DashakPachava Samas Satava Baddha Lakshan
Samas Satava Baddha Lakshan. It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Baddha. Who is Baddha? To know that we can think of a person who is completely absorbed in Prapancha. He neglects Parmartha. He doesn’t think of Punya. He is engaged in doing sins for his prapancha. There are many qualities of Baddha described in this Samas bh Samarth Ramdas.
समास सातवा बद्धलक्षण
श्रीराम ॥
सृष्टी जे कां चराचर । जीव दाटले अपार ।
परी ते अवघे चत्वार । बोलिजेती ॥ १ ॥
१) या चराचर सृष्टीमध्यें (जीवांची) माणसांची बरीच गर्दी झाली आहे. पण त्यांचे एकदंर चार विभाग सांगितले आहेत.
ऐक तयांचे लक्षण । चत्वार तो कोण कोण ।
बद्ध मुमुक्ष साधक जाण । चौथा सिद्ध ॥ २ ॥
२) ते चार विभाग कोण कोणते तर बद्ध, मुमुक्षु, साधक आणि चवथा सिद्ध.
यां चौघांविरहित कांही । सचराचरीं पांचवा नाहीं ।
आतां असो हें सर्वही । विशद करुं ॥ ३ ॥
३) या चौघांव्यतिरिक्त या चराचरी पांचवा वर्ग नाही. आतां हे सर्व विशद करतो.
बद्ध म्हणिजे तो कोण । कैसें मुमुक्षाचें लक्षण ।
साधकसिद्धवोळखण । कैसी जाणावी ॥ ४ ॥
४) बद्ध म्हणजे कोण? मुमुक्षुचे लक्षण काय? साधक व सिद्ध कसा ओळखावा ते समजून घ्या.
श्रोतीं व्हावें सावध । प्रस्तुत ऐका बद्ध ।
मुमुक्ष साधक आणि सिद्ध । पुढें निरोपिले ॥ ५ ॥
५) श्रोत्यांनीं सावध होऊन बद्ध, मुमुक्ष, साधक व सिद्ध यांची पुढें दिलेली लक्षणें ऐकावीत.
आतां बद्ध तो जाणिजे ऐसा । अंधारींचा अंध जैसा ।
चक्षुवीण दाही दिशा । सुन्याकार ॥ ६ ॥
६) अंध माणूस अंधारामध्यें जसा चाचपडतो, तसा बद्ध माणूस अज्ञाबाच्या अंधारांत जीवनामध्यें वावरतो. अंधाला दृष्टी नसल्याने दाही दिशा शून्य असतात. तसाच बद्ध ज्ञान दृष्टी नसल्यानें परमात्मा आंत बाहेर असूनही दिसत नाही.
भक्त ज्ञाते तापसी । योगी वीतरागी संन्यासी ।
पुढें देखतां दृष्टीसी । येणार नाहीं ॥ ७ ॥
७) भक्त, ज्ञानी, तापसी, योगी, विरक्त, संन्यासी हे दृष्टीसमोर असूनही त्याला दिसत नाहीत.
न दिसे नेणे कर्माकर्म । न दिसे नेणे धर्माधर्म ।
न दिसे नेणे सुगम । परमार्थपंथ ॥ ८ ॥
८) चांगलें कर्म, वाईट कर्म, धर्म, अधर्म, व सोपा परमार्थ मार्ग तो पाहात नाही व जाणत नाही.
तयास न दिसे सच्छास्त्र । सत्संगति सत्पात्र ।
सन्मार्ग जो कां पवित्र । तो ही न दिसे ॥ ९ ॥
९) त्याला खरें शास्त्र, सत्संगति कोणती, चांगला माणूस, चांगला पवित्र मार्ग तोही त्याला दिसत नाही.
न कळे सारासार विचार । न कळे स्वधर्म आचार ।
न कळे कैसा परोपकार । दान पुण्य ॥ १० ॥
१०) सारासार विचार, स्वधर्माचा आचार, परोपकार, दान व पुण्य हें कांहीं त्याला कळत नाही.
नाहीं पोटीं भूतदया । नाही सुचिष्मंत काया ।
नाहीं जनासि निववावया । वचन मृद ॥ ११ ॥
११) त्याच्या पोटी भूतदया नसते, त्याच्याजवळ देहाची स्वच्छता नसते, लोकांचे मन शांत करणारी गोड भाषा नसते.
न कळे भक्ति न कळे ज्ञान । न कळे वैराग्य न कळे ध्यान ।
न कळे मोक्ष न कळे साधन । या नाव बद्ध ॥ १२ ॥
१२) त्याला भक्ति, खरे ज्ञान कळत नाही. वैराग्य किंवा ध्यान म्हणजे काय त्याला कळत नाही. मोक्ष म्हणजे काय? साधन म्हणजे काय हे कळत नाही त्याला बद्ध म्हणतात.
