Friday, November 10, 2017

Samas Satava Viklpa Nirshan समास सातवा विकल्प निरसन


Dashak Navava Samas Satava Viklpa Nirshan 
Samas Satava Viklpa Nirshan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about why common people have a Birth- Death Cycle. Why Dnyani Santa have Mukti.
समास सातवा विकल्प निरसन
श्रीराम ॥
आधीं स्थूळ आहे येक । तरी मग अंतःकर्णपंचक ।
जाणतेपणाचा विवेक । स्थूळाकरितां ॥ १ ॥
१) आधीं स्थूल पिंड असतो. मग त्यांत अंतःकरण पंचक आढळते. अंतःकरण, मन, बुद्धि, चित्त व अहंकार ही त्याची पांच अंगे आहेत. ज्ञानाचा विचार व व्यवहार स्थूल देहाच्या आधारानें चालतो.     
तैसेंचि ब्रह्मांडेंवीण कांहीं । मूळमायेसी जाणीव नाहीं ।
स्थूळाच्या आधारें सर्व हि । कार्य चाले ॥ २ ॥
२) त्याचप्रमाणें हें दृश्य व स्थूल ब्रह्मांड आहे म्हणून मूळमायेंमध्यें " मी ब्रह्म आहे" अशी जाणीव आहे. म्हणून पिंड ब्रह्मांडांतील व्यवहार स्थूलाच्या आधारानें चालतात. 
तें स्थूळचि नस्तां निर्माण । कोठे राहेल अंतःकर्ण ।
ऐसा श्रोतीं केला प्रश्र्ण । याचें उत्तर ऐका ॥ ३ ॥
३) तें स्थूळच जर निर्माण झालें नसतें तर जाणिवेला व अंतःकरणाला राहायाला जागाच मिळाली नसती. श्रोत्यांनी हा प्रश्र्ण विचारला. त्याचें उत्तर ऐका. 
कोसले अथवा कांटेघरें । नाना पृष्ठिभागीं चालती घरें ।
जीव करिती लहानथोरें । शक्तीनुसार ॥ ४ ॥
४) रेशमाचे किडे आपल्याभोवतीं तंतूचें कोष करुन त्यांत स्वतःला कोंडून घेतात. इतर किंडे स्वतःभोवतीं काट्यांचे कवच करुन त्यांत राहतात. अशा पद्धतीनें पृथ्वीवरील जीव आपापल्या शक्तीप्रमाणें लहानमोठीं घरें निर्माण करतात.  
शंख  सिंपी घुला कवडें । आधीं त्यांचें घर घडे ।
किंवा आधीं निर्माण किडे । हें विचारावें ॥ ५ ॥
५) शंख, शिंपला, व लहानमोठ्या कवड्या हीं ज्यांची घरें आहेत तें किडें आधीं कां त्यांची घरें आधीं याचा विचार करावा.   
आधीं प्राणी ते होती । मग घरें निर्माण करिती ।
हें तो प्रत्यक्ष प्रचिती । सांगणें नलगे ॥ ६ ॥
६) आधी प्राणी जन्मास येतो आणि मग तो आपलें घर बनवतो. हा आपला प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यावर अधिक सांगण्याची जरुरी नाही.   
तैसें आधीं सूक्ष्म जाण । मग स्थूळ होतें निर्माण ।
येणें दृष्टांतें प्रश्र्ण । फिटला श्रोतयांचा ॥ ७ ॥
७) त्याचप्रमाणें आधी सूक्ष्म निर्माण होते. त्यानंतर स्थूल निर्माण होते. या दृष्टांतावरुन श्रोत्यांच्या प्रश्र्णाचे उत्तर ध्यानांत येईल.
तव श्रोता पुसे आणीक । जी आठवलें कांहीं येक ।
जन्ममृत्याचा विवेक । मज निरोपावा ॥ ८ ॥
८) तेव्हां श्रोता म्हणाला कीं, " मला आणखी आठवण झाली.जन्ममृत्युबद्दल मला माहिती सांगावी. जन्म व मृत्यु यांचा विचार कसा आहे तें मला समजावून सांगावें.  
