Monday, October 2, 2017

Samas Dusara Sukshma Aashanka Nirupan समास दुसरा सूक्ष्मआशंकानिरुपण


Dashak Aathava Samas Dusara Sukshma Aashanka Nirupan
Samas Dusara Sukshma Aashanka Nirupan, It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Maya. How Maya is created. What are the different opinions about creation of Maya.
समास दुसरा सूक्ष्मआशंकानिरुपण 
श्रीराम ॥
मागां श्रोतीं आक्षेपिलेम । तें पाहिजे निरोपिलें ।
निरावेवीं कैसें जालें । चराचर ॥ १ ॥ 
१) या आधीच्या समासांत श्रोत्यानें आक्षेप घेतला होता कीं, निर्गुण ब्रह्मामध्यें हें चराचर कसें निर्माण झाले. त्याचे उत्तर प्रथम द्यावयास हवे.  
याचें प्रतिवचन । ब्रह्म जें कां सनातन ।
तेथें माया मिथ्याभाव । विवर्तरुप भासे ॥ २ ॥
२) तें उत्तर असें आहे. ब्रह्म सनातन आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी विवर्तरुप माया निर्माण झाली. ती खरी नसून खरेंपणानें भासूं लागली. दृष्टीला भ्रम होऊन दोरी असतांना सापाचा भास होतो. याला ' विवर्त ' म्हणतात. तसेंच मी आत्मा आहे हे विसरुन मी देहच आहे अशी भावना होणें यालाही विवर्त म्हणतात. अविद्येनें हे घडून येते.  
आदि येक परब्रह्म । नित्यमुक्त अक्रिय परम ।
तेथें अव्याकृत सूक्ष्म । जाली मूळमाया ॥ ३ ॥
३) आधी मूळ एक ब्रह्मच होते. तें नित्यमुक्त, निष्क्रिय व सर्वश्रेष्ठ असतें. त्याच्या ठिकाणीं कोणताही विकार नसलेली व अत्यंत सूक्ष्म अशी मूळमाया उत्पन्न झाली. 
श्र्लोक 
आद्यमेकं परब्रह्म नित्यमुक्तमविक्रियम् ।
तस्य माया समावेशी जीवमव्याकृतात्मकम् ॥
अर्थ 
मुळांत सर्वांच्या आधी एक परब्रह्म असतें. तें नित्यमुक्त असते. त्याच्यामधें कोणताही बदल होत नसतो. त्यामध्यें अत्यंत सूक्ष्म माया उत्पन्न होते. तिच्यांत बीजरुपानें जीव वास करतो.
आशंका ॥ येक ब्रह्म निराकार । मुक्त अक्रिये निर्विकार ।
तेथें माया वोडंबर । कोठून जाली ॥ ४ ॥
४) यावर शंका अशी कीं, ब्रह्म एक आहे, निराकार, मुक्त, निष्क्रिय व निर्विकार आहे. हे जर खरें तर त्याच्या ठिकाणी साकार, सक्रिय व सविकार माया कशी निर्माण झाली. 
ब्रह्म अखंड निर्गुण । तेथें इच्छा धरी कोण ।
निर्गुणीं सगुणेविण । इच्छा नाहीं ॥ ५ ॥
५) त्याच्या संकल्पानें विश्व निर्माण झाले असे म्हणता येत नाही. कारण ब्रह्म अखंड व निर्गुण आहे. त्याला इच्छा कशी असणार? ब्रह्म सगुण मानल्यावाचंचून त्याच्या ठिकाणीं इच्छा अथवा संकल्प होऊं शकत नाहीं.   
मुळीं असोचिना सगुण । म्हणौनि नामें निर्गुण ।
तेथें जालें सगुण । कोणेपरी ॥ ६ ॥
६) मूळ परब्रह्मांत सगुणाला वाव नाही म्हणून तर तें निर्गुण आहे. असें असतांना निर्गुण ब्रह्मामध्यें सगुण निर्माण झालेंच कसें ?
