Saturday, August 19, 2017

Samas Tisara ChaturdashaBrahma Nirupan समास तिसरा चतुर्दशब्रह्म निरुपण


Dashak Satava Samas Tisara ChaturdashaBrahma
Nirupan Samas Tisara ChaturdashaBrahma Nirupan, It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is describing Fourteen Brahmas. Each and every brahma with the qua;ities is described here. This is for knowing real, true ParBrahma which has no end. We will come to know about ParaBrahma in this samas.
समास तिसरा चतुर्दशब्रह्म निरुपण
श्रीराम ॥
श्रोतां व्हावें सावधान । आतां सांगतों ब्रह्मज्ञान ।
जेणें होये समाधान । साधकाचें ॥ १ ॥
१) श्रोत्यांनी आतां लक्षपूर्वक ऐकावे. मी आतां ब्रह्मज्ञान सांगणार आहे. तें ऐकले कीं, साधकांचे समाधन होईल. 
रत्नें साधायाकारणें । मृत्तिका लागे येकवटणें ।
चौदा ब्रह्मांची लक्षणें । जाणिजे तैसीं ॥ २ ॥
२) खाणींमधलीं रत्नें मातींतून काढावी लागतात. तसेंच आधी चौदा ब्रह्में कोणती व त्यांची लश्रणें यांचे वर्णन ऐकल्यावर शुद्ध ब्रह्म गवसेल. 
पदार्थेंविण संकेत । द्वैतावेगळा दृष्टांत ।
पूर्वपक्षेंविण सिद्धांत । बोलतांचि न ये ॥ ३ ॥
३) जें सूक्ष्म व अतिंद्रिय आहे. त्याचे लक्षण समजण्यासाठीं दृश्य पदार्थाचा आधार घ्यावा लागतो. द्वैताशिवाय तो देता येत नाही. तसेच पूर्वपक्ष नीट मांडल्याशिवाय सिद्धांत सांगता येत नाही.   
आधीं मिथ्या उभारावें । मग तें वोळखोन सांडावें ।
पुढें सत्य तें स्वभावें । अंतरीं बाणे ॥ ४ ॥
४) जें खोटे आहे त्याचे सविस्तर वर्णन आधी करावे. त्यामधले दोष शोधून समजून घेतल्यावर तें बाजूस काढल्यावर खरें आहे तें अंतःकरणांत ठाम बसते.   
म्हणौन चौदा ब्रह्मांचा संकेत । बोलिला कळाया सिद्धांत ।
येथें श्रोतीं सावचित । क्षण येक असावें ॥ ५ ॥
५) हें लक्षांत घेऊनच चौदा ब्रह्मांच्या खुणा सांगितल्यावर शुद्ध ब्रह्म कसें आहें, तें ध्यानीं येईल. श्रोत्यांनी क्षणभर सावधानतेनें ऐकावे. 
पहिलें तें शब्दब्रह्म । दुजें मीतिकाक्षरब्रह्म । 
तिसरें खंब्रह्म । बोलिली श्रुती ॥ ६ ॥
चौथे जाण सर्वब्रह्म । पांचवें चैतन्यब्रह्म । 
साहावें सत्ताब्रह्म । साक्षब्रह्म सातवें ॥ ७ ॥
आठवें सगुणब्रह्म । नवें निर्गुणब्रह्म ।
दाहावें वाच्यब्रह्म । जाणावें पैं ॥ ८ ॥
अनुभव तें अक्रावें । आनंदब्रह्म तें बारावें । 
तदाकार तेरावें । चौदावें अनुर्वाच्य ॥ ९ ॥
६-९) पहिले शब्दब्रह्म, दुसरें ॐ एकाक्षरब्रह्म, तिसरें श्रुतीनें सांगितलेले खंब्रह्म, चौथे सर्वब्रह्म, पांचवे चैतन्यब्रह्म, सहावे सत्तब्रह्म, सातवें साक्षब्रह्म, आठवें सगुणब्रह्म, नववे निर्गुणब्रह्म, दहावे वाच्यब्रह्म, अकरावें अनुभवब्रह्म, बारावें आनंदब्रह्म, तेरावें तदाकार ब्रह्म, चौदावें अनिर्वाच्य ब्रह्म अशी ही चौदा ब्रह्में 
ऐसीं हे चौदा ब्रह्में । यांचीं निरोपिली नामें ।
आतां स्वरुपाचीं वर्में । संकेत दाऊं ॥ १० ॥
१०) चौदा ब्रह्मांची नावें सांगितली. आतां त्यंच्या स्वरुपांची वर्मे, रहस्यें खुणांनी सांगतो.
