Tuesday, June 11, 2019

ShriShivaLilamrut Adhyay 8 श्रीशिवलीलामृत अध्याय आठवा


ShriShivaLilamrut Adhyay 8 
ShriShivLilaMrut Adhyay 8 is in Marathi. It is from Skandha Purana, Brahmottar Khanda which is in Sanskrit. This Adhayay is very pious and tells us about King Bhadrayu and his mother Sumati and of ShivaYogi and his blessings. Bhadrayu’s father Virabhau was attacked by the enemies. Bhadru fought with them and freed King Virabhau. This story goes on and then God Shiva tested Bhadrayu for his Shiva bhakti.
ShriShivaLilamrut Adhyay  8 श्रीशिवलीलामृत अध्याय आठवा 


Custom Search


श्रीशिवलीलामृत अध्याय आठवा
श्रीशिवलीलामृत अध्याय आठवा 
श्रीगणेशाय नमः ।
जय जय शिव ब्रह्मानंदमूर्ती । वेदवंद्य तूं भोळाचक्रवर्ती ।
शिवयोगिरुपें भद्रायुप्रती । अगाध नीती प्रगटविली ॥ १ ॥
तुझिया बळें विश्र्वव्यापका । सूत सांगे शौनकादिकां ।
भद्रायुसी शिवकवच देखा । श्रीगुरुनें शिकविलें ॥ २ ॥
मृत्युंजयमंत्र उत्तम । सर्वांगीं चर्चिलें भस्म ।
रुद्राक्षधारण सप्रेम । करी भद्रायुबाळ तो ॥ ३ ॥
एक शंख उत्तम देत । ज्याच्या नादें शत्रु होती मूर्छित ।
खङ्ग दिधलें अद्भुत । त्रिभुवनांत ऐसे नाहीं कीं ॥ ४ ॥
तें शस्त्र शत्रूतें दावितां नग्न । जाती एकदांच भस्म होऊन ।
द्वादश सहस्त्रइभबळ गहन । तत्काळ दिधलें कृपेनें ॥ ५ ॥
देणें शिवाचे अद्भुत । म्हणे होईं ऐश्र्वर्यवंत ।
आयुरारोग्य विख्यात । सर्व रायांत श्रेष्ठ तूं ॥ ६ ॥
चिरकाल विजयी होऊनी । संतोषरुपें पाळीं मेदिनी ।
निष्कामदानेंकरुनी । माजेल त्रिभुवनीं कीर्तिघोष ॥ ७ ॥
भाग्यलक्ष्मी असो तव सदनीं । भूतकारुण्यलक्ष्मी ह्रदयभवनीं ।
दानलक्ष्मी येवोनी । करकमळीं राहो सदा ॥ ८ ॥
सर्वांगीं असो लक्ष्मीसौम्य । दोर्दंडीं वीरलक्ष्मी उत्तम ।
दिगंतरीं कीर्ति परम । सर्वदाही वसो तुझी ॥ ९ ॥
शत्रुलक्ष्मी खङ्गग्री वसो । साम्राज्यलक्ष्मी सदा असो ।
विद्यालक्ष्मी विलसो । सर्वदाही तुजपाशीं ॥ १० ॥
ऐसें शिवयोगी बोलोन । तेथेंचि पावला अंर्तधान ।
भद्रायु सुमती गुरुचरण । सर्वदाही न विसंबती ॥ ११ ॥
इकडे भद्रायुचा पिता निरुती । दशार्णदेशींचा नृपती ।
वज्रबाहु महामती । शत्रु त्यावरी पातले ॥ १२ ॥
मगधदेशाधिपती हेमरथ । तेणें देश नागविला समस्त ।
धनधान्य हरुनि नेत । सर्व करीत गोहरण ॥ १३ ॥
स्त्रिया पुरुष धरोनि समस्त । बळें नेऊन बंदीं घालीत ।
मुख्य राजग्राम वेष्टित । बाहेर निघत वज्रबाहू ॥ १४ ॥
