Saturday, April 3, 2021

Shri DnyaneshwariAdhyay 6 Part 17श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग १७

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 6 Part 17 
Ovya 481 to 497 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग १७ 
ओव्या ४८१ ते ४९७

म्हणोनि याकारणें । तूंतें मी सदा म्हणें ।

योगी होय अंतःकरणें । पंडुकुमरा ॥ ४८१ ॥

४८१) म्हणून या कारणास्तव हे अर्जुना, तूं मनानें योगी हो, असे मी नेहमीं तुला म्हणतों.

मूळ श्लोक

योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना ।

श्रद्धावान् भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥ ४७ ॥

४७) माझ्या ठिकाणीं जडलेल्या अंतःकरणानें युक्त होऊन ( मद्रुप होऊन ), जो मनुष्य श्रद्धेनें माझी ( भजनाची त्रिपुटी मीच होऊन ) भक्ति करतो, तो सर्व प्रकारच्या योग्यांपेक्षां श्रेष्ठ प्रकारचा योगी मला वाटतो. 

अगा योगी जो म्हणिजे । तो देवांचा देव जाणिजे ।

आणि सुखसर्वस्व माझें । चैतन्य तो ॥ ४८२ ॥

४८२) अर्जुना, योगी जो म्हणतात, तो देवांचा देव जाणावा; आणि माझें सुखसर्वस्व व माझा आत्मा तो आहे. 

जया भजता भजन भंजावें । हें भक्तिसाधन जें आघवें ।

तें मीचि जाहलों अनुभवें । अखंडित ॥ ४८३ ॥

४८३) ज्या पुरुषाला, भजन करणारा, भजन व भज्य अशी भक्तिसाधनांची जी त्रिपुटी, ती सर्व अनुभवानें सदोदित मद्रूपच आहे;

मग तया आम्हां प्रीतीचें । स्वरुप बोलीं निर्वचे ।

ऐसें नव्हे गा तो साचें । सुभद्रापती ॥ ४८४ ॥

४८४) मग अर्जुना, त्याच्या आमच्या प्रेमाचें स्वरुप शब्दानें सांगतां येईल, असा तो खरोखर नाहीं.

तया एकवटलिया प्रेमा । जरी पाड़ें पाहिजे उपमा ।

तरी मी देह तो आत्मा । हेचि होय ॥ ४८५ ॥

४८५) त्या ऐक्यभावाच्या प्रेमाला जर योग्य उपमा हवी असेल तर मी देह व तो आत्मा, ही होय.

ऐसें भक्तचकोरचंद्रें । तेथ त्रिभुवनैकनरेंद्रें ।

बोलिलें गुण समुद्रें । संजयो म्हणे ॥ ४८६ ॥

४८६) याप्रमाणें तेथें भक्तरुपी चकोरांचे चंद्र, त्रैलोक्याचे एकमेव राजे व गुणांचे समुद्र, असे जे श्रीकृष्णपरमात्मा, ते बोलले, असें संजय म्हणाला. 

तेथ आदिलापासूनि पार्था । ऐकिजे ऐसीचि अवस्था ।

दुणावली हें यदुनाथा । पावों सरलें ॥ ४८७ ॥

४८७) तेथें भगवंताचें बोलणें ऐकावें, अशी जी अर्जुनाला तीव्र इच्छा होती, ती पहिल्यापेक्षां दुप्पट झाली, असेम भगवंताना कळून चुकलें.

कीं सावियाचि मनीं तोषला । जे बोला आरिसा जोडला ।

तेणें हरिखें आतां उपलवला । निरुपील ॥ ४८८ ॥

४८८) त्यामुळें त्यांच्या मनांत सहजच संतोष उत्पन्न झाला; कारण त्यांच्या बोलण्याचें यथार्थ ग्रहण करणारा अर्जुनरुपी आरसा त्यांना प्राप्त झाला. त्या आनंदाच्या योगानें अंतःकरण प्रफुल्लित झालेले श्रीकृष्ण आता सविस्तर निरुपण करतील.