अनुभवेंविण भ्रम । या नांव शब्दब्रह्म ।
आतां मीतिकाक्षरब्रह्म । तें येकाक्षर ॥ ११ ॥
११) साक्षात अनुभव नसतां नुसत्या शब्दांनी तें ब्रह्म असें आहे, तसे आहे असे भ्रमाने सांगणे म्हणजे शब्दब्रह्म होय. ॐ या एकाक्षरानें दाखविले जाणारे तें मितीकाक्षर ब्रह्म होय.
खंशब्दें आकाशब्रह्म । महादाकाश व्यापकधर्म ।
आतां बोलिलें सूक्ष्म । सर्वब्रह्म ॥ १२ ॥
१२) खं नावाने आकाशब्रह्म समजते. म्हणजेच सर्व व्यापक महद्आकाश. आतां सूक्ष्म असलेले सर्वब्रह्म सांगतो. 
पंचभूतांचें कुवाडें । जें जें तत्त्व दृष्टी पडे ।
तें तें ब्रह्मचि चोखडें । बोलिजेत आहे ॥ १३ ॥
१३) पंचभूतांच्या अवाढव्य गुंतागुंतीमध्यें जें जें तत्व नजरेस पडते तें तें खरें ब्रह्म असे समजतात. तें सूक्ष्म ब्रह्म होय. 
या नाव सर्वब्रह्म । श्रुतिआश्रयाचें वर्म । 
आतां चैतन्यब्रह्म । बोलिजेल ॥ १४ ॥
१४) याचे नांव सर्वब्रह्म आहे. सर्वं खलु इदं ब्रह्म या श्रुतींचा आधार याला आहे. आतां चैतन्यब्रह्म सांगतो.   
पंचभूतादि मायेतें । चैतन्य चि चेतवितें ।
म्हणौनि त्या चैतन्यातें । चैतन्ब्रह्म बोलिजे ॥ १५ ॥ 
१५) माया आणि पंचमहाभूतें या सर्वांना प्राण देऊन चालविणारे मूळ चैतन्यच होय. म्हणून त्याला चैतन्यब्रह्म म्हणतात. 
चैतन्यास ज्याची सत्ता । तें सत्ताब्रह्म तत्वता ।
तये सत्तेस जाणता । या नाव साक्षब्रह्म ॥ १६ ॥
१६) चैतन्यास ज्याच्या सत्तेचा आधार तें सत्ताब्रह्म होय. त्या सत्तेला जाणणारे ते साक्षब्रह्म होय.  
साक्षत्व जयापासूनी । तें हि आकाळिलें गुणीं ।
सगुणब्रह्म हे वाणी । तयासि वदे ॥ १७ ॥
१७) साक्षित्व म्हणजे वेगळेपणाने पाहाणें किंवा जाणणे. हा गुणच असल्यानें साक्षब्रह्माला सगुणब्रह्म हा शब्द लावतात. 
जेथें नाहीं गुणवार्ता । तें निर्गुणब्रह्म तत्वता ।
वाच्यब्रह्म तें हि आतां । बोलिजेल ॥ १८ ॥
१८) जेथें गुणांना स्थानच नाही, तें खरें निर्गुणब्रह्म होय. आतां वाच्यब्रह्म काय तें सांगतो.  
जें वाचें बोलतां आलें । तें वाच्यब्रह्म बोलिलें ।
अनुभवासि कथिलें । नवचे सर्वथा ॥ १९ ॥
१९) वाणीनें ज्याचे वर्णन करता येते. ते वाच्यब्रह्म म्हटलेले आहे. ब्रह्म स्वतः अनुभवावे लागते व तो शब्दांनी सांगता येत नाही.
