Thursday, February 14, 2019

ShriSantoshiMata Stotra श्रीसंतोषीमाता स्तोत्र (मराठी)


ShriSantoshiMata Stotra 
SnriSantoshiMata Stotra is in Marathi. It is written by Milind-Madhav. It is a very beautiful creation.
श्रीसंतोषीमाता स्तोत्र (मराठी)
॥ ॐश्रीसंतोषीदेव्यै नमः । ॐ नमो श्रीगजवदना ॥
गणराया गौरीनंदना । विघ्नेशा भवभय हरणा ।
नमन माझे साष्टांगीं ॥ १ ॥
नंतर नमिली श्रीसरस्वती । जगन्माता भगवती ।
ब्रह्मकुमारी वीणावती । विद्यादात्री विश्र्वाची ॥ २ ॥
नमन तैसे गुरुवर्या । सुखनिधान सद्गुरुराया ।
स्मरुनि त्या पवित्र पायां । चित्तशुद्धि जाहली ॥ ३ ॥
थोर ऋषीमुनी संतजन । बुधगण आणि सज्जन ।
करुनि तयांसी नमन । स्तोत्ररचना आरंभिली ॥ ४ ॥
नमो आदिमाया आद्यशक्ति । मूळप्रकृति तूं भगवती ।
तुझी सत्ता त्रिजगतीं । सत्यसंतोषीमाते नमोऽस्तु ते ॥ ५ ॥
विश्र्वस्वरुपे वरदायिनी । सुचरित्रे ब्रह्मांडव्यापिनी ।
बालरविसम तेजस्विनी । संतोषीमाते नमोऽस्तु ते ॥ ६ ॥
सर्वकारणस्वरुपिणी । ब्रह्ममयी परब्रह्मरुपिणी ।
स्वर्ग, मृत्यु, पाताळवासिनी । संतोषीमाते नमोऽस्तु ते ॥ ७ ॥
दुःखदारिद्र्याचें निवारण । कोण करिल माते तुझ्यावीण ।
यास्तव धरितों तव चरण । संतोषीमाते नमोऽस्तु ते ॥ ८ ॥
ब्रह्मा, शंकर, नारायण । संकटी येती तुलाच शरण ।
स्थिरचर जीव थोरलहान । तुलाच नित्य वंदिती ॥ ९ ॥
जळीं, स्थळीं, काष्ठीं, पाषाणीं । अणुरेणुंत तूं अससी भरुनी ।
तूं नाहींस ऐसें त्रिभुवनीं । एकही स्थळ दिसेना ॥ १० ॥
तूं करिसी सकल उत्पत्ती । वाढ-विकास तुझिया हातीं ।
तूंच थोर विनाश-शक्ति । त्रिदशा, त्रिगुणा, त्रिरुपा ॥ ११ ॥
तूंच निर्मिले मानवदानव । कृमीकीटक सूक्ष्म जंतू जीव ।
वृक्षवनस्पती पशुपक्षी सर्व । सृष्टिरचना आगळी ॥ १२ ॥
सजीव बाहुल्या विश्र्वपटावर । मांडुनी खेळसी खेळ थोर ।    
त्या उचलुनी अवचित भराभर । प्रलय रुप दाविसी ॥ १३ ॥
गोचर आणि अगोचर । अस्थिर आणि संथ स्थीर ।
द्विभावी तूं निरंतर । लीला जगा दाविसी ॥ १४ ॥
स्थूलरुप, सूक्ष्मरुप । तिसरें ते पररुप ।
या रुपांनी आपोआप । दर्शन तुझें घडतसे ॥ १५ ॥
ज्याचेवरी तूं कृपा करिसी । त्यासी सुखसंपत्ती देसी ।
उच्चपदीं त्या नित्य बसविसी । सुयश कीर्ति देऊनी ॥ १६ ॥
सर्व शास्त्रांचें सार तूं मेधाशक्ती । अचिंत्यस्वरुपा आदिशक्ति ।
तव कृपेनें सर्व आपत्ती । नष्ट होवोत सर्वदा ॥ १७ ॥
प्रसन्न होतां तूं लक्ष्मी भगवती । रोग, संकट, भय नष्ट होती ।
खङ्ग त्रिशूळ तुझे हातीं । रक्षण करी आमुचें ॥ १८ ॥
तुझ्या शस्रानें शत्रुनाश । होतां मिळते सद्गति त्यास ।
तारिशील तूं आम्हांस । ऐसा विश्र्वास वाटतो ॥ १९ ॥
पुरुष आणि प्रकृति । यांतील प्रकृति तीच मूळशक्ती ।
कल्पारंभी आणि कल्पांतीं । अस्तित्व तुझें देवते ॥ २० ॥
