Friday, September 15, 2017

Samas Navava Shravan Nirupan समास नववा श्रवणनिरुपण


Dashak Satava Samas Navava Shravan Nirupan 
Samas Navava Shravan Nirupan, It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us the importance of Shravan (listening of spiritual advice).
समास नववा श्रवणनिरुपण  
श्रीराम ॥
आतां श्रवण कैसें करावें । तेंहि सांगिजेल अवघें ।
श्रोता अवधान द्यावें । येकचित्तें ॥ १ ॥
१) श्रवण कसें करावें तें सगळें नीट सांगतो. एकाग्र होऊन श्रोत्यांनी तें अवधान देऊन ऐकावें. 
येक वगतृत्व श्रवणीं पडे । तेणें जालें समाधान मोडे ।
केला निश्र्चय विघडे । अकस्मात ॥ २ ॥
२) एखादे प्रवचन असें असतें कीं तें ऐकून आपलें समाधान भंग पावते. मनाचा केलेला निश्र्चय एकाएकी ढळतो. 
तें वगतृत्व त्यागावें । जें माईक स्वभावें ।
जेथें निश्र्चयाच्या नावें । सुन्याकार ॥ ३ ॥
३) असें भ्रम निर्माण करणारे व हानिकारक प्रवचन ऐकू नये. कारण ते ऐकून निश्र्चय निर्माण होत नाही. 
येक्या ग्रंथें निश्र्चय केला । तो दुजयानें उडविला ।
तेणें संशयोचि वाढला । जन्मवरी ॥ ४ ॥
४) एखादा ग्रंथ वाचल्यावर मनाचा निश्र्चय होतो. पण दुसरा ग्रंथ त्याच विषयावरील वाचला की, झालेला निश्र्चय उडून जातो. परत संशयच निर्माण होतो व वाढतो.   
जेथें संशय तुटती । होये आशंकानिवृत्ती ।
अद्वैत ग्रंथ परमार्थी । श्रवण करावे ॥ ५ ॥
५) ज्या ग्रंथांच्या श्रवणाने संशय, शंका, आशंका यांचे पूर्ण निराकरण होते असे अद्वैत ग्रंथांचे श्रवण ऐकावे.  
जो मोक्षाचा अधिकारी । तो परमार्थपंथ धरी ।
प्रीति लागली अंतरीं । अद्वैतग्रंथाची ॥ ६ ॥
६) ज्याला मोक्ष हवा असतो, मोक्षाची तळमळ लागते तोच परमार्थ मार्ग धरतो. त्याच्याच मनांत अद्वैतग्रंथांचे प्रेम निर्माण होते.
जेणें सांडिला इहलोक । जो परलोकींचा साधक ।
तेणें पाहावा विवेक । अद्वैतशास्त्रीं ॥ ७ ॥
७) परमार्थमार्ग धरुन या भवसागराची आसक्ती सोडून जो साधनाची तयारी करतो, त्यानें अद्वैतग्रंथांतील आत्मानात्मविवेकाचा अभ्यास करावा. 
जयास पाहिजे अद्वैत । तयापुढें ठेविता द्वैत ।
तेणें क्षोभलें उठे चित्त । तया श्रोतयाचें ॥ ८ ॥
८) ज्याला अद्वैताचे विवेचन आवडते त्याला द्वैताचे विवेचन आवदत नाही. 
आवडीसारिखें मिळे । तेणें सुखचि उचंबळे ।
नाहीं तरी कंटाळे। मानस ऐकतां ॥ ९ ॥
९) आपल्याला आवडते तें ऐकावयास मिळाले तर माणसाच्या अंतरी सुखाच्या लाटा उचंबळतात. त्याच्या वेगळे ऐकावयाचा कंटाळा येतो. 
ज्याची उपासना जैसी । त्यासी प्रीति वाटे तैसी ।
तेथें वर्णितां दुजयासी । प्रशस्त न वटे ॥ १० ॥
१०) जो साधक ज्या देवतेची उपासना करतो, तीच्याबद्दल त्याच्या मनांत प्रेम असते. त्याच्यापुढे दुसर्‍या देवतेचे वर्णन त्याला प्रशस्त वाटत नाही.
