Sunday, December 10, 2017

Adhyay Dusara Karma Yoga अध्याय दुसरा कर्मयोगः


Ganesh Geeta Adhyay Dusara Karma Yoga 
Ganesh Geeta Adhyay Dusara Karma Yoga is in Sanskrit. It is told by God Gajanan to King Varenya.
श्रीगणेशगीता अध्याय  दुसरा कर्मयोगः
वरेण्य उवाच
ज्ञाननिष्ठा कर्मनिष्ठा द्वयं प्रोक्तं त्वया विभो ।
अवधार्य वदैकं मे निःश्रेयसकरं नु किम् ॥ १ ॥
१) राजा वरेण्य म्हणाला, हे गजानना, ज्ञाननिष्ठा व कर्मनिष्ठा अशा दोन निष्ठा तुम्ही मला सांगितल्या. त्यांत जी एक मला निःश्रेयस्कर होईल ती निश्र्चित करुन मला सांगा.  
श्रीगजानन उवाच 
अस्मिंश्र्चराचरे स्थित्यौ पुरोक्ते द्वे मया नृप ।
सांख्यानां बुद्धियोगेन वैधयोगेन कर्मिणाम् ॥ २ ॥
२) श्रीगजानन म्हणाले, हे राजा, पूर्वी आचरणाकरितां चर व स्थिर स्वभावाच्या दोन स्थिती मी सांगितल्या आहेत. त्यांत सांख्यांकरिता बुद्धियोग व कर्माधिकारी लोकांसाठी कर्मयोग सांगितला आहे.   
अनारम्भेण वैधानां निष्क्रियः पुरुषो भवेत् ।
न सिद्धिं याति संत्यागात्केवलात्कर्मणो नृप ॥ ३ ॥
३) विधिविहित कर्में सोडून बसेल तर तेवढ्यानें तो निष्क्रिय कसा होईल? असल्या निष्फल कर्मत्यागानें कर्मानें मिळणारी सिद्धि मात्र त्याला मिळत नाही.
कदाचिदक्रियः कोऽपि क्षणं नैवावतिष्ठते ।
अस्वतन्त्रः प्रकृतिजैर्गुणैः कर्म च कार्यते ॥ ४ ॥
४) कोणालाही केव्हांही एक क्षणही कर्मावांचून राहतां येत नाही. प्रत्येक मनुष्य परतंत्र असल्यानें मायेचे गुण त्याच्याकडून कर्म करवून घेत असतात.  
कर्मकारीन्द्रियग्रामं  नियम्यास्ते स्मरन्पुमान् ।
तद्गोचरान्मन्दचित्तो धिगाचारः स भाष्यते ॥ ५ ॥
५) कर्मेंद्रियांना रुद्ध करुन जो मनामध्यें विषयांचे चिंतन करतो, अशा पुरुषाचे तें करणें निंद्य आहे असे म्हणतात.
तद्ग्रामं संनियम्यादौ मनसा कर्म चारभेत् ।
इन्द्रियैः कर्मयोगं यो वितृष्णः स परो नृप ॥ ६ ॥
६) प्रथम मनानें इंद्रियें स्वाधीन ठेवून मगकर्म करावे. वितृष्ण होऊन इंद्रियांनी कर्मयोग जो करतो तो पुरुष श्रेष्ठ आहे.
अकर्मणः श्रेष्ठतमं कर्मानीहाकृतं तु यत् ।
वर्ष्मणः स्थितिरप्यस्याकर्मणो नैव सेत्स्यति ॥ ७ ॥
७) अज्ञानानें कर्मत्याग करण्यापेक्षां निष्काम होऊन केलेलें कर्मच फार श्रेष्ठ आहे. अजीबात कर्म सोडण्याने शरीर तरी राहील काय?
असमर्प्य निबध्यन्ते कर्म तेन जना मयि ।
कुर्वीत सततं कर्मानाशोऽसङ्गो मदर्पणम् ॥ ८ ॥
८) मनुष्य कर्म करुन तें मला अर्पण करीत नाहीत, त्यामुळें तें बद्ध होतात. याकरितां आशा व संग सोडून कर्म करावें व तें मला समर्पण करावें. 
