Thursday, November 16, 2017

Samas Dahava Sthiti Nirupan समास दहावा स्थितिनिरुपण


Dashak Navava Samas Dahava Sthiti Nirupan 
Samas Dahava Sthiti Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Sthiti. Janiva and Neniva are two sthitis of the people. Janiva means means a person who has become Dyani. Neniva means person who has no knowledge.
समास दहावा स्थितिनिरुपण
श्रीराम ॥
देउळामधें जगन्नाथयेक । आणी देउलावरी बैसला काक ।
परी तो देवाहून अधिक । म्हणों नये कीं  ॥ १ ॥
१) एखाद्या देवळांत गाभार्‍यांत देव व देवळाच्या शिखरावर कावळा बसला तर तो कावळा देवापेक्षां श्रेष्ठ असें कोणी म्हणत नाहीं.
सभा बैसली राजद्वारीं । आणी मर्कट गेलें स्तंभावरी ।
परी ते सभेहून श्रेष्ठ चतुरीं । कैसें मानावें ॥ २ ॥
२) राजवाड्यांत राजसभा भरली आहे. अशावेळी सभामंडपाच्या खांबावर माकड चढून बसले तर सभासद खाली बसलेले असून माकड त्यांच्यापेक्षां उंच जागी बसले म्हणून माकडाला सभासदांहून मोठा मानीत नाहीत. 
ब्राह्मण स्नान करुन गेले । आणी बक तैसेंचि बैसले ।
परी ते ब्राह्माणास भले । कैसे मानावे ॥ ३ ॥
३) कांहीं ब्राह्मण तळ्यावर स्नान करुन व ध्यान करुन गेले. तेथेंच बगळेसुद्धा डोळें बंद करुन बसून राहीले. तर त्यांना ब्राह्मणांहून श्रेष्ठ मानता येत नाहीत.  
ब्राह्मणामधें कोणी नेमस्त । कोणी जाले अव्यावेस्त ।
आणी स्वान सदा ध्यानस्त । परी तें उत्तम नव्हे ॥ ४ ॥
४) ब्राह्मणांमधें कांहींजण नियम पाळणारे तर कांहीं न पाळणारे अव्यवस्थित आहेत. कुत्रा तर सदा ध्यानस्त बसलेला. तरी तो कांहीं ब्राह्मणांहून श्रेष्ठ मानता येत नाही. 
ब्राह्मण लक्षमुद्रा नेणें । मार्जर लक्षविषईं शाहाणें ।
परी ब्राह्मणापरीस विशेष कोणें । म्हणावें तयासी ॥ ५ ॥
५) एखाद्या वस्तूकडे एकाग्र होऊन बघण्याची संवय कित्येक ब्राह्मणांपाशी नसते. पण मांजर एखाद्या वस्तुकडे एकाग्र होऊन बघूं शकते म्हणून तें कांहीं ब्राह्मणांपेक्षां श्रेष्ठ मानता येत नाही. 
ब्राह्मण पाहे भेदाभेद । मक्षिका सर्वांस अभेद । 
परी तीस जाला ज्ञानबोध । हें तो न घडे कीं ॥ ६ ॥
६) ब्राह्मण भेदाभेद पाहून वागतो. पण माशी कोणताही भेद पाळत नाहीं. तिला उकिरडा व उत्तम अन्न दोन्ही सारखेंच असतात. असें असलें तरी माशीला आत्मज्ञान झालें असें कधी होत नाही. 
उंच वस्त्रें नीच ल्याला । आणि समर्थ उघडाच बैसला ।
परी तो आहे परीक्षिला । परीक्षवंतीं ॥ ७ ॥
७) समजा, एखाद्या कनिष्ठ प्रतीच्या माणसानें भारी कपडे घातले आहेत व एखादा थोर पुरुष उघडाच बसला आहे. तर खरी परीक्षा करणारे जाणते लोक श्रेष्ठ कोण व कनिष्ठ कोण हें बरोबर ओळखतात.  
