Saturday, September 9, 2017

Samas Satava SadhanPratishtha Nirupan समास सातवा साधन प्रतिष्ठानिरुपण


Dashak Satava Samas Satava SadhanPratishtha Nirupan 
Samas Satava SadhanPratishtha Nirupan, It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is describing Brahma and how to mediate for becoming one with Brahma.
समास सातवा साधन प्रतिष्ठानिरुपण
श्रीराम ॥
वस्तूसि जरी कल्पावें । तरी ते निर्विकल्प स्वभावें ।
तेथें कल्पनेच्या नावें । सुन्याकार ॥ १ ॥
१) कल्पना ब्रह्मवस्तुस आकलन करुं शकत नाही. कल्पना तेथें पोहोचूं शकत नाही. कल्पना तेथें शून्यवत होते. कारण ब्रह्म स्वभावताच निर्विकल्प आहे. 
तथापि कल्पूं जातां । न ये कल्पनेच्या हातां । 
वोळखी ठांई न पडे चित्ता । भ्रंश पडे ॥ २ ॥
२) तरी देखील जर आपण ब्रह्माची कल्पना करुं लागलों तर तें कल्पनेच्या आवाक्यांत येत नाही. मनाला त्याची बरोबर ओळख होत नाही. मनाचा गोंधळ मात्र होतो. 
कांहीं दृष्टीसचि न दिसे । मनास तेंहि न भासे ।
न भासे न दिसे कैसें । वोळखावें ॥ ३ ॥ 
३) ब्रह्म दृष्टीला दिसत नाही. मनाला भासत नाही. जें दिसत नाहीं व जें भासत नाही तें ओळखायचे, जाणायचे कसें? 
पाहों जातां निराकार । मनासि पडे सुन्याकार ।
कल्पूं जातां अंधकार । भरला वाटे ॥ ४ ॥
४) ब्रह्माला आकार नाहीं. त्यामुळें मन शून्याकार होऊन जाते. कल्पनेनें ब्रह्म पहावयास गेले तर कल्पनाच लटकी पडते व अज्ञानाचा अंधार अनुभवास येतो.
कल्पूं जातां वाटे काळें । ब्रह्म काळें ना पिवळें ।
आरक्त निळें ना धवळें । वर्णरहित ॥ ५ ॥
५) म्हणून ब्रह्म काळें आहे असे कल्पनेस वाटते . पण ब्रह्माला रंग नाही, तें काळें नाही, पिवळें नाही, लाल नाहीं, निळें नाहीं किंवा पिवळें नाहीं. 
जया वर्णवेक्ती नसे । भासाहून अनारिसें ।
रुपचि नाहीं कैसें । वोळखावें ॥ ६ ॥
६) ब्रह्माला रंग कोणताच नाही. त्याला रुप नाही. व जे भासाहून निराळे आहे, तर त्याचे ज्ञान कसें मिळवायचे. 
न दिसतां वोळखण । किती धरावी आपण । 
हें तों श्रमासीच कारण । होतसे ॥ ७ ॥
७) ब्रह्म तर दिसत नाही.आणि अदृश्याची ओळख मनामध्यें फार काळ टिकत नाही. तसें करण्यानें उगीच श्रम मात्र होतात.
जो निर्गुण गुणातीत । जो अदृश्य अवेक्त ।
जो अचिंत्य चिंतनातीत । परमपुरुष ॥ ८ ॥
८) तो परम पुरुष निर्गुण व गुणातीत आहे, अदृश्य व अव्यक्त आहे, अचिंत्य व चिंतनाच्या पलीकडे आहे.
श्र्लोक
अचिंत्याव्यक्तरुपाय निर्गुणाय गुणात्मने ।
समस्तजगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः ॥
श्र्लोकाचा अर्थ: अचिंत्य, अव्यक्तरुप, निर्गुण, गुणात्मा, सगळ्या जगाचा आधार अशा ब्रह्ममूर्तीला मी नमस्कार करतो. 
अचिंत्य तेंचि चिंतावें । अव्यक्तास आठवावें ।
निर्गुणास वोळखावें । कोणेपरी ॥ ९ ॥
९) जें अचिंत्य आहे त्याचें चिंतन कसें करायचे. जें अव्यक्त आहे त्याचे स्मरण कसें करावें, जें निर्गुण आहे तें कसें ओळखावें?
