Monday, March 30, 2020

ज्ञानेश्र्वरी अध्याय पहिला Dnyaneshwari Adhyay 1


ज्ञानेश्र्वरी अध्याय पहिला भाग पहिला 
Dnyaneshwari Adhyay 1 Part 1
श्रीगणेशाय नमः । ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥ १ ॥
हे सर्वांचे मूळ असणार्‍या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणार्‍या श्रीओंकारा, तुला नमस्कार असो.; व स्वतःला स्वतः जाणण्यास योग्य असणार्‍या आणि सर्वव्यापी अशा आत्मरुपी ओंकारा तुझा जयजयकार असो. 
देवा तूंचि गणेशु । सकलमतिप्रकाशु । म्हणे निवृत्तिदासु ।
अवधारिजो जी ॥ २ ॥
( वरील विषेशांनीं युक्त अशा ) देवा, सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश, तो तूंच आहेस. निवृत्तिनाथांचे शिष्य ( ज्ञानेश्र्वर महाराज ) म्हणतात, महाराज ऐका.
हे शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेश । तेथ वर्णवपु निर्दोष ।
मिरवत असे ॥ ३ ॥
संपूर्ण वेद हीच ( त्या गणपतीची ) मूर्ति आहे; आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरुपी शरीराचें सौंदर्य शोभून राहिलें आहे.
स्मृति तेचि अवयव । देखा अंगीकभाव । तेथ लावण्याची ठेव ।
अर्थशोभा ॥ ४ ॥
आतां शरीराची ठेवण पाहा. ( मन्वादिकांच्या ) स्मृति हेच त्याचे अवयव होत. या स्मृतीतील अर्थसौंदर्याने ( ते अवयव म्हणजे ) लावण्याची केवळ खाणच बनले आहेत.  
अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें । पदपद्धती खेचणें ।
प्रमेयरत्नांची ॥ ५ ॥
अठरा पुराणें हेच ( त्याच्या ) अंगावरील रत्नखचित अलंकार; त्यांत प्रतिपादिलेली तत्त्वें हीच रत्नें व शब्दांची छंदोबद्ध रचना हीच त्यांची कोंदणे होत.  
पटबंध नागर । तेंचि रंगाथिलें अंबर ।
जेथ साहित्य वाणें सपूर । उजाळाचें ॥ ६ ॥
उत्तम प्रकारची शब्दरचना हेंच ( त्या गणपतीच्या ) अंगावरील रंगविलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेंतील अलंकार हें त्या वस्त्राचे चकचकीत तलम पोत आहे.
देखा काव्यनाटका । जे निर्धारितां सकौतुका ।
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका अर्थध्वनि ॥ ७ ॥
पाहा, कौतुकानें काव्यनाटकांविषयीं विचार केला असतां तीं काव्यनाटकें ( त्या गणपतीच्या ) पायांतील क्षुद्र घागर्‍या असून त्या, अर्थरुप आवाज रुणझुणत आहेत.
नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी ।
दिसती उचित पदें माझारीं रत्नें भली ॥ ८ ॥
त्यांत प्रतिपादलेलीं अनेक प्रकरची तत्त्वें व त्यांतील कुशलता यांचा बारकाईनें विचार केला असतां यांमध्येंहि उचित पदांची कांहीं चांगलीं रत्नें आढळतात.
तेथ व्यासादिकांचिया मती । तेचि मेखळा मिरवती ।
चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ॥ ९ ॥
येथें व्यासादिकांची बुद्धि हीच कोणी ( त्या गणपतीच्या ) कमरेला बांधलेली मेखला शोभत आहे व तिच्या पदराच्या दशा निर्दोषपणाने झळकत आहेत.
देखा षड्दर्शनें म्हणिपती । तेचि भुजांची आकृती ।
म्हणऊनि विसंवादें धरिती । आयुधें हातीं ॥ १० ॥
पाहा, सहा शास्त्रे म्हणून जी म्हणतात, तेच गणपतीचे सहा हात आणि म्हणून एकमेकींशी न मिळणारी मतें हीच कोणी त्या हातांत शस्त्रे आहेत.
तरी तर्कु तोचि परशु । नीतिभेदु अंकुश ।
वेदान्तु तो महारसु । मोदकु मिरवे ॥ ११ ॥
तरी ( काणादशास्त्ररुपी ) हातांमध्यें अनुमानरुपी परशु आहे. ( गौतमीय न्यायदर्शनरुपी ) हातात प्रमाणप्रमेयादि षोडश पदार्थांचा तत्त्वभेदरुपी अकुंश आहे. ( व्यासकृतवेदान्तसूत्ररुपी ) हातांत ब्रह्मरसानें भरलेली ब्रह्मज्ञानरुपी मोदक शोभत आहेत.  
एके हाती दंतु । जो स्वभावता खंडितु ।
तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ॥ १२ ॥
बौद्धमताचे निदर्शन करणार्‍या बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादलेले बौद्धमत, हाच कोणी स्वभावतः खंडित असलेला दांत तो  ( पातंजलदर्शनरुपी ) एका हातात धरला आहे.
मग सहजे सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु ।
धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ॥ १३ ॥
मग ( बौद्धांच्या शून्यवादाचे खंडन झाल्यावर ) सहजच येणारा (निरीश्र्वर सांख्यांचा ) सत्कातवाद हाच ( गणपतीचा ) वर देणार्‍या कमलासारखा हात होय. व (जैमिनिकृत धर्मसूत्रे ) हा धर्माची सिद्धी करणारा व अभय देणारा ( गणपततीचा ) हात होय.
देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु ।
जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥ १४ ॥
पाहा, ज्या ( गणपतीच्या ) ठिकाणी सोलीव ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद हीच सरळ अति निर्मळ व बर्‍या-वाईटाची निवड करण्यात समर्थ अशी लांब सोड आहे.
तरी संवादु तोचि दशनु । जो समताशुभ्रवर्णु ।
देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥ १५ ॥
तर, संवाद हाच दांत असून त्यांतील पक्षरहितपणा हा त्य दातांचा पांढरा रंग आहे. ज्ञानरुप बारिक डोळे असलेला विघ्नांचा नियामक असा हा देव आहे.
मज अवगमलिया दोनी । मीमांसा श्रवणस्थानीं ।
बोधमदामृत मुनी- -। अली सेविती ॥ १६ ॥
पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा ही शास्त्रें हीच त्या ( गणपतीच्या ) दोन्ही कानांच्या मला वाटतात व बोध हेंच त्यांचे मदरुपी अमृत असून मुनिरुपी भ्रमर त्यांचे सेवन करतात. 
