Tuesday, August 15, 2017

Samas Pahila MangalaCharan समास पहिला मंगलाचरण


Dashak Satava Samas Pahila MangalaCharan
Samas Pahila MangalaCharan. It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is bowing to God Ganesh, Goddess Sharda, SadGuru and Sadhaks who are there for listening Adhyatmya. Mainly he is telling about Maya. Hoe is Maya, what Maya do how we are engulfed in Maya and are separated from Atmadnyanan. He also tells us how to become free from Maya.
समास पहिला मंगलाचरण
श्रीराम ॥
विद्यावंतांचा पूर्वजु । मत्ताननु येकद्विजु ।
त्रिनयेन चतुर्भुजु । फरशपाणी ॥ १ ॥
१) मदानें भरलेले हत्तीचे डोके असलेलाअसा गजानन सर्व विद्यावंतांचा मूळ पुरुष आहे. त्याला तीन डोळे असून चार हात आहेत. त्याच्या हातांत परशु आहे.  
कबेरापासूनि अर्थ । वेदापासून परमार्थ ।
लक्ष्मीपासून समर्थ । भाग्यासि आले ॥ २ ॥
२) कुबेरापासून धन, वेदांपासून परमार्थ व लक्ष्मीपासून ऐश्वर्य प्राप्त होऊन माणूस भाग्यपद मिळवतो.    
तैसी मंगळमूर्ती अद्या । पासूनि जाल्या सकळ विद्या ।
तेणें कवी लाघव गद्या । सत्पात्रें जाले ॥ ३ ॥
३) त्याचप्रमाणें मंगळमूर्ति सर्व विद्यांचे उगमस्थान आहे. त्याच्या कृपेनें कवि उत्तम काव्य रचना करुं शकतात. व मोठी प्रसिद्धी मिळवतात.   
जैसी समर्थांचीं लेकुरें । नाना आळंकारीं सुंदरें ।
मूळ पुरुषाचेनि द्वारें । तैसे कवी ॥ ४ ॥
४) ज्याप्रमाणें श्रीमंताची मुलें नाना अलंकारांनी सुंदर दिसतात. त्याचप्रमाणें मूळ पुरुषाच्या (गजाननाच्या) कृपेनें कवि मोठे शोभून दिसतात.
नमूं ऐसिया गणेंद्रा । विद्याप्रकाशें पूर्णचंद्रा ।
जयाचेनि बोधसमुद्रा । भरितें दाटे बळें ॥ ५ 
५) विद्येच्या प्रकाशांत पूर्णचंद्राप्रमाणे शोभणार्‍या गणेशाला मी नमन करतो. तो पूर्णचंद्र असल्यानें ज्ञानसमुद्राला अपार भरती येते.  
जो कर्तृत्वास आरंभ । मूळपुरुष मुळारंभ ।
जो परात्पर स्वयंभ । आदिअंतीं ॥ ६ ॥
६) त्याच्यामुळे सर्व कर्तृत्वाला उगम आहे. तो मूळ पुरुष आहे. सर्व विश्वाचे उगमस्थान तोच आहे. सर्व विश्वाच्या पलीकडील श्रेष्ठ स्वरुप तोच आहे. सर्वांच्या आधी व नंतर दिसणारा स्वयंभू तोच आहे. 
तयापासून प्रमदा । इच्छा कुमारी शारदा ।
आदित्यापासून गोदा । मृगजळ वाहे ॥ ७ ॥
७) सूर्यापासून मृगजळाचा मोठा ओघ होऊन वाहतो. त्याचप्रमाणे त्या स्वयंभू स्वरुपाला शारदा नावाची मुलगी झाली. ती स्फूरणरुप व स्फूर्तिरुप असल्यानें गतिमान असतें. मूळमाया तीच आहे.