बाह्याकार केला अधीक । परी तो अवघा लोकिक ।
येथें पाहिजे मुख्य येक । अंतरनिष्ठा ॥ ८ ॥
८) बाहेरुन पुष्कळ देखावा केला तर तो व्यवहारांत चालतो. पण परमार्थांत मुख्य अंतर्निष्ठा लागते. ती नसेल तर परमार्थ लटका पडतो. अंतर्निष्ठा म्हणजे आत्मनिष्ठा होय.  
लोकिक बरा संपादिला । परी अंतरीं सावध नाहीं जाला ।
मुख्य देवास चुकला । तो आत्मघातकी ॥ ९ ॥
९) एखाद्यानें व्यवहारांमध्यें उत्तम लौकिक मिळवला. पण अंतर्यामींच्या स्वरुपाकडे लक्ष दिलें नाहीं, तर मुख्य देव त्यास प्राप्त होत नाहीं. असा मनुष्य आत्मघातकी होय. तो स्वतःच स्वतःचा घात करुन घेतो. 
देवास भजतां देवलोक । पित्रांस भजतां पित्रलोक ।
भूतांस भजतां भूतलोक । पाविजेतो ॥ १० ॥
१०) देवतांची उपासना केली तर देवलोक मिळतो. पितरांची उपासना केली तर पितृलोक मिळतो. भूतांची उपासना केली तर भूतलोक मिळतो.
जेणें जयास भजावें । तेणें त्या लोकासी जावें ।
निर्गुणीं भजतां व्हावें । निर्गुणचि स्वयें ॥ ११ ॥
११) जो ज्याची उपासना करतो त्यास तो लोक मिळतो. निर्गुणाची उपासाना केल्यास माणूस स्वतः निर्गुणी बनतो. 
निर्गुणाचें कैसें भजन । निर्गुणीं असावें अनन्य ।
अनन्य होतां होईजे धन्य । निश्र्चयेंसीं ॥ १२ ॥
१२) श्रोत्यांनी विचारलें निर्गुणाची उपासना कशी करावी ? वक्त्यानें सांगितलें कीं, आपण निर्गुणाशी अनन्य व्हावें, मीपणा बाजूस सारुन त्यांत मिसळून जावें. अशा रीतीनें निर्गुणाशी समरस होणारा निश्र्चितपणें धन्य होऊन जातो.   
सकळ केलियाचें सार्थक । देव वोळखावा येक ।
आपण कोण हा विवेक । पाहिला पाहिजे ॥ १३ ॥
१३) एक देव ओळखण्यामध्यें जीवनांतील सगळ्या खटपटीचें सार्थक आहे.  मी कोण आहे ? यावर सूक्ष्म विचार करावा.  
देव पाहातां निराकार । आपला तों माईक विचार ।
सोहं आत्मा हा निर्धार । बाणोन गेला ॥ १४ ॥   
१४) देव पाहावा तर तो निर्गुण व निराकार आहे. मीपणाचा विचार केला तर तो खरा नाहीं. अशा रीतीनें खोल विचार केला तर  " मी तोच आहे. मी आत्माच आहे. असा निःसंशय निर्धार अंगीं बाणतो.      
आतां अनुमान तो काई । वस्तु आहे वस्तुचा ठाईं ।
देहभाव कांहींच नाहीं । धांडोळितां ॥ १५ ॥
१५) मग कल्पना करण्याची गरज नसते. ब्रह्म जसें आहे. तसेंच स्वस्थानीं निःश्चल असतें. त्याच्यावर आरोपलेल्या देहबुद्धीचा शोध केला कीं, ती खरी नाहीं. असा अनुभव येतो.  
सिद्धास आणी साधन । हा तों अवघाच अनुमान ।
मुक्तास आणी बंधन । आडळेना ॥ १६ ॥
१६) " मी आत्माच आहे " असा साक्षात्कार होऊन जो सिद्ध बनला त्यास साधन चिकटवणें म्हणजे केवळ कल्पना होय. जो खरोखर मुक्त झाला त्याला साधनाचें बंधन असणें शक्य नाहीं.   