जें दृष्टीसचि न पडे । जें मनासहि नातुडे ।
तया कैसें पाहाणें घडे । निर्गुणासी ॥ १० ॥
१०) जें दृष्टीला पडत नाही, जें मनाला सांपडत  नाही, त्या निर्गुण ब्रह्माला कशा रीतीनें पाहतां येईल? 
असंगाचा संग धरणें । निरावलंबी वास करणें ।
निशब्दासी अनुवादणें । कोणेपरीं ॥ ११ ॥
११) जें कशाला चिकटलेले नाही त्याची संगति कशी धरावी? जेथें मुळी आधारच नाही तेथें वस्ती कशी करायची? आणि जेथें शब्द हार खाऊन मागें येतो त्याचे वर्णन कसें करायचे? 
अचिंत्यासी चिंतूं जातां । निर्विकल्पासी कल्पितां ।
अद्वैताचें ध्यान करितां । द्वैतचि उठे ॥ १२ ॥
१२) सध्यांच्या आपल्या अवस्थेंत अचिंत्य ब्रह्माचे चिंतन करुं लागल्यास, निर्विकल्प ब्रह्माची कल्पना करुं लागल्यास आणि अद्वैत ब्रह्माचें ध्यान करुं लागल्यास ज्ञाता आणि ज्ञेय, ध्याता आणि ध्येय, मन व वस्तु असें द्वैत जोर करते.
आतां ध्यानचि सोडावें । अनुसंधान तें मोडावें ।
तरी मागुतें पडावें । माहां संशईं ॥ १३ ॥
१३) ध्यान करणें सोडून द्यावें किंवा चिंतन बंद करावें तर मनांत मोठे संशय निर्माण होतात. 
द्वैताच्या भेणें अंतरीं । वस्तु न पाहिजे तरी ।
तेणें समाधान उरी । कदा असेचिना ॥ १४ ॥
१४) द्वैताच्या संशयाच्या भीतीनें ध्यान किंवा चिंतन करणें सोडून दिलें तर समाधान प्राप्त होण्याचा संभव नाही. 
सवे लावितां सवे पडे । सवे पडतां वस्तु आतुडे ।
नित्यानित्यविचारें घडे । समाधान ॥ १५ ॥
१५) मनाला जशी सवय लावावी तशी लागते. ब्रह्मचिंतनाची सवय जर मनाला लाविली तर कालांतरानें ब्रह्मसाक्षात्कार होईल. त्याच्या जोडीला नित्यानित्य विचार ठेविला तर समाधान प्राप्त होईल. दृश्यचिंतन सोडून ब्रह्मचिंतन मनाकडून करवून घ्यावें. 
वस्तु चिंतितां द्वैत उपजे । सोडी करितां कांहींच नुमजे ।
सुन्यत्वसंदेहीं पडिजे । विवेकविण ॥ १६ ॥
१६) आपण जेव्हां वस्तूंचें चिंतन करतो तेव्हां चिंतन करणारा मी व चिमतनाची वस्तु असें द्वैत उपजते. पण याकारणासाठीं चिंतन करणेंच जर सोडून दिलें तर कांहींच साधन घडणार नाही. विवेक सोडून दिलाा तर शून्यत्व येऊन अनेक संशय निर्माण होतील.   
म्हणोनि विवेक धरावा । ज्ञानें प्रपंच सारावा ।
अहंभाव वोसरावा । परी तो वोसरेना ॥ १७ ॥
१७) म्हणून आत्मानात्म विवेक तर करावाच. त्यांतून उत्पन्न होणार्‍या सारज्ञानानें प्रपंच मनांतून बाजूस सारावा. तरीसुद्धा अंतरीं असलेला अहंभाव कांहीं केल्या कमी होत नाही. 
परब्रह्म तें अद्वैत । कल्पितांच उठे द्वैत ।
तेथें हेत आणी दृष्टांत । कांहींच न चले ॥ १८ ॥
१८) परब्रह्म अद्वैत आहे, अहंपणा ठेवून त्याची कल्पना करुं लागलें कीं द्वैत उपजते. द्वैताच्या क्षेत्रांतील कार्यकारण व दृष्टांत परब्रह्मास लागूं पडत नाहीत. 