प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ ।
सरिसे एकवटत इभ--। मस्तकावरी ॥ १७ ॥   
वर सांगितलेल्या श्रुतिस्मृत्यादिकांत प्रतिपादिलेली तत्त्वें हीच ( गणपतीच्या ) अंगावरील तेजदार पोवळी होत व द्वैत आणि अद्वैत मतें हींच त्या गजवदनाच्या मस्तकावरील गंडस्थळें असून, ती तुल्यबलानें तेथें एकत्र राहिलीं आहेत.
उपरि दशोपनिषदें । जियें उदारें ज्ञानमकरंदें ।
तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें । शोभती भलीं ॥ १८ ॥
ज्ञानरुप मध देण्यांत उदार असलेली ईशावास्यादि दशोपनिषद् सुगंधी फुलें गंडस्थळावर असलेल्या मुकुटावर चांगली शोभतात.
अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल ।
मकार महामंडल । मस्तकाकारें ॥ १९ ॥
ॐकाराची प्रथम अकारमात्रा, हे ( गणपतीचे ) दोन पाय असून, दुसरी उकारमात्रा, हे मोठे त्यांचे पोट आहे; आणि तिसरी मकारमात्रा हाच त्याच्या मोठ्या वाटोळया मस्तकाचा आकार आहे.
हे तिन्ही एकवटले । तेथें शब्दब्रह्म कवळलें ।
तें मिया गुरुकृपा नमिलें । आदिबीज ॥ २० ॥
ह्या तिन्ही मात्रा एकवटल्या म्हणजे त्यांत संपूर्ण वेद कवटला जातो. त्या बीजरुप ॐकाररुप गनपतीला मी गुरुकृपेनें नमस्कार करतो.       
आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थकलाकामिनी ।
ते शारदा विश्र्वमोहिनी । नमस्कारिली मियां ॥ २१ ॥
आतां त्यानंतर जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून, चातुर्य, वागर्थ व कला यांची देवता आहे व जिनें सर्व जग मोहून टाकले आहे, त्या सरस्वतीस मी नमस्कार करतो.
मज हृदयीं सद्गुरु । जेणें तारिलों हा संसारपूरु ।
म्हणऊनि विशेषें अत्यादरु । विवेकावरी ॥ २२ ॥
ज्यांनी मला या संसारपुरांतुन तारिलें, ते सद्गुरु माझ्या हृदयांत आहेत, म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे. .
जैसें डोळ्यां अंजन भेटे । ते वेळीं दृष्टीसी फांटा फुटे ।
मग वास पाहिजे तेथ प्रगटे । महानिधी ॥ २३ ॥
ज्याप्रमाणें डोळ्यांना अंजन मिळतें त्यावेळीं दृष्टि फांकते आणि मग ( भूमिगत ) द्रव्याचा सहज सुगावा लागून मोठा खजिना ( दृष्टीला ) प्रगट होतो;
कां चिंतामणि जालया हातीं । सदा विजयवृत्ति मनोरथीं ।
तैसा मी पूर्णकाम निवृत्ती । ज्ञानचेवो म्हणे ॥ २४ ॥
अथवा ज्याप्रमाणें चिंतामणि हस्तगत झाल्यावर मनोरथ नेहमीं विजयीं होतात. त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्रीनिवृत्तिनाथांच्यामुळें पूर्ण झाले आहेत, असे ज्ञानेश्र्वर म्हणतात.  
म्हणोनि जाणतेनो गुरु भजिजे । तेणें कृतकार्य होईजे ।
जैसें मूळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ॥ २५ ॥   
एवढ्याकरितां अहो ज्ञाते पुरुषहो, गुरुला भजावें आणि त्या योगानें कृतकृत्य व्हावे. ज्याप्रमाणें झाडाच्या मुळांना पाणी घातलें असतां अनायासें फांद्या व पानें यांना टवटवी येते;
कां तीर्थें जिये त्रिभुवनीं । तियें घडती समुद्रावगाहनीं ।
ना तरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ॥ २६ ॥
अथवा समुद्रस्नानानें त्रैलोक्यांत जेवढीं तीर्थें आहेत तेवढी घडतात किंवा अमृतरसाच्या सेवनाने सर्व रसांचे सेवन घडतें;
तैसा पुढतपुढती तोचि । मियां अभिवंदिला श्रीगुरुचि ।
जो अभिलषित मनोरुचि । पुरविता तो ॥ २७ ॥  
त्याप्रमाणें ( श्रीगुरुवंदनात सर्वांचें वंचन येत असल्यामुळे ) मी त्याच श्रीगुरुला वारंवार पूज्यताबुद्धीनें नमन केले. ( कारण की, ) तो इच्छिलेल्या आवडी पुरविणारा आहे.
आता अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुकां जन्मस्थान ।
कीं अभिनव उद्यान । विवेकतरुचें ॥ २८ ॥
आतां ( ज्यांत गीता निर्माण झाली अशा महाभारताची ) खोल विचारांनीं भरलेली कथा ( तिचें माहात्म्य ) ऐका. ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे किंवा विचाररुपी वृक्षाचा अपूर्व बगीचाच आहे;
ना तरी सर्व सुखांची आदि । जे प्रमेयमहानिधि ।
नाना नवरससुधाब्धि । परिपूर्ण हे ॥ २९ ॥
अथवा, ही सर्व सुखांचे उगमस्थान आहे, अनेक सिद्धांताचा मोठा सांठा आहे किंवा शृंगारादि नवरसरुपी अमृताने तुडुंब भरलेला असा हा समुद्र आहे;
कीं परमधाम प्रकट । सर्व विद्यांचे मूळपीठ ।
शास्त्रजातां वसिष्ठ । अशेषांचे ॥ ३० ॥
किंवा ही ( कथा ) प्रत्यक्ष श्रेष्ठ स्थान ( ब्रह्म ) असून सर्व विद्यांचे मुख्यस्थान आहे; त्याचप्रमाणें संपूर्ण शास्त्रांमध्ये ही श्रेष्ठ आहे;   
ना तरी सकळ धर्मांचें माहेर । सज्जनांचें जिव्हार ।
लावण्यरत्नभांडार । शारदेचें ॥ ३१ ॥
किंवा ही ( कथा ) सर्व धर्मांचें माहेरघर आहे; सज्जनांचा जिव्हाळा आहे; सरस्वतीच्या सौंदर्यरुप रत्नांचे भांडार आहे;
नाना कथारुपें भारती । प्रकटली असे त्रिजगतीं ।
आविष्कारोनी महामती । व्यासाचिये ॥ ३२ ॥
अथवा व्यासांच्या विशाल बुद्धीमध्यें स्फुरुन, सरस्वती या कथेच्या रुपानें त्रिजगतांत प्रकट झाली आहे.
