Thursday, March 22, 2018

Samas Dusara Bhiksha Nirupan समास दुसरा भिक्षा निरुपण


Dashak Choudava Samas Dusara Bhiksha Nirupan 
Samas Dusara Bhiksha Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about the importance of Bhiksha. Bhiksha i.e. Om Bhavati Bhikshan Dehi is very essential for a Brahmin Sadhak for his spiritual progress.
समास दुसरा भिक्षा निरुपण
श्रीराम ॥
ब्राह्मणाची मुख्य दीक्षा । मागितली पाहिजे भिक्षा ।
वों भवति या पक्षा । रक्षिलें पाहिजे ॥ १ ॥
१) ब्राह्मणाच्या जीवन आचारामध्यें " भिक्षा मागणें " हें प्रमुख लक्षण आहे. ॐ भवति भिक्षां देहि या ब्रीदाचे रक्षण केलें पाहिजे. 
भिक्षा मागोन जो जेविला । तो निराहारी बोलिला ।
प्रतिग्रहावेगळा जाला । भिक्षा मागतां ॥ २ ॥
२) जो साधक भिक्षा मागून जेवतो, तो निराहारी म्हणून ओळखला जातो. त्यानें भिक्षा मागून पोट भरल्यानें कोणाकडून फुकट दान घेतल्याचा दोष त्यास लागत नाही. 
संतासंत जे जन । तेथें कोरान्न मागोन करी भोजन ।
तेणें केलें अमृतप्राशन । प्रतिदिनीं ॥ ३ ॥
३) सज्जन आणि दुर्जन दोन्ही तर्‍हेचे लोक जेथें राहतात अशा वस्तीमध्यें कोरडी भिक्षा मागून जो पोट भरतो, तो रोज अमृताचे सेवन करतो, असें म्हणावें.
श्र्लोक 
भिक्षाहारी निराहारी । भिक्षा नैव प्रतिग्रहः ।
असंतो वापि संतो वा । सोमपानं दिने दिने ॥
श्र्लोकाचा अर्थ
भिक्षा मागून पोट भरणारा माणूस मिताहारी असतो. भिक्षा घेणें म्हणजे दान स्वीकारणें नव्हे. भिक्षा घालणारे लोक सज्जन असोत किंवा दुर्जन असोत, त्यांनी घातलेल्या भिक्षेनें पोट भरणें म्हणजे रोज सोमपान करण्याचे पुण्य होय. 
ऐसा भिक्षेचा महिमा । भिक्षा माने सर्वोत्तमा ।
ईश्र्वराचा अगाध महिमा । तोहि भिक्षा मागे ॥ ४ ॥
४) भिक्षा मागण्याचा महिमा असा आहे. भगवंताला भिक्षा पसंत आहे. श्रीशंकराचा थोरपणा केवढा मोठा आहे, पण तो देखील भिक्षा मागतो.  
दत्त गोरक्ष आदिकरुनी । सिद्ध भिक्षा मागती जनीं । 
निस्पृहता भिक्षेपासुनी । प्रगट होये ॥ ५ ॥
५) दत्त, गोरखनाथ इत्यादि सिद्धसुद्धां लोकांमध्यें भिक्षा मागतात. भिक्षा मागण्यामध्यें निस्पृहता प्रगट होते.   
वार लाऊन बैसला । तरी तो पराधेन जाला ।
तैसीच नित्यावळीला । स्वतंत्रता कैंची ॥ ६ ॥
६) जो माणूस वार लावून जेवतो किंवा पोट भरतो, तो पराधीन बनतो. त्याचप्रमाणें जो एखाद्या माणसाच्या घरी रोज जेवतो, त्याचे स्वातंत्र्य नष्ट होते. 
आठां दिवसां धान्य मेळविलें  । तरी तें कंटाळवाणें जालें ।
प्राणी येकायेकीं चेवलें । नित्यनूतनतेपासुनी ॥ ७ ॥
७) रोजची भिक्षा न करतां आठ दिवसांची भिक्षा मागण्याची पद्धत ठेवणे योग्य नाहीं. तें कंटाळवाणें होते. रोज भिक्षा मागल्यानें जी नित्यनूतनता, रोजचा नवीनपणा असतो तो चटदिशीं नाहींसा होतो.   
नित्य नूतन हिंडावें । उदंड देशाटण करावें ।
तरीच भिक्षा मागतां बरवें । श्र्लाघ्यवाणें ॥ ८ ॥
८) रोज नव्या नव्या ठिकाणी भिक्षेसाठीं हिंडावें, सपाटून प्रवास पर्यटन करावें. असें केलें तर भिक्षा मागण्याचें खरें कौतुकआहे.
अखंड भिक्षेचा अभ्यास । तयास वाटेना परदेश ।
जिकडे तिकडे स्वदेश । भुवनत्रैं ॥ ९ ॥
९) सदैव भिक्षा मागून पोट भरण्याची ज्याला सवय आहे, त्याला कोणताही प्रांत परदेश असा वाटत नाहीं. जिकडेतिकडे भुवनत्रयामध्यें स्वदेशच आहे, असे त्यास वाटते.    
भिक्षा मागतां किरकों नये । भिक्षा मागतां लाजों नये ।
भिक्षा मागतां भागों नये । परिभ्रमण करावें ॥ १० ॥
१०) भिक्षा मागण्यास कुरकुरु नये. भिक्षा मागतांना लाजूं नये. भिक्षा मागतांना थकून जाऊं नये. भिक्षेच्या निमित्यानें सारखें फिरत राहावें. 
भिक्षा आणि चमत्कार । च्चाकाटती लहानथोर । 