प्रीतिचें लक्षण ऐसें । अंतरी उठे अनायासें ।
पाणी पाणवाटें जैसें । आपण चि धांवे ॥ ११ ॥
११) आपोआप मनांत उत्पन्न होणें हे प्रीतिचे लक्षण आहे. पाणी जसें उतारावर अनायासें धावतें तसाच प्रीतिचा स्वभाव आहे.  
तैसा जो आत्मज्ञानी नर । तयास नावडे इतर ।
तेथें पाहिजे सारासार । विचारणा ते ॥ १२ ॥
१२) आत्मज्ञानी पुरुषालाही इतर विषय आवडत नाहीत. आत्मज्ञानानें भरलेले ग्रंथच त्याला आवडतात.
जेथें कुळदेव्या भगवती । तेथें पाहिजे सप्तशती ।
इतर देवांची स्तुती । कामा न ये सर्वथा ॥ १३ ॥
१३) ज्याच्या कुळांत देवीची उपासना असते त्याला सप्तशतीच हवी असते. इतर देवांची स्तुती, उपासना तेथें चालत नाही. 
घेतां अनंताच्या व्रता । तेथें न लगे भगवद्गीता ।
साधुजनासी वार्ता । फळाशेची नाहीं ॥ १४ ॥
१४) जर कोणी अनंताचे व्रत घेतले तर ते सकाम असल्यानें फळाची आशा सोडण्यास सांगणारी भगवद्गीता तेथें कामाची नाही. ती साधुसंतास हवीच.
वीरकंकण घालितां नाकीं । परीं तें शोभा पावेना कीं ।
जेथील तेथें आणिकीं । कामा न ये सर्वथा ॥ १५ ॥
१५) हातावर घालावयाचें वीरकंकण जर नाकांत घातले तर तें शोभत नाही. ज्या वस्तूंचे जें ठिकाण असेल तेथेंच ती शोभून दिसते.  
नाना महात्में बोलिलीं । जेथील तेथें वंद्य जालीं ।
विपरीत करुन वाचिलीं । तरी तें विलक्षण ॥ १६ ॥  
१६) नाना तीर्थें आहेत, प्रत्येकाच माहात्म्य वेगवेगळे आहे. एका तीर्थाचे माहात्म्य त्याच तीर्थीं वाचावयाचे असते. तें दुसर्‍या तीर्थी वाचले तर तें विपरीत होऊन विलक्षण वाटते.         
मलारमाहात्म द्वारकेसी । द्वारकामाहात्म नेलें कासीं ।
कासीमाहात्म वेंकटसीं । शोभा न पवे ॥ १७ ॥
१७) मलारी माहात्म्य द्वारकेला वाचले. द्वारका माहात्म्य काशीला वाचले. काशी माहात्म्य तिरुपतीच्या व्यंकटेशापाशी वाचले. तर तें शोभत नाही. 
ऐसें सांगतां असे वाड । परी जेथील तेथेंचि गोड ।
तैसी ज्ञानीयांस चाड । अद्वैत ग्रंथाची ॥ १८ ॥
१८) असे प्रकार सांगायला गेले तर ते संपणार नाहींत. मूळ मुद्दा असा कीं जेथील तेथेंच शोभून दिसते. तसेंच ज्ञानी माणसाला अद्वैतग्रंथांचीच आवड असते त्याला इतर ग्रंथांची किंमत नसते.  
योगियांपुढें राहाण । परीक्षवंतांपुढें पाषाण ।
पंडितांपुढें डफगाण । शोभा न पवे ॥ १९ ॥ 
१९) योग्यासमोर भुताटकीचे प्रयोग केले, जवाहीर जो रत्नांची पारख करणरा त्याच्यासमोर दगड ठेवला किंवा विद्वान माणसासमोर तमाशांतील गाणें म्हटले तर तें शोभणर नाही.   
वेदज्ञापुढें जती । निस्पृहापुढें फळश्रुती ।
ज्ञानीयांपुढें पोथी ।  कोकशास्त्राची ॥ २० ॥
२०) वैदिक कर्मानुष्ठान करणारासमोर कर्मसन्यासी, जो खरा निःस्पृह आहे त्याच्यापुढें कर्माच्या फळाचे वर्णन केलें किंवा एखाद्या ज्ञानी माणसासमोर कामशास्त्राची पोथी ठेवली तर तें शोभणार नाही.   
