Friday, February 14, 2020

Kahani Hartalikechi कहाणी हरतालिकेची


Kahani Hartalikechi  
is in Marathi. It is told to Goddess Devi by God Shuva.Ladies perform this Vrata in BhadraPada Masa to get a good husband.
कहाणी हरतालिकेची
एके दिवशी शंकर-पार्वती कैलासपर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकरांना विचारले की, महाराज सर्व व्रतात चांगल व्रत कोणते ? ज्यात श्रम थोडे व फळ पुष्कळ उत्तम मिळते ? तसे व्रत असेल तर मला सांगा.  तसेच मी कोणत्या पुण्याईने आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हां शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहांत सूर्य श्रेष्ठ, चार वर्णांत ब्राह्मण श्रेष्ठ, देवांत विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्व व्रतांत श्रेष्ठ व्रत आहे.
ते तुला सांगतो. तेच व्रत तू पूर्व जन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याईने तू मला प्राप्त झालीस. ते व्रत ऐक.
हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे. ते पूर्वी तू कसं केलेस ते मी तुला आता सांगतो. मी तुला प्राप्त व्हावे म्हणून तू लहानपणी मोठे तप केलेस. चौसष्ट वर्षे तर तू झाडाची पाने खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडलांना फार दुःख झाले व अशा या आपल्या कन्येला कोणाला द्यावे ? अशी त्यांना काळजी लागून राहिली. एकदा तिथे नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली. येण्याचे कारण मोठ्या नम्रतेने त्यांना विचारले. तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या आता उपवर झाली आहे. ती विष्णुला द्यावी. तो तिला योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी घालण्यास पाठविले आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. नंतर नारद तेथून निघून विष्णुकडे आले. सर्व हकिगत विष्ंणुंना सांगितली.       
नारद गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली. ती तुला रुचली नाही. तू रागावलीस असे पाहून तुझ्या सखीने तुझ्या रागावण्याचे कारण विचारले. तेव्हा तू सांगितलस की, महादेवावाचून मला दुसरा पती करणे नाही.असा माझा निश्र्चय आहे. असे असूनही माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे.ह्याला काय उपाय करावा? 
मग तुझ्या सखीने तुला एका घोर अरण्यात नेले. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा दिसली. त्या गुहेत जाऊन तू माझे लिंग पार्वतीसह स्थापन केलेस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलेस. त्या तुझ्या पुण्याने माझे इथले आसन हलले. नंतर मी तिथे आलो. तुला दर्शन दिले व वर मागण्यास सांगितले. तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही. मी ही गोष्ट मान्य केली व गुप्त झालो. 
पुढे दुसर्‍या दिवशी ती  व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याच पारण केलेस. 
इतक्यात तुझे वडिल तिथे आले. त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले. मग तू त्यांना सर्व हकिगत सांगितलीस. मग त्यांनी तुला मलाच देण्याचे वचन दिले. मग तुम्ही घरी गेलात. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले. अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका  व्रत असे म्हणतात.
व्रताचा विधि--ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचे असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावे, केळीचे खांब लावून ती जागा सुशोभित करावी. रांगोळी घालावी. पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे. षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. उपवास करावा. नंतर ही कहाणी करावी. जागरण करावे. या व्रताने प्राणी पापांपासून मुक्त होतो. साता जन्मांचे पातक नाहीसे होते. राज्य मिळते. स्रियांचे सौभाग्य वाढते. ह्या दिवशी काहीं खाल्ले तर सात जन्म वंध्यत्व येते. दळिद्र येते. पुत्रशोक होतो. कहाणी झाल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावे. दुसरे दिवशी उत्तरपूजा करुन व्रताचे विसर्जन करावे. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण.            

No comments:

Post a Comment