म्हणोनि हा काव्यां रावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो ।
एथूनि रसां झाला आवो । रसाळपणाचा ॥ ३३ ॥
म्हणून हा महाभारत ग्रंथ सर्व काव्य ग्रंथांचा राजा आहे, या ग्रंथाच्या ठिकाणी मोठेपणाची सीमा झाली आहे व येथूनच रसांना रसाळपणाचा डौल आला आहे.
तेवींचि आइका आणीक एक । एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक ।
आणि महाबोधीं कोवळीक । दुणावली ॥ ३४ ॥
याच प्रमाणे याची आणखी एक महति ऐका. यापासूनच शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली व त्यामुळें ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली.
एथ चातुर्य शहाणें झालें । प्रमेय रुचीस आलें ।
आणि सौभाग्य पोखलें । सुखाचें एथ ॥ ३५ ॥
 येथें चतुरता शहाणी झाली, तत्त्वांना गोडी आली व सुखाचें ऐश्र्वर्य येथें पुष्ट झालें,
माधुर्यी मधुरता । शृंगारीं सुरेखता ।
रुढपण उचितां । दिसे भलें ॥ ३६ ॥
गोडीचा गोडपणा, शृंगाराचा सुरेखपणा, व योग्य वस्तूंना आलेला रुढपणा यापासूनच चांगला दिसूं लागला.
एथ कळाविदपण कळा । पुण्यासी प्रतापु आगळा ।
म्हणऊनि जनमेजयाचें अवलीळा । दोष हरले ॥ ३७ ॥
येथूनच कलांना कुशलता प्राप्त झाली. पुण्याला विशेष तेज चढलें व म्हणूनच ( महाभारताच्या पठनाने ) जनमेजयाचे दोष सहज नाहीसें झाले;
आणि पाहतां नावेक । रंगीं सुरंगतेची आगळीक ।
गुणां सगुणपणाचें बिक । बहुवस एथ ॥ ३८ ॥
आणि क्षणभर विचार केला असतां असें दिसून येतें कीं, रंगामध्यें सुरंगतेची वाढ येथे झाली आहे व यामुळेच सद्गुरुंना चांगुलपणाचें विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे.
भानुचेनि तेजें धवळलें । जैसें त्रैलोक्य दिसे उजळलें ।
तैसे व्यासमती कवळलें । मिरवे विश्र्व ॥ ३९ ॥
सूर्याच्या प्रकाशानें प्रकाशित झालेलें त्रैलोक्य ज्याप्रमाणें उज्जवल दिसतें, त्याप्रमाणें व्यासांच्या बुद्धीनें व्यापलेलें विश्व शोभतें;
कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें ।
तैसें भारतीं सुरवाडलें । अर्थजात ॥ ४० ॥
किंवा उत्तम जमिनींत बी पेरलें असतां त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो, त्याप्रमाणें महाभारतामध्यें चार पुरुषार्थ प्रफुल्लीत झालेले आहेत;
ना तरी नगरांतरीं वसिजे । तरी नागराचि होईजे ।
तैसे व्यासोक्तितेजें । धवळित सकळ ॥ ४१ ॥
अथवा, शहरांत राहिल्यानें जसा मनुष्य चाणाक्षच होतो, त्याप्रमाणें व्यासांच्या वाणींतील तेजानें सर्व गोष्टी उज्ज्वल ( स्पष्ट ) झाल्या आहेत;
कीं प्रथमवयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी ।
प्रगटे जैसी आगळी । अंगनाअंगीं ॥ ४२ ॥
किंवा, तारुण्यावस्थेंत स्रियांच्या ठिकाणीं ज्याप्रमाणें सौंदर्याचा बहर अधिक उठावदार दिसूं लागतो;
ना तरी उद्यानीं माधवी घडे । तेथ वनशोभेची खाणी उघडे ।
आदिलापासोनि अपाडें । जियापरी ॥ ४३ ॥
अथवा, बगीच्यांत वसंतानें प्रवेश केला असतां तेथील सर्व झाडांच्या सौंदर्याची पूर्वीपेक्षां ज्याप्रमाणे अशी खाण उघडते;
नाना घनीभूत सुवर्ण । जैसें न्याहाळितां साधारण ।
मग अळंकारीं बरवेपण । निवाडु दावी ॥ ४४ ॥
अथवा, सोन्याची लगड पाहिली असतां तें सोनें डोळ्यांत भरत नाहीं पण त्याच लगडीचे दागिने बनविल्यावर तेच सोनें आपलें सौंदर्य कांही निराळेंच दाखवितें;
तैसें व्यासोक्ती अळंकारिलें । आवडे तें बरवेपण पातलें ।
तें जाणोनि काय आश्रयिलें । इतिहासीं ॥ ४५ ॥
त्याप्रमाणें व्यासांच्या बोलण्याने अलंकृत झालें असतां आपल्याला हवा तसा चांगलेपणा येतो हे समजूनच की काय, पूर्वींच्या कथांनीं भारताचा आश्रय केला;
नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरुनि आंगीं ।
पुराणें आख्यानरुपें जगीं । भारता आलीं ॥ ४६ ॥
अथवा, जगामध्यें पुरता मोठेपणा प्राप्त व्हावा, म्हणून स्वतःच्या ठिकाणी लहानपणा घेऊन, पुराणांनी आख्यानरुपानें भारतात प्रवेश केला.
म्हणऊनि महाभारतीं जें नाहीं । तें नोहेचि लोकीं तिन्हीं ।
येणें कारणें म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७ ॥
एवढ्याकरितां महाभारतामध्यें जें नाहीं तें त्रैलोक्यांत नाहींच. या कारणामुळें संपूर्ण त्रैलोक्य व्यासांचें उष्टें म्हटलें जातें ( म्हणजे व्यासांनंतर झालेल्यांनी आपल्या सर्व कल्पना व्यासांपासून घेतल्या आहेत.
ऐसी सुरस जगीं कथा । जे जन्मभूमि परमार्था ।
मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥ ४८ ॥
अशी जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली व ब्रह्मज्ञानाला जन्म देणारी ही भारतीय कथा राजश्रेष्ठ जनमेजय राजाला वैशंपायन ऋषींनी सांगितली.
जे अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम ।
परम मंगलधाम । अवधारिजो ॥ ४९ ॥
ऐका, हे महाभारत अद्वितीय, उत्तम, अतिपवित्र, निरुपम आणि श्रेष्ठ असें मांगल्याचें ठिकाण आहे.
