Monday, March 30, 2020

ज्ञानेश्र्वरी अध्याय पहिला Dnyaneshwari Adhyay 1


ज्ञानेश्र्वरी अध्याय पहिला भाग पहिला 
Dnyaneshwari Adhyay 1 Part 1
श्रीगणेशाय नमः । ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥ १ ॥
हे सर्वांचे मूळ असणार्‍या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणार्‍या श्रीओंकारा, तुला नमस्कार असो.; व स्वतःला स्वतः जाणण्यास योग्य असणार्‍या आणि सर्वव्यापी अशा आत्मरुपी ओंकारा तुझा जयजयकार असो. 
देवा तूंचि गणेशु । सकलमतिप्रकाशु । म्हणे निवृत्तिदासु ।
अवधारिजो जी ॥ २ ॥
( वरील विषेशांनीं युक्त अशा ) देवा, सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश, तो तूंच आहेस. निवृत्तिनाथांचे शिष्य ( ज्ञानेश्र्वर महाराज ) म्हणतात, महाराज ऐका.
हे शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेश । तेथ वर्णवपु निर्दोष ।
मिरवत असे ॥ ३ ॥
संपूर्ण वेद हीच ( त्या गणपतीची ) मूर्ति आहे; आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरुपी शरीराचें सौंदर्य शोभून राहिलें आहे.
स्मृति तेचि अवयव । देखा अंगीकभाव । तेथ लावण्याची ठेव ।
अर्थशोभा ॥ ४ ॥
आतां शरीराची ठेवण पाहा. ( मन्वादिकांच्या ) स्मृति हेच त्याचे अवयव होत. या स्मृतीतील अर्थसौंदर्याने ( ते अवयव म्हणजे ) लावण्याची केवळ खाणच बनले आहेत.  
अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें । पदपद्धती खेचणें ।
प्रमेयरत्नांची ॥ ५ ॥
अठरा पुराणें हेच ( त्याच्या ) अंगावरील रत्नखचित अलंकार; त्यांत प्रतिपादिलेली तत्त्वें हीच रत्नें व शब्दांची छंदोबद्ध रचना हीच त्यांची कोंदणे होत.  
पटबंध नागर । तेंचि रंगाथिलें अंबर ।
जेथ साहित्य वाणें सपूर । उजाळाचें ॥ ६ ॥
उत्तम प्रकारची शब्दरचना हेंच ( त्या गणपतीच्या ) अंगावरील रंगविलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेंतील अलंकार हें त्या वस्त्राचे चकचकीत तलम पोत आहे.
देखा काव्यनाटका । जे निर्धारितां सकौतुका ।
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका अर्थध्वनि ॥ ७ ॥
पाहा, कौतुकानें काव्यनाटकांविषयीं विचार केला असतां तीं काव्यनाटकें ( त्या गणपतीच्या ) पायांतील क्षुद्र घागर्‍या असून त्या, अर्थरुप आवाज रुणझुणत आहेत.
नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी ।
दिसती उचित पदें माझारीं रत्नें भली ॥ ८ ॥
त्यांत प्रतिपादलेलीं अनेक प्रकरची तत्त्वें व त्यांतील कुशलता यांचा बारकाईनें विचार केला असतां यांमध्येंहि उचित पदांची कांहीं चांगलीं रत्नें आढळतात.
तेथ व्यासादिकांचिया मती । तेचि मेखळा मिरवती ।
चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ॥ ९ ॥
येथें व्यासादिकांची बुद्धि हीच कोणी ( त्या गणपतीच्या ) कमरेला बांधलेली मेखला शोभत आहे व तिच्या पदराच्या दशा निर्दोषपणाने झळकत आहेत.
देखा षड्दर्शनें म्हणिपती । तेचि भुजांची आकृती ।
म्हणऊनि विसंवादें धरिती । आयुधें हातीं ॥ १० ॥
पाहा, सहा शास्त्रे म्हणून जी म्हणतात, तेच गणपतीचे सहा हात आणि म्हणून एकमेकींशी न मिळणारी मतें हीच कोणी त्या हातांत शस्त्रे आहेत.