युद्ध झालें दशदिनपर्यंत । हा एकला शत्रु बहुत ।
त्यासी धरोनियां जित । रथीं बांधिती आकर्षोनी ॥ १५ ॥
वज्रबाहुचे अमात्य धरोन । तेही चालविले बांधोन । 
सर्व ग्राम प्रजा लुटून । राजस्त्रिया धरियेल्या ॥ १६ ॥
ऐसें हरोनि समस्त । घेवोनि चालिला हेमरथ ।
वज्रबाहु सचिवांसहित । मागें पुढें पाहतसे ॥ १७ ॥
पुत्र ना बंधु आम्हांस । कोण कैवारी या समयास ।
आम्हीं पहावी कवणाची आस । सोडवील कोण दुःखार्णवीं ॥ १८ ॥
तो समाचार कळला भद्रायुसी । कीं शत्रु नेती पितयासी ।
गुरुस्मरण करुनि मानसीं । अंगीं कवच लेईलें ॥ १९ ॥
मृत्युंजयमंत्र परम । सर्वांगीं चर्चिलें भस्म ।
शंख खङ्ग घेऊनि उत्तम । मातेलागीं नमस्कारीं ॥ २० ॥
म्हणे माते शत्रु बहुत । ग्राम हरुनि पितयास नेत । 
तरी मी गुरुदास तुझा सुत । संहारीन समस्तांतें ॥ २१ ॥
माते तुझ्या सुकृतेंकरुन । कृतांत समरीं करीन चूर्ण ।
पृथ्वीचे राजे जितचि धरुन । आणीन तुझिया दर्शना ॥ २२ ॥
निर्दोष यशाचा ध्वज । उभवीन आज तेजःपुंज ।
शरत्काळींचा द्विजराज । सोज्वळ जैसा शोभत ॥ २३ ॥
पद्माकर पुत्र सुनय वीर । सवें घेतला सत्वर । 
सर्पाचा माग काढी विनतापुत्र । तैसे दोघे धांवती ॥ २४ ॥
इभ आहे कोणते कांतारीं । शोधीत धांवती दोघे केसरी ।
कीं जनकजेचे कैवारी । लहु कुश पुत्र जैसे ॥ २५ ॥
पायीं क्रमिती भूमी सत्वर । शोभती धाकुटे वये किशोर ।
जवळीं देखोनि शत्रूंचे भार । सिंहनादें गर्जिन्नले ॥ २६ ॥
म्हणती उभे रहा रे तस्कर समस्त । वज्रबाहूऐसी दिव्य वस्त ।
चोरोनि नेता त्वरित । शिक्षा लावूं तुम्हांतें ॥ २७ ॥
तस्करांसी हेचि शिक्षा जाण । छेदावे कर्ण नासिक कर चरण ।
एवढा अन्याय करुन । कैसें वांचून जाल तुम्ही ॥ २८ ॥
अवघे माघारे जव पाहती । तंव दोघे किशोर धांवती। 
म्हणती एक रमापती एक उमापती । येती निजभक्तकैवारें ॥ २९ ॥
एक मृगांक एक मित्र । वसिष्ठ एक विश्र्वामित्र ।
एक वासुकी एक भोगींद्र । तेवीं दोघे भासती ॥ ३० ॥
असंख्यात सोडिती बाण । जैशा धारा वर्षे घन ।
वीर खिळिले संपूर्ण । मयूराऐसे दीसती ॥ ३१ ॥
परतले शत्रूंचे भार । वर्षती शस्त्रारें समग्र ।
वाद्यें वाजती भयंकर । तेणें दिशा व्यापिल्या ॥ ३२ ॥
तों जलज वाजविला अद्भुत । धाकें उर्वी डळमळित ।
पाताळीं फणिनाथ । सांवरीत कुंभिनीतें ॥ ३३ ॥
दिशा कोंदल्या समस्त । दिग्गज थरथरां कांपत ।
शत्रु पडिले मूर्च्छित । रितें रथ धांवती ॥ ३४ ॥
त्यातील दिव्य रथ घेवोनि दोनी । दोघे आरुढले तेचि क्षणीं ।