न कळे देव निश्र्चयात्मक । न कळे संतांचा विवेक ।
न कळे मायेचें कौतुक । या नाव बद्ध ॥ १३
१३) निश्र्चित देव, संतांचा विवेक, मायेचे कौतुक कळत नाही तो बद्ध होय.
न कळे परमार्थाची खूण । न कळे अध्यात्मनिरुपण ।
न कळे आपणासि आपण । या नाव बद्ध ॥ १४ ॥
१४) परमार्थाची खूण, अध्यात्म निरुपण, आपण स्वतः कोण? हे कळत नाही तो बद्ध होय.
न कळे जीवाचें जन्ममूळ । न कळे साधनाचे फळ ।
न कळे तत्वता केवळ । या नाव बद्ध ॥ १५ ॥
१५) जीवाचे जन्ममूळ, साधनाचें फळ, केवळ शुद्ध ब्रह्म काय? हे कळत नाही तो बद्ध होय.
न कळे कैसें तें बंधन । न कळे मुक्तीचे लक्षण ।
न कळे वस्तु विलक्षण । या नाव बद्ध ॥ १६ ॥
१६) बंधनाचे लक्षण, मुक्तीचे लक्षण, विलक्षण परमात्म वस्तु हे कळत नाही तो बद्ध होय.
न कळे शास्त्रार्थ बोलिला । न कळे निजस्वार्थ आपुला ।
न कळे संकल्पें बांधला । या नाव बद्ध ॥ १७ ॥
१७) ज्याला सांगितलेला शास्त्रार्थ कळत नाही. आपला खरा स्वार्थ म्हणजे निजहित कळत नाही. आणि आपण संकल्पानें बांधलो आहोत हे ज्याला कळत नाही त्याला बद्ध म्हणतात.
जयासि नाहीं आत्मज्ञान । हें मुख्य बद्धाचें लक्षण ।
तीर्थ व्रत दान पुण्य । कांहींच नाहीं ॥ १८ ॥
१८) बद्धाचे मुख्य लक्षण म्हनजे त्याला आत्मज्ञान नसणें. तीर्थयात्रा, व्रतें, दानें यापैकी कांहींही नसते. तो बद्ध होय.
दया नाहीं करुणा नाहीं । आर्जव नाहीं मित्रि नाहीं ।
शांति नाहीं क्ष्मा नाहीं । या नाव बद्ध ॥ १९ ॥
१९) बद्धाला दया, करुणा, नम्रता, सरलता, शांति आणि क्षमा हे गुण त्याच्यापाशी नसतात. त्याला बद्ध म्हणतात.
जें ज्ञानविशिं उणें । तेथें कैचीं ज्ञानाचीं लक्षणें ।
बहुसाल कुलक्षणें । या नाव बद्ध ॥ २० ॥
२०) जेथें मूळ आत्मज्ञान नसते, त्याचा अभाव असतो, तेथें ज्ञानाची लक्षणें आढळणें शक्य नसतें. त्याच्या अंगी पुष्कळ वाईट लक्षणें असतात तो बद्ध असतो.
नाना प्रकारीचे दोष । करितां वाटे परम संतोष ।
बाष्कळपणाचा हव्यास । या नाव बद्ध ॥ २१ ॥
२१) नाना प्रकारची दोषपूर्ण वर्तणुक करण्यांत त्याला मोठा आनंद वाटतो. बाष्कळपणा करण्याची हौस असते. त्यास बद्ध म्हणतात.
बहु काम बहु क्रोध । बहु गर्व बहु मद ।
बहु द्वंद्व बहु खेद । या नाव बद्ध ॥ २२ ॥
२२) काम, क्रोध, गर्व, मद, भांडण, खेद याने भरलेला असा तो बद्ध असतो.
बहु दर्प बहु दंभ । बहु विषये बहु लोभ ।
बहु कर्कश बहु अशुभ । या नाव बद्ध ॥ २३ ॥
२३) दर्प, दंभ, इंद्रियभोग, लोभ, कर्कशपणा, वाईट वृत्ती याने भरलेला असतो तो बद्ध असतो.
बहु ग्रामणी बहु मत्सर । बहु असूया तिरस्कार ।
बहु पापी बहु विकार । या नाव बद्ध ॥ २४ ॥
२४) गांवगुंडगिरी, अतिमत्सर, अति असुया, तिरस्कार, पापी, विकारी असा जो तो बद्ध असतो.
बहु अभिमान बहु ताठा । बहु अहंकार बहु फांटा ।
बहु कुकर्माचा सांठा । या नाव बद्ध ॥ २५ ॥
२५) फार अभिमानी, ताठा, अहंकार, विकल्प, फार कुकर्मी असा तो बद्ध असतो.
