Saturday, November 28, 2020

Shri RamCharitManas Part 63 श्रीरामचरितमानस भाग ६३

 

Shri RamCharitManas Part 63 
Doha 284 to 287 
श्रीरामचरितमानस भाग ६३ 
दोहा २८४ ते २८७ 
श्रीरामचरितमानस बालकाण्ड

दोहा—जाना राम प्रभाउ तब पुलक प्रफुल्लित गात ।

जोरि पानि बोले बचन हृदयँ न प्रेमु अमात ॥ २८४ ॥

त्यांनी श्रीरामांचा प्रभाव जाणला. तेव्हा त्यांचे अंग आनंदाने रोमांचित झाले. ते हात जोडून म्हणाले. त्यांच्या हृदयांत प्रेम मावत नव्हते. ॥ २८४ ॥

जय रघुबंस बनज बन भानू । गहन दनुज कुल दहन कृसानू ॥

जय सुर बिप्र धेनु हितकारी । जय मद मोह कोह भ्रम हारी ॥

‘ हे रघुकुलरुपी कमलवनाच्या सूर्या, हे राक्षस कुलरुपी दाट जंगलाला जाळून टाकणार्‍या अग्ने, तुमचा विजय असो. हे देव, ब्राह्मण व गाई यांचे हित करणारे, तुमचा विजय असो. हे मद, क्रोध आणि भ्रम यांचे हरण करणारे, तुमचा विजय असो. ॥ १ ॥

बिनय सील करुना गुन सागर । जयति बचन रचना अति नागर ॥

सेवक सुखद सुभग सब अंगा । जय सरीर छबि कोटि अनंगा ॥

हे विनय, शील, कृपा इत्यादी गुणांचे समुद्र आणि बोलण्यात अत्यंत चतुर, तुमचा विजय असो. हे सेवकांना सुख देणारे, सर्वांगसुंदर व शरीरामध्ये कोट्यावधी कामदेवांचे लावण्य धारण करणारे, तुमचा विजय असो. ॥ २ ॥

करौं काह मुख एक प्रसंसा । जय महेस मन मानस हंसा ॥

अनुचित बहुत कहेउँ अग्याता । छमहु छमामंदिर दोउ भ्राता ॥

मी एका मुखाने तुमची प्रशंसा कशी करु ? हे महादेवांच्या मनरुपी मानस-सरोवरातील हंसा, तुमचा विजय असो. मी नकळत तुम्हांला पुष्कळ अनुचित बोललो. हे क्षमेचे मंदिर असलेल्या दोन्ही बंधूंनो, मला क्षमा करा.

कहि जय जय जय रघुकुलकेतू । भृगुपति गए बनहि तप हेतू ॥

अपभयँ कुटिल महीप डेराने । जहँ तहँ कायर गवँहिं पराने ॥

हे रघुकुळाचे प्रतापस्वरुप श्रीरामचंद्र, तुमचा विजय असो, जय असो, जय असो. ‘ असे म्हणून परशुराम तप करण्यासाठी वनात निघून गेले. परशुरामांनाही पराजित करणार्‍या श्रीरामांचा द्वेष केल्यामुळे दुष्ट राजे विनाकारण घाबरुन जाऊन हळूच इकडे-तिकडे पळून गेले. ॥ ४ ॥

दोहा—देवन्ह दीन्हीं दुंदुभीं प्रभु पर बरषहिं फूल ।

हरषे पुर नर नारि सब मिटी मोहमय सूल ॥ २८५ ॥

देवांनी नगारे वाजविले व प्रभूंच्यावर फुलांचा वर्षाव करु लागले. जनकपुरीचे सर्व स्त्री-पुरुष आनंदित झाले. त्यांचे अज्ञानामुळे उत्पन्न झालेले दुःख दूर झाले. ॥ २८५ ॥

अति गहगहे बाजने बाजे । सबहिं मनोहर मंगल साजे ॥

जूथ जूथ मिलि सुमुखि सुनयनीं । करहिं गान कल कोकिलबयनीं ॥

जोरजोराने वाद्ये वाजू लागली. सर्वांनी मंगल श्रृंगार केला. सुंदर वदनी, सुंदर नयनी आणि कोकिळेसारखा मधुर आवाज असणार्‍या स्त्रिया झुंडींनी जमून सुंदर गाणी गाऊ लागल्या. ॥ १ ॥

सुखु बिदेह कर बरनि न जाई । जन्मदरिद्र मनहुँ निधि पाई ॥

बिगत त्रास भइ सीय सुखारी । जनु बिधु उदयँ चकोरकुमारी ॥

जनक राजांचा आनंद अवर्णनीय होता. जणू जन्माने गरीब असलेल्याला धनाचा खजिना सापडला. सीतेचे भय विरु लागले. तिला इतका आनंद झाला, जसा चंद्रोदयामुळे चकोरीला होतो. ॥ २ ॥

जनक कीन्ह कौसिकहि प्रनामा । प्रभु प्रसाद धनु भंजेउ रामा ॥

मोहि कृतकृत्य कीन्ह दुहुँ भाईं । अब जो उचित सो कहिअ गोसाईं ॥

जनकराजांनी विश्र्वामित्रांना प्रणाम केला आणि म्हटले, ‘ प्रभूंच्या कृपेनेच श्रीरामचंद्रांनी धनुष्य मोडले. दोन्ही भावांनी मला कृतार्थ केले. हे स्वामी, आता योग्य असेल ते सांगा. ‘ ॥ ३ ॥

