाहायचे व ते खरें मानायचे अशी आपल्या दृष्टीला सवय झाली आहे. परंतु जेम रहस्य असतें तें नेहमी गुप्त असते.  
प्रगट तें जाणावें असार । आणी गुप्त तें जाणावें सार ।
गुरुमुखें हा विचार उमजों लागे ॥ २१ ॥
२१) जें इंद्रियांना दिसते व जें उघड आहे तें असार म्हणजे खोटे समजावे. जें गुप्त असतें, सूक्ष्म असते, तें खरें असतें हें सद्गुरुच्या उपदेशाने समजु लागते. 
जें उमजेना तें उमजावें । जें दिसेना तें पाहावें ।
जें कळेना तें जाणावें । विवेकबळें ॥ २२ ॥
२२) आपल्या विचाराने जें उमजत नाहीं तें उमजुन घ्यावें. जें दिसत नाही तेम पहाण्याचा यत्न करावा. जें कळत नाही तें जाणुन घ्यावे. हें सर्व सद्गुरु उपदेश आठवून आपल्या विचारानें जाणून घ्यावे. 
गुप्त तेंचि प्रगटवावें । असाध्य तेंचि साधावें । 
कानडेंचि अभ्यासावें । सावकास॥ २३ ॥
२३) जें गुप्त आहे तें स्वतः प्रगट करुन घ्यावें. जें असाध्य आहे, कष्टसाध्य आहे तें आत्मस्वरुप साध्य करुन घ्यावें. जें अवघड आहे त्याचा चिकाटीनें सतत अभ्यास करावा. 
वेद विरंची आणि शेष । जेथें सिणले निशेष ।
तेंचि साधावें विशेष । परब्रह्न तें ॥ २४ ॥
२४) वेद, ब्रह्मदेव व शेष ज्या ब्रह्माचे वर्णन करतांना थकले, तें परब्रह्म आपण विशेष प्रयत्न करुन साधून घ्यावें.  
तरी तें कोणेपरी साधावें । तेंचि बोलिलें स्वभावें ।
अध्यात्मश्रवणें पावावें । परब्रह्म तें ॥ २५ ॥
२५) परंतु तें परब्रह्म कसें अनुभवावें, तर त्याचे स्वाभाविक साधन सांगतो. अध्यात्मश्रवणानें तें परब्रह्म प्राप्त करुन घ्यावें. 
पृथ्वी नव्हे आप नव्हे । तेज नव्हे वायु नव्हे ।
वर्णवेक्त ऐसें नव्हे । अव्यक्त तें ॥ २६ ॥
२६) तें पृथ्वी नाहीं, तें आप नाही, तेज व वायुसुद्धा नाही. तें रंगाचे नाही. तसेच तें व्यक्त नाहीं ते अव्यक्त आहे.
तयास म्हणावें देव । वरकड लोकांचा स्वभाव ।
जितुके गाव तितुके देव । जनाकारणें ॥ २७ ॥
२७) जें व्यक्त असते त्याला लोक देव म्हणतात. हा त्यांचा स्वभाव आहे. म्हणुन सामान्य अज्ञानी लोकांची जितकी गांवे तितके देव असतात.
ऐसा देवाचा निश्र्चय जाला । देव निर्गुण प्रत्यया आला ।
आतां आपणचि आपला । शोध घ्यावा ॥ २८ ॥
२८) अशा प्रकारें खरा देव कोणता हें निश्र्चितपणें कळलें, देव निर्गुण आहे असा अनुभव आला मग आपल्या अंतर्यामी आपला आपण शोध घ्यावा.  
माझें शरीर ऐसें म्हणतो । तरी तो जाण देहावेगळांचि तो ।
मन माझें ऐसें जाणतो । तरी तो मनहि नव्हे ॥ २९ ॥
२९) माझे शरीर असें आपण सर्व म्हणतो. याचा अर्थ मी देहाहून वेगळा आहे. माझे मन ही जाणीव आपल्याला असते. याचाच अर्थ मी देहही नाही व मी मनही नाही.   
पाहातां देहाचा विचार । अवघा तत्वांचा विस्तार ।
तत्वें तत्व झाडितां सार । आत्माच उरें ॥ ३० ॥  
३०) आपण देहाचा विचार केला तर तो पंचमहाभूतांचा बनला आहे. तत्वामध्यें तत्व मिसळीत गेल्यास अखेर साररुप अविनाशी आत्मा तेवढा उरतो.       
आपणासी ठावचि नाहीं । येथें पाहाणें नलगे कांहीं । 
तत्वें ठांईचा ठांई । विभागून गेलीं ॥ ३१ ॥
३१) देहबुद्धीचे ज्ञान असलेला मी कोठे राहतो हें शोधू लागलें तर त्याला स्थानच नाही असे लक्षांत येते. मग त्याला पाहाण्याचे कांहींच कारण उरत नाही. पांच महाभूतें ज्यांनी देह बनला आहे ती आपापल्या ठिकाणी विभागून नाहीशीं होतात.  
बांधली आहे तों गांठोडी । जो कोणी विचारें सोडी ।
विचार पाहातां ही गांठोडी । आडळेना ॥ ३२ ॥
३२) आपलें शरीर म्हनजें पंचमहाभूतें एकत्र बांधून तयार झालेले एक गाठोडे आहे. जर कोणीं विचारचे साधनाने सोडूं लागला तर तें गांठोडेच सांपडत नाहीसें होते.  
तत्वांचें गांठोडें शरीर । याचा पाहातां विचार ।