बहु कापट्य वादवेवाद । बहु कुतर्क भेदाभेद ।
बहु कृर कृपामंद । या नाव बद्ध ॥ २६ ॥
२६) कपटी, वादविवद करणारा, कुतर्की, भेदाभेद करणारा, क्रूर, कृपामंद, असा जो तो बद्ध म्हणून ओळखावा.
बहु निंदा बहु द्वेष । बहु अधर्म बहु अभिळाष ।
बहु प्रकारीचे दोष । या नाव बद्ध ॥ २७ ॥
२७) निंदा, द्वेष, अधर्मी, अभिलाषी, अशा पुष्कळ दोषानेंयुक्त असा जो त्याला बद्ध म्हणतात.
बहु भ्रष्ट अनाचार । बहु नष्ट येकंकार ।
बहु आनित्य अविचार । या नाव बद्ध ॥ २८ ॥
२८) भ्रष्टपणा, अनाचारी, नष्टपणा, सबगोलंकार, अनीति, अविचारी, असा तो बद्ध असतो.
बहु निष्ठुर बहु घातकी । बहु हत्यारा बहु पातकी ।
तपीळ कुविद्या अनेकी । या नाव बद्ध ॥ २९ ॥
२९) निष्ठुर, घातकी, हिंस्र, पातकी, तापट, कुविद्या असा जो तो बद्ध होय.
बहु दुराशा बहु स्वार्थी । बहु कळह बहु अनर्थी ।
बहु डाईक दुर्मती । या नाव बद्ध ॥ ३० ॥
३०) दुराशा, अति स्वार्थी, भांडणतंटे, अनर्थ, दावा धरणें, दुष्ट बुद्धि ज्याची तो बद्ध समजावा.
बहु कल्पना बहु कामना । बहु तृष्णा बहु वासना ।
बहु ममता बहु भावना । या नाव बद्ध ॥ ३१ ॥
३१) कल्पना, कामना, तृष्णा, वासना, ममता, भावना, या ज्याच्यापाशी व्याप्त आहेत तो बद्ध समजावा.
बहु विकल्पी बहु विषादी । बहु मूर्ख बहु समंधी ।
बहु प्रपंची बहु उपाधी । या नाव बद्ध ॥ ३२ ॥
३२) अति विकल्पी, अति विषादी, अति मूर्ख, अति संबंधीपणा, फार प्रपंची, उपाधी असतो तो बद्ध समजावा.
बहु वाचाळ बहु पाषांडी । बहु दुर्जन बहु थोतांडी ।
बहु पैशून्य बहु खोडी । या नाव बद्ध ॥ ३३ ॥
३३) वाचाळपणा, पाखंडीपणा, दुर्जनता, थोतांडीपणा, लबाडी, खोड्याळपणा ज्याच्याकडे तो बद्ध समजावा.
बहु अभाव बहु भ्रम । बहु भ्रांति बहु तम ।
बहु विक्षेप बहु विराम । या नाव बद्ध ॥ ३४ ॥
३४) नास्तिकपणा, भ्रम, भ्रांति, अज्ञानाचा अंधार, संशय, आळशी असा जो तो बद्ध समजावा.
बहु कृपण बहु खंदस्ती । बहु आदखणा बहु मस्ती ।
बहु असत्क्रिया व्यस्ती । या नाव बद्ध ॥ ३५ ॥
३५) अति कंजुष, झोटिंगपणा, लोकविरुद्धपणा, मस्तपणा, वाईट क्रिया, शास्त्रविरुद्धपणा, या सर्व गोष्टी ज्याच्या ठिकाणी असतात तो बद्ध असतो.
परमार्थविषईं अज्ञान । प्रपंचाचे उदंड ज्ञान ।
नेणें स्वयें समाधान । या नाव बद्ध ॥ ३६ ॥
३६) जो परमार्थाविषयीं अज्ञानी व प्रपंचाविषयीं अति ज्ञान असते व ज्यास समाधान माहीत नसते तो बद्ध असतो.
परमार्थाचा अनादर । प्रपंचाचा अत्यादर ।
संसारभार जोजार । या नाव बद्ध ॥ ३७ ॥
३७) जो परमार्थाचा अनादर करतो व प्रपंचाचा ज्याला अति आदर असतो, ज्याच्या डोक्यावर संसाराचे ओझे असते तो बद्ध असतो.
सत्संगाची नाही गोडी । संतनिंदेची आवडी ।
देहेबुद्धीची घातली बेडी । या नाव बद्ध ॥ ३८ ॥
३८) ज्याला सत्संगाची गोडी नसते पण संतनिंदेची आवड असते. जो देहबुद्धिने घट्ट बांधलेला असतो त्याला बद्ध असे समजतात.