चापी बाण लावूनी । सोडितीप्रलयविद्युद्वत ॥ ३५ ॥
वज्रबाहूचे वीर बहुत । भारासमवेत गजरथ । 
भद्रायुभोंवते मिळत । कैवारी आपला म्हणवूनी ॥ ३६ ॥
वाद्यें वाजवूनियां दळ । भद्रायुभोंवते मिळाले सकळ ।
म्हणती हा कैवारी या वेळ ।आला न कळे कोठोनी ॥ ३७ ॥
पाठिराखा देखोनि समर्थ । वीरांस बळ चढलें अद्भुत ।
हेमरथाची सेना बहुत । संहारिली ते काळीं ॥ ३८ ॥
वज्रबाहुसहित प्रधान । रथीं बांधिले पाहती दुरुन ।
म्हणती त्रिपुरारि मुरारि दोघेजण । किशोरवेषें पातले ॥ ३९ ॥         
एका गुरुनें शिकविलें पूर्ण । दिसे दोघांची विद्या समान ।           
त्यांत मुख्य राजनंदन । देखोनि स्नेह वाटतो ॥ ४० ॥
कोण आहेत न कळे सत्य । मज वाटती परम आप्त ।
हृदयीं धरुनि यथार्थ । द्यावें चुंबन आवडीनें ॥ ४१ ॥
मांडिलें घोरांदर रण । रक्तपूर चालिले जाण ।
वज्रबाहु दुरुन । प्रधानासहित पाहतसे ॥ ४२ ॥
अनिवार भद्रयुचा मार । शत्रु केले तेव्हां जर्जर ।
समतबहूमी माजली थोर । बाणें अंबर कोंदलें ॥ ४३ ॥
ऐसें देखोनि हेमरथ । लोटला तेव्हां कृतांतवत ।
दोघांसी युद्ध अद्भुत । चार घटिका जाहलें ॥ ४४ ॥ 
शत्रू थरथरां कांपत । म्हणती भीम कीं हनुमंत ।
किंवा आला रेवतीनाथ । मुसळ नांगर घेऊनी ॥ ४५ ॥
शत्रूचा देखोनी उत्कर्ष बहुत । भद्रायुनें शिवयोगीदत्त ।
खङ्ग काढिलें तेज अद्भुत । सहस्त्रमार्तंडांसमान ॥ ४६ ॥
काळाग्नीची जिव्हा कराळ । कीं प्रळयविजांचा मेळ ।
कीं काळसर्पाची गरळ । तेवीं खङ्ग झळकतसे ॥ ४७ ॥
तें शस्त्र झळकतां तेजाळ । मागधदळ भस्म झालें सकळ ।
मागें होता हेमरथ तत्काळ । समाचार श्रुत जाहला ॥ ४८ ॥
कीं काळशस्त्र घेतां हातीं । देखतांचि दळ संहारिती ।
मग पळूं लागला पवनगती । उरल्या दळासमवेत ॥ ४९ ॥
प्रधानांसह वज्रबाहुसी टाकून । पळती शत्रु घेतलें रान ।
तें भद्रायुनें देखोन । धरिला धांवून हेमरथ ॥ ५० ॥
धरिला तो दृढ केशीं । ओढूनि पाडिला भूमीसी ।
लत्ताप्रहार देतां हृदयदेशीं । अशुद्ध ओकीत भडभडां ॥ ५१ ॥
रथीं बांधिला आकर्षून  । मंत्रिप्रधानास हित जाण ।
क्षुरमुखशर घेऊन । पांच पाट काढिले ॥ ५२ ॥
अर्धखाड अर्धमिशी भादरुन । माघारें चालवी संपूर्ण ।
राजस्त्रिया अपार कोष धन । घेत हिरोन तेधवां ॥ ५३ ॥
देश नागविला होता सकळ । वस्तुमात्र आणविल्या तत्काळ ।
गोमार परतविला सकळ । जेथींचा तेथें स्थापिला ॥ ५४ ॥
अमात्यासमवेत पिता । सोडवूनि पायीं ठेविला माथा ।
वज्रबाहु होय बोलता । त्याजकडे पाहुनी ॥ ५५ ॥
नयनीं लोटल्या अश्रुधारा । तूं कोण आहेस सांग कुमारा ।
