Friday, May 18, 2018

Samas Dahava GunaBhoot Nirupan समास दहावा गुणभूत निरुपण


Dashak Solava Samas Dahava GunaBhoot Nirupan
Samas Dahava GunaBhoot Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Pancha Mahabhoot and three Gunas.
समास दहावा गुणभूत निरुपण
श्रीराम ॥
पंचभूतें चाले जग । पंचभूांची लगबग ।
पंचभूतें गेलियां मग । काये आहे ॥ १ ॥
१) पंचभूतांनीं जग चालतें. जगामध्यें सगळीकडे पंचभूतांची धांदल आहे. ती पंचभूतें लय पावल्यावर मग काय उरतें. 
श्रोता वक्तयास बोले । भूतांचे महिमे वाढविले । 
आणि त्रिगुण कोठें गेले। सांगा स्वामी ॥ २ ॥
२) श्रोता वक्त्याला असा प्रश्र्ण विचारतो कीं, सारसार विचारंत पंचभूतांना फारच महत्व दिलेलें आढळतें. मग त्रिगुणांचें काय झालें? स्वामी तें आपण मला सांगा.
अंतरात्मा पांचवे भूत । त्रिगुण त्याचें अंगभूत ।
सावध करुनि चित्त । बरें पाहें ॥ ३ ॥
३) स्वामी सांगतात कीं, अंतरात्मा हा पांचवें भूत समजावें. त्याच्यांतच त्रिगुणांचा समावेश होतो. चित्त स्थिर करुन नीट पाहा. 
भूत म्हणिजे जितुकें जालें । त्रिगुण जाल्यांत आलें ।
इतुकेन मूळ खंडलें । आशंकेचें ॥ ४ ॥
४) जें जें झालें तें तें सारें भूत होय. त्रिगुण देखील जें झालें त्यांत येतात. या उत्तरानें शंकेचे निरसन होईल.
भूतांवेगळें कांहीं नाहीं । भूतजात हे सर्व हि ।
येकावेगळें येक कांहीं । घडेचिना ॥ ५ ॥
५) या दृश्य विश्वांत पंचभूतांखेरीज दुसरें कांहींच नाहीं. जें जें आहे तें सारे पंचभूतांपासूनच झालें आहे. एकावेगळें एक असें कांहींच घडत नाहीं. सर्व पदार्थांमध्यें पांचही भूतें हजर असतात.
आत्म्याचेनी जाला पवन । पवनाचेन प्रगटे अग्न ।
अग्नीपासून जीवन । ऐसें बोलती ॥ ६ ॥
६) अंतरात्म्यापासून वायु झाला, वायुपासून अग्नि प्रगट झाला. अग्नीपासून पाणी झालें, असें म्हणतात. 
जीवन आवघें डबाबिलें । तें रविमंडळें आळलें ।
वन्हीवायोचेन जालें । भूमंडळ ॥ ७ ॥
७) जिकडेतिकडे पाणी पसरलें होतें. सूर्याच्या उष्णतेनें तें घट्ट झालें. अशा रीतीनें अग्नि आणि वायु यांच्यापासून पृथ्वी तयार झाली. 
वन्ही वायो रवी नस्तां । तरी होते उदंड सीतळता ।
ते सीतळतेमधें उष्णता । येणें न्यायें ॥ ८ ॥
८) अग्नि, वायु आणि सूर्य नसते तर सर्व ठिकाणीं फार थंडी राहीली असती. त्या थंडीमध्यें सूर्यानें अशा रीतीनें उष्णता निर्माण केली.  
आवघें वर्मासी वर्म केलें । तरीच येवढें फांपावलें ।
देहेमात्र तितुके जालें । वर्माकरितां ॥ ९ ॥
९) ज्या भूताचे जे वर्म असतें, तें दुसर्‍या भूताच्या वर्मानें नरम पडतें. म्हणूनच दृश्याचा एवढा पसारा वाढला. याच युक्तीनें प्राणीमात्रांचे देह तयार झालें. 
आवघेम सीतळचि असतें । तरी प्राणीमात्र मरोनी जातें ।
आवघ्या उष्णेंचि करपते । सकळ कांहीं ॥ १० ॥
१०) जिकडेतिकडे नुसता गारठाच असता तर सर्व प्राणीमात्र मरुन गेले असते. तसेंच नुसती उष्णता असती  तर सर्व कांहीं करपून गेले असते. 