कीर्ति वर्णी निरंतर । भगवंताची ॥ ११ ॥
११) एखादा माणूस भिक्षा मागतो पण चमत्कार करतो. असें ऐकल्यावर लहान मोठी माणसें आश्र्चर्यचकित होतात. तसेंच तो भगवंताची कीर्ति निरंतर गातो, हें पाहून सर्वांना कौतुक वाटते. 
भिक्षा म्हणिजे कामधेनु । सदा फळ नव्हे सामान्यु ।
भिक्षेस करी जो अमान्यु । तो करंटा जोगी ॥ १२ ॥
१२) भिक्षा म्हणजे कामधेनूच होय. ती सदैव हवें तें फळ देणारी असल्यानें कांहीं सामान्य नव्हे. भिक्षा ज्याला मान्य नाही असा यति किंवा बैरागी भाग्यहीन समजावा. 
भिक्षेनें वोळखी होती । भिक्षेनें भरम चुकती ।
सामान्य भिक्षा मान्य करिती । सकळ प्राणी ॥ १३ ॥
१३) भिक्षेमुळें नव्या ओळखी होतात. भिक्षेनें चुकीच्या कल्पना नाहींश्या होतात. भिक्षा वाटते मामुली पण सर्वांना ती मान्य आहे यांत शंका नाहीं.
भिक्षा म्हणिजे निर्भये स्थिती । भिक्षेनें प्रगटे महंती ।
स्वतंत्रता ईश्र्वरप्राप्ती । भिक्षागुणें ॥ १४ ॥
१४) भिक्षा मागणारा माणूस निर्भय स्थितींत असतो. भिक्षा मागण्यानें महंतपणा प्रगट होतो. स्वातंत्र्य व भगवंताची प्राप्ति हे दोन गुण भिक्षा मागणारास प्राप्त होतात. 
भिक्षेस नाहीं आडथाळा । भिक्षाहारी तो मोकळा ।
भिक्षेकरितां सार्थक वेळा । काळ जातो ॥ १५ ॥
१५) भिक्षेला कधीं कसला आडथळा येत नाहीं. भिक्षेवर पोट भरणारा सदैव मोकळा असतो. भिक्षेच्या योगानें सगळा काळ सार्थकीं लावतां येतो.  
भिक्षा म्हणिजे अमरवल्ली । जिकडे तिकडे लगडली ।
अवकाळीं फळदायेनी जाली । निर्ल्लजासी ॥ १६ ॥
१६) भिक्षा म्हणजे अमृतवल्ली आहे. जिकडेतिकडे ती फळाफुलांनी बहरलेलीं असतें.  एखाद्यावर जेव्हां अवदशा गुदरते, त्यावेळीं लाज सोडून भिक्षा मागणार्‍यास ती मोठी फलदायिनी होते. 
पृथ्वीमधें देश नाना । फिरतां उपवासी मरेना । 
कोणे येके ठाईं जना । जड नव्हे ॥ १७ ॥
१७) पृथ्वीवर अनेक देश आहेत. त्या देशांमधून पर्यटन करतांना उपाशी मरण्याची पाळी येत नाहीं. भिक्षा मागणारा माणूस कोठल्याहि ठिकाणीं लोकांना जड होत नाहीं.  
गोरज्या वाणिज्य कृषी । त्याहून प्रतिष्ठा भिक्षेसी ।
विसंभों नये झोळीसी । कदाकाळीं ॥ १८ ॥
१८) गुरें पाळणें, व्यापार करणें आणि शेती करणें या व्यवसायांहून भिक्षेची प्रतिष्ठा, सामजिक स्थान अधिक आहे. म्हणून महंतानें आपली झोळी कधीं बाजूला करुं नये.   
भिक्षेऐसें नाहीं वैराग्य । वैराग्यापरतें नाहीं भाग्य ।
वैराग्य नस्तां अभाग्य । येकदेसी ॥ १९ ॥
१९) भिक्षेसारखें वैराग्य नाहीं आणि वैराग्यासारखें भाग्य नाहीं. ज्या माणसापासहीं वैराग्य नाहीं, तो माणूस आकुंचित व अभागी समजावा.  
कांहीं भिक्षा आहे म्हणावें । अल्पसंतोषी असावें ।
बहुत आणितां घ्यावें । मुष्टी येक ॥ २० ॥
२०) कोणाच्या दारापुढें उभे राहून " कांहीं भिक्षा मिळेल कां? " असें मोठ्यानें म्हणावें. पुष्कळ भिक्षा घालायला आणली तर मूठभर घ्यावी. भिक्षा मागणारानें अल्पसंतोषीं असावें.     
सुखरुप भिक्षा मागणें । ऐसीं निस्पृहतेचीं लक्षणें ।
मृद वागविळास करणें । परम सौख्यकारी ॥ २१ ॥
२१) मोठ्या प्रसन्नतेनें भिक्षा मागावी. निस्पृहतेची लक्षणें अशी आहेत. दुसर्‍याशी बोलतांना गोड मृदु शब्द बोलावेत. ऐकणारास आनंद वाटेल असा वाग्विलास असावा. 
ऐसी भिक्षेची स्थिती । अल्प बोलिलें येथामती ।
भिक्षा वांचवी विपत्ती । होणार काळीं ॥ २२ ॥
२२) भिक्षेची स्थिती ही अशी असते. ती मी येथें यथामति सांगितली. पुढें येणार्‍या आपत्कालापासून भिक्षा माणसास वाचवते.    
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे भिक्षानिरुपणनाम समास दुसरा ॥
Samas Dusara Bhiksha Nirupan
समास दुसरा भिक्षा निरुपण



Custom Search

No comments:

Post a Comment