मदर्थं यानि कर्माणि तानि बन्धन्ति न क्वचित् ।
सवासनमिदं कर्म बन्धाति देहिनं बलात् ॥ ९ ॥
९) माझ्याकरितां केलेली कर्में केव्हांही बंधक होत नाहीत. पण वासना धरुन केलेले कर्म जीवास बळेंच बद्ध करते. 
वर्णान्सृष्टवावदं चाहं सयज्ञांस्तान्पुरा नृप ।
यज्ञेन ऋद्ध्यतामेष कामदः कल्पवृक्षवत् ॥ १० ॥
१०) मीं पूर्वीं यज्ञासह सर्व वर्ण उत्पन्न केले व त्यांस असें बोललों कीं, हा यज्ञ कल्पवृक्षाप्रमाणें इच्छा पूर्ण करणारा असल्यामुळें याचें योगानें या वर्णांनी समृद्ध व्हावें. 
सुरांश्र्चानेन प्रीणध्वं सुरास्ते प्रीणयन्तु वः ।
लभध्वं परमं स्थानमन्योन्यप्रीणनात्स्थिरम् ॥ ११ ॥
११) या यज्ञानें तुम्ही देवांना संतुष्ट करा. म्हणजे देवही तुम्हाला संतुष्ट करतील. एकमेकांना संतुष्ट करुन चिरकाल राहील असें स्थान मिळवा. 
इष्टा देवाः प्रदास्यन्ति भोगानिष्टान्सुतर्पिताः ।
तैर्दत्तांस्तान्नरस्तेभ्योऽदत्वा भुङ्क्ते स तस्करः ॥ १२ ॥
१२) यज्ञानें देव संतुष्ट झाले म्हणजे ते तुम्हांला इष्ट भोग देतील. देवांकडून मिळालेले त्यांना न देतां जो भोगतो त्याला चोर असें म्हणतात. 
हुतावशिष्टभोक्तारो मुक्ताः स्युः सर्वपातकैः ।
अदन्त्येनो महापापा आत्महेतोः पचन्ति ये ॥ १३ ॥
१३) यज्ञशिष्ट अन्न भक्षन करणारे सर्व पातकांपासून मुक्त होतात. जे केवळ आपल्याकरितांच अन्न शिजवतात तें त्यांचे अन्न भक्षण नसून पापभक्षण होते. 
ऊर्जो भवन्ति भूतानि देवादन्नस्य संभवः ।
यज्ञाश्र्च देवसंभूतिस्तदुत्पत्तिश्र्च वैधतः ॥ १४ ॥
१४) अन्नापासून भूतें उत्पन्न होतात. पर्जन्यापासून अन्न उत्पन्न होते. यज्ञापासून पर्जन्य उत्पन्न होतो. व तो यज्ञही विधियुक्त कर्मांपासून होतो. 
ब्रह्मणो वैधमुत्पन्नं मत्तो ब्रह्मसमुद्भवः ।
अतो यज्ञो च विश्र्वस्मिन् स्थितं मां विद्धि भूमिप ॥ १५ ॥
१५)  (ज्या कर्मापासून यज्ञ होतात ) ते कर्म वेदांपासून होते. ते वेद माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत. याकरितां सर्वस्थित अशा माझें यज्ञांतही वास्तव्य आहे असें, हें राजा तूं समज.
संसृतीनां महाचक्रं क्रामितव्यं विचक्षणैः ।
स मुदा प्रीणते भूपेन्द्रियक्रीडोऽधमो जनः ॥ १६ ॥ 
१६) जन्ममरणरुप संसाराचें मोठे चक्र आहे. कुशल लोकांनीं युक्तीनें यांतून सुटून जावें म्हणजे त्यांना परमानंद मिळतो. जो इंद्रियांतच रमून जातो, तो अधमापेक्षां अधम जाणावा. 
अन्तरात्मनि यः प्रीत आत्मरामोऽखिलप्रियः ।
आत्मतृप्तो नरो यः स्यात्तस्यार्थो नैव विद्यते ॥ १७ ॥
१७) जो अंतरात्म्यातच संतुष्ट असतो, जो आत्म्यांत रमून जातो, जो सर्वांना प्रिय असतो, अशा आत्मतृप्त नराला मुळींच  कर्तव्य असत नाही. 
