Thursday, February 8, 2018

Samas Choutha VivekVairagya Nirupan समास चौथा विवेकवैराग्य निरुपण


Dashak Barava Samas Choutha VivekVairagya Nirupan 
Samas Choutha VivekVairagya Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us that if anybody retires from Prapancha knowing that it is not real or permanant and on a path of Parmarth, then he must have Vivek that is knowledg, For a success in Prapancha.
समास चौथा विवेकवैराग्य निरुपण
श्रीराम ।
महद्भाग्य हातासे आलें । परी भोगूं नाहीं जाणितलें ।
तैसे वैराग्य उत्पन्न जालें । परी विवेक नाहीं ॥ १ ॥
१) एखाद्या माणसास मोठें वैभव लाभले, पण त्यास त्याचा भोग कसा घ्यावा हें माहीत नसेल तर तें वाया जातें. त्याचप्रमाणें एखाद्याला वैराग्य प्राप्त झालें पण त्याच्या अंगीं विवेक नसेल तर त्या वैराग्यांतून आत्मज्ञान निर्माण होणार नाहीं.  
आदळतें आफळतें । कष्टी होतें दुःखी होतें ।
ऐकतें देखते येतें । वैराग्य तेणें ॥ २ ॥
२) प्रपंचांत आदळ, आपट, कष्ट व दुःख असतात. ते ऐकलेआणि पाहिले व त्याचा अनुभव घेतला म्हणजे माणसाला वैराग्य उत्पन्न होते.   
नाना प्रपंचाच्या वोढी । नाना संकटें सांकडीं ।
संसार सांडुनी देशधडी । होये तेणें ॥ ३ ॥
३) प्रपंचांत अनेक प्रकारें ओढाताण होते, नाना तर्‍हेची संकटें येतात. नाना प्रकारच्या अडचणीं सोसाव्या लागतात. या सगळ्यांनी माणूस त्रासून जातो. तो प्रपंच सोडून देशांतरास जातो.  
तो चिंतेपासून सुटला । पराधेनतेपासुनि पळाला ।
दुःखत्यागें मोकळा जाला । रोगी जैसा ॥ ४ ॥  
४) एखादा बरा झालेला रोगी ज्याप्रमाणें रोगाच्या तडाख्यांतून सुटतो त्याचप्रमाणें प्रपंचाला त्रासून देशांतरास गेलेला माणूस काळजी, दुःख व पराधीनता यांच्यापासून सुटतो. 
परी तो होऊं नये मोकाट । नष्ट भ्रष्ट आणि चाट ।
सीमाच नाहीं सैराट । गुरुं जैसें ॥ ५ ॥ 
५) पण प्रपंच सोडून गेलेला हा माणूस स्वैराचारी, नष्ट, भ्रष्ट, चावट आणि एखाद्या भटक्या जनावरासारखा मोकाट बनूं नये.   
विवेकेंविण वैराग्ये केलें । तरी अविवेकें अनर्थीं घातलें ।
अवघें वेर्थचि गेलें । दोहिंकडे ॥ ६ ॥
६) विवेक नसतां वैराग्य आलें तर माणूस संकटांत पडतो. आणि दोहीकडे त्याची फसगत होते.  
ना प्रपंच ना परमार्थ । अवघें जिणेंचि जालें वेर्थ ।
अविवेकें अनर्थ । ऐसा केला ॥ ७ ॥     
७) त्याला धड प्रपंच साधत नाहीं वा ना धड परमार्थ.  त्याचे सगळें जीवन वायां जातें. अविवेकामुळें हा अनर्थ घडून येतो.
कां वेर्थचि ज्ञान बडबडिला । परी वैराग्ययोग नाहीं घडला ।
जैसा कारागृहीं अडकला । पुरुषार्थ सांगे ॥ ८ ॥
८) एखादा माणूस खूप ज्ञानाच्या गोष्टी सांगतो पण त्याला वैराग्याची पार्श्वभूमि नसेल तर तें ज्ञान व्यर्थ बडबडच ठरते. तुरुंगांत असलेल्यानें पराक्रमाच्या गप्पा माराव्यात तसें ठरते. 
वैराग्येंविण ज्ञान । तो वेर्थचि साभिमान ।
लोभदंभें घोळसून । कासाविस केला ॥ ९ ॥
९) वैराग्याचा पाया नसलेले ज्ञान उगाच खोटा अभिमान उत्पन्न करतें. असा वैराग्यहीन ज्ञानवान माणूस लोभानें व दंभानें कासावीस झालेला असतो.   
स्वान बांधलें तरी भुंके । तैसा स्वार्थामुळें थिंके ।
पराधीक देखों न सके । साभिमानें ॥ १० ॥
१०) एखाद्या कुत्र्यासारखी त्याची अवस्था झालेली असते. कुत्र्याला बांधलें तरी ते भुंकतें. त्याचप्रमाणें हा ज्ञानवान लोभी स्वार्थामुळें चरफडतो. अभिमानामुळें दुसर्‍याचा उत्कर्ष त्याला सहन होत नाहीं.
