Monday, April 9, 2018

Samas Pahila Chaturya Lakshan समास पहिला चातुर्य लक्षण


Dashak Pandharava Samas Pahila Chaturya Lakshan 
Samas Pahila Chaturya Lakshan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Wiseness and wise person. Wise person is required to help people and bring them on the way of spirituality. It is told in here how he can do it.
समास पहिला चातुर्य लक्षण 
श्रीराम ॥
अस्तिमांशांचीं शरीरें । त्यांत राहिजे जीवेश्र्वरें ।
नाना विकारीं विकारे । प्रविण होईजे ॥ १ ॥
१) शरीर हाडामासांचें असतें पण त्यांत जीवरुपी ईश्र्वर राहतो. शरीरांत नाना प्रकारचे बदल होतात. त्यांच्याबरोबर बदलण्यांत तो कुशल होतो.  
घनवट पोंचट स्वभावें । विवरोन जाणिजे जीवें ।
व्हावें न व्हावें आघवें । जीव जाणे ॥ २ ॥
२) दाट कोणतें व पोकळ कोणतें यांचें विवरण करुन जीव आपोआप तें बरोबर जाणतो. आपल्याला काय हवे व काय नको हें सगळें जीव जाणतो. 
येंकीं मागमागों घेणें । येकां न मागतांच देणें ।
प्रचीतीनें सुलक्षणें । ओळखावीं ॥ ३ ॥
३) एखाद्या जीवाला सारखें मागून मिळवावें लागतें तर एखाद्या जीवाला न मागतां मिळतें. चांगलीं लक्षणें अशा अनुभवानें कळतात.  
जीव जीवांत घालावा । आत्मा आत्म्यांत मिसळावा ।
राहराहों शोध घ्यावा । परांतरांचा ॥ ४ ॥
४) दुसर्‍याच्या जीवाशी आपला जीव एकरुप करावा. त्याच्या आत्म्यांत आपला आत्मा मिळवावा. अशारीतीनें दुसर्‍याच्या अंतःकरणांत काय आहे तें वारंवार शोधून पहावें.
जानवें हेंवडकारें जालें । ढिलेपणें हेवड आलें ।
नेमस्तपणें शोभलें । दृष्टीपुढें ॥ ५ ॥
५) जानवें जर ढिलें ठेवले तर त्याचे पदर एकमेकांत अडकतात. तेंच जर नीट व्यवस्थित ठेवलें तर दिसायलासुद्धा ते छान दिसतें. 
तैसेंचि हें मनास मन । विवेकें जावें मिळोन ।
ढिलेपणें अनुमान । होत आहे ॥ ६ ॥
६) त्याचप्रमाणें आपलें मन दुसर्‍याच्या मनाशी मिळवून टाकावें. त्यांत चालढकल केली कीं कल्पनेस वाव मिळतो.   
अनुमानें अनुमान वाढतो । भिडेनें कार्यभाग नासतो ।
याकारणें प्रत्यये तो । आधीं पाहावा ॥ ७ ॥
७) कल्पनेनें कल्पना वाढत जातें. परस्परांना भीड पडल्यानें कार्याची हानी होते. त्यासाठीं प्रत्यक्ष अनुभव काय आहे तें प्रथम बघावें. 
दुसर्‍याचे जीवीचें कळेना । परांतर तें जाणवेना ।
वश्य होती लोक नाना । कोण्या प्रकारें ॥ ८ ॥
८) जोपर्यंत दुसर्‍याच्या जीवांतील कळत नाहीं.त्याच्या अंतःकरणांत काय आहे हें समजत नाहीं, तोपर्यंत लोक वश होणें कठीण आहे. 
आकल सांडून परती । लोक वश्यकर्ण करिती ।
अपूर्णपणें हळु पडती । ठाईं ठाईं ॥ ९ ॥
९) कांहीं लोक बेवकूफ बनून वशीकरणाच्या नादीं लागतात. पण वशीकरण अपुरें पडते. त्यामुळें ठिकठिकाणी अशा माणसांचे वजन पडत नाहीं.  
जगदीश आहे जगदांतरीं । चेटकें करावी कोणावरी ।
जो कोणी विवेकें विवरी । तोचि श्रेष्ठ ॥ १० ॥
१०) अंतरात्मा संपूर्ण जगांत भरुन असल्यानें वशीकरणाचें चेटूक कोणी कोणावर करणें हा मूर्खपणा आहे. लोकांना वश करण्याचा विचार जो विेवेकानें करतों, तोंच श्रेष्ठ होय.  
श्रेष्ठ कार्ये करी श्रेष्ठ । कृत्रिम करी तो कनिष्ठ ।
कर्मानुसार प्राणी नष्ट । अथवा भले ॥ ११ ॥