कार्याकार्यकृतीनां स नैवाप्नोति शुभाशुभे ।
किंचिदस्य न साध्यं स्यात्सर्वजन्तुषु सर्वदा ॥ १८ ॥
१८) कर्तव्याकर्तव्याचें त्याला शुभाशुभ कांहींच लागत नाहीं. तो सर्व जनांत वावरत असला तरी त्याला कांहींही साध्य असत नाही. 
अतोऽसक्ततया भूप कर्तव्यं कर्म जन्तुभिः ।
सक्तोऽगतिमवाप्नोति मामवाप्नोति तादृशः ॥ १९ ॥  
१९) राजा, याकरितां पुरुषांनी आसक्ती सोडून कर्म करावें. आसक्त माणसाला सद्गति मिळत नाही. आसक्ति सोडून कर्म करणारा मला प्राप्त होतो. 
परमां सिद्धिमापन्नाः पुरा राजर्षयो द्विजाः ।
संग्रहाय हि लोकानां तादृशं कर्म चारभेत् ॥ २० ॥
२०) पूर्वीं राजर्षि व ब्राह्मण परमसिद्धिला प्राप्त झाले आहेत. लोकांना चांगलें वळण लागेल असेंच कर्म करावें.
श्रेयान्यत्कुरुते कर्म तत्करोत्यखिलो जनः ।
मनुते यत्प्रमाणं स तदेवानुसरत्यसौ ॥ २१ ॥
२१) श्रेष्ठ पुरुष जें करतो इतरहि जन तेंच करतात. थोर ज्याला प्रमाण म्हणून मानतो इतर जनही त्याचेच अनुकरण करतात. 
विष्टपे मे न साध्योऽस्ति कश्र्चिदर्थो नराधिप ।
अनालब्धश्र्च लब्धव्यः कुर्वे कर्म तथाऽप्यहम् ॥ २२ ॥
२२) स्वर्गांत मिळविण्यासारखें मला कांहींच नाही. जें मिळालें नसून मिळवावयचे आहे असेंही पण कांहीं नाही.  
न कुर्वेऽहं यदा कर्म स्वतन्त्रोऽलसभावितः ।
करिष्यन्ति मम ध्यानं सर्वे वर्णा महामते ॥ २३ ॥
२३) मी स्वतंत्र असल्यानें जर आळसानें कर्म करावयाचें सोडून देईन तर सर्व वर्ण माझें ध्यान करितील. 
भविष्यन्ति ततो लोका उच्छिन्नाः संप्रदायिनः ।
हंता स्यां सर्वलोकस्य विधाता संकरस्य च ॥ २४ ॥
२४) मला मानणारे लोक यामुळे नष्ट होतील व मी त्यांचा विनाशक व त्यांच्या संकराला कारण होईन.
कामिनो हि सदा कामैरज्ञानात्कर्मकारिणः ।
लोकानां संग्रहायैतद्विद्वान्कुर्यादसक्तधीः ॥ २५ ॥
२५) फलेच्छु पुरुष फलप्राप्ती होण्याकरितां असें मोहानें कर्म करीत असतात, तसें ज्ञात्या पुरुषानें लोकसंग्रहाकरितां स्वतः असक्त राहून कर्म करावे.
विभिन्नत्वमतिं जह्यादज्ञानां कर्मचारिणाम् ।
योगयुक्तः सर्वकर्माण्यर्पयेन्मयि कर्मकृत् ॥ २६ ॥
२६) ज्यांची कर्मावर आसक्ति असते अशा अज्ञ लोकांचा शहाण्यानें बुद्धिभेद करुं नये. स्वतः योगयुक्त होऊन कर्में करावीं. व ती मला अर्पण करावीत.
अविद्यागुणसाचिव्यात्कुर्वन्कर्माण्यतन्द्रितः ।
अहंकाराद्भिन्नबुद्धिरहं कर्तेति योऽब्रवीत् ॥ २७ ॥
२७) अविद्येचे सत्त्वरज इत्यादि गुण सहाय करितात. म्हणून हा आळस सोडून कर्म करीत असतो. अहंकार याची बुद्धि नष्ट झालेली असल्यामुळें मीच कर्ता आहे असे म्हणत असतो. 