भूमंडळ आळोन गोठलें । तें रविकिर्णे वाळोन गेलें ।
मग सहज चि देवें रचिलें । उपायासी ॥ ११ ॥
११) पाणी आटून पृथ्वी तयार झाली. पण नुसत्या सूर्यकिरणांनी ती शुष्क होऊन गेली असती. तसें होऊं नये म्हणून देवानें उपाय काढला.  
म्हणोनी केला प्रज्यनयकाळ । थंड जालें भूमंडळ ।
पुढें उष्ण कांहीं सीतळ । सीतकाळ जाणावा ॥ १२ ॥    
१२) देवानें पावसाळा निर्माण केला. पावसानें पृथ्वी थंड होतें. थोडी गरमी व थोडी थंडी यास हिवाळा म्हणतात.   
सीतकाळें कष्टले लोक । कर्पोन गेलें वृक्षादिक ।
म्हणोन पुढें कौतुक । उष्णकाळाचें ॥ १३ ॥
१३) पण फार थंडी पडली कीं लोकांना कष्ट होतात. झाडेवगैरे करपून जातात. म्हणून त्यानंतर उन्हाळा यावा असें केलें आहे. 
त्याहिमधें प्रातःकाळ । माध्यानकाळ सायंकाळ ।
सीतकाळ उष्णकाळ । निर्माण केले ॥ १४ ॥
१४) रोज दिवसामध्यें देखील सकाळ, दुपार व संध्याकाळ असें कांहीं थंड व कांहीं गरम काळ आहेत.
ऐसें येकामागे येक केलें । विलेनें नेमस्त लाविलें ।
येणेकरितां जगलें । प्राणीमात्र ॥ १५ ॥
१५) एकामागून एकानें यावें असा क्रम निर्माण करुन पंचभूतांची नीट व्यवस्था लावली आहे. त्याच्यामुळेंच प्राणी जगतात. 
नाना रसें रोग कठीण । म्हणोनी औषधी केल्या निर्माण ।
परंतु सृष्टीचें विवरण । कळलें पाहिजे ॥ १६ ॥ 
१६) अन्नामधील अनेक रसांनीं कठीण रोग निर्माण होतात. त्यांना बरें करण्यासाठीं वनस्पती निर्माण केल्या. अशा रीतीनें या सृष्टीची रचना आकलन झाली पाहिजे.   
देहेमूळ रक्त रेत । त्या आपाचे होती दात ।
ऐसीच भूमंडळीं प्रचित । नाना रत्नांची ॥ १७ ॥
१७) आपला देह हाडामासांचा घट्ट दिसतो. पण रक्त व रेत त्याचे मूळ आहे. वास्तविक रक्त व रेत पाणी आहे पण त्याचेच दांत होतात. अनेक रत्नें अशीच द्रवापासून होतात असा जगांत अनुभव येतो.  
सकळांसी मूळ जीवन बांधा । जीवनें चाले सकळ धंदा ।
जीवनेंविण हरिगोविंदा । प्राणी कैचे ॥ १८ ॥
१८) सगळ्या दृश्य जड पदार्थांचा मूळ बांधा पाण्याचाच असतो. पाण्याच्या शाय्यानें सर्व व्यवहार चालतो. पाण्यावांचून देव, प्राणी जगूंच शकणार नाहींत. 
जीवनाचें मुक्ताफळ । शुक्रासारिखें सुढाळ ।
हिरे माणिके इंद्रनीळ । तें जळें जाले ॥ १९ ॥
१९) पाणीदार सुरेख मोती, हिरे, माणकें, इंद्रनीळ, वगैरे पाण्यापासूनच तयार होतात. 
महिमा कोणाचा सांगावा । जाला कर्दमुचि आघवा ।
वेगळवेगळु निवडावा । कोण्या प्रकारें ॥ २० ॥
२०) कोणत्या भूताचा महिमा सांगावा अशी अडचण पडतें. कारण जेथें तेथें पंचभूतें एकमेकांत कालवलेली आहेत. त्या काल्यामध्यें एकएक भूत वेगळें काढणें कठीण आहे.   
परंतु बोलिलें कांहीयेक । मनास कळावया विवेक ।
जनामधें तार्किक लोक । समजती आघवें ॥ २१ ॥
२१) पण सामान्य माणसाच्या मनाला पटावें म्हणून कांहीं वर्णन केलें. जगांत जें विचारवंत आहेत त्यांना पंचभूतांच्या गुणधर्माची बरोबर कल्पना येते.
आवघें समजलें हें घडेना । शास्त्रांशास्त्रांसी  पडेना ।
अनुमानें निश्र्चय होयेना । कांहीयेक ॥ २२ ॥