या नांव अनुभवब्रह्म । आनंदवृत्तीचा धर्म ।
परंतु याचेंहि वर्म । बोलिजेल ॥ २० ॥
२०) असें शब्दांच्या पलीकडे असलेले केवळ अनुभवास येणारे तें अनुभव ब्रह्म होय. आनंद हा वृत्तीचा गुण आहे. परंतु आनंदब्रह्माचेही वर्म सांगतो.  
ऐसें हें ब्रह्म आनंद । तदाकार तें अभेद ।
अनुर्वाचीं संवाद । तुटोन गेला ॥ २१ ॥
२१) आनंदाचा अनुभव घेणारी वृत्ती जेथें असते तें आनंदब्रह्म. समरस होऊन अभेद घडतो तें तदाकार ब्रह्म होय. ज्या ठिकाणीं वाणी व मन दोन्हींही नसते व जें सांगता येत नाही, तें अनिर्वाच्यब्रह्म होय.   
ऐसीं हे चौदा ब्रह्में । निरोपिलीं अनुक्रमें ।
साधकें पाहातां भ्रमें । बाधिजेना ॥ २२ ॥
२२) अशी चौदा ब्रह्में अनुक्रमें सांगितली. साधकांनी ती नीट समजून घेतली तर अज्ञाानानें होणारा भ्रम होणार नाही.  
ब्रह्म जाणावें शाश्वत । माया तेचि अशाश्वत ।
चौदा ब्रह्मांचा सिद्धांत । होईल आतां ॥ २३ ॥
२३) शुद्ध ब्रह्म हें शाश्वत आहे व माया ही अशाश्वत आहे. हे पक्के लक्षांत ठेवावे. त्यामुळे पुढें चौदा ब्रह्मांचे निरसन केलेले नीट समजेल.  
शब्दब्रह्म तें शाब्दिक । अनुभवेंविण माईक ।
शाश्वताचा विवेक । तेथें नाहीं ॥ २४ ॥
२४) शब्दब्रह्मांत नुसते शाब्दिकज्ञान ज्यांत अनुभव नाही. तेथें शाश्वताचा विचार नसतो. ते मायेंतच असते.  
जें क्षर नाहीं अक्षर । तेथें कैंचें मीतिकाक्षर ।
शाश्वताचा विचार । तेथेहि न दिसे ॥ २५ ॥
२५) सद्वस्तु विनाशी नाहीं तशीच अविनाशी नाही. म्हणून ती एका अक्षरानें वर्णन करणें योग्य नाही. शिवाय अक्षर ही मानवी कल्पना मायेच्या कक्षेंतील म्हणजे शाश्वताचा विचार नाही.  
खंब्रह्म ऐसें वचन । तरी सुन्यातें नासी ज्ञान ।
शाश्वताचें अधिष्ठान । तेथेहि न दिसे ॥ २६ ॥  
२६) खंब्रह्म म्हणजे आकाश हेंच ब्रह्म होय. असें श्रुतिवचन आहे. पण आकाश शून्यरुप आहे. ब्रह्मज्ञानानें शून्य नाहीसें होते. म्हणून येथेंही शाश्वतता नाही.              
सर्वत्रास आहे अंत । सर्वब्रह्म नासिवंत ।
प्रळये बोलिला निश्र्चित । वेदांतशास्त्रीं ॥ २७ ॥
२७) विश्र्वरुपानें दिसणारें सर्व दृश्य नाशिवंत आहे. म्हणजे सर्वब्रह्म विश्वाबरोबर लय पावते. वेदांता या विश्वाच्या प्रळयाची कल्पना दिली आहे. 
ब्रह्मप्रळये मांडेल जेथें । भूतान्वय कैचा तेथें ।
म्हणौनियां सर्वब्रह्मातें । नाश आहे ॥ २८ ॥
२८) ब्रह्मदेवाची रात्र सुरु होऊन प्रलय मांडला म्हणजे भूलोकापर्यंतची पंचमहाभूतें विरायला लागतात. त्यामुळें सर्वब्रह्मही नाशिवंत आहे. 
अचळासि आणी चळण । निर्गुणास लावितां गुण ।
आकारास विचक्षण । मनीतना ॥ २९ ॥ 
२९) मूळ अचल, स्थिर आहे त्यास चंचलपणा लावला जातो. जे निर्गुणी आहेत्यास गुण लावले जातात. त्यामुळें आकाराला आलेल्या वस्तूला ज्ञानी शाश्वत ब्रह्म मानीत नाहीत. 