जे मिथ्या म्हणतांच गोवी । माईकपणें लाघवी । 
वक्तयास वेढा लावी । वेगळेपणें ॥ ८ ॥
८) माया मिथ्या आहे. असे म्हणून तिचें अस्तित्व मानावें लागते. तसेच तिला वेगळेपणानें पाहूनच तिच्याबद्दल बोलावें लागते. अशारीतीनें ती सांगणार्‍याला गुंतवून टाकते.   
जे द्वैताची जननी । किं ते अद्वैताची खाणी ।
मूळमाया गवसणी । अनंत ब्रह्मांडांची ॥ ९ ॥ 
९) ही माया द्वैताला जन्म देते. तरी ती अद्वैताची खाण आहे. ती परमात्म्यापासून वेगळी होत नाही. ती अनंत विश्र्वांना झाकून टाकते.
कीं ते अवदंबरी वल्ली । अनंत ब्रह्मांडीं लगडली ।
मूळपुरुषाची माउली । दुहितारुपें ॥ १० ॥
१०) ही मूळमाया म्हणजे विलक्षणपणें पसरणारी जणूं एक वेलच आहे. तिच्यावर अनंत विश्र्वें फुलली आहेत. ती मूळपुरुषाची प्रथम मुलगी व नंतर आई आहे.   
वंदूं ऐसी वेदमाता । आदिपुरुषाची जे सत्ता ।
आतां आठवीन समर्था । सद्गुरुसी ॥ ११ ॥
११) अशी जी वेदमाता शारदा, आदिपुरुषाचे अस्तित्व जिच्या सामर्थ्यानें अनुभवाला येते. तिला मी वंदन करतो. यानंतर समर्थ सद्गुरुचे मी स्मरण करतो.   
जयाचेनि कृपादृष्टी । होये आनंदाची वृष्टी ।
तेणें सुखें सर्व सृष्टी । आनंदमये ॥ १२ ॥
१२) सद्गुरुची कृपादृष्टी झाली तर आनंदाचा पाऊस पडतो. त्या सुखानें सर्व विश्र्व आनंदानें भरुन जातें
किं तो आनंदाचा जनक । सायोज्यमुक्तीचा नायेक ।
कैवल्यपददायक । अनाथबंधु ॥ १३ ॥
१३) श्रीसद्गुरु आनंदाला जन्म देणरा पिता आहे. सायुज्यमुक्तीपर्यंत नेणारा मार्गदर्शक आहे. तो अनाथांचा सहाय्यकर्ता बंधू असून कैवल्यपद मिळवून देतो.   
मुमुक्ष चातकीं सुस्वर । करुणा पाहिजे अंबर ।
वोळे कृपेचा जळधर । साधकांवरी ॥ १४ ॥
१४) मुमुक्षु हा चातकाप्रमाणें जो करुणपणें आकाशाकडे नजर लावून असतो . ढग बरसला की ते जलबिंदू पिऊन तृप्त होतो. तेवढ्याच भक्तिभावानें मुमुक्षुनें सद्गुरुस आळविले कीं, सद्गुरुची कृपा होते. 
किं तें भवार्णवींचें तारुं । बोधें पाववी पैलपारु ।
माहां आवर्तीं आधारु । भाविकांसी ॥ १५ ॥
१५) सद्गुरु हा भवसागरांतून तारुन नेणारे तारुंच आहे. आत्मज्ञानाचा बोध करुन तो पैलतीरास पोहोचवितो. प्रपंचांतील मोठ्या मोठ्या दुःखांत, अडचणींत अडलेल्या भविकांना मोठा आधार आहे.  
किं तो काळाचा नियंता । नांतरी संकटी सोडविता ।
किं ते भाविकांची माता । परम स्नेहाळु ॥ १६ ॥
१६) सद्गुरु काळावर सत्ता गाजवितात. ते संकटांतून सोडवितात. सद्गुरु म्हणजे भाविकांची परम स्नेहाळू माताच समजावी.  