तरी तर्कु तोचि परशु । नीतिभेदु अंकुश ।
वेदान्तु तो महारसु । मोदकु मिरवे ॥ ११ ॥
तरी ( काणादशास्त्ररुपी ) हातांमध्यें अनुमानरुपी परशु आहे. ( गौतमीय न्यायदर्शनरुपी ) हातात प्रमाणप्रमेयादि षोडश पदार्थांचा तत्त्वभेदरुपी अकुंश आहे. ( व्यासकृतवेदान्तसूत्ररुपी ) हातांत ब्रह्मरसानें भरलेली ब्रह्मज्ञानरुपी मोदक शोभत आहेत.  
एके हाती दंतु । जो स्वभावता खंडितु ।
तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ॥ १२ ॥
बौद्धमताचे निदर्शन करणार्‍या बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादलेले बौद्धमत, हाच कोणी स्वभावतः खंडित असलेला दांत तो  ( पातंजलदर्शनरुपी ) एका हातात धरला आहे.
मग सहजे सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु ।
धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ॥ १३ ॥
मग ( बौद्धांच्या शून्यवादाचे खंडन झाल्यावर ) सहजच येणारा (निरीश्र्वर सांख्यांचा ) सत्कातवाद हाच ( गणपतीचा ) वर देणार्‍या कमलासारखा हात होय. व (जैमिनिकृत धर्मसूत्रे ) हा धर्माची सिद्धी करणारा व अभय देणारा ( गणपततीचा ) हात होय.
देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु ।
जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥ १४ ॥
पाहा, ज्या ( गणपतीच्या ) ठिकाणी सोलीव ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद हीच सरळ अति निर्मळ व बर्‍या-वाईटाची निवड करण्यात समर्थ अशी लांब सोड आहे.
तरी संवादु तोचि दशनु । जो समताशुभ्रवर्णु ।
देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥ १५ ॥
तर, संवाद हाच दांत असून त्यांतील पक्षरहितपणा हा त्य दातांचा पांढरा रंग आहे. ज्ञानरुप बारिक डोळे असलेला विघ्नांचा नियामक असा हा देव आहे.
मज अवगमलिया दोनी । मीमांसा श्रवणस्थानीं ।
बोधमदामृत मुनी- -। अली सेविती ॥ १६ ॥
पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा ही शास्त्रें हीच त्या ( गणपतीच्या ) दोन्ही कानांच्या मला वाटतात व बोध हेंच त्यांचे मदरुपी अमृत असून मुनिरुपी भ्रमर त्यांचे सेवन करतात. 
प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ ।
सरिसे एकवटत इभ--। मस्तकावरी ॥ १७ ॥   
वर सांगितलेल्या श्रुतिस्मृत्यादिकांत प्रतिपादिलेली तत्त्वें हीच ( गणपतीच्या ) अंगावरील तेजदार पोवळी होत व द्वैत आणि अद्वैत मतें हींच त्या गजवदनाच्या मस्तकावरील गंडस्थळें असून, ती तुल्यबलानें तेथें एकत्र राहिलीं आहेत.
उपरि दशोपनिषदें । जियें उदारें ज्ञानमकरंदें ।
तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें । शोभती भलीं ॥ १८ ॥
ज्ञानरुप मध देण्यांत उदार असलेली ईशावास्यादि दशोपनिषद् सुगंधी फुलें गंडस्थळावर असलेल्या मुकुटावर चांगली शोभतात.
अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल ।
मकार महामंडल । मस्तकाकारें ॥ १९ ॥
ॐकाराची प्रथम अकारमात्रा, हे ( गणपतीचे ) दोन पाय असून, दुसरी उकारमात्रा, हे मोठे त्यांचे पोट आहे; आणि तिसरी मकारमात्रा हाच त्याच्या मोठ्या वाटोळया मस्तकाचा आकार आहे.