येक आत्मा निरंतर । आपण नाहीं ॥ ३३ ॥
३३) आपलें शरीर हें पंचमहाभूतांचे गांठोडे आहे. विचारानें याचे विवरण करतगेलें तर मी म्हणून जो वावरतो तो उरतच नाही. तर अविनाशी असा आत्माच उरतो. 
आपणासी ठावचि नाहीं । जन्ममृत्यु कैंचें काई ।
पाहातां वस्तुचा ठांई । पापपुण्य नसे ॥ ३४ ॥
३४) जेथें मी पणाला जागाच उरत नाहीं तेथें जन्म कोणाचा व मृत्यु कोणाचा ? आणि जी परमात्मा वस्तु आहे तीला पापपुण्याचा स्पर्शही होत नाही.   
पापपुण्य येमयातना । हे निर्गुणीं तों असेना ।
आपण तोचि तरी जन्ममरणाचा । ठव कैंचा ॥ ३५ ॥
३५) पापपुण्य व यमयातना यांचा निर्गुणाशीं कांहींच संबंध नाही. आपला खरा मी निर्गुण आहे. त्यामुळें त्याच्या ठिकाणी जन्ममरणाला स्थान नाही. 
देहेबुद्धीनें बांधला । तो विवेकें मोकळा केला । 
देहातीत होतां पावला । मोक्षपद ॥ ३६ ॥
३६) मी देहच आहे या दृढ भावनेनें जीव बांधलेला असतो. विवेक केल्यानें तो त्या बंधनांतून मुक्त होतो. देहबुद्धि सुटुन तो देहाच्या पलीकडे गेला म्हणजे मोक्षपदास पोहोंचतो. 
जालें जन्माचें सार्थक । निर्गुण आत्मा आपण येक ।
परंतु हा विवेक । पाहिला पाहावा ॥ ३७ ॥
३७) निर्गुण आत्मा हाच खरा मी आहे असा साक्षात् अनुभव येणें म्हणजे जन्माचें सार्थक होय. परंतु हा अनुभव येण्याचा पुनः पुनः विवेक करावा लागतो.
जागें होतां स्वप्न सरे । विवेक पाहातां दृश्य वोसरे ।
स्वरुपानुसंधानें तरे । प्राणीमात्र ॥ ३८ ॥
३८) झोपेंतून जागें झाल्यावर स्वप्न जसें आपोआप विरतें तसें सारखा विवेक केल्यानें दृश्य ओसरुं लागते.  
आपणास निवेदावें । आपण विवेकें नुरावें ।
आत्मनिवेदन जाणावें । याचे नांव ॥ ३९ ॥
३९) आपण स्वतःला स्वस्वरुपांत लीन करावें. विवेकाच्या अभ्यासानें आपण स्वस्वरुपाहून वेगळें उरुंच नये. स्वस्वरुपांत लीन होण्याच्या या अवस्थेला आत्मनिवेदन असें म्हणतात.  
आधीं अध्यात्मश्रवण । मग सद्गुरुपादसेवन ।
पुढें आत्मनिवेदन । सद्गुरुप्रसादें ॥ ४० ॥
४०) प्रथम अध्यात्मश्रवण करावें. मग श्रीसद्गुरुच्या चरणांची सेवा करावी. पुढें सद्गुरुंच्या कृपाप्रसादानें आत्मनिवेदन साधतें. 
आत्मनिवेदन उपरी । निखळ वस्तु निरंतरी ।
आपण आत्मा अंतरीं । बोध जाला ॥ ४१ ॥
४१) आत्मनिवेदन झाल्यावर निव्वळ शाश्वत आत्मवस्तु तेवढी उरतें. आणि मी म्हणजेच आत्मा असें ज्ञान होते. 
त्या ब्रह्मबोधें ब्रह्मचि जाला । संसारखेद तो उडाला ।
देहो प्रारब्धीं टाकिला । सावकास ॥ ४२ ॥
४२) त्या आत्मज्ञानानें जीव ब्रह्मरुप होतो. त्याचें संसारांतील दुःख नाहीसें होते. नंतर देह प्रारब्धावर सोडून तो  स्वस्थ राहतो. 
यासी म्हणिजे आत्मज्ञान । येणें पाविजे समाधान । 
परब्रह्मीं आभिन्न । भक्तचि जाला ॥ ४३ ॥
४३) याला आत्मज्ञान म्हनतात. त्यामुळें समाधान मिळतें. जीव परब्रह्मामधें विलीन होऊन एकरुप होतो. तो खरा भक्त होतो.  
आतां होणार तें होयेना कां । आणि जाणार तें जायेना कां ।
तुटली मनांतील आशंका । जन्ममृत्याची ॥ ४४ ॥
४४) आतां जे होणार असेल तें होऊन दे. जें जायचे असेल तें जाऊं दे. अशी मनाची निश्र्चित अवस्था होते. सर्व शंका मीटतात. जन्ममरणाची भिती निघून जाते. 
संसारी पुंडावें चुकलें । देवा भक्ता ऐक्य जालें ।
मुख्य देवास वोळखिलें । सत्संगेंकरुनी ॥ ४५ ॥
४५) संतांच्या संगतीचा लाभ झाला म्हणजे मुख्य देवाची ओळख होते. ती झाली की देव व भक्त एकरुप होतात. मग संसारांतील ओढाताण संपतें.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ब्रह्मपावननाम समास दुसरा ॥
Samas Dusara Brahmapavan Nirupan 
समास दुसरा ब्रह्मपावन निरुपण


Custom Search

No comments:

Post a Comment