किं तो परत्रींचा आधार । किं ते विश्रांतीची थार ।
नांतरी सुखाचें माहेर । सुस्वरुप ॥ १७ ॥
१७) सद्गुरु परमार्थाचे मार्गदर्शक असतात. भाविकांसाठीं ती एक खरी विश्रांतीची जागा असते. आनंदानें भरलेले सद्गुरु सुखाचें माहेरघरच असतात.  
ऐसा सद्गुरु पूर्णपणी । तुटे भेदाची कडसणी ।
देहविण लोटांगणी । तया प्रभूसी ॥ १८ ॥
१८) सद्गुरु अशारीतीनें परिपूर्ण असतात. त्यांच्या संगतींत वेगळेपणाची भावना सुटते. मी देह आहे ही भावना विसरुन मी सद्गुरुनां वंदन करतो. 
साधु संत आणी सज्जन । वंदूनियां श्रोतेजन ।
आतां कथानुसंधान । सावध ऐका ॥ १९ ॥
१९) साधु, संत, सज्जन आणि श्रोतेयांना वंदन करुन मी पुढें सांगण्यास सुरुवात करतो तरी सावधपणें ऐकावें.     
संसार हाचि दीर्घ स्वप्न । लोभें वोसणाती जन ।
माझी कांता माझें धन । कन्या पुत्र माझे ॥ २० ॥
२०) संसार हेंच एक मोठे स्वप्न आहे. त्या स्वप्नामध्यें आसक्तीनें " माझी बायको, माझा पैसा, माझी मुलगी, माझा मुलगा असें लोक म्हणतात.
ज्ञानसूर्य मावळला । तेणें प्रकाश लोपला ।
अंधकारें पूर्ण जाला । ब्रह्मगोळ अवघा ॥ २१ ॥
२१) आत्मज्ञानाचा सूर्य मावळल्यानें ज्ञानप्रकाश नाहींसा झाला. सर्व विश्र्व अज्ञानरुपी अंधारानें भरुन गेले.  
नाहीं सत्वाचें चांदिणें । कांहीं मार्ग दिसे जेणें ।
सर्व भ्रांतीचेनि गुणें । आपेंआप न दिसे ॥ २२ ॥
२२) सत्वगुणांचे चांदणेंसुद्धा नसल्यानें थोडा मार्ग दिसत होता. तोही दिसत नाही. दृश्य दिसूं लागल्यानें व तेंच खरे असा भ्रम झाल्यानें स्वस्वरुप अनुभवास येईनासें झालें.  
देहबुद्धिअहंकारें । निजेले घोरती घोरें ।
दुःखें आक्रंदती थोरें । विषयसुखाकारणें ॥ २३ ॥
२३) " मी देहच आहे " या दृढ भावनेनें देहाभिमानापोटीं भयंकर घोरु लागले. इंद्रियसुख मिळत नाही म्हणुन दुःखानें रडूं लागले.   
निजेले असतां च मेले । पुन्हा उपजताां च निजेले। 
ऐसे आले आणी गेले । बहुत लोक ॥ २४ ॥
२४) अज्ञानी जीव अशा रीतीनें झोपेंतच मरतात आणि परत जन्माला येऊन झोपी जातात. असे अगणित जीव आजपर्यंत येथें आलें आणि गेले.  
निदसुरेपणें चि सैरा । बहुतीं केल्या येरझारा ।
नेणोनियां परमेश्र्वरा । भोगिले कष्ट ॥ २५ ॥
२५) अज्ञानाच्या झोपेंतच पुष्कळ जीवांनीं जन्ममरणाच्या येरझारा केल्या. भगवंताची ओळख न झाल्यानें त्यांनी कष्ट भोगलें.  