हातीं द्रव्याची जपमाळ । कांताध्यान सर्वकाळ ।
सत्संगाचा दुष्काळ । या नाव बद्ध ॥ ३९ ॥
३९) जो नेहमी द्रव्यचे चिंतन करतो. स्त्रीचें ध्यान करतो. ज्याच्या जीवनांत सत्संग नसतो. त्याला बद्ध असे समजतात.
नेत्रीं द्रव्य दारा पाहावी । श्रवणीं द्रव्य दारा ऐकावी ।
चिंतनीं द्रव्य दारा चिंतावी । या नाव बद्ध ॥ ४० ॥
४०) डोळ्यांनी द्रव्यदारा पहावी, कानांनी द्रव्यदारा ऐकावी, चिन्तन द्रव्य आणि दारेचे करावे अशी ज्याची अवस्था त्याला बद्ध म्हणून ओळखावे.
काया वाचा आणि मन । चित्त वित्त जीव प्राण ।
द्रव्यदारेचें करी भजन । या नाव बद्ध ॥ ४१ ॥
४१) काया, वाचा मनें, चित्त, वित्त, जीव, प्राण, या सर्वांनी जो द्रव्यदारेंचे चिंतनांत गुंततो तो बद्ध असतो.
इन्द्रियें करुन निश्र्चळ । चंचळ होऊं नेदी पळ ।
द्रव्यदारेसि लावी सकळ । या नाव बद्ध ॥ ४२ ॥
४२) द्रव्य आणि दारा यांच्या पायीं जो आपली इंद्रियें निश्चल करतो, त्यांना चंचल होऊ देत नाही तो बद्ध असतो.
द्रव्य दारा तेंचि तीर्थ । द्रव्य दारा तो चि परमार्थ ।
द्रव्य दारा सकळ स्वार्थ । म्हणे तो बद्ध ॥ ४३ ॥
४३) द्रव्यदारा हेच ज्याचे तीर्थ, हाच ज्याचा परमार्थ, हाच ज्याचा संपूर्ण स्वार्थ असतो तो बद्ध असतो.
वेर्थ जाऊं नेदी काळ । संसारचिंता सर्वकाळ ।
कथा वार्ता ते चि सकळ । या नाव बद्ध ॥ ४४ ॥
४४) काळ व्यर्थ न जाऊं देता जो सर्व काळ संसाराची चिंता करतो, ज्याच्या गप्पा गोष्टी सार्या संसाराबद्दल असतात तो बद्ध असतो.
नाना चिंता नाना उद्वेग । नाना दुःखाचे संसर्ग ।
करी परमार्थाचा त्याग । या नाव बद्ध ॥ ४५ ॥
४५) अनेक काळज्या, अनेक चित्ताची अस्वस्थता, नाना दुःखें, परमार्थाचा त्याग करणारा तो बद्ध असतो.
घटिका पळ निमिष्यभरी । दुश्र्चीत नव्हतां अंतरीं ।
सर्वकाळ ध्यान करी । द्रव्यदाराप्रपंचाचें ॥ ४६ ॥
४६) तास, मिनिटें सोडून द्या, पण एकसेकंद सुद्धां ज्याचें मन ासतो.न हलता सदासर्वकाळ द्रव्य, दारा, प्रपंचाचे चिंतन करतें तो बद्द.
तीर्थ यात्रा दान पुण्य । भक्ति कथा निरुपण ।
मंत्र पूजा जप ध्यान । सर्वही द्रव्य दारा ॥ ४७ ॥
४७) ज्याचे तीर्थ, यात्रा, दान, पुण्य, भक्ति, कथा, निरुपण, मंत्र, पूजा, जप ध्यान हे सर्व कांहीं द्रव्य आणि दारा असते, तो बद्ध असतो.
जागृति स्वप्न रात्रि दिवस । ऐसा लागला विषयेध्यास ।
नाहीं क्षणाचा अवकाश । या नाव बद्ध ॥ ४८ ॥
४८) जागेपणीं, स्वप्नामध्यें, रात्री आणि दिवसा ज्याला अशा प्रकारें दृश्यसुखाचा ध्यास लागतो, त्याच्या चिंतनांत गुंतल्यानें ज्याला क्षणभरसुद्धा मोकळा वेळ मिळत नाहीं तो बद्ध असतो.
ऐसें बद्धाचें लक्षण । मुमुक्षपणीम पालटे जाण ।
ऐक तेही वोळखण । पुढिलीये समासी ॥ ४९ ॥
४९) बद्धाचे लक्षण हे असें आहे. मुमुक्षुपणा आला कीं तें बदलते. त्याची ओळख पुढील समासां आहे. ती आतां ऐकावी.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे बद्धलक्षणनाम समास सातवा ॥
Samas Satava Baddha Lakshan
समास सातवा बद्धलक्षण
Custom Search
No comments:
Post a Comment