कोण जन्मास घालितें । आणी मागुता कोण जन्म घेतें ।
हें प्रत्यया कैसें येतें । कोण्या प्रकारें ॥ ९ ॥
९) जीवाला कोण जन्मास घालतो ? मेल्यावर कोण जन्म घेतो. कशा रीतीनें व कोणत्या प्रकारें याचा प्रत्यक्ष अनुभव येतो? हें सांगावें. 
ब्रह्मा जन्मास घालितो । विष्णु प्रतिपाळ करितो ।
रुद्र अवघें संव्हारितो । ऐसें बोलती ॥ १० ॥
१०) सामान्य लोक म्हणतात कीं, ब्रह्मदेव जन्मास घालतो, विष्णु सांभाळ करतो. रुद्र सगळ्यांचा संहार करतो.  
तरी हे प्रवृतीचे बोलणें । प्रत्ययास आणी उणें ।
प्रत्यय पाहातां श्र्लाघ्यवाणें । होणार नाहीं ॥ ११ ॥
११) असें हें व्यवहारांतील बोलणे प्रत्यक्ष अनुभवास येत नाही.  प्रत्यक्ष अनुभव घ्यावयास गेल्यास हें खरें सिद्ध होत नाहीं. 
ब्रह्मयास कोणें जन्मास घातलें । विष्णूस कोणें प्रतिपाळिलें ।
रुद्रास कोणें संव्हारिलें । माहाप्रळईं ॥ १२ ॥
१२) अशी विचारणा करतां येईल कीं, ब्रह्मदेवाला कोणी जन्मास घातलें? विष्णूला कोण सांभाळतो. महाप्रलयाच्यावेळीं रुद्राचा संहार कोण करतो?
म्हणौनि हा सृष्टीभाव । अवघा मायेचा स्वभाव ।
कर्ता म्हणो निर्गुण देव । तरी तो निर्विकारी ॥ १३ ॥
१३) या प्रक्ष्णांची उत्तरें देतां येत नाहीत. म्हणून हें सगळें दृश्य विश्व खरें नाहीं. हा सगळा मायेचा पसारा आहे. निर्गुण देव विश्वाचा कर्ता म्हणतां येत नाहीं. कारण तो विकाररहित आहे.   
म्हणावें माया जन्मास घाली । तरी हे आपणचि विस्तारली ।
आणी विचारितां थारली । हें हि घडेना ॥ १४ ॥
१४) माया विकारी म्हणून ती विकारमय विश्व जन्मास घालते असें म्हणता येत नाहीं. कारण विश्वरुपानें माया स्वतःच विस्तार पावली आहे. सूक्ष्म विचारानें ती कल्पान्ती नाश पावतें.    
आतां जन्मतो तो कोण । कैसी त्याची वोळखण ।
आणी संचिताचें लक्षण । तेंहि निरोपावें ॥ १५ ॥
१५) म्हणून जन्मास येतो तो कोण? त्याची ओळखण कशी करावी? संचिताचें लक्षण काय? हें मला समजावून सांगावें. 
पुण्याचें कैसें रुप । आणी पापाचें कैसें स्वरुप ।
याहि शब्दाचा आक्षेप । कोण कर्ता ॥ १६ ॥ 
१६) पुण्याचें व पापाचें स्वरुप काय ? हे सगळे प्रश्र्ण विचारणारा कोण आहे?
हें कांहींच न ये अनुमाना । म्हणती जन्म घेते वासना ।
परी ते पाहातां दिसेना । ना धरितां न ये ॥ १७ ॥
१७) याबद्दल निश्चित असें कांहीं ठरवितां येत नाहीं. कांहीं लोक म्हणतात कीं वासना जन्म घेते. पण वासना बघावी म्हटली तर दिसत नाहीं. तीला धरता येत नाहीं.