तें आठवितां विसरिजे । कां तें विसरोनि आठविजे ।
जाणोनियां नेणिजे । परब्रह्म तें ॥ १९ ॥
१९) परब्रह्माचे स्मरण करण्यास स्वतःस विसरावें लागते. स्वतःचा विसर पडला तरच त्याचे स्मरण करतां येते. त्याला जाणलें तरी " मी त्यास जाणलें " ही जाणीव नसते. परब्रह्म हें असें आहे.  
त्यास न भेटतां होये भेटी । भेटो जातां पडे तुटी ।
ऐसी हे नवल गोष्टी । मुकेपणाची ॥ २० ॥
२०) " मी ब्रह्माची भेट घेतो " अशी भूमिका त्याची भेट करुन देत नाही. भेट घेत असतां मी ब्रह्माची भेट घेत आहे. याचे भान नसते. ब्रह्माचा अनुभव असा हा विलक्षण आहे. त्याबद्दल कांहीं बोलतांच येत नाही. 
तें साधूं जातां साधवेना । नातरी सोडितां सुटेना ।
लागला समंध तुटेना । निरंतर ॥ २१ ॥
२१) " मी ब्रह्म साधतो " अशा मीपणाने साधन करणारास तें साधत नाहीं. पण तें आंत बाहेर व्यापून असल्यानें त्यास सोडावें म्हटलें तरी तें सुटत नाही. त्याचा व आपला निरंतर संबंध आहे. कांहीं केल्या तो तुटणार नाही.  
तें असतचि सदां असे । नातरी पाहातां दुरासे ।
न पाहातां प्रकाशे । जेथें तेथें ॥ २२ ॥
२२) ब्रह्म निरंतर असतेच असते. तें नाहीं असे कधींच होत नाही. वेगळेपणानें त्यास बगहावयास गेले तर तें दुरावते. तसें केलें नाहीतर त्याचाच प्रकाश जिकडे तिकडे भासमान होतो. 
जेथें उपाये तोचि अपाये । आणी अपाये तोचि उपाये ।
हें अनुभवेंविण काये । उमजो जाणें ॥ २३ ॥
२३) द्वैतामध्यें सफल होणारे उपाय ब्रह्माच्या बाबतींत अपाय ठरतात. तर द्वैतामध्यें विफल होणारे अपाय ब्रह्माच्या बाबतींत उपाय ठरतात. या गोष्टीं अनुभवाखेरीज आकलन होणार नाहीत. 
तें नुमजतांच उमजे । उमजोन कांहींच नुमजे ।
तें वृत्तीविण पाविजे । निवृत्तिपद ॥ २४ ॥
२४) " ब्रह्म कांहींच समजत नाहीं " असें खरें अगदी आंतून वाटते त्यावेळीं तें समजते. " मला ब्रह्म समजले " असें ज्यावेळीं वाटते त्यावेळीं तें मुळींच समजलेले नसते. संपूर्ण वृत्तिरहित बनलें म्हणजे निवृत्ती ब्रह्मपद प्राप्त होते.  
तें ध्यानीं धरितां नये । चिंतनीं चिंतावें तें काये ।
मनामधें न समाये । परब्रह्म तें ॥ २५ ॥
२५) ब्रह्माचें ध्यान करतां येत नाही. कारण ध्यान करणें ही मनाची वृत्तीच आहे. त्याचें चिंतन करतां येत नाही. कारण तें संपूर्ण गुणरहित आहे. मनामध्यें स्थलकालातीत अनंत ब्रह्म मावणे शक्य नाही.     
त्यास उपमे द्यावें । तरी तें निर्मळ निश्र्चळ ।
विश्र्व बुडालें सकळ । तरी तें कोरडेंचि असे ॥ २६ ॥
२६) ब्रह्म पाण्यासारखें आहे. असे म्हतलें तरी ती उपमा अपुरी पडते. कारण ब्रह्म अत्यंत निर्मळ व निश्चल आहे. संपूर्ण विश्व जरी पाण्यांत बुडाले व भिजलें तरी ब्रह्म भिजणार नाहीं. तें कोरडेंच राहील. 
नव्हे प्रकाशासारिखें । अथवा नव्हे काळोखें ।
आतां तें कासयासारिखें । सांगावें हो ॥ २७ ॥
२७) ब्रह्म प्रकाशासारखें नाहीं. तें अंधारासारखेहीं नाही. ब्रह्म कशासारखें आहे हें मी कसें सांगू?  
