Tuesday, January 16, 2018

Samas Tisara Shikavan Nirupan समास तिसरा शिकवण निरुपण


Dashak Aakarava Samas Tisara Shikavan Nirupan 
Samas Tisara Shikavan Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Human life and how it is to be made beautiful by following certain practices in this Samas.
समास तिसरा शिकवण निरुपण 
श्रीराम ॥
बहुतां जन्मांचा सेवट । नरदेह सांपडे अवचट ।
येथें वर्तावें चोखट । नीतिन्यायें ॥ १ ॥
१) खालच्या योनींतील अनेक जन्म होऊन गेल्यावर अखेर एकाएकी मानसाचा देह आपल्याला मिळतो. या देहांत आल्यावर नीतिन्यायानें व निर्मळपणाने वर्तन करावें. 
प्रपंच करावा नेमका । पाहावा परमार्थविवेक ।
जेणेंकरितां उभय लोक । संतुष्ट होती ॥ २ ॥
२) प्रपंच अगदी व्यवस्थित करावा. त्याचबरोबर परमार्थाचाही अभ्यास करावा. असें केले तर या लोकीं व परलोकींही यश मिळते. 
शत वरुषें वय नेमिलें । त्यांत बाळपण नेणतां गेलें । 
तारुण्य अवघें वेचलें । विषयांकडे ॥ ३ ॥
३) माणसाचे आयुष्य शंभर वर्षे धरतात. त्यापैकी बालपणींचा काल हा अज्ञानांत तर तरुणपणींचा विषयसुखांत जातो. 
वृद्धपणीं नाना रोग । भोगणें लागे कर्मभोग ।
आतां भगवंताचा योग । कोणे वेळे ॥ ४ ॥
४) म्हातारपणीं अनेक रोग शरीराला होतात. माणसाला पूर्वकर्माचे भोग भोगावें लागतात. बालपण, तारुण्य व म्हातारपण यांत काळ गेल्यानें भगवंताकडे वळण्याचा योग येत नाही. 
राजिक देविक उदेग चिंता । अन्न वस्त्र देहममता ।
नाना प्रसंगें अवचिता । जन्म गेला ॥ ५ ॥
५) जीवनांत नाना प्रकारचे प्रसंग येतात. राज्यकर्त्यांकडून होणारा त्रास, दैवी आपत्ती, विफलता, काळजीअन्नवस्त्रांची आबाळ, देहावरिल प्रेमामुळे होणारें दुःख, इत्यादि अनेक प्रसंगांना तोंड देता देता आयुष्य कसें संपून जाते.     
लोक मरमरों जाती । वडिलें गेलीं हे प्रचिती ।
जाणता जाणता निश्र्चिती । काये मानिलें ॥ ६ ॥
६) माणसें सारखी मरतअसतात. वडील माणसें मरतात. हें प्रत्यक्ष अनुभवास येते. हें सगळें माहित असतांना कशाचीहि शाश्वती मानता येत नाही.
अन्न गृहासी लागला । आणि सावकास निजेला ।
तो कैसा म्हणावा भला । आत्महत्यारा ॥ ७ ॥
७) समजा घराला आग लागली असतां एखादा निजून राहीला, तर त्याला भला माणूस कोण म्हणेल तो तर आत्मघातकीच म्हणावा.     
पुण्यमार्ग अवघा बुडला । पापसंग्रह उदंड जाला ।
येमयातनेचा झोला । कठीण आहे ॥ ८ ॥
८) जीवनामधें पुण्यमार्ग सगळा बुडला आणि पापमात्र फार करुन ठेवलें तर मृत्युनतर सोसाव्या लागणार्‍या यमयातना फार कठोर असतात.   
तरी आतां ऐसें न करावें । बहुत विविकें वर्तावें ।
इह लोक परत्र साधावें । दोहीकडे ॥ ९ ॥
९) म्हणून माणसानें असें करु नये. जीवनामध्येम फार विचारानें वागावें. आणि प्रपंच व परमार्थ दोन्ही साधावें. 
आलसाचें फळ रोकडें । जांभया देऊन निद्रा पडे ।
सुख म्हणौन आवडे । आळसी लोकां ॥ १० ॥