मज अपयशसमुद्रांतूनि त्वरा । काढिलें उडी घालूनी ॥ ५६ ॥
जळतां शत्रुदावाग्नींत । वर्षलासी जलद अद्भुत ।
मज वाटे तूं कैलासनाथ । बाळवेषें आलासी ॥ ५७ ॥
कीं वाटे वैकुंठनायकें । रुपें धरिलीं बाळकांचीं कौतुकें ।
कीं सहस्त्राक्षें येणें एकें । केलें धांवणें वाटतसे ॥ ५८ ॥
सकळ राजस्त्रिया धांवोन । उतरिती मुखावरुनि निंबलोण ।
म्हणती बाळा तुजवरुन । जाऊं ओवाळून सर्वही ॥ ५९ ॥
भद्रायु म्हणे नगरांत । चला शत्रु घेवोनि समस्त ।
बंदीं घालूनि रक्षा बहुत । परम यत्नें करोनियां ॥ ६० ॥
नगरांत पिता नेऊनि । बैसविला दिव्य सिंहासनीं ।
जयवाद्यांचा ध्वनी । अपार वाजों लागला ॥ ६१ ॥
नगर श्रृगांरिलें एकसरा । रथीं भरुनि वांटती शर्करा ।
नगरजन धांवती त्वरा । वज्रबाहुसी भेटावया ॥ ६२ ॥
वज्रबाहु म्हणे सद्गद होऊन । जेणें मज सोडविलें धांवून । 
त्या कैवारियाचे चरण । धरा जाऊन ये वेळां ॥ ६३ ॥
भद्रायु म्हणे पितयालागुन । शत्रुस करा बहुत जतन ।
तीन दिवसां मी येईन । परतोनि जाणा तुम्हांपासीं ॥ ६४ ॥
मी आहे कोणाचा कोण । कळेल सकळ वर्तमान । 
ऐसें बोलोनि दोघेजण । रथारुढ पैं झाले ॥ ६५ ॥
मनोवेगेंकरुन । येऊन वंदिले मातेचे चरण ।
मग तिणें करुनि निंबलोण । सुखावे पूर्ण पद्माकर ॥ ६६ ॥
असो यावरी शिवयोगी दयाघन । चित्रांगदसिमंतिनीसी भेटोन ।
जन्मादारभ्य वर्तमान । त्यांसी सांगे भद्रायुचें ॥ ६७॥
पिता सोडवूनि पुरुषार्थ । केला तो ऐकिलीं कीं समस्त ।
तरी तो तुम्ही करावा जामात । कीर्तिमालिनी देऊनियां ॥ ६८ ॥
ऐकतां ऐसा मधुर शब्द । सीमंतिनी आणि चित्रांगद ।
दृढ धरिती चरणारविंद । पूजिती मग षोडशोपचारें ॥ ६९ ॥
म्हणती तुझें वचन प्रमाण । वर आणावा आतांचि आहे लग्न ।
मग दळभार वाहनें पाठवून । दिधली वैश्यनगराप्रती ॥ ७० ॥
सुनयपुत्रासहित समग्र । नाना संपत्ति घेऊन अपार ।
लग्नासी चालिला पद्माकर । वाद्यें अपार वाजती ॥ ७१ ॥
भद्रायु बैसला सुखासनीं । तैसीच माता शिबिकायानीं ।
चित्रांगद सामोरा येवोनी । घेवोनि गेला मिरवीत ॥ ७२ ॥
वर पाहूनि जन तटस्थ । म्हणती कायसा यापुढें रतिनाथ ।
पृथ्वीचे राजे समस्त । आणविले लग्नासी ॥ ७३ ॥
त्यांत वज्रबाहु सहपरिवारें । लग्नालागीं पातला त्वरें ।
वराकडे पाहे सादरें । तंव तो कैवारी ओळखिला ॥ ७४ ॥
पाय त्याचे धरावया धांविन्नला । भद्रायुनें वरच्यावरी धरिला ।
आलिंगन देतां वेळोवेळां । कंठ दाटले उभयतांचे ॥ ७५ ॥
नयनीं चालिल्या विमलांबुधारा । अभिषेक करिती येरयेरां ।
मग वज्रबाहु पुसे वरा । देश तुझा कवण सांग ॥ ७६ ॥