तया कष्टाचें निर्शन । व्हावया पाहिजे आत्मज्ञान ।
म्हणोनि हें निरुपण । अध्यात्मग्रंथ ॥ २६ ॥
२६) आत्मज्ञान करुन घेतले तर हे कष्ट होणार नाहीत. अध्यात्मग्रंथ हे आत्मज्ञान कसें करुन घ्यावें हेंच सांगतात. 
सकळ विद्येमध्यें सार । अध्यात्मविद्येचा विचार ।
दशमोध्याईं  सारंगधर । भगवद्गीतेसि बोलिला ॥ २७ ॥   
२७) जगांतील सर्व विद्यांमध्यें श्रेष्ठविद्या म्हणजे अध्यात्मविद्या असे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायांत सांगितले आहे.   
याकारणें अद्वैतग्रंथ । अध्यात्मविद्येचा परमार्थ ।
पाहावया तोचि समर्थ । जो सर्वांगे श्रोता ॥ २८ ॥
२८) या कारणानें अध्यात्मविद्येमध्यें सांगितलेला परमार्थ अद्वैतग्रंथाद्वारे समजण्यास अवघड असतो. आपल्या सर्वांगाचे कान करुन ऐकणारा श्रोताच तो अध्यात्मग्रंथ समजण्यास समर्थ, पात्र होतो.  
श्र्लोक
अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥
जयाचे चंचल हृदये । तेणे ग्रंथ सोडूं चि नये ।
सोडितां अलभ्य होये । अर्थ येथीचा ॥ २९ ॥
२९) ज्या माणसाचे चित्त चंचल आहे, त्यानें हा अध्यात्मग्रंथ वाचूच नये. त्यानें तो वाचण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तो बरोबर समजणार नाही. 
जयास जोडला परमार्थ । तेणें पाहावा हा ग्रंथ ।
अर्थ शोधितां परमार्थ । निश्र्चयें बाणे ॥ ३० ॥
३०) ज्याला परमार्थ खरोखर जोडाचा आहे त्यानेच हा ग्रंथ वाचावा. अर्थाचा शोध घेता घेता त्याला तो नक्की समजेल व खरोखर परमार्थ अंगी बाणेल.  
जयासि नाहीं परमार्थ । तयासि न कळे येथीचा अर्थ ।
नेत्रेंविण निधानस्वार्थ । अंधार कळेना ॥ ३१ ॥   
३१) ज्याला परमार्थाची आस्था नाही, चाड नाही, त्याला या ग्रंथाचा अर्थ समजणार नाही. हे म्हणजे आंधळ्याला दृष्टीच्या अभावी द्रव्याचा सांठा सापडत नाही, त्याचप्रमाणें होते. 
येक म्हणती मर्‍हाटें काये । हें तों भल्यांसि ऐकों नये ।
तीं मूर्खें नेणती सोये। अर्थान्वयाची ॥ ३२ ॥
३२) कांही लोक म्हणतात, मराठींत कांहीं अर्थ नाही. चांगल्या माणसांनी मराठींतील ग्रंथ ऐकू नयेत. असें म्हणणारी माणसें मूर्ख असतात. शब्दांचा अर्थ समजून घेण्याची पात्रता त्यांच्याजवळ नसते.
लोहाची मांदूस केली । नाना रत्नें साठविलीं ।
ते अभाग्यानें त्यागिली । लोखंड म्हणौनी ॥ ३३ ॥
३३) एक लोखंडाची पेटी करुन त्यांत मौल्यवान रत्नें ठेविली. ज्याला ती पेटी मिळाली. त्याने ती पेटीच लोखंडाची म्हणून टाकून दिली. 
तैसी भाषा प्राकृत । अर्थ वेदांत आणि सिद्धांत ।
नेणोनि त्यागी भ्रांत । मंदबुद्धिस्तव ॥ ३४ ॥
३४) त्याचप्रमाणें मराठी भाषेच्याबद्दल विद्वान असें वागतात. मराठींत अर्थ भरलेला आहे. वेदांत व सिद्धांत भरलेले आहेत. हें न समजल्यानें मूर्ख व खोट्या कल्पना करणारे तथाकथित विद्वान लोक तीचा त्याग करतात.    