निर्गुणचि गुणा आलें । ऐसें जरी अनुवादलें ।
लागों पाहे येणें बोलें । मूर्खपण ॥ ७ ॥ 
७) निर्गुण ब्रह्मच सगुण बनलें म्हटलें तर हें म्हणणें मूर्खपणाचे होईल. कारण मग ब्रह्म नित्य व अविकारी राहणार नाही.
येक म्हणती निरावेव । करुन अकर्ता तो देव ।
त्याची लीळा बापुडे जीव । काये जाणती ॥ ८ ॥
८) कोणी म्हणतात कीं, देव खरा निराकारच आहे. पण तो सर्व करुन अकर्ता  आहे. ही त्याची लीला विलक्षण आहे. ती कोणास कळणार नाही. 
येक म्हणती तो परमात्मा । कोण जाणे त्याचा महिमा ।
प्राणी बापुडा जीवात्मा । काये जाणे ॥ ९ ॥
९) कोणी म्हणतात कीं, तो परम आत्मा आहे. त्याचा महिमा अगाध आहे. बापुड्या जीवाला तो कळणार नाही. 
उगाच महिमा सांगती । शास्त्रार्थ अवघा लोपिती ।
बळेंचि निर्गुणास म्हणती । करुनि अकर्ता ॥ १० ॥
१०) अशा लोकांना देवाचे खरें स्वरुप कळलेले नसते. ते उगाच त्याचा महिमा सांगत सुटतात. वेदान्तांतील प्रतिपादन बाजूस करुन आपल्याच आग्रहानें निर्गुण ब्रह्म करुन अकर्ता आहे असें म्हणतात.  
मुळीं नाहीं कर्तव्यता । कोण करुन अकर्ता ।
कर्ता अकर्ता हे वार्ता । समूळ मिथ्या ॥ ११ ॥
११) मूळ निर्गुण स्वरुपामध्यें अमुक एक करावें ही ऊर्मीच नसते. तेथें तो करुन अकर्ता आहे असें म्हणताच येत नाही. ब्रह्म करुन अकर्ता आहे ही गोष्ट अगदी खोटी आहे. 
जें ठांईचें निर्गुण । तेथें कैचें कर्तेपण ।
तरी हे इच्छा धरी कोण । सृष्टिरचाव्याची ॥ १२ ॥
१२) मुळांत जें निर्गुण आहे तेथें कर्तेपणाचा, कर्म करण्याचा भावच असूं शकत नाही.हें खरें असल्यानें सृष्टीरचावयाची इच्छा कोण धरेल ?
इच्छा परमेश्र्वराची । ऐसी युक्ती बहुतेकांची । 
परी त्या निर्गुणास इच्छा कैंची । हें कळेना ॥ १३ ॥
१३) परमेश्र्वराच्या इच्छेनें हें विश्र्व निर्माण झालें असें पुष्कळ लोकांना वाटते. पण परमेश्र्वर तर निर्गुण आहे. मग ता निर्गुणांत ही इच्छा कशी उत्पन्न झाली हे मात्र कोणालाच कळत नाही. 
तरी हें इतुकें कोणें केलें । किंवा आपणचि जालें ।
देवेंविंण उभारलें । कोणेपरी ॥ १४ ॥
१४) मग हें एवढें विश्व कोणी उभारलें  ? कां तें आपोआप झाले ? देव जर त्याचा कर्ता नाही तर हें कसें झालें ?
देवेविण जालें सर्व । मग देवास कैंचा ठाव ।
येथें देवाचा अभाव । दिसोन आला ॥ १५ ॥
१५) देवाशिवाय जर हें विश्व झालें असेल तर मग देवाला अस्तित्वच उरत नाही. आणि देव नाहींच असें म्हणावें लागेल.  