फेडी संशय तत्त्वतां  । सांग कवण माता पिता ।
गोत्र ग्राम गुरु आतां । सर्व सांग मजप्रती ॥ ७७ ॥
चित्रांवदें एकांतीं नेऊन  । सांगितलें साद्यंत वर्तमान ।
हा शिवयोगियाचा महिमा पूर्ण  । उपासना शिवाची ॥ ७८ ॥
अनंत पुण्य कोट्यानुकोटी । तैं शिवयोगियाची होय भेटी ।
तो साक्षात धूर्जटी । त्याचें चरित्र जाण हें ॥ ७९ ॥
मग ते सुमती पट्टराणी । भेटविली एकांतीं नेऊनी ।
वज्रबाहु खालतें पाहूनी । रुदन करी तेधवां ॥ ८० ॥
म्हणे ऐसीं निधानें वरिष्ठें । म्यां घोर वनीं टाकिलीं नष्टें ।
मजएवढा अन्यायी कोठें । पृथ्वी शोधितां नसेल ॥ ८१ ॥
सुमती मागील दुःख अद्भुत । आठवूनि रडे सद्गदित ।
म्हणे शिवयोगी गुरुनाथ । तेणें कृतार्थ केलें आम्हां ॥ ८२ ॥
मग सीमंतिनी चित्रांगद । उभयतांचा करुनि ऐेक्यवाद ।
वज्रबाहु बोले सद्गद । धन्य सुमती राणी तूं ॥ ८३ ॥
बिंदूचा सिंधु करुन । मज त्वां दाविला आणोन ।
संर्षप कनकाद्रीहून । श्रेष्ठ केला गुणसरिते ॥ ८४ ॥
त्वां माझा केला उद्धार । मज अभाग्यासी कैंचा पुत्र ।
हें राज्य तुझेंचि समग्र । सुतासहित त्वां दिधलें ॥ ८५ ॥
ऐसें बोलोनि त्वरित । वज्रबाहु बाहेर येत ।
भद्रायु धांवोनि सद्गदित । साष्टांगें नमित पितयातें ॥ ८६ ॥
वज्रबाहु देत आलिंगन । जेवीं भेटती शिव आणि षडानन ।
कीं वाचस्पति आणि कचनिधान । संजीवनी साधितां आलिंगी ॥ ८७ ॥
मस्तक अवघ्राणूनि झडकरी । सप्रेम बैसविला अंकावरी । 
कार्तिमालिनी स्नुषा सुंदरी । दक्षिणांकीं बैसविली ॥ ८८ ॥
तंव राजे समस्त आश्र्चर्य करिती । धन्य वज्रबाहु नृपती ।
मग पद्माकर सुनय यांप्रती । भद्रायु भेटवी पितयातें ॥ ८९ ॥
गगनीं न समायें ब्रह्मानंद । ऐसा झाला सकळां मोद ।
मग चारी दिवस सानंद । यथासांग लग्न झालें ॥ ९० ॥
आंदण दिधलें अपार । दोन लक्ष वाजी अयुत कुंजर । 
दास दासी भांडार । भरुनि द्रव्य दिधलें ॥ ९१ ॥
सवें घेऊनि कीर्तिमालिनी । पद्माकरसहित जनलजननी ।
निजनगरा तेंचि क्षणीं । जाते झालें तेधवां ॥ ९२ ॥
गगनगर्भीं न समाये हरिख । ऐसें मातापितयांसी झालें सुख ।
पट्टराणी सुमती देख । केलें आधीन सर्व तिच्या ॥ ९३ ॥
मग सकळ शत्रु सोडोन । प्रतिवर्षीं करभार नेमून ।
करुनि आपणाआधीन । जीवदान दीधलें तया ॥ ९४ ॥
भद्रायु ऐसा पुत्र प्राप्त । होय असल्या पुण्य बहुत ।
तरी जन्मोजन्मीं हिमनगजामात । पूजिला असेल प्रेमभरें ॥ ९५ ॥
स्त्री पतिव्रता चतुर सुंदर । पुत्र पंडित सभाग्य पवित्र ।
गुरु सर्वज्ञ उदार थोर । पूर्वदत्तें प्राप्त होय ॥ ९६ ॥
मग त्या भद्रायुवरी छत्र । वज्रबाहु उभवूनि सत्वर ।