ब्रह्मचर्यापुढें नाचणी । रासक्रीडा निरुपणीं ।
राजहंसापुढें पाणी । ठेविलें जैसें ॥ २१ ॥
२१) एखद्या ब्रह्मचार्‍यासमोर नाचणारीण उभी केली, किंवा निर्गुण निराकार परब्रह्माच्या निरुपणांत रासक्रीडा सांगायला लागलात किंवा राजहंसापुढे पाणी आणून ठेवले तर तें शोभणार नाही.  
तैसें अंतर्निष्ठांपुढें । ठेविलें श्रृंघारिक टिपडें ।
तेणें त्याचे कैसें घडे । समाधान ॥ २२ ॥
२२) अंतरंगांतील स्वस्वरुपामध्यें रंगलेल्या आत्मनिष्ठासमोर शृंगारानें भरलेले चोपडें ठेवलें तर त्याचे समाधान होणार नाही. 
रायास रंकाची आशा । तक्र सांगणें पीयुषा ।
संन्याशासी वोवसा । उचिष्ट चांडाळी ॥ २३ ॥
२३) राजाला एखाद्या क्षुद्र वस्तुची लालूच दाखविणें म्हणजे वेडेपणा आहे. अमृतापुढें ताकाची स्तुती करणें अयोग्य आहे. किंवा वैराग्यसंपन्न संन्याशाला उष्त्या चांडाळीचे व्रत सांगणें हें शोभत नाही.    
कर्मनिष्ठा वशीकर्ण । पंचाक्षरी निरुपण ।
तेथें भंगे अंतःकर्ण । सहजचि त्याचें ॥ २४ ॥
२४) एखाद्या कर्मानुष्ठान करणार्‍याला वशीकरणाचा प्रयोग किंवा पंचाक्षरी माणसाला ब्रह्म निरुपण सांगितलें तर त्यांचे अतःकरण विटते. 
तैसे परमार्थिक जन । तयांस नस्तां आत्मज्ञान ।
ग्रंथ वाचितां समाधान । होणार नाहीं ॥ २५ ॥
२५) त्याचप्रमाणें ज्यांना खरी परमार्थाची आवड आहे अशा साधकवृत्तीच्या माणसांना आत्मज्ञान आवडते. तें ज्या ग्रंथांत नसते तो ग्रंथ वाचून त्यांचे समाधान होत नाही.  
आतां असो हें बोलणें । जयासि स्वहित करणें ।
तेणें सदा विचरणें । अद्वैतग्रंथीं ॥ २६ ॥
२६) आतां हें बोलणें पुरें. ज्याला आत्मकल्याण साधावयाचे आहे त्यानें नेहमी अद्वैतग्रंथांचें श्रवण, वाचन व मनन करावे. 
आत्मज्ञानी येकचित्त । तेणें पाहाणें अद्वैत ।
येकांत स्थळीं निवांत । समाधान ॥ २७ ॥
२७) आत्मज्ञानाची साधना करणार्‍या साधकानें निवांत अशा एकांतस्थळीं जाऊन एकाग्र मनानें अद्वैत ग्रंथ अभ्यासावेत. त्याने त्याचे समाधान होईल. 
बहुत प्रकारें पाहातां । ग्रंथ नाहीं अद्वैतापरता ।
परमार्थास तत्वता । तारुंच कीं ॥ २८ ॥
२८) अनेक बाजूंनी विचार केल तर अद्वैत ग्रंथासारखा दुसरा ग्रंथ नाहीं असें अनुभवास येते. असा ग्रंथ परमार्थांत होडीसारखा उपयोगी पडतो.  
इतर जे प्रपंचिक । हास्य विनोद  नवरसिक ।
हित नव्हे तें पुस्तक । परमार्थासी ॥ २९ ॥
२९) इतर प्रापंचिक विषयांवरील ग्रंथ आणि हास्य, विनोद आदिनीं नवरसानीं भरलेले ग्रंथ परमार्थांत उपयोगाचे नाहीत.  
जेणें परमार्थ वाढे । आंगी अनुताप चढे ।
भक्तीसाधन आवडे । त्या नाव ग्रंथ ॥ ३० ॥
३०) ज्यानें परमार्थ वाढतो, अंगांत अनुताप उत्पन्न होऊन मन शुद्ध होते, साधना, भक्ती करावीशी वाटते, तोच खरा ग्रंथ होय.  
जो ऐकताच गर्व गळे । कां ते भ्रांतीच मावळे ।
नातरी येकसरें वोळे । मन भगवंती ॥ ३१ ॥
३१) जो ऐकला कीं अभिमान नाहींसा होतो, भ्रम निघून जातो, मन त्याच्या वाचनानें भगवंताकडे वळते तोच खरा ग्रंथ. 