देव म्हणों सृष्टिकर्ता । तरी येवं पाहे सगुणता ।
निर्गुणपणाची वार्ता । देवाची बुडाली ॥ १६ ॥
१६) देव विश्र्व रचनेचा कर्ता म्हटला तर तो सगुण म्हणावा लागतो. मग देव निर्गुण आहे हा सिद्धांतच उरत नाही.  
देव ठांईचा निर्गुण । तरी सृष्टिकर्ता कोण ।
कर्तेपणाचें सगुण । नासिवंत ॥ १७ ॥
१७) देव खरोखरच निर्गण आहे असें म्हटलें तर या विश्र्वाचा कर्ता कोण या प्रश्र्णाचे काय ? कारण सगुणपणा नाशवंत असतो त्यामुळें कर्तेपणा असलेला देव देखील नाशवंत ठरतो.  
येथें पडिले विचार । कैसें जालें सचराचर ।
माया म्हणों स्वतंतर । तरी हेंहि विपरीत दिसे ॥ १८ ॥
१८) हें चराचर विश्व कसें झालें याचा अधिक विचर केला तर असें वाटते कीं, माया स्वतंत्र आहे व तीनें हें विश्व रचले. पण हेसुद्धा विपरीत दिसते.   
माया कोणीं नाहीं केली । हे आपणचि विस्तारली ।
ऐसें बोलतां बुडाली । देवाची वार्ता ॥ १९ ॥
१९) माया स्वतंत्र आहे. ती कोणी केलेली नाहीं. तिनें स्वतःच आपला विस्तार केला, असें जर मानलें तर देवाला स्थान उरत नाही.
देव निर्गुण स्वतसिद्ध । त्यासी मायेसि काये समंध ।
ऐसें बोलतां विरुद्ध । दिसोन आलें ॥ २० ॥
२०) देव निर्गुण आहे स्वतः सिद्ध आहे. त्याचा मायेशी कांहीं संबंध नाही असें  म्हणणे अद्वैतास विरोध करणारें आहे. 
सकळ कांहीं कर्तव्यता । आली मायेच्याचि माथां ।
तरी भक्तांस उद्धरिता । देव नाहीं कीं ॥ २१ ॥
२१) सगळा कर्तेपणा मायेचा आहे असे म्हटले तर एक नविनच अडचण उत्तपन्न होते. जर माया सर्व कांहीं कर्ते तर भक्तांचा उद्धार करणारा कोणी देव आहे कां नाही ? 
देवेमविण नुस्ती माया । कोण नेईल विलया ।
आम्हां भक्तां सांभाळाया । कोणीच नाहीं ॥ २२ ॥
२२) देव असून त्याची सत्ता मायेवर चालत असेल तरच तो माया नाहींशी करुं शकेल. असें जर नसेल तर अज्ञानी जीवांना मायेपासून कोण सोडवील ? आम्हाम भक्तांना कोणी सांभाळणाराच नाही असा प्रसंग येईल.  
म्हणोनि माया स्वतंतर । ऐसा न घडे कीं विचार ।
मायेचा निर्मिता सर्वेश्र्वर । तो येकचि आहे ॥ २३ ॥
२३) म्हणून माया स्वंतत्र आहे हा विचार कांही बरोबर नाहीं. मायेला निर्माण करणारा व आवरणारा परमेश्र्वर म्हणून कोणीतरी आहे यांत शंका नाही.  
तरी तो कैसा आहे ईश्र्वर । मायेचा कैसा विचार ।
तरी हे आतां सविस्तर । बोलिलें पाहिजे ॥ २४ ॥
२४) आतां तो परमेश्र्वर कसा आहे. मायेचा व त्याचा संबंध काय आहे. हें विस्तारानें सांगणें जरुर आहे.  
श्रोता व्हावें सावधान । येकाग्र करुनिया मन ।
आतां कथानुसंधान । सावध ऐका ॥ २५ ॥
२५) श्रोत्यांनी आतां आपले मन एकाग्र करावें, साावधान व्हावें व जो विषय चालला आहे. तो नीट ऐकावा.  