स्त्री सुमतीसहित तप अपार । हिमकेदारीं करिता झाला ॥ ९७ ॥
करितां शिवआराधन । त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचें पूजन ।
मागें भद्रायु बहुत दिन । राज्य करीत पृथ्वीचें ॥ ९८ ॥
शिवकवच भस्म धारण । रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण ।
धन्य गुरु शिवयोगी सुजाण । शिष्य भद्रायु धन्य तो ॥ ९९ ॥
असो भद्रायु नृपनाथ । कीर्तिमालिनीसमवेत । 
चालिला वनविहारार्थ । अवलोकीत वनश्रियेतें ॥ १०० ॥
छाया सघन शीतळ । पाट वाहती मन निर्मळ ।
तेथें बैसतां सूर्यमंडळ । वरी कदापि दिसेना ॥ १०१ ॥
नारळी केळी पोफळी रातांजन । मलयागर सुवास चंदन ।
अशोकवृक्ष खर्जुरी सघन । आंबे जांभळी खिरणिया ॥ १०२ ॥
वट पिंपळ कडवे निंब । डाळिंब सेवरी मंदार कदंब ।
अंजीर औदुंबर पारिभद्र नभ । भेदीत गेले गगनमार्गे ॥ १०३ ॥
चंपक मोगरे जाई जुई । मालती शेवंती बकुळ ठायीं ठायीं ।
शतपत्र जपा अगस्तिवृक्ष पाहीं । वेष्टोनि वरी चालिले ॥ १०४ ॥
कनकवेली नागवेली परिकर । पोंवळवेली नाना लता सुवासकर ।
द्राक्षद्वीप द्राक्षतरु सुंदर । जायफळी डोलती फळभारें ॥ १०५ ॥
बदकें चातक मयुर । कस्तुरीमृग जवादी मार्जार ।
चक्रवाक नकुळ मराळ परिकर । सरोवरतीरीं क्रीडती ॥ १०६ ॥
असो तया वनांत । कीर्तिमालिनीसमवेत ।
क्रीडत असतां अकस्मात । एक अपूर्व वर्तलें ॥ १०७ ॥
दूरवरी भद्रायु विलोकीत । तों स्त्री पुरुष येती धांवत ।
ऊर्ध्व करोनि हस्त । दीर्घस्वरें बोभाती ॥ १०८ ॥
पाठीं लागला महाव्याघ्र । आक्रोशें बोभात विप्र ।
म्हणे नृपा स्त्री पतिव्रता थोर । मागें सुकुमार राहिली ॥ १०९ ॥
गजबजोनि धांविन्नला नृप । शर लावूनि ओढिलें चाप ।
तंव तो व्याघ्र काळरुप । स्त्रियेसी नेत धरुनियां ॥ ११० ॥
रायें शर सोडिले बहुत । परी तो न गणी तैसाचि जात ।
विजूऐसे शर अद्भुत । अंगीं भेदले तयाच्या ॥ १११ ॥
गिरिकंदरें ओलांडून । व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन ।
विप्र रायापुढें येऊन । शोक करी आक्रोशें ॥ ११२ ॥
अहा ललने तुजविण । गृह वाटतें महाअरण्य ।
रायास म्हणे ब्राह्मण । धिक् क्षत्रियपण धिक् जिणें ॥ ११३ ॥
तुज देखतां सत्य । माझ्या स्त्रीनें केला आकांत ।
अहा कांत पडलें व्याघ्रमुखांत । सोडवी मज यापासूनी ॥ ११४ ॥
तुजही हांका फोडिल्या बहुत । धांव धांव हे जगतीनाथ । 
धिक् तुझी शस्त्रें समस्त । खङ्ग व्यर्थ गुरुनें दीधलें ॥ ११५ ॥
द्वादश सहस्र नागांचे बळ । धिक् मंत्र अस्त्रजाळ । 