साधनें जें कांहीं साधावें । तें तों आपणचि स्वभावें ।
आतां साधकाच्या नावें । सुन्याकार ॥ १७ ॥
१७) साधन करुन जें कांहीं साधायचें तें आत्मस्वरुप स्वतःच बनल्यावर साधन संपतें. तेथें साधकावस्था संपते.
कुल्लाळ पावला राजपदवी । आतां रासभें कासया राखावीं ।
कुल्लाळपणाची उठाठेवी । कासया पाहिजे ॥ १८ ॥
१८) समजा एका कुंभाराला राज्यपद मिळालें तर तो गाढवें सांभळण्याचें काम करत नाहीं. कुंभाराच्या व्यवसायाची उठाठेव तो करत नाहीं. 
तैसा अवघा वृत्तीभाव । नाना साधनांचा उपाव ।
साध्य जालियां कैंचा ठाव । साधनांसी ॥ १९ ॥
१९) त्याचप्रमाणें कोनतेही साधन करायचें म्हणजे त्याचा वृत्तीशी अती निकट संबंध असतो. आणि आत्मस्वरुप बनण्यासाठीं वृत्तीरहित व्हावें लागतें. यामुळें आत्मज्ञान साध्य झाल्यावर वृत्ति निर्माण होत नाहीं म्हणून साधन होऊं शकत नाहीं.  
साधनें काये साधावें । नेमें काये फळ घ्यावें ।
आपण वस्तु भरंगळावें । कासयासी ॥ २० ॥
२०) साधनानें आपल्याला काय साधावयाचें आहे. आणि नियमानें वागून आपल्याला कोणते फळ मिळवायचे आहे. याबद्दल आपला समज अगदी स्वच्छ व योग्य असावा. आपण आत्मस्वरुप असल्यानें उगीच भलत्या कल्पनांनी चूकीच्या मार्गानें जाऊं नये.  
देह तरी पांचा भूतांचा । जीव तरी अंश ब्रह्मींचा ।
परमात्मा तरी अनन्याचा । ठाव पाहा ॥ २१ ॥
२१) देहाचा विचार केला तर तो आहे पांच भूतांचा. जीवाचा विचार केला तर तर तो अंश आहे ब्रह्माचा. आणि जो अनन्य होतो तोच परमात्म्यापर्यंत पोहोचतो हें लक्षांत ठेवावें.  
उगेंचि पाहातां मीपण दिसे । शोध घेता कांहींच नसे ।
तत्वें तत्व निरसे । पुढें निखळ आत्मा ॥ २२ ॥
२२) उगीच पाहिलें तर मीपण दिसते. पण विचारानें त्याचा शोध घ्यावयास गेल्यावर तें खरें नाहीं असें आढळतें. एका तत्वानें दुसर्‍या तत्वाचें निरसन करत गेले असतां सगळें दृश्य खरें नाहीं असे अनुभवास येते. नंतर शुद्ध निर्भेळ आत्मस्वरुप तेवढें शिल्लक उरते.  
आत्मा आहे आत्मपणें । जीव आहे जीवपणें ।
माया आहे मायापणें । विस्तारली ॥ २३ ॥
२३) आत्मा- स्वस्वरुप हे आत्मपणानें असतें. जीव जीवपणानें राहतो. माया मिथ्यापणानें सगळीकडें पसरुन राहते.  
ऐसें अवघेंचि आहे । आणी आपण हि कोणीयेक आहे ।
हें सकळ शोधून पाहे । तोचि ज्ञानी ॥ २४ ॥  
२४) असें हें सगळें आहेपणानें दिसतें. आणि त्याचबरोबर मी कोणीतरी एक आहे असें वाटतें. यांपैकी खरें आहेपण कशाला आहे, शुद्ध अस्तित्व किंवा खरेपण कोणास आहे, हे शोधून काढतो तो खरा ज्ञानी होय.  
