Saturday, August 22, 2020

Dnyaneshwari Adhyay 3 Part 4 ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ४

 

Dnyaneshwari Adhyay 3 Part 4 
Ovya 76 to 100 
ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ४ 
ओव्या ७६ ते १००
तूं मानसा नियमु करीं । निश्र्चळु होय अंतरीं ।
मग कर्मेंद्रियें हीं व्यापारीं । वर्ततु सुखें ॥ ७६ ॥
७६) तूं मनाला आंवरुन धर व अंतःकरणांत स्थिर हो; मग ही कर्मेंद्रियें आपापले व्यवहार करीत खुशाल राहूं देत.  
म्हणशी नैष्कर्म्य होआवें । तरी एथ तें न संभवे ।
आणि निषिद्ध केवीं राहाटावें । विचारीं पां ॥ ७७ ॥
७७) कर्म टाकून देऊं असें म्हणशील, तर विहित कर्में करणें टाकून कर्मातीत ( होणें ) देहधार्‍यास संभवत नाहीं, आणि ( असें जर आहे तर मग ) शास्त्रबाह्य कर्माचें आचरण काय म्हणून करावें, याचा तूं विचार कर;    
म्हणोनि जें जें उचित । आणि अवसरेंकरुनि प्राप्त ।
तें कर्म हेतुरहित । आचर तूं ॥ ७८ ॥
७८) म्हणून जें जें करणीय व प्रसंगानुसार प्राप्त झालेलें कर्म आहे, तें तें तूं फलाशा सोडून करीत जा. 
पार्था आणीकही एक । नेणसी तूं हें कवतिक । 
जें ऐसें कर्म मोचक । आपैसें असे ॥ ७९ ॥
७९) अर्जुना, अशा या निष्काम कर्माचें आणखीहि, एक कौतुक आहे, ते तुला ठाऊक नाहीं, तें हें कीं असें ( अहंकाररहित व निष्काम बुद्धीनें केलेलें विहित, नित्य वा नैमित्तिक ) कर्म प्राण्यांना कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करतें.   
देखें अनुक्रमाधारें । स्वधर्मु जो आचरे । 
तो मोक्षु तेणें व्यापारें । निश्र्चित पावे ॥ ८० ॥  
८०) पाहा, वर्णाश्रमधर्माप्रमाणें जो आपणांस योग्य असलेल्या धर्माचें आचरण करतो त्यास त्या आचरणानें मोक्षाची प्राप्ति निश्र्चित होते.
स्वधर्मु जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पां ।  
म्हणोनि वर्ततां तेथ पापा । संचारु नाहीं ॥ ८१ ॥
८१) अरे बाबा आपला जो धर्म आहे, तोच नित्य यज्ञ होय, असें समज; म्हणून त्याचें आचरण करीत असतांना त्यांत पापाचा शिरकाव होत नाहीं,  
हा निजधर्मु जैं सांडे । कुकर्मीं रति घडे ।
तैंचि बंधु पडे । संसारिकु ॥ ८२ ॥
८२) स्वधर्माचरण सुटलें म्हणजे वाईट कर्माच्या ठिकाणीं आसक्ति उत्पन्न होते. आणि तेव्हांच त्या वाईट कर्में करणर्‍या पुरुषास संसारबंध प्राप्त होतो.  
म्हणोनि स्वधर्मानुष्ठान । तें अखंड यज्ञयाजन । 
जो करी तया बंधन । कहींच नाहीं ॥ ८३ ॥
८३) म्हणून स्वधर्माचें आचरण करणें हेंच नित्य यज्ञयाजन करण्यासारखें होय. जो असे स्वधर्माचरण करतो, तो केव्हांच बंधांत पडत नाहीं.   
हा लोकु कर्में बांधिला । जो परतंत्रा भुतला ।
तो नित्य यज्ञातें चुकला । म्हणोनियां ॥ ८४ ॥
८४) हे ( कर्माधिकारी ) लोक आपल्या नित्य यज्ञाला चुकले, म्हणून कर्मानें बद्ध होऊन परतंत्र अशा देहाच्या अधीन झाले.
आतां येचिविशीं पार्था । तुज सांगेन एकी मी कथा ।
जैं सृष्ट्यादि संस्था । ब्रह्मेनि केली ॥ ८५ ॥
८५) अर्जुना, याच संबंधाची तुला एक गोष्ट सांगतों. ब्रह्मदेवानें सृष्ट्यादि रचना जेव्हां केली,
तैं नित्ययागसहितें । सृजिलीं भूतें समस्तें ।
परी नेणतिचि तियें यज्ञातें । सूक्ष्म म्हणउनी ॥ ८६ ॥
८६) तेव्हा नित्य यज्ञा ( कर्मा ) सहित सर्व प्राणी त्यानें उत्पन्न केले; परंतु यज्ञ ( कर्म ) सूक्ष्म असल्यामुळें ते प्राणी आपल्या कर्तव्यकर्मांना मुळीच जाणत नव्हते. 
ते वेळीं प्रजीं विनविला ब्रह्मा । देवा आश्रयो काय एथ आम्हां ।