११) श्रेष्ठ माणूस सदैव श्रेष्ठ कामें करतो. कृत्रिम कामें करतो तो कनिष्ठ असतो. आपापल्या कामाप्रमाणें माणसें भलीं किंवा हलकी ठरतात. 
राजे जाती राजपंथें । चोर जाती चोरपंथे । 
वेडें ठकेअल्पस्वार्थें । मूर्खपणें ॥ १२ ॥
१२) राजा राजमार्गानें तर चोर चोरवाटेनें जातो. वेडीं माणसें थोड्या स्वार्थापायीं मूर्खपणानें फसतात. 
मूर्खास वाटे मी शाहाणा । परी तो वेडा दैन्यवाणा ।
नाना चातुर्याच्या खुणा । चतुर जाणे ॥ १३ ॥
१३) आपण मोठे शहाणें आहोत असें मूर्खाला वाटते. पण तो खरा वेडा व दैन्यवाणा असतो. चतुरपणाच्या खर्‍या खुणा चतुराला कळतात. 
जो जगदांतरें मिळाला । तो जगदांतरचि जाला ।
अरत्रीं परत्रीं तयाला । काय उणें ॥ १४ ॥
१४) जगाच्या अंतरंगाशी जो मिसळतो तो तें अंतरंग स्वतः बनतो. मग इहलोकीं व परलोकीं त्याला कांहीं कमी पडत नाही.
बुद्धि देणें भगवंताचें । बुद्धिविण माणुस काचें ।
राज्य सांडून फुकाचे । भीक मागे ॥ १५ ॥
१५) बुद्धि ही ईश्र्वराकडून माणसाला मिळालेली मोठी देणगी आहे. ज्याच्यापाशीं बुद्धि नाहीं तो कच्चा समजावा. जो आपल्या बुद्धिचा उपयोग करत नाही. तो जणूं काय राज्य टाकून भीक मागत फिरतो. 
जें जें जेंथें निर्माण जालें । तें तें तयास मानलें ।
अभिमान देऊन गोविलें । ठाईं ठाईं ॥ १६ ॥
१६) ज्या ठिकाणीं ज्या गोष्टी निर्माण होतात त्या ठिकाणी लोकांना त्या पटतात. त्यांना त्याचा अभिमान वाटतो. ठिकठिकाणी अशा अभिमानानें लोक गुंतलेले असतात.
अवघेच म्हणती आम्ही थोर । अवघेचि म्हणती आम्ही सुंदर ।
अवघेचि म्हणती आम्ही चतुर । भूमंडळीं ॥ १७ ॥
१७) जगामध्यें सगळेंच म्हणतात कीं, आपण थोर किंवा सुंदर किंवा चतुर आहेत.  
ऐसा विचार आणितां मना । कोणीच लाहान म्हणवीना ।
जाणते आणिती अनुमाना । सकळ कांहीं ॥ १८ ॥
१८) ही गोष्ट ध्यानांत आली म्हणजे पटते. कीं जगामध्यें कोणीही स्वतःला लहान म्हणवून घेत नाहीं. शहाणी माणसें हें सगळें बरोबर ओळखून असतात.  
आपुलाल्या साभिमानें । लोक चालिले अनुमानें ।
परंतु हें विवेकानें । पाहिलें पाहिजे ॥ १९ ॥
१९) आपल्याला पसंत असलेल्या गोष्टीचा अभिमान बाळगून कल्पनेनें लोक जगतात. आपण विवेकानें हें समजून घेतलें पाहिजे. 
लटिक्याचा साभिमान घेणें । सत्य अवघेंच सोडणें ।
मूर्खपणाची लक्षणें । ते हे ऐसीं ॥ २० ॥
२०) जें खरें नाहीं त्याचा अभिमान धरायचा आणि जें खरें आहे त्याला सोडून द्यायचे, हीं मूर्खपणाची लक्षणें आहेत.  
सत्याचा जो साभिमान । तो जाणावा निराभिमान ।
न्याये अन्याये समान । कदापि नव्हे ॥ २१ ॥
२१) सत्याचा जो अभिमान असतो तो अभिमान नव्हे. तो निरभिमानच होय. न्याय व अन्याय दोन्ही एकसारखें असूंच शकत नाहीत.  
न्याये म्हणिजे तो शाश्र्वत । अन्याये म्हणिजे तो अशाश्वत ।
बाष्कळ आणि नेमस्त। येक कैसा ॥ २२ ॥
२२) जें न्यायमय असतें तें शाश्वत व जें अन्यायमय असतें तें अशाश्वत होय. बेशिस्त व शिस्तबद्ध दोन्ही सारखेंच असत नाहीत.
येक उघड भाग्य भोगिती । येक तश्कर पळोन जाती ।
येकांची प्रगट महंती । येकांची कानकोंडी ॥ २३ ॥
२३) एक उघडपणें भाग्य भोगतात, तर एक चोर म्हणून पळून जातात. एक उघडपणें महंत म्हणून मिरवितो तर एक चोरुन महंती करतो. 
आचारविचारेंविण । जें जें करणें तो तो सीण ।
धूर्त आणि विचक्षण । तेचि शोधावे ॥ २४ ॥