कह मुनि सुनु नरनाथ प्रबीना । रहा बिबाहु चाप आधीना ॥

टूटतहीं धनु भयउ बिबाहू । सुर नर नाग बिदित सब काहू ॥

मुनी म्हणाले, ‘ हे चतुर राजा, तसे पाहता विवाह हा धनुर्भंगावर अवलंबून होता. धनुष्य भंग पावताच विवाह झाला. देव, मनुष्य, नाग या सर्वांना हे माहीत आहे. ॥ ४ ॥

दोहा—तदपि जाइ तुम्ह करहु अब जथा बंस ब्यवहारु ।

बूझि बिप्र कुलबृद्ध गुर बेद बिदित आचारु ॥ २८६ ॥

तरीही तुम्ही जाऊन आपल्या कुलाचा जो आचार असेल, तो ब्राह्मणांना, कुलातील वयोवृद्धांना आणि गुरुंना विचारुन तसेच वेदात सांगितल्याप्रमाणे जसा असेल, तसा करा. ॥ २८६ ॥

दूत अवधपुर पठवहु जाई । आनहिं नृप दसरथहि बोलाई ॥

मुदित राउ कहि भलेहिं कृपाला । पठए दूत बोलि तेहि काला ॥

अयोध्येला दूत पाठवा. राजा दशरथांना बोलावून आणा. ‘ राजांनी प्रसन्न होऊन म्हटले, ‘ हे कृपाळू, फार छान.’ आणि त्याचवेळी दूतांना बोलावून अयोध्येला पाठविले. ॥ १ ॥

बहुरि महाजन सकल बोलाए । आइ सबन्हि सादर सिर नाए ॥

हाट बाट मंदिर सुरबासा । नगरु सँवारहु चारिहुँ पासा ॥

नंतर महाराजांनी सर्व श्रेष्ठींना बोलाविले. सर्वांनी येऊन राजाला आदराने अभिवादन केले. राजांनी सांगितले, बाजार, रस्ते, घरे, देवालये आणि नगर यांना चोहीकडून सजवा. ॥ २ ॥

हरषि चले निज निज गृह आए । पुनि परिचारक बोलि पठाए ॥

रचहु बिचित्र बितान बनाई । सिर धरि बचन चले सचु पाई ॥

श्रेष्ठी प्रसन्न होऊन आपापल्या घरी आले. त्यानंतर राजांनी नोकरांना बोलावून आज्ञा दिली की, सुंदर मंडप सजवून तयार करा. ‘ ते ऐकून सर्वांनी आज्ञा शिरसावंद्य मानून ते आनंदाने गेले. ॥ ३ ॥

पठए बोलि गुनी तिन्ह नाना । जे बितान बिधि कुसल सुजाना ॥

बिधिहि बंदि तिन्ह कीन्ह अरंभा । बिरचे कनक कदलि के खंभा ॥

त्यांनी अनेक कारागिरांना बोलाविले. ते सर्व मंडप बनविण्यांत वाकबदार होते. त्यांनी ब्रह्मदेवांना वंदन करुन काम सुरु केले आणि प्रथमतः सोन्याच्या केळींचे खांब तयार केले. ॥ ४ ॥

दोहा—हरित मनिन्ह के पत्र फल पदुमराग के फूल ।

रचना देखि बिचित्र अति मनु बिरंचि कर भूल ॥ २८७ ॥

हिरव्यागार पाचूंची पाने व फळे बनविली. माणकांची फुले बनविली. मंडपाची अत्यंत विलक्षण रचना पाहून ब्रह्मदेवांचे मनही भुलून गेले. ॥ २८७ ॥

बेनु हरित मनिमय सब कीन्हे । सरल सपरब परहिं नहिं चीन्हे ॥

कनक कलित अहिबेलि बनाई । लखि नहिं परइ सपरन सुहाई ॥

हिरव्या पाचूंपासून सरळ व गाठीचे वेळू असे बनविले की, ते खरे की पाचूचे हे ओळखून येत नव्हते. सोन्याच्या सुंदर नागवेली बनविल्या. पानांसह त्या इतक्या छान दिसत होत्या की, ओळखता येत नव्हत्या. ॥ १ ॥

तेहि के रचि पचि बंध बनाए । बिच बिच मुकुता दाम सुहाए ॥

मानिक मरकत कुलिस पिरोजा । चीरि कोरि पचि रचे सरोजा ॥

त्याच नागवेलींपासून कलाकुसर करुन बांधण्यासाठी दोर्‍या केल्या. मधून –मधून मोत्यांच्या सुंदर झालरी लावल्या. माणके, पाचू, हिरे आणि नीलमणी ही रत्ने कापून, कोरुन आणि कलाकुसर करुन त्यांपासून लाल, हिरवी, शुभ्र आणि निळ्या रंगांची कमळे बनविली गेली. ॥ २ ॥

किए भृंग बहुरंग बिहंगा । गुंजहिं कूजहिं पवन प्रसंगा ॥

सुर प्रतिमा खंभन गढ़ि काढ़ीं । मंगल द्रब्य लिएँ सब ठाढ़ीं ॥

भुंगे आणि अनेक रंगांचे पक्षी बनविले. ते हवेमुळे आपोआप गुंजारव व कूजन करीत होते. खांबांवर देवांच्या मूर्ती कोरल्या होत्या. त्या सर्व मूर्ती मंगल द्रव्ये घेऊन उभ्या होत्या. ॥ ३ ॥

चौकें भॉंति अनेक पुराईं । सिंधुर मनिमय सहज सुहाईं ॥

गजमुक्तांपासून सहज अशा अनेक प्रकारच्या रांगोळ्या 

काढल्या होत्या. ॥ ४ ॥



Custom Search

No comments:

Post a Comment