आहाच सांपडतां धन । त्याग करणें मूर्खपण ।
द्रव्य घ्यावें सांठवण । पाहोंचि नये ॥ ३५ ॥   
३५) कष्ट न करतां धन सांपडलें तर त्याचा त्याग करणें मूर्खपणा आहे. तें द्रव्य कशांत साठवून ठेवले आहे. हे बघुच नये. 
परिस देखिला आंगणीं । मार्गी पडिला चिंतामणी ।
आव्हावेल माहां गुणी । कूपांमधें ॥ ३६ ॥
३६) आपल्या अंगणांत पडलेला परिस, रस्त्यांत पडलेला चिंतामणी, व उजवीकडून वाढणारा आव्हावेल विहीरींत उगवला म्हणून टाकून देऊं नये.  
तैसे प्राकृतीं अद्वैत । सुगम आणी सप्रचित ।
अध्यात्म लाभे अकस्मात । तरी अवश्य घ्यावें ॥ ३७ ॥
३७) त्याचप्रमाणें मराठीमध्यें सोपे आणि अनुभवसिद्ध आत्मज्ञान मिळत असेल तर तें अवश्य घ्यावें.
न करितां वित्पत्तीचा श्रम । सकळ शास्त्रार्थ होये सुगम ।
सत्समागमाचे वर्म । तें हें ऐसें असे ॥ ३८ ॥
३८) फक्त सत्समागम केल्यानें श्रम न करितां शास्त्रार्थ सहज समजतो. संत संगतीचे रहस्य हें असें आहे.  
जें वित्पत्तीनें न कळे । तें सत्समागमें कळे ।
सकळ शास्त्रार्थ आकळे । स्वानुभवासी ॥ ३९ ॥
३९) नुसत्या विद्वत्तेनें कळत नाहीं, तें सत्समागमानें कळते. सर्व शास्त्रार्थ अनुभवाच्या कक्षेंत येतो.
म्हणौनि कारण सत्समागम । तेथें नलगे वित्पत्तीश्रम ।
जन्मसार्थकाचें वर्म । वेगळेंचि आहे ॥ ४० ॥  
४०) म्हणुन सतसमागम अवश्य करावा. त्यामुळे आत्मज्ञान मिळविण्यासाठी कराव्या लागणार्‍या श्रमांची जरुरी नसते. कारण जन्म सार्थक करुन घेण्याचे वर्म कांहीं वेगळेंच आहे. 
श्र्लोक 
भाषाभेदाश्च वर्तन्ते ह्यर्थ एको न संशयः ।
पात्रद्वये यथा खाद्यं स्वादभेदो न विद्यते ॥
भाषापालटें कांहीं । अर्थ वायां जात नाहीं ।
कार्यसिद्धि ते सर्वहि । अर्थाचपासीं ॥ ४१ ॥ 
४१) भाषा बदलली म्हणून अर्थ बदलत नाही. आपल्या कामांत यश मिळण्यासाठीं अर्थच उपयोगी पडतो.    
तथापी प्राकृताकरितां । संस्कृताची सार्थकता ।
येर्‍हवीं त्या गुप्तार्था । कोण जाणे ॥ ४२ ॥
४२) मराठीमध्यें लिहिल्यानें संस्कृतग्रंथांत एवढा अर्थ भरलेला आहे हे लक्षांत आले. ऐरव्हीं हें रहस्य समजले असते कां नाही माहित नाही.
