Monday, January 29, 2018

Samas Navava Upadesha Nirupan समास नववा उपदेश निरुपण


Dashak Aakarava Samas Navava Upadesha Nirupan 
Samas Navava Upadesha Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us everybody has to do certain Karma. The karma should be done very sincerely, should be beautifully. When a difficult is there while doing Karma, we should remember God. We have to find out how is God? What he do? In our body there is Atma, the same Atma is outside everywhere and called as Jagdatma.
समास नववा उपदेश निरुपण
श्रीराम ।
आधीं कर्माचा प्रसंग । कर्म केले पाहिजे सांग ।
कदाचित पडिलें  व्यंग । तरी प्रत्यवाय घडे ॥ १ ॥
१) जीवनांत प्रथम कर्माचा प्रसंग येतो. माणसाला कर्म करावेंच लागते. कर्म उत्तम रीतीनें करावे. त्यांत कांहीं दोष किंवा कमीपणा झाला तर तें कर्म करण्यास विघ्न निर्माण होते.
म्हणौन कर्म आरंभिलें । कांहीयेक सांग घडलें ।
जेथजेथें अंतर पडिलें । तेथें हरिस्मरण करावें ॥ २ ॥
२) म्हणून आपण कर्म करायला सुरुवात केली. त्यापैकी कांहीं कर्म चांगलें झालें. मात्र मधें अडचण आली तर जेथें अडचण निर्माण होईल तेथें भगवंताचे स्मरण करावें.       
तरी तो हरि आहे कैसा । विचार पाहावा ऐसा ।
संधेपूर्वीं जगदीशा । चोविसां नामीं स्मरावें ॥ ३ ॥
३) तो भगवंत आहे तरी कसा असा सूक्ष्म विचार करावा. संध्या करतांना चोवीस नामांनी भगवंताचे प्रथम स्मरण करतात.  
चोविसनामी सहस्त्रनामी । अनंतनामी तो अनामी ।
तो कैसा आहे अंतर्यामीं । विवेकें वोळखावा ॥ ४ ॥
४) पण त्याला कांहीं चोविसच नांवें आहेत असें नाहीं. त्याला हजार नांवें आहेत, अनंत नावें आहेत. असें असूनही तो अनामी आहे. सर्व नामांच्या पलीकडे आहे. असा तो कसा आहे हें विवेकानें आपण आपल्या अंतर्यामी समजून घ्यावें.   
ब्राह्मण स्नानसंध्या करुन आला । मग तो देवार्चनास बैसला ।
येथासांग तो पूजिला । प्रतिमादेवो ॥ ५ ॥
५) एक ब्राह्मण नदीवर स्नानसंध्या करुन आला. व घरीं देवपूजेला बसला. त्यानें देवाच्या प्रतिमेची यथासांग पूजा केली.
नाना देवांच्या नाना प्रतिमा । लोक पूजिती धरुन प्रेमा ।
ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा । कैसा आहे ॥ ६ ॥
६) अनेक देवांच्या अनेक प्रतिमा असतात. लोक अगदी प्रेमानें त्यांची पूजा करतात. पण ज्याच्या त्या प्रतिमा आहेत तो परमात्म कसा आहे.  
ऐसें वोळखिलें पाहिजे । वोळखोन भजन कीजे ।
जैसा साहेब नमस्कारिजे । वोळखिल्याउपरी ॥ ७ ॥
७) हें आपण ओळखलें पाहिजे. साहेबाला बघितल्यावर आपण त्याला जसा नमस्कार करतो. तसें परमात्म्याला ओळखून त्याची भक्ति करावी.    
तैसा परमात्मा परमेश्र्वर  । बरा वोळखावा पाहोन विचार ।
तरीच पाविजे पार । भ्रमसगराचा ॥ ८ ॥