आतां भारतीं कमळपरागु । गीताख्यु प्रसंगु ।
जो संवादला श्रीरंगु । अर्जुनेसी ॥ ५० ॥


Custom Search

ShriRamCharitManas Part 7 श्रीरामचरितमानस भाग ७


ShriRamCharitManas Part 7 श्रीरामचरितमानस भाग ७ 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड


दोहा—रामकथा मंदाकिनी चित्रकूट चित चारु ।
तुलसी सुभग सनेह बन सिय रघुबीर बिहारु ॥ ३१ ॥
तुलसीदास म्हणतात की, रामकथा ही मंदाकिनी नदी होय, निर्मळ चित्त चित्रकूट होय आणि सुंदर स्नेह हेच वन होय. त्यामध्ये श्रीसीताराम विहार करतात. ॥ ३१ ॥
रामचरित चिंतामनि चारु । संत सुमति तिय सुभग सिंगारु ॥
जग मंगल गुनग्राम राम के । दानि मुकुति धन धरम धाम के ॥
श्रीरामांचे चरित्र हा सुंदर चिंतामणी आहे आणि संतांच्या सुबुद्धिरुपी स्रीचा सुंदर शृंगार आहे. श्रीरामांचे गुण-समुह हे जगाचे कल्याण करणारे आणि मुक्ती, धन, धर्म आणि परमधामाची प्राप्ती करुन देणारे आहेत. ॥ १ ॥
सदगुर ग्यान बिराग जोग के । बिबुध बैद भव भीम रोग के ॥
जननि जनक सिय राम प्रेम के । बीज सकल ब्रत धरम नेम के ॥
( ते गुणसमुह ) ज्ञान, वैराग्य आणि योग यांसाठी सद्गुरु आहेत आणि संसाररुपी भयंकर रोगाचा नाश करण्यासाठी देवांचे वैद्य ( अश्र्विनीकुमार ) यांच्याप्रमाणे आहेत. ते श्रीसीतारामांविषयी प्रेम उत्पन्न करणारे माता-पिता आहेत आणि व्रते, धर्म आणि नियम यांचे बीज आहेत. ॥ २ ॥
समन पाप संताप सोक के । प्रिय पालक परलोक लोक के ॥
सचिव सुभट भूपति बिचार के । कुंभज लोभ उदधि अपार के ॥
पाप,दुःख व शोक यांचा नाश करणारे, तसेच इह-परलोकाचे प्रेमाने पालन करणारे आहेत. विचार ( ज्ञान ) रुपी राजाचे शूरवीर मंत्री व लोभरुपी अपार समुद्र शोषून टाकणारे अगस्त्य मुनी आहेत. ॥ ३ ॥
काम कोह कलिमल करिगन के । केहरि सावक जन मन बन के ॥
अतिथि पूज्य प्रियतम पुरारि के । कामद घन दारिद दवारि के ॥
भक्तांच्या मनरुपी वनामध्ये राहणार्‍या काम, क्रोध आणि कलियुगातील पापरुपी हत्तींना ठार मारणारे सिंहाचे छावे आहेत आणि भगवान शिवांचे पूज्य व आवडते अतिथी आहेत. तसेच दारिद्र्यरुपी दावानल विझवून टाकण्याची कामना पूर्ण करणारे मेघ आहेत. ॥ ४ ॥
मंत्र महामनि बिषय ब्याल के । मेटत कठिन कुअंक भाल के ॥
हरन मोह तम दिनकर कर से । सेवक सालि पाल जलधर से ॥
ते विषयरुपी सापाचे विष उतरविण्यासाठी मंत्र व महामणि आहेत. ( माणसाच्या ) ललाटावर लिहिलेले व नष्ट होण्यास कठीण असलेले वाईट लेख ( वाईट प्रारब्ध ) नष्ट करणारे आहेत. अज्ञानरुपी अंधकाराचे हरण करण्याच्या बाबतीत सूर्यकिरणांसमान आणि सेवकरुपी भात-पिकाचे पालन करण्यासाठी मेघाप्रमाणे आहेत. ॥ ५ ॥
अभिमत दानि देवतरु बर से । सेवत सुलभ सुखद हरि हर से ॥
सुकबि सरद नभ मन उडगन से । रामभगत जन जीवन धन से ॥
मनोवांछित वस्तू देणार्‍या श्रेष्ठ कल्पवृक्षाप्रमाणे आहेत आणि सेवा करण्यास हरि-हराप्रमाणे सुलभ व सुख देणारे आहेत. सुकविरुपी शरदऋतूचे मनरुपी आकाश सुशोभित करणार्‍या तारागणामप्रमाणे आणि श्रीरामांच्या भक्तांचे तर जीवनघनच आहेत. ॥ ६ ॥
सकल सुकृत फल भूरि भोग से । जग हित निरुपधि साधु लोग से ॥
सेवक मन मानस मराल से । पावन गंग तरंग माल से ॥
हे संपूर्ण पुण्याच्या फलाच्या महान भोगांसमान आहेत. जगाचे वास्तविक हित करण्यासाठी साधु-संतासमान आहेत. सेवकांच्या मनरुपी सरोवरासाठी हंसासमान आणि पवित्र करण्यासाठी गंगेच्या तरंगासमान आहेत. ॥ ७ ॥
( वरील सर्व विवेचन हे श्रीरामांच्या गुणांचे आहे. ते या आधीच्या भागांत सुरु झाले आहे. )
दोहा—कुपथ कुतरक कुचालि कलि कपट दंभ पाषंड ।
दहन राम गुन ग्राम जिमि इंधन अनल प्रचंड ॥ ३२ (क) ॥
श्रीरामांचे गुण-समूह हे कुमार्ग, कुतर्क, दुराचरण आणि कलियुगातील कपट, दंभ आणि पाखंड जाळून टाकण्यासाठी इंधनास नष्ट करुन टाकणार्‍या प्रचंड अग्नीप्रमाणे आहेत. ॥ ३२ (क) ॥
रामचरित राकेस कर सरिस सुखद सब काहु ।
सज्जन कुमुद चकोर चित हित बिसेषि बड लाहु ॥ ३२ (ख) ॥
रामचरित्र हे पौर्णिमेच्या चंद्राच्या किरणांप्रमाणे सर्वांना सुख देणारे आहे, परंतु सज्जनरुपी कुमुदिनी आणि चकोराच्या चित्तासाठी ते विशेष हितकारक आणि फार लाभदायक आहे. ॥ ३२ (ख) ॥
कीन्हि प्रस्न जेहि भॉति भवानी । जेहि बिधि संकर कहा बखानी ॥
सो सब हेतु कहब मैं गाई । कथा प्रबंध बिचित्र बनाई ॥
पार्वतीने शंकराला जे प्रश्र्ण विचारले आणि त्यांनी त्यांची विस्ताराने जी उत्तरे दिली, ती सर्व मी विशेष प्रकारे कथेची रचना करुन सांगेन. ॥ १ ॥