आतां असो हें बोलणें । भाषा त्यागूनि अर्थ घेणें ।
उत्तम घेऊन त्याग करणें । सालीटरफलांचा ॥ ४३ ॥
४३) आतां हे बोलणें पुरे. आपण जसें फळें खातांना त्यांच्या साली व टरफले काढून टाकून देतो. तसेच वेदांतग्रंथांच्या भाषेकडे लक्ष न देता अर्थाचेच आकलन करुन घ्यावें  
अर्थ सार भाषा पोचट । अभिमानें करावी खटपट ।
नाना अहमतेनें वाट । रुधिली मोक्षाची ॥ ४४  ॥
४४) अर्थ सार असून भाषा असार आहे. पण केवळ अभिमानाने मोक्षाची वाट रोखून धरली जाते.  
शोध घेतां लक्ष्यांशाचा । तेथें आधीं वाच्यांश कैंचा ।
अगाध महिमा भगवंताचा । कळला पाहिजे ॥ ४५ ॥
४५) शब्द हा वाच्यांश आहे. अर्थ हा लक्ष्यांश आहे. आधीं वाच्यांश लागतो. पण अर्थाचा शोध घेऊ लागल्यावर शब्द मागें पडतो. आणि भगवंत या दोही पलीकडे आहे. हे सकजून घेतलें पाहिजे.   
मुकेपणाचेम बोलणें । हें जयाचें तोचि जाणे ।
स्वानुभवाचिये खुणे । स्वानुभवी पाहिजे ॥ ४६ ॥ 
४६) मुक्या माणसाची भाषा माहितगारालाच कळते, त्याचप्रमाणे स्वानुभवी पुरुषाच्या बोलण्याचा अर्थ फक्त स्वानुभवी पुरुषांनाच कळतो. 
अर्थ जाणे अध्यात्माचा । ऐसा श्रोता मिळेल कैंचा ।
जयासि बोलतां वाचेचा । हव्यासचि पुरे ॥ ४७ ॥
४७) ज्याला अध्यात्माच्या निरुपणाचा अर्थ कळेल असा श्रोता कसा मिळेल, पण मिळालाच तर अशा श्रोत्याशी संभाषण करतांना बोलण्याची हौस फिटते.   
परीक्षवंतांपुढें रत्न । ठेवितां होये समाधान ।
तैसें ज्ञानियांपुढें ज्ञान । बोलावें वाटे ॥ ४८ ॥
४८) ज्याला रत्नांची पारख आहे, त्याला आपलीं रत्नें दाखविण्यानें बरें वाटतें, तसेंच ज्ञानी लोकांच्याजवळ ज्ञान बोलावेसें वाटते.  
मायाजाळें दुश्र्चीत होय । तें निरुपणीं कामा न ये ।
संसारिकां कळे काये । अर्थ येथीचा ॥ ४९ ॥
४९) मायेच्या जाळ्यांत अडकलेल्याचे मन स्थिर नसतें. त्याला अध्यात्माचे निरुपण समजत नाही. संसारी माणसाला अद्वैतग्रंथांतील अर्थ कळणें कठिण असते.
श्र्लोक 
व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन । 
बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ॥
वेवसाईं जो मळिण । त्यासि न कळे निरुपण ।
येथें पाहिजे सावधपण । अतिशयेंसीं ॥ ५० ॥
५०) अस्थिर माणसाचा मनावर ताबा नसतो, तो निश्र्चयी नसतो, त्याला हेम निरुपण कळत नाही. तें कळण्यासाठीं सावधानता, दृढ निश्र्चय व मनाची अतिशय एकाग्रता पाहिजे. 
नाना रत्नें नाना नाणीं । दुश्र्चीतपणें घेतां हानी ।
परीक्षा नेणतां प्राणी । ठकला तेथें ॥ ५१ ॥
५१) एखाद्या माणसाने नाना रत्नें व नाना नाणी त्यांची माहिती, परीक्षा न घेतां घेतली तर नुकसान होते. त्याची तेथें फसवणुकच होते.  