जेणें होये उपरती । अवगुण पालटती ।
जेणें चुके अधोगती । त्या नाव ग्रंथ ॥ ३२ ॥   
३२) ज्याच्या वाचनाने विरक्ति प्राप्त होते. स्वभावांतील दोष कमी होतात, आणि ज्यानें अधोगती टळते, तोच खरा ग्रंथ होय.  
जेणे धारिष्ट चढे । जेणें परोपकार घडे ।
जेणें विषयवासना मोडे । त्या नाव ग्रंथ ॥ ३३ ॥
३३) ज्यांने अंगांत धैर्य उत्पन्न होते, परोपकार करावासा वाटूं लागतो, आणि ज्याच्या वाचनाने, अभ्यासानें विषयवासना प्रवृत्ती मरते, त्यालाच ग्रंथ असें म्हणतात.  
जेणें परत्रसाधन । जेणें ग्रंथें होये ज्ञान ।
जेणें होईजे पावन । या नाव ग्रंथ ॥ ३४ ॥  
३४) जो वाचला की, माणसाला परमार्थसाधन समजते, ज्याच्या श्रवणाने साधकाला आत्मज्ञान प्राप्त होते आणि ज्यामुळे माणुस कृतकृत्य होऊन पवित्र होतो तोच खर्‍या अर्थाने ग्रंथ होय.   
ग्रंथ बहुत असती । नाना विधानें फळश्रुती ।
जेथें नुपजे विरक्ती भक्ती । तो ग्रंथचि नव्हे ॥ ३५ ॥
३५) ग्रंथ पुष्कळ आहेत त्यामध्यें अनेक कर्मानुष्ठानें, व्रतवैकल्यें आणि त्यांची फळें सांगितली आहेत. परंतु ज्यांच्या अभ्यासानें विरक्ती उत्पन्न होऊन मनांत भक्ती निर्माण होत नाही, त्याला ग्रंथ म्हणता येत नाही.    
मोक्षेंविण फळश्रुती । ते दुराशेची पोथी ।
ऐकतां ऐकतां पुढती । दुराशाचि वाढे ॥ ३६ ॥
३६) मोक्षाचा मार्ग न दाखवतां ज्या ग्रंथामध्यें अनेक फळांचे वर्णन आधळते ती पोथी अशुभ वासना निर्माण करणारी व ती श्रवण करतां प्रापंचिक वासना वाढविणारीच असते.   
श्रवणीं लोभ उपजेल जेथें । विवेक कैंचा असेल तेथें ।
बैसलीं दुराशेचीं भूतें । तया अधोगती ॥ ३७ ॥  
३७) ज्या ग्रंथांच्या श्रवणानें प्रपंचाचा लोभच वाढतो. त्या ठिकाणीं आत्मानात्म विवेक कसा असेल ? ज्याच्या उरावर दुराशेची भुतें बसली आहेत त्याची अधोगती होणार हें ठरलेलेच आहे.    
ऐकोनिच फळश्रुती । पुढें तरी पावोन म्हणती ।
तयां जन्म अधोगती । सहजचि जाली ॥ ३८ ॥
३८) ग्रंथामध्यें असलेली फळें ऐकून मानसांना वाटते कीं, तें फळ या जन्मी आपल्याला मिळाले नाही तरी पुढील जन्मी मिळेल. या भावनेमुळें परत जन्म घेण्याची अधोगती पत्करावी लागते. 
नाना फळें पक्षी खाती । तेणेंचि तयां होये तृप्ति ।
परी त्या चकोराचे चित्तीं । अमृत वसे ॥ ३९ ॥ 
३९) इतर पक्षी निरनिराळीं फळें खातात व तृप्त होतात परंतु चकोर मात्र मनांमध्यें अमृताचाच हट्ट धरुन बसतो. 
तैसे संसारी मनुष्य । पाहे संसाराची वास ।
परी ते भगवंताचे अंश । भगवंतचि इच्छिती ॥ ४० ॥
४०) त्याचप्रमाणें संसारांत रमलेलीं माणसें सांसारिक वासना धरुन बसतात. पण दैवी संपत्तीनें संपन्न असणारे भगवंतावर खरें प्रेम करणारे पुरुष फक्त भगवंताचीच अपेक्षा धरतात. 