जेहिं यह कथा सुनी नहिं होई । जनि आचरजु करै सुनि सोई ॥
कथा अलौकिक सुनहिं जे ग्यानी । नहिं आचरजु करहिं अस जानी ॥
रामकथा कै मिति जग नाहीं । असि प्रतीति तिन्ह के मन माहीं ॥
नाना भॉति राम अवतारा । रामायन सत कोटि अपारा ॥
ज्याने पूर्वी ही कथा ऐकली नसेल, त्याने ही ऐकून आश्र्चर्य करु नये. जे ज्ञानी लोक ही विलक्षण कथा ऐकतात, ते जाणत असूनही आश्र्चर्य करीत नाहीत. कारण जगामध्ये रामकथेला काही मर्यादा नाही, असा विश्र्वास त्यांच्या मनात असतो. श्रीरामांचे नाना प्रकारचे अवतार झाले आहेत आणि शंभर कोटी व अपार रामायणे आहेत. ॥ २-३ ॥
कलपभेद हरिचरित सुहाए । भॉति अनेक मुनीसन्ह गाए ॥
करिअ न संसय अस उर आनी । सुनिअ कथा सादर रति मानी ॥
मुनीश्वरांनी श्रीहरीची सुंदर चरित्रे कल्प-भेदानुसार अनेक प्रकारे गाइली आहेत, असा विचार करुन मनात संशय आणू नका आणि आदरपूर्वक प्रेमाने ही कथा ऐका. ॥ ४ ॥
दोहा—राम अनंत अनंत गुन अमित कथा बिस्तार ।
सुनि आचरजु न मानिहहिं जिन्ह कें बिमल बिचार ॥ ३३ ॥
श्रीराम अनंत आहेत, त्यांचे गुणसुद्धा अनंत आहेत. त्यांच्या कथांचाही विस्तार अनंत आहे. म्हणून ज्यांचे विचार शुद्ध आहेत, त्यांना ही कथा ऐकून आश्र्चर्य वाटणार नाही. ॥ ३३ ॥
एहि बिधि सब संसय करि दूरी । सिर धरि गुर पद पंकज धूरी ॥
पुनि सबही बिनवउँ कर जोरी । करत कथा जेहिं लाग न खोरी ॥
अशा प्रकारे सर्व संदेह दूर करुन आणि श्रीगुरुंच्या चरण-कमलांची धूळ मस्तकी धारण करुन मी पुन्हा हात जोडून सर्वांना विनंती करतो. त्यामुळे कथेच्या रचनेमध्ये कोणत्याही दोषाचा स्पर्श होणार नाही. ॥ १ ॥
सादर सिवहि नाइ अब माथा । बरनउँ बिसद राम गुन गाथा ॥
संबत सोरह सै एकतीसा । करउँ कथा हरि पद धरि सीसा ॥
आता मी आदराने श्री शिवांना मस्तक नमवून श्रीरामांच्या गुणांची पवित्र कथा सांगतो. श्रीहरींच्या चरणांवर मस्तक ठेवून विक्रम संवत १६३१ मध्ये ही कथा प्रारंभ करीत आहे. ॥ २ ॥
नौमी भौम बार मधुमासा । अवधपुरी यह चरित प्रकासा ॥
जेहि दिन राम जनम श्रुति गावहिं । तीरथ सकल तहॉ चलि आवहिं ॥
चैत्र मासातील नवमी तिथी, मंगळवार या दिवशी अयोध्येमध्ये हे चरित्र प्रकाशित झाले. ज्या दिवशी श्रीरामांचा जन्म असतो, त्या दिवशी सर्व तीर्थे तेथे येतात, असे वेद सांगतात. ॥ ३ ॥
असुर नाग खग नर मुनि देवा । आइ करहिं रघुनायक सेवा ॥
जन्म महोत्सव रचहिं सुजाना । करहिं राम कल कीरति गाना ॥
असुर, नाग, पक्षी, मनुष्य, मुनी व देव हे सर्वजण अयोध्येमध्ये येऊन श्रीरघुनाथांची सेवा करतात. बुद्धिमान माणसे जन्मोत्सव साजरा करतात आणि श्रीरामांच्या सुंदर कीर्तीचे गायन करतात. ॥ ४ ॥
दोहा—मज्जहिं सज्जन बूंद बहु पावन सरजू नीर ।
जपहिं राम धरि ध्यान उर सुंदर स्याम सरीर ॥ ३४ ॥
त्या दिवशी सज्जन लोकांचेअनेक समूह शरयू नदीच्या पवित्र जळामध्ये स्नान करतात आणि हृदयामध्ये सुंदर श्यामल शरीर असलेल्या श्रीरघुनाथांचे ध्यान करीत त्यांच्या नामाचा जप करतात. ॥ ३४ ॥
दरस परस मज्जन अरु पाना । हरइ पाप कह बेद पुराना ॥
नदी पुनीत अमित महिमा अति । कहि न सकइ सारदा बिमल मति ॥
शरयू नदीचे दर्शन, स्पर्श, स्नान आणि जल-प्राशन या गोष्टी पापांचे हरण करतात, असे वेद-पुराणे सांगतात. ही नदी मोठी पवित्र आहे, हिचा महिमा अनंत आहे. तिचे माहात्म्य अत्यंत बुद्धिमती सरस्वतीसुद्धा वर्णन करु शकत नाही. ॥ १ ॥
राम धामदा पुरी सुहावनि । लोक समस्त बिदित अति पावनि ॥
चारि खानि जग जीव अपारा । अवध तजें तनु नहिं संसारा ॥
ही शोभायमान अयोध्यापुरी श्रीरामचंद्रांचे परमधाम प्राप्त करुन देणारी आहे. ही सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध आहे आणि अत्यंत पवित्र आहे. जगामध्ये ( अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जरायुज ) या चार योनींतील अनंत जीव आहेत. यापैकी जे जीव अयोध्येमध्ये शरीर त्याग करतात, ते पुन्हा संसारात येत नाहीत. ( जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून सुटून भगवंताच्या परमधामामध्ये निवास करतात. ) ॥ २ ॥


Custom Search

Friday, March 27, 2020

ShriRamCharitManas Part 6 श्रीरामचरितमानस भाग ६


ShriRamCharitManas Part 6 श्रीरामचरितमानस भाग ६ 
ShriRamcharitManas is written by Tulsidas. He was a great devotee of God Ram. RamcharitManas is in Avadhi Language.


