Wednesday, June 13, 2018

Samas Navava Nidra Nirupan समास नववा निद्रा निरुपण


Dashak Atharava Samas Navava Nidra Nirupan 
Samas Navava Nidra Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Nidra.
समास नववा निद्रा निरुपण
श्रीराम ॥
वंदूनियां आदिपुरुष । बोलों निद्रेचा विळास ।
निद्रा आलियां सावकास । जाणार नाहीं ॥ १ ॥
१) आदिपुरुषाला वंदन करुन निद्रेचा विलास सांगतो. एकदां का झोप आली कीं, ती सहज जात नाहीं.माणसाला झोप अवावरपणें येतें.
निद्रेनें व्यापिली काया । आळस आंग मोडे जांभया ।
तेणेंकरितां बैसावया । धीर नाहीं ॥ २ ॥
२) झोपेनें शरीर व्यापलें म्हणजे सुस्ती येतें. अंग मोडून येते व जांभया येऊं लागतात. माणसाला मग बसवत नाहीं.
कडकडां जांभया येती । चटचटां चटक्या वाजती ।
डकडकां डुकल्या देती । सावकास ॥ ३ ॥
३) झोप आलेल्या माणसाला कडकडा जांभया येतात. तो चटाचट चुटक्या वाजवतो. आणि डकाडक डुलक्या खाऊं लागतो. 
येकाचे डोळे झांकती । येकाचे डोळे लागती ।
येक ते वचकोन पाहाती । चहुंकडे ॥ ४ ॥
४) झोप आली कीं, एखाद्याचे डोळे मिटतात. एखाद्याचे डोळे अर्धवट लागतात. आणि एखादा दचकून इकडेतिकडे पाहुं लागतो. 
येक उलथोन पडिले । तिहीं ब्रह्मविणे फोडिले ।
हुडकाचे टुकडे जाले । सुधी नाहीं ॥ ५ ॥
५) झोपेच्या भरांत कीर्तन ऐकायला बसलेला माणूस एकदम उताणा पडतो. तो बुवाच्या विणेवर पडल्यानें विणा फुटते किंवा हुडकी नांवाच्या वाद्यावर पदल्यानें तिचे तुकडे होतात. पण त्या माणसाला त्याची शुद्ध नसते. 
येक टेकोन बैसले । तेथेंचि घोरों लागले ।
येक उताणें पसरले । सावकास ॥ ६ ॥
६) एखादा टेकून बसलेला बसल्याबसल्याच घोरायला लागतो. एखादा हळुहळु उताणा पसरतो.  
कोणी मुर्कुंडी घालिती । कोणी कानवडें निजती ।
कोणी चक्रीं फिरती । चहुंकडे ॥ ७ ॥
७) एखादा मुर्कुडी घालून निजतो. तर एखादा कुशीवर झोपीं जातो. एखादा झोपेंमध्यें वाटोळा लोळतो.  
येक हात हालविती । येक पाये हालविती । 
येक दांत खाती । कर्कराटें ॥ ८ ॥    
८) झोपेंत एखादा हात तर एखादा पाय हलवतो. तर एखादा कराकरा दांत खातो. 
येकाचीं वस्त्रें निघोनि गेलीं । ते नागवींच लोळों लागलीं २
येकाचीं मुंडासीं गडबडलीं । चहुंकडे ॥ ९ ॥
९) एखाद्याचे कपडे जागेवर राहार नाहींत. मगतो नागवाच लोळतो. तर एखाद्याच्या डोक्याचे मुंडासे सगळीकडे पसरते. 
येक निजेलीं अव्यावेस्तें । येक दिसती जैसीं प्रेते ।
दांत पसरुनी जैसीं भूतें । वाईट दिसती ॥ १० ॥
१०) एखादा अस्ताव्यस्त पडलेला असतो. तर एखादा अगदी प्रेतासारखा दिसतो. तर एखादा दांत पसरलेल्या भुतासारखा अगदीं वाईट दिसतो.
येक वोसणतचि उठिले । येक अंधारीं फिरों लागले ।  
येक जाऊन निजेले । उकरड्यावरी ॥ ११ ॥
११) एखादा बडबडत उठतो. तर एखादा अंधारांत फिरु लागतो. तर एखादा सरळ उकिरड्यावर जाऊन निजतो. 
येक मडकीं उतरिती । येक भोई चांचपती ।
येक उठोन वाटा लागती । भलतीकडे ॥ १२ ॥
१२) एखादा शिंक्यावरची मडकी उतरवतो. तर एखादा जमीन चाचपतो. तर एखादा उठून झोपेंतच भलत्या वाटेंनें चालूं लागतो. 