हे तिन्ही एकवटले । तेथें शब्दब्रह्म कवळलें ।
तें मिया गुरुकृपा नमिलें । आदिबीज ॥ २० ॥
ह्या तिन्ही मात्रा एकवटल्या म्हणजे त्यांत संपूर्ण वेद कवटला जातो. त्या बीजरुप ॐकाररुप गनपतीला मी गुरुकृपेनें नमस्कार करतो.       
आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थकलाकामिनी ।
ते शारदा विश्र्वमोहिनी । नमस्कारिली मियां ॥ २१ ॥
आतां त्यानंतर जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून, चातुर्य, वागर्थ व कला यांची देवता आहे व जिनें सर्व जग मोहून टाकले आहे, त्या सरस्वतीस मी नमस्कार करतो.
मज हृदयीं सद्गुरु । जेणें तारिलों हा संसारपूरु ।
म्हणऊनि विशेषें अत्यादरु । विवेकावरी ॥ २२ ॥
ज्यांनी मला या संसारपुरांतुन तारिलें, ते सद्गुरु माझ्या हृदयांत आहेत, म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे. .
जैसें डोळ्यां अंजन भेटे । ते वेळीं दृष्टीसी फांटा फुटे ।
मग वास पाहिजे तेथ प्रगटे । महानिधी ॥ २३ ॥
ज्याप्रमाणें डोळ्यांना अंजन मिळतें त्यावेळीं दृष्टि फांकते आणि मग ( भूमिगत ) द्रव्याचा सहज सुगावा लागून मोठा खजिना ( दृष्टीला ) प्रगट होतो;
कां चिंतामणि जालया हातीं । सदा विजयवृत्ति मनोरथीं ।
तैसा मी पूर्णकाम निवृत्ती । ज्ञानचेवो म्हणे ॥ २४ ॥
अथवा ज्याप्रमाणें चिंतामणि हस्तगत झाल्यावर मनोरथ नेहमीं विजयीं होतात. त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्रीनिवृत्तिनाथांच्यामुळें पूर्ण झाले आहेत, असे ज्ञानेश्र्वर म्हणतात.  
म्हणोनि जाणतेनो गुरु भजिजे । तेणें कृतकार्य होईजे ।
जैसें मूळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ॥ २५ ॥   
एवढ्याकरितां अहो ज्ञाते पुरुषहो, गुरुला भजावें आणि त्या योगानें कृतकृत्य व्हावे. ज्याप्रमाणें झाडाच्या मुळांना पाणी घातलें असतां अनायासें फांद्या व पानें यांना टवटवी येते;
कां तीर्थें जिये त्रिभुवनीं । तियें घडती समुद्रावगाहनीं ।
ना तरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ॥ २६ ॥
अथवा समुद्रस्नानानें त्रैलोक्यांत जेवढीं तीर्थें आहेत तेवढी घडतात किंवा अमृतरसाच्या सेवनाने सर्व रसांचे सेवन घडतें;
तैसा पुढतपुढती तोचि । मियां अभिवंदिला श्रीगुरुचि ।
जो अभिलषित मनोरुचि । पुरविता तो ॥ २७ ॥  
त्याप्रमाणें ( श्रीगुरुवंदनात सर्वांचें वंचन येत असल्यामुळे ) मी त्याच श्रीगुरुला वारंवार पूज्यताबुद्धीनें नमन केले. ( कारण की, ) तो इच्छिलेल्या आवडी पुरविणारा आहे.