हें येकेंविण येक । तेणें उगाच वाढे शोक ।
आतां वैराग्य आणि विवेक । योग ऐका ॥ ११ ॥
११) विवेकावांचून वैराग्य आणि वैराग्यावांचून विवेक असेल तर उगाच दुःख वाधण्यास तें कारण घडते. आतां विवेक व वैराग्या दोन्ही असतील तर कसें असतें तें ऐकावें.  
विवेकें अंतरीं सुटला । वैराग्यें प्रपंच तुटला ।
अंतर्बाह्य मोकळा जाला । निःसंग योगी ॥ १२ ॥
१२) विवेकानें माणसाचा मीपणा सुटतो. आणि वैराग्यानें त्याची प्रपंचाची आसक्ती सुटते. विवेकयुक्त वैराग्यानें पुरुष मोकळा होतो. बंधनरहित होतो तोच खरा निसंग योगी होय.  
जैसें मुखें ज्ञान बोले । तैसीच सवें क्रिया चाले ।
दीक्षा देखोनी चक्कित जाले । सुचिस्मंत ॥ १३ ॥   
१३) असा योगी जसें बोलतो तसाच वागतो. त्याची जीवनपद्धती पाहून समाजांतील शुद्धचरणीं माणसेंसुद्धा अचंबित होतात. 
आस्था नाहीं त्रैलोक्याची । स्थिती बाणली वैराग्याची ।
येत्नविवेकधारणेची । सीमा नाहीं ॥ १४ ॥
१४) एकीकडे त्रैलोक्याची आसक्ती नाहीं असें धगधगते वैराग्य त्याच्यापाशीं असते. तर दुसरीकडे असीम प्रयत्न, अमर्याद विवेक आणि अचाट धारणा त्याच्या अंगी असतात.
संगीत रसाळ हरिकीर्तन । ताळबद्ध तानमान ।
प्रेमळ आवडीचें भजन । अंतरापासुनी ॥ १५ ॥
१५) तालबद्ध, तानयुक्त, संगीतप्रधान असें हरिकीर्तन तो करतो. त्यांत हरी प्रेमाचा रसतो भरुन तें जिवंत करतो. त्याचप्रमाणें अगदीं मनापासून खर्‍या आवडीनें तो भगवंताचे भजन करतो.  
तत्काळचि सन्मार्ग लागे । ऐसा अंतरीं विवेक जागे ।
वगत्रुत्व करितां न भंगे । साहित्य प्रत्ययाचें ॥ १६ ॥
१६) त्याचे बोलणें जो ऐकतो तो ताबडतोप सन्मार्गाला लागतो. असा प्रबल विवेक त्याच्या अंतर्यामी प्रदीप्त असतो. तो बोलतअसतां त्याचेबोलणें स्वानुभवाच्या साहित्यास कधीही विरोध करत नाही.
सन्मार्गें जगास मिळाला । म्हणिजे जगदीश वोळला ।
प्रसंग पाहिजे कळला । कोणीयेक ॥ १७ ॥
१७) सन्मार्गानें जाण्यास त्याला लोकसमुदाय अनुसरु लागला म्हणजे त्याच्यावर ईश्र्वराची कृपा झाली हें ओळखावें. हें जरीं खरें तरी प्रसंग कोणता आहे हें जाणतां आलें पाहिजे.  
प्रखर वैराग्य उदासीन । प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान ।
स्नानसंध्या भगवद्भजन । पुण्यमार्ग ॥ १८ ॥
१८) कशाचीही आस नसलेले जळजळीत वैराग्य असावें. स्वानुभवचें ब्रह्मज्ञान असावें. स्नानसंध्याशील असावें. भगवंताचें भजन असावें. पुण्यमार्गानें जात असावें.
विवेकवैराग्य तें ऐसें । नुस्तें वैराग्य हेंकाडपिसें ।
शब्ज्ञान येळिलसें । आपणचि वाटे ॥ १९ ॥
१९) ज्याच्या अंगीं विवेक व वैराग्याची जोड असते तो पुरुष असा असतो. नुसतें वैराग्य दुराग्रही व वेडपट असते. तर नुसतें शब्दज्ञान ओशाळवाणें व कंटळवाणें असतें.  
म्हणौन विवेक आणि वैराग्य । तेंचि जाणिजे महद्भाग्य ।
रामदास म्हणे योग्य । साधु जाणती ॥ २० ॥ 
२०) म्हणून विवेक व वैराग्य यांचा संगम होणें हेंच भाग्य थोर समजावें. रामदासस्वामी म्हणतात कीं, जे खरे साधु असतात त्यांना हें बरोबर समजतें.   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विवेकवैराग्यनाम समास चौथा ॥
Samas Choutha VivekVairagya Nirupan 
समास चौथा विवेकवैराग्य निरुपण


Custom Search

No comments:

Post a Comment