वासना कामना आणी कल्पना । हेतु भावना मति नाना ।
ऐशा अनत वृती जाणा । अंतःकर्णपंचकाच्या ॥ १८ ॥
१८) वासना, कामना, कल्पना, हेतु, भावना, अनेक प्रकारचे तर्क अशा अंतःकरण पंचकाच्या अनंत वृत्ती आहेत. 
असो हे अवघें जाणीव यंत्र । जाणीव म्हणिजे स्मरणमात्र ।
त्या स्मरणास जन्मसूत्र । कैसें लागे ॥ १९ ॥
१९) हें सगळें जाणीवरुपी यंत्राचे कार्य आहे. जाणीव म्हणजे स्वतःचे केवळ स्मरण होय. त्या मीपणाच्या स्मृतीला जन्माचें बंधन कसें लागतें.  
देहो निर्माण पांचा भूतांचा । वायो चाळक तयाचा ।
जाणणें हा मनाचा । मनोभाव ॥ २० ॥
२०) पांच भूतांपासून देह निर्माण झाला. वायूमुळें तो हालचाल करतो. जाणणें हा देहांत राहणार्‍या मनाचा धर्म आहे.
ऐसें हें सहजचि घडलें । तत्वांचें गुंथाडें जालें ।
कोणास कोणें जन्मविलें । कोण्या प्रकारें ॥ २१ ॥
२१)  पांच तत्वांची गुंतागुंत होऊन त्यापासून देह व मन आपोआप निर्माण झाले. मग कोणाला, कोणी व कोणत्या रीतीनें जन्मास घातलें हा प्रश्र्ण व्यर्थ आहे.  
तरी हें पाहातां दिसेना । म्हणोन जन्मचि असेना ।
उपजला प्राणी येना । मागुता जन्म ॥ २२ ॥  
२२) शिवाय कोण कोणास जन्मास घालतो हें कांहीं प्रत्यक्ष दिसत नाही. म्हणून पुनः जन्मच नाहीं. येथें जन्मास आलेल्या प्राण्याला मेल्यानंतर पुनः जन्म येत नाहीं.   
कोणासीच जन्म नाहीं । तरी संतसंगे केलें काई ।
ऐसा अभिप्राव सर्वहि । श्रोतयांचा ॥ २३ ॥
२३) बरें, मेल्यानंतर जन्म नाहींअसें असेल तर मग संतांच्या संगतीनें काय साधते ? असा प्रश्र्ण पडतो. सगळ्या श्रोत्यांच्या मनांत हेच प्रश्र्ण येतात.
पूर्वी स्मरण ना विस्मरण । मधेंचि हें जालें स्मरण ।
अंतर्यामीं अंतःकर्ण । जाणती कळा ॥ २४ ॥
२४) जन्म येण्यापूर्वीं स्मरण नव्हतें. तसें विस्मरणही नव्हतें. जन्मास आल्यावर हें स्मरण उदय पावलें. माणसाच्या अंतर्यामीं जे अंतःकरण असते तेंच जाणीवेचे प्रगट रुप आहे. 
सावध आहे तों स्मरण । विकळा होतां विस्मरण ।
विस्मरण पडतां मरण । पावती प्राणी ॥ २५ ॥
२५) माणसाला शुद्ध असते तोंपर्यंत जाणीव असते. तों बेशुद्ध झाला कीं जाणीव लोपते. जाणीव संपूर्ण लोपली कीं तो मरण पावतो. 
स्मरण विस्मरण राहिलें । मग देहास मरण आलें ।
पुढें जन्मास घातलें । कोणास कोणें ॥ २६ ॥
२६) जाणीव व नेणीव दोन्ही हारपली कीं माणसाच्या देहास मरण येते. मेल्यानंतर मग कोण कोणास जन्मास घालतो ?   
म्हणोनि जन्मचि असेना । आणी यातना हि दिसेना ।
अवघी वेर्थचि कल्पना । बळावली ॥ २७ ॥
२७) म्हणून मेल्यानंतर जन्मच येत नाहीं. अर्थांत मग कोणत्या यातनाही भोगाव्या लागत नाहीत. मेल्यानंतर पुनः जन्म येतो ही खोटी कल्पना उगाच बळावली आहे. 