तुझी बिरुदावली मोठी । तुझी कीर्ति नाहीं खोटी ।
अगतिक होऊनी शेवटीं । मिठी पायीं घातली ॥ २१ ॥
लक्ष्मीचा तूं अंशावतार । गणेशकन्या तूं देवी थोर ।
तुझें रुप दिव्य मनोहर । नजरेसमोर आणिलें ॥ २२ ॥
मस्तकीं शोभे दिव्य मुगुट । चंद्रकोरीचा त्यांत लखलखाट ।
कुंडलें भूषणें आयुधें अचाट । अभय हस्त शोभतो ॥ २३ ॥
नवखंड पृथ्वीचें आसन । एकवीस स्वर्गांचें विशाल वसन ।
सप्तपाताळीं पोचले चरण । ध्यान तुझें हें कल्पिलें ॥ २४ ॥
आकाशगंगेचें घालुनि स्नान । भालीं सूर्यबिंबाचा तिलक लावून ।
ग्रहनक्षत्रांचीं पुष्पें अर्पून । पिंडब्रह्मांडनैवेद्य अर्पिला ॥ २५ ॥
चंद्रज्योत्स्नेची दिव्य आरती । ओवाळिली मी तुजपुढती ।
करुनी मानसपूजा अंती । मागणें आतां मागतों ॥ २६ ॥
श्री संतोषीमाते देवी । सदैव मजवरी कृपा असावी । 
कुटुंबियांना सुखी ठेवी । आयुरारोग्य लाभावें ॥ २७ ॥
चिंता, दारिद्र्य आणि क्लेश । यांचा करी समूळनाश ।
शत्रुपीडा आणि बहिर्वास । दूर करी गे माते तूं ॥ २८ ॥
घरीं दारीं देशीं परदेशीं । जाईन मी ज्या ज्या स्थळासी ।
तूं असावीस माझ्या पाठीशीं । रक्षण माझें कराया ॥ २९ ॥
यश मिळावें विद्येंत । उन्नति व्हावी धंद्यांत ।
पापविचार न येवो मनांत । निर्मल चित्त ठेवावें ॥ ३० ॥
मी आहे तुझें लेकरुं । नको माझा अव्हेर करुं ।
तुझ्यावीण कोणा हांक मारु । माते धाव पाव गे ॥ ३१ ॥
घरांत नांदो सुखशांती । संतति-संपत्तीची होवो प्राप्ती ।
जगांत होवो सत्कीर्ती । धन्य धन्य म्हणोनी ॥ ३३ ॥
अग्नि, वायु, इंद्र, वरुण । सर्व दैवतें तुझ्या आधिन ।
तव आज्ञेचें करिती पालन । सर्वश्रेष्ठ देवी तूं ॥ ३४ ॥
वंदिती तुला देवदेवता । सर्वमान्य आहे तुझी श्रेष्ठता ।
तुलाच आता माझी चिंता । योगक्षेम सुखें चालवी ॥ ३५॥
निर्विघ्न होवो ऐहिक जीवन । तुझ्या कृपेचे कवच घालून ।
रात्रंदिन करी माझें संरक्षण । परपीडे-ग्रहपीडेपासुनी ॥ ३६ ॥
मनीं असावें तुझेंच चिंतन । मुखी असावें नामोच्चारण ।
अंतीं लाभो सद्गतिघन । हीच माझी प्रार्थना ॥ ३७ ॥
हें स्तोत्र म्हणतां सकाळीं । कायिक पापें सर्व जाळी ।
वाचिक पापांची होते होळी । म्हणतां माध्याह्नकाळीं हें ॥ ३८ ॥
स्तोत्र म्हणतां निद्रासमयीं । विशेष होतें हें फलदायीं ।
मानसिक पापें सकलही । नष्ट होती समूळ ॥ ३९ ॥
असो, शक अठराशें अठ्याण्णव वर्षीं । ज्येष्ठमासी शुक्ल पक्षी ।
शुक्रवार वटपौर्णीमे दिवशीं । स्तोत्र पूर्ण झालें हें ॥ ४० ॥
इति मिळिंदमाधव विरचितं श्रीसंतोषीमाता स्तोत्रम् संपूर्णम् ॥
सत्यसंतोषीमातार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
ॐ शांति शांति शांतिः ॥
ShriSantoshiMata Stotra 
श्रीसंतोषीमाता स्तोत्र (मराठी)


Custom Search

No comments:

Post a Comment