क्षतापासोनि सोडवी तत्काळ । शरणागता रक्षी तोचि पार्थिव ॥ ११६ ॥
धिक् आश्रम धिक् ग्राम । जेथें नाहीं सत्समागम ।
धिक श्रोता धिक् वक्ता । सप्रेम नाहीं कीर्तन शिवाचें ॥ ११७ ॥
धिक् संपत्ति धिक् संतती । द्विज न रक्षी न भजे उमापती ।
ते धिक् नारी पापमती । पतिव्रता जे नव्हे ॥ ११८ ॥
मातापितयांसीं शिणवीत । धिक् पुत्र वाचला व्यर्थ ।
धिक् शिष्य जो गुरुभक्त । नव्हेचि मतवादी पैं ॥ ११९ ॥
गुरुची झांकोनि पदवी । आपुला महिमा विशेष मिरवी ।
धिक् पार्थिव जो न सोडवी । संकटीं प्राण गेलिया ॥ १२० ॥
भद्रायु बोले उद्विग्न । मी तुज इच्छिलें देईन । 
करी पुढती उत्तम लग्न । अथवा राज्य दान घे माझे ॥ १२१ ॥
विप्र म्हणे कासया लग्न । स्रीहीनास कासया धन ।
जन्मांधासी दर्पण । व्यर्थ काय दाऊनी ॥ १२२ ॥
मूढासी कासया उत्तम ग्रंथ । तरुणासी संन्यास देणें हें अनुचित ।
जरेनें कवळिला अत्यंत । त्याचें लग्न व्यर्थ जैसें ॥ १२३ ॥
तृषाक्रांतासी पाजिलें घृत । क्षुधातुरासी माळा गंधाक्षता ।
चिंतातुरापुढें व्यर्थ । गायन नृत्य कासया ॥ १२४ ॥
यालागीं नलगे तुझें राज्य धन । दे माझी स्री आणोन ।
राव म्हणे जा कीर्तिमालिनी घेवोन । दिधली म्यां तुजप्रती ॥ १२५ ॥
रायाचें सत्त्व पाहे ब्राह्मण । म्हणे दे कीर्तिमालिनी मज दान ।
माझें तप मेरुपर्वताहून । उंच असे न सरे कधीं ॥ १२६ ॥
मी पापासी भीत नाहीं जाण । अंगिकारिलें तुझें स्रीरत्न ।
सागरी ढेंकुळ पडलें येऊन । तरी सागर काय डहुळेल ॥ १२७ ॥
धुळीनें न मळे आकाश । तैसा मी सदा निर्दोष ।
राव म्हणे हें अपयश । थोर आलें मजवरी ॥ १२८ ॥
माझें बळ गेलें तेच क्षणा । व्याघ्रें नेली विप्रललना ।
आतां स्री देवोनि ब्राह्मणा । अग्निकाष्ठें भक्षीन मी ॥ १२९ ॥
विप्रापुढें संकल्प करुनी । दान दिधली कीर्तिमालिनी । 
विप्र गुप्त झाला तेचि क्षणीं । रायें अग्नि चेतविला ॥ १३० ॥
ज्वाळा चालिल्या आकाशपंथें । मग स्नान केलें नृपनाथें ।
भस्म चर्चिलें सर्वांगातें । रुद्राक्षधारण पैं केलें ॥ १३१ ॥
आठवूनि गुरुचरण । शिवमंत्र शिवध्यान ।
प्रदक्षिणा करुनि तीन । अग्निकुंडाभोवत्या ॥ १३२ ॥
जय जय शंकर उमारंगा । मदनांतका भक्तभवभंगा ।
विश्र्वव्यापका आराध्यलिंगा । नेई वेगें तुजपाशीं ॥ १३३ ॥
उडी टाकों जाता ते वेळीं । असंभाव्य चेतला ज्वाळामाळी ।
तंव त्यामधून कपालमौली । अपर्णेसहित प्रकटला ॥ १३४ ॥
दशभुज पंचवदन । कर्पूरगौर पंचदशनयन ।
पंचविंशतितत्त्वांहून । पंचभूतांवेगळा जो ॥ १३५ ॥
भद्रायुस हृदयीं धरुनि सत्वर । म्हणे सखया इच्छित माग वर ।