म्हणौन जन्मचि नाहीं कोणासी । श्रोतयांची आशंका ऐसी ।
मरोन गेलें तें जन्मासी । मागुतें न ये ॥ २८ ॥
२८) यावरुन श्रोत्यांचा अभिप्राय ध्यानांत येईल, तो असा कीं, मेल्यानंतर कोणालाच पुनः जन्म नाही. मनुष्य एकदा मरुन गेला कीं तो पुनः जन्म घेत नाहीं. 
वाळले काष्ठ हिरवळेना । पडिलें फळ तें पुन्हां लागेना ।
तैसें पडिलें शरीर येना । जन्मास मागुतें ॥ २९ ॥
२९) वाळलेल्या लाकडाला हिरवा कोंब  फुटत नाहीं. फळ एकदां पडलें कीं पुनः तेच फळ झाडाला लागत नाही. त्याचप्रमाणें शरीर एकदां पडलें कीं पुनः तें जन्मास येत नाही.  
मडकें अवचितें फुटलें । फुटलें तें फुटोनिच गेलें ।
तैसेंचि पुन्हां जन्मलें । नाहीं मनुष्य ॥ ३० ॥
३०) एखादें मडकें एकाएकी फुटलें मगतें कायमचे फुटले. त्याचप्रमाणें देह एकदा पडला कीं तो कायमचा पडला. म्हणून माणूसएकदां मेला कीं तो पुनः जन्मास येत नाहीं.
येथें अज्ञान आणी सज्ञान । सारिखेंच जालें समान ।
ऐसा बळावला अनुमान । श्रोतयांसी ॥ ३१ ॥
३१) श्रोत्यांचे हें सारें म्हणणें ऐकून असें वाटतें कीं ज्ञानी व अज्ञानी माणसांना हे निश्र्चितपणें समान मानतात.  
वक्ता म्हणे हो ऐका । अवघें पाषांड करुं नका ।
अनुमान असेल तरी विवेका । अवलोकावें ॥ ३२ ॥
३२) वक्ता श्रोत्यांना सांगतो कीं, त्यांनी उगीच भलते  तर्क लढवूं नयेत. माणसानें तर्क चालवावा पण त्यास विवेकाचा पाया असावा.  
प्रेत्नेंवीण कार्य जालें । जेविल्यावीण पोट भरलें ।
ज्ञानेंवीण मुक्त जालें । हें तों घडेना ॥ ३३ ॥
३३) प्रयत्नांवाचून काम झाले, जेवल्यावाचून पोट भरलें आत्मज्ञानावाचूंन मुक्त झाला असें या जगांत कधीही घडत नाहीं. 
स्वयें आपण जेविला । त्यास वाटे लोक धाला ।
परंतु हें समस्तांला । घडलें पाहिजे ॥ ३४ ॥
३४) एक माणूस स्वतः जेवला. त्याला जर वाटले कीं सगळ्यांचे पोट भरलें तर तें खरें नाहीं. जसें त्याचे स्वतःचे पोट भरलें तसें सर्वांचेच खरोखर पोट  भरायला हवे. 
पोहणें सिकला तो तरेल । पोहणें नेणे तो बुडेल ।
येथें हि अनुमान करील । ऐसा कवणु ॥ ३५ ॥
३५) ज्याला पोहायला येते तो पाण्यामध्यें  तरतो. ज्याला पोहायला येत नाहीं तो बुडतो. याबद्दल कोणालाही शंका येणें बरोबर नाहीं. 
तैसें जयास ज्ञान जालें । ते ते तितुके च तरले ।
ज्याचें बंधनचि तुटलें । तोचि मुक्त ॥ ३६ ॥
३६) त्याचप्रमाणें ज्यांना आत्मज्ञान झालें तेवढेंच पुरुष संसारसागर तरले. ज्याचें बंधन तुटलें तोच मुक्त होय.   