जें निर्माण पंचभूत । तें प्रत्यक्ष नासिवंत ।
सर्वब्रह्म हे मात । घडे केवी ॥ ३० ॥
३०) जें भूत निर्माण झालेले आहे, अशा पंचभूतात्मक विश्वाला नाश आहे. म्हणून हें सर्व ब्रह्मच आहे असें मान्य कसें करावयाचें?     
असो आतां हें बहुत । सर्वब्रह्म नासिवंत । 
वेगळेपणास अंत । पाहाणें कैचें ॥ ३१ ॥
३१) याहून अधिक सांगावयाचे कारण नाही. सर्वब्रह्म नाशिवंत आहे. हें वेगळेंपणाने पाहणारा द्रष्टा त्यालाही अंत आहे. तर नाशिवंत ब्रह्म कोणी पहावें?     
आतां जयास चेतवावें । तेंचि माईक स्वभावें ।
तेथें चैतन्याच्या नावें । नास आला ॥ ३२ ॥
३२) ज्या विश्वांत चैतन्य जिवंत ठेवतें तें विश्व मायीकच. म्हणून खोटेपणानें भासणार्‍या विश्वाला चालना देणारे चैतन्य त्या विश्वाबरोबर नाश पावते. 
परिवारेंविण सत्ता । ते सत्ता नव्हे तत्वता ।
पदार्थेंविण साक्षता । तेहि मिथ्या ॥ ३३ ॥
३३) सत्ताब्रह्म परिवारावर, कनिष्ठांवर सत्ता चालते. पण तोच परिवार नसेल तर सत्तेला अर्थ नाही. म्हनजे सत्ताब्रह्म खरें नाही. साक्षब्रह्म पदार्थांना वेगळेपणाने पाहाणे म्हणजे साक्षित्व. पण पदार्थच नाहीत तेथें साक्षित्वाला कांही अर्थ नाही. म्हणजेच साक्षब्रह्म खरें नाही.    
सगुणास नाश आहे । प्रत्यक्षास प्रमाण काये ।
सगुणब्रह्म निश्र्चयें । नासिवंत ॥ ३४ ॥
३४) जें जें गुणांनी वेढलेलें आहें तें नाशिवंत आहे. असा प्रत्यक्ष अनुभव येतो त्याला प्रमाणाची जरुरी नाही. म्हणुन सगुण ब्रह्म नाशिवंत आहे, हें निश्र्चयपूर्वक.   
निर्गुण ऐसें जें नांव । त्या नावास कैचा ठाव ।
गुणेंविण गौरव । येईल कैचें ॥ ३५ ॥
३५) निर्गुणब्रह्म-- गुणमय दृश्य सृष्टी हा शब्दांचा भाग आहे. जेथे गुण नाहीत तेथे शब्दही नाहीत. म्हणजेच निर्गुण हा नुसता एक शब्दच आहे. वस्तुचा बोध नाही, गुणच नाहीत तर वस्तुही नाही. मग वर्णन कसलें करावयाचे?   
माया जैसें मृगजळ । ऐसें बोलती सकळ । 
कां तें कल्पनेचें आभाळ । नाथिलेंची ॥ ३६ ॥
३६) ज्ञानी असें सांगतात कीं, माया मृगजळासारखीं आहे. हें दृश्य विश्व म्हणजे कधींच निर्माण न झालेलें कल्पनेंचे अभ्र आहे. 
ग्रामो नास्ति कुतः सीमा । जन्मेंविण जीवात्मा ।
अद्वैतासी उपमा । द्वैताची ॥ ३७ ॥
३७) जेथें गांवच नाही तेथें त्या गावांची हद्द कशी सांगणार.  जन्म झाला म्हणुन जीवात्मा आहे असे आपण म्हणतो पण जर जन्मच झाला नाहीं तर जीवात्मा आहे असे म्हणता येत नाही. जेथें गुणमय विश्वच मृगजळासारखें तेथें गुणांच्या पलीकडील निर्गुण ब्रह्म खरें मानता येत नाही. ब्रह्म सगुण नाही तसेंच तें निर्गुण नाही. द्वैताच्या अनुभवामध्यें ज्या कल्पना आपण वापरतो त्याच कल्पना आपण अद्वैत पतमवस्तु सांगण्यास वापरतो. पण त्यामुळें सद्वस्तु जशी आहे तशी ग्रहण होऊ शकत नाही.     