शोधूं जाणें सकळांसी । परी पाहों नेणे आपणासी ।
ऐसा ज्ञानी येकदेसी । वृत्तीरुपें ॥ २५ ॥
२५) ज्ञाता आणि ज्ञेय यांच्या द्वैतामध्यें वावरणारा शोधक ज्ञेयरुपानें पुढें येणारें सर्व जग जाणतो. त्याचा शोध घेतो. पण मीपणानें जगाचा शोध घेणारा जो ज्ञाता त्याचा शोध कोणी करत नाहीं. जगाचें ज्ञान वृत्तिरुप असल्यानें मीपणाचा शोध न घेणारा ज्ञाता अपूर्णज्ञानी समजावा.    
तें वृत्तिरुप जरी पाहिलें । तरी मग कांहींच नाहीं राहिलें ।
प्रकृतिनिरासें अवघें चि गेलें । विकारवंत ॥ २६ ॥
२६) देहबुद्धीचे ज्ञान वृत्तिरुप असतें. त्या वृत्तिचें नीट परीक्षण केलें तर सगळ्या वृत्ति कल्पनेनें भरलेल्या आहेत हें लक्षांत येईल. कल्पनेनें निर्माण केलेलें खरें असूं शकत नाहीं. अशा रीतीनें प्रकृतीनें निर्माण केलेलें सर्व दृश्य विकारवंत व चंचल म्हणून खोटें ठरते.  
उरलें तें निखळ निर्गुण । विवंचितां तेंचि आपण ।
ऐसी परमार्थाची खूण । अगाध आहे ॥ २७ ॥
२७) एकदेशी व परिछिन्न दृश्य लय पावलें कीं शेवटी केवळ शुद्ध निर्गुण स्वस्वरुप उरते. अधिक विवेक केल्यास तें स्वरुप आपण स्वतः आहोत असा आत्मसाक्षात्कार होतो. परमार्थाची ही अशी अत्यंत खोल व गहन खूण आहे. 
फळ येक आपण येक । ऐसा नाहीं हा विवेक ।
फळाचें फळ कोणीयेक । स्वयेंचि होईजे ॥ २८ ॥
२८) परमार्थाचा विचार वेगळा आहे. वस्तु जाणणारा ज्ञाता आणि जाणायची वस्तु ज्ञेय ही दोन्ही या विचारांमध्यें वेगळे राहात नाहीत. या विचारामध्यें ज्ञाता स्वतः ज्ञेयरुप बनून जातो. ज्ञाता ज्ञेयाशी अनन्य होऊन तें ज्ञान घडते.  
रंक होता राजा जाला । बरें पाहातां प्रत्यये आला ।
रंकपणाचा गल्बला । रंकीं करावा ॥ २९ ॥
२९) एक भिकारी होता. तो राजा झाला. आपण खरोखर राजे आहोत असा त्यास अनुभव आला. मग भिकारीपणाची धडपड करणें त्यास शोभणार नाहीं. त्याचप्रमाणें आत्मज्ञानी पुरुष वृत्तिरुप ज्ञानाची धडपड करणार नाहीं. 
वेद शास्त्रें पुराणें । नाना साधनें निरुपणें ।
सिद्ध साधु ज्याकारणें । नाना सायास करिती ॥ ३० ॥ 
३०) वेद, शास्त्रें, पुराणें, नाना प्रकारची साधनें, निरुपणें, सिद्ध आणी साधु ज्याची प्राप्ती व्हावी यासाठी धडपडतात, 
तें ब्रह्मरुप आपणचि आंगें । सारासारविचारप्रसंगें ।
करणें न करणें वाउगें । कांहींच नाहीं ॥ ३१ ॥
३१) तें ब्रह्मस्वरुप आपण स्वतःच आहोंत असा अनुभव आल्यानंतर कर्म-अकर्माची समस्या उरत नाहीं. प्रसंग आला असतां सारासार विचार करुन हें करणें बरें कीं तें करणें बरें हा प्रश्र्ण लटका होऊन कांहीं कर्तव्यच शिल्लक उरत नाही.    
