Monday, June 28, 2021

Dnyaneshwari Adhyay 8 Part 11 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग ११

 

Dnyaneshwari
Adhyay 8 Part 11 
Ovya 261 to 271 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ८ भाग ११ 
ओव्या २६१ ते २७१
मूळ श्लोक
वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् ।
अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॥ २८ ॥
२८) वेदाध्ययन, यज्ञ, तपश्चर्या अथवा दान यांमध्यें जें जें पुण्यकारक फल सांगितलेलें आहे, त्या सर्व फलांहून अधिक फल हें ( जीव ब्रह्म यांचें ऐक्यरुपी ज्ञान ) आहे; हें जाणून योगी त्यांत ( वरील वेदाध्ययनादिकांच्या मार्गानें प्राप्त होणारीं स्वर्गसुखासारखीं फलें त्यांस ) मागें टाकून अत्यंत श्रेष्ठ अशा स्थानाप्रत जातो.   
वरी वेदाध्ययनाचें जालें । अथवा यज्ञाचें शेतचि पिकलें ।
कां तपोदानांचें जोडलें । सर्वस्व हन जें ॥ २६१ ॥
२६१) जरी वेदाच्या अध्ययनानें मिळणारें पुण्य प्राप्त झालें, अथवा यज्ञरुप शेतच पिकलें, किंवा तपाचें अथवा दानाचें असलेलें सर्वस्व, पुण्य मिळालें. 
तया आघवियांचि पुण्याचा मळा । भारु आंतौनि जया ये फळा ।
जें परब्रह्म निर्मळ । सांठि न सरे ॥ २६२ ॥
२६२) ( तरी ) त्या सर्वच पुण्याच्या मळ्याला पुष्कळ पीक येऊन जें फळ येतें, तें फळ नित्य शुद्ध परमात्म्याच्या तुलनेला येत नाही. 
जें नित्यानंदाचेनि मानें । उपमेचां कांटाळा न दिसे सानें ।
पाहा पा वेदयज्ञादि साधनें । जया सुखा ॥ २६३ ॥
२६३) जें स्वर्गसुख, नित्यानंदाच्या मानानें उपमेच्या ताजव्यांत घालून पाहिलें असतां लहान दिसत नाही; पाहा कीं, ज्या सुखाच्या प्राप्तीकरितां वेदयज्ञादि साधनें आहेत;
जें विटे ना सरे । भोगितयाचेनि पवाडें पुरे ।
पुढती महासुखाचें सोयरें । भावंडचि ॥ २६४ ॥
२६४) जे ( स्वर्गसुख ) विटत नाहीं व संपत नाहीं, भोगणार्‍याच्या इच्छा पुरवितें आणि शिवाय जें स्वर्गसुख ब्रह्मसुखाचें धाकटें भावंडच आहे.    
ऐसें दृष्टीचेनि सुखपणें । जयासी अदृष्टाचें बैसणें ।
जें शतमखींहि आंगवणें । नोहेंचि एका ॥ २६५ ॥ 
२६५) अशा तर्‍हेचें दिसण्यांतच जें सुख आहे व ज्याला अदृष्टाचा ( संस्काररुपानें असलेल्या धर्माचा ) आधार आहे व जें शंभर यज्ञ करुनदेखील कित्येकांना साध्य होत नाहींच. 
तयातें योगीश्र्वर अलौकिकें । दिठीचेनि हाततुकें ।
अनुमानिती कौतुकें । तंव हळुवट आवडे ॥ २६६ ॥  
२६६) त्या स्वर्सुखाला योगेश्र्वर ( आपल्या ) लोकोत्तर विचारदृष्टिरुपी हातांवर लीलेनेंच वजन करुन त्या स्वर्गसुखाच्या योग्यतेचें अनुमान करतात, तों तें त्यांना अगदीच हलकें दिसून येतें 
 मग तया सुखाची किरीटी । करुनिया गा पाउटी ।
परब्रह्माचिये पाठीं । आरुढती ॥ २६७ ॥
२६७) अर्जुना, मग ते योगेश्र्वर त्या स्वर्गसुखाची पायरी करुन परब्रह्माच्या पटावर बसतात.  
ऐसें चराचरैकभाग्य । जें ब्रह्मेशां आराधनायोग्य ।
योगियांचें भोग्य । भोगधन जें ॥ २६८ ॥
२६८) याप्रमाणें स्थावरजंगमात्मक जगाचें जें एकमेव भाग्य, जें ब्रह्मदेव व शंकर यांनाहि आराधना करण्यास योग्य व जें योग्यांना भोगण्याला योग्य, असें भोगरुपी ऐक्य आहे.       
जो सकळ कळांची कळा । जो परमानंदाचा पुतळा ।
जो जिवाचा जिव्हाळा । विश्र्वचिया ॥ २६९ ॥
२६९) जो ( परमात्मा ) सर्व कळांची कळा आहे, जो परमानंदाची मूर्ति आहे, व जो विश्र्वाच्या जीवाचा जिव्हाळा आहे,
जो सर्वज्ञतेचा वोलावा । जो यादव कुळींचा कुळदिवा ।
तो कृष्ण जी पांडवा- । प्रती बोलिला ॥ २७० ॥
२७०) जो परमात्मा सर्वज्ञतेचें जीवन आहे; जो यादवांच्या कुलाचा कुलदीप आहे, असा श्रीकृष्ण अर्जुनास येणेंप्रमाणें बोलला.
ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांतु । संजयो रायासी असे सांगतु ।
तेचि परियसा पुढां मातु । ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा ॥ २७१ ॥
२७१) अशी ही कुरुक्षेत्रावरील हकीकत संजय, राजा धृतराष्ट्राला सांगत होता. तीच गोष्ट पुढें तुम्ही ऐका, असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात.  
॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ब्रह्माक्षरनिर्देशोा नाम अष्टमोऽध्यायः ॥ ( श्लोक २८, ओव्या २७१ )
॥ ॐश्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ॥  




Custom Search

No comments:

Post a Comment