मायेविरहित सत्ता । पदार्थेंविण जाणता ।
आविद्येंविण चैतन्यता । कोणास आली ॥ ३८ ॥
३८) मायेच्या पसार्‍यांत सत्ता वावरते. पदार्थांत जाणतेपणा वावरतो. अविद्येंत चित्शक्तीचा खेळ चालतो. 
सत्ता चैतन्यता साक्षी । सर्व हि गुणाचपासीं ।
ठाईचें निर्गुण त्यासी । गुण कैचें ॥ ३९ ॥
३९) सत्ता, साक्षित्व, व चैतन्य या कल्पना माया, दृश्य पदार्थ व अज्ञान यामुळें निर्माण होतात. पण ह्या तिन्ही गोष्टी गुणांच्या कक्षेंतील आहेत. ज्या स्वरुपाला (शुद्ध ब्रह्म) गुणांचा संपर्कच नाही तेथे हें सर्व लटकें पडतें. 
ऐसें जें गुणरहित । तेथें नामाचा संकेत ।
तोचि जाणावा अशाश्वत । निश्र्चयेंसी ॥ ४० ॥
४०) असें जें गुणरहित ब्रह्म तें निर्गुण या शब्दाच्या खुणेनें सांगावयाचे. पण तो शब्द व त्यानें दर्शविलेला संकेत दोन्ही निश्र्चयपूर्वक अशाश्वत आहेत. 
निर्गुण ब्रह्मासि संकेतें । नामें ठेविलीं बहुतें ।
तें वाच्यब्रह्म त्यातें । नाश आहे ॥ ४१ ॥
४१) गुणरहित ब्रह्माला खुणेनें ओळखण्यासाठीं पुष्कळ नावें देतात. म्हणून त्यांना वाच्यब्रह्म म्हणतात. परंतु तें सर्व नाशिवंत आहे. 
आनंदाचा अनुभव । हाहि वृत्तीचाचि भाव ।
तदाकारीं ठाव । वृत्तीस नाहीं ॥ ४२ ॥
४२) अनुभवब्रह्म-- आनंदब्रह्म -- आनंद होतो हा वृत्तीचाच भाग आहे. व त्याचा अनुभव त्या वृत्तीतच येतो. त्यामुळें हे दोन्ही वृत्ती बरोबर नाश पावणारे. तदाकारब्रह्म-- ब्रह्माशी तदाकार झाल्यानंतर वृत्ती राहू शकत नाही. परंतु तदाकारब्रह्मांत अज्ञान शिल्लक असल्यानें तसें होत नाही. त्यामुळे ते शुद्ध ब्रह्म नाही. 
अनुर्वाच्य याकारणें । संकेत वृत्तीच्या गुणें ।
तया संकेतास उणें । निवृत्तीनें आणिलें ॥ ४३ ॥
४३) अनुर्वाच्यब्रह्म-- ब्रह्मज्ञानास अनुर्वाच्य असें वृत्तीच्या अनुरोधानें म्हणतात. म्हणून हें नुसते सांकेतीक आहे. परंतु शुद्ध ब्रह्माशी तदाकार झाल्यावर वृत्ती उरतच नाही. म्हणून त्यास अनिर्वाच्य म्हणणे गौणच आहे. 
अनुर्वाच्य ते निवृत्ती । तेचि उन्मनीची स्थिती ।
निरोपाधी विश्रांती । योगियांची ॥ ४४ ॥
४४) मन वृत्तीमय असते. त्याच्या बदल होऊन मग निवृत्ती येते. यालाच उन्मनी अवस्था म्हणतात.  यामधें साधक बंधनमुक्त, मर्यादामुक्त असतो. यामुळें योगीजनांची हीच विश्रांतीची जागा असते. 
