Wednesday, May 27, 2020

Dnyaneshwari Adhyay 2 Part 4 ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग ४


Dnyaneshwari Adhyay 2 Part 4 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग ४ 

ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा ओव्या ७६ ते १००    
तयापरी तो धनुर्धरु । जाहलासे दुःखें जर्जरु ।
जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु । वणवला कां ॥ ७६ ॥
७६) ज्याप्रमाणें उन्हाळ्यांत एखादा मोठा पर्वत वणव्याने व्यापला, त्याप्रमाणें अर्जुन दुःखानें जर्जर झाला होता.
म्हणोनि सहजें सुनीळु । कृपामृतें सजळु ।
तो वोळलासे श्रीगोपाळु । महामेघु ॥ ७७ ॥
७७) म्हणून जात्याच अत्यंत सांवळा व कृपामृतरुप जीवनानें युक्त, असा तो गोपाळरुपी महामेघ ( अर्जुनाकडे ) वळला.
तेथ सुदर्शनाची द्युति । तेचि विद्युलता झळकती ।
गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची ॥ ७८ ॥
७८) ( श्रीकृष्णरुपी मेघाच्या ठिकाणीं ) सुदर्शनाचें तेज हीच जणूं काय चमकणारी वीज होय आणि गंभीर बोल हाच गडगडाचा थाट होय.
आतां तो उदार कैसा वर्षेल । तेणें अर्जुनाचळु निवेल ।
मग नवी विरुढी फुटेल ॥ उन्मेषाची ॥ ७९ ॥
७९) आतां तो उदार ( श्रीकृष्णमेघ ) कसा वर्षाव करील व त्यामुळे अर्जुनरुपी पर्वत कसा शांत होईल, आणि मग ज्ञानरुपी नवीन अंकुर त्याच्या ठिकाणी कसा फुटेल, 
ते कथा आइका । मनाचिया आराणुका ।
ज्ञानदेवो म्हणे देखा । निवृत्तिदासु ॥ ८० ॥
८०) हें पाहा. ती कथा समाधानवृत्तीनें ऐका, असें निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात.
ऐसें संजयो सांगतु । म्हणे राया तो पार्थु ।
पुनरपि शोकाकुलितु । काय बोले ॥ ८१ ॥
८१) याप्रमाणें संजयानें ( धृतराष्ट्राला ) सांगितले. तो ( मग ) म्हणाला, राजा, अर्जुन पुन्हां शोकाकुल होऊन काय म्हणाला.
आइकें सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळवावें तुम्हीं मातें । 
मी सर्वथा न झुंजें येथें । भरवंसोनि ॥ ८२ ॥
८२) तें ऐक. तो खिन्न होऊन श्रीकृष्णांना म्हणाला, आतां तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करुं नका. मी कांहीं झालें तरी ह्या वेळीं निश्चित लढणार नाही.  
ऐसें येकि हेळां बोलिला । मग मौन करुनि ठेला ।
तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखोनि तयातें ॥ ८३ ॥
८३) असें एकच वेळीं बोलला. मग स्तब्ध होऊन राहिला. त्या प्रसंगी त्याला ( तसा ) पाहून श्रीकृष्णांना विस्मय वाटला. 
मग आपुलां चित्तीं म्हणे । एथ हें कायी आदरिलें येणें ।
अर्जुन सर्वथा कांहीं नेणे । काय कीजे ॥ ८४ ॥
८४) मग ( श्रीकृष्ण ) आपल्या मनांत म्हणाला, या प्रसंगीं, यानें हें काय आरंभिले आहे ! या अर्जुनाला मुळींच कांहीं कळत नाहीं, काय करावें !
हा उमजे आतां कवणेपरी । कैसेनि धीरु स्वीकारी ।
जैसा ग्रहातें पंचाक्षरी । अनुमानी कां ॥ ८५ ॥
८५) हा आतां कशानें उमजेल ? कशानें धीर धरील ? ज्याप्रमाणें एखादा मांत्रिक पिशाच्चाला ( तें कोणतें आहे व तें कसें दूर करतां येईल याचा ) विचार करतो;
ना तरी असाध्य देखोनी व्याधी । अमृतासम दिव्य औषधी ।
वैद्य सूची निरवधि । निंदानींची ॥ ८६ ॥
८६) किंवा रोग असाध्य पाहून, ज्याप्रमाणें वैद्य निर्वाणीच्या अमृततुल्य, दिव्य औषधाची ताबडतोप योजना करतो;
तैसे विवरतु असे श्रीअनंतु । तया दोहीं सैन्याआंतु ।
जयापरी पार्थु । भ्रांति सांडी ॥ ८७ ॥
८७) त्याप्रमाणें अर्जुन कोणत्या उपायानें मोह टाकील, याचा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागीं श्रीकृष्ण विचार करीत होते.