येके आशंकेचा भाव । जनीं वेगळेले अनुभव ।
तेहि बोलिजेती सर्व । येथानुक्रमें ॥ २६ ॥
२६) वास्तविक मुळांत शंका एकच आहे. पण लोक निरनिराळ्या दृष्टिकोनांतून ती निरसन करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळें प्रत्येकजण आपला भिन्न अनुभव सांगतो. हे सर्व अनुभव आतां क्रमवार सांगतो.  
येक म्हणती देवें केली । म्हणोनि हे विस्तारली ।
देवास इछ्या नस्ती जाली । तरी हे माया कैची ॥ २७ ॥
२७) कोणी म्हणतात कीं, माया देवानेंच केली आहे. म्हणून तिचा एवढा मोठा विस्तार झाला. देवाला इच्छाच झाली नसती तर मग माया देखील निर्माण झाली नसती.  
येक म्हणती देव निर्गुण । तेथें इछा करी कोण ।
माया मिथ्या हे आपण । जालीच नाहीं ॥ २८ ॥
२८) कोणी म्हणतात कीं, देव निर्गुण आहे. त्यामुळें देवाच्या ठिकाणीं इच्छा निर्माण होत नाही. अर्थात् माया खोटी आहे. म्हणून ती कधीं जन्मास आलींच नाही.  
येक म्हणती प्रत्यक्ष दिसे । तयेसी नाहीं म्हणतां कैसें ।
माया हे अनादि असे । शक्ती ईश्र्वराची ॥ २९ ॥
२९) कोणी म्हणतात कीं माया प्रत्यक्ष दिसते. तेव्हां ती नाही म्हणून चालणार नाही. माया ही ईश्र्वराची अनादि शक्ति आहे. 
येक म्हणती साच असे । तरी हे ज्ञाने कैसी निरसे ।
साचासारिखीच दिसे । परी हे मिथ्या ॥ ३० ॥
३०) कोणी म्हणतात माया जर खरी मानली तर ती ज्ञानानें नाश पावली नसती. म्हणून ती खरी वाटली तरी ती खरी नाही. 
येक म्हणती मिथ्या स्वभावें । तरी साधन कासया करावें ।
भक्तिसाधन बोलिलें देवें । मायात्यागकारणें ॥ ३१ ॥
३१) कोणी म्हणतात कीं, माया खोटी आहे तर जीवाला उद्धारासाठी साधन करण्याची आवश्यकता नाही. परंतु माया नाहींशी व्हावी म्हणून भगवंताने भक्तीचे साधन सांगितले आहे.  
येक म्हणती मिथ्या दिसतें । भयें अज्ञानसन्येपातें ।
साधन औषधही घेईजेतें । परी तें दृश्य मिथ्या ॥ ३२ ॥
३२) कोणी म्हणतात कीं माया वास्तविक मिथ्याच आहे. पण जीवास अज्ञानरुपी सन्निपात ज्वर आला आहे. त्यामुळें त्यास भय वाटते, चिंता वाटतें. साधनरुपी औषधानें हें सारें दृश्य मिथ्या म्हणून अनुभवास येतें.    
अनंत साधनें बोलिलीं । नाना मतें भांबावलीं ।
तरी माया नवचे त्यागिली । मिथ्या कैसी म्हणावी ॥ ३३ ॥
३३) मायेच्या तडाख्यांतून बाहेर पडण्यास अनेक साधनें सांगितलीं आहेत. तिच्याविषयीं नाना मतांचा गोंधळ आहे. असें असूनही तिला सोडून दूर जाता येत नाही. अशा त्या मायेला खोटे कसें म्हणावें ?  
मिथ्या बोले योगवाणी । मिथ्या वेदशास्त्रीं पुराणीं ।
मिथ्या नाना निरुपणीं । बोलिली माया ॥ ३४ ॥
३४) तरी योगशास्त्र, वेद, शास्त्रें व पुराणें , अनेक तत्त्वचिंतक, निरुपणकार, माया मिथ्या आहे असें म्हणतात.