ऐसें ब्रह्म निरंजन । कदा नव्हे दृश्यमान । 
लावावें तें अनुसंधान । कोणेपरी ॥ २८ ॥
२८) दृश्य विश्वांतील कोणत्याही वस्तुसारखें ब्रह्म नाही. तें कधीही दृश्याच्या पातळीवर येत नाही. अशा ब्रह्माचे लक्ष लावून ध्यान किंवा चिंतन करावयाचे कसें? 
अनुसंधान लाऊं जातां । कांहीं नाहीं वाटे आतां ।
तेणें मनाचिया माथां । संदेह वाजे ॥ २९ ॥
२९) लक्ष लावून चिंतन करण्याचा प्रयतन केला तरी मनापुढें कांहींच येत नाही. मग ब्रह्माच्या अस्तित्वाबद्दल मनांत संशय येऊं लागतो. 
लटिकेंचि काये पाहावें । कोण जाऊन राहावें । 
अभाव घेतला जीवें । सत्य स्वरुपाचा ॥ ३० ॥
३०) मनांत असें येते कीं, जें मुळांत नाहींच तें काय पहायचे? ब्रह्म अमुक ठिकाणी आहे असें नसल्यानें त्याला पाहण्यास कोठें जाऊन राहायचें? तातत्पर्य आपलें जें खरें स्वरुप आहे तें नाहींच असें जीवाला वाटूं लागते.  
अभावचि म्हणों सत्य । तरी वेदशास्त्र कैसें मिथ्य ।
आणी व्यासादिकांचें कृत्य । वाउगें नव्हे ॥ ३१ ॥
३१) परब्रह्माला अस्तित्व नाहींच असें जर खरें असेल तर वेदशास्त्रांना खोटे म्हणावें लागेल. तें बरोबर नाहीं. तसेंच व्यासादिकांसारख्या ब्रह्मज्ञानी पुरुषांचे कार्य व्यर्थ म्हणावें लागेल, तेंही योग्य नाही. 
म्हणोनि मिथ्या म्हणतां नये । बहुत ज्ञानाचे उपाये ।
बहुतीं निर्मिलें तें काये । मिथ्या म्हणावें ॥ ३२ ॥
३२) म्हणुन आत्मज्ञान खोटे म्हणतां येत नाही. ब्रह्मज्ञानी पुरुषांनी आजपर्यंत आत्मज्ञानाची साधनें निर्माण केली. त्या सगळ्यांना खोटे म्हणण्याची पाळी येईल. ते बरोबर नाही.  
अद्वैतज्ञानाचा उपदेश । गुरुगीता तो महेश ।
सांगता होये पार्वतीश । पार्वतीप्रती ॥ ३३ ॥
३३) गुरुगीतेमध्यें अद्वैतज्ञानाचा उपदेश आहे. श्रीशंकरांनी तो पार्वतीला सांगितला आहे.   
अवधूत गीता केली । गोरक्षीस निरोपिली ।
ते अवधूतगीता बोलिली । ज्ञानमार्ग ॥ ३४ ॥
३४) गोरक्षाला अवधूतगीता सांगितली. अवधूतगीतेमध्यें ज्ञानमार्ग आहे.
विष्णु होऊन राजहंस । विधीस केला उपदेश ।
ते हंसगीता जगदीश । बोलिला स्वमुखें ॥ ३५ ॥
३५) विष्णुनें राजहंसाचें रुप घेऊन ब्रह्मदेवाला उपदेश केला आहे. ईश्र्वरानें स्वमुखानें हा उपदेश केला. त्यास हंसगीता म्हणतात.    
ब्रह्मा नारदा उपदेशित । चतुश्र्लोकी भागवत ।
पुढें व्यासमुखें बहुत विस्तारलें ॥ ३६ ॥
३६) ब्रह्मदेवानें नारदाला चतुःश्र्लोकी भागवत सांगितलें. व्यासांनी नंतर त्याचा खूप विस्तार केला. 
वसिष्ठसार वसिष्ठऋषी । सांगता झाला रघुनाथासी ।
कृष्ण सांगे अर्जुनासी । सप्तश्र्लोकी गीता  ॥ ३७ ॥
३७) वसिष्ठांनी श्रीरामचंद्राला योगवासिष्ठ सांगितलें. श्रीकृष्णांनी अर्जुनाला सप्तश्र्लोकी गीता सांगितली. 