तंव म्हणे तो कमळजन्मा । भूतांप्रति ॥ ८७ ॥
८७) त्या वेळीं सर्व प्राण्यांनीं ब्रह्मदेवाला विनंती केली कीं, देवा, या लोकांत आम्हांला आधार काय ? तेव्हां ब्रह्मदेव लोकांना म्हणाला, 
तुम्हां वर्णविशेषवशें । आम्हीं हा स्वधर्मुचि विहिला असे ।
यातें उपासा मग आपैसे । काम पुरती ॥ ८८ ॥
८८) तुम्हाला वर्णानुसार असा हा स्वधर्मच आम्हीं सांगितला आहे. याचें आचरण करा म्हणजे तुमच्या मनांतील इच्छा आपोआप पूर्ण होतील.  
तुम्हीं व्रतें नियमु न करावे । शरीरातें न पीडावें । 
दुरी केंही न वचावें । तीर्थासी गा ॥ ८९ ॥
८९) ( याखेरीज ) तुम्हाला आणखी व्रतें व नियम करण्याची जरुरी नाहीं व दूर कोठें तीर्थाला जाण्याचें कारण नाहीं.
योगादिकें साधनें । साकांक्ष आराधनें ।
मंत्रयंत्रविधानें । झणीं करा ॥ ९० ॥
९०) योग वगैरे साधनें, कामनायुक्त आराधना अथवा मंत्रतंत्र इत्यादिकांचें अनुष्ठान कदाचित कराल, तर करुं नका.  
देवतांतरा न भजावें । हें सर्वथा कांहीं न करावें ।
तुम्हीं स्वधर्मयज्ञीं यजावें । अनायासें ॥ ९१ ॥
९१) स्वधर्म सोडून अन्य देवतांस भजावयाचें कारण नाही. हें सर्व करण्याचें मुळीच कारण नाहीं; तुम्ही सहजगत्या प्राप्त झालेला स्वधर्माचरणरुप यज्ञ करावा.  
अहेतुकें चित्ते । अनुष्ठा पां ययातें ।
पतिव्रता पतीतें । जियापरी ॥ ९२ ॥
९२) ज्याप्रमाणें पतिव्रता, आपल्या पतीला एकनिष्ठेने भजते त्याप्रमाणें तुम्ही मनांत कोणताहि हेतु न धरतां याचें आचरण करा.   
तैसा स्वधर्मरुप मखु । हाचि सेव्यु तुम्हां एकु ।
ऐसें सत्यलोकनायकु । म्हणता जहाला ॥ ९३ ॥
९३) अशा रीतीने तुम्हांला हाच एक स्वधर्मरुपी यज्ञ आचरण करण्यास योग्य आहे, याप्रमाणें सत्यलोकांचा अधिपती ब्रह्मदेव म्हणाला.
देखा स्वधर्मातें भजाल । तरी कामधेनु हा होईल ।
मग प्रजाहो न संडील । तुमतें सदा ॥ ९४ ॥
९४) पाहा. स्वधर्माचें आचरण जर कराल, तर हा धर्म कामधेनूप्रमाणें इच्छा पुरविणारा होईल. मग लोकहो, ही ( स्वधर्मरुपी ) कामधेनू तुम्हांला नेहमीं ( केव्हांहि ) सोडणार नाहीं.  
जें येणेंकरुनि समस्तां । परितोषु होईल देवतां ।
मग ते तुम्हां ईप्सिता । अर्थांतें देती ॥ ९५ ॥
९५) कारण, या धर्माच्या आचरणामुळें सर्व देवतांना आनंद होईल आणि मग त्या देवता तुम्हांला इच्छिलेले विषय देतील. 
या स्वधर्मपूजा पूजितां । देवतागणां समस्तां ।
योगक्षेमु निश्र्चिता । करिती तुमचा ॥ ९६ ॥
९६) या स्वधर्मरुप पूजेनें सर्व देवतांना आराधिलें असतां, त्या तुमचा खात्रीनें योगक्षेम चालवितील.
तुम्ही देवतांतें भजाल । देव तुम्हां तुष्टतील ।
ऐसी परस्परें घडेल । प्रीति जेथ ॥ ९७ ॥
९७) तुम्ही देवांचें आराधन कराल आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतील; अशी एकमेकांवर जेव्हां प्रीति जडेल;
तेथ तुम्ही जें करुं म्हणाल । तें आपैसें सिद्धी जाईल ।
वांछितही पुरेल । मानसींचें ॥ ९८ ॥
९८) तेव्हां तुम्ही जें करुं म्हणाल, तें सहजच सिद्धीस जाईल आणि मनांतील इच्छित गोष्टीहि पूर्ण होतील.
वाचासिद्धी पावाल । आज्ञापक होआल ।
म्हणिये तुमतें मागतील । महाऋद्धि ॥ ९९ ॥
९९) तुम्ही बोलाल तें खरें होईल आणि तुम्ही आज्ञा करणारें व्हाल. तुम्हांला ' आपली काय आज्ञा आहे,' म्हणून महाऋद्धि विचारतील.
जैसें ऋतुपतीचें द्वार । वनश्री निरंतर । 
वोळगे फळभार । लावण्येंसी ॥ १०० ॥
१००) ऋतुपति वसंताच्या द्वारांत वनशोभा ज्याप्रमाणें फलभार व सौंदर्यासह निरंतर सेवा करते; 



Custom Search

No comments:

Post a Comment