माया मिथ्या म्हणतां गेली । हे वार्ता नाहीं ऐकिली ।
मिथ्या म्हणतांच लागली । समागमें ॥ ३५ ॥
३५) माया खरी नाहीं असें म्हटल्यावर माया नाहींशी झाली असा कांहीं कोणी ऐकलेले नाही. उलट तिला मिथ्या म्हटलें ती आपल्याबरोबरच राहतें. 
जयाचे अंतरी ज्ञान । नाही वोळखिले सज्जन ।
तयास मायामिथ्याभान । सत्यचि वाटे ॥ ३६ ॥
३६) ज्याला आत्मज्ञान नसतें आणि जो संतांना ओळखूं शकत नाही त्या माणसाला मायेच्या मिथ्यापणाची जाणीव खरी वाटते. माया खरी नाहीं हें ज्ञान खरें आहे असें त्यास वाटते. 
जेणें जैसा निश्र्चयें केला । तयासी तैसाचि फळाला ।
पाहे तोचि दिसे बिंबला । तैसी माया ॥ ३७ ॥
३७) ज्याच्या मनाचा जो दृढ भाव असतो त्याचा परिणाम तसाच त्याच्यावर घडतो. जो आरशांत पाहतो त्यास स्वतःचेच प्रतिबिंब दिसते. मायेच्या बाबतींत तसेंच होते. मायेविषयीं ज्याची जी भावना असते त्या भावनेप्रमाणें त्यास माया दिसते.  
येक म्हणती माया कैंची । आहे तें सर्व ब्रह्मचि ।
थिजल्या विघुरल्या घृताची । ऐक्यता न मोडे ॥ ३८ ॥
३८) कोणी म्हणतात कीं, माया मुळीं नाहींच आहे. जें आहे तें सर्व परब्रह्मच आहे. तूप पातळ असो कीं घट्ट शेवतीं तें तूपच. त्यामुळें ब्रह्म अदृश्य राहिलें काय किंवा तें दृश्य विश्वरुपानें दिसलें काय, मूळ ब्रह्मरुपामध्यें फरक पडत नाहीं.  
थिजलें आणी विघुरलें । हें स्वरुपीं नाहीं बोलिलें ।
साहित्य भंगलें येणें बोलें । म्हणती येक ॥ ३९ ॥
३९) खरें म्हणजें थिजणें किंवा विरघळणें हीं भाशा ब्रह्मस्वरुपाला लागूं पडत नाही. म्हणून कोणी म्हणतात कीं, हा दृष्टांतच मुळीं ब्रह्मस्वरुपाला चुकीनें लावला आहे. 
येक म्हणती सर्व ब्रह्म । हें न कळे जयास वर्म ।
तयाचे अंतरी भ्रम । गेलाच नाहीं ॥ ४० ॥
४०) कोणी म्हणतात कीं, ब्रह्मस्वरुपाचें वर्म ज्यास कळलें नाही त्याच्या अंतरंगाचा भ्रम अजून गेलाच नाहीं असें समजावें. 
येक म्हणती येकचि देव । तेथें कैंचे आणिलें सर्व । 
सर्व ब्रह्म हें अपूर्व । आश्र्चिर्य वाटे ॥ ४१ ॥ 
४१) कोणी म्हणतात कीं, देव एकमेव अद्वितीय आहे. त्याच्यावाचून दुसरे कांहीं नाहींच. मग " सर्व कांहीं ब्रह्मच आहे. देवच आहे. " या बोलण्यांत सर्व शब्दांचे कांहीं प्रयोजन नाहीं. " सर्व कांहीं ब्रह्म हें बोलणें विलक्षण वाटते. त्याचें आश्र्चर्य वाटते     
येक म्हणती येकची खरें । आनुहि नाहीं दुसरें ।
सर्व ब्रह्म येणें प्रकारें । सहजचि जालें ॥ ४२ ॥
४२) कोणी म्हणतात कीं, सद्वस्तु केवळ एकच एक आहे. त्यावाचूंन दुसरें यत्किंचीतही नाही. तर मग जें आहें तें ब्रह्मच आहे. हें निराळें सिद्ध करण्याची जरुरच नाही.    