ऐसें सांगावें तें किती । बहुत ऋषी बोलिलें बहुतीं ।
अद्वैत ज्ञान आदिअंतीं । सत्यचि असे ॥ ३८ ॥
३८) अशा कितीतरी ग्रंथांची नांवे सांगतां येतील. पुष्कळ ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी उपदेश केलेला आढळतो. अर्थात् अद्वैतज्ञान आरंभापासून शेवटपर्यंत सर्व स्वानुभवी पुरुषांनी खरें मानलें आहे.  
म्हणोनि मिथ्या आत्मज्ञान । म्हणतां पाविजे पतन ।
प्रज्ञेरहित जे जन । तयांसी हें कळेना ॥ ३९ ॥
३९) म्हणून आत्मज्ञान खरें नाहीं, खोटे आहे, असे म्हणणे आपल्या अधःपाताचे ठरेल. बुद्धिहीन व विचारहीन माणसांना हें कळत नाहीं.
जेथें शेषाची प्रज्ञा मंदली । श्रुतीस मौन्य मुद्रा पडिली ।
जाणपणें न वचे वदली । स्वरुपस्थिती ॥ ४० ॥
४०) आत्मसाक्षात्कार होऊन अनुभवास येणारी स्वरुपस्थिति इतकी सूक्ष्म आहे कीं, तेथें शेषाची बुद्धि हार खाते, श्रुतींना मौन धरावें लागतें. " मला ती समजली " म्हणून कोणी तिचें वर्णन करुंच शकत नाही.
आपणास नुमजे बरवें । म्हणोनि मिथ्या कैसें करावें ।
नातरी सदृढ धरावें । सद्गुरुमुखें ॥ ४१ ॥
४१) स्वरुपस्थिति कशी आहे हें आपल्याला नीट समजत नाही. म्हणून ती खरी नाहींच असें म्हणणे योग्य नाही. सद्गुरुच्या मुखानें त्याबद्दल श्रवण करावें व तें मनामध्यें दृढपणें धरुन ठेवावे. 
मिथ्या तेंचि सत्य जालें । सत्य असोन मिथ्य केलें ।
संदेहसागरीं बुडालें । अकस्मात मन ॥ ४२ ॥
४२) देहबुद्धीमुळें जें दृश्य खोटे आहे तें खरे वाटते. जें ब्रह्म खरें आहे तें खोटे वाटते. निरनिराळ्या संशयांमध्यें मन बुडून जाते. 
मनास कल्पायाची सवे । मनें कल्पिलें तें नव्हे ।
तेणें गुणें संदेह धावे । मीपणाचेनि पंथे ॥ ४३ ॥
४३) कल्पना करायची मनाला सवय लागलेली असते. पण मन जी कल्पना करतें तें ब्रह्मस्वरुप नव्हे. अशारीतीनें कल्पना खोटी पडली कीं, देहबुद्धीच्या मीपणाने अनेक संशय गोंधळ घालतात.
तरी तो पथचि मोडावा । मग परमात्मा जोडावा ।
समूळ संदेह तोडावा । साधुचेनि संगतीं ॥ ४४ ॥
४४) म्हणून मीपणाचा मार्ग मोडून टाकावा. म्हणेजे परमात्मस्वरुपाशी तदाकार होता येते. सत्पुरुषांच्या संगाने संशयवृत्ती नाहीशीं करावी.
मीपण शस्त्रें तुटेना । मीपण फोडितां फुटेना ।
मीपण सोडितां सुटेना । कांहीं केल्यां ॥ ४५ ॥ 
४५) मीपण मोठे विलक्षण आहे. तें शस्त्रानें तोडता येत नाही. तें फोडता येत नाही आणि सोडू म्हटलें तर सुटत नाही.    
मीपणें वस्तु नाकळे । मीपणें भक्ति मावळे।
मीपणें शक्ति गळे । वैराग्याची ॥ ४६ ॥
४६) मीपणाने परमात्मवस्तु कळत नाही. मीपणामुळें भक्ति नाहीशीं होते. मीपणानें वैराग्याची शक्ति नाहीशी होते. 
मीपणें प्रपंच न घडे । मीपणें परमार्थ बुडे ।
मीपणें सकळहि उडे । येशकीर्तिप्रताप ॥ ४७ ॥
४७) मीपणानें प्रपंच नीट होत नाही. मीपणानें परमार्थही घडत नाही. यश, कीर्ति व प्रताप हे सारे मीपणामुळें नाश पावतात.  