२४) आचार व विचार न सांभाळता मनुष्य जें कांहीं करतो, ते वृथा श्रम होतात. म्हणून लोकसंग्रही मनुष्यानें चतुर आणि बुद्धिमान माणसें शोधून काढावित.   
उदंड बाजारी मिळाले । परी ते धूर्तेचि आळिले ।
धूर्तांपासीं कांहीं न चले । बाजार्‍यांचें ॥ २५ ॥ 
२५) बाजार बुणग्यांचा मोठा समुदाय केवळ एक चतुर पुरुष आपल्या ताब्यांत ठेवूं शकतो. चतुर पुरुषांशी बाजारी बुणग्यांचे कांहीं चालूं शकत नाहीं.
याकारणें मुख्य मुख्य । तयांसी करावे सख्य । 
येणेंकरितां असंख्य । बाजारी मिळती ॥ २६ ॥   
२६) या दृष्टीनें समाजांतील जी मुख्य माणसें असतात त्यांच्याशी स्नेह जोडावा.  तसें केलें तर असंख्य सामान्य लोक आपल्याला वश होतात.      
धूर्तासि धूर्तचि आवडे । धूर्त धूर्तीच पवाडे ।
उगेचि हिंडती वेडे । कार्येविण ॥ २७ ॥
२७) चतुराला चतुर आवडतो. चतुराचा चतुरपणा चतुरलोकांमध्येंच कौतुकास्पद होतो. ज्यांना हे कळत नाहीं ते  वेडे लोक कांहीं काम न करतां उगीच भटकतात. 
धूर्तासि धूर्तपण कळलें । तेणें मनास मन मिळालें ।
परी हें गुप्तरुपें केलें । पाहिजे सर्वे ॥ २८ ॥
२८) एका चतुराला दुसर्‍याचा चतुरपणा कळला म्हणजें दोघांचे मन जमतें. पण हें सारें गुप्तपणें केलें पाहिजे.  
समर्थाचें राखतां मन । तेथे येती उदड जन ।
जन आणि सज्जन । आर्जव करिती ॥ २९ ॥
२९) मोठ्या माणसाला आपलेंसे करुन घेतलें म्हणजे पुष्कळसे सामान्य लोक आकर्षित होतात. साधें लोक व सज्जन दोघे आर्जव करुं लागतात. 
वोळखीनें साधावी । बुद्धीनें बुद्धि बोधावी । 
नीतिन्यायें वाट रोधावी । पाषांडाची  ॥ ३० ॥
३०) ओळखीनें ओळखी वाढवावी. आपल्या बुद्धिनें लोकांच्या बुद्धीला प्रगल्भ करावें. नीतिन्यायांनी समाजघातक मतांना वाव देऊं नये.   
वेष धरावा बावळा । अंतरीं असाव्या नाना कळा ।
सगट लोकांचा जिव्हाळा । मोडूं नये ॥ ३१ ॥ 
३१) बाहेरुन साधाच वेष घालावा. परंतु अंतर्यामीं अनेक कलांनी संपन्न असावें. सार्‍या लोकांचे अंतःकरण सांभाळून असावें. 
निस्पृह आणि नित्य नूतन । प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान ।
प्रगट जाणता सज्जन । दुल्लभ जगीं ॥ ३२ ॥
३२) अत्यंत निस्पृह, नित्य नवें, सदैव ताजें असणारें स्वानुभवाचें आत्मज्ञान ज्याच्यापाशी आहे असा प्रगटपणें समाजांत वावरणारा ज्ञानी साधु फार दुर्लभ असतो.  
नाना जिनसपाठांतरें । निवतां सकळांचीं अंतरें ।
चंचळपणें तदनंतरे । सकळां ठाईं ॥ ३३ ॥
३३) त्याच्यापाशीं अनेक विषयांचें पाठांतर असल्यानें तो सगळ्यांची अंतःकरणें निववितो. पण तो एका ठिकाणीं राहात नाहीं. तो सर्वत्र फिरत असतो.    
येकं ठाईं बैसोन राहिला । तरी मग व्यापचि बुडाला ।
सावधपणें ज्याला त्याला । भेटि द्यावी ॥ ३४ ॥
३४) तो जर एकाच ठिकाणी स्थिर राहिला तर त्याचा लोकसंग्रह बुडतो. म्हणून त्यानें सर्वांना सावधपणें भेट देत असावें. 
भेटभेटों उरी राखणें । हे चातुर्याचीं लक्षणें ।
मनुष्यमात्र उत्तम गुणें । समाधान पावे ॥ ३५ ॥
३५) प्रत्येलास पुःन पुःन भेटून त्यास मार्गांत ठेवावें. ही चतुरपणाची लक्षनें आहेत. सगळ्या माणसांना उत्तम गुणांच्या योगानें समाधान मिळते. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चातर्यलक्षणनाम समसा पहिला ॥
Samas Pahila Chaturya Lakshan
समास पहिला चातुर्य लक्षण 



Custom Search

No comments:

Post a Comment