८) नीट विचार करुन परमात्मा किंवा परमेक्ष्वर चांगल्या प्रकारें ओळखावा. तरच दृश्यानें भरलेल्या या भ्रमसमुद्राचा पैलतीर गाठता येईल. 
पूजा घेताती प्रतिमा । आंगा येतो अंतरात्मा ।
अवतारी तरी निजधामा । येऊन गेले ॥ ९ ॥
९) आपण प्रतिमेची पूजा करतो. पण त्यामुलें आपल्या अंतरांतील अंतरात्मा प्रगट होतो. अवतारी पुरुषांमधें तो अंतरात्मा प्रगट होत असतो. अंतरात्म्यापासून तें खालीं येतात व पुनः अवतार संपवून अंतरात्म्यांत जातात.  
परी ते निजरुपें असती । तें निजरुप ते जगज्जोती ।
सत्वगुण तयेस म्हणती । जाणती कळा ॥ १० ॥
१०) अवतारी पुरुष स्वस्वरुपानें कायमचे असतात. पण जगत्ज्योती हें त्यांचे निजरुप होय. तिला शुद्ध सत्त्वगुण किंवा ज्ञानकला असें म्हणतात.  
तये कळेचे पोटीं । देव असती कोट्यान्कोटी ।
या अनुभवाच्या गोष्टी । प्रत्ययें पाहाव्या ॥ ११ ॥   
११) या ज्ञानकलेच्या पोटांत कोट्यानुकोटी देव आहेत. या गोष्टी अनुभवाच्या आहेत. स्वतः अनुभव घेऊनच त्या जाणून घ्याव्या.   
देहपुरामधें ईश । म्हणोन तया नांव पुरुष ।
जगामधें जगदीश । तैसा वोळखावा ॥ १२ ॥
१२) अंतरात्मा या देहरुपी नगरींत किंवा पुरीमधें राहतो. म्हणून त्याला पुरुष म्हणतात. त्याचप्रमाणें जगामधें राहणारा अंरात्मा तो जगदीश हे ओळखावें.
जाणीवरुपें जगदांतरें । प्रस्तुत वर्तती शरीरें ।
अंतःकरणविष्णु येणें प्रकारें । वोळखावा ॥ १३ ॥
१३) या जगाच्या अंतर्यामी शुद्ध जाणीव वास करते. तीच सर्व शरीरांना हालचाल करण्याची प्रेरणा देते. ही जाणीव म्हणजेच विष्णु किंवा विश्वाचें अंतःकरण होय. असें समजावें. 
तो विष्णु आहे जगदांतरीं । तोचि आपुले अंतरीं ।
कर्ता भोक्ता चतुरीं । अंतरात्मा वोळखावा ॥ १४ ॥
१४) जगांत राहणारा विष्णुच आपल्या अंतःकरणांत आहे. हा अंतरात्माच खरा कर्ता व भोक्ता आहे. हें शहाण्या, चतुर माणसांनी ओळखावें.       
ऐके देखे हुंगे चाखे । जाणोन विचारें ओळखे ।
कित्येक आपुले पारिखे । जाणताहे ॥ १५ ॥
१५) विश्व व्यापणारा हा सगळ्या शरीरांमध्यें ऐकतो, पाहतो, वास घेतो, चव घेतो समजून विचार करतो व जाणतो.आपला कोण व आपला कोण नाहीं हें सुद्धां तोच जाणतो.
येकचि जगाचा जिव्हाळा । परी देहलोभाचा आडताळा ।
देहसमंधें वेगळा । अभिमान धरी ॥ १६ ॥
१६) जगाचें अंतःकरण एकच आहे. पण देहाच्या आसक्तीमुळे तें तसे आपल्याला अनुभवास येत नाही. देहाच्या समंधानें माणूस वेगळेपणाचा अभिमान धरतो. मी देहच आहे या अभिमानाने माणूस वेगळेपणने जीवन जगतो.  
उपजे वाढे मरे मारी । जैशा उचलती लहरीवरी लहरी ।
चंचळ सागरीं भरोवरी । त्रैलोक्य होत जातें ॥ १७ ॥
१७) सागर्‍याच्या पाण्यावर ज्याप्रमाणें लाटावर लाता येत राहतात, त्याचप्रमााणें या जाणीवरुप सागरामध्यें देहाच्या अनंत लाटा येत असतात आणि जात असतात. प्राण्याचा देह उपजतो, वाढतो, मरतो व मारतो. या अंतरात्म्याच्या सागरांत अशी पुष्कळ विश्वें उत्पन्न होतात आणि लय पावतात.  