मीपणें मीत्री तुटे । मीपणें प्रीति आटे ।
मीपणें लिगटे । अभिमान आंगीं ॥ ४८ ॥
४८) मीपणानें मैत्रीमधील स्नेह कमी होऊन मैत्री तुटते, आपापसांतील प्रेम कमी होते. मीपणामुळें माणसाच्या अंगी अभिमान चिकटतो.   
मीपणें विकल्प उठे । मीपणें कळह सुटे  ।
मीपणें संमोह फुटे । ऐक्यतेचा ॥ ४९ ॥
४९) मीपणामुळें संशय निर्माण होतो. मीपणामुळें भांडण उत्पन्न होते. मीपणामुळें परस्परांतील ऐक्यता नष्ट होते. 
मीपण कोणासिच न साहे । तें भगवंतीं कैसेनि साहे ।
म्हणौनि मीपण सांडून राहे । तोचि समाधानी ॥ ५० ॥
५०)  जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रांत मीपणा कोणालाही चालत नाही. मग भगवंताला तो कसा सहन होईल? म्हणून मीपणा सोडून जो जगतो तोच समाधानी होतो.       मीपण कैसे त्यागावें । ब्रह्म कैसें अनुभवावें ।
समाधान कैसें पावावें । कोणा प्रकारें ॥ ५१ ॥
५१) मीपणाचा त्याग कसा करावा? ब्रह्माचा अनुभव कसा घ्यावा? समाधान कसें कोणत्या प्रकारें मिळवावे?  
मीपण जाणोनि त्यागावें । ब्रह्म होऊन अनुभवावें ।
समाधान तें पावावें । निःसंगपणें ॥ ५२ ॥    
५२) मीपणाचा त्याग होण्यासाठी विवेकाची गरज असते. ब्रह्मानुभव येण्यासाठीं समरसतेची आवश्यकता असते. आणि समाधानासाठीं वासनारहित व्हावें लागते. माझेपणानें कोणत्याही दृश वस्तुंत चिकटू नये. म्हणजे समाधान मिळतें.
आणीक येक समाधान । मीपणेंविण साधन ।
करुं जाणे तोचि धन्य । समाधानी ॥ ५३ ॥
५३) समाधानाचे एक रहस्य आहे. साधना करत असतांना " मी साधना करतो " ही भावना नसेल तर त्याचे समाधान धन्य होय. देहबुद्धींत असलेले मीपण नष्ट झालें कीं " मी साधना करतो " ही भावना नाहींशी होते.     
मी तों ब्रह्मचि जालों स्वता । साधन कोण करील आतां ।
ऐसें मनीं कल्पूं जातां । कल्पनाचि उठे ॥ ५४ ॥
५४) साधना करतकरता साधक जर स्वस्वरुपाकार झाला व मीतर आतां स्वतः ब्रह्म झालो. मग आतां साधनाची जरुर काय असें म्हणूं लागला तर तो कल्पनेंमध्येच अजून आहे असे म्हणावे लागेल.   
ब्रह्मीं कल्पना न साहे । तेचि तेथें उभी राहे ।
तयेसी शोधून पाहे । तोचि साधु ॥ ५५ ॥
५५) ब्रह्नस्वरुपामध्यें कल्पनेला वाव नाही. पण जर तशी कल्पना वरीलप्रमाणें होऊं लागलीं तर तीच पुढें उभी राहते. म्हणून तीचा शोध करुन तिला नाहींशी करतो, तोच खरा साधु होय. मीपणाशिवाय साधन करणारा असा असतो.  
निर्विकल्पासी कल्पावें । परी कल्पिते आपण न व्हावें ।
मीपणासि त्यागावें । येणें रितीं ॥ ५६ ॥
५६) निर्विकल्पाची कल्पना तर करावी. पण  "  मी कल्पना करतो " अशी देहबुद्धीची भावना तेथें असूं नये. अशा रीतीनें मीपणाचा त्याग करावा. 
या ब्रह्मविद्येच्या लपणी । कांहींच नसावें असोनी ।
दक्ष आणी समाधानी । तोचि हें जाणे ॥ ५७ ॥
५७) ब्रह्मविद्येंमध्यें ज्ञाता जें जाणायचे ज्ञेय असते त्यामधें जाऊन लपतो, विलीन होतो. आणि पुन्हा वेगळेंपणानें प्रगट होतो. या विद्येंमधे " दिसायला " आपण मीपणानें असावें. पण खर्‍या अर्थानें संपूर्ण नसावें. जो कोणी तत्पर आहे आणि समाधानी आहे त्यालाच हें कळेल.   