आता अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुकां जन्मस्थान ।
कीं अभिनव उद्यान । विवेकतरुचें ॥ २८ ॥
आतां ( ज्यांत गीता निर्माण झाली अशा महाभारताची ) खोल विचारांनीं भरलेली कथा ( तिचें माहात्म्य ) ऐका. ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे किंवा विचाररुपी वृक्षाचा अपूर्व बगीचाच आहे;
ना तरी सर्व सुखांची आदि । जे प्रमेयमहानिधि ।
नाना नवरससुधाब्धि । परिपूर्ण हे ॥ २९ ॥
अथवा, ही सर्व सुखांचे उगमस्थान आहे, अनेक सिद्धांताचा मोठा सांठा आहे किंवा शृंगारादि नवरसरुपी अमृताने तुडुंब भरलेला असा हा समुद्र आहे;
कीं परमधाम प्रकट । सर्व विद्यांचे मूळपीठ ।
शास्त्रजातां वसिष्ठ । अशेषांचे ॥ ३० ॥
किंवा ही ( कथा ) प्रत्यक्ष श्रेष्ठ स्थान ( ब्रह्म ) असून सर्व विद्यांचे मुख्यस्थान आहे; त्याचप्रमाणें संपूर्ण शास्त्रांमध्ये ही श्रेष्ठ आहे;   
ना तरी सकळ धर्मांचें माहेर । सज्जनांचें जिव्हार ।
लावण्यरत्नभांडार । शारदेचें ॥ ३१ ॥
किंवा ही ( कथा ) सर्व धर्मांचें माहेरघर आहे; सज्जनांचा जिव्हाळा आहे; सरस्वतीच्या सौंदर्यरुप रत्नांचे भांडार आहे;
नाना कथारुपें भारती । प्रकटली असे त्रिजगतीं ।
आविष्कारोनी महामती । व्यासाचिये ॥ ३२ ॥
अथवा व्यासांच्या विशाल बुद्धीमध्यें स्फुरुन, सरस्वती या कथेच्या रुपानें त्रिजगतांत प्रकट झाली आहे.
म्हणोनि हा काव्यां रावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो ।
एथूनि रसां झाला आवो । रसाळपणाचा ॥ ३३ ॥
म्हणून हा महाभारत ग्रंथ सर्व काव्य ग्रंथांचा राजा आहे, या ग्रंथाच्या ठिकाणी मोठेपणाची सीमा झाली आहे व येथूनच रसांना रसाळपणाचा डौल आला आहे.
तेवींचि आइका आणीक एक । एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक ।
आणि महाबोधीं कोवळीक । दुणावली ॥ ३४ ॥
याच प्रमाणे याची आणखी एक महति ऐका. यापासूनच शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली व त्यामुळें ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली.
एथ चातुर्य शहाणें झालें । प्रमेय रुचीस आलें ।
आणि सौभाग्य पोखलें । सुखाचें एथ ॥ ३५ ॥
 येथें चतुरता शहाणी झाली, तत्त्वांना गोडी आली व सुखाचें ऐश्र्वर्य येथें पुष्ट झालें,
माधुर्यी मधुरता । शृंगारीं सुरेखता ।
रुढपण उचितां । दिसे भलें ॥ ३६ ॥
गोडीचा गोडपणा, शृंगाराचा सुरेखपणा, व योग्य वस्तूंना आलेला रुढपणा यापासूनच चांगला दिसूं लागला.
एथ कळाविदपण कळा । पुण्यासी प्रतापु आगळा ।
म्हणऊनि जनमेजयाचें अवलीळा । दोष हरले ॥ ३७ ॥
येथूनच कलांना कुशलता प्राप्त झाली. पुण्याला विशेष तेज चढलें व म्हणूनच ( महाभारताच्या पठनाने ) जनमेजयाचे दोष सहज नाहीसें झाले;
आणि पाहतां नावेक । रंगीं सुरंगतेची आगळीक ।
गुणां सगुणपणाचें बिक । बहुवस एथ ॥ ३८ ॥
आणि क्षणभर विचार केला असतां असें दिसून येतें कीं, रंगामध्यें सुरंगतेची वाढ येथे झाली आहे व यामुळेच सद्गुरुंना चांगुलपणाचें विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे.
