Sunday, June 27, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 8 Part 6 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग ६

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 8 Part 6 
Ovya 137 to 159 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग ६ 
ओव्या १३७ ते १५९
नातरी देहांतींचि मियां यावें । मग आपणयातें न्यावें ।
हेंही नाहीं स्वभावें । जे आधीचि मज मीनले ॥ १३७ ॥
१३७) अथवा, मरणाच्या वेळेलाच मी यावें आणि नंतर त्यांना आपणाकडे न्यावें ( म्हणजें आपल्या स्वरुपांत मिळवावें ), असें करावे लागत नाहीं, कारण ते ( भक्त ) आधीच मला सहज मिळालेलें असतात.   
येरी शरीराचां पा सलिली । असतेपण हेंचि साउली ।
वांचूनि चंद्रिका ते ठेली । चंद्रीच आहे ॥ १३८ ॥
१३८) एर्‍हवीं चंद्राच्या चांदण्याचा भास जरी पाण्यांत झाला, तरी तें चांदणें चंद्राच्याच ठिकाणीं असतें, त्याप्रमाणें शरीररुप पाण्यांत जरी तो भक्त दिसला, तरी तो नुसता भासमात्र आहे. वास्तविक तो माझ्या स्वरुपींच आहे.   
ऐसे जे नित्ययुक्त । तयासि सुलभ मी सतत । 
म्हणऊनि देहांतीं निश्र्चित । मीचि होती ॥ १३९ ॥
१३९) याप्रमाणें जें माझ्या ठिकाणीं नित्य जडलेले असतात, त्यांना मी नेहमी जवळ आहे, म्हणून ते देह पडल्यावर खात्रीने मीच होतात.  
मग क्लेशतरुची वाडी । जे तापत्रयाग्नीची सगडी ।
जे मृत्युकाकासि कुरोंडी । सांडिली आहे ॥ १४० ॥
१४०) नंतर जे ( शरीर ) दुःखरुप वृझांचीबाग, व आध्यात्माचि तीन तापरुपी विस्तवाची शेगडी व मृत्युरुपी कावळ्यास उतरुन टाकलेला बळी आहे.    
जें दैन्याचें दुभतें । जें महाभयातें वाढवितें ।
जें सकळ दुःखाचें पुरतें । भांडवल ॥ १४१ ॥
१४१) जें दैन्य प्रसवणारें आहे, जें मरणाला पोसतें व जें सर्व दुःखाचे पुरे भांडवल आहे,  
जें दुर्मतीचें मूळ । जें कुकर्माचें फळ ।
जें व्यामोहाचें केवळ । स्वरुपचि ॥ १४२ ॥
१४२) जें दुष्ट बुद्धीचें उत्पत्तिस्थान व वाईट क्रियांचें फल आहे, जे केवळ मूर्तिमंत गाढ अविवेकच आहे,
जें संसाराचें बैसणें । जें विकाराचें उद्यानें ।
जें सकळ रोगांचें भाणें । वाढिलें आहे ॥ १४३ ॥
१४३) जें संसाराची बैठक आहे, जें विकाररुपी झाडांची बाग आहे व जें सर्व रोगांचें वाढलेलें ताट आहे;   
जें काळाचा खिचउशिटा । जें आशेचा आंगवठा ।
जन्ममरणाचा वोलिंवटा । स्वभावें जें ॥ १४४ ॥
१४४) जें मृत्युचें खाऊन राहिलेले अन्न आहे. जें मूर्तिमंत आशा आहे, जें जन्म व मृत्युची स्वाभाविक वाहती वाट आहे. 
जें भुलीचें भरिंव । जें विकल्पाचें वोतिंव ।
किंबहुना पेंव । विंचवाचें ॥ १४५ ॥
१४५) जें भ्रमाचें भरलेले व संशयाचें ओतलेले आहे; फार काय सांगावें ? जें विंचवाचे पेंव आहे.
जें व्याघ्राचें क्षेत्र । जे पण्यांगनेचें मैत्र ।
जें विषयविज्ञानयंत्र । सुपूजित ॥ १४६ ॥
१४६) जें शरीर, वाघाचें वसतिस्थान आहे, जें वेश्येच्या स्नेहाप्रमाणें ( दिखाऊ ) आहे; जें विषयांचा अनुभव आणून देणारें सुपूजित यंत्रच आहे, 
जें लावेचा कळवळा । निवालिया विषोदकाचा गळाळा ।
जें विश्र्वासु आंगवळा । संवचोरचा ॥ १४७ ॥
१४७) जें राक्षसीची दिखाऊ कळकळ आहे, जे निवालेल्या विषाचा घोट आहे, जें सावांचे सोंग घेतलेल्या चोराचा मिळविलेला विश्वास आहे.
जें कोढियाचें खेंव । जें कालसर्पाचें मार्दव ।
जें गोरीचें स्वभाव । गायन जें ॥ १४८ ॥
१४८) जें रक्तपित्याचें आलिंगन आहे, जेम हटकून मारणार्‍या सापाचा मऊपणा आहे व जें पारध्याचें स्वाभाविक गायन आहे;  
जें वैरियाचा पाहुणेरु । जें दुर्जनाचा आदरु ।
हें असो जें सागरु । अनर्थाचा ॥ १४९ ॥
१४९) जें शत्रूचा पाहुणचार आहे, जें दुष्ट लोकांचा सन्मान आहे; हें राहूं द्या. जें ( सर्व ) अनर्थांचा समुद्र आहे;  
जें स्वप्नीं देखिलें स्वप्न । जें मृगजळें सासिन्नलें वन ।