श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—नामु राम को कलपतरु कलि कल्यान निवासु ।
जो सुमिरत भयो भॉग तें तुलसी तुलसीदासु ॥ २६ ॥
कलियुगामध्ये श्रीरामांचे नाम हे मनोवांछित पदार्थ देणारे आणि कल्याणाचा निवास आहे. त्याचे स्मरण केल्याने भांगेप्रमाणे ( निकृष्ट ) असलेला तुलसीदास तुळशीप्रमाणे ( पवित्र ) झाला. ॥ २६ ॥
चहुँ जुग तीनि काल तिहुँ लोका । भए नाम जपि जीव बिसोका ॥
बेद पुरान संत मत एहू । सकल सुकृत फल राम सनेहू ॥
चारी युगांमध्ये तिन्ही कालांमध्ये आणि तिन्ही लोकांमध्ये नामाचा जप करुन जीव शोकमुक्त झाले आहेत. वेद, पुराणे व संत यांचे मत हेच आहे की, सर्व पुण्याचे फळ श्रीरामांवर प्रेम उत्पन्न होण्यातच आहे. ॥ १ ॥
ध्यानु प्रथम जुग मख बिधि दूजें । द्वापर परितोषत प्रभु पूजें ॥
कलि केवल मल मूल मलीना । पाप पयोनिधि जन मन मीना ॥
सत्ययुगात ध्यानाने, त्रेतायुगात यज्ञाने आणि द्वापरयुगात पूजनाने भगवान प्रसन्न होत असत. परंतु कलियुग हे फक्त पापाचे मूळ आणि मलिन आहे. यामध्ये मनुष्याचे मन पापरुपी समुद्रातील मासा बनले आहे. ॥ २ ॥
नाम कामतरु काल कराला । सुमिरत समन सकल जग जाला ॥
राम नाम कलि अभिमत दाता । हित परलोक लोक पितु माता ॥
अशा घोर कलियुगामध्ये नाम हाच कल्पतरु आहे. त्याचे स्मरण करताच ते संसारातील सर्व दगदग नाहीशी करुन टाकणारे आहे. कलियुगात हे रामनाम मनोवांछित फळ देणारे आहे. ते परलोकीचे परम कल्याण करणारे असून या लोकीचे माता-पिता आहे. ॥ ३ ॥
नहिं कलि करम न भगति बिबेकू । राम नाम अवलंबन एकू ॥
कालनेमि कलि कपट निधानू । नाम सुमति समरथ हनुमानू ॥
कलियुगामध्ये कर्म, भक्ती किंवा ज्ञानही नाही. रामनामाचा एकमात्र आधार आहे. कपटाची खाण असलेल्या कलियुगरुपी कालनेमीला ( ठार मारण्यासाठी ) रामनाम हेच बुद्धिमान आणि समर्थ असा हनुमान आहे. ॥ ३ ॥
दोहा—राम नाम नरकेसरी कनककसिपु कलिकाल ।
जापक जन प्रहलाद जिमि पालिहि दलि सुरसाल ॥ २७ ॥
रामनाम हे भगवान नृसिंह आहे, कलियुग हे हिरण्यकशिपू आहे आणि नामाचा जप करणारे लोक प्रल्हादाप्रमाणे आहेत. हे रामनाम देवांचा शत्रू असलेल्या ( कलियुगरुपी ) दैत्याला मारुन जप करणार्‍यांचे रक्षण करील. ॥ २७ ॥
भायँ कुभायँ अनख आलासहूँ । नाम जपत मंगल दिसि दसहूँ ।
सुमिरि सो नाम राम गुन गाथा । करउँ नाइ रघुनाथहि माथा ॥
प्रेमाने, वैराने, क्रोधाने किंवा आळसाने कशाही प्रकारे नाम जपल्यामुळे दाही दिशांना कल्याणच होते. त्याच रामनामाचे स्मरण करुन आणि श्रीरघुनाथांसमोर मस्तक नम्र करुन मी त्यांच्या गुणांचे वर्णन करतो. ॥ १ ॥
मोरि सुधारिहि सो सब भॉती । जासु कृपा नहिं कृपॉ अघाती ॥
राम सुस्वामि कुसेवकु मोसो । निज दिसि देखि दयानिधि पोसो ॥
ते माझे चुकलेले सर्व प्रकारे सुधारुन घेतील. त्यांची कृपा ही कृपा करुन करुन कधी तृप्त होत नाही. श्रीराम हे उत्तम स्वामी आहेत आणि माझ्यासारखा वाईट सेवक कोणी नाही. तरीही दयानिधी श्रीरामांनी आपल्या ब्रीदाचा विचार करुन माझे पालन केले. ॥ २ ॥
लोकहुँ बेद सुसाहिब रीती । बिनय सुनत पहिचानत प्रीती ॥
गनी गरीब ग्राम नर नागर । पंडित मूढ मलीन उजागर ॥
या जगामध्ये व वेदामध्ये चांगल्या स्वामीची हीच रीत प्रसिद्ध आहे की, विनंती ऐकताच तो प्रेम ओळखतो. गरीब-श्रीमंत, खेडूत-नागरिक, पंडित-मूर्ख, कुप्रसिद्ध-सुप्रसिद्ध, ॥ ३ ॥
सुकबि कुकबि निज मति अनुहारी । नृपहि सराहत सब नर नारी ॥
साधु सुजान सुसील नृपाला । ईस अंस भव परम कृपाला ॥
सुकवि-कुकवि व सर्व स्री-पुरुष हे आपापल्या बुद्धीप्रमाणे राजाची स्तुती करतात आणि साधु बुद्धिमान, सुशील, ईश्र्वरी अंशाने उत्पन्न  राजा हा, ॥ ४ ॥
सुनि सनमानहिं सबहि सुबानी । भनिति भगति नति गति पहिचानी ॥
यह प्राकृत महिपाल सुभाऊ । जान सिरोमनि कोसलराऊ ॥
त्या सर्वांचे ऐकून घेऊन आणि त्यांची वाणी, भक्ती, विनय आणि वर्तणूक ओळखून गोड वाणीने त्या सर्वांचा यथायोग्य सन्मान करतो. हा स्वभाव लौकिक राजांचा असतो. कोसलनाथ श्रीराम तर महान ज्ञानी आहेत. ॥ ५ ॥
रीझत राम सनेह निसोतें । को जग मंद मलिनमति मोतें ॥
श्रीराम हे खरेतर शुद्ध प्रेमाने प्रसन्न होतात, परंतु या जगात माझ्यापेक्षा मूर्ख आणि मलिन बुद्धीचा दुसरा कोण असणार ? ॥ ६ ॥
दोहा—सठ सेवक की प्रीति रुचि रखिहहिं राम कृपालु ।