तुझी भक्ति निर्वाण थोर । देखोनि प्रकट झालों मी ॥ १३६ ॥
भद्रायु बोले सद्गदित । म्हणे विप्रस्री आणून दे त्वरित ।
तैं ऐकोनि हांसिन्नला गजमुखतात । विप्र तो मीच झालों होतों ॥ १३७ ॥
व्याघ्रही मीच होऊन । गेलों भवानीस घेऊन ।
तुझी भक्ति पहावया निर्वाण । दोघेंही आम्ही प्रगटलो ॥ १३८ ॥ 
तुझी हे घे कीर्तिमालिनी । म्हणोनि उभी केली तेचि क्षणीं ।  
देव सुमनें वर्षती गगनीं । राव चरणीं लागतसे ॥ १३९ ॥
शिव म्हणे रे गुणवंता । अपेक्षित वर मागें आतां ।
येरु म्हणे वज्रबाहु पिता । सुमती माता महासती ॥ १४० ॥
पद्माकर गुणवंत । कैलासीं न्यावा स्रीसमवेत ।
इतुक्यांसी ठाव यथार्थ । तुजसमीप देईंजे ॥ १४१ ॥
तुझिया पार्श्र्वभागीं सकळ । असोत स्वामी अक्षयीं अढळ ।
यावरी बोले पयःफेनधवल । कीर्तिमालिनी तूं माग आतां ॥ १४२ ॥
ती म्हणे माता सीमंतिनी । पिता चित्रांगद पुण्यखाणी ।
तुजसमीप राहोत अनुदिनीं । शूळपाणी तथास्तु म्हणे ॥ १४३ ॥
तुम्हीं उभयतांनीं मागितलें । तें म्यां सर्व दिधलें ।
माझें चित्त गुंतलें । तुम्हांपासीं सर्वदा ॥ १४४ ॥
मग कीर्तिमालिनीसमवेत । दहा सहस्रवर्षेंपर्यंत ।
भद्रायु राजा राज्य करीत । हरिश्र्चंद्रासारिखें ॥ १४५ ॥
मग त्यावरी सकळी । दिव्यदेह अवघीं झालीं ।
दिव्य विमानी कपालमौली । नेता झाला सन्निध ॥ १४६ ॥
चित्रांगद सीमंतिनी । वज्रबाहु सुमती राणी ।
अवघीं विमानारुढ होवोनी । पावलीं शिवपद शाश्र्वत ॥ १४७ ॥
स्रीपुत्रांसमवेत पद्माकर । भद्रायु कीर्तिमालिनी सुकुमार ।
त्यासी विमान धाडूनि श्रीशंकर । आपुल्या स्वरुपीं मेळविलें ॥ १४८ ॥
हे भद्रायु आख्यान । परम यशदायक आयुष्यवर्धन ।
ऐकतां लिहितां जाण । विजय कल्याण सर्वदा ॥ १४९ ॥
हें आख्यान जें म्हणत । ते सर्वदा वादीं जयवंत ।
विजय धैर्य अत्यंत । कीर्तिवंत सर्वांठायीं ॥ १५० ॥
भद्रायुआख्यान पुण्य आगळें । पदरचना हीं बिल्वदळें ।
उमावल्लभ वाहती भावबळें । ते तरती संसारीं ॥ १५१ ॥
भद्रायु आक्यान कैलासगिरी । जो कां पारायण प्रदक्षिणा करी । 
त्याचा बंध तोडोनि मदनारी । निष्पाप करी सर्वदा ॥ १५२ ॥
ब्रह्मानंदा सुखदायका । श्रीधरवरदा कैलासनायका ।
भक्तकामकल्पद्रुमा गजांतका । न येसी तर्का निगमागमा ॥ १५३ ॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत श्रोते अखंड । अष्टमाध्याय  गोड हा ॥ १५४ ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
ShriShivaLilamrut Adhyay  8 
श्रीशिवलीलामृत अध्याय आठवा 


Custom Search

No comments:

Post a Comment