Sunday, June 24, 2018

Samas Dahava Vivek Lakshan Nirupan समास दहावा विवेकलक्षण निरुपण


Dashak Aekonvisava Samas Dahava Vivek Lakshan Nirupan 
Samas Dahava Vivek Lakshan Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Leader and his behavior with people. Name of this Samas is Vivek Lakshan Nirupan.
समास दहावा विवेकलक्षण निरुपण
श्रीराम ॥
जेथें अखंड नाना चाळणा । जेथें अखंड नाना धारणा ।
जेथें अखंड राजकारणा । मनासी आणिती ॥ १ ॥
१) ज्या ठिकाणी राजकारण करणारा महंत असतो, त्या ठिकाणी सतत अनेक चिषयांवर विचारविनिमय चालूं असतो. तेथें अनेक प्रकारच्या गोष्टी एकाग्रतेनें मनांत वागवल्या जातात. आणि अनेक प्रकारच्या राजकीय समस्यांवर चिंतन चालतें.
सृष्टीमधें उत्तम गुण । तितुकें चाले निरुपण ।
निरुपणाविण क्षण । रिकामा नाहीं ॥ २ ॥ 
२) जगांत जे उत्तम गुण आहेत ते आपण कसें शिकावे याची चर्चा तेथें होते. खरें म्हणजे या गुणांचे वर्णन आणि भगवंत निरुपण, याशिवाय एक क्षण रीकामा जात नाहीं.  
चर्चा आशंका प्रत्योत्तरें । कोण खोटे कोण खरें । 
नाना वगत्रुत्वें शास्त्राधारें । नाना चर्चा ॥ ३  ॥ 
३) तेथें अनेक शंका काढून त्यांचे निरसन केलें जातें. कोण खरें व कोण खोटे याचे निश्र्चित केलें जातें. अनेक प्रकारची वक्तव्यें ऐकाला मिलतात. आणि शास्त्राचा आधार घेऊन अनेक चर्चा होतात.    
भक्तिमार्ग विशद कळे । उपासनामार्ग आकळे ।
ज्ञानविचार निवळे । अंतर्यामीं ॥ ४ ॥
४) तेथें भक्तिमार्गाचे स्वरुप स्पष्टपणें कळतें. उपासनामार्गाचे आकलन होतें. माणसाच्या अंतर्यामी ज्ञानविचार संशयरहित होऊन जातो. 
वैराग्याची बहु आवडी । उदास वृत्तीची गोडी ।
उदंड उपाधी तरी सोडी । लागोंच नेदी ॥ ५ ॥
५) समाजनेत्या महंताला वैराग्याची मोठी आवड असते. अलिप्तपणांत त्याला मनापासून गोडी वाटते. त्याच्या मागें पुष्कळ भानगडी असतात. पण मनानें तो त्यांना चिकटून नसतो. त्या सोडायच्या म्हटल्या तर तो केंव्हाही सोडून देऊं शकतो. 
प्रबंदाचीं पाठांतरें । उत्तरासी संगीत उत्तरें ।
नेमक बोलतां अंतरें । निववी सकळांचीं ॥ ६ ॥
६) त्याला पुष्कळ साहित्य ग्रंथ पाठ असतात. प्रश्रणांना त्यानें दिलेली उत्तरें व्यवस्थित असतात. त्याच्या योग्य व नेमक्या बोलण्यानें सर्वांच्या मनाला शांती मिळते.  
आवडी लागली बहु जना । तेथें कोणाचें कांहीं चालेना ।
दळवट पडिला अनुमाना । येईल कैसा ॥ ७ ॥
७) लोकांचे त्याच्यावर फार प्रेम असते. म्हणून त्याच्यापुढें कोणाचे कांहीं चालत नाहीं. त्याच्याभोवती नेहमी गर्दी असते. पण त्याचे अंतरंग फारच थोड्या लोकांना माहित असते. 
उपासना करुनियां पुढें । पुरवलें पाहिजे चहुंकडे ।
भूमंडळीं जिकडे तिकडे । जाणती तया ॥ ८ ॥
८) तो स्वतः उपासना आचरतो. उपासनेच्या प्रसारासाठीं तो सगळीकडे भ्रमण करतो. त्यामुळें जगांत जिकडे तिकडे तो माहित असतो.    
जाणती परी आडळेना । काये करितो तें कळेना ।
नाना देसीचे लोक नाना । येऊन जाती ॥ ९ ॥  
९) लोकांना तो माहित असला तरी फारसा दृष्टीस पडत नाहीं. तो काय करतो तें कळत नाहीं. अनेक देशांतील अनेक लोक त्याच्याकडे येऊन जातात. 