२२) कोणालाही सगळें समजलें असें होत नाहीं. बरें, निरनिराळ्या शास्त्रांच्या निर्णयांमधें विरोध आढळतो. त्यामुळें नुसत्या अनुमानानें निश्र्चित ज्ञान होत नाहीं. 
अगाध गुण भगवंताचे । शेष वर्णूं न शके वाचें ।
वेदविधी तेहि काचे । देवेंविण ॥ २३ ॥   
२३)  भगवंताचे गुण अगाध आहेत. शेषास देखील आपल्या वाचेनें त्यांचे वर्णन करतां येत नाहीत. अंतरात्मा नसेल तर वेद विधि सुद्धां लटकें पडतात.   
आत्माराम सकळां पाळी । आव घें त्रयलोक्य सांभाळी ।
तथा येकेंविण धुळी । होये सर्वत्रांची ॥ २४ ॥
२४) अंतरात्मा सर्वांचे पालन करतो. सगळें त्रैलोक्य तोच सांभाळतो. एका अंतरात्म्यावाचून सगल्याची धूळ होते. सगळे मातीमोल होतात.  
जेथें आत्माराम नाहीं । तेथें उरो न शके कांहीं ।
त्रयलोकीचे प्राणी सर्व हि । प्रेतरुपी ॥ २५ ॥
२५) जेथें अंतरात्मा नाहीं तेथें कांहींच उरुं शकत नाही. तो नसेल तर त्रैलोक्यांतील प्राणी प्रेतरुप होऊन जातात. 
आत्मा नस्तां येती मरणें । आत्म्याविण कैचें जिणे ।
बरा विवेक समजणें । अंतर्यामीं ॥ २६ ॥
२६) अंतरात्मा नसेल तर मरण येते. अंतरात्म्यावाचून जिवंतपण असत नाहीं. माणसानेम ही गोष्ट विवेकानें अमतर्यामीं समजून घ्यावी.  
समजणें जे विवेकाचें । तेंहि आत्म्याविण कैचें ।
कोणीयेकें जगदीशाचें । भजन करावें ॥ २७ ॥
२७) विवेकाचा वापर करुन माणूस जे समजून घेतो तेंही अंतरात्म्यावांचून होऊं शकत नाहीं. अंतरात्म्याचें हें महत्व ओळखून प्रत्येकानें त्याचें म्हणजेच जगदीशाचे भजन करावें.
उपासना प्रगट जाली । तरी हे विचारणा कळली ।
याकारणें पाहिजे केली । विचारणा दवाची ॥ २८ ॥
२८) ज्याच्या  अंतर्यामी उपासना प्रगट होते, म्हणजे ज्याच्या अंतर्यामी अंतरात्म्याच्या अस्तित्वाची खूण पटते, त्यासच अंतरात्म्याचे सर्व कर्तेपण ध्यानांत येतें. यासाठी अंतरात्मा सर्वकर्ता आहे हें मनास पटवून ध्यावें.   
उपासनेचा मोठा आश्रयो । उपासनेविण निराश्रयो ।
उदंड केलें तरी तो जयो । प्राप्त नाहीं ॥ २९ ॥
२९) उपासना अथवा अंतरात्मा आपल्या अंतर्यामी आहे ही जाणीव मनाला मोठा धीर देते. ही जाणीव नसेल तर मनाला धीर वाटत नाहीं. या जाणीवेचा अभाव असून सपाटून धडपड केली तरी माणसाला यश मिळत नाहीं. 
समर्थाची नाहीं पाठी । तयास भलताच कुटी ।
याकारणें उठाउठी । भजन करावें ॥ ३० ॥
३०) आपल्या पाठीशी एखादी बलवान व्यक्ति किंवा शक्ति नसेल तर आपल्याला वाटेल तो येऊन मारतो. याकरितां अंतरात्मा पाठीशी असावा म्हणून वेळ वाया न घालविता त्याचे भजन करावें. 
भजन साधन अभ्यास । येणें पाविजे परलोकास ।
दास म्हणे हा विश्र्वास । धरिला पाहिजे ॥ ३१ ॥
३१) भजन, साधन व अभ्यास या त्रयीनें माणसाला परमार्थ साधतो. रामदास म्हणतात कीं, यावर विष्वास ठेवणें अवश्य आहे. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गुणभूतनिरुपणनाम समास दहावा ।  
Samas Dahava GunaBhoot Nirupan
 समास दहावा गुणभूत निरुपण


Custom Search

No comments:

Post a Comment