Wednesday, August 12, 2020

Dnyaneshwari Adhyay 3 Part 2 ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग २

 

Dnyaneshwari Adhyay 3 Part 2 Ovya 26 to 50 
ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग २ ओव्या २६ ते ५०
तरी आपुलिया सवेसा । कां न मगावासि परेशा ।
देवा सुकाळु हा मानसा । पाहला असे ॥ २६ ॥
२६) तर मग हे परमेश्र्वरा, आपल्या इच्छेला येईल तसें तुजजवळून कां मागून घेऊं नये ? देवा, माझ्या मनांतील हेतु पूर्ण सफल होण्याची ही वेळ आली आहे. 
देखें सकळार्तीचें जियालें । आजि पुण्य यशासी आलें ।
हे मनोरथ जहाले । विजयी माझे ॥ २७ ॥
२७) पाहा, माझ्या सर्व मनोरथांचे जीवित सफल झालें, आज माझें पूर्व पुण्य यशस्वी झालें व माझ्या मनातील हेतु आज तडीस गेले.
जी जी परममंगळधामा । देवदेवोत्तमा । 
तूं स्वाधीन आजि आम्हां । म्हणऊनियां ॥ २८ ॥
२८) कारण, अहो महाराज, सर्वोत्कृष्ट मंगलाचें स्थान आणि ( सर्व ) देवांत श्रेष्ठ अशा देवा, तूं आमच्या ताब्यांत आला आहेस, म्हणून  
जैसें मातेचां ठायीं । अपत्या अनवसरु नाहीं ।
स्तन्यालागूनि पाहीं । जियापरी ॥ २९ ॥
२९) पाहा, जसें लहान मुलाला स्तनपान करण्यास आईच्या ठिकाणीं वेळ-अवेळ अशी कांहींच नसते;   
तैसें देवा तूतें । पुसिजतसें आवडे तें ।
आपुलेनि आर्तें । कृपानिधि ॥ ३० ॥
३०) तसें हे कृपानिधि देवा, मी आपल्या इच्छेला येईल त्याप्रमाणें तुला वाटेल तें विचारीत आहें.
तरी पारत्रिकीं हित । आणि आचरितां तरी उचित ।
तें सांगें एक निश्र्चित । पार्थु म्हणे ॥ ३१ ॥
३१) तर मग परलोकीं कल्याणकारक आणि ( इहलोकीं ) आचरण्याला तर योग्य असें जें असेल तें एक मला निश्र्चित करुन सांग, असें अर्जुन म्हणाला.
या बोला अच्युतु । म्हणतसे विस्मितु । 
अर्जुना हा ध्वनितु । अभिप्रावो ॥ ३२ ॥
३२) अर्जुनाच्या या भाषणानें श्रीकृष्ण आश्र्चर्यचकित होऊन म्हणूं लागले, अर्जुना, आम्हीं, तुला हा थोडक्यांत मतलब सांगितला
जे बुद्धियोगु सांगतां । सांख्यमतसंस्था । 
प्रकटिली स्वभावता । प्रसंगें आम्हीं ॥ ३३ ॥
३३) कारण कीं, निष्काम कर्मयोग सांगत असतांना प्रसंगानें सहजच आम्ही ज्ञानमार्गाची व्यवस्था ( ज्या हेतूनें ) स्पष्ट केली,
तो उद्देशु तूं नेणसीचि । म्हणोनि क्षोभलासि वायांचि ।
तरी आतां जाण म्यांचि । उक्त दोन्ही ॥ ३४ ॥
३४) तो आमच्या प्रतिपादनाचा हेतु तूं जाणलाच नाहींस, म्हणून उगीच रागावला आहेस. तर आतां ध्यानांत ठेव कीं, हे दोनहि मार्ग मीच सांगितलेलें आहेत.
अवधारीं वीरश्रेष्ठा । ये लोकीं या दोन्ही निष्ठा ।
मजचिपासूनि प्रगटा । अनादिसिद्धा ॥ ३५ ॥
३५) हे वीरश्रेष्ठा अर्जुना, ऐक. या लोकाममध्यें हे दोन्ही मार्ग माझ्यापासून प्रकट झालेले आहेत व ते मुळापासून तसेच चालत आलेले आहेत.
एकु ज्ञानयोगु म्हणिजे । जो सांख्यीं अनुष्ठिजे ।
जेथ ओळखीसवें पाविजे । तद् रुपता ॥ ३६ ॥
३६) त्यांपैकी एकाला ज्ञानयोग म्हणतात, त्याचें आचरण ज्ञानी लोक करतात आणि त्यांत ओळखीबरोबर परमात्मस्वरुपाशीं तन्मयता प्राप्त होतें.  
एक कर्मयोगु जाण । जेथ साधकजन निपुण ।
होवूनिया निर्वाण । पावती वेळे ॥ ३७ ॥
३७) दुसरा तो कर्मयोग समज. जेथें साधक लोक निष्णात होऊन परम गतीला पावतात, ( परंतु ) ते कांहीं कालानें पावतात.   
हे मार्गु तरी दोनी । परि एकवटती निदानीं ।
जैसीं सिद्धसाध्यभोजनीं । तृप्ति एकी ॥ ३८ ॥