सर्व मिथ्या येकसरें । उरलें तेंचि ब्रह्म ।
ऐसीं वाक्यें शास्त्राधारें । बोलती येक ॥ ४३ ॥
४३) कोणीं शास्त्रांतील वाक्यें आधार घेतात आणि म्हणतात आणि म्हणतात कीं, हें सगळेंच्या सगळें दृश्य जर मिथ्या आहे तर मिथ्या जाऊन जें उरतें तें ब्रह्म तेवढें खरें होय.    
आळंकार आणी सुवर्ण । तेथें नाहीं भिन्नपण ।
आटाआटी वेर्थ सीण । म्हणती येक ॥ ४४ ॥
४४) कोणी म्हणतात कीं, सोनें व सोन्याचें दागिनें यांत कांहींच फरक नसतो दोन्ही सोनेंच. त्याचप्रमाणें ब्रह्म व जगत् यांच्यांत भेद नाहीं. असें जर आहे तर अमुक सत्य व अमुक मिथ्या अशी आटापीट करण्याचें कारणच नाहीं.  
हीन उपमा येकदेसी । कैसी साहेल वस्तूसी ।
वर्णवेक्ती अव्यक्तासी । साम्यता न घडे ॥ ४५ ॥
४५) पण यावर कांहीं लोक असा आक्षेप घेतात कीं, कोणतीही उपमा दृश्य वस्तुवरुनच सुचते. दृश्य वस्तु एकदेशी तर ब्रह्म सर्वदेशी आहे, अर्थात् प्रत्येक उपमा ब्रह्माच्याबाबतींत उणी पदते. तिनेम ब्रह्माचे वर्णन होऊं शकत नाहीं. सोनें व्यक्त व रंगयुक्त आहे तर ब्रह्म अव्यक्त व रंगरहित आहे सबब दोन्हीची तुलना होऊं शकत नाही.  
सुवर्णीं दृष्टी घालितां । मुळींच आहे वेक्तता । 
आळंकार सोनें पाहातां । सोनेंचि असे ॥ ४६ ॥
४६) सोन्याच्या उपमेंमध्ये सोनें मुळांतच व्यक्त आहे. दागिनें व सोनें या दोन्हींमध्यें मुळांतच व्यक्त असणारें सोनें असतें.  
मुळीं सोनेंचि हें वेक्त । जड येकदेसी पीत ।
पूर्णास अपूर्णाचा दृष्टांत । केवी घडे ॥ ४७ ॥
४७) सोनें दृश्य, व्यक्त, पिवळें, जड, एकदेशी असते आणि ब्रह्म तर अदृश्य, अव्यक्त रंघीन, सूक्ष्म आणि सर्वदेशीअसतें. सोनें अपूर्ण तर ब्रह्म पूर्ण आहे. मग पूर्णाला अपूर्णाचा दृष्टांत कसा लागूं पडेल ?  
दृष्टांत तितुका येकदेसी । देणें घडे कळायासी ।
सिंधु आणी लहरीसी । भिन्नत्व कैंचे ॥ ४८ ॥
४८) दृष्टांत देणारा यावर म्हणतो कीं, कोणताही दृष्टांत एकदेशी व अपूर्ण असतो हें मान्य आहे. पण ब्रह्मस्वरुपाची कल्पना येण्यासाठीं तो वापरावा लागतो. समुद्र व त्यावर उठणार्‍या पाण्याच्या लाटा या एकरुपच असतात. त्यांच्यांत भेद नसतो.      