जयासी आपण कल्पावें । तेंचि आपण स्वभावें ।
येथें कल्पनेच्या नावें । सुन्य आलें ॥ ५८ ॥
५८) ज्या ब्रह्मरुपाची आपण कल्पना करायची, तें स्वरुपच जर आपण स्वतः झालों तर मग कल्पना आपोआप शून्यवत् होऊन जाते.  
पदीहून चळों नये । करावें साधन उपाये ।
तरीच सांपडे सोये । अलिप्तपणाची ॥ ५९ ॥
५९) आपण ब्रह्मस्वरुप आहोत हें आपलें मूळचें पद होय. तेथून बाजूला न होतां आपण साधन करण्यास शिकावें. हें जर साधलें तरच अलिप्तपणाची युक्ति स्वाधीन होते. 
राजा राजपदीं असतां । उगीच चाले सर्व सत्ता ।
साध्यचि होऊन तत्वतां । साधन करावें ॥ ६० ॥
६०) राजा राजपदावर बसतो. मग तो स्वतः प्रत्यक्ष कांहीं न करतां त्याची सत्ता चालते. त्याचप्रमाणें आपण साध्यरुप व्हावें, ब्रह्मरुप बनावें आणि नंतर साधना आपोआप घडूं द्यावी.   
साधन आलें देहाच्या माथां । आपण देह नव्हे सर्वथा ।
ऐसा करुनि अकर्ता । सहजचि जाला ॥ ६१ ॥
६१) साधनेचा संबंध दृशाशी व देहाशी असतो. आणि " मी देहरुप नाही, मी ब्रह्मस्वरुप आहे " असा साधकाचा प्रत्यक्ष अनुभव असतो. म्हणून सर्व कंहीं करुन देखील त्याचें अकर्तेपण जसेंच्या तसेंच राहते.     
देह आपण ऐसें कल्पावें । तरीच साधन त्यागावें ।
देहातीत अस्तां स्वभावें । देह कैचां ॥ ६२ ॥
६२) आपण देह आहोत ही भावना असेपर्यंत साधन करणें किंवा सोडणें या क्रियांना अर्थ असतो. परंतु आपण देहातीत आत्मस्वरुप आहोत अशी प्रचीति आल्यावर देहाचें स्मरणच उरत नाही. तेथें साधन करणें किंवा सोडणें हें उरत नाहीं.  
ना ते साधन ना तें देह । आपला आपण निःसंदेह । 
देहीच असोन विदेह । स्थिति ऐसी ॥ ६३ ॥
६३) ब्रह्मस्वरुप झाल्यामुळें जो पूर्णपणें संदेहरहित होत. त्याला ना देहाचे भान उरतें ना साधनाची आठवण राहते. देहांत असून विदेह अवस्था भोगणें तें हें असें असते.
साधनेंविण ब्रह्म होतां । लागों पाहे देहममता ।
आळस प्रबळे तत्वतां । ब्रह्मज्ञानमिसें ॥ ६४ ॥
६४) चिकाटीनें व सातत्यानें उत्तम साधना झाल्याखेरीज जर ब्रह्माकारता प्राप्त झाली तर देहाचे ममत्व चिकटण्याचा संभव असतो. तसेंच ब्रह्मज्ञानाच्या नांवाखाली आळस बळावतो. 
परमार्थमिसें अर्थ जागे । ध्यानमिसें निद्रा लागे ।
मुक्तिमिसें दोष भोगे । अनर्गळता ॥ ६५ ॥
६५)  परमार्थाच्या नांवाखालीं स्वार्थाचा व्यवहार होतो. ध्यानाच्या नावांखाली झोप लागते. आणि मुक्तपणाच्या नावांखालीं स्वैराचार अंगी बोकाळतो.
निरुपणमिसें निंदा घडे । संवादमिसें वेवाद पडे ।
उपाधीमिसें येऊन जडे । अभिमान आंगीं ॥ ६६ ॥
६६) निरुपणाच्या निमित्तानें निंदा करण्याकडे मन धांवतें. सुखसंवादाच्या नावांखालीं वादविवाद करण्याची प्रवृत्ती होते. आणि व्याप वाढल्यानें अभिमान अंगी चढतो.  