यस्तु वेत्त्यात्ममनस्तत्त्वं  विभागाद्रुणकर्मणोः ।
करणं  विषये वृत्तमिति मत्वा न सज्जते ॥ २८ ॥
२८) गुणकर्मापेक्षां आत्मा भिन्न आहे. हें आत्म्याचें सत्य स्वरुप ज्यास कळतें तो विषयरत होणारीं इन्द्रियें हीं गुणकर्म विभागापैकींच आहेत हें जाणून त्यांना आसक्त होत नाहीं.   
कुर्वन्ति सफलं कर्म गुणैस्त्रिभिर्विमोहिताः ।
अविश्र्वस्तः स्वात्मद्रुहो विश्र्वविन्नैव लङ्घयेत् ॥ २९ ॥
२९) जे मायेच्या त्रिगुणांनी मोहित होऊन सकाम कर्म करीत असतात अशा आत्मद्रोही व अश्रद्ध लोकांना सर्वज्ञ पुरुषानें कर्मापासून परावृत्त करुं नये.
नित्यं नैमित्तिकं तस्मान्मयि कर्मार्पयेद्बुधः ।
त्यक्त्वाऽहंममताबुद्धिं परां गतिमवाप्नुयात् ॥ ३० ॥
३०) अहंत व ममतायुक्त बुद्धीचा त्याग करुन जो नित्यनैमित्किक कर्में करतो व तीं मला अर्पण करतो त्याला उत्तम गति मिळते.     
अनीर्ष्यन्तो भक्तिमन्तो ये मयोक्तमिदं शुभम् ।
अनुतिष्ठन्ति ये सर्वे मुक्तास्तेऽखिलबन्धनैः ॥ ३१ ॥
३१) भक्तिमान् व विमत्सर असे पुरुष मीं सांगितलेले हें शुभ तत्त्व जर आचरणांत आणतील तर तो सर्व संपूर्ण बंधनांतून मुक्त होतील.
ये चैव नानुतिष्ठन्ति त्वशुभाहतचेतसः ।
र्इर्ष्यमाणान्महामूढान्नष्टांस्तान्विद्धि मे रिपून् ॥ ३२ ॥
३२) अशुभानें ज्यांची ज्ञानशक्ति नष्ट झाली आहेअसे जे कोणी माझ्या तत्त्वांचे आचरण करीत नाहीत अशा मत्सरी व महामूढ नष्ट लोकांना तूं माझे शत्रू म्हणून जाण.
तुल्यं प्रकृत्या कुरुते कर्म यज्ज्ञानवानपि ।
अनुयाति च तामेवाग्रहस्तत्र मुधा मतः ॥ ३३ ॥
३३) ज्ञानी पुरुषही आपल्या स्वभावाप्रमाणें कर्म करीत असतो. सर्वच आपापल्या स्वभावाप्रमाणें वागत असतात. म्हणून इंद्रियांचा सर्वस्वी निर्बंध करणें व्यर्थ होय.
कामश्र्चैव तथा क्रोधः खानमर्थेषु जायते ।
नैतयोर्वश्यतां यायादस्य विध्वंसकौ यतः ॥ ३४ ॥
३४) काम व क्रोध हे इन्द्रियांच्या शब्दादि विषयांत उत्पन्न होतात. हे विनाशक आहेत, म्हणून केव्हांही यांच्या स्वाधीन होऊं नये.
शस्तोऽगुणो निजो धर्मः सांगादन्यस्य धर्मतः ।
निजे तस्मुन्मृतिः श्रेयोऽपरत्र भयदः परः ॥ ३५ ॥
३५) परधर्म पूर्ण असला ( तो असत नाहींच ) तरीही गुणानें कमी वाटणारा स्वधर्म श्रेष्ठ आहे. आपल्या धर्मांत मरण आलें तरी ते श्रेयस्कर आहे. परधर्म हा परलोकीं भय देणारा आहे.    