उत्तम मधेम कनिष्ठ । येका दृष्टांतें कळे पष्ट ।
येका दृष्टांतें नष्ट । संदेह वाढे ॥ ४९ ॥
४९) दृष्टांताची अशी एक खुबी आहे कीं, एखाद्या दृष्टांतानें उत्तम, मध्यम व कनिष्ठ यांचें स्पष्ट ज्ञान घडते. पण कांहीं दृष्टांत असें असतात कीं, त्यांच्या द्वारां ज्ञान तर घडतच नाहीं पण भलताच विकल्प मात्र वाढतो.   
कैंचा सिंधु कैंची लहरी । अचळास चळाची सरी ।
साचाऐसी वोडंबरी । मानूंच नये ॥ ५० ॥
५०) सागर्‍याच्या दृष्टांतात समुद्र सतत बदलणरा व चंचल तर ब्रह्म अचल त्याला अचल समुद्राचा दृष्टांत देणें बरोबर नाही. जादूनें निर्माण केलेल्या वस्तु संपूर्ण खर्‍या मानूंच नयेत.   
वोडंबरी हे कल्पना । नाना भास दाखवी जना ।
येरवी हे जाणा । ब्रह्मचि असे ॥ ५१ ॥
५१) त्यावर कोणी म्हणतात कीं, जादूगार आपल्या कल्पनेनें लोकांपुढें अनेक प्रकारचे भास निर्माण करतो. तें कांहीं खरें नसतात. पण एरवी तें सारे ब्रह्मच आहे. 
ऐसा वाद येकमेकां । लागतां राहिली आशंका ।
तेचि आतां पुढें ऐका । सावध होउनी ॥ ५२ ॥   
५२) अशा रीतीनें एकमेकांमध्यें वाद चालतात व मूळ आशंका मात्र बाजूलाच रहाते. तिचे निरसन आतां लक्ष देऊन ऐकावें.   
माया मिथ्या कळों आली । परी ते ब्रह्मी कैसी जाली ।
म्हणावी ते निर्गुणें केली । तरी ते मुळींच मिथ्या ॥ ५३ ॥
५३)माया खरी नाहीं हें कळलें. पण ती ब्रह्मामध्यें निर्माण कशी झाली हें सांगतां आलेंच पाहिजे. माया निर्गुणानें निर्माण केलीं असें म्हणणें तर मुळांतच मिथ्या आहे. निर्गुण कांहीं निर्माण करीत नाही. आणि त्यांतलें त्यांत जें मिथ्याच आहे तें तर निर्गुण निर्माण करतें हें म्हणणेंच अगदी अयोग्य आहे.  
मिथ्या शब्दीं कांहींच नाहीं । तेथें केलें कोणें काई ।
करणें निर्गुणाचा ठांई । हेंहि अघटित ॥ ५४ ॥
५४)  " काहींच नाहीं " असा मिथ्या शब्दाचा भावार्थ आहे. जें नाहीं तें कोणीतरी निर्माण केलें हें म्हणणें बरोबर नाहीं. निर्गुण ब्रह्म नसलेलीं माया निर्माण करणें हे अघटित वाटते. 
कर्ता ठांईच अरुप । केलें तेंहि मिथ्यारुप ।
तथापी फेडूं आक्षेप । श्रतयांचा ॥ ५५ ॥
५५) अघटित कसें तें पहा. निर्माण करणारा कर्ता मुळांतच निराकार आहे. आणि त्यानें जें निर्माण केलें तें सगळें मिथ्या आहे. हें सगळेंच कांहीं तरी विलक्षण वाटतें. असें जरी असलें तरी श्रोत्यांच्या शंकेचे निरसन करायला हवें.    
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्मआशंकानिरुपण समास दुसरा ॥ 
Samas Dusara Sukshma Aashanka Nirupan
समास दुसरा सूक्ष्मआशंकानिरुपण 



Custom Search

No comments:

Post a Comment