Sunday, September 27, 2020

ShriRamcharitmans Part 47, श्रीरामचरितमानस भाग ४७

 

ShriRamcharitmans Part 47  
Doha 228 to 230 
श्रीरामचरितमानस भाग ४७ 
दोहा २२८ ते २३० 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--तासु दसा देखी सखिन्ह पुलक गात जलु नैन ।
कहु कारनु निज हरष कर पूछहिं सब मृदु बैन ॥ २२८ ॥
सख्यांनी तिची दशा पाहिली. तिचे शरीर पुलकित झाले होते आणि नेत्र सजल झालेले होते. सर्वजणी कोमल स्वरांनी विचारु लागल्या की, ' तुझ्या आनंदाचे कारण काय बरे ! ' ॥ २२८ ॥
देखन बागु कुअँर दुइ आए । बय किसोर सब भाँति सुहाए ॥
स्याम गौर किमि कहौं बखानी । गिरा अनयन नयन बिनु बानी ॥
( ती म्हणाली, ) ' दोन राजकुमार बाग पाहण्यास आले आहेत. ते किशोर वयाचे असून फार सुंदर आहेत. ते सावळ्या व गोर्‍या रंगाचे आहेत. मी त्यांचे सौंदर्य कसे वर्णन करु ? ( कारण ) वाणीला नेत्र नाहीत आणि नेत्रांना वाणी नाही. ' ॥ १ ॥
सुनि हरषीं सब सखीं सयानी । सिय हियँ अति उतकंठा जानी ॥
एक कहइ नृपसुत तेइ आली । सुने जे मुनि सँग आए काली ॥
हे ऐकून आणि सीतेच्या मनातही उत्कंठा दाटलेली पाहून त्या सर्व चतुर सख्याही आनंदून गेल्या. तेव्हा एक सखी म्हणाली, ' हे सखी, काल विश्वामित्र मुनींच्याबरोबर आले आहेत, असे ऐकले होते, तेच हे राजकुमार असावेत. ॥ २ ॥
जिन्ह निज रुप मोहनी डारी । कीन्हे स्वबस नगर नर नारी ॥
बरनत छबि जहँ तहँ सब लोगू । अवसि देखिअहिं देखन जोगू ॥
त्यांनी आपल्या रुपाच्या मोहिनीने नगरातील स्त्री-पुरुषांना वश केले आहे. जिकडे-तिकडे सर्व लोक त्यांच्या सौंदर्याचे वर्णन करीत आहेत. ते पाहण्याजोगे आहेत. त्यांना जरुर पाहिले पाहिजे.' ॥ ३ ॥
तासु बचन अति सियहि सोहाने । दरस लागि लोचन अकुलाने ॥
चली अग्र करि प्रिय सखि सोई । प्रीति पुरातन लखइ न कोई ॥
सखीचे हे बोल सीतेला फार आवडले आणि त्यांच्या दर्शनासाठी तिचे नेत्र आसुसले . त्या प्रिय सखीला पुढे करुन सीता निघाली. शाश्र्वत प्रेम कोणी पाहू शकत नाही. ॥ ४ ॥
दोहा--सुमिरि सीय नारद बचन उपजी प्रीति पुनीत । 
चकित बिलोकति सकल दिसि जनु सिसु मृगी सभीत ॥ २२९ ॥
नारदांचे वचन आठवून सीतेच्या मनात पवित्र प्रेम उपजले. ती चकित होऊन सगळीकडे पाहू लागली. जणू बावरलेली हरिणी इकडे-तिकडे पाहात असावी. ॥ २२९ ॥
कंकन किंकिनि नूपुर धुनि सुनि । कहत लखन सन रामु हृदयँ गुनि ॥
मानहुँ मदन दुंदुभी दीन्ही । मनसा बिस्व बिजय कहँ कीन्ही ॥
कंकणे, मेखलाांच्या घागर्‍या आणि नूपुरे यांचा ध्वनी कानी येताच श्रीरामचंद्रांच्या मनात विचार येऊन, त्यांनी लक्ष्मणाला म्हतले, ( हा ध्वनी असा येत आहे की, ) ' जणू कामदेवाने विश्व जिंकण्याचा संकल्प करुन दुंदुभी वाजविल्या आहेत. ' ॥ १ ॥
अस कहि फिरि चितए तेहि ओरा । सिय मुख ससि भए नयन चकोरा ॥
भए बिलोचन चारु अचंचल । मनहुँ सकुचि निमि तजे दिगंचल ॥