वरेण्य उवाच
पुमान्यत्कुरुते  पापं स हि केन नियुज्यते ।
अकाङ्क्षन्नपि हेरम्ब प्रेरितः प्रबलादिव ॥ ३६ ॥
३६) वरेण्य म्हणाला, हे गजानना, मनुष्य जें पाप करतो त्याला पाप कर्माकडे कोण प्रवृत्त करतो ? जसें एखादा प्रबल मनुष्यानें आज्ञा केल्यावर दुर्बल मनुष्य इच्छा नसतांही मुकाट्यानें तें काम करीत असतो.  
श्रीगजानन उवाच
कामक्रोधौ महापापौ गुणद्वयसमुद्भवौ ।
नयन्तौ वश्यतां लोकान् विद्ध्येतौ द्वेषिणौ वरौ ॥ ३७ ॥
३७) श्रीगजानन म्हणाले, महापापी काम व क्रोध हे रजोगुण व तमोगुण यांपासून उत्पन्न होतात. हे लोकांना वश करतात. हे मोठे शत्रु आहेत असें जाण. 
आवृणोति यथा माया जगद्बाष्पो जलं यथा ।
वर्षामेघो यथा भानुं तद्वत्कामोऽखिलांश्र्च रुट् ॥ ३८ ॥
३८) माया जगाला अशी व्यापते. धुकें जसें पाण्याला झांकून टाकते. व वर्षाऋतूंतील मेघ जसा सूर्याला आच्छादितो. त्याचप्रमाणें या कामक्रोधांनी सर्वांनाच व्यापून टाकले आहे.  
प्रतिपत्तिमतो ज्ञानं छादितं सकलं द्विषा ।
इच्छात्मकेन तरसा दुष्पोष्येण च शुष्मिणा ॥ ३९ ॥
३९) या कामरुपी शत्रुनें ज्ञानी पुरुषांचे सर्व ज्ञान झांकून टाकलें आहे. इच्छा हे याचें स्वरुप आहे. याचा वेग मोठा आहे. ज्याला तृप्त करणें कठिण असते असा हा दुसरा अग्निच आहे. 
आश्रित्य बुद्धमनसी इन्द्रियाणी स तिष्ठति ।
तैरेवाच्छादितप्रज्ञो ज्ञानिनं मोहयत्यसौ ॥ ४० ॥
४०) हा काम मनबुद्धि व इंद्रियें यांच्या आश्रयानें राहतो. त्यांच्या योगानें ज्ञानी पुरुषाच्या प्रज्ञेला झांकून टाकतो व ज्ञानाला मोहांत टाकतो. 
तस्मान्नियम्य तान्यादौ स मनांसि नरो जयेत् ।
ज्ञानविज्ञानयोः शान्तिकरं पापं मनोभवम् ॥ ४१ ॥
४१) म्हणून मनासह सर्व इंद्रियांना जिंकून ज्ञानविज्ञानाच्या घातक अशा कामास मनुष्यानें जिंकावें.  
यतस्तानि पराण्याहुस्तेभ्यश्र्च परमं मनः ।
ततोऽपि हि परा बुद्धिरात्मा बुद्धेः परो मतः ॥ ४२ ॥
४२) ( स्थूलदेहापेक्षां ) इंद्रियें पर ( उत्तम ) आहेत. इंद्रियांपेक्षा मन हे पर आहे. मनापेक्षां बुद्धि व बुद्धिपेक्षां आत्मा पर आहे.   
बुद्ध्वैवमात्मनात्मानं संस्तभ्यात्मानमात्मना  ।
हत्वा शत्रुं कामरुपं परं पदमवाप्नुयात् ॥ ४३ ॥
४३) बुद्धिनें आत्मस्वरुप जाणून व बद्धिनेंच मन रुद्ध करुन कामरुप शत्रूचा नाश केला असतां परपदाची प्राप्ती होते.   
ॐ तत्सदिति श्रीमद्गणेशगीतासूपनिषदर्थगर्भासु योगामृतशास्त्रे श्रीगणेशपुराणे उत्तरखंडे श्रीगजाननवरेण्यसंवादे कर्मयोगो नाम द्वितीयोऽध्यायः ॥
Adhyay Dusara Karma Yoga 
अध्याय  दुसरा कर्मयोगः


Custom Search

No comments:

Post a Comment