मोकळा म्हणे नाहीं बंधन । आणी प्रत्यक्ष बंदीं पडिले जन ।
त्यांचें कैसें समाधान । तें तुम्ही पाहा ॥ ३७ ॥
३७) जो बंधनापासून मुक्त असतो तो म्हणतों  कीं जगांत कसलेंही बंधन नाही. हें त्याचें म्हणणे त्याच्यापुरतें खरें आहे. पण या जगामध्यें प्रत्यक्ष बंधनांत अडकलेले लोक आहेत. त्यांचे समाधान अश्या बोलण्यानें होईल कां, हें श्रोत्यांनीच ठरवावें. 
नेणे दुसर्‍याची तळमळ । तें मनुष्य परदुःखसीतळ ।
तैसाच हाहि केवळ । अनुभव जाणावा ॥ ३८ ॥
३८) ज्या माणसाला दुसर्‍याच्या दुःखाची कल्पना नसते तो माणूस दुसर्‍यांचे दुःख विशेष नाहीं असें समजतो. ह्याला परदुखशीतळ असें म्हणतात. मोकळ्या असलेल्या माणसाला बंदजनांत दुःख भोगणार्‍या माणसांचे दुःख कळत नाहीं तें असें. 
जयास आत्मज्ञान जालें । तत्वें तत्व विवंचिलें ।
खुणेसी पावतांच बाणलें । समाधान ॥ ३९ ॥
३९) ज्याला आत्मज्ञान झालें . ज्यानें सर्व तत्वाचें विवरण केलें, अशा माणसाला स्वस्वरुपापर्यंत पोहोचण्याची खूण सापडते. व संपूर्ण समाधान लाभते. 
ज्ञानें चुके जन्ममरण । सगट बोलणें अप्रमाण ।
वेदशास्त्र आणी पुराण । मग कासयासी ॥ ४० ॥
४०) आत्मज्ञानानें जन्ममरण तुटतें हें अगदी खरें आहे. पण सगळ्यांना जन्ममरण नाहीं हें म्हणणे चुकीचे आहे. असें जर असतें तर वेद, शास्त्रें व पुराणें यांना कांहींच अर्थ उरत नाहीं. 
वेदशास्त्रविचारबोली । माहानुभावांची मंडळी ।
भूमंडळीं लोक सकळी । हें मानीतना ॥ ४१ ॥    
४१) वेद आणि शास्त्रें यांच्यामधें असलेली वचनें फार विचारांनी लिहीलेली असतात. म्हणून वेद, शास्त्रें, थोर संत व जगांतील सर्व लोक या सर्वांना वरील म्हणणे मान्य होणार नाहीं.      
अवघें होतां अप्रमाण । मग आपलेंच काय प्रमाण ।
म्हणोन जेथें आत्मज्ञान । तोचि मुक्त ॥ ४२ ॥
४२) सगळ्यांचे म्हणणे खोटे आणी माझेंच म्हणणे खरें असें धरुन चालणें योग्य नाहीं. म्हणून ज्याला आत्मज्ञान होते तो मुक्त होतो, इतरांना जन्म येतो, असा सिद्धान्त आहे.  
अवघें च मुक्त पाहातां नर । हाहि ज्ञानाचा उद्गार ।
ज्ञानेंविण तो उद्धार । होणार नाहीं ॥ ४३ ॥  
४३) जो मुक्त होतो त्यास वाटते कीं सगळेंच मुक्त आहेत. ज्ञानी पुरुषाचे हे उद्गार आहेत. पण ज्ञानी पुरुषाला तसें वाटले तरी आत्मज्ञान झाल्यावांचून उद्धार होणार नाहीं, हें खरें आहे.  