ज्ञानियास पाहिजे ज्ञान । भजकास पाहिजे भजन ।
साधकास पाहिजे साधन । इच्छेसारिखें ॥ ४१ ॥
४१) जो ज्ञानमार्गी आहे त्यास ज्ञान आवडतें, भक्ताला भजन आवडते, तर साधकास मनासारखें साधन आवडते. 
परमार्थ्यास परमार्थ । स्वार्थ्यास पाहिजे स्वार्थ । 
कृपणास पाहिजे अर्थ । मनापासुनी ॥ ४२ ॥
४२) जो परमार्थी आहे त्याला परमार्थ आवडतो. जो स्वार्थी आहे त्याला स्वार्थ आवडतो. तर कंजूषाला मनापासून द्रव्य आवडते.   
योगियांस पाहिजे योग । भोगियांस पाहिजे भोग ।
रोगियांस पाहिजे रोग- । हर्ति मात्रा ॥ ४३ ॥
४३) योग्याला योग, भोग्याला भोग तर रोग्याला रोग हरण करणारी मात्रा आवडते. 
कवीस पाहिजे प्रबंद । तार्किकांस तर्कवाद ।
भाविकांस संवाद । गोड वाटे ॥ ४४ ॥ 
४४) कवीला काव्य आवडते. तार्किक माणसाला तर्कप्रधान वाद आवडतो. श्रद्धाळू माणसाला संवाद गोड वाटतो. 
पंडितांस पाहिजे वित्पत्ती । विद्वांसास अधेनप्रीती ।
कळावंतां आवडती । नाना कळा ॥ ४५ ॥
४५) विद्वानाला विद्वत्ता, आभ्यासू माणसाला अध्ययन आवडते. तर कलावंताला नाना कला आवडतात.   
हरिदासा आवडे कीर्तन । सुचिस्मंतां संध्यास्नान ।
कर्मनिष्ठां विधिविधान । पाहिजे तें ॥ ४६ ॥
४६) हरिदासाला कीर्तन आवडते. शुचिर्भूत माणसाला स्नानसंध्या आवडते. तर कर्मनिष्ठाला निरनिराळे कर्मविधी आवडतात.  . 
प्रेमळास पाहिजे करुणा । दक्षता पाहिजे विचक्षणा ।  
चातुर्य पाहे शाहाणा । आदरेंसीं ॥ ४७ ॥
४७) प्रेमळ माणसाला दया, करुणा आवडते. चतुर माणसाला हुशारी आवडते. तर शहाणामाणूस व्यवहार कौशल्य आवडीनें पाहातो.  
भक्त पाहे मूर्तिध्यान । संगीत पाहे ताळज्ञाान ।
रागज्ञानी तानमान । मूर्छना पाहे ॥ ४८ ॥
४८) भक्त मूर्तीध्यान आवडीनें पाहतो. गाणारा तालाचें ज्ञान आवडीनें पाहतो. तर रागाचें ज्ञान असणारा माणूस ताना, आलाप, नींड, खटकें आवडीनें पाहतो.  
योगाभ्यासी पिंडज्ञान । तत्वज्ञासि तत्वज्ञान ।
नाडिज्ञानी मात्राज्ञान । पाहातुसे ॥ ४९ ॥
४९) योगाभ्यासी माणसाला शरीररचनेच्या ज्ञानाची आवड असते. तत्वज्ञान अभ्यासणार्‍याला निरनिराळ्या तत्वज्ञानांची आवड असते. तर नाडी ज्ञानी माणसाला औषधी मात्रांची आवड असते. 
कामिक पाहे कोकशास्त्र । चेटकी पाहे चेटकमंत्र ।
यंत्री पाहे नाना यंत्र । आदरेंसीं ॥ ५० ॥
५०) शृंगारप्रिय माणसाला कामशास्त्र आवदते. चेटूक करणार्‍या माणसाला चेटकाचे मंत्र आवडतात. तर जारणमारण करणार्‍यास नाना यंत्रे आवडतात. 
टवाळां आवडे विनोद । उन्मतास नाना छंद ।
तामसास अप्रमाद । गोड वाटे ॥ ५१ ॥
५१) थट्टेखोर माणसास विनोद आवडतो. अंगांत रग असलेल्या माणसास नाना व्यसनें आवडतात. तर तामसी माणसाला दुष्कर्म करणें आवडते.  