१०) जीवनामध्यें आळसाचा परिणाम अगदी लगेच दिसतो. माणूस सूस्त व निद्राधीन बनतो. आळशी माणसांना झोप अति सुखाची वाटते.
साक्षेप करितां कष्टती । परंतु पुढें सुरवाडती । 
खाती जेविती सुखी होती । येत्नें करुनी ॥ ११ ॥
११) आधी काम करतांना कष्ट होतात हें खरें. पण त्यांचे सुख कालांतराने मिळते.   
आळस उदास नागवण । आळस प्रेत्न बुडवणा । 
आळसें करंटपणाच्या खुणा । प्रगट होती ॥ १२ ॥
१२) आळस उत्साहाला मारक आहे. आळस फार नुकसान करतो. आळस प्रयत्न पार नाहींसा करतो. आळसानें दुर्भाग्याच्या खुणा, दुर्दैवीपणाची चिन्हें प्रगट होतात.  
म्हणौन आळस नसावा । तरीच पाविजे वैभवा ।
अरत्रीं परत्रीं जीवा । समाधान ॥ १३ ॥
१३) म्हणून माणसानें आळसाला थारा देऊं नये. माणूस आळशी नसेल तरच त्यास वैभव प्राप्त होते. आणि प्रपंचांत व परमार्थांत जीवाला समाधान लाभते.  
प्रेत्न करावा तो कोण । हेंचि ऐका निरुपण । 
सावध करुन अंतःकरण । निमिष्य येक ॥ १४ ॥
१४) आळस सोडून प्रयत्न करावा हेंच खरें. पण तो कोणता प्रयत्न करावा हे सांगतो. श्रोत्यांनी तें लक्षपूर्वक श्रवण करावें. 
प्रातःकाळीं उठावें । कांहीं पाठांतर करावें ।
येथानशक्ति आठवावें । सर्वोत्तमासी ॥ १५ ॥
१५) सकाळीं लवकर उठावें. कांहींतरी पाठांतर करावें. ते झाल्यावर जसें शक्य असेल तसें भगवंताचे स्मरण करावें. 
मग दिशेकडे जावें । जे कोणासिच नव्हे ठावे ।
शाौच्य आच्मन करावें । निर्मळ जळें ॥ १६ ॥
१६) मग लांब कोठेतरी शौचास जावे. नंतर स्वच्छा पाण्यानें हातपाय धुवावेत. व आचमन करावें.
मुखमार्जन प्रातःस्नान । संध्या तर्पण देवतार्चन ।
पुढें वैश्वदेव उपासना । येथासांग ॥ १७ ॥
१७) मग दांत घासावें. प्रातःस्नान करावे. त्यानंतर संध्या करावी. पितृतर्पण करावे. देवाची पूजा करुन वैश्वदेव करावा. 
कांहीं फळाहार घ्यावा । मग संसारधंदा करावा ।
सुशब्दें राजी राखावा । सकळ लोक ॥ १८ ॥
१८) हें झाल्यावर थोडें खाऊन घ्यावे. मग प्रपंचाचा उद्योग सुरु करावा. गोड शब्द बोलून सर्वांना खूष ठेवावे.  
ज्या ज्याचा जो व्यापार । तेथें असावें खबर्दार ।
दुश्र्चितपणें तरी पोर । वेढा लावी ॥ १९ ॥
१९) प्रत्येकाने आपला जो व्यवसाया असेल त्यांत दक्ष व खबरदार असावे. बेसावध राहीले तर एखादे पोरसुद्धा फसवून जाईल.  
चुके ठके विसरे सांडी । आठवण जालियां चर्फडी ।
दुश्र्चीत आळसाची रोकडी । प्रचित पाहा ॥ २० ॥
२०) जो माणूस चुकतो, फसतो, वस्तु विसरतो किंवा हरवतो, आणि आठवण झाली की तळमळ करतो त्याला यश मिळणे कठीण असते. आळसाचा व गैरसावधपणाचा हा रोकडा अनुभव येतो.  
याकारणें सावधान । येकाग्र असावें मन ।
तरी मग जेवितां भोजन । गोड वाटे ॥ २१ ॥
२१) म्हणून माणसाने नेहमी आपल्या व्यवसायांत सावधपणें वागावे. तेथें आपलें मन एकाग्र गुंतवावे. अशा उत्तम रीतीनें व्यवसाय करुन घरी आल्यावर मग जेवण गोड लागते.  
पुढें भोजन जालियांवरी । कांहीं वाची चर्चा करी ।
येकांतीं जाऊन विवरी । नाना ग्रंथ ॥ २२ ॥