असे म्हणून श्रीरामांनी वळून तिकडे पाहिले. सीतेचा मुख-चंद्र पाहण्यासाठी त्यांचे नेत्र चकोर बनले. त्यांचे सुंदर नेत्र स्थिरावले. ( एकटक पाहू लागले. ) जणू ( जनकांचे पूर्वज ) निमी राजाने संकोचाने ( निमी हे सर्वांच्या पापण्यावर निवास करतात, असे मानले जाते. त्यांनी आपली कन्या व जावई यांचा मिलन-प्रसंग पाहणे उचित वाटले नाही, म्हणून ) पापण्यांचा त्याग केला असावा. ( त्यांनी पापण्यांवर राहणे सोडल्यामुळे पापण्या मिटणे थांबले. ॥ २ ॥
देखि सीय सोभा सुखु पावा । हृदयँ सराहत बचनु न आवा ॥
जनु बिरंचि सब निज निपुनाई । बिरचि बिस्व कहँ प्रगटि देखाई ॥
सीतेचे सौंदर्य पाहून श्रीराम फार आनंदित झाले. मनात त्यांनी तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली. परंतु मुखातून शब्द फुतला नाही. ( ते सौंदर्य असे अनुपम होते की, ) जणू ब्रह्मदेवांनी आपले संपूर्ण कौशल्य साकार करुन ( सीतेच्या रुपाने ) जगाला प्रकट करुन दाखविले होते. ॥ ३ ॥        
सुंदरता कहुँ सुंदर करई ॥ छबिगृहँ दीपसिखा जनु बरई ॥
सब उपमा कबि रहे जुठारी । केहिं पटतरौं बिदेहकुमारी ॥
सीतेचे सौंदर्य सौंदर्यालाही सुंदर बनविणारे होते. ( असे वाटत होते की, ) जणू सौंदर्याच्या घरामध्ये दीप उजळला आहे. ( आजवर सौंदर्य-भवनामध्ये अंधार होता, ते भवन जणू सीतेच्या सौंदर्यरुपी दीपशिखेमुळे उजळून निघाले, पूर्वीपेक्षा फार सुंदर झाले. ) कवींनी सर्व उपमा उष्ट्या करुन टाकल्या आहेत. तेव्हा मी जनकनंदिनी सीतेला कशाची उपमा देऊ ? ॥ ४ ॥
दोहा--सिय सोभा हियँ बरनि प्रभु आपनि दसा बिचारि ॥
बोले सुचि मन अनुज सन बचन समय अनुहारि ॥ २३० ॥
( अशा प्रकारे ) मनात सीतेच्या सौंदर्याची वाखाणणी करीत व आपली झालेली मोहित दशा पाहून प्रभू श्रीरामांनी पवित्र मनाने लक्ष्मणाला समयानुकूल म्हटले, ॥ २३० ॥
तात जनकतनया यह सोई । धनुषजग्य जेहि कारन होई ॥
पूजन गौरि सखीं लै आईं । करत प्रकासु फिरइ फुलवाईं ॥
' हे बंधू जिच्यासाठी धनुष्ययज्ञ होत आहे, तीच ही जनककन्या आहे. सख्या हिला गौरीपूजनासाठी घेऊन आल्या आहेत. ही या फुलबागेला उजळून टाकीत वावरत आहे. ॥ १ ॥
जासु बिलोकि अलौकिक सोभा । सहज पुनीत मोर मनु छोभा ॥
सो सबु कारन जान बिधाता । फरकहिं सुभद अंग सुनु भ्राता ॥
तिचे अलौकिक सौंदर्य पाहून स्वभावतः पवित्र माझे मन विचलित झाले आहे. त्याचे कारण त्या विधात्यालाच ठाऊक. परंतु हे बंधू ,माझी मंगलदायक उजवी अंगे स्फुरण पावू लागली आहेत. ॥ २ ॥
रघुबंसिन्ह कर सहज सुभाऊ । मनु कुपंथ पगु धरइ न काऊ ॥
मोहि अतिसय प्रतीति मन केरी । जेहिं सपनेहुँ परनारि न हेरी ॥
रघुवंशी लोकांचा हा सहज स्वभाव आहे की, त्यांचे मन कधी कुमार्गावर पाऊल टाकीत नाही. मला माझ्या मनाची खात्री आहे की, त्याने ( जागृतीतच काय ) स्वप्नातही पर-स्त्रीवर दृष्टी टाकलेली नाही. ॥ ३ ॥
जिन्ह कै लहहिं न रिपु रन पीठी । नहिं पावहिं परतिय मनु डीठी ॥
मंगन लहहिं न जिन्ह कै नाहीं । ते नरबर थोरे जग माहीं ॥
रणामध्ये शत्रूंना ज्यांची पाठ दिसत नाही, पर-स्त्री ज्यांचे मन आणि दृष्टी मोहून टाकू शकत नाही, आणि ज्यांच्याकडून याचकाला कधी नकार मिळत नाही, असे श्रेष्ठ पुरुष जगात फार थोडे आहेत. ॥ ४ ॥   



Custom Search

No comments:

Post a Comment