जें धूम्ररजांचें गगन । ओतलें आहे ॥ १५० ॥
१५०) जें ( शरीर ) स्वप्नांत पाहिलेले स्वप्न आहे, अथवा मृगजळाच्या पाण्यानें भरास आलेलें रान आहे, किंवा जें शरीर म्हणजे धुराच्या कणांचें बनविलेले आकाश आहे; 
ऐसें जें हें शरीर । तें ते पवतीची पुढती नर ।
जें होऊनि ठेले अपार । स्वरुप माझें ॥ १५१ ॥
१५१) असें ( अनर्थकारक व खोटें ) जें शरीर तें, जे पुरुष माझें अमर्याद स्वरुपच होऊन राहिलेले आहेत, त्यांस पुन्हां प्राप्त होत नाहीं. 
मूळ श्लोक
आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन ।
मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥ १६ ॥
१६) अर्जुना, ब्रह्मलोकासकट सर्व लोकींचे प्राणी पुनर्जन्म पावणारे आहेत, हे कुंतीपुत्रा, परंतु मजप्रत आल्यानंतर पुनर्जन्म नाहीं.  
एर्‍हवी ब्रह्मपणाचिये भडसे । न चुकतीचि पुनरावृत्तीचे वळसे ।
परि निवटलियांचे जैसे । पोट न दुखे ॥ १५२ ॥
१५२) सहजच विचार करुन पाहिलें तर ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला तरी, त्यास पुनः पुनः येणारे जन्ममरणांचे फेरे चुकतच नाहीत. परंतु ज्याप्रमाणें मेलेल्या माणसाचें पोट दुखत नाहीं; 
नातरी चेइलियानंतरें । न बुडिजे स्वप्नींचेनि महापूरें ।
तेवीं मातें पावले ते संसारें । लिंपतीचि ना ॥ १५३ ॥
१५३) अथवा जागा झाल्यानंतर माणूस स्वप्नांतील महापुरानें बुडत नाहीं; त्याप्रमाणें जें माझ्या स्वरुपीं प्राप्त झाले, ते पुरुष संसारबंधनांत सांपडत नाहींत, 
एर्‍हवीं जगदााराचें सिरें । जें चिरस्थापीयांचे धुरे ।
ब्रह्मभुवन गा चवरे । लोकाचळाचें ॥ १५४ ॥
१५४) एर्‍हवीं जगदाकाराचा शिरोभाग आणि सर्व चिरस्थायी पदार्थांमध्ये अग्रगण्य व स्वर्गदि लोकरुपी पर्वताचें शिखर जो सत्यलोक ( ब्रह्मदेवाचा लोक ); 
जिये गांवींचा पहारु दिवोवरी । एका अमरेंद्राचें आयुष्य न धरी ।
विळोनि पांती उठी एकसिरी । चवदाजणांची ॥ १५५ ॥
१५५) ज्या सत्यलोकरुपी गांवाच्या प्रहर दिवसपर्यंत एका इंद्राचें आयुष्य टिकत नाहीं, ( तर त्या गांवाच्या ) एका दिवसांत एकसारखी चौदा इंद्रांची पंगत उठते; 
मूळ श्लोक
सहस्त्रयुगपर्यन्तमहर्यद्ब्रह्मणो विदुः ।
रात्रिं युगसहस्त्रान्तां तेऽहोरात्रविदो जनाः ॥ १७ ॥
१७) एक सहस्त्र युगें ( चार युगांच्या सहस्त्र चौकड्या ) झालीं म्हणजे संपणारा असा ब्रह्मदेवाचा एक दिवस होय; आणि एक सहस्त्र युगें राहणारी ( ब्रह्मदेवाची ) एक रात्र होय, असें जे जानतात, ते ( ब्रह्मदेवाचे ) अहोरात्र जाणणारे होत.  
जैं चोकडिया सहस्त्र जाये । तैं ठायेठावो विळुचि होय ।
आणि तेसेंचि सहस्त्रे भरिये पाहें । रात्री जेथ ॥ १५६ ॥
१५६) चार युगांच्या जेव्हां हजार फेर्‍या होतात, तेव्हां ब्रह्मदेवाचा एक पूर्ण दिवसच होतो व पाहा, त्याचप्रमाणें हजार चौकड्या भरल्या म्हणजे जेथील एक रात्र होते,  
येवढे अहोरात्र जेथिंचे । तेणें न लोटती जे भाग्याचे । 
देखती ते स्वर्गींचे । चिरंजीव ॥ १५७ ॥
१५७) ज्या ठिकाणचा दिवस व रात्र एवढी मोठी आहेत, त्या कालांत जे मरत नाहींत, ते भाग्यवान् हा दिवस ( आपल्या डोळ्यांनी ) पाहातात. ते स्वर्गांतील चिरंजीव होत. 
येरां सुरगणाची नवाई । विशेष सांगावी येथ कांई ।
मुदला इंद्राचीचि दशा पाहीं । जे दिहाचे चौदा ॥ १५८ ॥
१५८) इतर देवांचे या ठिकाणीं विशेष आश्र्चर्य काय सांगावयाचें आहे ! मुख्य देवांचा राजा जो इंद्र त्याचीच दशा पाहा कीं, ते इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसांत चौदा होतात. 
परि ब्रह्मयाचियाहि आठां प्रहारांतें । आपुलियां डोळां देखते । 
आहाति गा तयांतें । अहोरात्रविद म्हणिपे ॥ १५९ ॥
१५९) परंतु ब्रह्मदेवाच्याहि आठां प्रहारांना आपल्या डोळ्यांनीं पाहाणारे जे आहेत, त्यास ब्रह्मदेवाच्या दिवसरात्रींना जाणणारे म्हणावेत.   



Custom Search

No comments:

Post a Comment