उपल किए जलजान जेहिं सचिव सुमति कपि भालु ॥ २८ ( क) ॥
परंतु कृपाळू श्रीराम माझ्यासारख्या दुष्ट सेवकाचेही प्रेम आणि आवड नक्कीच स्वीकारतील. त्यांनी पाषाणांना तरणारे जहाज ( सेतु ) आणि वानर-अस्वलांना बुद्धिमान मंत्री बनविले. ॥ २८ ( क ) ॥
हौंहु कहावत सबु कहत राम सहत उपहास ।
साहिब सीतानाथ सो सेवक तुलसीदास ॥ २८ ( ख ) ॥
सर्व लोक मला श्रीरामांचा सेवक म्हणतात आणि मीसुद्धा ( लाज न बाळगता ) तसे म्हणवून घेतो. कृपाळू श्रीरामही ही निंदा सहन करुन घेतात की, सीतानाथांसारख्या स्वामींचा तुलसीदासासारखा ( यःकश्र्चित ) सेवक आहे. ॥ २८ ( ख ) ॥
अति बडि मोरि ढिठाई खोरी । सुनि अघ नरकहुँ नाक सकोरी ॥
समुझि सहम मोहि अपडर अपनें । सो सुधि राम कीन्हि नहिं सपनें ॥
हे माझे मोठे धाडस आणि दोष आहे. माझे पाप ऐकून नरकानेही नाक मुरडले. या विचाराने कल्पित भयामुळे मला भीती वाटत आहे, परंतु भगवान श्रीरामांनी स्वप्नातही माझ्या या दोषांकडे लक्ष दिले नाही. ॥ १ ॥
सुनि अवलोकि सुचित चख चाही । भगति मोरि मति स्वामि सराही ॥
कहत नसाइ होइ हियँ नीकी । रीझत राम जानि जन जी की ॥
उलट, माझे प्रभू श्रीरामचंद्रांनी ही गोष्ट ऐकून, पाहून आणि आपल्या सुचितरुपी चक्षूंनी निरीक्षण करुन माझ्या भक्तीचे व बुद्धीचे कौतुक केले. कारण बोलण्यात जरी चूक असली ( अर्थात मी स्वतःला भगवंताचा सेवक म्हणत-म्हणवीत असलो ) तरी हृदयात चांगुलपणा असला पाहिजे. ( मनात मी स्वताःला त्यांचा सेवक बनण्यास योग्य न मानता पापी आणि दीन आहे, असेच मानतो, हा चांगुलपणा. ) श्रीरामसुद्धा या आपल्या दासाच्या मनाची स्थिती चांगल्या प्रकारे जाणून प्रसन्न होतात. ॥ २ ॥
रहति न प्रभु चित चूक किए की । करत सुरति सय बार हिए की ॥
जेहिं अघ बधेउ ब्याघ जिमि बाली । फिरि सुकंठ सोइ कीन्हि कुचाली ॥
प्रभु रामांच्या मनात आपल्या भक्तांची चूक-भूल राहात नाही ( ते ती विसरुन जातात ) आणि त्यांच्या मनाची चांगली भावना शंभर वेळा आठवीत असतात. ज्या पापासाठी त्यांनी व्याधाप्रमाणे वालीला ठार मारले, त्याचप्रमाणे नंतर सुग्रीवसुद्धा वाईट वागला. ॥ ३ ॥
सोइ करतूति बिभीषन केरी । सपनेहुँ सो न राम हियँ हेरी ॥
ते भरतहि भेंटत सनमाने । राजसभॉ रघुबीर बखाने ॥
तशीच कृती बिभीषणाचीही होती, परंतु श्रीरामांनी ती स्वप्नातसुद्धा मनात धरली नाही. उलट भरताची भेट झाली, तेव्हा श्रीरघुनाथांनी बिभीषणाचा सन्मान केला आणि राजसभेमध्ये त्याच्या गुणांची वाखाणणी केली. ॥ ४ ॥
दोहा—प्रभु तरु तर कपि डार पर ते किए आपु समान ।
तुलसी कहूँ न राम से साहिब सीलनिधान ॥ २९ ( क) ॥
प्रभु श्रीराम हे वृक्षाखाली आणि वानर झाडांच्या फांदिवरचे. ( अर्थात कुठे मर्यादापुरुषोत्तम श्रीराम आणि कुठे फांद्यांवर उड्या मारणारे वानर. ) परंतु त्यांनी अशा वानरांना आपल्यासारखे बनविले. तुलसीदास म्हणतात की, श्रीरामांच्यासारखे शीलनिधान स्वामी कुठेही मिळणार नाहीत. ॥
राम निकाईं रावरी है सबही को नीक ।
जौं यह सॉची है सदा तौ नीको तुलसीक ॥ २९ ( ख ) ॥
हे प्रभु श्रीराम, तुमच्या चांगुलपणामुळेच सर्वांचे कल्याण आहे. ( अर्थात तुमचा कल्याणमय स्वभाव सर्वांचे भले करणारा आहे. ) ही गोष्ट खरी असेल, तर तुलसीदासाचे सुद्धा कल्याण होईल. ॥
एहि बिधि निज गुन दोष कहि सबहि बहुरि सिरु नाइ ।
बरनउँ रघुबर बिसद जसु सुनि कलि कलुष नसाइ ॥ २९ ( ग ) ॥
अशाप्रकारे आपले गुणदोष सांगून आणि सर्वांना नमस्कार करुन मी रघुनाथांच्या निर्मळ कीर्तीचे वर्णन करतो. ते ऐकल्याने कलियुगातील पापे नाहीशी होतात. ॥ २९ ( ग ) ॥
जागबलिक जो कथा सुहाई । भरद्वाज मुनिबरहि सुनाई ॥
कहिहउँ सोइ संबाद बखानी । सुनहुँ सकल सज्जन सुखु मानी ॥
याज्ञवल्क्य मुनींनी जी मधुर कथा मुनिश्रेष्ठ भरद्वाजांना ऐकविली होती, तोच संवाद मी वर्णन करुन सांगत आहे. तो सर्व सज्जनांनी सुखाने ऐकावा. ॥ १ ॥
संभु कीन्ह यह चरित सुहावा । बहुरि कृपा करि उमहि सुनावा ॥
सोइ सिव कागभुसुंडिहि दीन्हा । राम भगत अधिकारी चीन्हा ॥
प्रथम भगवान शिवांनी हे सुंदर चरित्र रचले आणि नंतर कृपा करुन ते पार्वतीला ऐकविले. शंकरांनी काकभुशुंडी हे रामभक्त असल्याचे पाहून व त्यांचा अधिकार ओळखून तेच चरित्र त्यांना दिले. ॥ २ ॥