मूर्ख होये नादलुब्धी । निंदक पाहे उणी संधी ।
पापी पाहे पापबुद्धि । लाऊन आंगीं ॥ ५२ ॥
५२) मूर्ख माणसाला कांहीं तरी नाद आवडतो. निंदकाला दुसर्‍याचे उणें पाहावयास आवडते. पापी माणूस पापबुद्धीनें दुसर्‍यावर पाप लादून पहात बसण्यांत आनंदतो.  
येकां पाहिजे रसाळ । येकां पाहिजे पाल्हाळ ।
येकां पाहिजे केवळ । साबडी भक्ती ॥ ५३ ॥
५३) एखाद्या माणसाला रसाळपणा आवडतो. तर एखाद्याला पाल्हाळपणा आवडतो. तर एखाद्याला भोळी भक्तीच आवडते.  
आगमी पाहे आगम । शूर पाहे संग्राम ।
येक पाहाती नाना धर्म । इच्छेसारिखे ॥ ५४ ॥
५४) तंत्रसंप्रदायी माणसाला तंत्रशास्त्राची आवड असते. शूर माणसाला लढाई आवडते. तर एखाद्याला नाना धर्मांचा अभ्यास करणें आवडते.    
मुक्त पाहे मुक्तलीळा । सर्व पाहे सर्व कळा ।
जोतिषी भविष्य पिंगळा । वर्णूं पाहे ॥ ५५ ॥
५५) मुक्त होऊं इच्छिणारा मुक्तांच्या वर्तनाची आवडीनें पहाणी करतो. सर्वाची आवड असणारा सर्व गोष्टी आवडीनें पाहतो. तर ज्योतिषी पिंगळा पक्षी त्याच्या आवाजावरुन भविष्य सांगण्यांत गुंतलेला असतो.  
ऐसें सांगावें तें किती । आवडीसारिखें ऐकती । 
नाना पुस्तकें वाचिती । सर्वकाळ ॥ ५६ ॥
५६) अशा रीतीनें जगांतील माणसांच्या आवडी किती सांगाव्यांत ? जो तो स्वतःच्या आवडीनुसार श्रवण करीत असतो. व तशीच पुस्तकें वाचीत असतो.   
परी परत्र साधनेंविण । म्हणों नये तें श्रवण ।
जेथें नाहीं आत्मज्ञान । तया नाव कर्मणा ॥ ५७ ॥
५७) परंतु ज्या श्रवणांत परमार्थ कसा साधावा याचे ज्ञान नाही त्यास श्रवण म्हणणे योग्य नाही. ज्यांत आत्मज्ञानाचे प्रतीपादन नाही ती नुसती करमणुक होय. 
गोडीविण गोडपण । नाकेंविण सुलक्षण ।
ज्ञानेंविण निरुपण । बोलोंचि नये ॥ ५८ ॥
५८) ज्यांत गोडी नाहीं ते गोडपण नाही. ज्याचें नाक सुरेख नाहीं तो सुरेखच नाही. त्याचप्रमाणे ज्या निरुपणांत आत्मज्ञानाचे विवेचन नाही तें निरुपणच नाही.  
आतां असो हें बहुत । ऐकतां परमार्थग्रंथ ।
परमार्थग्रंथेविण वेर्थ । गथागोवी ॥ ५९ ॥
५९) आतां अधिक सांगणें पुरें झाले. साधकानें परमार्थाचे ग्रंथ श्रवण करावें. अध्यन करावेत. इतर ग्रंथ चांगले असले तरी आत्मज्ञानाच्या दृष्टीनें उपयोगाचे नाहीत. 
म्हणोनि नित्यानित्यविचार । जेथें बोलिला सारासार
तोचि ग्रंथ पैलपार । पाववी विवेकें ॥ ६० ॥
६०) म्हणून ज्या ग्रंथांमध्यें शाश्वत काय व अशाश्वत काय याचे विवेचन असते, सार कोणते व असार कोणतें हें सांगितलेले असते अशा ग्रंथांचे परिशीलनच विवेक निर्माण करते. त्याच्या बळानेच माणूस आत्मज्ञानापर्यंत पोहोचतो. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रवणनिरुपणनाम समास नववा ॥
Samas Navava Shravan Nirupan
समास नववा श्रवणनिरुपण  


Custom Search

No comments:

Post a Comment