तितुक्यांचीं अंतरें धरावीं । विवेकें विचारें भरावीं ।
कडोविकडीचीं विवरावीं । अंतःकर्णें ॥ १० ॥
१०) भेटायला येणार्‍या अशा सगळ्याचें अंतरंग आपलें करुन घ्यावें. त्यांचें अंतरंग विवेकानें व विचारानें भरुन टाकावे. त्यांच्यापैकी जे एकांतिक वृत्तीचे असतात. त्यांचे अंतःकरण विवेकानें समतोल बनवावें. 
किती लोक तें कळेना । किती समुदाव आकळेना ।
सकळ लोक श्रवणमनना । मध्यें घाली ॥ ११ ॥
११) त्याला भेटायला किती लोक येतात त्यांची गणती नसते. त्याच्या अनुयायांच्या संख्येची कल्पना येत नाहीं. पण सर्वांनाच तो श्रवण मननाचा मार्ग शिकवतो. त्यांना श्रवण मनन करायला पात्र करतो.
फड समजाविसी करणें । गद्यपद्य सांगणें ।
परंतरासी राखणें । सर्वकाळ ॥ १२ ॥
१२) आपण निर्माण केलेल्या समूहांतील लोकांची समजूत घालणें, गद्य, पद्य लिहून घेण्यास सांगणें सदासर्वकाळ दुसर्‍याचें अंतःकरण सांभाळणें,
ऐसा ज्याचा दंडक । अखंड पाहाणें विेवेक ।
सावधापुढें अविवेक । येईल कैचा ॥ १३ ॥
१३) असा त्याचा नित्यक्रम असल्यानें अहोरात्र तो अत्यंत विवेकानें वागतो. असा सावधपणा ठेवून वागल्यामुळें अविवेक त्याच्याजवळ येत नाहीं.
जितुकें कांहीं आपणासी ठावें । तितुकें हळुहळु सिकवावें ।
का शाहाणें करुनि सोडावे । बहुत जन ॥ १४ ॥
१४) जितकें कांहीं आपल्यापाशी ज्ञान असेल तितकें लोकांना हळुहळु धीमेपणानें शिकवावें. अशा रीतीनें पुष्कळ लोक शहाणे करावे.
परोपरीं सिकवणें । आडणुका सांगत जाणें ।
निवळ करुनी सोडणें । निस्पृहासी ॥ १५ ॥
१५) जो निःस्पृह आहे आणि महंत होण्यास लायक आहे. अशा पुरुषाला तर परोपरीनें शिकवावें. अडचणी व अडवणुका सांगत जाव्या.आणि त्याला अगदी निःसंदेह करुन सोडावा.   
होईल तें आपण करावें । न होतां जनाकरवीं करवावें ।
भगवद्भजन राहावें । हा धर्म नव्हे ॥ १६ ॥ 
१६) लोककार्यापैकी जेवढें होईल तेवढें आपण करावें, आपल्या हातून होत नसेल, ते जनतेकडून करवून घ्यावें. पण भगवंताचे भजन मागें पडेल हा कांहीं धर्म नाही.  
आपण करावें करवावें । आपण विवरावें विवरवावें ।
आपण धरावें धरवावें । भजनमार्गासी ॥ १७ ॥
१७) आपण स्वतः करावें आणि इतरांकडून करवून घ्यावें. आपण विवेक करावा आणि इतरंकडून करवून घ्यावा. आपण भक्तिमार्ग धरावा आणि इतरांना भक्तिमार्ग धरायला लावावा. 
जुन्या लोकांचा कंटाळा आला । तरी नूतन प्रांत पाहिजे धरिला ।
जितुकें होईल तितुक्याला । आळस करुं नये ॥ १८ ॥
१८) जुन्या लोकांचा कंटाळा आला तर नविन ठिकाणी जाऊन महंती करावी. तेथें आपल्याकडून जेवढें होईल तेवढें करावें, आळस करुं नये.
देह्याचा अभ्यास बुडाला । म्हणिजे महंत बुडाला ।
लागवेगें नूतन लोकांला । शाहाणें करावें ॥ १९ ॥
१९) देहाचा अभ्यास बुडाला कीं, महंत बुडाला. म्हणून शक्य तितक्या लवकर नविन लोकांना शहाणें करावें. महंतानें आपल्या देहाला सारखा लोकसेवेमध्यें राबवला पाहिजे. तो आळसावला कीं, सर्व लोकसमुदाय आळसावतो. त्यामुळें उपासना ढिली पडते व कार्याचा नाश होतो.
उपाधींत सांपडों नये । उपाधीस कंटाळों नये ।
निसुगपण कामा नये । कोणीयेकविषीं ॥ २० ॥
२०) महंतानें उपाधींत अडकूं नये तरी उपाधीला कंटाळू नये. कोणत्याही कामाबद्दल त्यानें आळस दाखवतां कामा नये. 