तें कारण मनीं धरिलें । मग सरोष बोलों आदरिलें ।
जैसे मातेचां कोपीं थोकलें । स्नेह आधी ॥ ८८ ॥
८८) तो ( श्रीकृष्णांनीं ) हेतु मनात धरला; मग ( ते ) रागानें बोलावयास लागले, ज्याप्रमाणें आईच्या रागांत गुप्त माया असते,
कीं औषधाचिया कडुवटपणीं । जैसी अमृताची पुरवणी ।
ते आहाच न दिसे परी गुणीं । प्रकट होय ॥ ८९ ॥
८९) किंवा, औषधाच्या कडूपणांत ज्याप्रमाणें अमृताची जोड असते; ती वर दिसत नाहीं मग गुणाच्या रुपाने पुढें स्पष्ट होते,
तैसीं वरिवरि पाहतां उदासें । आंत तरी अतिसुरसें ।
तियें वाक्यें हृषीकेशें । बोलों आदरिलीं ॥ ९० ॥
९०) त्याप्रमाणें वरवर पाहतां उदास ( कठोर ), पण आंत अति सुरस ( परिणामीं अत्यंत हितकर ) असें उपदेशाचे शब्द श्रीकृष्ण बोलूं लागले.
मग अर्जुनातें म्हणितलें । आम्हीं आजि हें नवल देखिलें ।
जें तुवां येथ आदरिलें । माझारींचि ॥ ९१ ॥
९१) मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हें जें तूं मध्येंच आरंभिलें आहेस, तें आम्हीं आज एक आश्र्चर्यच पाहिलें.
तूं जाणता तरी म्हणविसी । परी नेणिवेतें न संडिसी ।
आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी । बहुसाल नीति ॥ ९२ ॥
९२) तूं आपल्याला जाणता तर म्हणवितोस, पण मूर्खपणा टाकीत नाहींस. बरें, तुला कांहीं शिकवावें म्हटलें तर तूं नीतीच्या मोठमोठ्या गोष्टी सांगतोस !
जात्यंधा लागे पिसें । मग तें सैरा धांवे जैसें ।
तुझें शहाणपण तैसें । दिसतसे ॥ ९३ ॥
९३) जन्मांधाला वेड लागलें म्हणजे तें जसे सैरावैरा धांवतें, तसें तुझें शहाणपण दिसतें.
तूं आपणपें तरी नेणसी । परी या कौरवांतें शोचूं पहासी ।
हा बहु विस्मय आम्हांसीं । पुढतपुढती ॥ ९४ ॥
९४) तूं स्वतःला तर जाणत नाहींस, परंतु या कौरवांकरितां शोक करुं पाहतोस, याचा आम्हांला वारंवार फारच विस्मय वाटतो.
तरी सांग पां मज अर्जुना । तुजपासूनि स्थिति या त्रिभुवना ।
हे अनादि विश्र्वरचना । तें लटकें कायी ॥ ९५ ॥
९५) तर अर्जुना, मला सांग बाबा, तुझ्यामुळें या त्रिभुवनाचें अस्तित्व आहे काय ? ही विश्वाची रचना अनादि ( आहे असें म्हणतात ) तें खोटें आहे काय ?
एथ समर्थु एक आथी । तयापासूनि भूतें होती ।
तरी हें वांयाचि काय बोलती । जगामाजीं ॥ ९६ ॥
९६) तर येथें सर्वशक्तिमान असा कोणी आहे आणि त्याच्यापासून प्राणी उत्पन्न होतात, असें जें जगांत बोलतात तें उगीचच काय ?
हो कां सांप्रत ऐसें जहालें । जे हे जन्ममृत्यु तुवां सृजिले ।
आणि नाशु पावे नाशिले । तुझेनि कायी ॥ ९७ ॥
९७) आतां असें झालें कां कीं, हे जन्ममृत्यु तूं उत्पन्न केलेस ? आणि तूं मारशील तर हें मरतील होय ?
तूं भ्रमलेपणें अहंकृती । यांसि घातु न करिसी चित्तीं ।
तरी सांगे कायि हे होती । चिरंतन ॥ ९८ ॥
९८) तूं भ्रमानें अहंकार घेऊन यांचा घात करण्याचे मनांत आणिलें नाहींस, तर सांग, हे काय चिरंजीव होणार आहेत ?  
कीं तूं एक वधिता । आणि सकळ लोकु हा मरता ।
ऐसी भ्रांति झणें चित्ता । येवों देसी ॥ ९९ ॥
९९) किंवा, तूं एक मारणारा व बाकीचे सर्व लोक मरणारे अशी भ्रांति ( कदाचित ) तुझ्या चित्ताला होईल, तर ती होऊं देऊं नकोस.
अनादिसिद्ध हें आघवें । होत जात स्वभावें ।
तरी तुवां कां शोचावें । सांगे मज ॥ १०० ॥
 १००) हे सगळें ( सृष्टि ) आपोआप होतें व जातें, असा हा क्रम अनादि कालापासून असाच अव्याहत चालू आहे. तर मग तूं शोक कां करावास ? सांग मला.


Custom Search

No comments:

Post a Comment