भानुचेनि तेजें धवळलें । जैसें त्रैलोक्य दिसे उजळलें ।
तैसे व्यासमती कवळलें । मिरवे विश्र्व ॥ ३९ ॥
सूर्याच्या प्रकाशानें प्रकाशित झालेलें त्रैलोक्य ज्याप्रमाणें उज्जवल दिसतें, त्याप्रमाणें व्यासांच्या बुद्धीनें व्यापलेलें विश्व शोभतें;
कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें ।
तैसें भारतीं सुरवाडलें । अर्थजात ॥ ४० ॥
किंवा उत्तम जमिनींत बी पेरलें असतां त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो, त्याप्रमाणें महाभारतामध्यें चार पुरुषार्थ प्रफुल्लीत झालेले आहेत;
ना तरी नगरांतरीं वसिजे । तरी नागराचि होईजे ।
तैसे व्यासोक्तितेजें । धवळित सकळ ॥ ४१ ॥
अथवा, शहरांत राहिल्यानें जसा मनुष्य चाणाक्षच होतो, त्याप्रमाणें व्यासांच्या वाणींतील तेजानें सर्व गोष्टी उज्ज्वल ( स्पष्ट ) झाल्या आहेत;
कीं प्रथमवयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी ।
प्रगटे जैसी आगळी । अंगनाअंगीं ॥ ४२ ॥
किंवा, तारुण्यावस्थेंत स्रियांच्या ठिकाणीं ज्याप्रमाणें सौंदर्याचा बहर अधिक उठावदार दिसूं लागतो;
ना तरी उद्यानीं माधवी घडे । तेथ वनशोभेची खाणी उघडे ।
आदिलापासोनि अपाडें । जियापरी ॥ ४३ ॥
अथवा, बगीच्यांत वसंतानें प्रवेश केला असतां तेथील सर्व झाडांच्या सौंदर्याची पूर्वीपेक्षां ज्याप्रमाणे अशी खाण उघडते;
नाना घनीभूत सुवर्ण । जैसें न्याहाळितां साधारण ।
मग अळंकारीं बरवेपण । निवाडु दावी ॥ ४४ ॥
अथवा, सोन्याची लगड पाहिली असतां तें सोनें डोळ्यांत भरत नाहीं पण त्याच लगडीचे दागिने बनविल्यावर तेच सोनें आपलें सौंदर्य कांही निराळेंच दाखवितें;
तैसें व्यासोक्ती अळंकारिलें । आवडे तें बरवेपण पातलें ।
तें जाणोनि काय आश्रयिलें । इतिहासीं ॥ ४५ ॥
त्याप्रमाणें व्यासांच्या बोलण्याने अलंकृत झालें असतां आपल्याला हवा तसा चांगलेपणा येतो हे समजूनच की काय, पूर्वींच्या कथांनीं भारताचा आश्रय केला;
नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरुनि आंगीं ।
पुराणें आख्यानरुपें जगीं । भारता आलीं ॥ ४६ ॥
अथवा, जगामध्यें पुरता मोठेपणा प्राप्त व्हावा, म्हणून स्वतःच्या ठिकाणी लहानपणा घेऊन, पुराणांनी आख्यानरुपानें भारतात प्रवेश केला.
म्हणऊनि महाभारतीं जें नाहीं । तें नोहेचि लोकीं तिन्हीं ।
येणें कारणें म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७ ॥
एवढ्याकरितां महाभारतामध्यें जें नाहीं तें त्रैलोक्यांत नाहींच. या कारणामुळें संपूर्ण त्रैलोक्य व्यासांचें उष्टें म्हटलें जातें ( म्हणजे व्यासांनंतर झालेल्यांनी आपल्या सर्व कल्पना व्यासांपासून घेतल्या आहेत.
ऐसी सुरस जगीं कथा । जे जन्मभूमि परमार्था ।
मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥ ४८ ॥
अशी जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली व ब्रह्मज्ञानाला जन्म देणारी ही भारतीय कथा राजश्रेष्ठ जनमेजय राजाला वैशंपायन ऋषींनी सांगितली.
जे अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम ।
परम मंगलधाम । अवधारिजो ॥ ४९ ॥
ऐका, हे महाभारत अद्वितीय, उत्तम, अतिपवित्र, निरुपम आणि श्रेष्ठ असें मांगल्याचें ठिकाण आहे.
आतां भारतीं कमळपरागु । गीताख्यु प्रसंगु ।
जो संवादला श्रीरंगु । अर्जुनेसी ॥ ५० ॥


Custom Search

No comments:

Post a Comment