३८) हे मार्ग तर दोन आहेत; परंतु ते शेवटीं एकाच ठिकाणी येऊन मिळतात. ज्याप्रमाणें तयार असलेल्या व तयार करावयाच्या अशा दोन्ही जेवणांत सारखीच तृप्ती असते; 
कां पूर्वापर सरिता । भिन्न दिसती पाहतां ।
मग सिंधुमिळणीं ऐक्यता । पावती शेखीं ॥ ३९ ॥
३९) किंवा पूर्वेकडून व पश्र्चिमेकडून वाहणार्‍या नद्या पाहिल्या तर वाहतांना वेगळाल्या दिसतात, मग समुद्रांत मिळाल्या असतां शेवटी एकच होतात; 
तैसीं दोनी ये मतें । सूचिती एका कारणातें ।
परी उपास्ति ते योग्यते-। आधीन असे ॥ ४० ॥
 ४०) त्याप्रमाणें ज्ञानयोग व कर्मयोग हे मार्ग जरी दोन आहेत, तरी ते एकाच साध्याला सुचवितात. परंतु त्यांचे आचरण करणें करणाराच्या योग्यतेवर अवलंबून आहे. 
देखें उत्प्लवनासरिसा । पक्षी फळासि झोंबे जैसा ।
सांगें नरु केवीं तैसा । पावे वेगां ॥ ४१ ॥
४१) हें पाहा. ज्याप्रमाणें पक्षी उड्डाणाबरोबर फळाला बिलगतो त्याप्रमाणें मनुष्याला त्या वेगानें तें फळ कसें प्राप्त करुन घेतां येईल ? सांग बरें. 
तो हळूहळू ढाळेंढाळें । केतुकेनि एके वेळे ।
मार्गाचेनि बळें । निश्र्चित ठाकी ॥ ४२ ॥
४२) तो हलके हलके एका फांदीवरुन दुसर्‍या फांदीवर जात जात, कांहीं वेळानें त्या मार्गाच्या आधारानें त्या फळापर्यंत खात्रीनें पोंचतो.  
तैसें देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानातें ।
सांख्य सद्य मोक्षातें । आकळिती ॥ ४३ ॥
४३) पाहा. तसें वरील दृष्टान्तांतील पक्ष्याच्या मार्गाप्रमाणें ज्ञानमार्गाचा आश्रय करुन ज्ञानी तत्क्षणींच मोक्ष आपल्या अधीन करुन घेतात.
येर योगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें ।
पूर्णता अवसरें । पावते होती ॥ ४४ ॥
४४) दुसरे जे कर्मयोगी, ते कर्मयोगाच्या आश्रयानें वेदांत सांगितलेला आपला आचारच पाळून, कांहीं कालानें पूर्णतेस पोहोंचतात.   
वांचोनि कर्मारंभ उचित । न करितांचि सिद्धवत ।
कर्महीना निश्र्चित । होईजेना ॥ ४५ ॥
४५) शिवाय योग्य कर्माचा आरंभ न करतांच कर्महीनाला सिद्धाप्रमाणें ( निष्कर्म ) निश्र्चयानें होतां येणार नाहीं. 
कां प्राप्तकर्म सांडिजे । येतुलेनि नैष्कर्म्या होईजे ।
हें अर्जुना वायां बोलिजे । मूर्खपणें ॥ ४६ ॥
४६) किंवा अधिकारपरत्वें आपल्या भागाला आलेलें कर्म टाकून द्यावें व एवढ्यानेंच निष्कर्म व्हावे, हें बोलणें अर्जुना, व्यर्थ व मूर्खपणाचें आहे.   
सांगें पैलतीरा जावें । ऐसें व्यसन कां जेथ पावे ।
तेथ नावेतें त्यजावें । घडे केवीं ॥ ४७ ॥
४७) पलीकडील तीराला कसें जावें अशी जेथें अडचण पडली आहे, तेथें नावेचा त्याग करुन कसें चालेल ? सांग बरें
ना तरी तृप्ति इच्छिजे । तरी कैसेननि पाकु न कीजे ।
कीं सिद्धुही न सेविजे । केवीं सांगें ॥ ४८ ॥
४८) अथवा, जर भोजनापासून तृप्तीची इच्छा आहे तर स्वतंपाक न करुन कसें चालेल ? किंवा तयार असलेला स्वयंपाक न सेवन करतां कसें चालेल ? सांग.
जंव निरार्तता नाहीं । तंव व्यापारु असे पाहीं ।
मग संतुष्टीचां ठायीं । कुंठे सहजें ॥ ४९ ॥
४९) जोंपर्यंत निरिच्छता प्राप्त झाली नाहीं तोंपर्यंत कर्म करणें हें राहाणारच, असें समज ; व मग आत्मतृप्ति प्राप्त झाली असतां कर्म सहजच थांबतें.
म्हणोनि आइकें पार्था । जया नैष्कर्म्यपदीं आस्था ।
तया उचित कर्म सर्वथा । त्याज्य नोहे ॥ ५० ॥
५०) म्हणून अर्जुना, ऐक. ज्याला नैष्कर्म्य स्थितीची तीव्र इच्छा आहे, त्यानें आपली विहित कर्में टाकणें मुळींच योग्य होणार नाहीं.   
 


Custom Search

No comments:

Post a Comment