२२) जेवण झाल्यावर थोडे वाचन करावें. थोडी चर्चा करावी. मग एकीकडे एकटे बसून निरनिराळ्या ग्रंथांचा अभ्यास करावा.  
तरीच प्राणी शाहाणा होतो । नाहींतरी मूर्खचि राहातो ।
लोक खाती आपण पाहतो । दैन्यवाणा ॥ २३ ॥
२३) अशा रीतीनें माणूस वागला कीं तो शहाणा होतो. नाहींतर तो मूर्खच राहतो. लोकांनीं ऐश्र्वर्य भोगावे व आपण तें लाचारीनें नुसतें बघावे. असा प्रसंग मूर्ख माणसावर येतो.  
ऐक सदेवपणाचें लक्षण । रिकामा जाऊं नेदी येक क्षण ।
प्रपंचवेवसायाचें ज्ञान । बरें पाहे ॥ २४ ॥
२४) आपल्या आयुष्याचा कोणताही क्षण वाया न जाऊं देणें हेंच भाग्याचें लक्षण आहे. प्रपंचाचा जो व्यवसाय आपण करतो त्याचे उत्तम ज्ञान आपल्याला असावें.  
कांहीं मेळवी मग जेवी । गुंतल्या लोकांस उगवी ।
शरीर कारणीं लावी । कांहीं तरी ॥ २५ ॥
२५) कांहींतरी कमवावें व मग आपण जेवावे. कोणाचेही कधीही फुकट खाऊं नये. अडचणींत असलेल्या लोकांना मदत करुन त्यांची अडचण दूर करावी. कोणत्याही चांगल्या कार्यासाठीं देहाला कष्ट करायला लावावे.  
कांहीं धर्मचर्चा पुराण । हरीकथा निरुपण ।
वायां जाऊं नेदी क्षण । दोहींकडे ॥ २६ ॥
२६) थोडी धर्मचर्चा करावी. पुराण, हरिकथा यांचे श्रवण करावें. निरुपण ऐकावे. प्रपंच व परमार्थ मिळून आयुष्याचा एकही क्षण वाया जाऊं देवू नये. 
ऐसा जो सर्वसावध । त्यास कैंचा असेल खेद ।
विवेकें तुटला समंध । देहबुद्धीचा ॥ २७ ॥
२७) अशारीतीनें जीवनामध्यें सर्व बाजूंनी जो सावधपणें वागतो, त्याला दुःख करण्याचा प्रसंग येत नाही. असा मनुष्य विवेकाच्या जोरावर देहबुद्धि किंवा स्वार्थ सोडून देतो. 
आहे तितुकें देवाचें । ऐसे वर्तणें निश्र्चयाचें ।
मूळ तुटें उद्वेगाचें । येणें रीतीं ॥ २८ ॥
२८) आपल्या देहासगट सारें दृश्य भगवंताच्या मालकीचे आहे अशा ठाम निश्र्चयानें जो वागतो त्याच्या दुःखाचेच मूळ उपटले जाते. त्याचे ममत्वही नाहींसे झाल्यानें वासना क्षीण होते. वासना क्षीण झाल्यानें फलाची आशा राहात नाही. फलाशा नसल्यानें दुःखच नाहीसें होते.   
प्रपंचीं पाहिजे सुवर्ण । परमार्थीं पंचिकर्ण ।
माहावाक्याचें विवरण । करितां सुटे ॥ २९ ॥
२९) प्रपंच व्यवस्थित चालण्यासाठीं पैशाची आवश्यकता असते. तर परमार्थ उत्तम साधण्यासाठीं महावाक्यांचे ज्ञान आवश्यक असते. तत् त्वम् असि ; अहम् ब्रह्म असि ; या तत्वांचे मनन व निदिध्यासन केल्यावर माणूस आत्मज्ञानी होतो व प्रकृतिच्या बंधनांतून मुक्त होतो.   
कर्म उपासना आणि ज्ञान । येणें राहे समाधान ।
परमार्थाचें जें साधन । तेंचि ऐकत जावें ॥ ३० ॥
३०) कर्म, भक्ति व ज्ञान यांचा समन्वय साधल्यावर मानसाला आत्मसाक्षात्कार होऊन समाधान लाभते. व तें टिकते. हेंच परमार्थाचे साधन असल्यानें नेहमी त्याचे श्रवण करावें.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सिकवणनिरुपण नाम समास तिसरा ॥
Samas Tisara Shikavan Nirupan
समास तिसरा शिकवण निरुपण 


Custom Search

No comments:

Post a Comment