येक प्राणी वोसणाती । येक फुंदफुंदों रडती ।
येक खदखदां हांसती । सावकास ॥ १३ ॥
१३) एखादा उगीच ओरडत उठतो. तर एखादा स्फूंदून रडतो. तर एखादा खदखदा हासत सुटतो.  
येक हाका मारुं लागले । येक बोंबलित उठिले ।
येक वचकोन राहिले । आपुले ठाईं ॥ १४ ॥  
१४) एखदा हांका मारतो तर एखादा शंख करीत उठतो. तर एखादा निजलेला दचकून उठून बसतो. 
येक क्षणक्षणा खुरडती । येक डोई खाजविती । 
येक कढों लागती । सावकास ॥ १५ ॥
१५) एखादा क्षणक्षणाला पायानें खुरडतो. तर एखादा डोकें खाजवतो. तर एखादा सारखा कण्हत असतो. 
येकाच्या लाळा गळाल्या । येकाच्या पिका सांडल्या ।
येकीं लघुशंका केल्या । सावकास ॥ १६ ॥
१६) एखाद्याची लाळ गळते. तर एखाद्याची पिंक तोंडांतून सांडते. तर एखाद्याला झोपेंतर लघवी होते. 
येक राउत सोडिती । येक कर्पट ढेंकर देती ।
येक खांकरुनी थुंकिती । भलतीकडे ॥ १७ ॥
१७) एखादाला वारा सरतो तर एखाद्याला करपट ढेकरा येतात. तर एखादा झोपेंतच खांकरुन भलतीकडेच थुंकतो.  
येक हागती येक वोकिती । येक खोंकिती येक सिंकिती ।
येक ते पाणी मागती । निदसुर्‍या स्वरें ॥ १८ ॥
१८) एखाद्याला झोपेंत शौचाला होते तर एखादा ओकारी करतो. एखादा खोंकतो तर एखादा शिंकतो. तर एखादा झोपेंतच झोपाळू आवाजांत पाणी मागतो.    
येक दुस्वप्नें निर्बुजले । येक सुस्वप्नें संतोषले ।
येक ते गाढमुढी पडिले । सुषुप्तिमधें ॥ १९ ॥
१९) एखादा वाईट स्वप्न बघून घाबरतो तर एखादा चांगलें स्वप्न पाहून खूष होतो. तर एखादाअगदी गाढ झोपेंत स्वस्थ पडलेला असतो. 
इकडे उजेडाया जालें । कोण्हीं पढणें आरंभिलें ।
कोणीं प्रातस्मरामि मांडिलें । हरिकीर्तन ॥ २० ॥
२०) इकडे दिवस उगवण्याची वेळ झालीकीं एखादा नित्यपाठ आरंभ करतो. तर एखादा प्रातःस्मरण करतो. आणि हरिकिर्तन सुरु करतो. 
कोणीं आठविल्या ध्यानमूर्ति । कोणी येकांतीं जप करिती ।
कोणी पाठांतर उजळिती । नाना प्रकारें ॥ २१ ॥
२१) एखादा ध्यानमूर्ति मनांत आठवतो. तर एखादा एकांतांत बसून जप करतो. तर एखादा अनेक प्रकारानें आपल्या पाठांतराची उजळणी करुं लागतो. 
नाना विद्या नाना कळा । आपलाल्या सिकती सकळा ।
तानमानें गायेनकळा । येक गाती ॥ २२ ॥
२२) प्रत्येकजण आपापल्या विद्या व कला शिकूं लागतो. एखादा तानाबीना घेऊन गायनकलेचा अभ्यास करतो. 
मागें निद्रा संपली । पुढें जागृति प्राप्त जाली ।
वेवसांई बुद्धि आपुली । प्रेरिते जाले ॥ २३ ॥
२३) रात्रीची झोप झाली मग चांगली जाग आली. प्रत्येकजण आपापल्या व्यवसायांत लक्ष घालूं लागला. 
ज्ञाता तत्वें सांडून पळाला । तुर्येपलिकडे गेला ।
आत्मनिवेदनें जाला । ब्रह्मरुप ॥ २४ ॥
२४) ज्ञानी पुरुष दृश्य असणारीं अशाश्वत तत्वें टाकून दूर सरतो, तुर्येच्यापलीकडे जातो आणि संपूर्ण आत्मनिवेदन करुन ब्रह्मरुप होतो. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे निद्रानिरुपणनाम समास नववा ॥   
Samas Navava Nidra Nirupan
समास नववा निद्रा निरुपण


Custom Search

No comments:

Post a Comment