आत्मज्ञान कळों आलें । म्हणोन दृश्य मिथ्या जालें ।
परंतु वेढा लाविलें । सकळांस येणें ॥ ४४ ॥
४४) ज्याला आत्मज्ञान होतें त्याला सगळें दृश्य विश्र्व खोटे वाटते. त्याच्यासाठीं हे बरोबर आहे. पण ज्यानां आत्मज्ञान झालें नाहीं त्यांना दृश्य खरें वाटते व ते त्यांच्या मनावर परिणाम करतें. 
आतां प्रश्र्ण हा फिटला । ज्ञानी ज्ञानें मुक्त जाला ।
अज्ञान तो बांधला । आपलें कल्पनेनें ॥ ४५ ॥
४५) याप्रमाणें या प्रश्र्णाचे उत्तर दिलें. ज्ञानी पुरुष आत्मज्ञानानें मुक्त होतो. अज्ञानी पुरुष स्वतःच्या कल्पनेनें बांधलेला असतो. 
विज्ञानासारिखें अज्ञान । आणी मुक्तासारिखें बंधन ।
निश्र्चयासारिखा अनुमान । मानूंचि नये ॥ ४६ ॥
४६) विज्ञान आणि अज्ञान; मुक्त आणि बद्ध; स्वानुभव आणि तर्क यांना सारखें समजणें बरोबर नाहीं.  
बंधन म्हणिजे कांहींच नाहीं । परी वेढा लाविलें सर्व हि ।
यास उपावचि नाहीं । कळल्यावांचुनी ॥ ४७ ॥
४७) ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीनें हें दृश्य सारें मिथ्या असल्यानें कोणी बद्ध नाही. जगांत बंधन असें कोणास नाहीं. मात्र सामान्य लोकांना दृश्यानें घेरलेले असल्यानें तें आपला परिणाम करतें, या दोन्ही भूमिका नीट समजून घेणें हा या घोटाळ्यांतून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. 
कांहींच नाहीं आणी बाधी । हेंचि नवल पाहा आधीं ।
मिथ्या जाणिजेना बद्धि । म्हणोन बद्ध ॥ ४८ ॥
४८) परमात्मस्वरुपाकडून बघितले तर हें दृश्य विश्व झालेंच नाहीं. जें झालें नाहीं, ज्याला खरेपणाच  नाहीं तें बाधतें हेंच केवढें नवल आहे. दृश्य विश्व खरें वाटतें, त्याचें खोटेपण आपल्या बुद्धीला निश्र्चितपणें कळत नाहीं म्हणून त्यानें बांधलें जातो. आपण बद्ध होतो.    
भोळा भाव सिद्धी जाव । हा उधाराचा उपाव ।
रोकडा मोक्षाचा अभिप्राव । विवेकें जाणावा ॥ ४९ ॥
४९) भोळी म्हणजे नेणतेपणाची श्रद्धाआत्मज्ञानाची सिद्धि मिळवून देते असें म्हणतात. हा व्यवहार उधारीचा आहे. मोक्षाचा व्यवहार अगदी रोकडीचा आहे. पण त्यासाठी आत्मानात्म विवेकाचा जाणतेपणा अवश्य लागतो.    
प्राणी व्हावया मोकळा । आधीं पाहिजे जाणीवकळा ।
सकळ जाणतां निराळा । सहजचि होये ॥ ५० ॥
५०) बंधनांतून मोकळे होण्यासाठी सूक्ष्म बुद्धि हवी. सूक्ष्म आत्मस्वरुप ओळखण्याची शक्ती त्या बुद्धिंत हवी. सार असार; स्थूल सूक्ष्म या सर्वांचें स्वरुप जाणलें कीं तें जाणणारा " मी " आपोआप सर्वांहून निराळा होतो. त्याला असलेले दृश्याचे बंधन गळून पडतें.  
कांहींच नेणिजे तें अज्ञान । सकळ जाणिजे तें ज्ञान ।
जाणीव राहातां विज्ञान । स्वयेंचि आत्मा ॥ ५१ ॥
५१) वस्तूचें यथार्थ स्वरुप न कळणें यावें नांव अज्ञान, त्याच्यात कांहींच कळत नाहीं. ज्ञानामध्यें सर्व कळते. पण ज्ञानरुपी जाणीवसुद्धा मागें पडतें त्यावेळी स्वरुपसाक्षात्कार होतो.  " मी आत्माच आहे " असा अनुभव येतो. त्यास विज्ञान असें म्हणतात. 