काम नासणार नासतें । आपण वेडें उगें च पाहातें ।
आळसी हृदयसून्य तें । काये करुं जाणे ॥ २१ ॥
२१) आळशीपणा केल्यानें कार्याचा नाश व्हायचा तो होतोच, व वेडेपणानें हा उगीच त्याच्याकडे पहात राहतो. हृदयशून्य व आळशी असा तो त्याबाबतींत कांहीं करुं शकत नाहीं.
धकाधकीचा मामला । कैसा घडे अशक्ताला ।
नाना बुद्धि शक्ताला । म्हणोनी सिकवाव्या ॥ २२ ॥
२२) महंताचें जीवन म्हणजे धकाधकीचा व्यवहार आहे. देहानें व मनानें व वृत्तीनें जो अशक्त आहे, त्याला तो जमत नाहीं. म्हणून जो शरीरानें व मनानें बलवान आहे, त्याला नाना प्रकारच्या युक्त्या, विचार आणि कौशल्य शिकवावे.      
व्याप होईल तों राहावें । व्याप राहातां उठोन जावें ।
आनंदरुप फिरावें । कोठे तर्‍ही ॥ २३ ॥   
२३) कार्याचा व्याप आपण जोपर्यंत सांभाळू शकतो, तोपर्यंत लोकसमुदायांत राहावें. तें अशक्य झालें कीं, तेथून चालते व्हावें. मगआनंदानें कोठेतरी परिभ्रमण करीत फिरावें.   
उपाधीपासुनी सुटला । तो निस्पृहपणें बळावला ।
जिकडे अनुकूळ तिकडे चालिला । सावकास ॥ २४ ॥ 
२४) जो उपाधींतून मोकळा होतो, त्याची निःस्पृहता बळकट होते. मग त्याला ज्या ठिकाणीं अनुकूल परिस्थिती असेल तेथें तो स्वस्थपणें जाऊं शकतो.   
कीर्ति पाहातां सुख नाहीं । सुख पाहातां कीर्ति नाहीं ।
केल्याविण कांहींच नाहीं । कोठें तर्‍ही ॥ २५ ॥
२५) कीर्ति पाहिजे असेल तर सुखासीनता चलणार नाहीं. आणि सुखासीनता हवी असेल तर कीर्ति मिळणार नाहीं. माणूस कोठेंही जावो, आपण केल्यावाचून कार्य घडत नाहीं. असेंच आढळते.   
येरवीं काय राहातें । होणार तितुकें होऊन जातें ।
प्राणी मात्र अशक्त तें । पुढें आहे ॥ २६ ॥
२६) आपण केलें नाहीं तर कार्य अडून राहतें असें नाहीं. जें होणार असतें तें होऊन जाते. शक्तिहीन व बलहीन माणूसमात्र निमित्याला शोधत असतो.  
आधींच तकवा सोडिला । मधेंचि धीवसा सांडिला ।
तरी संसार हा सेवटाला । कैसा पावे ॥ २७ ॥   
२७) संसार करतांना आधींच उत्साह सोडला किंवा मधेंच धीर सुटला, तर संसार शेवटपर्यंत निभावणें कठीण आहे.    
संसार मुळींच नासका । विवेकें करावा नेटका ।
नेटका करितां फिका । होत जातो ॥ २८ ॥
२८) संसार हा मुळांतच नासका आहे. अशाश्वत आहे. विवेकाच्या सामर्थ्यानें तो व्यवस्थित करावा. असा तो व्यवस्थित केला तर त्याचा रस फिका होत जातो. त्याची आसक्ती क्षीण होत जाते.   
ऐसा याचा जिनसाना । पाहातां कळों येतें मना ।
परंतु धीर सांडावाना । कोणीयेकें ॥ २९ ॥
२९) संसाराचा मालमसाला हा असा अशाश्वत आहे. त्याचे नीट निरीक्षण केलें कीं हे समजते. पटते. हे जरी खरें असलें तरी धीर सोडूं नये. 
धीर सांडितां काये होतें । अवघें सोसावें लागतें ।
नाना बुद्धि नाना मतें । शाहाणा जाणे ॥ ३० ॥
३०) धीर सोडल्यानें कांहीं फायदा होत नाहीं. माणसाला जें सोसयचे असेल तें सोसावे लागतेच. नाना प्रकारचे विचार व नाना प्रकारची मतें शहाणा जाणतो. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विवेकलक्षणनिरुपण नाम समास दहावा ॥ 
Samas Dahava Vivek Lakshan Nirupan 
समास दहावा विवेकलक्षण निरुपण


Custom Search

No comments:

Post a Comment