वस्तु जे कां निरोपाधी । तेचि सहज समाधी ।
जेणें तुटे आदिव्याधी । भवदुखाची ॥ ४५ ॥
४५) उपाधिशून्य सद्वस्तु स्वतः बनणें म्हणजेच सहजसमाधि. यामुळें संसारांतील आधी व्याधी नष्ट होतात. 
जो उपाधीचा अंत । तोचि जाणावा सिद्धांत ।
सिद्धांत आणी वेदांत । धादांत आत्मा ॥ ४६ ॥
४६) सर्व उपाधींचा नाश होणें हाच ब्रह्मसाक्षात्कार होय. वेदान्ताचा अखेरचा सिद्धांत हाच आहे. 
असो ऐसें जें शाश्वत ब्रह्म । जेथें नाहीं मायाभ्रम ।
अनुभवी जाणे वर्म । स्वानुभवें ॥ ४७ ॥
४७) असो. असें जें शाश्वत ब्रह्म आहे तेथें माया अगर मायेचा भ्रमसुद्धा नाही. अज्ञान, दृश्य, कल्पना कांहींच नाही. जें साधक शुद्ध ब्रह्माचा साक्षात अनुभव घेतात, त्यांना परब्रह्माचे आकलन होते.  
आपुलेन अनुभवें । कल्पनेसि मोडावें । 
मग सुकाळीं पडावें । अनुभवाचे ॥ ४८ ॥
४८) स्वस्वरुपाच्या अनुभवानें देहबुद्धी, मी देह ह्या कल्पना काढून टाकाव्यांत. तसें झालें म्हणजे सर्वत्र ब्रह्मस्वरुपाचा अनुभव येईल.
निर्विकल्पास कल्पावें । कल्पना मोडें स्वभावें ।
मग नसोनि असावें । कल्पकोटी ॥ ४९ ॥
४९) देहबुद्धीची कल्पना नाहीशीं करण्यासाठीं निर्विकल्प ब्रह्मस्वरुपाची कल्पना करावी. यामुळें आपोआप " मी देह आहे " ही कल्पना नष्ट होते. नंतर मग निर्विकल्पता आल्यावर मी पणाने नसुन सद्धा ब्रह्मस्वरुपांत अनंत काळ राहावे. 
कल्पनेचें येक बरें । मोहरितांच मोहरे ।
स्वरुपीं घालिता भरे । निर्विकल्पीं ॥ ५० ॥    
५०) कल्पनेची एक विशेषता म्हणजे ज्याची कल्पना करावयाची त्याच्याशी तीं एकरुप होते. म्हणून ती स्वस्वरुपाकडे नेली तर ती निर्विकल्प होते.      
निर्विकल्पासी कल्पितां । कल्पनेची नुरे वार्ता ।
निःसंगास भेटों जातां । निःसंग होइजे ॥ ५१ ॥
५१) पण जें निर्विकल्प आहे, त्याची कल्पना करुं लागल्यावर कल्पनाच विलीन होते. कारण ब्रह्मस्वरुप निःसंग असल्यानें साधक स्वतःच निःसंग बनतो.
पदार्थाऐसें ब्रह्म नव्हे । मा तें हाती धरुन द्यावें ।
असो हें अनुभवाचें । सद्गुरुमुखें ॥ ५२ ॥
५२) परब्रह्म म्हणजे दृश्य पदार्थ नाही, जें हातांत घेऊन देता येईल. सद्गुरुमुखानें तें श्रवण करुन मगआपण त्याचा अनुभव घ्यावा. 
पुढें कथेचा अन्वये । केलाचि करुं निश्र्चये ।
जेणे अनुभवासी ये । केवळब्रह्म ॥ ५३ ॥
५३) आतांपर्यंत ब्रह्मस्वरुप कसें आहे, ते सांगितले. तें अधिक निश्र्चितपणें समजण्यासाठीं पुढें विवेचन केले आहे. तें श्रवण केल्यानें शुद्ध व शाश्वत ब्रह्माचा अनुभव येईल. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दशाब्रह्मनिरुपण नाम समास तिसरा ॥
Samas Tisara ChaturdashaBrahma Nirupan
समास तिसरा चतुर्दशब्रह्म निरुपण


No comments:

Post a Comment