तैसा ब्रह्मज्ञानमिसें । आळस अंतरीं प्रवेशे ।
म्हणे साधनाचें पिसें । काये करावें ॥ ६७ ॥
६७) असा मनुष्य म्हणूं लागतो कीं, ब्रह्मज्ञान झाल्यावर साधनाचें वेड घेऊन करायचें काय? अर्थांत ब्रह्मज्ञानाच्या नावांखालीं त्याच्या अंगामधें आळस शिरतो.
श्र्लोक
किं करोमि क्व गच्छामि किं गृह्णामि त्यजामि किम् ।
आत्मना पूरितं सर्वं महाकल्पांबुना यथा ॥
अर्थ 
कल्पान्त आला कीं महाप्रलय होतो. त्यावेळीं जिकडे तिकडे पाणी भरुन जाते. त्याचप्रमाणें आत्मा सर्व ठिकाणीं भरलेला आहे. मग मी काय करुं? कोठें जाऊं? काय घेऊं? आणि काय सोडूं?  
वचन आधारीं लाविलें । जैसें शस्त्र फिराविलें ।
स्वता हाणोन घेतलें । जयापरी ॥ ६८ ॥
६८) समजा, एखाद्या माणसानें स्वतःच्या हातामध्यें हत्यार स्वतःवरच चालविलें. तर तसें करण्यानें तो स्वतःच आपला घात करुन घेतो. त्याचप्रमाणें वरील श्र्लोकासारखीं वचनें आपल्या वागण्यास आधार घेऊन माणूस आपणच आपला घात करुन घेतो. 
तैसा उपायाचा अपाये । विपरीतपणें स्वहित जाये ।
साधन सोडितां होये । मुक्तपणें बद्ध ॥ ६९ ॥
६९) उपायाचा अपाय होतो तो असा. उलटेपणानें वागलें असतां माणूस स्वहितास मुकतो. माणसानें साधन सोडलें तर त्याचें मुक्तपणच त्याच्या बंधनााला कारण होतें. 
साधन करितां च सिद्धपण । हातींचे जाईल निघोन ।
तेणें गुणें साधन । करुंच नावडे ॥ ७० ॥
७०) आपण जर साधन केलें तर आपले सिद्धपण अंतरेल. या भयानें त्याला साधन करावेंसें वाटत नाहीं.  
लोक म्हणती हा साधक । हेचि लज्जा वाटे येक ।
साधन करिती ब्रह्मादिक । हें ठाउकें नाहीं ॥ ७१ ॥
७१) साधन केले तर  " हा सिद्ध नाहीं हा साधक आहे " असें लोक म्हणतील . हें ऐकण्याची फार लाज वाटतें. पण याला हें माहित नसतें कीं ब्रह्मादिक देवसुद्धा साधन करतात.    
आतां असो हेअविद्या । अभ्याससारणी विद्या ।
अभ्यासें पाविेजे अद्या । पूर्ण ब्रह्म ॥ ७२ ॥
७२) आतांपर्यंत सांगितलें तें सगळें देहबुद्धीचें किंवा अविद्येचे चित्र आहे. जो अभ्यास करतो त्याच्याच मागेम विद्या जाते. केवळ अभ्यासानें किंवा साधनानेंच सर्वांचे मूळ असलेलें ब्रह्म हस्तगत होते. 
अभ्यास करावा कवण । ऐसा श्रोता करी प्रश्र्न ।
परमार्थाचें साधन । बोलिलें पाहिजे ॥ ७३ ॥
७३) हें ऐकून श्रोता विचारतो कीं, कोणता अभ्यास करावा? परमार्थाचें साधन आम्हांला सांगावें. 
याचें उत्तर श्रोतयांसी । दिधले पुढिले समासीं ।
निरोपिलें साधनासी । परमार्थाच्या ॥ ७४ ॥
७४) या प्रश्र्णाचे उत्तर पुढील समासांत दिलें आहे. परमार्थाचें साधन कसें करावें हें तेथें नीट सांगितलें आहे.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे साधनप्रतिष्ठानिरुपणनाम समास सातवा ॥
Samas Satava SadhanPratishtha Nirupan
समास सातवा साधन प्रतिष्ठानिरुपण


Custom Search

No comments:

Post a Comment