अमृत सेऊन अमर जाला । तो म्हणे मृत्य कैसा येतो जनाला ।
तैसा विवेकी म्हणे बद्धाला । जन्म तो कैसा ॥ ५२ ॥
५२) एक माणूस अमृत प्यायला म्हणून तो अमर झाला. मग " लोकांना मरण कसें येतें " असें म्हणू लागला. त्याचप्रमाणें आत्मज्ञानी पुरुष सामान्य माणसांना म्हणतो कीं, " अहो, मनुष्य मेल्यावर त्यास जन्म कसा येईल ? "
जाणता म्हणें जनातें । तुम्हां भूत कैसें झडपितें ।
तुम्हांस वीष कैसें चढतें । निर्विष म्हणे ॥ ५३ ॥
५३) ज्ञानी पुरुष लोकांना विचारतों कीं, " अहो, तुम्हांला भूतबाधा होते तरी कशी ? " त्याचप्रमाणें ज्याला विषबाधेचा अनुभव नाहीं, तो इतरांना विचारतो कीं, " तुम्हां लोकांना विष चढतें तरी कसें ?"    
आधीं बद्धासारिखें व्हावें । मग हें नलगेचि पुसावें ।
विवेक दुरी ठेऊन पाहावें । लक्षण बद्धाचें ॥ ५४ ॥
५४) या सगळ्याचा भावार्थ असा कीं, आपण आधीं बद्धदशेंत जावें. त्या दशेची लक्षणें अंगीं बाणलीं कीं मग असले प्रश्र्ण माणूस विचारणार नाहीं. बद्धाची अवस्था ध्यानांत येण्यासाठीं आपण आपलें ज्ञान जरा बाजूस ठेवून त्याच्याकडे पाहिलें पाहीजें.    
निजेल्यास चेईला तो । म्हणे हा कां रे वोसणातो ।
अनुभव पाहाणेंचि आहे तो । तरी मग निजोन पाहावा ॥ ५५ ॥
५५) झोपीं गेलेला माणूस बरळूं लागला. त्याला पाहून एक जागा माणूस म्हणाला, हा माणूस झोपेंमधे असा कां बरळतो आहे ? तो कां बरळतो याचा अनुभव हवा असेल तर स्वतः झोपी जाणें जरुर आहे. 
ज्ञात्याची उगवली वृत्ती । बद्धाऐसी न पडे गुंती । 
भुकेल्याची अनुभवप्राप्ती । धात्यास नाहीं ॥ ५६ ॥  
५६) ज्ञानी पुरुषाची वृत्ती दृश्यांतून बाहेर पडलेली असते. त्यामुळें बद्ध माणसाच्या वृत्तीप्रमाणें ती दृश्यामधें गुंतून किंवा अडकून जात नाहीं. भूकेलेल्या माणसाच्या अवस्थेची कल्पना पोट भरुन तृप्र झालेल्या माणसाला येत नाहीं.      
इतुकेंन आशंका तुटली । ज्ञानें मोक्षप्राप्ती जाली ।
विवेक पाहातां बाणली । अंतरस्थिती ॥ ५७ ॥
५७) एवढ्या विवेचनानें श्रोत्यांच्या शंकेचें निरसन झालें. ज्ञानानें मोक्ष प्राप्ती होते ,मुक्त पुरुषास पुन्हां जन्म येत नाहीं, खोल आत्मानात्म विवेक केला असतां आत्मज्ञानाची अंतरस्थिती बाणते, हें सगळ्या श्रोत्यांना पटलें. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विकल्पनिर्शननाम समास सातवा ॥
Samas Satava  Viklpa Nirshan 
समास सातवा विकल्प निरसन


Custom Search

No comments:

Post a Comment