तैसें निरुपणीं जाणा । आहाच पाहातां कळेना ।
मर्‍हाटेंचि उमजेना । कांहीं केल्यां ॥ ५२ ॥ 
५२) अध्यात्मनिरुणासाठी हेंच लागू पडते. ग्रंथांचा अर्थ सारखासारखा बघुन कळत नाही. तो मराठींत असला तरी कळत नाही.   
जेथें निरुपणाचें बोल । आणी अनुभवाची वोल ।
तें संस्कृतापरीस खोल । अध्यात्मश्रवण ॥ ५३ ॥
५३) ज्या अध्यात्म निरुपणामध्यें स्वानुभवाचा ओलवा असतो, त्याचे श्रवण संस्कृताप्रमाणेच सखोल असते. 
मायाब्रह्म वोळखावें । तयास अध्यात्म म्हणावें ।
तरी तें मायेचे जाणावें । स्वरुप आधीं ॥ ५४ ॥
५४) माया व ब्रह्म हे वेगळे ओळखावे म्हणजेच तें अध्यात्म होय. पण ह्याआधीं मायेचे स्वरुप कसें आहे तें जाणून घ्यावें. 
माया सगुण साकार । माया सर्वस्व विकार ।
माया जाणिजे विस्तार । पंचभूतांचा ॥ ५५ ॥
५५) माया त्रिगुणी आहे. सारखा बदल होणारी माया आहे. माया हा पंदमहाभूतांचा विस्तार व पसारा आहे.  
माया दृश्य दृष्टीस दिसे । माया भास मनासि भासे ।
माया क्षणभंगुर नासे । विवेक पाहातां ॥ ५६ ॥
५६) माया ही दृष्टीला दिसते. ती मनाला भासते. माया क्षणभंगुर आहे. ती नाशवंत आहे. विचारानें तीचा शोध घेतल्यावर हें समजते.   
माया अनेक विश्र्वरुप । माया विष्णूचें स्वरुप ।
मायेची सीमा अमूप । बोलिजे तितुकी ॥ ५७ ॥
५७) माया विश्र्वांत अनेक रुपानें भरलेली आहे. ती विष्णुस्वरुप आहे. त्याच्यासारखी मोहिनी घालणारी व मायेला मर्यादा नाही. तिच्याबद्दल जितकें सांगतो ते कमीच आहे.  
माया बहुरुपी बहुरंग । माया ईश्र्वराचा संग ।
माया पाहातां अभंग । अखिळ वाटे ॥ ५८ ॥
५८) माया बहुरुप्याप्रमाणें अनेक रंगांनी अनेक प्रकारें व्यक्त होते. माया ईश्र्वराच्या संगतींत राहाते. बाह्यात्कारें माया अभंग व परिपूर्ण वाटते.   
माया सृष्टीची रचना । माया आपुली कल्पना ।
माया तोडितां तुटेना । ज्ञानेंविण ॥ ५९ ॥
५९) या सर्व सृष्टीची रचना मायेमुळेंच होते. आपली कल्पना ही मायाच आहे. माया ज्ञाानानेंच नाहीशी होते, त्यावाचून ती तुटतही नाही. 
ऐसी माया निरोपिली । स्वल्प संकेतें बोलिली ।
पुढें वृत्ति सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ ६० ॥
६०) थोडक्यांत व खुणेनें हें मायेचे वर्णन झाले. पुढचा विषय ऐकण्यासाठीं श्रोत्यानीं आपली वृत्ती सावध ठेवली पाहीजे. 
पुढें ब्रह्मनिरोपण । निरोपिलें ब्रह्मज्ञान ।
जेणें तुटे मायाभान । येकसरें ॥ ६१ ॥
६१) पुढें ब्रह्म व ब्रह्मज्ञाचे निरुपण केले आहे. त्यानें माया तत्काळ नष्ट होईल.   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मंगलाचरणनाम समास पहिला ॥
Samas Pahila MangalaCharan 
समास पहिला मंगलाचरण


Custom Search

No comments:

Post a Comment