त्रैलोका वर्तवितो येक । म्हणौन त्रैलोक्यनायेक ।
ऐसा प्रत्ययाचा विवेक । पाहाना कैसा ॥ १८ ॥
१८) या प्रचंड त्रैलोक्याला चालवतो म्हणून त्या अंतरात्म्याला त्रैलोक्यनायक असें म्हणतात. विवेकानें याचा अनुभव घेऊन पाहावा. 
ऐसा अंतरात्मा बोलिला । परी तोहि तत्वांमधें आला ।
पुढें विचार पाहिजे केला । माहावाक्याचा ॥ १९ ॥
१९) आतांपर्यंत अंतरात्म्याचे इतके वर्णन केले, पण तोही मायेच्या कक्षांत येतो. म्हणून एक पाऊल पुढें जाऊन महावाक्याचा म्हणजे शुद्ध परब्रह्नाचा विचार करणें अवश्य आहे.  
आधीं देखिला देहधारी । मग पाहावें जगदांतरीं ।
तयाचेनियां उपरी । परब्रह्म पावे ॥ २० ॥
२०) आधीं आपल्या देहामधिल स्वस्वरुप अनुभवावे. मग विक्ष्वामध्यें व्यापून असणारे ईश्र्वरस्वरुप अनुभवावें. तो अनुभव मागें सारुन मगच शुद्ध परब्रह्म अनुभवास येते. 
परब्रह्माचा विचार । होतां निवडे सारासार ।
चंचळ जाईल हा निर्धार । चुकेना कीं ॥ २१ ॥ 
२१) शुद्ध निर्विकार परब्रह्माचा साक्षात्कार झाला म्हणजे शाश्वत अशाश्वताची बरोबर निवड होते. त्यानंतर अशाश्वत सगळें नश्र्वर आहे हा निश्र्चय पक्का होतो. 
उत्पत्ति स्थिति संव्हार जाण । त्याहून वेगळा निरंजन ।
येथें ज्ञानाचें विज्ञान । होत आहे ॥ २२ ॥
२२) जें नश्र्वर आहे त्यास उत्पत्ति, स्थिति व संहार हे विकार असतात. निरंजन ब्रह्म त्याहून अगदीं निराळें आहे. त्या ठिकाणी ज्ञानाचे पर्यवसान विज्ञानामध्यें होते.   
अष्टदेह थानमान । जाणोन जालियां निर्शन ।
पुढें उरे निरंजन । विमळ ब्रह्म ॥ २३ ॥
२३) पिंडब्रह्मांडाचे आठ देह आणि स्थलकालांनी मापलेले दृश्य विश्र्व यांना ओळखून त्यांचा लय केल्यावर मग पुढें निरंजन व विमल ब्रह्म उरतें.
विचारेंचि अनन्य जाला । पाहाणाराविण प्रत्यय आला ।
तेहि वृत्ति निवृत्तिला । बरें पाहा ॥ २४ ॥
२४) जो साधक अखंड व निरंतर चिंतनाने अंतरात्म्याशी अनन्य होतो, त्याचा मीपणा नाहींसा होतो. त्याला आत्मस्वरुपाचा साक्षात अनुभव येतो. परंतु अनुभव येणें ही एक वृत्तीच आहे. ती वृत्ती देखील नाहींशी होऊन वृत्तिशून्य अवस्था पुढें येते. हीच सर्वश्रेष्ठ अवस्था समजावी.   
येथें राहिला वाच्यांश । पाहोन सांडिला लक्ष्यांश ।
लक्ष्यांशासरिसा वृत्तिलेश । तोहि गेला ॥ २५ ॥ 
२५) प्रथम शब्द ऐकण्याचा अनुभव, नंतर त्यांचा अर्थ आकलन होण्याचा अनुभव, त्यानंतर अर्थानें अभिप्रेत असलेल्या वस्तूचा अनुभव आणि अखेर अनुभव घेण्याच्या वृत्तीचा लय, अशा या साधनाच्या पायर्‍या आहेत. म्हणून वाच्यांश मागे राहिला, वस्तोोचा साक्षात् अनुभव आल्यानें लक्ष्यांश मागें राहिला, आणि शेवटीं वृत्तीदेखील नाहींशी झाली.    
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उपदेश नाम समास नववा ॥
Samas Navava Upadesha Nirupan 
समास नववा उपदेश निरुपण



Custom Search

No comments:

Post a Comment