तेहि सन जागबलिक पुनि पावा । तिन्ह पुनि भरद्वाज प्रति गावा ॥
ते श्रोता बकता समसीला । सवँदरसी जानहिं हरिलीला ॥
काकभुशुंडींकडून नंतर ते याज्ञवल्क्यांना मिळाले. त्यानंतर त्यांनी ते भरद्वाज मुनींना ऐकविले. ते दोघे वक्ता आणि श्रोता ( याज्ञवल्क्य आणि भरद्वाज ) समानशील, समदर्शी आणि हरीची लीला जाणणारे आहेत. ॥ ३ ॥
जानहिं तीनि काल निज ग्याना । करतल गत आमलक समाना ॥
औरउ जे हरिभगत सुजाना । कहहिं सुनहिं समुझहिं बिधि नाना ॥
ते दोघे आपल्या ज्ञानाने तिन्ही काळांतील घटना तळहातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे ( प्रत्यक्ष ) जाणतात आणि जे भगवंताच्या लीलांचे रहस्य जाणणारे हरिभक्त आहेत, ते हे चरित्र नानाप्रकारे सांगतात, ऐकतात व समजून घेतात. ॥ ४ ॥
दोहा—मैं पुनि निज गुर सन सुनी कथा सो सूकरखेत ।
समुझी नहिं तसि बालपन तब अति रहेउँ अचेत ॥ ३० ( क ) ॥
नंतर मी तीच कथा वाराह-क्षेत्रामध्ये आपल्या गुरुजींच्याकडून ऐकली. परंतु त्यावेळी बालपणामुळे मला विशेष समज नव्हती, त्यामुळे ते चरित्र मला चांगल्या प्रकारे समजले नाही. ॥ ३० (क) ॥
श्रोता बकता ग्याननिधि कथा राम कै गूढ ।
किमि समुझौं मैं जीव जड कलि मल ग्रसित बिमूढ ॥ ३० ( ख ) ॥
श्रीरामांच्य गूढ कथेचा वक्ता व श्रोता हे दोघे ज्ञानाचे भांडार असतात. कलियुगातील पापांनी ग्रासलेला मी महामूर्ख जड जीव ती कशी समजू शकणार बरे ? ॥ ३० ( ख ) ॥
तदपि कही गुर बारहिं बारा । समुझि परी कछु मति अनुसारा ॥
भाषाबद्ध करबि मैं सोई । मोरें मन प्रबोध जेहिं होई ॥
तरीही गुरुजींनी जेव्हा वारंवार ती कथा सांगितली, तेव्हा माझ्या बुद्धीप्रमाणे मला काहीशी समजली. आता तीच मी माझ्या मनाला समाधान मिळण्यासाठी लौकिक भाषेत लिहीत आहे. ॥ १ ॥
जस कछु बुधि बिबेक बल मेरें । तस कहिहउँ हियँ हरि के प्रेरें ॥
निज संदेह मोह भ्रम हरनी । करउँ कथा भव सरिता तरनी ॥
माझ्यामध्ये जे काही थोडे बुद्धी व विवेकाचे बळ आहे, त्यानुसार मी हरीच्या प्रेरणेने ही कथा सांगेन. मी स्वतःच्या संशय, अज्ञान व भ्रम यांचे हरण करणार्‍या कथेची रचना करीत आहे. कारण ती संसाररुपी नदी तरुन जाण्यासाठी नाव आहे. ॥ २ ॥
बुध बिश्राम सकल जन रंजनि । रामकथा कलि कलुष बिभंजनि ॥
रामकथा कलि पंनग भरनी । पुनि बिबेक पावक कहुँ अरनी ॥
रामकथा ही पंडितांना विसावा देणारी, सर्व मनुष्यांना प्रसन्न करणारी आणि कलियुगातील पापांचा नाश करणारी आहे. रामकथा कलियुगरुपी सर्पासाठी मोर आहे आणि विवेकरुपी अग्नी प्रकट करण्यासाठी अरणी ( अग्नीमंथन करण्याचे काष्ठ ) आहे. ॥ ३ ॥
रामकथा कलि कामद गाई । सुजन सजीवनि मूरि सुहाई ॥
सोइ बसुधातल सुधा तरंगिनि । भय भंजनि भ्रम भेक भुअंगिनि ॥
रामकथा ही कलियुगामध्ये सर्व मनोरथ पूर्ण करणारी कामधेनू आहे आणि सज्जन लोकांसाठी संजीवनी आहे. पृथ्वीवर हीच अमृताची नदी आहे. जन्म-मरणरुपी भयाचा नाश करणारी आहे आणि भ्रमरुपी बेडकांना खाऊन टाकणारी सर्पीण आहे. ॥ ४ ॥
असुर सेन सम नरक निकंदिनि । साधु बिबुध कुल हित गिरिनंदिनि ॥
संत समाज पयोधि रमा सी । बिस्व भार भर अचल छमा सी ॥
रामकथा ही असुरांच्या सेनेप्रमाणे असणार्‍या ( भयंकर ) नरकांचा नाश करणारी आणि साधुरुप देवांच्या कुलाचे हित करणारी पार्वती आहे. संत-समाजरुपी क्षीरसागरासाठी लक्ष्मीसारखी आहे आणि संपूर्ण विश्र्वाचा भार उचलून धरण्यासाठी अचल पृथ्वीसारखी आहे. ॥ ५ ॥
जम गन मुहँ मसि जग जमुना सी । जीवन मुकुति हेतु जनु कासी ॥
रामहि प्रिय पावनि तुलसी सी । तुलसिदास हित हियँ हुलसी सी ॥
रामकथा ही यमदूतांच्या तोंडाला काळोखी फासणार्‍या या जगातील यमुनेप्रमाणे आहे आणि जीवांना मुक्ती देण्यासाठी जणू काशीच आहे. ही कथा श्रीरामांना पवित्र तुळशीप्रमाणे आवडते आणि तुलसीदासाचे ( तुलसीदासांची आई ) हुलसी प्रमाणे मनापासून हित करणारी आहे. ॥ ६ ॥
सिवप्रिय मेकल सैल सुता सी । सकल सिद्धि सुख संपति रासी ॥
सदगुन सुरगन अंब आदिति सी । रघुबर भगति प्रेम परमिति  सी ॥

ही रामकथा शंकरांना नर्मदेप्रमाणे आवडणारी आहे. ही सर्व सिद्धींची आणि सुख-संपत्तीची खाण आहे. ही सद्गुणरुपी देवांना उत्पन्न करुन त्यांचे पालन-पोषण करणार्‍या माता अदितीसारखी आहे. ही जणू श्रीरघुनाथांच्या भक्ती व प्रेमाच्या परम सीमेसारखी आहे. ॥ ७ ॥


Custom Search