तो प्रसंगु आहे पुढां । जेथ शांतु दिसेल उघडा ।

तो पालविजेल मुडा । प्रमेयबीजांचा ॥ ४८९ ॥

४८९) तो प्रसंग पुढें आहे. जेथें शांतरस स्पष्ट दिसेल, असें जें प्रतिपाद्य विषयरुपी बीजाचें सांठवण, तें ( मोकळें करुन ) विस्तृत तर्‍हेनें श्रोत्यांच्या मनांत पेरण्यांत येईल.

जे सात्त्विकाचेनि वडपें । गेलें आध्यात्मिक खरपें ।

सहजें निरोळले वाफे । चतुरचित्ताचे ॥ ४९० ॥

४९०) कारण कीं सत्त्वगुणाच्या दृष्टीनें मानसिक तापरुपी डिखळे विरघळून, योग्य चित्ताचे वाफे सहज तयार झाले.

वरी अवधानाचा वाफसा । लाघला सोनयऐसा ।

म्हणोनि पेरावया धिंवसा । निवृत्तीसी ॥ ४९१ ॥

४९१) आणखी सोन्यासारखा अवधानरुपी वाफसा मिळाला; म्हणून श्रीनिवृत्तिनाथांस पेरण्याची इच्छा झाली. 

ज्ञानदेव म्हणे मी चाडें । सद्गुरुंनीं केला कोडें ।

माथां हात ठेविला तें फुडें । बीजचि वाइलें ॥ ४९२ ॥

४९२) ज्ञानेश्र्वरमहाराज म्हणतात, सद्गुरुंनीं कौतुकानें मला चाडें केले व माझ्या मस्तकावर जो हात ठेवला, तें उघड उघड बीजच घातलें 

म्हणऊनि येणें मुखें जे निगे । तें संतांचां हृदयीं साचचि लागे ।

हें असो सांगें श्रीरंगें । बोलिलें जें ॥ ४९३ ॥

४९३) म्हणून या माझ्या मुखांतून जें निघेल तें संतांच्या मनाला खरोखर पटेल. श्रोते म्हणतात, हें रुपक राहूं दे; श्रीकृष्णपरमात्मा जेम कांहीं म्हणाले, ते तूं सांग.  

परी तें मनाचां कानीं ऐकावें । बोल बुद्धीचां डोळां देखावे ।

हे साटोवाटी घ्यावे । चित्ताचिया ॥ ४९४ ॥

४९४) ( असे म्हटल्यावर ज्ञानेक्ष्वर महाराज म्हणतात, मी सांगतों ) पण तें मनाच्या कानानें ऐकलें पाहिजें. माझे शब्द बुद्धीच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजेत. हे माझे शब्द चित्त देऊन त्याच्या मोबदला घेतले पाहिजेत.

अवधानाचेनि हातें । नेयावे हृदयाआंतौते ।

हे रिझवितील आयणीतें । सज्जनांचिये ॥ ४९५ ॥

४९५) हे शब्द अवधानाच्या द्वारां मनाच्या आंत घ्यावेत; हे शब्द सज्जनांच्या बुद्धीला समाधान देतील.

हे स्वहितातें निवविती । परिणामातें जीवविती ।

सुखाची वाहविती । लाखोली जीवा ॥ ४९६ ॥

४९६) हे शब्द आत्महिताला स्थिर करतील, पूर्ण अवस्थेला जगवितील आणि जीवाला सुखाची लाखोली वाहवितील.

आतां अर्जुनेंसी मुकुंदें । नागर बोलिजेल विनोदें ।

तें वोंवियेचेनि प्रबंधें । सांगेन मी ॥ ४९७ ॥

४९७) आतां अर्जुनाशीं श्रीकृष्ण चांगलें कौतुकानें बोलतील. तें त्यांचें बोलणें मी ओंवी बंधाने सांगेन.

इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

 श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः 

( श्लोक ४७, ओव्या ४९७ ) ॐश्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ॥



Custom Search

No comments:

Post a Comment