रंक राजआज्ञेसि भ्याले । तेंचि पुढें राजा जालें ।
मग तें भयेचि उडालें । रंकपणासरिसें ॥ ३२ ॥
३२) एक गरिब माणूस राजाज्ञेला भीत असे. पुढें तो स्वतःच राजा झाला. राजा होताक्षणीच त्याची गरीबी जशी नाहीशीं झाली तसें त्याचे भयही नाहीसें झाले. 
वेदें वेदाज्ञेने चालावें । सच्छास्त्रें शास्त्र अभ्यासावें ।
तीर्थें तीर्थास जावें । कोण्या प्रकारें ॥ ३३ ॥
३३)  आत्मज्ञानी पुरुष स्वतः वेदशास्त्रांचे मूळ बनतो. तीर्थस्वरुप होतो. वेदानें वेदांची आज्ञा पाळावीत. वेदांतशास्त्रानें शास्त्रांचा अभ्यास करावा, तीर्थानें तीर्थयात्रा करावी, हे जसें अशक्य व अयोग्य असते तसें ज्ञानी पुरुषास दृश्याची बंधनें किंवा मर्यादा घालणें योग्य नसतें.    
अमृतें सेवावें अमृत । अनंतें पाहावा अनंत ।
भगवंतें लक्षावा भगवंत । कोण्या प्रकारें ॥ ३४ ॥
३४) तसेंच अमृतानें अमृत प्यावें. अनंतानें अनंत पाहावा. भगवंतानें भगवंताचे ध्यान करावें. हें घडणें शक्य नसतें.  
संतें असंत त्यागावे । निर्गुणें निर्गुणासी भंगावें ।
स्वरुपें स्वरुपीं रंगावें । कोण्या प्रकारें ॥ ३५ ॥
३५) संत म्हणजे सदा, सर्वत्र पूर्णपणें व्यापून असणारें ब्रह्मस्वरुप होय. असंत म्हणजे जें कधी नव्हतेंच नव्हतें तें भासरुप होय. जे सदा आहेच आहे त्याने जे कदा नाहींच नाहीं तें टाकावें, निर्गुणानें निर्गुणाचा भंग करावा. स्वस्वरुपानें स्वरुपामध्येंच रंगून जावें , हें घडणें शक्य नसतें.   
अंजनें ल्यावें अंजन । धनें साधावें धन ।
निरंजनें निरंजन । कैसें अनुभवावें ॥ ३६ ॥
३६) अंजनानें स्वतःला अंजन घालावें. धनानेंच धनाची प्राप्ती करुन घ्यावी. शुद्ध परमात्मस्वरुपानें तशाच परमात्स्वरुपाचा अनुभव घ्यावा. हें घडणें शक्य नसतें.   
साध्य करावें साधनासी । ध्येंयें धरावें ध्यानासी ।
उन्मनें आवरावें मनासी । कोण्या प्रकारें ॥ ३७ ॥
३७) जें स्वतः साध्य आहे त्यानेंच साधना करावी. जें स्वतः ध्येय आहे त्यानेंच घ्यान लावावें. जो स्वतः उन्मन बनला आहे त्यानें मन आवरावें या गोष्टी घडणें शक्य नसतें. संगण्याचा भावार्थ असा कीं, आत्मसाक्षात्कारी ज्ञानी पुरुष त्रिगुणांच्या व पंचमहाभूतांच्या कक्षेपलीकडे गेलेला असतो. दृश्याच्या सार्‍या कल्पना तेथें लटक्या पडतात. आपण त्याच्याबद्दल जी जी कांहीं कल्पना करुं ती देहबुद्धीची असल्यानें द्वैतप्रधान असते. आणि तो तर संपूर्ण अद्वैतसाम्राज्यांत राहतो. म्हणून अशा परस्पर विरोधी भाषेनें त्याच्या स्थितिची कल्पना द्यावी लागते.     
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स्थितिनिरुपणनाम समास दहावा ॥ 
Samas Dahava  Sthiti Nirupan
समास दहावा स्थितिनिरुपण


Custom Search

No comments:

Post a Comment